भांडा सौख्यभरे

Submitted by सौ. वंदना बर्वे on 26 February, 2013 - 02:19

"भांडा सौख्यभरे"

भांडण हा गृहसौख्याचा पाया आहे. असं म्हणतात नवरा बायकोच्या भांडणात कुणी पडू नये आणि काही अंशी ते खरही आहे. भांडकुदळ बायको किंवा भांडखोर नवरोबा, त्याहून वेगळं म्हणजे दोघेही भांडणवादी असे चित्र सहसा पहायला मिळते. भांडखोर स्वभाव दोघांतही नसलेल्या नवरा बायकोनाही कधीतरी उगाच भांडावं असं वाटतं, भांडतातही. त्यांच्यामधलं प्रेम, स्नेहबंध भांडण वाढवते.

आईंची आणि बाबांची पुष्कळ वेळा भांडणे व्हायची. मी नवी नवरी घरात आले तेंव्हा खाजगीत दोघेही एकमेकांबद्दल मला सांगत असत. एकमेकांचे दोष, खोड्या एवढच नव्हे तर यथेच्छ उखाळ्या पाखाळ्या काढत. मला हा प्रकार नवीनच होता. आमचा हनिमुन पिरियड असल्याने भांडणे होत नसत. तेंव्हा आई बाबांची भांडणे पाहण्यात आणि शेवटी सोडवण्यात खूपच गंमत यायची. माहेरी माझे बाबा हे खूप तापट प्रकरण होतं. आई भित्री भागुबाई. त्यामुळे त्याअर्थी भांडण असं होत नसे. बाबांनी रागवायचं, आईने गप्प राहून ऐकून घ्यायचं असच चाले. इकडच्या घरी नेमकं विरूध्द होतं. दोघेही भांडायची आणि आपला मुद्दा काही केल्या सोडत नसत. उतारवयातल्या जोडप्याची ही गमतीशीर भांडणं मी खूपदा अनुभवली.

कितीही झालं तर दोघांच्यामध्ये असलेल्या प्रेमाची जाणीवही मला तितक्याच प्रकर्षाने व्हायची. आजकालच्यासारखं आय लव्ह यू असं म्हणत एकसारखं गळेपडूपणा करणं त्यात नसलं तरी एकमेकांबद्दल असलेली प्रचंड आंतरीक ओढ होती, काळजी होती. स्वत:च्या समजुतीप्रमाणे दुसऱ्याचं चुकीचं वागणं, त्याच्या कमतरतेची जाणीव व त्याला त्या कमतरतेचा कुठे त्रास होऊ नये ही काळजी. संसाराला अनेक वर्षे झाल्याने तशा कमतरतेतून झालेले त्रास हे बहुधा भांडणात असायचे. "मी सांगितलं होतं. ज्याच्या नावाला ऐकायचं म्हणून नाही." अशा वाक्याने सुतोवाच झालेली भांडणे संदर्भासह स्पष्ट होत असत. पुराव्यादाखल मग दावे, प्रतिदावे होत असत. कुठल्याही वकिलाला लाजवेल असे वादप्रतिवाद असत. त्याहीपलिकडे जाऊन एकमेकांची आत्यंतिक काळजी वाहणे जाणवायचे. अशा भांडणांचा शेवट बाबा बाहेर जाऊन बसण्यात व आई रागावून शांत बसण्यात होई. बहुतांशी जेवणादरम्यान ही भांडणे सुटत. बाबा जेवल्याशिवाय आई जेवत नसे. ताट घेऊन आई बाहेर जायच्या, बाबाही तोपर्यंत शांत झालेले असायचे. दोघांच्या डोळ्यात पाणी आणि मग एकत्र जेवण. असे प्रसंग आठवड्यातून दोनतीनदा तरी व्हायचेच.

आमच्या दोघातही हनिमून पिरियड संपल्यानंतर अनेकदा भांडणे झाली. ह्यांना जे जे लोकं ओळखतात त्यांना माझं म्हणणं कदाचित खरं वाटणार नाही. पण हे खूपच तापट आहेत. एकदा रागाचा पारा चढला, की मग कशाचेही भान रहात नाही. माझं लग्न झालं तेंव्हा आमच्या घरात सहा लाकडी स्टूलं होती. आजच्या घडीस एकही नाही. भांडण झाल्यावर यांनी आपटून आपटून बिचारी खिळखिळी झाली. यांच्या तापट स्वभावामुळे आपटुन अंती मोडलेल्या अवस्थेत आंघोळीचे पाणी तापवायच्या चूलीत दग्ध झाली. आमच्यातल्या भांडणाचा मूळ विषय हा बहुतेकदा "जनविकास" हाच असायचा. माझं म्हणणं ऐकूनच घेत नसत. (आजही घेत नाहीत). आपल्याच विश्वात गर्क. आमच्या घरात अनेक विश्व नांदताहेत असच वाटायचं मला. मी कधी आणायला सांगितलेले स्वयंपाकाचे सामान आठवड्यानंतर भांडण झाल्याशिवाय किंवा मी स्वत: जाऊन आणल्याशिवाय आले नाही. बरं मी सांगितलेलं ह्यांना समजलय का, कळतय का हे कळायलाही मार्ग नाही. ऐकताना हो, हो, आणतो करतो असच म्हणतात. चेहऱ्यावर नावाप्रमाणेच नेहमी प्रसन्नता असते, त्यामुळे ह्यांना कळलय की नाही हे कळायलाही मार्ग नसतो. बुडाले एखाद्या गोष्टीत की बुडाले, मग कशाचेही भान नसते. जेवण नको, आंघोळ नको, कुणी आलेलं नको की गेलेलं नको. हवी असेल तर ती "कॉफी". दिवसातून सतरांदा कॉफी पिल्यावर दही लावायला दूध काही शिल्लक रहात नाही. त्याच्यावरूनही भांडण.

माझ्या वडिलांप्रमाणे माझ्यातही त्यांच्या तापटपणाचा अंश बऱ्यापैकी आहे. मी लगेच रागावते, रिएक्ट होते. हे सहसा रागावत नाहीत, पण एकदा रागावले की त्याला सीमा नसते. छान, मस्त चाललय आमचं.

भांडण होणे याच्या मुळाशी काही विविक्षित कारणे आहेत. बदल न करणे, अहंकार, अडवणूक, सुधारण्याचे प्रयत्न करणे अशी वरवर दिसणारी आणि त्याशिवाय न दिसणारी, अव्यक्त अशी अनेक कारणे असतात. आपण लग्नाचे होईतो विचारांनी, संस्कारांनी घडून तयार झालेले असतो. जगण्याची एक विशिष्ट पध्दत ठरून गेलेली असते. दिनक्रमापासून ते कसे वागावे, कसे बोलावे, कसे चालावे इथपर्यंत आपली मते आत्यंतिक होत जातात. मते दृढ होण्यात संस्कार, विचारांची जडणघडण, मैत्र, आपण राहतो ते वातावरण कारणीभूत असतं.

त्यात स्वत: बदल करणे स्वत:लाच अवघड होऊन बसते. आपण नवीन काही स्विकारण्याच्या वाटाच बंद करतो.

याचबरोबरीने आणखी एक गोष्ट घडत असते ती म्हणजे आपल्या जोडीदाराविषयीच्या कल्पना, विचारदेखिल ठरत जातो. सहसा मुलाला वधू ही आईसारखी हवी असते आणि मुलीला नवरा हा वडिलांसारखा हवा असतो. आदर्श जोडीदाराच्या कल्पना ह्या इतरांना आलेल्या अनुभवतातूनसुध्दा घडतात. बहिणीच्या नवऱ्याचे तिच्याशी वागणे, त्यांच्या परस्परसंबंधांचे आपल्यास आलेले अनुभव नवऱ्याविषयीच्या बऱ्या वाईट कल्पना घडवतात.

असं होण्य़ात चूक काहीच नाही. खरा प्रॉब्लेम तेंव्हा सुरू होतो जेंव्हा आपण त्याच कल्पनांना कवटाळून बसतो. इतक्या घट्टपणे की त्या कल्पनेतल्या आदर्शवत जोडीदारापायी आपण वास्तवातल्या जोडीदाराला स्विकारणेच बंद करतो. स्विकारायचे झाल्यास त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न करीत राहतो. सहजीवनात विद्यार्थ्याची भुमिका विसरून शिक्षकाची भुमिका घेतो. घरी दारी जोडीदाराला शिकवीत राहतो. "हजारदा सांगितलय, टीशर्ट घातल्यावर कॉलर नीट कर", "बायका त्या बायकाच, अक्कल ती किती? साधा चहा नाही करता येत." असा चारचौघात एकमेकांचा पाणऊतारा करतात. जे बदल स्वत:त केलेले चालत नाहीत त्याची अपेक्षा जोडीदाराकडून ठेवतात. इतरांच्या समोर व्यक्ती म्हणून जोडीदाराचा आदर ठेवलाच पाहिजे हा सौजन्याचा साधा संकेतही विस्मृतीत जातो. इथेच अहंकार दुखावला जातो.

अहंकार हा अध्यात्मात निषिध्द असला तरी संसारात आवश्यक आहे. व्यक्तिगत आयुष्यातसुध्दा अहंकार असल्याविना प्रगती संभवत नाही. स्वत्वाचा विकास हा अहंकाराच्या पायावरच होतो. ते चुकीचे किंवा वाईट अजिबात नाही. माझ्या अहंकाराबरोबरच जोडीदाराच्या अहंचा आदर केला पाहिजे, तो त्याच्या व्यक्तिविकासाला पोषक आहे असे न स्विकारणे आणि तेही स्वत:च्या अहंकारापायी हे चूक आहे. हिच अहंकारांची स्पर्धा भांडणे विकोपाला घेऊन जातात. अहंकाराचे व्यवस्थित केलेले पोषण हे संसाराला पोषकच ठरते. इथेही "योजकस्तत्र दुर्लभ:".

माणूस हा स्वत:मध्ये परिपूर्ण, स्वयंभू असा कधीच नसतो. अपूर्णत्व आहे म्हणूनच तर संसार होतो. आपली व आपल्या जोडीदाराची बलस्थाने व हीनस्थाने ओळखून तसे वागणे आवश्यक व अपेक्षित असते. वास्तवात मात्र उलटच घडते. जोडीदाराची कुठल्या गोष्टीत तरबेज आहे ते पाहून तिथे तडजोड व जिथे तो कमजोर आहे तिथे अडवणूक सुरू असते. अनेकदा नवरा बायकोतल्या तडजोडीच्या आणि अडवणूकीच्या जीवघेण्या स्पर्धेलाच संसार समजलं जातं.

जोडीदाराची कमजोरी हे आपलं बलस्थान असल्यास त्याच्यापाठीमागे उभे राहणे म्हणजेच संसार, म्हणजेच सहजीवन. सुखी सहजीवनासाठी भांडलं पाहिजे. तेंव्हा मैत्रिणींनो, "भांडा सौख्यभरे".

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहेत. अगदी व्यापक आढावा नसला तरीही जे मुद्दे आले आहेत ते बरोबरच वाटतात. हाही विषय अनेक फाटे फुटण्यासारखा आहे. पण तुमचा लेख हा तुमच्या चष्म्यातून व तुमच्या सभोवतालाशी निगडीत असल्याचे मान्य करून वाचल्यास फाटे फुटू नयेत.

आम्हास येथे एक म्हणावेसे वाटते.

तुमच्या विचारांमध्ये दिसत असणारा भाबडेपणा जगात अभावाने दिसतो.

हा महत्वाचा फरक या लेखात दृष्टिआड केल्यासारखा वाटला.

असे केल्याने ही लेखमालिका शेवटी गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांच्या स्वरुपाची होईल असे वाटते. थोडे अधिक साहसी, धूर्त व चौफेर होऊन असे लेख लिहिल्यास ते उपयुक्त ठरू शकतील.

कळावे

गं स

जोडीदाराची कमजोरी हे आपलं बलस्थान असल्यास त्याच्यापाठीमागे उभे राहणे म्हणजेच संसार, म्हणजेच सहजीवन. >> तुम्हि लवकरात लवकर सुतारकाम शिकुन घ्या. लाकडी स्टुले मोडणारा जोडिदार म्हन्जे...

छान लिहिलेय, मलातरी मनमोकळे वाटले, भाबडे वगैरे नाही, प्रवचन तर अजिबात नाही.
थोडेफार भांडण अपरिहार्यच पण अहं दाखवायसाठी भांडण होत असेल तर कालांतराने उबगच येईल.
माझ्या चांगल्या मित्रांपैकी दोघांचे घटस्फोट झालेत. आज विचाराल तर त्यांना एकही सबळ - पटण्याजोगे कारण सांगता येणार नाही. परंतु त्यावेळी छोटी कारणेदेखील भांडण विकोपास न्यायची. शेवटी तुटेपर्यंत न ताणण्याची विवेकबुद्धी असली पाहिजे.

दिवसातून सतरा वेळा कॉफी...
हे आमच्याकडे पण! Wink
फक्त कॉफीऐवजी चहा. मग दही नाही म्हणून गोंधळ.
दूध जास्त घेतलं तर त्यादिवशी हमखास कमी चहा.

बाकी तुमचे श्रीयुत चिडल्यावर लाकडी स्टूले नेमकी कशी मोडतात?

'अनेकदा नवराबायकोतल्या तडजोडीला आणी जीवघेण्या अडवणुकीलाच संसार समजलं जातं' हे व्यक्तिशः कितीही पटलं नाही तरी खरे आहे. उदाहरणे सतत दिसतातच आसपास.

वंदना ताई,

एक सांगू का! दुसर्‍या परिच्छेदात आईबाबांचा उल्लेख आहे. त्या जागी खरं तर सासू आणि सासरे हे शब्द हवे होते. तसेच 'आमचे हे' ऐवजी 'माझा नवरा' किंवा 'माझे पतिराज' असं स्पष्ट हवं होतं. बायकांच्या मासिकांत कदाचित असे उल्लेख खपून गेले असते. पण इथे मायबोलीवर वाचकांना संदर्भ जुळवून अर्थबोध करून घ्यावा लागतो. त्यामुळे मजकुरातली अनावश्यक संदिग्धता टाळली तर बरं होईल.

बाकी भांडणांबद्दल म्हणायचं झालं तर बायकोशी शेवटचं केव्हा भांडलो होतो ते आठवतही नाही. Proud भांडायचं असेल तर मी सरळ माबोवर येतो. उगीच घरातली शांती का म्हणून बिघडवायची! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

ओ गापै,
त्यांनी बायकांच्या मासिकासाठीच लिहिलंय. तुम्हाला चोरून बायकी म्यागेझिन वाचल्ल्याचा फ़ील येत नाहीये का?
आ. उ.
इब्लिस.

गामाजीपै , त्यांना जर सासु सासर्‍यांना, आई बाबा (च) म्हणायचं असेल आपली हरकत का असावी ?
'आमचे हे' ऐवजी 'माझा नवरा' किंवा 'माझे पतिराज' असं स्पष्ट हवं होतं. >>> का बुवा ?

बाकी तुमचे श्रीयुत चिडल्यावर लाकडी स्टूले नेमकी कशी मोडतात? >>> साती!!!! मला वाटले होते बसून! :)(म्हणजे खूप रागावलेला वजनदार माणूस जर जोरात बसला तर मोडेल की). पण आता तू प्रश्न विचारल्यावर मनात फार भलते प्रश्न येतायत .... Sad फेकतात बिकतात काय? लागेल की कोणाला .....

अतीशय उत्तम उपयुक्त लेख
खास म्हणजे स्वानुभव इतक्या उघडपणे मांडायला धारिष्ट्य लागते

धन्यवाद या लेखासाठी

बाकी अनुभवी लोक आपापली मते देतीलच

Happy

श्री,

>> गामाजीपै , त्यांना जर सासु सासर्‍यांना, आई बाबा (च) म्हणायचं असेल आपली हरकत का असावी ?
>> 'आमचे हे' ऐवजी 'माझा नवरा' किंवा 'माझे पतिराज' असं स्पष्ट हवं होतं. >>> का बुवा ?

त्याचं काये की असे उल्लेख मला खटकले आजिबात नाहीत. जर मी बायकांची मासिके वाचत असतो तर हे उल्लेख 'साहजिक' या सदरात मोडले असते.

मात्र मायबोलीवर अशा वर्गीकरणाची सोय नाही. संयुक्ता गटात लिहिलं असेल तर ते स्त्रीच्या दृष्टीकोनातून असेल असा थोड्याफार प्रमाणात अदमास लावता येतो. असे उल्लेख करतांना वाचकाला जे गृहीत धरलंय तसं धरू नये. 'मी माझ्या सासूसासर्‍यांना आईबाबा असेच म्हणते' हे वाक्य सुरवातीला टाकलं तरी चालेल.

तोच प्रकार नवर्‍याबाबत. 'आमचे हे' असा सर्वनामी उल्लेख चुकीचा नाही. पण हल्लीच्या जमान्यात तसा कोणी करीत नाही. आदरार्थी उल्लेख करायचा असल्यास दुसरी एखादी समर्पक शब्दयोजना करावी. नवर्‍याबद्दल बोलतांना लेखिकेने त्रयस्थपणा पत्करावा का, असा प्रश्नही विचारता येईल. तसा पत्करण्याची गरज नाही, असं उत्तरही देता येईल. मात्र वाचकाला ते जाणवेल असं बघायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

"आमचे हे " हा उल्लेख आपल्या गौरवशाली परंपरेचा भाग आहे. एकीकडे मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे आपल्या संस्कृतीच्या खाणाखुणा नष्ट होत असतांना "आमचे हे" ला पर्याय म्हणून अमेरिकन संस्कृतीप्रमाणे माझा नवरा असा उल्लेख करण्याची सक्ती वा सूचना करणे हे निषेधार्थ असून तो राष्ट्रद्रोहच होय. या गुन्ह्यासाठी माफी नाही !

आम्ही गेली ४२ वर्षे भांडतोच आहोत. भांडणानंतर आम्हाला सुखी सहजीवन मिळेल अशी श्रद्धा ठेवून, अमेरिकन पद्धतीप्रमाणे (If little is good, more is better) अजून भांडतोच आहोत. त्यामुळे जेंव्हा केंव्हा आमचे सुखी सहजीवन सुरु होईल तेंव्हा ते अतीव सौख्याचे होईल याची खात्री आहे.

वाट पहातो आहोत, नि भांडणे चालूच ठेवतो आहोत, कारण प्रयत्न सोडू नयेत! शिवाय भांडणाची कारणे इ. फालतू गोष्टींचा विचार न करता भांडण करत रहातो.
Happy

"आम्ही गेली ४२ वर्षे भांडतोच आहोत. भांडणानंतर आम्हाला सुखी सहजीवन मिळेल अशी श्रद्धा ठेवून, अमेरिकन पद्धतीप्रमाणे (If little is good, more is better) अजून भांडतोच आहोत. त्यामुळे जेंव्हा केंव्हा आमचे सुखी सहजीवन सुरु होईल तेंव्हा ते अतीव सौख्याचे होईल याची खात्री आहे."

(भांडण) केल्याने होत आहे रे , आधी केलेचि पाहीजे !

" कारण प्रयत्न सोडू नयेत! शिवाय भांडणाची कारणे इ. फालतू गोष्टींचा विचार न करता भांडण करत रहातो."

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. कीप भांडींग..

सर्व प्रतिसादांना धन्यवाद.

आई बाबांचा उल्लेख माझ्या माझ्या सासू सासऱ्यांना उद्देशून होता. हे माझ्या आई वडिलांना किंवा मी ह्यांच्या आई वडिलांना, परोक्ष आणि अपरोक्ष आई बाबा असेच संबोधतो.

सौ. वंदना बर्वे.

माझ्या चांगल्या मित्रांपैकी दोघांचे घटस्फोट झालेत. आज विचाराल तर त्यांना एकही सबळ - पटण्याजोगे कारण सांगता येणार नाही.

>> बर्फ हा नेहमी नऊ दशांश पाण्याखाली असतो आणि एक दशांशच वर दिसत असतो.संसारातल्या अडचणी, मानापमान आणि दु:ख पण अशीच असतात.नऊ दशांश न सांगता येण्यासारखी.सांगितली तर खोटी वाटणारी.एक दशांश न सांगता दिसणारी किंवा सांगितलं तर लगेच पटणारी!

- व. पु. काळे

तस्मात आपण निष्कर्षाप्रत येण्याची घाई करु नका.

भांडणा शिवाय संसारात मजाच नाही. नाहीतर अळणी [मिठाशिवाय] जेवणा सारखा संसार वाटेल. भांडणानेच तर प्रेम वाढत. नवरा-बायको एकमेकाशी भांडतील, एकमेकाचे दोष दाखवतील. त्याबाबत इतरांजवळ तक्रारहि करतील पण इतर कुणी त्यातील [दोघांपैकी] एकाजवळ दुसर्याबद्दल वाइट बोलला तर तो ऐकुन घेउ शकणार नाही. याला जिवन ऐसे नाव.

एकदा रागाचा पारा चढला, की मग कशाचेही भान रहात नाही. माझं लग्न झालं तेंव्हा आमच्या घरात सहा लाकडी स्टूलं होती. आजच्या घडीस एकही नाही. भांडण झाल्यावर यांनी आपटून आपटून बिचारी खिळखिळी झाली. यांच्या तापट स्वभावामुळे आपटुन अंती मोडलेल्या अवस्थेत आंघोळीचे पाणी तापवायच्या चूलीत दग्ध झाली >> Sad ६ लाकडी स्टूलं ..

६ लाकडी स्टूलं ..>> हो न ग उर्मी मला पण असच वाटल. मुळात ६ स्टूल घरात हवी कशाला? असली तर ती आपटून मोडतील इतकी खिळखिळी का असावी? त्यावर चढून डबे काढते कोण? बरे मोडले स्टूल तर ते चुलीत का, रिपेर का करू नये? मला अनेक प्रश्न पडले पण लोक म्हणतील 'दुसरा धागा काढा' म्हणून गप्प बसले...