चारचौघी - १५ (अंतिम भाग)

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2013 - 09:22

'चारचौघी' ही कादंबरी या भागाद्वारे समाप्त होत आहे. मायबोली प्रशासन, प्रतिसाद व प्रोत्साहनदाते आणि वाचक यांचा मी ऋणी आहे. वकुबानुसार जमेल तशी लिहिली आहे. काही गोष्टी पटल्या नसल्यास किंवा चुकल्या असल्यास कथानकाच्या गाभ्याकडे अधिक मन वळवावेत इतकी विनंती करू शकतो.

मनापासून धन्यवाद!

-'बेफिकीर'!

==================

अतृप्ततेचा शाप असलेले मानवी आयुष्य! हाती असलेले सामर्थ्य न वापरता विनयानेही जगता येते या संतांनी सांगितलेल्या वचनाचा पूर्ण विसर पडलेली मने! दुसरा म्हणजेच आपण आणि आपण म्हणजेच दुसरा हे वाक्य फक्त प्रवचने आणि कीर्तने यातच शोभते अशी दृढ श्रद्धा व धारणा असलेले व्यवहारी जग! कागदोपत्री वाळवीच्या पोटी जाणारी समानता! टेबलाखालून दिले गेलेल्या पैशांनी टेबलवर ठेवलेली कायद्याची पुस्तके पळवाटांच्या पुस्तकात रुपांतरीत झालेली.

दोन प्रमुख प्रजाती! नर व मादी! सत्ता, सुबत्ता, सुखसुविधा या तीन घटकांच्या प्राप्तीसाठी प्रत्येकाची लढाई चाललेली! त्याच्यात्याच्या वकुबानुसार जो तो लढत आहे. संस्कृतीच्या साचेबदलाच्या चिरंतन प्रक्रियेत कोणत्यातरी टप्प्यावर 'स्त्री' हा सुखसुविधेचा एक भाग बनला किंवा मानला गेला. पहिल्याच टप्प्यापासून तो तसाच असण्याची शक्यता जरा कमीच असावी.

स्त्रीला निसर्गाने दिलेल्या देणग्या हे तिचे जीवनाच्या लढाईतील खरे शत्रू! लावण्य, मातृत्व व दौर्बल्य! या तीन शापांसकट एक स्त्री जगाशी लढत आहे. लावण्य ओरबाडले जात आहे, मातृत्व लादले जात आहे आणि दौर्बल्य उपभोगले जात आहे. संघटित होणे शक्य नाही कारण अबलांची संघटनाही बळहीनच असणार यावर जणू ठाम विश्वास बसलेला आहे. हाती शस्त्र घेतले तर कायद्याचे दार ठोठावले नाही हा पहिला गुन्हा ठरत आहे. अन्याय सोसून गप्प राहिले तर तिनेच पुरुषाला मोहीत केले असणार हा सोप्पा युक्तिवाद केला जाणे नित्य आहे. स्वतःला जपले तर ते बाहेरच्यांपासून जपता येते, ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्यांच्यापासून स्वतःला जपणे जवळपास अशक्य! स्वतःला जपायचे असले तर ते एखाद्या विशिष्ट वयानंतर आणि एक किमान शारीरिक ताकद मिळाल्यानंतरच जपणे थोडेफार तरी शक्य आहे कारण तीन महिने, सहा महिने, दोन वर्षे आणि चार वर्षे असल्या वयांमध्ये स्वतःला जपता येत नाही. तसेच वय वर्षे पन्नास, साठ आणि सत्तर असल्या वयांमध्ये ती ताकद शरीरात राहिलेली नसतेच. अवयव मात्र तेच राहतात, त्यांचा इतरांच्या मते उपयोग तोच राहतो.

प्रत्येक टप्प्यावर केवळ आपल्या स्त्रीत्वाचे भान ठेवून वागणे रक्तात भिनलेले आहे. इतके, की खरोखर चांगल्या पुरुषाशीही निखळ नाते निर्माण होण्याआधी दोघांनाही अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. एवढे करून ते नाते निखळ आहे हे इतरांना मान्य होईल असे नाही. जगायचे तर इतरांच्यातच आहे.

मन, मनातील विचार, हेतू, आशा आकांक्षा, इच्छा, स्वप्ने, प्रयत्न, संवाद यातील कोणतीही गोष्ट व्यक्त रुपात प्रकटताना 'शरीर' नावाचा अडथळा व त्यायोगे असलेल्या अटी पार करून मगच प्रकट करता येतात. तसे करताना लज्जेने मान खाली जाते, धीटपणे वावरता येत नाही, जपून बोलावे लागते, सौम्य वागावे लागते. कोणताही चुकीचा पावित्रा कोणालाही कधीही विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो. अंगभर बुरखा वागवूनही नजरा चिकटतात. बंधने पाळायला भाग पाडले जाते.

कधीतरी या सगळ्या रचनेवर हल्लाबोल करावासा वाटतो. पण त्याचे स्वरूपही मर्यादीत असल्याचे भान लवकरच येते. जीवन ही कैद आणि मरण ही सुटका असे काहीतरी विचित्र मनात यावे अश्याही पातळीचे क्षण काहीजणींच्या आयुष्यात येतात.

स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणा देणे हेच मुळी असमानता आहे हे ठसवण्यासारखे आहे. किंवा निदान असमानता आहे हे मान्यतरी करण्यासारखे आहेच. यावर युक्तिवाद असा की अमान्य करून काय उपयोग? सर्वत्र दिसतेच आहे की असमानता! पण ही असमानता अश्या आंदोलनांनी 'ऑथेंटिकेट' होत आहे त्याचे काय? मग घोषणा देऊच नयेत की काय? जरूर द्या, पण घोषणांवरच थांबून काय मिळणार?

प्रश्नांना उत्तरे नाहीत, प्रश्नच आहेत. प्रश्नांना फाटे आहेत आणि प्रत्येक फाट्याचा अंत एका प्रश्नानेच झालेला आहे.

स्त्रीचे शरीर तिच्या अपेक्षा, इच्छा व स्वप्ने यांना सामावणार्‍या तिच्या मनाला स्वतःमध्ये सामावून घेते. स्त्रीचे शरीर तिच्या मनाला संरक्षण देते. जसे पुरुषाचे शरीर पुरुषाच्या मनाला सामावून घेते तसेच स्त्रीचेही! पण ते स्त्रीच्या स्वतःच्या दृष्टीने! 'नराच्या' दृष्टीने त्या शरीरात मन नसते किंवा असले तर शरीराबरोबरच तेही नासले जाईल असे असते. स्त्रीचा प्रयत्नवाद, कर्तृत्व, विकास तिच्या ज्या मनःशक्तीमुळे साध्य होऊ शकतो त्या मनाला सामावणारे तिचे शरीर हा तिचा प्रयत्नवाद, कर्तृत्व व विकास यांच्या प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा असावा हा विरोधाभास नैसर्गीक नसून मानवनिर्मीत आहे. हे शरीर झाकले तरी कुतुहल चाळवणारे आहे आणि उघडे टाकले तरी! त्याच्या आवृत्त वा अनावृत्त असण्यावर अवलंबूनच नसलेला असा एक घटक त्या शरीराचा नित्य विचार करत असतो. तो घटक बाह्यघटक असतो. स्त्रीच्या नियंत्रणातील नसतोच. तो घटक म्हणजे नराच्या मनात उफाळून येऊ शकणारी कामवासना! ती कोणत्या नराच्या मनात कोणत्या परिस्थितीत कोणत्या स्त्रीच्या शरीरासंदर्भात उफाळून येईल याला कोणताही नियम लागू नाही. ना नैसर्गीक ना मानवनिर्मीत! त्यामुळे स्वतःला जपत राहणे हा 'श्वास घेण्याइतकाच' आवश्यक आणि चिरंतन भाग होतो तिच्या आयुष्याचा!

स्त्रीच्या वासना उफाळून येण्याला उथळपणा मानायचा जणू प्रघात आहे.

बेसिकली हे सगळेच चुकीचे आहे, कधीतरी फार पूर्वीच चुकलेले आहे हे सगळ्यांना मनात समजते. कोणाकडून अशी अपेक्षाही नाही की मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याची क्षमता व कर्तृत्व कोणी दाखवावे. अगदी मोठ्यात मोठ्या संघटनेकडूनही तशी अपेक्षा ठेवता येत नाही.

सर्व प्रश्न शेवटी एकाच मुद्यापाशी येऊन थांबतात. तो म्हणजे, जर पुरुष स्वतः सभ्य झाले, त्यांचे स्वतःचेच वैचारीक परिवर्तन झाले तरच अनुकुल असे बदल घडण्याची प्रक्रिया जोर धरू शकेल. हे होणे अशक्य नसले तरी जवळपास अशक्य तरी आहेच. काहीवेळा कोणत्यातरी गुन्ह्यांची आकडेवारी कमी झाल्याचे दिसेलही, पण ती नष्ट होणार नाही.

एकजात सगळेपुरुष वाईट नसतात. पण एका संस्कृतीतून व्यक्तीस्वातंत्र्याचे त्या संस्कृतीतील स्थानिक निकष जेव्हा दुसर्‍या संस्कृतीसमोर माध्यमांच्यामार्फत आणून आपटले जातात तेव्हा भावनिक व वैचारीक विस्फोट होऊ शकतो. हेही सगळ्यांना मनात माहीत असते. गर्भनिरोधक साधनांच्या वीस वर्षांपूर्वीच्या जाहिरातीत दोनच मुले असलेले कुटुंब सुखी असून नवरा व बायकोच्या चेहर्‍यावर सुख व समाधान दाखवले की पुरायचे. संदेश पोचायचा. आज कंडोम्सचा फ्लेवर, त्या फ्लेवरमधून हिंडणारी अर्धनग्न युवती आणि दोन एकमेकांमध्ये बेभानपणे मिसळलेली शरीरे दाखवल्याशिवाय लक्ष वेधून घेता येत नाही. हा फरक दोन तीन दशकांमध्ये पडत गेला, पडत राहिला.

मोबाईल फोन, शेव्हिंग क्रीम, आफ्टर शेव्ह, डिओ, मोटरसायकल, धुण्याचा साबण, वेदनानाशक बाम, बोर्नव्हिटा, शीतपेये, उत्पादन कोणतेही असो, सेक्स अपील दाखवणारी मुलगी असल्याशिवाय जाहिरात पूर्ण होत नाही. मग तिचा भले त्या उत्पादनाशी अर्थाअर्थी संबंध नसो!

वाढत्या लोकसंख्येच्या जोडीला मुक्त अर्थव्यवस्था आल्यामुळे झालेल्या सांस्कृतीक उलथापालथीत आणि सुखसमाधानाच्या बदललेल्या परिभाषांमध्ये टिकून राहण्याच्या झुंजीत कधी मुले कॉन्व्हेंटमध्ये जायला लागली, कधी नवरा व बायको दोघांनी नोकरी करणे अपरिहार्य झाले, कधी फास्ट फूड स्थिरावले, कधी आजी आजोबांचे संस्कारक्षम थरथरणारे हात दुरावले आणि कधी बहिणीप्रमाणे असणार्‍या वर्गमैत्रिणीची गर्लफ्रेंड झाली हे एका पिढीला जणू उमगलेच नाही. इतके करून हे सगळे सोडून होतो तसे व्हावे असे कोणीच म्हणणार नाही. जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या सर्व गोष्टी हव्याच आहेत. जागतिक स्तरावर व्यवहारात बोलली जाणारी इंग्रजी आम्हाला हवी आहे. पण त्या माध्यमात शिकणार्‍या मुलांसाठी वाचनास योग्य अशी पुस्तकेही तीच मातृभाषा असलेल्या संस्कृतीतून येतात याचे काय करावे? प्रगतीचा हा वेग आणि ही स्थिती सोडून थेट जुन्या वळणाने गांधीवादी व्हावे असे कोणीच म्हणत नाही, पण हल्ली मुले आणि मुली पूर्वीपेक्षा कमी वयात मोठी का होत आहेत? झाली तर वाईट काही नाही, पण मग बालकपालकसारखे चित्रपट काढावेत इतकी अवस्थातरी का यावी? मुळातच तो भाग सिलॅबसमध्ये असण्याइतका आपला समाज वयाने मोठा नाही झाला का अजून? म्हणूनच वाटते की सगळे पुरुष एकजात वाईट नसतात, पण हा संस्कृतीक उलथापालथीचा काळ जुन्याच शिकवणींवर सोसून तावून सुलाखून पुन्हा सभ्य म्हणून त्यातून असे कितीसे बाहेर पडणार? काहीच प्रभाव पडणार नाही? सभ्यता मोजायचे कोणतेही परिमाण उपलब्ध नाही. पण असतेच तर आज आपल्याला हे तरी नक्कीच दिसले असते ना की १९७० च्या तुलनेत - लोकसंध्यावाढीच्या प्रो रेटा बेसिसवर पाहिले तरीही - असभ्यता खूपच अधिक वाढली आहे? ती काय केवळ बायका अबला असतात म्हणून? त्या एक्स्पोज करतात म्हणून? त्या नोकर्‍या करतात म्हणून? पुरुष बिघडले आहेत म्हणून? पुरुष मुळातच वाह्यात होते पण आता असभ्यपणा करण्याची संधी अगदी सहज हाताशी असते म्हणून?

निरुत्तर करणारा प्रश्न आहे असे वाटते. त्यामुळे मग जो तो आपली उत्तरे शोधतो किंवा निर्माण करतो. कदाचित गेल्या सव्वाशे वर्षात एकंदर आधुनिकतेकडे झालेला सामाजिक प्रवास शेवटच्या (म्हणजे गेल्या) पंचवीस वर्षांत सर्वाधिक वेगाने व प्रमाणाने झाला. त्यामुळे आज कार्यरत असलेली पिढी सर्वाधिक हबकलेली व बहकलेली असण्याची शक्यता आहे. त्यातून व माध्यमांमधून स्त्रीचे जे रुप दाखवले जात आहे त्याची नोंद मनात कोठेतरी राहिल्यामुळे संधी मिळेल तेव्हा बलात्काराचा राक्षस प्रकट होत आहे. किंवा तो संधीच्या आधीपेक्षा खूपच अधिक प्रमाणात शोधात आहे. शांतपणे थांबून विचार करण्याचा वेळ आज राहिलेला नाही.

जो तो आपली उत्तरे शोधत आहे.

सिमेलिया जैन! अ‍ॅरेस्टेड! पोलिसांच्या भयानक चौकशीपुढे हार मानून खुनाची कबूली दिलेली. रफी आणि ओमही अडकलेले. त्याचबरोबर मेघना आणि समीरही अडकलेले! वारिया दस्तूरचीही चौकशी चाललेली. सिमला शिक्षा निश्चीत. मोटिव्ह क्लीअरली एस्टॅब्लिश्ड. सिमवर झालेला रेप हा तो मोटिव्ह! मेघना, समीर, नीलाक्षी आणि वारिया दस्तूर या चौघांच्या साक्षी आणि सिमला वारियाकडे जायला सुचवणारा एस एम एस हे पुरावे! समीरलाही शिक्षा निश्चीत! तशीच मेघना आणि वारियालाही! काही प्रमाणात नीलाक्षीला झाली असती ती पै मुळे वाचली.

सिमेलियाला तिच्या घरचे वाचवायला आले नाहीत. तिच्यावर रेप झाल्याचे समजल्यानंतर तिचे फॅन्स आंदोलन करून गेले. आंदोलनाची तीव्रता हळूहळू कमीकमी होत गेली. आता फॅन्सना त्यांचे त्यांचे आयुष्य आहे आणि सिमला तिचे तिचे! सिमचे वय, तिला अनुभवायला लागलेल्या भयानक गोष्टी, तिच्या मनात खुनाचा विचार येण्याची पार्श्वभूमी आणि पै चा जमेल तितका हस्तक्षेप यातून सिमची शिक्षा कमी होण्याची शक्यता आहे. पण तेवढेच! लगेच सुटका त्रिवार अशक्य आहे. करीअर संपुष्टात आलेले आहे. जुने आयुष्य, मुलवानी होस्टेलच्या रूममधील मैत्री, हनुमाननगरमधील बालपण, सगळे जणू आधीच्या जन्मात झाले असावे असे वाटत आहे तिला आता!

पण सिमच्या चेहर्‍यावर एक निगरगट्ट स्मितहास्य कायम विलसलेले असते. यत्किंचितही पश्चात्ताप नाहीये तिच्या मनात! तिच्यापुअरते मर्यादीत असलेल्या तिच्या भावविश्वातील खलनायकांना तिने यमसदनी पाठवलेले आहे. समीरही तिथे असता तर त्यालाही पाठवले असते. इतकेच वाईट वाटत आहे की तो अजून जिवंत आहे. पोलिस खाते, समाजातील अनेक घटक आणि संघटना यांना मनातूनच सिमेलियाने दिलेला जबरी तडाखा खरे तर आवडलेला आहे. कोर्टात तो वारंवार अश्या रीतीने मांडण्यात येत आहे की सिमने एक प्रकारे त्या तिघांना मारून समाजातील कीड नष्टच केली. पण सरकारी पक्षातर्फे असलेले वकील अजूनही सिमचे उत्तान पोषाख, ग्लॅमर वर्ल्डमधील स्त्रियांचे वर्तन, सिमला असलेले व्यसन, रात्रीबेरात्री कोणाबरोबरही कुठेही कोणत्याही पोशाखात ती देत असलेल्या जाहिराती यांच्याच जोरावर हे सिद्ध करत आहेत की सिमसारखीवर बलात्कार होणार नाही तर काय होणार?

पण जो तो स्वतःची उत्तरे शोधत असतो. सिमेलिया जैनने स्वतःचे उत्तर शोधले.

सिमवर फिल्मी स्टाईलने रेप झाला होता. अगदी सहज संधी निर्माण झाली आणि पाचजणांनी मिळून तिला तावडीत पकडले आणि तिचा रेप केला. जसे प्रेम चोप्रा किंवा एखादा खलनायक एखाद्या नटीची साडी फेडतो तसाच हा प्रकार! सिमची जबाबदारी कितपत होती? ज्या करिअरमध्ये उंची गाठायची तिथे गोयल येत असलेले ऑकेजन टाळणे तिला त्या क्षणी शक्य नव्हते. जेथे स्त्रीने कपडे काढल्याशिवाय तिला पैसेच मिळत नाहीत त्या क्षेत्रात आशिषला किस देणे टाळण्यात अर्थ उरलेला नव्हता. एकदा रेप झाल्यानंतर असाईनमेन्ट नाकारणे हा वेडेपणा होता. कायद्याकडे ती गेली होती पण तिला वारिया दस्तूर भेटली हा तिचा दोष नव्हता. पोलिसांकडे ती गेली नाही कारण ती एकटी होती, वयाने लहान होती आणि होऊ शकणार्‍या बदनामीपेक्षा मिळू शकणार्‍या असाईनमेन्टचे महत्व तिला त्या क्षणी अधिक वाटले होते. आशिषच्या बर्थ डे पार्टीला ती बुरखा घालून जाणे कोणालाच अपेक्षित नव्हते. ती टीशर्ट आणि जीन्स घालून गेलेली होती. रेप होऊ शकेल याची किंचित जरी जाणीव झाली असती तरी ती तिथून तत्क्षणी बाहेर पडली असती. पण अचानक आपल्याला शारीरिक बळाने उचलले जाईल आणि कोणीही मदत करणार नाही, उलट आपल्या असहाय्यतेचा गैरफायदाच घेतील हे तिच्या डोक्यातही येणे शक्य नव्हते. तेही मेघनासारखी एक तिच्याएवढीच मुलगी तेथे असताना! त्या टोळक्यावर विश्वास ठेवणे हा सिमचा अपराध नव्हता. जगात कोणावर तरी विश्वास ठेवल्याशिवाय आणि कोणीतरी विश्वासार्ह व्यक्ती सोबतीला असल्याशिवाय माणूस हा समाजप्रिय प्राणी जगूच शकणार नाही. चार मुले आणि गोयल यांच्या एकत्रीत शारीरिक ताकदीपेक्षा सिमची ताकद नेहमीच कमी असणार होती. जे झाले ते झाले, पुढचे पाऊल खबरदारीने टाकायचे ही तिची नंतरची भूमिका खरे तर आंतरीक बळातून आलेली होती. पण चार भिंतींच्या आत नग्न झालेलीला पुन्हा नग्नच होण्याचे काम मिळावे या दैवदुर्विलासावर स्वतःच्या नशिबाला दोष देत ती हासत राहिली. समाज ढवळून काढत राहिली. त्यासाठी होस्टेल सोडले, मैत्रिणी सोडल्या, घर सोडले आणि शेवटी स्वातंत्र्यही गमावून गजाआड जावे लागले. हाती काहीही राहिले नाही. फक्त एक समाधान! की तीन नराधमांना जिवंत जाळले. हे सिमेलियाने बलात्काराला दिलेले उत्तर होते.

आठ वर्षांपूर्वी सलग चार वर्षे तेही अगदी कोवळ्या वयात नरकासमान यातना भोगलेल्या नीलाक्षीने आयुष्य स्वतःसारख्याच शोषित मुलींच्या पुनर्वसनासाठी वाहून घेतलेले होते. आजवर तिच्यामते तिने शोषणाला दिलेले तिचे हे उत्तर होते. पण पै भेटला आणि मनात खळबळ माजली. पै सामर्थ्यवान होता हे पाहून नव्हे. तो सज्जन होता हे पाहून नव्हे. तो युनिक होता हे पाहून नव्हे. तो तिला उपकार केल्यासारखे न दाखवता लग्नाला तयार झाला होता हे पाहूनही नव्हे. मनात खळबळ माजली ती यामुळे की सिमेलियाबाबत त्याने घेतलेल्या भूमिकेमिळे! एक प्रकारे सिमला त्यानेच समाजासमोर आणले. अगदी छायाचित्रासकट! पण ते अश्या प्रकारे आणले, की त्यातून सिमची एक प्रकारची प्रसिद्धीच झाली. एवीतेवी होर्डिंग्ज लागल्यानंतर गावात कुणकुण लागणारच होती की ही मुलगी मुलवानी होस्टेलला राहते. मग तीच बातमी चार दिवस आधी छापली तर क्षितीजतरी खपेल हे पै चे म्हणणे व्यावसायिक दृष्टिकोनातून ठीकच होते. पण ते करून झाल्यानंतर त्याने सिमला शक्य तितकी सुरक्षा पुरवली होती. अगदी तिच्या पाठीशी उभा राहिलेला होता. त्यातही कश्याचीही अपेक्षा न ठेवता. सायलेंट ऑब्झर्व्हर नीलाक्षीला पै असा ठळकपणे जाणवत राहिला तो यामुळेच! आपलीच पोळी भाजून घेण्याची वृत्ती नव्हती त्याची! पत्रकारिता पार पाडल्यानंतर तो एकाकी सिमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. तेव्हा त्याला नीलाक्षी नीटशी माहीतही नव्हती. सिमकडून त्याने पैसे घेतले नाहीत, तिला ब्लॅकमेल केले नाही किंवा कसलाच त्रास दिला नाही. उलट पोलिसांपासून आणि सोहनीबाईंपासून वाचवले. पै ने सिमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि स्वेच्छेने अंगप्रदर्शन करून पैसे मिळवण्यावर गदा येऊ दिली नाही.

पुरुषाची सावलीही नकोशी झालेल्या नीलाक्षीला पै स्त्री आणि पुरुष या परिभाषेच्या पलीकडील व्यक्ती वाटला. त्याच्याशी विस्तृत बोलल्यानंतर त्याचे धडाडीयुक्त पण सभ्य विचार अधिकच जवळून ऐकायला मिळाले. पै च्या डोळ्यात वासना नव्हती. फार काही आपुलकी होती अश्यातलाही भाग नाही. पण माणूस रोखठोक होता. विचार चांगले होते. निली अठ्ठावीस वर्षांची होती. तो चाळिशी च्या आसपास! वयात अंतर होते. पण विचारांत नव्हते, भूमिकांमध्ये नव्हते, कार्यात नव्हते. समांतर रेषांप्रमाणे जात राहण्याऐवजी एकच रेषा बनून प्रवास करण्याची निलीची कल्पना पै ला मान्य होती. तसेही, दोघे मिळून खरंच बरेच काही करण्यासारखे होतेही!

लांबवर पुरुष दिसला तर श्वास रोखून तिरस्काराने मान वळवून तो दिसेनासा होईपर्यंत जमीनीकडे पाहणार्‍या निलीला या जगाने आजवर दिलेल्या अमानवी अनुभवांनंतर पै च्या रुपाने एक दिलासा आणि एक चांगला अनुभवही दिला. निली पुरुषाशिवाय जगू शकत होती. तिच्या सध्याच्या जगण्यात पुरुषाच्या भक्कम सोबतीची काहीच आवश्यकता नव्हती. खरे तर उगाचच एक पुरुष पुन्हा एकदा आयुष्यात आणून जुगार खेळायचीही आवश्यकता नव्हती. पण उभे आयुष्य पुढे पडलेले होते. ते काढताना एक हक्काचा सोबती किंवा सोबतीण मिळावी असे वाटणे गैर नव्हते. पै पुरुष असला तरी तिच्या मनात असलेल्या पुरुषी साच्याबाहेरचा होता. आरपार पाहता येईल असा पारदर्शक होता. मुख्य म्हणजे पत्रकार होता. तोही बेधडक पत्रकार! त्याच्या रुपाने आपल्या कार्याला आवश्यक अशी एक ताकद सोबतीला राहणार होती. यात पुरुषप्रधान संस्कृतीलाच शेवटी शरण जायला लागले असे काहीही अपमानास्पद नव्हते. हा पूर्ण विचारांती घेतलेला एक परिपक्व निर्णय होता ज्याचे अधिष्ठान नवी नवलाई, दोन घराण्यांचे मीलन, समाजाच्या मते झालेले लग्नाचे वय असल्या तद्दन तकलादू निकषांवर आधारलेले नव्हते. ती खरे तर एक आत्मिक गरज होती. ज्या पुरुष नावाच्या घटकाचा पराकोटीचा तिरस्कार आपण करतो त्यातील चांगुलपणाचाही शोध घ्यायची एक सुप्त इच्छा पूर्ण होऊ शकणार होती. आत्मविश्वास वाढणार होता. नवे दालन उघडले जाणार होते. शक्यतांच्या शक्यता होत्या.

निलीवर लहान वयात झालेला बलात्कार नरेशमुळे झाला, तिच्याच आईमुळे झाला, तिच्या वडिलांच्या कर्तृत्वशून्यतेमुळे झाला की विरोध करण्याची कुवतच नसण्यामुळे झाला? की सगळ्याचेच काँबिनेशन? बहुधा सगळ्याचेच काँबिनेशन! त्यात निली किती वर्षांची आहे, ती कशी दिसते, तिचा विरोध आहे का, ती कसे कपडे घालते, ती कशी वागते या कोणत्याही गोष्टीला काही महत्वच नव्हते. निव्वळ तिचे शोषण करत राहणे शक्य आहे म्हणून ते झालेले होते. सिमेलियाप्रमाणे कोणत्यातरी एखाद्या क्षणी निली अचानक बलात्कार्‍यांच्या हाती गवसलेली नव्हती. निली सलग चार वर्षे ते सहन करत होती. खरे तर चारहीजणींपैकी सर्वाधिक छळ नीलाक्षीच्याच वाट्याला आलेला होता. तिला आवाज नव्हता, असला तर तो ऐकला जात नव्हता. अश्रू पुसलेही जात नव्हते आणि पाहिलेही जात नव्हते. एखाद्या यंत्राप्रमाणे उपभोग घेऊन दिला की आपल्या घरी निघून यायचे असे तिचे आयुष्य होते. मग शरीराचा कंटाळा आल्यावर नरेशने झिडकारणे, मग वडिलांनी हात टाकणे आणि शेवटी घरगड्यांनी उपभोग घेणे या पातळ्या तिच्या मनाचा विचारही न करता गाठल्या गेल्या होत्या. इतक्या लहान मुलीच्या मनात तेव्हा काय उलथापालथी झाल्या असतील हे तिच्या आईला समजले नसेल असे नाही. पण अगतिकतेच्याच आसर्‍याला राहात असताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या अंगणात पाय टाकता येत नाहीच.

निलीला अजूनही समजलेले नाही की होस्टेलवरचे तिचे पैसे कोणती अज्ञात व्यक्ती भरायची. निली आता पै च्या घरी लग्न करून राहते. दोघे तासनतास बोलत बसतात. निलीला उबदार सुरक्षा कवच मिळाल्यासारखे वाटते. कुठेतरी मनात येते, की आपण मिसेस पै होणे हा आपल्या एकटे राहू शकण्याच्या क्षमतेचा पराभव म्हणून तर नाही ना पाहिले जाणार? पण पै तिला समजावून सांगतो. तो म्हणतो की ती एकटी राहू शकण्याच्या क्षमतेची असण्यानेच त्याला तिच्या विचारांनी भुरळ पाडली आणि दोन समांतर रेषांची एक रेष तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. जसे जगात सगळेच पै नसतात तसेच जगात सगळेच नरेशही नसतात. पण बायकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर फार कमीजणी सिमेलिया असतात, अनेकजणी नीलाक्षी असतात आणि त्याहीहून खूपच अधिकजणी असतात जया!

जयासाठी आयुष्याचा रंगच बदलला होता. उंची सुंदर कपडा बघून आणावा आणि पहिल्याच धुण्यात त्याचा सगळा रंग जाऊन एक विटके कापड हाताशी राहावे तसे झाले होते. चारचौघींप्रमाणेच लग्न हा सर्वोत्तम व सुरक्षित उपाय असून सिमेलिया, निली आणि पद्मजापेक्षा आपण अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे या भावनेला सुरुंग लागला होता. अनुभवविश्वात उलथापालथी झाल्या होत्या आणि एका दिशाहीन मनस्थितीत ती पुन्हा होस्टेलवर येऊन धडकलेली होती. नोकरीतील सिनियॉरिटी गेली असली तरी निदान शाळेने तिला पुन्हा घ्यायची तयारी दाखवलेली होती. प्रथम माहेरच्यांनी निर्णयला विरोध करणे, नंतर त्यांनीही तिच्या पाठीशी उभे राहणे, सासरच्यांनी आकांडतांडव करणे, राहुलने होस्टेलवर येऊन स्वतःचाच अपमान करून घेऊन निघून जाणे हे सगळे आटोपल्यानंतर निदान इतके शिक्कामोर्तब झालेले होते की आता राहुल आणि त्याच्या घरच्यांशी पुन्हा कधीही संबंध येणार नाही. घटस्फोटाचे काय करावे हे समजत नव्हते. नीलाक्षीने पै शी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला पाहून जयाने तिला त्या निर्णयापासून परावृत्त करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यात मत्सर नव्हता. त्यामागे भूमिका ही होती की जिला पूर्वायुष्यात इतके भयंकर सोसावे लागलेले आहे तिने पुन्हा जुगार खेळू नये. पण शेवटी नीलाक्षी ठामच राहिली. नीलाक्षी पै कडे निघून गेली आणि प्रियंकानेही रूम सोडून कायमचे दीप अंकलबरोबर राहण्याचे सुतोवाच केले. जयाच्या दृष्टीने आता रूम म्हणजे ती आणि जो या दोघींचेच अस्तित्व! ती रूम दोघींसाठी बरीच मोठी असल्याने सोहनी बाई तिथे आणखीन कोणालातरी ठेवणार किंवा आपल्या दोघींना इतरत्र शिफ्ट करणार हे जयाला समजून चुकलेले होते. काहीही झाले तरी जो पासून लांब जायचे नाही असे तिने ठरवलेले होते. जयाचे माहेर आणि सासर दोन्ही परगावी होते. सोडलेला नवरा मुंबईला होता. या गावात ती एकटी होती. पूर्णपणे!

जयाच्या हळव्या मनावर परिणाम झालेला होता. खरे तर एक पेक्षा अधिक परिणाम झालेले होते. लग्न हा सर्वाधिक सुरक्षित व योग्य मार्ग असल्याचे खोटे ठरावे व तेही तिच्या स्वतःच्याच बाबतीत, यामुळे अपमान झाल्यासारखे वाटत होते. रात्र रात्र विचार करून ती हे पुन्हा पुन्हा तपासून बघत होती की तिचा हा निर्णय चुकला तर नाही? सुधारणा होण्याची काहीही शक्यता असती तरी आपण थांबलो असतो हेच तिचे मन तिला तितक्याच वेळा सांगत होते. राहुलचा मुख्य प्रॉब्लेम हा होता की तो परिस्थिती स्वीकारत नव्हता. त्याचा पुरुषी इगो आड येत होता. आणि परिस्थितीचे खापर तो जयावर फोडत होता. तिच्या असमर्थतेमुळे तो तसा आहे असे काहीतरी समीकरण निर्माण करू पाहात होता. आज पुन्हा मागे वळून पाहिल्यावर जयाला वाटत होते की या खोटेपणासहितही कदाचित आपण आयुष्य काढूही शकलो असतो, पण मूल होण्याचे प्रेशर माहेर आणि सासरहून आले असते. राहुलने पुढेमागे आपल्याला सोडलेच असते त्या कारणासाठी बहुधा! नसते सोडले तरी छळ केला असताच. नोकरीही करू दिली नसती. निव्वळ त्याच्या पायाची दासी होऊन आयुष्य कंठण्यापेक्षा आज उघड्या जगात एकटीने पण स्वतंत्रपणे वावरणे केव्हाही चांगले आहे हाच निष्कर्ष सर्व विचारमंथनातून शेवटी निघत होता.

राहुल हळुवार नव्हता. त्याच्या स्पर्धात ओरबाडलेपण होते. हपापलेपण होते. हे सगळे चालले असते जर त्या सगळ्याचा अंत निदान त्याच्या स्वतःच्या, एकट्याच्या समाधानात जरी झाला असता तरी! मूलबाळ होण्याची तितकी फिकीर नव्हती. आपण आपल्यामाथी दोष स्वीकारून आणि नातेवाईकांची कुजकी बोलणी ऐकूनही जन्म काढला असता किंवा दत्तक घेतले असते. पण राहुल स्वतः समाधानी होत नव्हता आणि त्याचा दोष जयावर ढकलत होता. घाणेरडे वागत होता. उद्या एखादी दुसरीच बाई बघून नादीही लागला असता. सहजीवन ही संकल्पना त्याच्या विचारांमध्ये कुठेही नव्हती. तो एकटाच जगणारा दिसत होता. आपले अस्तित्व हे लादले गेल्यासारखे वागवत होता. आपल्याला तेथे महत्व नव्हते. हे सगळे इतक्या कमी कालावधीत कसे काय ताडले आपण? लोक वर्षानुवर्षे संसार करून दोन दोन मुले झाल्यानंतर सेपरेट होतात. आपण पंधराच दिवसांत या वळणावर का आलो? याचे कारण तो राक्षस होता. स्त्रीच्या शरीराचे हाल केले की त्याची वासना जागृत होऊ शकत होती असे त्यालाच वाटत होते. लग्न या संस्कारातर्फे प्राप्त झालेल्या स्त्रीला कसेही वागवण्याची परवानगी आपल्याला समाजाने दिलेली आहे असे काहीतरी त्याच्या डोक्यात बसलेले होते. ते एन्डलेस होते. ती त्याची मूळ प्रवृत्ती होती. जी बदलणार नव्हती. त्यामुळे वाट पाहणे निरर्थक होते. तो उपचार आवश्यक मानत नव्हता. डॉक्टर किंवा मानसशास्त्रज्ञ हे त्याच्यासाठी आवश्यक होते, पण ते त्याला पटत नव्हते. घाणेरडी राहणी त्याला आवडत होती. बायको हे एक तर लोढणे तरी आहे किंवा दासीतरी अशी त्याची भूमिका त्याने बनवून ठेवलेली होती. आपल्याला दुसरा कोणताही आधार नव्हता. माहेरच्यांनी कधीही आपल्याला पुन्हा माहेरी स्वीकारले नसते. आत्ता भले आपल्या पाठीशी असले तरी आपण इथे एकट्या राहू शकत आहोत म्हणून पाठीशी आहेत. घरी राहायला गेलो तर पुन्हा एखादा बीजवर बघून लग्नाचे ठरवू लागतील. सासरच्यांचा तर प्रश्नच नाही. अश्या परिस्थितीत वेडी आशा मनात बाळगून राहुलचे अत्याचार सहन करत बसणे मूर्खपणाचे होते.

मग बाकीच्या बायकांचे काय होते लग्न करून? काहींचे सहजीवन फारच लोभस असते. पण त्यात श्रेष्ठत्व कोणाकडे जाते? पुरुषाकडेच ना? मग ही रचना अशी कश्यामुळे आहे? मुले जन्माला घालणारे व घर सांभाळणारे मशीन या पलीकडे किंवा फार तर नोकरी करून आर्थिक जबाबदारीही उचलणारे मशीन या पलीकडे काही स्थान का नसते? परक्या घरातून आलेली एक मुलगी निव्वळ आपल्यासाठी आणि आपल्या जीवावर येथे येऊन राहात आहे हे पाहून माणूसकीचा झरासुद्धा का पाझरू नये? निदान तिला हे आपले घर वाटून त्यात आपल्यालाही काही मते, काही आवाज व काही महत्व आहे असे वाटावे याचे जाणीवपूर्वक प्रयत्न का केले जात नाहीत?

कमीअधिक प्रमाणात आपल्यासारख्याच जया सगळीकडे का असतात? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तीव्रता कमी जास्त असेल, पण बहुतांशी घरात जयाच राहतात हे काही खोटे नाही. एखादी जया, जया असण्यातच धन्यता मानत असेल, एखादीला सिमेलिया व्हायचे असेल, एखादीची निली झालेली असेल, एखादी महाराणी होऊन बसलेली असली तरी ते महाराणीपद तिला तिचा नवरा महाराजा आहे म्हणून मिळालेले असेल. पण शेवटी 'जयाच'!

असे का?

आता आपण काय करायचे? हा प्रश्न तेव्हा कसा काय पडला नाही? खड्ड्यात गेला हा 'तेव्हा'! 'आत्ता' हा 'आत्ता' आहे. हा 'आत्ताच' महत्वाचा! आता काय करायचे? शिकवू लहान मुलांना! शाळेशिवाय क्लासेस घेऊ जमले तर! निदान आर्थिक बाजू तरी बळकट करायच्या मागे लागू. बाकीचे पुढचे पुढे! आपली काही उपासमार होणार नाही आहे. चांगला रिस्पेक्टेबल जॉब आहे आपल्याला! पुढेसुद्धा लग्नच करायला हवे असे काही नाही. बघता येईल. निलीने लग्न केले असले तरी सिमने कुठे केले? जो कुठे करतीय? पायावर डोके ठेवून रडला तरी राहुलकडे मात्र परत जायचे नाही हे नक्की! ही दिशाहीन अवस्था उगीच घाबरवत आहे. समाजात काय अश्या बायका नसतात की काय? केलेले लग्न मोडले म्हणजे माझाच दोष की काय? विचारायला तर या स्पष्टपणे की काय झाले? मग जे सांगेन ते ऐकल्यावर तुम्हीच म्हणाल पंधरा दिवसतरी कसे काढलेस कोणास ठाऊक! एकटेपणा अनुभवणार आहे मी. मस्त वाटते असेसुद्धा! आपले आपले मस्त जगायचे. हवे तसे वागायचे. काय आहे या आयुष्यात एवढे? आणि लग्न हाच अंत का असावा स्त्रीच्या स्त्रीत्वाचा? मी ही अशी जगणार आहे. तुम्ही कोण मला सांगणारे? तुमच्या पैशांवर अवलंबून आहे का मी? होय मी सामान्य आहे. होय मी केलेले लग्न मोडले. माझ्यात निदान ती हिम्मत तरी आहे. तुमच्यात काय? नुसतीच भोचक बोलण्याची क्षमताच ना? शेवटी रात्री घरी जाऊन नवर्‍ञाचे पाय चेपत त्याच्या शिव्या ऐकत त्याच्या शेजारी झोपणार, हेच करणार ना? सॉरी! मला तो मार्ग रुचला नाही. मी नाही त्यावर चालणार.

मी माझे लग्न कराच म्हणाले नव्हते. मोडाच म्हणाले नव्हते. जे काय केले ते मी केले. जबाबदारी माझी आहे. जग गेले खड्ड्यात!

जयाची पॉलिसी ठरलेली होती. बोल्ड झाली होती जया. जयावर झालेला बलात्कार प्रत्यक्षात शारीरिक बलात्कार नव्हताच. शरीरसंबंध प्रस्थापुतच होऊ शकले नव्हते. पण ते व्हावेत यासाठी तिला नरकातून जावे लागले होते. एक यंत्र व्हावे लागले होते. जे तिला, तिच्यातील निर्मळ शिक्षिकेला मान्य होणे कदापीही शक्य नव्हते.

पण अश्या अनेक जया जगात जगत होत्या. लग्नाचे नाव व आवरण असलेल्या शरीरसंबंधांना आदर्श मानत तग धरून होत्या. मन मारून होत्या. त्यांच्या इच्छेविना, केवळ लग्नाची बायको या नात्यातून नवर्‍याकडून वेळोवेळी बलात्कार होत होते. संबंधांमधील माधूर्य तर केव्हाच आटून गेलेले असूनही निव्वळ शारीरिक गरज म्हणून अश्या अनेक जया निर्विकारपणे शय्यासोबत करत होत्या नवर्‍याची! त्यांच्यात नाही म्हणण्याची हिम्मत नव्हती. नाहीतर दुसर्‍या दिवशी त्या माहेरी आणून सोडल्या गेल्या असत्या. बायकोच शेजारी झोपत नाही म्हंटल्यावर नवर्‍याने बाहेरख्यालीपणा नाही करायचा तर काय करायचे असे प्रश्न विचारले गेले असते. एकंदरीत, सिमेलिया आणि नीलाक्षीपेक्षा जयाच संख्येने खूप होत्या. न कळलेले, न सांगितले गेलेले आणि खरे म्हणजे बलात्कार होत आहे हेच न समजलेले असे बलात्कार संख्येने सर्वात जास्त होते. एखादीच जया त्यातून लवकरात लवकर सुटत होती.

चारचौघी!

या सगळ्या आम चारचौघी होत्या. त्यांच्या आयुष्यात फिल्मी रेप झालेले होते. फिल्मी सूड घेतला गेला होता. शोषण झालेले होते. सामुहिक बलात्कार झालेला होता. शरीर संबंध प्रस्थापितही न होता मनोविश्व बलात्कारातून गेल्यासारखे उजाडले गेलेले होते. भावनिक भागीदारी असलेल्या नात्यात शेवटी फसगत झालेलेही प्रकार होते.

निव्वळ स्त्री हे नाते प्रामुख्याने जपले गेले होते. स्त्रीकडूनही आणि पुरुषाकडूनही! निव्वळ स्त्री म्हणण्यापेक्षा स्त्रीदेह हे नाते. मनापर्यंत पोहोचण्यापूर्वी देहाचा विचार केला गेलेला होता. आणि देहाचा विचार केल्यानंतर मनाचा विचारच केला गेलेला नव्हता. माणूस म्हणून समसमान वागणूक मिळण्यापेक्षा देह म्हणून असमान वागणूक देण्याचेच प्रमाण सर्वाधिक होते. हे स्त्री व पुरुष दोघांकडूनही झालेले होते. हे स्त्रीने उत्तान कपडे घातलेले असताना किंवा घातलेले नसताना अश्या दोन्ही वेळी झालेले होते. हे स्त्रीने बहकवणारे वर्तन करून अथवा अजिबात न करूनही झालेले होते. स्त्रीने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे हे झालेले होते तसेच एकही पाऊल पुढे न टाकताही झालेले होते.

या चारचौघींच्या आयुष्यात नरेश होता. नीलाक्षीचे वडील होते. तिची आईही होती. घरगडी होते. नीलाक्षी होती. ती नीलाक्षी, जिला बलात्काराशिवाय शरीर संबंध असतात हे मान्यही होऊ शकत नसताना आज ती लग्न करून बसलेली होती. या चारचौघींच्याच आयुष्यात एक पै ही होता. एक कर्तव्यदक्ष समर तावरेही होता. एक वारिया दस्तूर आणि एक नीलाक्षीची आईही होती ज्यांनी स्त्री असूनही स्त्री मन जाणले नव्हते किंवा जाणूनही तिकडे दुर्लक्ष केलेले होते. एक कामांध पुरुष होता ज्याने पोटच्या पोरीचीच अब्रू घेतलेली होती. एक नवरा होता ज्याला शरीर संबंध हवे होते पण तो असमर्थ होता. नपुंसक होता. त्यामुळे राग बायकोवर काढत होता. एक भसीन होता ज्याने हवे ते मिळवून मग कंटाळा आल्यावर दूरही सारलेले होते. एक जया होती जिची स्वप्ने धुळीला मिळवल्यावर बदललेल्या दिशेला एकटी निघाली होती आणि आधीपेक्षा शूर झालेली होती. एक सिमेलिया होती जिला केवळ नग्नच होता आले होते पण त्यातूनच तिने खरीखुरी शिक्षा देऊन दाखवली होती. एक कायदा होता ज्याचा बडगा अपराध्यांऐवजी निरपराध्यांवर उगारला गेला होता. एक सोहनीबाई होत्या ज्यांना होस्टेलची अब्रू मुलीच्या अब्रूपेक्षा प्यारी होती. एक मेघना होती जिला असाईनमेन्ट सिमेलियाला मिळणार म्हंटल्यावर असूयेतून तिच्यावर रेप झाल्याचे सांगण्यात स्वारस्य आलेले होते. एक गोसावी होता जो सिमच्या नग्न होण्यातून पैसेही कमवत होता आणि सिमला लीगल प्रोटेक्शनही देत होता. रस्त्यावरून जाताना वखवखलेल्या नजराही होत्या आणि चोरटे विकृत स्पर्शही होते. मॉडेलिंग केले म्हणून संबंध सोडणारे कर्मठ कुटुंबीयही होते आणि मॉडिलिंग केले म्हणून काहीही बिघडले नाही असे म्हणणारा पत्रकारही होता.

एकंदरीत, कोणत्याही स्त्रीच्या मनाचा विचार करायच्या आधी तिच्याबद्दल 'ती म्हणजे एक स्त्रीचे शरीर आहे' हा विचार प्रामुख्याने केला गेलेला होता. वर्तनाची अपेक्षा तिच्याकडूनच होती. क्षमाशीलता तिच्याचकडून हवी होती. उपभोगही तिच्याकडून हवा होता. आणि अर्धनग्न पोझेसही तिच्याकडूनच हव्या होत्या. ती म्हणजे 'शरीर', यापलीकडचा विचार अत्यल्प प्रमाणात केला गेला होता. मग तो पुरुषाने केलेला असो वा स्त्रीने!

या फक्त त्याच चारचौघी नव्हत्या ज्या त्या मुलवानी होस्टेलच्या एका रूममध्ये राहात होत्या. या कोणत्याही चारचौघी होत्या.

त्यांच्याबाबत जे घडलेले होते, त्यावर प्रत्येकजण स्वतःचा विचार करत होता. त्यातून आपल्याला काय मिळेल किंवा काय करता येईल हेच प्रत्येकाच्या मनात चाललेले होते. या चारचौघींसकट... जो तो उत्तरे शोधत होता....

जो तो उत्तरे शोधत होता... आणि 'जो' 'ती' उत्तरे शोधत होती..

प्रियंका शिफ्ट होणार म्हंटल्यावर भसीनला भेटण्यावर कायमची फुली लागली हे तिला समजलेले होते. तिसर्‍या दिवशी भसीनने हातात प्रमोशन विथ इन्टरनल ट्रान्स्फरचे लेटर ठेवले होते. ताडकन उडलीच होती जो! एक प्रकारे फारच बरे झाले होते. डेप्युटी मॅनेजर की अकाऊंट्स! असे प्रमोशन मिळालेले होते. सर्व्हिस फंक्शनमधून डायरेक्ट मेन स्ट्रीम बिझिनेस फंक्शनमध्ये सेल्सला गेली होती ती! मस्तच जबाबदारी होती ही. ग्रोथ नक्की होती. घसघशीत पगारवाढही हातात पडली होती. अधिकार वाढले होते. मुख्य म्हणजे आता भसीनला रिपोर्टच करावे लागणार नव्हते. आता रिपोर्टिंग व्हाईस प्रेसिडेंट डोमेस्टिक सेल्सला होणार होते. आता अटायरकडे अधिक लक्ष द्यावे लागणार होते. सतत प्रेझेंटेबल राहावे लागणार होते. ट्रॅव्हलिंग वाढणार होते. भसीनशी जवळपास नगण्य संबंध येणार होता. उलट एक प्रकारे भसीनची ती इन्टर्नल कस्टमरच होणार होती. मग भले भसीनने दिलेली ही किंमत असो,पण स्वतःपासून तिला दूर करून त्याने तिच्यावर अनेक उपकार केलेले होते. मन जरा तरी शांत राहणार होते.

काही असले तरी क्लेम्स प्रोसेसिंगमधून निघताना शेवटचे भसीनला एक फॉर्मॅलिटी म्हणून भेटताना अत्यंत संमिश्र असे भाव तिच्या मनात होते. भसीनबाबतचा आत्यंतिक संताप, आजवर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत घालवलेले लाघवी क्षण, त्याच्याबरोबर घालवलेले अतिशय प्रायव्हेट क्षण आणि या सर्वाचा अंत म्हणून एक मोठे प्रमोशन आणि महत्वाची पोस्ट! भसीनच्या डोळ्यात डोळे मिसळून एकदाच 'का' असे विचारावेसे मनात येत होते पण तो मोह तिने आवरला. डोळ्यात आलेले पाणी कुणाचे लक्ष नाही असे पाहून टिपले आणि व्ही पी डोमेस्टिक सेल्सच्या केबीनकडे पहिल्या रिपोर्टिंगसाठी चालू लागली. तिकडे तिच्याहीसाठी एक लहानसे केबीन होते कस्टमर्स भेटायला येतील म्हणून!

पद्मजा कुलश्रेष्ठ - डेप्युटी मॅनेजर - की अकाऊंट्स

अशी पाटी त्या केबीनवर लटकत होती. इतक्या झटकन पाटीही तयार झालेली पाहून तिला मूठभर मांस चढले अंगावर! नवीन स्टाफशी ओळख आधीपासून होतीच, पण नव्याने सगळ्यांचे रोल्स समजून घेणे झाले. तिच्या टीममध्ये सहाजण होते. तिचे डायरेक्ट रिपोर्टिंग व्हीपी सेल्सला असल्याने आधीपेक्षा तिचा भाव येथे अधिक होता हे तर स्पष्टच होते.

ऑफीसमध्ये मजा यायला लागली होती. काम चॅलिंजिंग होते. बॉस सॉफ्टस्पोकन होता. स्टाफ को-ऑपरेटिव्ह होता. कस्टमर्स रिस्पेक्टफुली बोलत होते. पद्मजा त्या पोझिशनमध्ये अगदी शोभत होती. तिच्या पात्रतेचे काम तिला मिळाल्यासारखी!

पण संध्याकाळी रूमवर आले की खायला उठायचे. आता होस्टेल सोडून ऑफीसजवळच एखादी रूम भाड्याने घ्यावी की काय असे मनात येऊ लागले होते. जॉब सोडून द्यायच प्रायॉरिटी किंचित मागे पडलेली होती. त्या जागी या पोझिशनमध्ये स्वतःची ग्रोथ करून घेण्यास प्राधान्य मिळत होते. नाहीतरी रोज भसीनचा चेहरा बघावा लागतच नव्हता.

पण का कुणास ठाऊक! संध्याकाळपासून उदास वाटू लागायचे आणि रात्री झोपर्यंत असे वाटू लागायचे की भसीनने निदान एखादा एस एम एस तरी करावा. त्याला काहीच वाटले नव्हते का या सगळ्याबद्दल? विश्वास बसत नव्हता,

मग नकळत ते क्षण आठवत होते. त्याचे 'फूल उमलावे' तसे आपल्याला उमलवणे! हळूहळू रक्तातल्या लहरींना उत्तेजित करत करत आपल्याला असहाय्य बनवणे. स्वाधीन व्हायला लावणे. स्वाधीन होण्यातही आपल्यालाच विजयी वाटेल याची काळजी घेणे. कुठेच बेसूरपणा नाही. सगळे कसे तालात! पट्टीचा गायक एखादी नवीच जागा घेऊन मंत्रमुग्ध करतो तसे दरवेळी काही ना काही नावीन्य निर्माण करणे! आपण आहोत त्यापेक्षा त्याने नाजूक होणे! आणि सर्व सुरांची आणि रागांची अशी काही संमिश्र, लयबद्ध आणि मद्धम बरसात करणे, ज्यात आपण फक्त भिजत राहणे!

मग नंतर कधीतरी भेटींना हक्काचे अधिष्ठान मिळणे! ती दोघांची गरज आहे ही वस्तूस्थिती नकळतपणे अधोरेखीत झाल्यावर भसीनमध्ये जागृत झालेला अल्लड कॉलेज युवक! ज्याला क्षणाचाही दुरावा सहन न होणे! ज्याच्यासाठी जणू दोन नग्न शरीरे एकमेकांना आहेत त्या अवस्थेत भिडण्यासाठी लढत आहेत यालाच प्रेम म्हणत असावेत! धसमुसळेपणा! हास्याचे तुषार! मस्ती! लटका विरोध! तो मोडून काढताना बळाचा वापर! एखाद्या डोहाला स्वतःचीच खोली किती आहे हे दुसर्‍याने कळवण्यासारखे काहीतरी!

जो!

आज सकाळी आवरत होती ऑफीसला जायला. कालपासून तर विपरीतच येत होते मनात! वाटत होते की भसीनवरचा सगळा राग फेकून देऊन त्याला आज पुन्हा एकदा अ‍ॅप्रोच व्हावे! पण आता तिथे प्रियंका असणार होती. आणि मुख्य म्हणजे ते एस एम एस आठवत होते. भसीनबद्दलचा संताप उफाळून येत होता. पाण्याबाहेर पडलेल्या मासळीसारखी अवस्था काल रात्रीपासून झाली होती. ही अवस्था चेहर्‍यावर न येऊ देणे कमालीचे अवघड होते पण जो ते कसेबसे साध्य करत होती.

जो बसमध्ये बसली आणि पुढच्याच स्टॉपला एक अपंग म्हातारा तिच्याशेजारी येऊन बसला. जो च्या मनात ऑफीसमधील राहिलेल्या कामाचे आणि अहमदाबाद ट्रीपचे विचार चालू होते. अहमदाबादला अनेक पोटेन्शिअल असलेले प्रॉस्पेक्टिव्ह क्लाएंट्स होते. एकदा व्हिजिट करायलाच लागणार होती. बहुधा उद्या परवाच! विचारात असतानाच त्या अपंग म्हातार्‍याची दोन बोटे चुकून जो च्या उजव्या मांडीवर पडली. क्षणभर जो चमकलीच. पण ताडकन त्या माणसाकडे बघितले असते आणि ते इतर कोणी बघितले असते तर या रोजच्या बसमध्ये उगीच काहीतरी घोळ झाला असता. किंचित सरकल्यासारखे करत जो खिडकीबाहेर बघत बसू लागली. पण धाडस वाढू लागल्याचे तिला जाणवले. आता या माणसाला काही बोललो तर लोक आपल्यालाच वेड्यात काढतील हे तिला व्यवस्थित माहीत होते. अजून अर्धा तास उगीचच उठून उभे राहण्याइतकेही काही घडत नव्हते. पण जे घडत होते ते मुद्दाम घडत होते हे नक्की! आता हे इतर कोणी पाहिले असते तर त्याला वाटले असते की बाईही चालूच दिसतीय! खिडकीकडे अधिक सरकणेही शक्य नव्हते. म्हातार्‍याला हात काढा म्हंटल्यावर जर तो म्हणाला असता की मी अपंग आहे यामुळे थट्टा करता का तर आपणच गर्विष्ठ ठरलो असतो. जो ने सरळ डोळे मिटले. झोप लागल्यासारखी मान हालवत ती बसून राहिली. तशीही जरा झापड येतच होती वार्‍यामुळे, अगदी सकाळी सकाळीही! पण काय झाले तिला समजले नाही. कोणत्यातरी क्षणी म्हातार्‍याची बोटे अलगदपणे मांडीवर फिरू लागली. कसेतरीच वाटू लागले. भसीन असेच करायचा हे आठवू लागले. हळूहळू त्या बोटांच्या स्पर्शांमुळे शरीराला हुळहुळेपण आले. पंधरा वीस मिनिटे हेही एन्जॉय करण्यासारखे आहे असेच काहीतरी विचित्र मनात येऊ लागले. त्या बोटांचा दाब किंचित वाढला. तसे मग जो चे डोळे अलगद उघडले. चुटपुट नजरेने तिने इकडेतिकडे पाहिले. कोणाचेच लक्ष नव्हते. मग तिने पुन्हा डोळे मिटले. यावेळी जे डोळे मिटले, ते स्पर्श एन्जॉय करण्यासाठीच जणू!

कावूर हा तिचा नेक्स्ट होता. असिस्टंट मॅनेजर! सावळा कावूर कामाला वाघ होता. लहान होता. पंचविशीचा असेल! जो ऑफीसला पोचल्यावर आधी त्याला बोलावून घ्यायची आणि सगळे अपडेट्स घ्यायची. हासरा कावूर सगळे व्यवस्थित सांगायचा. जो चे अर्धे काम तिथेच व्हायचे. आजही कावूरने सगळे व्यवस्थित रिपोर्टिंग केले. जो ने त्याचे आभार मानल्यावर तो निघून जाऊ लागला. जो चे डोळे कशामुळे तरी चमकले. ती म्हणाली..

"कावूर... "

"येस मॅम?"

"आय थिंक यू अल्सो कम विथ मी टू अहमदाबाद... यू नो दोज पीपल बेटर दॅन मी राईट?"

"शुअर मॅम.. आय शॅल गेट द टिकेट्स अ‍ॅरेंज्ड"

"राईट"

कावूर निघून गेला तेव्हा जो च्या मनात प्रचंड खळबळ उडालेली होती...

जगातला जो तो त्याची उत्तरे शोधत होता आणि 'जो' तिची उत्तरे शोधत होती...

==================

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिमेलिया जैन! अ‍ॅरेस्टेड!....या पॅरापर्यंतचा शब्द न शब्द पटला खुप सुरेख, सखोल विश्लेशण केलत समाजव्यवस्थेच नि स्त्री-पुरुष संबंधाच !

धन्यवाद!

वाह!
छानच झालीय..ह्या हून जास्त काही म्हणत नाही!

पण अगतिकतेच्याच आसर्‍याला राहात असताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या अंगणात पाय टाकता येत नाहीच. >>>> हे अ प्र ति म!!!

पण हल्ली मुले आणि मुली पूर्वीपेक्षा कमी वयात मोठी का होत आहेत?---- एकदम correct...
पण शेवट थोडा अपुर्ण वाटला.....

छान

थोड्क्यात स्त्री च्या अन्तरन्गाचि ओळख घडवली आहे..... खुपच आवडली ही कथा..... विषयाची सुरेख माण्ड्णी..... Happy Happy

"स्वतःला जपायचे असले तर ते एखाद्या विशिष्ट वयानंतर आणि एक किमान शारीरिक ताकद मिळाल्यानंतरच जपणे थोडेफार तरी शक्य आहे कारण तीन महिने, सहा महिने, दोन वर्षे आणि चार वर्षे असल्या वयांमध्ये स्वतःला जपता येत नाही. तसेच वय वर्षे पन्नास, साठ आणि सत्तर असल्या वयांमध्ये ती ताकद शरीरात राहिलेली नसतेच." ____एकदम बरोबर....सर्व भाग आवड्ले....

जर पुरुष स्वतः सभ्य झाले, त्यांचे स्वतःचेच वैचारीक परिवर्तन झाले तरच अनुकुल असे बदल घडण्याची प्रक्रिया जोर धरू शकेल. हे होणे अशक्य नसले तरी जवळपास अशक्य तरी आहेच. काहीवेळा कोणत्यातरी गुन्ह्यांची आकडेवारी कमी झाल्याचे दिसेलही, पण ती नष्ट होणार नाही.

खरेच असे होईल?

सुंदर कथा, नवीन पिढी बाबत आशावाद ठेवायला हरकत नाही

आता नवीन काय? एखादी रहस्य कथा येऊ द्या की राव

कथा घाई घाई मध्ये संपवल्यासारखी वाटली. कुणाचीच कथा पुर्ण सांगितल्यासारखी वाटली नाही.

असं वाटलं लिहीता लिहीता अचानक तुमच्चा पुढे लिहिण्यातला रस संपला म्हणून कथा आटोपती घेतली.

सर्व प्रतिसाददात्यांचे खूप खूप आभार.

निनिकु - क्षमस्व, आपल्याला रस वाटेल असा शेवट झाला नाही. मला जमेल तशी लिहिली. Happy तरी लोभ असावा.

शोषण व बलात्कार यासारख्या गोष्टी अनुभवताना स्त्रीची मानसिकता कशी बनते हे सांगणे हे या कथेचे केंद्र होते असे पहिल्या भागात मी नोंदवले होते. साधारण त्या भोवतीच कथा रचत राहण्याचा प्रयत्न केला. कदाचित फसलाही असेल.

पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफी, कथाबीज तुम्ही शेवटापर्यंत घट्ट धरून ठेवलं हे सांगावसं वाटतंय.

ह्या शेवटच्या भागाच्या सुरूवातीचं भाष्य जरा रटाळ वाटलं, स्त्रीच्या बाबतीतल्या समाज विचारसरणीला ठळक करताना अगदी बालक पालक चित्रपटाचा उल्लेख हवा होता का, समजलं नाही.. कथा चारचौघींची सुरू असताना, मधेच लेखक बोलू पाहतोय, असा भास झाला. (माझं, एका वाचकाचं वैयक्तिक मत इतकाच ह्या वाक्यांचा अर्थ घ्यावा)

शेवट खास झालाय.अपूर्ण मुळीही वाटला नाही, एका स्त्रीची बदललेली मानसिकता आपल्याला पोखरत रहावी इतका समर्पक वाटला.

चारचौघींबाबत बोलताना, जगात प्रत्येकीचंच शोषण होतं, प्रत्येकीलाच सहन करावं लागतं.. हे फारसं पटलं नसलं तरी, ज्यांना सोसावं लागतं त्यांना किती प्रकारे सोसावं लागू शकतं, त्यांच्या जीवनावर कसा, किती प्रमाणावर ह्या घटनांचा परिणाम टिकून राहतो, ह्याचं प्रतिकात्मक उदाहरण म्हणाजे ह्या चौघी, हे स्पष्ट होतंय...
तुम्ही ज्या हेतूने कथा लिहीयला घेतली तो असा पोहचला.

कथा फॉलो केली, वाचताना बर्‍याचदा रोलर कोस्टर राईड तर कधी अतिशयोक्ती, तर कधी कॅरेक्टर ग्लोरिफाय झाल्यासारखे वाटले, पण कथेचा अंत जाणून घ्यायचा होता, ह्यात कथेची पकड समजली...

शुभेच्छा आणि आभार!

बागेश्री,

प्रथम दिलखुलास व जरा विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.

तुमचा प्रतिसाद त्रयस्थ वाचकाचा आहे व इव्हॅल्युएशन तटस्थपणे केलेले आहे, या दोन्ही बाबी आवडल्या.

अर्थातच, तुमच्या प्रतिसादाचा पूर्ण आदर आहे.

फक्त एकच मुद्दा:

>>>मधेच लेखक बोलू पाहतोय<<<

हे मात्र मी मुद्दाम केलेले होते व मला ते करायचेच होते. खरे तर मी शेवटच्या भागाला 'मंथन' असे शीर्षकही देणार होतो, पण त्यावरून निराळेच काही सुरू होऊ शकले असते याची जाणीव असल्यामुळे प्रथम माझे भाष्य आणि नंतर कथेचा शेवट असा क्रम ठरवला. मुद्दा हा की मला ते भाष्य करायचेच होते, त्यामुळे तो भास नसून योग्यच जाणीव आहे.

पुन्हा एकदा आभार! Happy

-'बेफिकीर'!

स्त्री अत्याचार आणि शोषणावर खूपच कागद रीचवून झाले की. बास करा की राव अता स्त्रियांची कीव करणे.
ते सीरीयलवाले तिकडे रतीब घालतायेत तसेच हेही बरे चाल्लेय की रडगाणे .
"बंदीनी स्त्री ही बंदीनी " रडून रडून डोळे फुटायची वेळ आली की अता !!!

रच्याकने, 'पुरुषांचे' सुद्धा लैंगिक शोषण होते , माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या एकंदरीत लिखाणावरून तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेल असे वाटत नाही. अमेरिकेत ६ पुरुषामागे १ पुरुष लैंगिक शोषणाला बळी पडतो ,अशी आकडेवारी आहे. अर्थात भारतात तर नक्कीच जास्त प्रमाण असणार.

शोषण व बलात्कार यासारख्या गोष्टी अनुभवताना स्त्रीची मानसिकता कशी बनते हे सांगणे >>>
अरे वा!! हे म्हण्जे एव्हरेस्ट सर केलेल्या माणसाच्या मानसिकतेवर , कधी हनुमान टेकडीही न चढलेल्या माणसाने टीप्पण्णी करण्यासारखे झाले.

डेलिया, तुम्हाला नुसतेच धन्यवाद देऊन दोन दिवस थांबलो होतो कारण तुमची प्रतिक्रिया थोडी वैयक्तीक स्वरुपाची होती आणि रिअ‍ॅक्ट व्हायचे नव्हते. आता योग्य तो प्रतिसाद देत आहे.

>>>रच्याकने, 'पुरुषांचे' सुद्धा लैंगिक शोषण होते , माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या एकंदरीत लिखाणावरून तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेल असे वाटत नाही. अमेरिकेत ६ पुरुषामागे १ पुरुष लैंगिक शोषणाला बळी पडतो ,अशी आकडेवारी आहे. अर्थात भारतात तर नक्कीच जास्त प्रमाण असणार.<<<

आपण जर शेवट लक्षपूर्वक वाचलात तर कदाचित जाणवेल की भसीनमुळे सुखाची चटक लागलेली 'जो' (पद्मजा कुलश्रेष्ठ) कावूर नावाच्या असिस्टंट असलेल्या तरुणाला भरीस पाडताना दाखवलेली आहे. शेवट करणारे हे वाक्य पुन्हा एकवार वाचावेतः

>>>जगातला जो तो त्याची उत्तरे शोधत होता आणि 'जो' तिची उत्तरे शोधत होती...<<<

यातून असा दावा नव्हे की ती थेट लैंगीक शोषण करणार होती, पण पोझिशनचा फायदा उचलण्याचा तिचा हेतू आहे हेच मला दाखवायचे होते. अनेक वाचकांनी ते ध्यानातच घेतलेले दिसत नाही. (यामागे कदाचित पूर्वग्रह असू शकतील किंवा डिटेल्स न वाचता घाईघाईत मतप्रदर्शन करणे असू शकेल).

डेलिया, मी मला जमेल तितका खोलवर विचार करून स्त्रीची भूमिका, भूमिका म्हणण्यापेक्षा मानसिकता या कथानकात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तो फसलाही असू शकेल किंवा बर्‍यापैकी उतरलाही असू शकेल. पण मुळात कथानकच जर स्त्रीचे शोषण या विषयावर असेल तर 'शोषण अजिबात न झालेली स्त्री' अश्या व्यक्तिरेखेला या कथेत स्थान द्यावे कशाला? हा विचार करून मी तशी एकही व्यक्तिरेखा मांडलेली नाही. मला हे माहीत आहे की स्त्रियांचे फक्त शोषणच होते असे नाही, पण शोषित स्त्रियांचेच विश्व दाखवायची इच्छा असल्याने व्यक्तीरेखा तश्याच घेतल्या.

>>>अरे वा!! हे म्हण्जे एव्हरेस्ट सर केलेल्या माणसाच्या मानसिकतेवर , कधी हनुमान टेकडीही न चढलेल्या माणसाने टीप्पण्णी करण्यासारखे झाले.<<<

हे तुमचे विधान! रिअ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये मी असेही म्हणू शकलो असतो की स्वस्त पिंका टाकण्यापलीकडे काम नसलेल्यांनी लैंगीक शोषणाची आकडेवारी देऊन पांडित्य दाखवणे म्हणजे विहिरीतल्या बेडकांनी विश्वरूपदर्शन घडल्याचा आव आणणे आहे. हेच लिहून वाद होऊ नयेत म्हणून दोन दिवस थांबलो होतो. मी स्त्री नाही, अश्या शोषणाचे बळी ठरलेल्या स्त्रीची मानसिकता कशी असेल हे स्त्री इतके अचूकपणे मी जाणवून घेऊ शकत नाही. ही माझी मर्यादा मला मान्य आहेच. म्हणूनच सुरुवातीला म्हणालो आहे की यथाशक्ती हे कथानक लिहीत आहे. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की एखाद्या स्त्रीनेच हे कथानक पुन्हा लिहावे (मायबोलीवरच) म्हणजे मला माझ्या लेखनातील कच्चे दुवे समजतील व त्याचा मलाच फायदा होईल. खरे तर एक चांगला एक्सरसाईझही होईल की हेच सगळे जेव्हा एक स्त्री लिहिते तेव्हा ती कथानक कसे लिहिते आणि पुरुष लिहितो तेव्हा कसा लिहितो.

आता खरेखुरे धन्यवाद प्रकट करतो.

-'बेफिकीर'!

बेफि.
कथा आवड्ली...यातील प्रियंका मी खुप जवळुन पाहीलिये....जयाची कहाणी खुप जवळच्या ४ मैत्रिणीं बाबत घड्ली आहे...when i was reading about Jaya I just felt that is one of my friends is your friend? how come you know this...

.नीली वाचताना सत्यमेव जयते ची आठवण झाली...सिम एकदम फिल्मी सादर झालीये....

Very bold but the fact of society. Hats off to detailing. The Jaya, i have seen same thing happening to one of my friends. It was an eyeopener. Keep writing.

mala directly part - 5 nantar part - 15 ch disat aahe madhale bhaag kuthe miltil??? Please link dya

Pages