Submitted by रसप on 13 February, 2013 - 05:13
शेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता
थवा आठवांचा डोळ्यातच दडला होता
रोज सकाळी जगास वाटे 'उजाडले की!'
लपलेला अंधार तेव्हढा दिसला होता
छान वाटले आरश्यास बोलून तुझ्याशी
तो माझ्याशी गप्पा मारुन थकला होता
मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता
कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता
'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता
....रसप....
१३ फेब्रुवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post_13.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनात नसतानाही रडलो आज
मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता >> व्व्वा, व्वा बहोत खूब...
कधीच माझे दु:ख कुणाला सांगत
कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता
छान.
छान वाटले आरश्यास बोलून
छान वाटले आरश्यास बोलून तुझ्याशी
तो माझ्याशी गप्पा मारुन थकला होता
'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता<<<
वा वा
(नकोस पाहू ऐवजी - 'जितू' नको हासूस चेहर्यांना हरलेल्या - असेही एक सुचले - कृ गै न)
बेफिजी, धन्यवाद!! विचार करतो.
बेफिजी,
धन्यवाद!!
विचार करतो. 'हासूस' मध्ये पाठोपाठ येणार्या 'स'मुळे मला सरलता कमी वाटतेय मात्र..
थकला , हसला, लढला हे तीन शेर
थकला , हसला, लढला हे तीन शेर प्रचण्ड आवडले
गझल छान झाली आहे
अर्घ्या ऐवजी मी चुकून अर्ध्यासाठी वाचले ..सॉरी ....आत्ता समजला शेर नविन्यपूर्ण वाटला . वाह् !!
छान गझल. "मनात नसतानाही रडलो
छान गझल.
"मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता " >>> यातला खयाल वेगळा आणि मस्त वाटला..... शेर सर्वाधिक आवडला.
>> हरलेलाही हरण्याआधी लढला
>> हरलेलाही हरण्याआधी लढला होता
वा!
आरसा आणि अर्घ्य शेर
आरसा आणि अर्घ्य शेर आवडले!
हरलेलाही हरण्याआधी लढला होता - हा सुटा मिसराही खूप आवडला, पण चेहरे न पाहण्याशी त्याचा नीट संबंध लावता येत नाहिये मला अजून...
छान वाटले आरश्यास बोलून
छान वाटले आरश्यास बोलून तुझ्याशी
तो माझ्याशी गप्पा मारुन थकला होता
शेर आवडला.
शेर तुझ्यावर एकच जेव्हा सुचला
शेर तुझ्यावर एकच जेव्हा सुचला होता!
मज गझलेचा पूर्ण चेहरा दिसला होता!!
उजाडलेले दिसे जगाला रोज सकाळी....
कोण पाहतो झोपडीत तम दडला होता?
आरसा किती खुलला आहे, तिला पाहुनी!
मला पाहुनी किती बिचारा सुकला होता!!
सूर्य उगवणाराही मजला अशुभ वाटला...
अर्घ्य घेवुनी मजसाठी तो अडला होता!
विडंबनाची खोड कधीची दिली सोडुनी....
कवितेपेक्षा मलाच जो तो हसला होता!
‘जितू’ यामधे जीतच त्याची दिसली मजला!
हरला, पण तो, हरण्यआधी लढला होता!!
.........................................................................
सतीशजी: मला वाटतं तुमचा नेक
सतीशजी:
मला वाटतं तुमचा नेक उद्देश्य आहे की फक्त प्रशस्तीपत्रकं न देता गझलकाराला गझलेत कितपत सुधार शक्य आहे हे कळवावे.
हे निश्चितच तुमच्या आणि गझलकारापुरते जर असेल तर ते निरोपातून देण्यास आपली हरकत नसावी, असे वाटते.
जेणेकरून गैरसमज वा वाद टाळता येतील तसेच गुलमोहर गझल मधे खेळीमेळीचे वातावरण राहिल आणि आपला गझलप्रपंच व्यवस्थित चालू राहिल. आपल्याला मी काय म्हणतो हे पटल्यास कृपया आपला वरील प्रतिसाद संपादित करावा ही विनंती.
समीर
मनात नसतानाही रडलो आज
मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता
कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता
'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता
>>
वाह!
कुणाच्याही गझलेत बदल करण्याचा
कुणाच्याही गझलेत बदल करण्याचा अधिकार कवी/ गझलकाराव्यतिरिक्त केवळ त्याच्या/ तिच्या गुरूसच असतो, हेही कळत नसल्यास तुम्ही इतके दिवस (वर्षं) गझलसाधनेतून काय शिकलात, हे सर्वांना समजत आहे. तुम्हाला स्वतःचा हशा करून घेण्याची हौसच असेल तर कृपा करून ती स्वतःच्या गझलांच्या धाग्यांवर पूर्ण करवून घ्यावी. मी ह्यापूर्वीही माझ्या गझलांत लुडबुड न करण्याबाबत सूचित केलेले आहे. असे परस्पर बदल करणे हे संबंधित कवी/ गझलकाराचा अवमान करणे आहे, असे मला वाटते. माझ्या अवमानाबद्दल तुम्ही माझी क्षमा मागावी, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. कारण कितीही झालं तरी आपण वय, अनुभव व साधनेने माझ्याहून खूपच मोठे आहात. (पण माझे गुरू नाही आहात.)
हात जोडून विनंती आहे की माझ्या गझलांवर व कवितांवर इथून पुढे असे लिखाण, कितीही अनावर उचंबळ आला तरीही करू नये. 'मला ते आवडत नाही', इतके कारण ह्यासाठी पुरेसे असावे.
धन्यवाद.
----------------------------------------------------
सर्व मा.बो. करांची आधीच क्षमा मागतो.
अप्रतिम गझल.......
अप्रतिम गझल.......
सुदर रे!
सुदर रे!
सुंदर गझल.. मतला तितका आवडला
सुंदर गझल..
मतला तितका आवडला नाही..
मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता
केवळ अप्रतिम..
माझ्या मते हासिल -ए -गझल शेर..
कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता
'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता
हे शेरही मस्त झाले आहेत..
शुभेच्छा..
मायबोली गुलमोहर गझल हा ओपन
मायबोली गुलमोहर गझल हा ओपन फोरम आहे. इथे प्रकाशित होणा-या रचनांवर कुणीही कोणत्याही शैलीत प्रतिसाद देवू शकतो! आमच्या गझलांवरील टुकारांचे व बुरखेवाल्यांचे प्रतिसाद वाचा म्हणजे प्रतिसादांची शैली आपणास समजेल! आम्ही कुणासही असा प्रतिसाद द्या वा देवू नका असे म्हणत नाही कारण होणा-या प्रत्येक तथाकथित टीका टवाळीला उत्तर द्यायला आमची लेखणीच पुरेशी आहे!
टीका सोसायची हिंमत नसती तर आम्ही एकही गझल इथे पोस्ट केली नसती! प्रकाशित कलाकृतीजवळ ओपन डिफेन्सला तोंड द्यायची धिटाई असलीच पाहिजे! सगळ्यांकडूनच पाठ थोपटून घेण्याची अपेक्षा अवाजवी आहे!
गुलमोहर गझलवर किती खेळीमेळीचे वातावरण आहे व अनेक बनावट घाबरट आडी काय खेळकर प्रतिसाद देत आहेत हे अख्खे जग पहात आहे!
आमची ही प्रतिसादाची शैली आहे!
टीप: आम्हास कुणाचेही गुरू/पर्यायी गुरू होण्याची आवश्यकताही नाही व इच्छाही नाही!
पेशाने प्राध्यापक असलो तरी आम्ही जीवनाच्या सर्व क्षेत्रात आजन्म विद्यार्थीच आहोत!
शिष्यदारिद्र्य आम्ही पाहिले नाही!
प्रतिसाद गद्यात/पद्यात/टीकारूपी/टवाळीरूपी/पोरकट/अतीप्रौढ/ उथळ/गंभीर/ विदुषकी/ विडंबनात्मक/विटंबनात्मक/ चिल्लर/थिल्लर/ संवादात्मक/ ओवाळण्यात्मक/ गोडवे गावून इत्यादी शैलीत इथे दिलेले सर्व जग पहाते आहे!
याउपर आम्ही पामरांनी काय बोलावे?
आम्ही कुणालाही( सोम्यागोम्यांनाही) इस्लाह देत नाही! ('इतका तुझ्याप्रमाणे मीही महान नाही!')
कुणाच्याही गझलेत बदलही करत नाही व प्रतिसादात लिहिलेले आमचे म्हणून कुठेही खपवत नाही वा नाचवतही नाही कारण इतके गझलदारिद्र्य आमच्याकडे नाही!
आम्ही कसे लिहिले असते हे फक्त आम्ही लिहून पोस्ट करतो!....याला या संकेतस्थळाची हरकत नाही!
त्यावर देखिल कुणी काही टवाळी केली तरी आम्ही त्याला तोंड द्यायला समर्थ आहोत!
.............प्रा.सतीश देवपूरकर
आम्हास जर टीकेची/टवाळीची/प्रतिसादाची भीती असती तर आमच्या तमाम रचना आम्ही स्वगृहात कुलुपबंद ठेवल्या असत्या!
मायबोली म्हणजे मकस नव्हे!
'शेर' उरावर जेंव्हा त्यांच्या
'शेर' उरावर जेंव्हा त्यांच्या भिडला होता!
लगेच मेंदू 'पर्यायी' का किडला होता?
गझल पाडली; कशी पाडली माझ्यावाचून?
सांग जनांना माझ्याविण तू अडला होता
गझल नवी पाहताक्षणी ते 'टाईट' झाले
ठर्रा मारून जसा बेवडा पडला होता
किती पाजळू प्रतिसादातुन ज्ञान फुकाचे
एक एक मी कवी येथला पिडला होता
'अतिसाराची' खोड जुनी ही प्रतिसादातुन
किती 'मी' चावु गझलेला? 'मी' नडला होता!
‘जितू’ यामधे पिसेपणा तू पाहिलास का?
गझल नवी तो पाहताच ओरडला होता!!
वा उमेशजी छान हझल ही
वा उमेशजी छान हझल
ही स्वतंत्रपणे गझलविभागात प्रकाशित करावीत अशी विनंती
शेर उरावर भिडला? अन् का मेंदू
शेर उरावर भिडला? अन् का मेंदू किडला?
किती कल्पनादारिद्र्याचे महाप्रदर्शन!
गझलेची अन् हझलेची ही हौस केवढी?
हांजी बाबा हजर जाहले द्याया दर्शन!!
>>मनात नसतानाही रडलो आज
>>मनात नसतानाही रडलो आज सकाळी
अर्घ्यासाठी सूर्य कधीचा अडला होता<<
मनात नसताना रडणे = अर्घ्य , फारशी भावली नाही ही कल्पना. कल्पनेत वेगळेपण आहे परंतु नुसतेच वेगळेपण आहे. त्यापलिकडे फारसे काही नाही वाटते ( वै.म.)
>>कधीच माझे दु:ख कुणाला सांगत नाही
कारण पूर्वी ऐकुन जो-तो हसला होता <<< अनेकवेळा येऊन गेलेला विचार, सादरीकरण थोडेसे वेगळ्यापध्दतीने असायला हवे होते )
'जितू' चेहरे हरलेले तू नकोस पाहू
हरलेलाही हरण्याआधी लढला होता ... हा मात्र सुरेख शेर. कल्पना खूप नविन नाही पण सादरीकरण मात्र खूप सुरेख आहे.
देवपूरकरमामा, तुमच्या
देवपूरकरमामा, तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही आजकाल तुमची औषधे वेळेवर घेत नाही असे दिसते. हे योग्य नव्हे. मामींना वेळीच कळवायला हवे.
खवटुन्निसाताई धन्यवाद!
खवटुन्निसाताई धन्यवाद! कुणीतरी आमच्या तब्येतीची, आौषधपाण्याची काळजी करत आहे, हे पाहून आम्ही सद्गदीत झालो आहोत! आम्ही आपणास शब्द देतो की, आमची औषधे वेळेत घ्यायला आम्ही विसरणार नाही!
सूर्याचा शेर कल्पनापूर्ण
सूर्याचा शेर कल्पनापूर्ण वाटला..
' लपलेला अंधार तेव्हढा दिसला होता ' याचा' उजाडले की!' शी संबंध मला समजला नाही (क्रु. गै. न.)
सांगितल्यास शेर अधिक चांगला समजून घ्यायला मदत होईल..
सर्वांचेच धन्यवाद
सर्वांचेच धन्यवाद !!
--------------------------------------------
@सुशांत खुरसाले,
प्रयत्न करतो..
रोज सकाळी जगास वाटे 'उजाडले की!'
लपलेला अंधार तेव्हढा दिसला होता
रात्रीच्या काळोखात न दिसलेला अंधार, अर्थात निराशाजनक/ क्लेषकारक/ अप्रिय वास्तव, सकाळी उजाडल्यावर दिसतं. रोज सकाळी की जगाला वाटतं की, नवा प्रसन्न दिवस उगवला आहे, प्रकाश पडला आहे, उजाडलं आहे. पण प्रत्यक्षात सारं काही तेच असतं, किंबहुना ह्या प्रकाशामुळे आणखी अश्या काही गोष्टी नजरेस येतात ज्या पाहिल्यावर असं वाटावं की तो काळोखच बरा होता जेव्हा काही दिसत नव्हतं.