एक होती वैदेही

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

‘‘कसं वळलात गाण्याकडे? तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का?’’
‘‘नाही हो, घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी, सरनाईक बाईंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला दत्तकच मागून घेतलं माझ्या वडलांकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही.’’
घरी आलेल्या मुलाखतकाराला वैदेही, म्हणजे सुप्रसिद्ध गायिका वैदेही सरनाईक, उत्तरं देत होती. मधूनच फोन घेत होती. अभिनंदनासाठी येणार्‍यांचं चहापाणी बघितलं जातंय ना यावरही देखरेख करत होती. पुरस्कार, अभिनंदनाचा वर्षाव, लोकांचं प्रेम या सगळ्यांनी भारावली होती वैदेही. एकुणात आज उत्सवाचा दिवस होता. गर्दी कमी झाली तशी दमून वैदेही डोळे मिटून बसली होती. आणि तिला पूर्वीचं सगळं आठवायला लागलं. लहानपणचं ते चाळीतलं घर, पाठोपाठच्या चार बहिणी, चौथीच्या वेळेला आईचा झालेला मृत्यू, गाण्याच्या
सरनाईकबाईंशी जुळलेले सूर. सगळं सगळं परत आठवताना वैदेहीला फार छान वाटत होतं. कठीण परिस्थितीमधून येऊन वैदेहीने गाण्यामध्ये नाव काढलं होतं. धाकट्या तिघींचे संसार मार्गी लावले होते. बाबांचं आजारपणही काढलं होतं. बाबांना जाउनही आता 4-5 वर्षं होऊन गेली होती. वयाच्या चाळीशीला मात्र तिला आता कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती.

का कुणास ठाऊक पण कालच्या बक्षिसाच्या सोहळ्यामध्ये तिच्याबरोबर मंचावर बसलेल्या त्या एका तरूण उद्योगपतीकडे सारखं तिचं लक्ष जात होतं. सोहळ्यानंतर झालेल्या जेवणाच्या कार्यक्रमात या तरूणाने संपूर्ण वेळ तिच्याशी बोलण्यात घालवला होता. संग्राम बडोदेकर असं भारदस्त नाव असलेला हा पस्तिशीचा तरूण उद्योगपती बोलायला अगदी छान होता. वैदेहीच्या गायकीवर प्रेम करत होता. दोन दिवसांनी त्याच्या घरी काही ठराविक निमंत्रितांसमोर छोटेखानी मैफल करायचं वैदेहीने मान्य केलं होतं.

वैदेही ठरल्या वेळी पोचली. संग्रामचे तीन चार मित्र, मैत्रिणी आले होते. संग्रामच्या घरात नोकरचाकर बरेच दिसत होते पण घरातली माणसं नव्हती. संग्रामची पहिली बायको लग्नानंतर वर्षभराच्या आतच अपघातात गेली तेव्हापासून संग्राम एकटाच आहे हे कळल्यावर वैदेहीला वाईट वाटलं आणि बरंही. वैदेहीचं गाणं आज नेहमीपेक्षा जास्त रंगलं. इतरांपेक्षा वैदेहीच आज स्वतःचं गाणं अनुभवत होती. मधूनच डोळे उघडले तर नजरेसमोर तल्लीन झालेला संग्राम दिसत होता आणि मग ती अजूनच आर्त होऊन जात होती.

वैदेहीला घरी यायला पहाट झाली. रात्रभर गाण्याचा किंचितही थकवा तिला जाणवत नव्हता. तिला घरी सोडताना संग्रामने किंचित ओल्या डोळ्यांनी तिला हसून निरोप दिला होता. त्याच धुंदीत वैदेही दिवसभर होती.
..........................................

संध्याकाळचे सात वाजले. लॅच उघडल्याचा आवाज आला. श्री मनोज पाटील घरी आले होते. सौ वसुधा पाटील भानावर आल्या. वैदेहीला पटकन गुंडाळून आतल्या कप्प्यात टाकून देत त्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. त्यातलं सगळंच इतकं अंगवळणी पडलं होतं की डोकं इकडे तिकडे भरकटलं तरी हात आपलं काम बरोबर जिथलं तिथे करत होते. वीस वर्षांची सवय होती त्यांना हे सगळं करायची. कधीच कुठल्याच कारणाने हे वेळापत्रक बदललं नव्हतं. अपवाद फक्त दोन चार वर्षांनी उगवणार्‍या भारतभेटीचा.

वीस वर्षांपूर्वी आपलं गाव, घर, माणसं आणि स्वतःलाही सोडून देऊन त्या सौ वसुधा पाटील बनून अमेरिकेत आल्या होत्या. "अमेरिकेत नोकरी करतात जावईबापू! वैदूनी नशीब काढलं." दोघांच्या वयातल्या पंधरा वर्षांच्या फरकाकडे काणाडोळा करत मावशी म्हणाली होती. "लग्नानंतर कायमचं अमेरीकेतच रहायचं, दरवर्षी भारतात यायचं नाही, अमेरिकेत रहात असलो तरी तिने घराबाहेर पडायचं नाही, शिक्षण, नोकरी कशाचीही अपेक्षा करायची नाही, आदर्श भारतीय स्त्री प्रमाणे पतीच्या अर्ध्या वचनात रहायचं" अशा सगळ्या अटी वैदूच्या बाबांनी एका क्षणात मान्य केल्या होत्या. वैदूच्या नंतर तीन मुली होत्या आणि वैदू बिनाहुंड्याची खपत होती तिही अमेरिकेत म्हणजे पुढच्या मुलींच्या लग्नांसाठी वैदू मदतही करू शकेल असा साधा सरळ विचार वैदूच्या बाबांनी केला.

पंधरा दिवसांच्या आत वैदेही शिंदेचे सौ वसुधा पाटलांच्यात रूपांतर झाले. वैदूने खूप शिक्षण, करीअर अशी स्वप्ने बघितलीच नव्हती. आता कधीही आपलं लग्न होईल आणि आपण सासरी जाऊ याची तिला कल्पना होतीच. नवर्‍याबद्दल फार अपेक्षा ठेवण्याची आपली ऐपत नाही हेही तिने मनाशी मान्य केले होते. तिच्या संसाराच्या कल्पना पण फार साध्या सरळ होत्या. खातंपितं घर आणि हसतीखेळती मुलं यात ती समाधानी असणार होती. सणवार, कुळाचार, देवधर्म, पूजाअर्चा, आलागेला, पैपाहुणा, रीतीभाती हे सगळं तिच्या सासरचे म्हणतील तसं असणारच होतं. त्याबद्दल विचार करण्यासारखं काहीच नव्हतं. संसाराला गरज लागली तर घर सांभाळून घरगुती उद्योग करण्याची किंवा कुठेतरी छोटीशी नोकरी करण्याची कल्पना तिला मान्य होती. सतत न खेकसणारा, त्रागा नकरणारा असा माणूस तिचा पति परमेश्वर असायला हरकत नव्हती. त्याने बाहेर कुठे भानगडी करू नयेत, मारहाण करू नये आणि दारूपायी संसाराची माती करू नये हेच खूप महत्वाचं होतं तिला. सुसंवाद, सहजीवन, मित्रसुद्धा असलेला नवरा अश्या कल्पना तिला माहीतही नव्हत्या. स्वत:चं वेगळं अस्तित्व, आत्मसन्मान, डोळसपणे जगण्याचं भान अश्या गोष्टी शिवल्याही नव्हत्या तिच्या मनाला. कधीतरी आणलेली साडी वा गजरा वा दागिना, एखादेवेळेला नाटक सिनेमा या गोष्टी बोनस अपेक्षांमधे होत्या. नवर्याने स्वत:च्या हाताने चहा करावा आणि आपल्याला द्यावा अशा गोष्टी तिने कधी स्वप्नातही मागितल्या नव्हत्या.. पण मनोज पाटलांना बघून तिचा जीवच धसकला. हार घालतानाच त्यांच्या डोळ्यातली जरब आणि कडवटपणा तिच्या अंगभर पसरत गेला. विष पसरावं तसा. वैदू भारतातच राह्यली. तिला भूतकाळात गाडून सौ वसुधा पाटील परदेशात आल्या.

मनोज पाटलांना ऑफिसमधले सहकारी सोडले तर मित्र नव्हते. मनोज पाटील सहकार्‍यांच्यामध्येही फारसे मिसळत नसत. ते ठरल्या वेळी ऑफिसात जात बहुतांशी ठरल्या वेळी घरी येत. क्वचित कधी ऑफिस पार्टीला जावे लागलेच तर एकटेच जात. दर शनिवारी ते ग्रोसरी आणि इतर खरेदीसाठी जात. दर रविवारी एक सिनेमा बघायला जात. या दोन ठीकाणी मात्र ते सौ वसुधा पाटलांनाही घेऊन जात. सिनेमा बघून आल्यावर न चुकता आपला नवरा असल्याचं आद्य कर्तव्यही निभावत.

मनोज पाटील निर्व्यसनी होते. ते कुठल्याही इतर बायाबापड्यांच्यात गुंतलेले नव्हते. मनोज पाटील आपल्या काकांना दरमहा पैसे पाठवत असत. मनोज पाटलांनी वयाच्या पस्तिशीला विशीतल्या वैदूशी लग्न केले होते.

एकदा रविवारच्या कार्यक्रमानंतर मनोज पाटलांनी सौ पाटलांना आपल्या आईवडिलांचा मृत्यू, काकाने वाढवणं पण त्यात प्रेम नसणं, काकाच्या उपकाराची परतफेड म्हणून पैसे पाठवणं असं काय काय सांगितलं होतं. सौ पाटलांनी वैदेही होऊन ऐकलं होतं. हार घालतानाचं धसकणं विसरून या माणसावर प्रेम करायचं असं वैदेहीने ठरवलं होतं. सौ पाटलांना पर्याय नव्हताच.

असं आयुष्य सरळ रेषेसारखं चाललं होतं. सगळ्या रेषा, चौकटी विस्कटून टाकेल आणि घरात गोंधळ माजवेल अशी चिमुरडी पावलं त्यांच्या आयुष्यात आलीच नाहीत. मनोज पाटील चिडले, अस्वस्थ झाले आणि मग गप्प बसले. सौ वसुधा पाटील घाबरल्या, रडल्या आणि मग सगळं गिळून गप्प झाल्या.

हे सगळं सगळं रोज रोज त्यांना आठवे. सगळी कामं आटोपल्यावर त्या सोफ्यावर बसत तेव्हा हा सगळा चित्रपट पुन्हा पुन्हा बघत. इतके वेळा बघून बघून ते आपलंच आयुष्य आहे ही त्यांची जाणीव नष्ट झाली होती.

सौ वसुधा पाटील रिमोट हातात घेऊन टिव्ही पुढे बसत. सतत टिव्ही चे चॅनेल्स मागे पुढे करून झाल्यावर एका ठिकाणी थांबत. तिथे काय चालू असेल ह्याच्याशी त्यांचं घेणदेणं उरलेलं नसे. एकाही चॅनेलवरचा एकही कार्यक्रम त्यांना आवडत नसे वा समजत नसे. पण करण्यासारखं काहीच नाही म्हणून त्या टिव्ही लावून बसत. थोड्या वेळाने ठरलेल्या वेळेला दुपारची झोप घ्यायला त्या बेडवर पडत. झोप आलेली असो वा नसो. ठरल्या वेळेला उठणे. चहा करणे. भरपूर वेळ लावून तो पिणे. संध्याकाळचा स्वैपाकही उरकणे. इतकं करूनही नेहमी फक्त पाचच वाजत. वेळ सरता सरत नसे आणि कंटाळा सगळा आसमंत व्यापत असे. याची त्यांना सवय झाली होती.

मनोज पाटलांच्या एका सहकार्याच्या बायकोने पूर्वी एकदा गाडी शिकण्याचा सल्ला दिला होता. पण मनोज पाटलांचा "आमच्या घरातल्या बायका बाहेर पडत नाहीत." असा अभिमान उफाळून आला होता. वसुधा पाटील गाडी न शिकताच गप्प बसल्या. मेलबॉक्सपर्यंत जाणे, बॅकयार्डमधे फिरणे हे त्यांच्या दृष्टीने बाहेर जाणे झाले होते.

जगात इंटरनेट रुळून कैक वर्ष झाली होती. हल्लीच वसुधा पाटलांनी इंटरनेटबद्दलऐकलं होतं. हळूच मनोज पाटलांना त्याबद्दल विचारलं होतं. मनोज पाटलांचं मत इंटरनेटबद्दल भलं नव्हतंच. कामापलिकडे इंटरनेट वापरणारे लोक त्यांना पसंत नव्हते. कामापलिकडे इंटरनेट वापरणारे सगळे जण चुकीच्या आणि घाणेरड्या गोष्टींसाठी ते वापरतात असं त्यांना वाटे. त्यात चाळीशी पूर्ण झालेल्या बायकोने इंटरनेटची मागणी केली तेव्हा त्यांना वसुधा पाटलांची शरम वाटली होती. ताडकन चोख उत्तर त्यांनी वसुधा पाटलांना दिले होते. वसुधा पाटील परत गप्प बसल्या होत्या. अन्न, वस्त्र, निवारा यापलिकडे वसुधा पाटलांच्या कुठल्याही गरजा असणे त्यांना मान्य नव्हते. उलट दर रविवारचा कार्यक्रम हा ते देत असलेला बोनस होता.

घरामधे खायला उठणारा वेळ, कंटाळा, कोणाशी न बोलणं अश्या सगळ्या गोष्टी वसुधा पाटील रोजच्या रोज झेलत होत्या. पेलत नसलं तरी निभावत होत्या. अशातच एक दिवस दुपारी वसुधा पाटलांचं भारतातून पार्सल आलं. माहेरच्या पत्त्यावरून बहिणीने पाठवलेलं पार्सल. ‘‘आपली चाळीतली जागा शेवटी रिकामी करून द्यावी लागली. तुझ्या काही बारीकसारीक वस्तू सापडल्या. त्या आणि काही फोटो पाठवतेय.’’ अशी बोटभर चिठ्ठी वरती आणि आत एक वही, गाण्याच्या स्पर्धेत चौथीत मिळालेलं उत्तेजनार्थ बक्षिसाचं सर्टिफिकेट, आईवडिलांचा एक, चाळीचा एक आणि बहिणींचा आपापल्या कुटुंबासकट एकेक असे फोटो असा सगळा सटरफटर कारभार होता.

फोटो बघून झाले आणि सर्टिफिकेट बघताना सौ वसुधा पाटलांना आठवलं आपल्याला शाळेतल्या सरनाईक बाईंनी बरं गातेस असं सांगितलं होतं. त्यांनीच शाळेतून स्पर्धेला पाठवलं होतं. पण स्पर्धेत गाउन आल्यावर घरी बाबांनी मारलं होतं. दोन वेळच्या अन्नाची कमतरता पडण्याइतकी परिस्थिती नाहीये की मुलीला गाण बजावणं करायच्या धंद्याला लावेन. असं बरंच काय काय तेव्हा न कळणारं बाबा बोलले होते. नंतर त्या घराने वैदूचं गुणगुणणं सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. हे सर्टिफिकेट सुद्धा कित्येक दिवस बाईंच्याकडेच पडलं होतं. शाळा संपताना मात्र बाईंनी एवढे वर्षं जपून ठेवलेलं सर्टिफिकेट तिच्या हातात ठेवलं होतं.

सर्टिफिकेट बाजूला ठेवून मग सौ वसुधा पाटलांनी वही उघडली. सरनाईक बाईंनी भेट दिलेली वही. अभ्यासाची नसलेली, काहीही लिहायची मुभा असलेली अशी नवलाईची पहिली वही. पहिल्या पानावर प्रिय वैदेहीस सप्रेम भेट असं बाईंच्या अक्षरात लिहिलेलं होतं. आणि पुढच्याच पानावर सरनाईक बाई, त्यांचं गाणं आणि बाबांना असलेला गाण्याचा तिरस्कार, त्यावरून वैदूनी खाल्लेला मार असं सगळं होतं. ‘नाहीतरी मी नकोच झालीये बाबांना, मग सरनाईक बाई मला दत्तकच का घेत नाहीत?’ चौदापंधरा वर्षाच्या वैदूनी स्वप्न पाह्यलं होतं सरनाईक बाईंची मुलगी बनून बाईंकडून गाणं शिकण्याचं.

वहीच्या पानापानांच्यात वैदूची पुरी न झालेली कैक स्वप्नं, कैक इच्छा होत्या. बहिणी, मैत्रिणी कुणालाच सांगता येण्यासारखं नसलेलं बरंचसं आतलं काय काय त्या पानांवर सांडलेलं होतं.
'चाळीतल्या मदाने काकू डेंजर आहेत. इतकं मारलं बिचार्या वंदनाला. कॉलेज बंद केलं तिचं!’
‘पण आता तर वंदना पळून गेली. लग्न केलं. आता पाया पडायला आलेत. तिच्या नवर्याला मोठ्ठं टक्कल आहे. वंदना सुंदर आहे. हा असा कसा? तर यावर निलू म्हणते स्मार्ट आहे की.’ ‘
हे असले उद्योग केले की लवकर लग्न करावं लागतं असं नाहीतर तसं. नकोच ते.’
‘अर्चनाच्या घरी गेले होते पहिल्यांदा. केवढं मोठ्ठं घर आहे. तिला वेगळी खोली सुद्धा आहे. तिथे तिच्याशिवाय कोणी जात नाही. तिच्या वस्तूंना घरातले कोणीही हात लावत नाहीत. तिची आई फार छान आहे अगदी माझ्या आईसारखी. फक्त तिची आई आहे आणि माझी आता नाही. तिचे बाबा पण छान आहेत. एकदम मस्त दिसतात. ते घरी आले की गप्प बसावं नाही लागत. उलट ते आल्यावर अज्जून मज्जा असते अर्चनाच्याकडे. ते अर्चनाला खूप शिकवणारेत. आपल्या पायावर उभं करणारेत आणि मग अर्चना म्हणेल त्याच्याशी तिचं लग्न करून देणारेत. माझे बाबा का असे नाहीत? ते आमच्याशी नीट बोलत सुद्धा नाहीत. माझे बाबा असे असते तर किंवा मी अर्चनाचीच जुळी बहीण असते तर...’ ‘
टाकीवरच्या ग्रुपमधल्या त्या चेक्स शर्टवाल्याने मी निळा रंग घातल्यावर दोनदा वळून बघितलं. माझंही लक्ष गेलं कळताच नजर चुकवली. मला निळा रंग आवडतो. माझ्याकडे निळ्या रंगाचेच कपडे आहेत. त्याचं नाव काही माहीत नाही. त्याचं नाक मात्र गमतीशीर आहे. आधी घसरगुंडीसारखं ढॉइंग आणि मग अचानक वरती वळून तुटक्या स्वल्पविरामासारखं तुटलेलं टुक! अगदी ढॉइंग टुक! म्हणता येईल असं.’
‘संगीताकडे खूप कादंबर्‍या आहेत. त्यातले सगळं किती छान असतं. तो आणि ती भेटतात. प्रेमात पडतात. मग काहीतरी होत होत त्यांचं लग्न होतं. ‘प्रेमदिवाणी’मधला अनिकेत किती छान आहे. अर्चनाला सांगितलं त्याबद्दल तर तिने फालतू कौटुंबिक कादंबर्‍या म्हणून नाक मुरडलं. अर्चना अशी काय आहे? जाऊदे. मला तरी खूप आवडल्या या कादंबर्‍या. प्रेमदिवाणी, फुलपाखराचे पंख, अखंड सौभाग्यवती, चांदण्यात भेटली राधा.. मस्त आहेत. घरी कोणाला दिसता कामा नये. बाबांना आवडणार नाहीच काही. ’
‘तुझा ढॉइंग टुक अर्चनाच्या मागे आहे. संगीता सांगत होती. पण तो मुळात माझा कधी झाला? मला त्याच्या नाकाची मजा वाटते एवढंच.’
‘अर्चनाचं जमलंय म्हणे. त्या ढॉइंग टुकशी नव्हे. कायनेटीकवाल्याशी.’
‘अर्चना सांगत होती जरा बरी रहा म्हणून. म्हणजे कसं पण? आणि ते कसं जमणार? कॉलेजमधे यायला मिळतंय हेच खूप आहे.’
‘आज ढॉइंगने अर्चनाला माझ्याबद्दल विचारलं असं संगीता सांगत होती. अर्चनानी विषयच काढला नाही.’

सौ वसुधा पाटलांना ढॉइंग टुक आठवला. काय बरं विचारलं होतं ढॉइंगने? लांब केसवाल्या सावळ्या मुलीचं नाव काय असं विचारलं असेल? अर्चनाने कधीच कसं नाही सांगितलं? कधीच भेटले नाही मी ढॉइंगला.

....................................

‘‘कोण ती सुंदर लांब केसांची सावळी राजकन्या? नाव काय तिचं?’’ ढॉइंगने अर्चनाला विचारलं होतं. अर्चनाने वैदूला सांगितलं होतं. वैदू कल्पनेनीच लाजली होती. वैदूने किती आढेवेढे घेतले पण अर्चना तिला टाकीशी घेऊन गेलीच होती. प्रत्यक्ष समोर ढॉइंगला बघून वैदू बावरलीच. त्याच्याशी बोलताना त्याच्याकडे सोडून सगळीकडे बघत होती वैदू.

वैदू आणि ढॉइंग केवळ दोन तीनदाच भेटले होते. ‘‘तो वेडा झालाय तुझ्यापायी! काय केलंस कोण जाणे!’’ अर्चना वैदूला चिडवत म्हणाली होती. अजूनतरी तो वैदूचा छान मित्रच होता. छान मित्र पण खूप आवडता. इतकं लक्ष वैदूकडे आजवर कुणी दिलं नव्हतं. वैदूचं गुणगुणणं त्याला खूप आवडायचं.

‘‘वैदेही!’’ त्याच्या तोंडून आपलं नाव पहिल्यांदा ऐकताना आपलं नाव इतकं सुंदर आहे याचा साक्षात्कार झाला होता वैदूला. वैदेही आणि ढॉइंग कॉलेजमधे टाकीशी भेटायचे आणि मग त्याच्या बाईकवरून कुठेतरी लांब जायचे. तो तिच्यासाठी कविता लिहायचा आणि तिला वाचून दाखवायचा. असंच शहरापासून दूर एका ठिकाणी ते बसलेले असताना ढॉइंगनी हळूच हाक मारली होती. वैदेहीचा हात हातात घेतला होता. वैदेही शहारली होती. त्याच्या डोळ्यात बघता बघता त्याच्या मिठीत शिरली होती. आणि थोडी घाबरली पण होती. तिला मिठीत घेताना हळूच तिच्या डोक्यावर थोपटून त्याने विश्वास दिला होता तिला ‘घाई करणार नाही!’ हा. तिच्या डोळ्यातून खळ्ळकन एक थेंब पडला होता.

इतकं प्रेम तिच्यावर कुणी केलं नव्हतं आजवर. वैदू गुणगुणायला लागली की तो म्हणायचा तुला तुझ्या वडलांच्यापासून पळवून नेतो मग बघू कोण तुझं गाणं थांबवतो. तू घरात केवळ गात रहा. आपलं घर नुसतं सुरांनी भरलेलं असू देत..

वैदूची टी.वाय.ची परीक्षा नुकतीच संपली होती. त्याचं शिक्षण गेल्या वर्षीच पुरं झालं होतं आणि आता तो त्याच्या वडलांना धंद्यात मदत करत होता. तेव्हाच कोणीतरी हा प्रकार वैदूच्या बाबांच्या कानावर घातला. मुलीने दिवे लावले म्हणून, स्वत:चा निर्णय घेतला म्हणून, न विचारता निर्णय घेतला म्हणून, जातीबाहेरचा मुलगा निवडला म्हणून, मुलगी ऐकत नाही म्हणून.. अश्या असंख्य म्हणूनांना घेऊन वैदूचे बाबा चीड चीड चिडले. वैदूला कोंडून ठेवणे, उपाशी ठेवणे असे सगळे प्रकार करू झाले. शेवटी वैदूला मारायला धावले आणि तेवढ्यात धाकट्या बहिणीने बोलावल्यामुळे ढॉइंग तिथे हजर झाला. वैदूनी जवळजवळ नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलं.

ढॉइंगच्या घरात वैदेहीचं स्वागतच झालं. वाजतगाजत लग्न झालं. वैदेही शिंदे आता सौ वैदेही टुक झाली. सगळं टुक घराणं आनंदानी भरून गेलं. वैदू गाणं शिकायला लागली आणि घरभर सुरांच्या महिरपी सजायला लागल्या. वर्षभरातले सगळे सणवार दणक्यात पार पडतायत न पडतायत तोच वैदेहीला ‘हवंनको’ झालं. परत एकदा टुक बंगल्यात आनंदाला उधाण आलं.

एक मुलगा नि एक मुलगी. जुळ्यांचा जन्म झाला. मुलगी ढॉइंगसारखी तर मुलगा वैदूसारखा. वैदूला दिवसाचे तास कमी पडायला लागले. ढॉइंग, त्याचे आईबाबा, धाकटा भाऊ सगळे वैदेहीवर खुश होते. जुळे दोघं तर सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होते.

मुलं मोठी होत होती. अभ्यासात चमकत होती. वैदूच्या अंगावरही सुखवस्तू तजेला चढला होता. ढॉइंगचा बिझनेस उत्तम चालला होता.

बाबा सोडून वैदूच्या माहेरचे सगळे तिला भेटून गेले होते. बहिणींच्या लग्नांच्या वेळी आपलं कर्तव्य म्हणून वैदूने घसघशीत मदत केली होती. बाबांच्या मनातली अढी काही जात नव्हती. कधी कधी तो विचार करून वैदू कष्टी व्हायची. मग ढॉइंग तिची समजूत घालायचा.

बाबा अत्यवस्थ आहेत कळल्यावर सगळा कडवटपणा गिळून वैदेही धावली होती. शेवटी तरी बाबांनी तिला माफ करायला हवं होतं. पण ते घडलं नाही. बाबा तसेच गेले तिच्याकडे पाठ फिरवून. वैदेही खूप रडली पण नवरा आणि मुलांच्यामुळे सावरली.

मुलं दहावीला बोर्डात आली. टुक बंगला परत एकदा सजला. वैदेही आणि ढॉइंग सुखाच्या शिखरावर होते. ..........................

फोन वाजला आणि सौ वसुधा पाटलांची तंद्री भंगली. त्या नॉर्थ कॅरोलिनाच्या त्यांच्या घरात परत आल्या वैदेहीला ढॉइंगबरोबर सोडून. त्यांनी घड्याळ पाह्यलं. सात वाजले होते. आजचा पहिलाच दिवस होता जो कधी सरला ते कळलंच नव्हतं. एक विचित्र हुरहुर घेऊन त्या आपल्या कामाला लागल्या. किंचित गुणगुणत. त्यांचा कंटाळा पार पळाला. श्री मनोज पाटील घरी आले. जेवले. झोपले. सकाळी उठले. नाश्ता केला आणि परत ऑफिसला निघून गेले. त्यांना वसुधा पाटलांमधला बदल जाणवला सुद्धा नाही. वसुधा पाटलांनी सगळ्या क्रमातला त्यांचा त्यांचा भाग पूर्ण केला. वही उघडली आणि नवीन आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाल्या.

--------------------------------------------------------------------------

समाप्त...
- नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

typical "नी" style कथा.. Happy

अप्रतिम आहे...मस्तं फुलविली...

असाच् एक विचार आला मनात की...या कथेचं शिर्षक "ही वाट दूर जाते..." असं काहिसं ठेवता आलं असतं का?...( आणि हवं असल्यास कथेत् सुद्धा त्या गाण्याचा reference टाकायचा...)...
सध्याचं title चांगलं आहे...पण...वाचकांना थोडं compact द्रुष्टिकोनातून वाचायला लावतं कथा...
I hope you get my point..( mind करू नका...)

-परीक्षित

सुरेखच लिहिली आहे कथा. मागे वाचली होती तेव्हाही आवडली होती. पहिल्यांदा कथा वाचल्यावर जी अस्वस्थता अनुभवली होती ती तितक्याच तीव्रतेने आजही अनुभवली.

इतके दिवसांनी प्रतिक्रिया.. भारीच Happy
परत आभार.
परिक्षित, माइण्ड काय करायचं त्यात... तुम्हाला वाटलं तुम्ही सजेस्ट केलंत. ठिके की. Happy
शिल्पा बडवे, नाही ही सत्यकथा नाही. असल्यास माझ्या समोर तरी अजून आली नाहीये. Happy

फार सुंदर कथा.
माहित नाहि का पण खूप अस्वस्थ करते हि कथा
पूर्वी पण वाचली होती पण तेंव्हा मायबोली सभासद नसल्याने प्रतिसाद देता आला नव्हता.

कसलंच रिलेट झालं मला Happy
मी अगदी वसुधा पाटील ही नाही आणि वैदेही टुक पण नाही
पण वेळ मिळेल तस स्वतःच्याच भाव विश्वात रमुन वेगळी वेगळी स्वप्न पहायचं जाम वेड आहे मला.
माझी स्वप्न माझं विश्व मला हवं तस सजवते मी तेवढा काळ! नंतर माईंड एकदम फ्रेश होऊन जातं Happy
मस्तच ग!

बऱ्याच दिवसांपासून असलाच काहीसा विषय मनात घोळत होता… त्यावर लिहाव अस वाटत होत आणि हे आज वाचलं… मनातलंच वाटलं

मीही आधी वाचली होती पण प्रतिसाद द्यायचा राहिला होता. मस्तच आहे ही कथा. सौ. वैदेही टुक हे भारी आहे Lol
सामो, मनातलं स्वप्नरंजन आहे.