हातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप्प राहीला. पाण्याचा ग्लास पुढे केलेला त्याचा बायकोचा हात काही क्षणासाठी थबकला. कडेवरच्या पिल्लाने बाबाकडे झेप घेण्यासाठी चळवळ केली... एरवी दारातूनच आपल्याला घेण्यासाठी हात आणि हास्य रूंदावणार्या बाबाने आज आपल्याकडे पाहीलेही नाही... पण तरीही 'काही झालंय का?' असा प्रश्न त्या निरागस पिल्लाला कुठून पडणार. बायकोने ओळखले... काहीतरी अघटीत घडलेय! ती पिल्लाला चुचकारू लागली. तिच्या बांगड्यांच्या किनकिनाटाने तो भानावर आला. काही क्षण पिल्लाकडे पाहून त्याने बायकोकडे नजर वळवली... हताशपणे पुटपुटला... "कामावरून काढून टाकलं... इन्टिमेशनही न देता...!"
"आता???" हा त्यालाही छळणारा प्रश्न अलगद तिच्याही डोक्यात शिरला... पण चटकन स्वतःला सावरत ती त्याच्याशेजारी बसली... बाबाकडे झेपावणार्या पिल्लाला एका हाताने सावरत तिने त्याच्या केसांतून ममत्वाने हलकेच हात फिरवला... इतका वेळ थोपवलेल्या भावनांचा कल्लोळ झंझावत बाहेर पडला... "असं कसं करू शकतात ते माझ्यासोबत! आणखी दहा-बाराजणांनाही कमी केलं. पण माझा आजवरचा रेकॉर्ड बघायचा...परफॉर्मन्स तरी लक्षात घ्यायचा. दिवस रात्र एक करून या कंपनीसाठी झटलो... तुझ्या प्रेगनन्सीच्या वेळी तुला माझी सर्वात जास्त गरज असूनही प्रोजेक्टची डेडलाईन पाळण्यासाठी ओव्हरटाईम केला... पिल्लू चातकासारखी वाट बघतो, त्यालातरी कुठे वेळ देता येतोय... श्याSS वैताग आलाय या आयुष्याचा!" त्यानं त्राग्यानं हात सोफ्यावर आपटला. पिल्लू बिथरलं होतं, शांतपणे टकामका बाबाकडे पाहत होतं. तिला त्याचा त्रागा हताशपणा समजत होता. घरकुलासाठी, पिल्लाच्या भविष्याच्या तरतूदीसाठीची त्याची धावपळ ती बघत होती. पण ती गप्प राहीली. आत्ता त्याला भडास काढून टाकू दे... मोकळं होऊ दे. तो बरंच काही बोलत होता...अचानक थांबला...
बायकोच्या डोळ्यांत पाहत कळवळून त्याने विचारलं, "आता???"
मोठाच गहन प्रश्न होता... तिलाही तो सतावत होताच! महागाई वाढतेय. पिल्लाला सांभाळण्यासाठी आपण नोकरी सोडली. त्याच्या पगारात कसंबसं निभावत होतं पण वाढते खर्च भागवायचे म्हणजे... क्षणभरच! स्वत:च्या मनातील सर्व काळज्यांना मागे सारत तिने हलकेच त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला... हळूवारपणे पण ठामपणे ती म्हणाली, "हे ही दिवस जातील..." त्या उबदार स्पर्शाने आश्वासक शब्दांनी त्याच्या चेहर्यावरील काजळी काहीशी मंदावली.
त्याने नवीन नोकरीसाठी धडपड चालू केली. पिल्लाला सांभाळून तीही त्याला मदत करत होती... पेपरमधील जाहीराती कापून ठेवणे, त्याचा बायोडेटा अपडेट करायला मदत करणे... पिल्लू मात्र खूश होतं... बाबा बराच वेळ मिळत होता त्याला. पिल्लाच्या निखळ खळखळाटाने, आनंदी किलबिलाटाने नी निरागस चेहर्याने त्याला नवीन हुरूप मिळत होता. इंटर्व्हूजचं चक्र चालूच होतं. पण अजूनही जमत नव्हतं कुठेच! पुंजी हळूहळू आटत चालली होती. धीर सुटतोय की काय अशी परीस्थिती निर्माण होते न होते तोच...
एक दिवस तो आला... धापा टाकत... तिला दारातूनच हाका मारत... धावत आला होता वाटते... धसकून घाईघाईने तिने दार उघडलं... तिचे दोन्ही खांदे अलगद दाबत हसर्या चेहर्याने त्याने तिच्याकडे पाहीलं... पिल्लू रांगत रांगत आलंच मागून... त्याला झटकन उचलून त्याने गरागरा फिरवलं... एवढा आनंद म्हणजे... ती विचार करेतो तिच्या तोंडात पेढा कोंबत तो गदगदत्या स्वरांत म्हणाला... "मला नवी नोकरी मिळालेय! आधीच्या कंपनीहून अधिक ऑफर केलेत, पोस्टही वरची आहे... आता सगळं नीट होईल... आता सगळंच अगदी छान होणारेय!"
त्याच्या डोळ्यात तरळलेल्या आनंदाश्रूंनी ती सुखावली. दोन्ही हात छातीशी धरून तिनं वर बघत देवाचे आभार मानले... अस्पष्ट स्वरांत पुटपुटली..." हे ही दिवस जातील..."!!!
................................................................................
थोपु वर पूर्वप्रकाशित...
छान लिहलय. अशी वेळ कोणावर ही
छान लिहलय.
अशी वेळ कोणावर ही येउ नये.
दोन्ही हात छातीशी धरून तिनं
दोन्ही हात छातीशी धरून तिनं वर बघत देवाचे आभार मानले... अस्पष्ट स्वरांत पुटपुटली..." हे ही दिवस जातील..."!!!
>>>>>>>>>>>>
आता हे दिवस कशाला घालवायचेत?
कि भिती आहे ही की सुखाचे दिवसही जातील..
अंड्या, आता हे दिवस कशाला
अंड्या, आता हे दिवस कशाला घालवायचेत?>>>>>>>>> घालवायचे नाहीयेत रे तिला.
कि भिती आहे ही की सुखाचे दिवसही जातील>>>>>>>>>अर्थातच. सुखाचे असो वा दु:खाचे हे ही दिवस जातील हे लक्षात असु द्यावं आणि येइल त्याला तोंड देण्यास समर्थ रहावं
छान गोष्ट. होप थिंग्स वर्क
छान गोष्ट. होप थिंग्स वर्क आउट फॉर देम.
सुखाचे असो वा दु:खाचे हे ही
सुखाचे असो वा दु:खाचे हे ही दिवस जातील हे लक्षात असु द्यावं आणि येइल त्याला तोंड देण्यास समर्थ रहावं स्मित >>>>> सोला आने सच.
छान गोष्ट - अगदी पॉझिटिव्ह दृष्टिकोन असलेली.
शेवट एकदम मस्त.
शेवट एकदम मस्त.
खुपच छान.
खुपच छान.
मोल, अंड्या, सस्मित, अमा,
मोल, अंड्या, सस्मित, अमा, पुरंदरे, माधव, प्रचिती सर्वांना धन्यवाद.
अंड्या
'ती' माझ्या कॅटॅगरी तली आहे ना... सुख पण जपून एन्जॉय करणारी...
एवढंच सुचवायचं होतं गेल्या परीस्थितीचे भान ठेवा. त्यातील कष्टांचे, अनुभवांचे... सुखाने हुरळून , माज करू नका... बस्स!! हे भान सुटू न देणे महत्वाचे...
सस्मित एकदम बरोब्बर!
तत्वज्ञान मधील आवडीचे तत्वज्ञान बाफ वर साधनाने हे वाक्य लिहीलेलं ते वाचून सहज सुचलं...