"ते" - ७

Submitted by मुरारी on 4 March, 2013 - 01:24

"ते" -१

"ते" -२

"ते" -३

"ते" -४

"ते" -५

"ते" -६

मी त्या झाडापाशी आलो , सर्व सामान गोळा केलं, पिशवीत भरलं. घड्याळात पाहिलं ४ वाजत आलेले होते, चला निघूया आता, लेसर मशीन उचलेलं आणि चालायला लागलो,मध्ये मध्ये आजूबाजूला नजर होतीच,एकट्याला आता चांगलीच भीती वाटत होती , चांगलंच अंधारल होतं. अचानक आभाळात वीज कडाडली ,आणि मी जास्तच घाबरलो .जवळपास पळायलाच लागलो. आता हे कारंज दिसतंय ते ओलांडल कि जमीन , ती ओलांडली कि चढ, आणि आपण सुरक्षित , असाच विचार करून पळत होतो , तेवढ्यात फरशीवरच्या शेवाळावरून पाय घसरला , आणि मी सणसणीत आपटलो, डोक कारंज्याच्या कठड्यावर आपटलं.. क्षणात रक्ताची चिळकांडी उडाली ..तोंडात कडूशार चव पसरली आणि हळूहळू समोरचा देखावा अस्पष्ट
व्हायला लागला.........................

*****************************

a

ग्लानीत कुणीतरी खेचत ,ओढत घेऊन जातंय एवढं समजत होतं, डोक्यात कलकलाट होत होता, डोळे अजिबात उघडवत नव्हते, समोरचं सर्वच अस्पष्ट ,अंधारमय गुलाबीसर धुक्यात हरवून जात होत किती वेळ गेला समजलं नाही, जाग आली तीच एका अंधाऱ्या जागेत. ताड्कन उठून उभा राहिलो, शरीर आत्यंतिक भीतीने थरथर कापत होतं. काय घडलंय ते आठवलं, एकट्याने या जागेत येण्याची खूप मोठी चूक केलेली होती मी, कारंज्यावर आपटून मी पडलो तिथवर आठवत होतं,पण आता कुठे आहे मी ? इतका घाबरलेला होतो कि हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं.. श्वासांचा आवाज त्या शांततेत इतका येत होता कि, तोच ऐकून "ते"येतील कि काय असे वाटायला लागले, माझा हात नकळत जखमेवर गेला आणि .. .... शरीरातल्या सर्व नसा आवळून घेतल्यागत डोक्यातून प्रचंड जीवघेणी कळ उठली,
"आ .... ई.. ग...".. मी जोरात ओरडलो पण तोंडातून आवाज आलाच नाही .. अचानक घामाने शरीर थबथबल.. डोळे मिटायला लागले .. भान हरपलं

*****

कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. भयंकर वायब्रेशन जाणवत होतं. हा अंधार कसला? हे देवा मी परत इथेच आलो? कसा? आत्ता तर मी.. आत्ता तर मी स्वताला संपवण्यासाठी समुद्रात उडी घेतलेली होती, त्यांनी मला परत येथे आणलं कि काय ? डोकं भयंकर दुखतंय , पण हे कसं शक्य आहे ? काहीतरी गडबड होत होती .
मी माझे हातपाय पाहिले , डोक्याची जखम सोडल्यास सर्व अंग शाबूत होतं, काहीतरी घोळ आहे.. लागलेली आग इतक्यातच विझली ? पावसाने दगा दिला , अजूनही कोसळतोय . परमेश्वरा काय खेळ खेळतो आहेस , सुखाने मरूही देत नाहीयेस.

******

हे कसले विचार येतायेत मनात ? मी कधी उडी मारली ? कुठून आणि ? मला हे काय आठवतंय ? कि माझ्याच कल्पना ?
शिऱ्याला कसं कळणार मी आलो नाहीये घरी ते ? अर्थात समजल असेलच , तो मला शोधायला निघालाही असेल , पण मी आहे कुठे?

*****

कोण शिऱ्या ? मी कोणाच नाव घेतोय ? हे कुठलं यंत्र खिशात आहे ? कँलक्युलेटर ? असा? हा सुरूही होत नाहीये ? हा माझ्याकडे कसा ? पाठीवरची पिशवी सुद्धा माझी नाहीये , ठीके नंतर बघू, इथून मला बाहेर पडायलाच हवं. ज्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी मी जीव द्यायला निघालो होतो , त्यांच्याच तावडीत आलोय. नियती माझ्याशी क्रूर चेष्टा करतेय ? कि तिने मला परत एक संधी दिलीये ? भाऊ काकाचं ऐकायला हवं होत.. खूप घाई केली मी, माझी विशेष रसायन भले यांच्या हवेत पेट घेतात , पण शेवटी पाणी पडल्यावर आग हि विझणारच. आणि हे फक्त 'ते' नाहीत , मृत झालेल्या
व्यक्ती सुद्धा यांच्या तावडीतून सुटलेल्या नाहीत , मरणानंतरच्या शरीरातून मुक्त झालेल्या त्यांच्या आत्मिक उर्जेचा सुद्धा हे आपल्या अस्तित्वासाठी वापर करतायेत , असली अभद्र युती मोडून काढायला मी एकटा किती पुरा पडणार, किती जन्म घ्यावे लागतील, या साठी ?

*****

त्या विचित्र वातावरण असलेल्या खोलीत विचारांवर ताबा ठेवण केवळ अशक्य झालेलं होतं. एकाच वेळी मी दोन आयुष्य जगत होतो. मेंदू फाटेल कि काय असं वाटत होतं. आत्तापर्यंत केवळ स्वप्नात दिसणारा , जाणवणारा जयदीप आता प्रत्यक्षात माझ्याशी एकरूप झालेला होता. आत्तापर्यंत आमच्यात जी एक सीमा रेषा असायची ती पूर्णपणे विरून गेलेली होती. एखाद्या हार्ड डिस्क मधला संपूर्ण डेटा, दुसर्या हार्ड डिस्क मध्ये टाकून ती फुल करून टाकल्यासारखी माझी अवस्था झालेली होती , एकच वेळी प्रचंड प्रमाणात माहिती , आठवणी , भावना माझ्यावर आदळत होत्या, त्यात जीव वाचवून इथून निघून जायचं हेही मधेच आठवत होतंच.प्रत्येक जुना क्षण दोन आठवणीत विभागला गेलेला होता.
डोक्यात प्रचंड कळ आल्याने तसाच खाली बसून राहिलेलो होतो . पण एक गोष्ट चांगली झाली कि, या नवीन धक्क्यामुळे मी इथे एकटा अडकल्याची भीतीची जाणीव खूपच कमी झाली , लक्ष विभागलं गेलं , नाहीतर फक्त घाबरूनच जीव नक्की गेला असता. भयानक जागा होती . मी या गढीत येऊन पडलेलो होतो . विचित्र कुबट वास भरून राहिलेला होता. थोडा वेळ तसाच दबा धरून बसलो , फक्त बाहेर कसं पडायचं याच विचारावर लक्ष केंद्रित केलं. मगाशी जाणवलेली वायब्रेशंस आता वाढलेली होती, कुठली तरी यंत्र चालू असावीत तसा आवाज येत होता .
तिथे नक्की काहीतरी घडत होतं. एक बंद खिडकी दिसली, मी धडपडत तिथपर्यंत गेलो, ती खिडकी काही केल्या उघडत नव्हती, फुटलेल्या काचेच्या एका भोकातून मी बाहेर पाहिलं , बापरे , मी गढीतल्या सर्वात वरच्या मजल्यावर होतो. खाली भयाण अंधार दाटलेला होता, हातपाय लटलट कापायला लागले, देवाचं नाव घ्यायला लागलो. इथून मी बाहेर कसा पडू ? भीतीने मी जोरात ओरडलो. पण माझा आवाज बाहेर पडलाच नाही . मी अजून जोरात ओरडलो,बेभान होऊन शिऱ्याच्या नावाने हाका मारायला लागलो. पण मुक्या सारखी अवस्था झालेली होती. त्या अवकाशात माझा आवाजाला काही किमंत नव्हती ,माझा आवाजतिथे अस्तित्वातच नव्हता.
उरल सुरलं अवसान सुद्धा गेलं,चक्क खाली बसून रडायला लागलो.

*****

डोळ्यातून पाणी वाहतंय , मी रडतोय? तेही ह्यांना घाबरून? माझं शरीर , माझा स्वताचाच स्पर्श , सगळ अनोळखी का वाटतंय ? ह्या कुठल्या आठवणी आहेत ? मी नक्की कुठेय ? अरे ? खिशात कसला उजेड झालाय? मी खिशातल ते यंत्र बाहेर काढलं ते चमकत होत.
battery down,please charge the phone.

हा फोन आहे ? असा ? घड्याळ आहे यावर १ वाजून ४० मिनिट , तारीख २८ जुलै २०१२

२०१२ ?????

हे कसं शक्य आहे ?
जवळपास २५ वर्ष पुढची तारीख?

*****

शिट्स , फोन पण बंद झाला. आता इथे उजेड कसा करू , मला काहीच दिसत नाहीये .
हा विचित्र आवाज येणं थांबणार आहे काय ? मला खूप भीती वाटतेय. डोक फुटेल आता .
बराच वेळ मी तसाच बसून होतो. मग एक कल्पना सुचली , जयदीप येथे येऊन गेला होता, त्याला या जागेची कल्पना आहे , तोच कदाचित बाहेर काढू शकेल , थोडा वेळ त्याला देऊन पाहू , आता जे काही होईल ते होऊद्नेत , त्यावर आपलं नियंत्रण नसणारे हे माहित असून सुद्धा मी डोळे मिटले , आणि

मनातले विचार थांबवले.

*****

मला कल्पना आलीये, मी परत अस्तित्वात आलोय, विचित्र वाटतंय काहीतरी , भावना शब्दात मांडता येत नाहीयेत. बर्याच दिवसांनी झोपेतून जग आल्यासारखं वाटतंय,सगळं विस्कळीत झालंय, आत्ताचा पण मीच , आणि आधीचा पण मीच. शरीर फक्त बदललेलं.
पण याचा विचार नंतर करता येईल, इथून बाहेर पडायचा प्रयत्न करायला हवा . मी खोलीत अंदाजे हात फिरवून चाचपडून पाहिलं. एक पिशवी हाताला लागली, बरंच सामान होत त्यात मी उचकटून बाहेर काढलं , बरेसचे कागद होते, ते परत आत टाकले , एक छोट यंत्र मिळालं. विचित्र आयताकृती आकार वाटत होता, खिशात तो आधुनिक फोन होता, त्याच्यासारखाच. यावर बरीच बटण होती.पिशवी घेऊन ती खांद्याला अडकवली , यंत्र हातात होतं. मी दरवाजापाशी आलो , फटीतून जरासा उजेड झिरपत होता, त्यात ते यंत्र न्याहाळून पाहिलं. calculator सारखं वाटत होतं. याचा उपयोग काय कळत नव्हत. on बटन दाबून पाहिलं, थोडासा आवाज झाला आणि त्यातून एक लाल रंगाचा लेसर लांब फेकला गेला , समोरच्या भिंतीवर एक मोठ लाल वर्तुळ आल. शिवाय त्या यंत्रावर आकडे आले , "3 मीटर". अच्छा हे यंत्र अंतर मोजतय .
मी खरच भविष्य काळात आलोय हे नक्की झालं. भयानक तंत्रज्ञान आहे हे.
आता बाहेर पडायलाच हवं, मी हळूच तो दरवाजा उघडून पाहिला. बाहेर अंधार होता, गुलाबीसर प्रकाश मध्ये मध्ये पसरलेला होता. मला समजल, मी जेथे मागे अडकलो होतो. तोच हा मजला, या मजल्याच्या वर एक शेवटचा मजला आहे. आणि तिथेच त्यांचं मुख्य केंद्र आहे. फार आत मध्ये येऊन मी पडलोय, इथून बाहेर निघणं जवळपास अशक्य आहे.
पण मला प्रयत्न तर करायलाच हवा. कारण इथे अडकलो तर मृत्य्पेक्षाही भयानक अनुभवत लोटतील हे. अनंत काळाचे दास होऊ यांचे. मला परत एक संधी मिळाली आहे, ती वाया घालवायला नको. पण मी नि: शस्त्र होतो. मागच्या वेळी मी पूर्ण तयारीत आलेलो होतो. त्यांना सळो कि पळो करून ठेवलेलं होतं मी. पण आता माझ्या हातात काहीच नाही, पळून लपून बाहेर पडण हाच एक शेवटच उपाय, अजून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला नाही म्हणजे त्यांनी मला ओळखलेले नसावे, त्यांच्या साठी हा एक नवीन माणूस असावा. हाल हाल करून करून मारण्याचा विचार दिसतोय.
मी हळू हळू पुढे आलो, मागच्या बाजूने एक गोलाकार जिना थेट खाली उतरत होता, तो सापडला , तर या भयानक गढीच आतलं अभद्र दर्शन तरी दिसणार नाही. मी मधल्या मोकळ्या जागेतून जिन्याच्या शोधात फिरायला लागलो.
अचानक पायाखालून काहीतरी वळवळत गेलं, मी दचकलो, प्रचंड शक्तीने पुढे पळायला लागलो, मागे वळून पाहिलं , एक विचित्र आकार हळू हळू मागे येत होता. 'त्यांना' जाग आली तर. एक मी मजल्याच्या एका टोकाला आलो, डावीकडे जिना होता हे नक्की.
खालचे मजले म्हणजे सामान्य माणसाच्या कल्पनाशाक्तीलाही लाजवतील इतके विकृत होते. पृथ्वीवरचा नरक म्हणता येईल . या ग्रहावरचे अनेक प्राणी नमुने म्हणून मारून , इकडे प्रदर्शनासारखे मांडून ठेवलेले होते, मला ते पहायची अजिबात इच्छा नव्हती. मला एखादी खिडकी तोडून त्या गोल जिन्यावरून थेट खाली जातं येईल का ते पहायचं
होत. पण आता हळू हळू गुलाबी प्रकाश वाढायला लागला, आजूबाजूने अनेक आकार जाणवायला लागले. मी भिंतीला टेकून उभा राहीलो. समोर 'ते' कापडाच्या काळ्या जळलेल्या चिंधी सारखे वळवळते आकार जमायला लागले. वातावरणातली उष्णता वाढली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अंत होऊन सुद्धा मला हे भोग परत भोगायला लागणार होते, परमेश्वरा कसला खेळ तुझा, तू मुळातच नाहीयेस हे नक्की. या शरीराला मारून पण मला हे वापरणार. ह्यांचे हस्तक खाली फिरत असतीलच. 'ते' आता जवळ येत होते, मला समजलं ते मला धरून सर्वात वरच्या मजल्यावर घेऊन जाणार.
पुढे ... पुढे .. नाही हि आठवण नको होती मला. माझे डोळे मिटले गेले.

******

एका धक्क्याने जाग आली मी फरफटत ओढला जात होतो. भयानक आकार मला खेचत ओढत नेत होते, विचित्र आवाज येत होता, जयदीप कुठेस तू? मला गोल जिना कुठेय कळायला हवं, मला बाहेर पडायचं आहे, परमेश्वर आहे या जगात, तू विश्वास ठेव, परत ये.
तू ? कि मीच? ....
जयदीप पण मीच, आणि आत्ताचा सुद्धा मीच..
हा फरक संपवायला हवा.. तरच एका दिशेने विचार करता येईल
'त्यांच्या' कडे पाहवत नव्हत . दर क्षणाला त्यांचा आकार बदलत होता, भयानक दुर्गंधी सुटलेली होती.
पण अचानक मधेच माझ्या हातातल लेसर मशीन सुरु झालं. त्याचा लेसर सरळ समोर मला खेचत असलेल्या एका आकारावर पडला.. काही कळायच्या आत त्याने पेटच घेतला , पुढच्याच क्षणाला आग विझुनही गेली, मला काही कळायच्या आत प्रचंड गुलाबी धूर बाहेर पडायला लागला. अनेक आकार , सावल्या माझ्या आजूबाजूने जायला लागल्या. मी प्रचंड घाबरलो, विचित्रच करकर करणारा आवाज यायला लागला. आजूबाजूला मधेच आग लागायची , लगेच विझून जायची, मग मला समजलं, हातातलं लेसर मशीन सुरूच होतं , त्याचा लेसर "त्यांना" नष्ट करत होता, "ते" आगीला घाबरतात हे माहिती होतं, पण आता हे किरण सुद्धा त्यांना संपवत होते.
****

परमेश्वर आहे हे पटले, अचानक बाहेर पडायची संधी आलेली होती, जे यंत्र मी उगाच हातात धरून ठेवलेलं , तेच सुटकेचा मार्ग ठरेल अस स्वप्नातही वाटलेलं नव्हत, आम्ही उपग्रहांमध्ये वापरायचो तेच तंत्रज्ञान वाटत होत, लेसर मुळे अक्षरश "ते" जळून निघत होते. प्रचंड संतापलेले दिसत होते, गुलाबी धूर वाढलेला होता , काहीच दिसत नव्हत, मी ते मशीन आजूबाजूला फक्त फिरवत होतो. उष्णता प्रचंड वाढलेली होती, श्वास घ्यायला त्रास होत होता. मी जिन्याने खाली धावायला लागलो. खाली सुद्धा अनेक आकृत्या समोर आल्या, माझं भान हरपलेल होतं. समोर येईल तो अक्षरशः राख होत होता.
अजून एक मजला. तो गेला मी तळमजल्यावर पोचेन, आणि बाहेर पडता येईल, मनातल्या मनात हिशोब करत मी अंधारातून पळत होतो. खालून कसला तरी आवाज यायला लागला, मी वरून डोकावून पहिले , बापरे हृदयाचा थरकाप उडाला , खालून अनेक विचित्र सांगाडे वाकडे तिकडे हलत वर येत होते. डोळ्यातली गुलाबी बुबुळ चमकत होती, घशातून घोगरा आवाज काढत ते माझ्याकडे येत होते. आणि त्याच क्षणाला मला समजल कि हातातलं यंत्र बंद पडलेलं होतं, मी निमिषार्धात मागे फिरलो , पहिल्या मजल्यावरच्या टोकावर एक मोठी खिडकी होती, तोच एक सुटकेचा मार्ग होता. मी
खिडकीपाशी पळत आलो, मागून ते भेसून आकार जवळ पोचलेले होते, धूर अक्ख्या गढीत पसरलेला होता. आता करण्यासारखी एकच गोष्ट उरलेली होती. मग भले मृत्यू आला तरी बेहत्तर, मी कशाचाही विचार न करता खिडकीतून खाली उडी मारली.

****

प्रचंड जोरात खाली आपटलो, मणक्यातून एक असह्य कळ शिरशिरत डोक्यात गेली, खच्चून ओरडलो, यावेळी पण आवाज बाहेर आला, तेवढ्यात दुरून कोणीतरी माझ्या नावाने ओरडून त्याला प्रतिसाद दिला , तो बहुतेक शिऱ्या होत्या, टोकावरून तो टॉर्च मारून माझा शोध घेत होता .पायातली जाणीवच गेली. तसाच खुरडत त्याच्या नावाने मी ओरडत होतो. तो पण बहुतेक खाली यायला लागला. अजूनही दोघे तिघे उतरताना दिसले. मागून ते आकार तसेच खिडकीतून खाली उतरायला लागले, त्यांचा वेग आता भयंकर होता, कुठल्याही परिस्थितीत ते मला गाठतील अशी स्थिती होती. तशीच हिम्मत करून उठलो , आणि मागे मागे जायला लागलो. पाउस प्रचंड कोसळत होता, विजेच्या लखलखाटात मध्ये 'ते" दिसत होते. कुठल्याही क्षणी ते माझ्यावर झडप घालतील अशीच स्थिती होती, तेवढ्यात शिऱ्या प्रचंड वेगात माझ्यापुढे आला, त्याच्या हातातल्या प्रचंड क्षमतेच्या टॉर्चमुळे 'ते' हि तिथेच थांबले. शिऱ्या बरोबर च्या दोघांनी सरळ मला उचलले आणि मागे पळायला लागले, शिऱ्या सुद्धा वेगाने टॉर्चचा झोत 'त्यांच्यावरून' न काढता मागे सरकायला लागला. 'ते' तिथे गोठल्या सारखे झालेले होते.
'त्यांच्या' तावडीतून मी आज कसाबसा वाचलेलो होतो,एवढे मला समजलेले होते .

पण बर्याच प्रश्नांची उत्तर मिळालेली होती,आणि बरेच प्रश्न समोर आलेले होते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसन्न तुमच्या कल्पना शक्तीला तोड नाही हो ......कस सुचत हे सर्व .......खरच शब्द नाही आहेत.

पण पुढच्या भागाला उशीर नका करू हो ..........please आम्हा वचक साठी .

प्रसन्न् प्लिज एखादा वार घ्या उदा. रविवार आनि त्या दिवशि पोस्त करा म्ह्नजे आम्हाला तुमच्या क्था शोधाव्या लागनार नाहि.. हे माझे स्वतःचे ओपिनिओन आहे...

प्रसन्न मी मा बो वर तुमच्या ते मुळे आले आणि इथ सदस्य झाले. ते च्या पुढच्या भागाची वाट पहात मी इथ आता खुप जणांच्या कथा वाचल्या त्यात बेफी वेल नंदिनी बागेश्री यांचीपण मी फ्यान झाले आहे.
अहो पुढचा भाग लवकर येऊद्यात हो.

Pages