(तस्वीर - तरही) खोळंबुनी सागरकिनारी

Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2013 - 05:43

या चित्रांनुसार ही गझल आहे.

खोळंबुनी सागरकिनारी वृक्षसुद्धा वाळतो
पण मी तुला भेटायचो ती वेळ अजुनी पाळतो

थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो

सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो

निर्व्याजतेवरती किती जमलेत थर कळते तिथे
शाळा बघितली की कुणी माझ्यातला ओशाळतो

घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्‍यासारखा मी चांदण्या न्याहाळतो

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच, अगदी तंतोतंत खयाल.

सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो>> व्वा

घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्‍यासारखा मी चांदण्या न्याहाळतो>> मस्त

छान

मस्त गझल. Happy
(एक सांभाळण्याचा शेरच त्यातल्या त्यात सपक वाटला.
तसंच 'तस्वीर तरही' म्हणजे काय ते तुम्ही दिलेली लिंक बघून आत्ता कळलं मला. मस्त कल्पना. Happy )

वा वा! सगळे खयाल समर्पक!

मतला,

सांभाळतो, न्याहाळतो अफलातून .

-सुप्रिया.

सर्वच शेर चांगले.

मात्र मला

थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो

हाच जास्त आवडला. Happy

शाळेबद्दलचा शेर नीटसा समजला नाही. बाकी सर्व शेर छान. `तस्वीर' हरवली तरिही शेरांचा अर्थ लागतोय.

वाटा वेगळ्या होणे/ सांभाळणे विशेष आवडला

फार मस्त आहे गझल बेफिकीर. तुमच्या गझलेच्या ओळी एकदा वाचून पण तशाच्या तशा आठवतात नंतर. This is called impact. Happy

थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो out of........... just grt
ethe mi baryach jananchya (तस्वीर - तरही) ya heading khali post kelelya gazal pahate aahe ,ya grp var je upakram ghetale jatat tyachi nemaki kuthe mahiti milate he kalel ka? mhanje sahbhag dyayla sop hoil

खोळंबुनी सागरकिनारी वृक्षसुद्धा वाळतो
पण मी तुला भेटायचो ती वेळ अजुनी पाळतो

छान मतला!

थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो


अप्रतिम, अलौकिक शेर!

सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो

सुंदर, वास्तववादी शेर!

घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्‍यासारखा मी चांदण्या न्याहाळतो


चकीत करणारा कल्पनाविलास व निरीक्षण!