बी.एम.एम. अधिवेशनाचा भरगच्च कार्यक्रम: डॉ. बाळ फोंडके प्रमुख वक्ते

Submitted by अजय on 18 February, 2013 - 12:39

साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट, आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मधे होणार्‍या बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत. या सर्वांची उपस्थिती निश्चित झाल्यानं, या १६ व्या अधिवेशनाच्या तयारीत चांगलीच रंगत आली आहे.

प्रसिध्द विज्ञानलेखक तसंच विज्ञान-प्रचारक डॉ. बाळ फोंडके यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. डॉ. फोंडके यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे मराठी विचारधारेतल्या आणि साहित्यातल्या एका सशक्त प्रवाहाचा उपस्थितांना आणखी एकदा परिचय होईल.

'विक्रमवीर' प्रशांत दामले यावेळी जरा वेगळ्या रुपात रंगमंचावर अवतरणार असून, या गायक-अभिनेत्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, ते खुल्या गप्पांमधून रसिकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हेही मुलाखतीद्वारे रसिकांना सामोरे जाणार असून, सुप्रसिध्द स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी त्यांची मुलाखत घेतील.

बी.एम.एम.च्या अधिवेशनात कोणतं नाटक येतं, याकडे अमेरिकेतील नाटकप्रेमी नजर लावून असतात. यावेळी सुकन्या कुलकर्णी, अजित भुरे, अद्वैत दादरकर आदींच्या भूमिका असलेलं, 'एकदंत क्रिएशन्स' निर्मित आणि विजत केंकरे दिग्दर्शित 'फॅमिली ड्रामा' रसिकांच्या भेटीला येत आहे.
त्याबरोबर, यावर्षी रसिकांना संगीत-नाटकाचीही मेजवानी मिळणार आहे. राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेलं 'संगीत मानापमान' यावेळी सादर होणार आहे. नव्या रुपातलं, नव्या संचातलं हे 'मराठी म्युझिकल' नव्या पिढीलाही आवडेल, अशी आयोजकांना खात्री वाटते.

बी.एम.एम. सारेगम २०१३ या संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा या अधिवेशनात होणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्रिया बापट करणार असून, प्रशांत दामले हेही या सोहळ्यात 'स्पेशल गेस्ट' म्हणून सहभागी होतील.

येत्या जुलैमधे होणार्‍या बी.एम.एम. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत. याविषयी www.bmm2013.org इथे अधिक माहिती मिळू शकेल आणि www.facebook.com/bmm2013 या फेसबुक पेजवर सतत नवनव्या घडामोडी कळू शकतील.

नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी
https://www.facebook.com/bmm2013
http://www.bmm2013.org

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोवारीकर यांच्या उपस्थितीनं बॉलिवूडमधील 'मराठी ग्लॅमर' या अधिवेशनाला लाभेल,>>> ज्यांनी एकही मराठी सिनेमा बनवला वा दिग्दर्शित केलेला नाही, ते 'मराठी ग्लॅमर' ?

मला तरी वाटतं बुवा. माधुरी दिक्षीत, सोनाली बेंद्रे यांनी एकाही मराठी चित्रपटात काम केलं नाही तरी मी त्याला मराठी ग्लॅमरच म्हणणार. मग गोवारीकर पण 'मराठी ग्लॅमर' का नाही.
"ग्लॅमरस मराठी माणूस्/बाई ते मराठी ग्लॅमर" अशी सोपी व्याख्या मला माहिती आहे.

माने, म्हणजे ज्यांनी मराठीत न करता हिंदीत काम केलं त्यांना 'मराठी ग्लॅमर' म्हणणार असं म्हणा की! Happy अलका कुबलला म्हणाल का मराठी ग्लॅमर?

मंडळी, आपण विविध क्षेत्रातील मान्यवर आणि यशस्वी मराठी व्यक्तिंना अधिवेशनासाठी आमंत्रित करतो. जसे एखादा प्रख्यात क्रिकेटपटू, नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक इ.
जसा क्रिकेट हा मराठी खेळ नाही, आणि शास्त्र, संशोधन हे मराठी विषयातच केले पाहीजे असे बंधन नाही तसेच हे. त्यांचं मराठी असणं आणि कुठल्यातरी क्षेत्रात ठाशीव योगदान केले असणे पुरेसे आहे.

- इंडीया प्रोग्रॅमिंग
बीएमएम २०१३