चित्र

Submitted by भारती.. on 16 February, 2013 - 12:09

चित्र

चित्रातला स्तब्ध किनारा
माडांचे शेंडे हलल्यासारखे वाटतात.
लाटांचे रोखलेले आवेग
वाळूतल्या धगीला कळल्यासारखे वाटतात.

विशाल कॅनव्हास सोनेरी चौकट
रंगरेषांचा अद्भुत मेळ.
गतीला स्थितीची शपथ घालणारी
बाहेर निगूढ मध्यान्हवेळ.

स्मरते काही .. समुद्रासमोर
समुद्राला पारखे होणे.
समुद्र समजून घेताघेता
निर्गुण आकाशासारखे होणे.

चित्रातला मनमित्र किनारा
जाणतो सारे चौकटीत राहून
आवरतो विस्तार नि:श्वसतो हळुवार
उल्हसतो किंचित मला पाहून.

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल कॅनव्हास सोनेरी चौकट

समुद्र समजून घेताघेता
निर्गुण आकाशासारखे होणे...

कल्पनाही अप्रतिम आणि मांडणी सुद्धा सुंदर!

कविता आवडली.
विशेषतः

स्मरते काही .. समुद्रासमोर
समुद्राला पारखे होणे.
समुद्र समजून घेताघेता
निर्गुण आकाशासारखे होणे.

शेवटाबाबत थोड्या संभ्रमात आहे. फार पटला नाही किंवा कळला नाही.

आभार सुशांत,समीर.
समीर,
''समुद्र समजून घेताघेता निर्गुण आकाशासारखे होणे '' अशी निवेदिका चित्राच्या आत आत अन तेथून निर्गुणात जाताना चित्रातला किनारा मात्र तिला,चित्र प्रेमाने न्याहाळताना लागलेल्या तिच्या तंद्रीला जाणतोय अन जणू आपला विस्तार तिच्यासाठी सोपा करून हळुवार उल्हसत जुन्या मित्रासारखा सगुणात येतोय..

सुंदरच!
कविता एखाद्या कोड्यासारखी वाटली... सुटता सुटता पुन्हा कोडे बनुन राहीली...

खूप सुंदर कविता. वाचल्यानंतरही मनात रुंजी घालत रहाणारी, काही वेळानंतर परत येऊन वाचावीशी वाटणारी. एखाद्या 'इंप्रेशिनिस्ट' चित्रकाराच्या कलाकृतीसारखी, त्याच रंग रेषांत प्रत्येकवेळी नवीन अनुभूतीचा आनंद देणारी. काही कळले आहे याचा उल्हास साठत असतानाच काही निसटल्याची वेदना देऊन जाणारी.

छान .... कल्पना नि कविताही.

मला असं जाणवलं की कवितेतील नायक/नायिका आणि चित्रातले घटक यांच्यात घडलेला हा शब्दाविण संवाद आहे.

सुंदर कविता
जाणतो सारे चौकटीत राहून
>> चौकट, मर्यादा

रणजीत देसाईंचे हे वाक्य आहे बहुतेक,
समुद्रच्या बेभान लाटा... बेभान कधीच नसतात
भान राखतात म्हणुन... मानाने फुटतात
असच काहीतरी. ते आठवले...

या कवितेचे विशेष तुम्हा सर्वांच्या नजरेतून तिच्याकडे बघताना मला जाणवताहेत म्हणून आभार . होय शाम, हे एक कोडे आहे, एक तद्रूपता ,अद्वैत आणि भूमिकांची अदलाबदल असं काहीबाही आहे.
अमेय, तरलतेने मूल्यांकन केलेत..
>>त्याच रंग रेषांत प्रत्येकवेळी नवीन अनुभूतीचा आनंद देणारी. काही कळले आहे याचा उल्हास साठत असतानाच काही निसटल्याची वेदना देऊन जाणारी. >>
'वेदना ' हा परिणाम साधला जात असेल तर कवयित्री इतकेच सांगू शकेल की तोच तिला अभिप्रेत होता..
शशांकजी,यशस्विनी, विक्रांत,पुरुष,धन्स.
उल्हासजी, होय, तसेच आहे संवाद, चित्रकलेशी कवितेचा.

पुनःपुन्हा वाचली.. दरवेळी नव्याने अर्थ लागताहेत..

मनातले काही तुकड्यातुकड्याने बाहेर येऊ पाहणारं आणि त्याची प्रतिकांशी घातलेली सांगड असं काहीसं?

खूप छान आहे खूप आवडली

आजच वाचली प्रतिसादास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व

बाकी सर्व वरील प्रतिसादातून आलेच आहे शामजींचा प्रतिसाद आवडला
तुमच्या प्रतिसादातले<<<< 'वेदना ' हा परिणाम साधला जात असेल तर कवयित्री इतकेच सांगू शकेल की तोच तिला अभिप्रेत होता..>>>>> हे वाक्य सुयोग्य लिहिलेत माझ्या मते जरा हाच इफेक्ट कमी आहे या कवितेत जितका अजून असू शकला असता म्हणजे वेदना अहे जरा उत्कट कमी अहे ती तुम्ही उरात दाबून शेवटी समारोपात उल्हासतो किंचित मला बघून असे जे केलेत त्याचे विशेष प्रयोजन मला वाटले नाही उलट अजून भावविभोर करणारा शेवट हवा होता

चौथे कडवे माझ्यासाठी स्पेशल आहे ..........कालच मी मनात एक खयाल आणला होता की लाट किनारा भेटतात क्षितिज जमीन भेटतात पण किनारा आभाळ भेटत नाहीत तर ..........मी पुढे विचार केला की जे आकाशाचे प्रतिबिंब समुद्रात पडते तेच लाट होवून जेंव्हा किनार्‍यास भेटए तिथे किनारा आकाशाला भेटत आस्ल्याचा आनंद व्यक्त करतोय असा एखादा शेर करावा वगैरे

निर्गुण आकाशासारखे होणे.>>>>> वाह वाह !!....किती सूक्षम पातळीवरचा विचार ..
............आज तुमच्या कवितेतील चौथे कडवे वाचून तोच शेर केल्यासारखे समाधान लाभले

धन्यवाद भारतीताई

चित्रातला मनमित्र किनारा
जाणतो सारे चौकटीत राहून
>>> व्व्व्वाह!!!!

चित्रातला स्तब्ध किनारा
या पहिल्या ओळीनंतर वरच्या दोन ओळी एकदम भिडल्या... Happy

वा.......!!
गतीला स्थितीची शपथ घालणारी
बाहेर निगूढ मध्यान्हवेळ.....हे खूपच भावलं Happy
संपूर्ण काव्य ...जबरदस्त !!

मला तुमची शब्दांची निवड, त्यांची गुंफण आणि त्यातून प्रकट होणारे वैविध्यपूर्ण पण खोल अर्थ नेहेमीच अंतर्मुख करतात. एकेक शब्द तोलुन-मापून येतो तुमच्या कवितांमध्ये. ही कविताही तशीच. खूप आवडली!

आभार या विविधतापूर्ण प्रतिसादांसाठी..
ही कविता चिखल्याच्या विनंतीवरून प्रकाशित केली इथे, (ती पूर्वप्रकाशित नाहीय),त्याला पॅनोरमिक चित्रासाठी विषय हवा होता. त्याने एक अत्यंत सुंदर चित्र रेखाटून तिची समृद्धी वाढवलीय्.धन्स चिखल्या.
http://www.maayboli.com/node/41245
'स्थितीला गतीची शपथ' सुरेशजी, जयश्री, कवितेची वातावरणनिर्मिती करणारी ही मध्यान्हवेळ गूढ, मला अत्यंत प्रिय म्हणून माझ्या कवितासंग्रहाचेही नाव 'मध्यान्ह'च आहे, त्या नावाची एक कविता इथे देईन
कधीतरी..
वैभव,नेहमीप्रमाणे दीर्घ अन सडेतोड प्रतिसाद.. कवयित्री एवढेच म्हणेल,वेदना दबलेली असेल पण उत्कट होती ही कविता लिहिताना.शेवट परिणाम कमी करणारा असेल पण त्या वेदनेवरचा त्या क्षणी जाणवलेला इलाज होता. ती वेदना ,'समुद्रासमोर समुद्राला पारखे होणे'.
आनंदयात्री, तुम्हाला भावलेली ती प्रतिमा--चित्रातल्या किनार्‍याने मनमित्र होणे..त्या वेदनेवरचा इलाज, जीवनातल्या त्रुटीवर कलेशी मैत्री करून मात करणे.

कविता स्फुरण्याची एक अनियंत्रित ठिणगी असते. त्या ठिणगीवर पुढे विस्तार, उपमा, अर्थछटा, शब्दांमधून दिले गेलेले काहीतरी निश्चीत स्वरूप अशी आवरणे चढवली जातात. पण 'ठिणगी' याच पातळीवर कविता समोर आणण्यासाठी अंगी साहस असावे लागते, स्वतःवर विश्वास असावा लागतो आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. हे वरील काव्य आम्हास वाटते की 'ठिणगी' याच पातळीवर समोर आणण्यात आले आहे. त्यामुळे ते भावते, पण कोड्यासारखेही वाटते. कोडे सुटते, पण सुटल्याचे समाधान मिळत नाही. समाधान मिळते पण उगीच मिळवले असे वाटते. असे सगळेच एकदम होते तेव्हा प्रामाणिकपणा लख्खकन आपले अस्तित्व दाखवून रसिकाला स्तिमित करतो.

या पातळीवरच कविता समोर आणण्याच्या या प्रवृत्तीला आमचाही एक सलाम.

कळावे

गं स

मला वाटते गंभीर समीक्षक,तुम्ही या कवितेची अन एकूणच माझ्या कवितेची प्रेरणा जाणलीय.आभार.