आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस

Submitted by पिशी अबोली on 21 February, 2013 - 12:44

आज युनेस्कोने जाहीर केलेला 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस'. बांगलादेशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. फक्त 'एक संपर्काचे माध्यम' इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,वैयक्तिक असे अनेक पदर मानवी भाषेला आहेत. आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे.

त्यातही 'मातृभाषा' म्हणजे तर सामाजिक जीवनाची पहिली पायरीच. एका विशिष्ट समूहाशी मातृभाषा आपले नाते जोडून देते. आजूबाजूच्या जगातून मिळणार्‍या ज्ञानाला, सौंदर्याला,आनंदाला भरभरून प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा. घरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि इतके आपलेपण मातृभाषेत बोलताना असते. म्हणूनच कदाचित सगळ्यांसाठी मातृभाषा हा इतका भावनिक पातळीवरचा विषय होऊन बसतो.

'मातृभाषा आणि तिच्यावर येऊ घातलेली संकटं' हा अनेकदा चर्चेचा विषय होतो. मातृभाषेशी नातं इतकं दृढ असतं की 'आपली मातृभाषा हरवत चालली आहे' अशा विचारानेही बहुतांश लोक अस्वस्थ होतात; आणि ते रास्तही आहे. इंग्रजीचा 'किलर लँग्वेज' म्हणून जगभर पडत चाललेला प्रभाव बर्‍याच लोकांना चिंताजनक वाटतो. पण मराठी,हिंदी अशा मोठ्या आणि समृद्ध, राजाश्रय असणार्‍या भाषांबद्दल असा विचार करत असताना केवळ ५०-६० भाषिक शिल्लक असणार्‍या आदिवासी भाषांची परिस्थिती काय असेल याचाही विचार व्हावा. एक भाषा संपणं म्हणजे एका खूप मोठ्या खजिन्याच्या दाराची किल्ली कायमची हरवणं. अंदमानमधील 'बो' या भाषेचे उदाहरण या बाबतीत देण्यासारखे आहे. ती भाषा बोलणारी शेवटची महिला गेल्यावर त्या समाजाविषयी,त्यांच्या प्रथा,त्यांचे परंपरागत ज्ञान या गोष्टींविषयी जाणून घेण्याची संधी कायमची निघून गेली. असे अजून कुठच्या भाषेच्या बाबतीत होऊ नये म्हणून प्रयत्न तर होत असतात, पण त्यांना यश येईलच असे सांगता येत नाही.

मातृभाषा दिनानिमित्त मनात आलेले विचार इथे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. भाषिक वैविध्य टिकवले जाणे,समृद्ध होणे ही काळाची गरज आहे; नसल्यास व्हावी एवढेच वाटते. मायबोलीकरांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत विचार, पण दुर्दैवाने परिस्थिती बरोब्बर उलट होत चालली आहे. Sad
अनेकदा अनेक धाग्यांवर चर्चा झालेली आहेच, जास्त काय लिहू ?