'पुल'कित

Submitted by अमेय२८०८०७ on 10 February, 2013 - 09:31

काही व्यक्तिमत्वे असे काही दैवी देणे घेऊन आलेले असतात की त्यांच्या प्रतिभेसाठी आकाशाचा फलकही अपुरा पडतो. आपल्या कलेतून वर्तमान आणि भविष्यातील अगणित पिढ्यांचे सामान्य जगणे उजळवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. अशा लोकांची निर्मिती पाहून, तिचा आस्वाद घेऊन तृप्ती तर होतेच पण त्या प्रतिभेचे विशुध्द तेज अनुभवून आपले स्वतःचे जीवनही एक आनंदयात्रा बनून जाते. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अशा असामान्य दैवी प्रतिभावंतांच्या यादीत पु.ल. देशपांडे हे नाव येणारी कित्येक वर्षे तळपत राहील.
चौथी - पाचवीत असेन. बाबांनी पॅनॅसॉनिकचा नवा करकरीत डेक घेतला होता. त्यावेळच्या ऐपतीप्रमाणे जरा अंगाबाहेरचाच खर्च होता पण ती सिल्वर कलरची सिस्टम आणि तिचे ते मोठाले स्पीकर पाहून वरकरणी रागावलेली आईही मनातून आनंदी झालेली दिसत होती. नव्या डेकचे उद्घाटन करण्यासाठी पु.लं.ची म्हैस, अंतू बरवा आणि पानवाला ही अतिशय गाजलेली कथाकथन कॅसेट आणली होती. पुढचे कित्येक महिने आम्ही ती कॅसेट अक्षरश: झिजवली. त्यातल्या ओळीन ओळी मला पाठ झाल्या होत्या.
लवकरच वाचनही सुरु झाले आणि पु.लं. ची पुस्तके जगण्याचा अविभाज्य घटक बनली. त्या कथाकथनाने निर्माण झालेला त्यांचा पगडा एवढा जबरदस्त होता की मी अजूनही पु.ल. वाचताना त्यांच्या त्या सानुनासिक आवाजात ते स्वतः वाचून दाखवतायत असंच वाटत रहातं. वय वाढत गेले, पु.लं. व्यतिरिक्त अनेक लेखकांच्या लिखाणाची ओळखही झाली. पण त्यांचे अग्रस्थान कायम राहिले. त्यांचे आणि त्यांच्याविषयीचे जसेजसे वाचत गेलो तसेतसे त्या व्यक्तिमत्वाचा उत्तुंगपणाही नजरेत भरत गेला. आज थोडी समज आल्यावर जाणवते ते हे की पु.ल.नी आपल्या लिखाणातून जी इतर लेखकांची, कलांची, कलासाधकांची ओळख करून दिली ती जास्त प्रभावशाली होती. व्यासंग म्हणजे काय याचे ते लिखाण एक मार्गदर्शकच होते. चाप्लीनचे चित्रपट पाहून मी एरवीही हसलो असतो पण त्या विनोदामागील कारुण्य आणि अधिष्ठान समजण्याची गरज पु.लं. नी निर्माण केली.
आईला आणि मला त्यांना भेटायची प्रचंड इच्छा होती पण त्यावेळी त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. पूर्व परवानगीशिवाय भेटणे अशक्य होते. तसे केल्यास सुनिताबाईंकडून कशी 'बिनपाण्याने' व्हायची शक्यता असते तेही बऱ्याच जणांकडून सोदाहरण कळलेले होते. त्यामुळे त्यांची भेट व्हायची शक्यताच नव्हती. त्यांच्या घराचा पत्ता पाठ होता. पुण्यात गेल्यावर त्या इमारतीवरून बऱ्याच वेळा गेलो होतो, काही फुटांवरच आत आपले दैवत राहते आणि भेट शक्य नाही या भावनेने हताशही झालो होतो.
आई थोडेफार लेखन करीत असे. तिच्या एका कथासंग्रहाला बरेच पुरस्कार मिळाले. एके दिवशी सुनिताबाईंचे 'इन्लॅण्ड लेटर' आले. त्यात त्यानी आईचे पुस्तक दोघानाही आवडल्याचे लिहिले होते. एका विशेष कथेविषयी मौलिक रसग्रहण केले होते आणि सोने पे सुहागा म्हणतात तसे खुद्द पु.ल. नी पार्किंसंस असूनही थरथरत्या हातांनी चार आशीर्वादपर वाक्ये लिहिली होती. अनेक पुस्तकांवर पाहिलेली ती विशिष्ट वळणाची सही प्रत्यक्षात पाहताना आम्हाला लॉटरी लागल्याचा आनंद झाला होता. पत्राच्या शेवटी सुनीताबाईंनी घरी भेटण्याचे आमंत्रण दिले होते. फोन नंबर दिला होता आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत कधीही या, पु.ल. फ्रेश असतात, काही बोलणे होईल असेही सांगितले होते. आई दुसऱ्याच दिवशी गेली असती पण माझी इंजिनियरिंगची फायनल चालू होती. हा कपिलाषष्ठीचा योग मी सोडणार नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आईला पंधरा दिवसांनंतरची वेळ फोन करून मागून घ्यावी लागली. पंधरा दिवस आम्ही नुसते सळसळत होतो. दोन आठवड्यानी आम्ही पुण्याला निघालो. काशीयात्रेला जाताना लोक पूर्वी भेटायला यायचे तशा आईच्या मैत्रिणी तिला 'घालवायला' आल्या होत्या.
साडे नऊच्या सुमारास आम्ही त्यांच्या घरापुढे होतो. मी चाचपडत बेल दाबली. दोन मिनिटांनी दार उघडले. एखादा नोकर/कामवाली बाई दार उघडेल, आपल्याला काही वेळ बाहेरच्या खोलीत बसवून ठेवतील आणि नंतर पु.ल. आले तर बाहेर येतील असं काही मला वाटलं होतं. दार उघडताच माझी शुध्द हरपली. खुद्द पु.ल. नी दार उघडलं होतं. आधीच धास्तावलेले आम्ही क्षणभर बधीर झालो. काय करावे काही सुचेना. पॉझ बटन दाबल्यासारखी स्थिती होती. ते आम्हाला आमचे नाव विचारत होते (खात्रीसाठी) आणि आम्ही दोघं गोठून गेलो होतो. त्याक्षणी माझी कुठली अंत:प्रेरणा जागृत होती माहित नाही पण पुढच्या आयुष्यात स्वतःचा अभिमान वाटत राहील अशी एकच गोष्ट माझ्या हातून घडली. त्यांच्या पायावर मी झोकून दिलं. डोळ्यातून पाण्याच्या धारा आपसूक वाहू लागल्या. इतक्यात मागून सुनिताबाई आल्या. त्यानी आम्हाला उठतं केलं. आत गेलो. काही काळ केवळ त्या दोघांकडे विशेषत: पु.लं. कडे अनिमिष बघण्यात गेला. शेवटी पु.लं. नीच विचारले ' अरे काही बोलणार आहात की नुसतेच बघून परत जाणार आहात?'. आम्हाला हसू फुटलं. अडखळत - घुटमळत बोलणं सुरू झालं.
किती क्षीण झाले होते ते. पुस्तकांच्या वेष्टनावर दिसणाऱ्या सतेज चेहऱ्याचा मागमूस नव्हता. केस विरळ होते, पांढरी दाढी चेहरा व्यापून होती. दोनच गोष्टी आमच्या ओळखीच्या होत्या त्या म्हणजे त्यांचे स्वत:शीच खुशीत हसणारे डोळे आणि आमच्या काळजात घर करून बसलेला तो खणखणीत आवाज. काळाच्या तडाख्यातून त्या कशा वाचल्या होत्या कोण जाणे.
सुदैवाने त्या दिवशी त्यांची तब्येत बरीच चांगली होती. आम्हाला वीसेक मिनिटांची वेळ दिली होती पण सुनिताबाईच इतक्या बोलू लागल्या की दोन तास आम्ही तिथे होतो. आयुष्य ओवाळून टाकले तरीही परत मिळणार नाहीत असे ते दोन तास होते. आईला त्यांनी 'पोहे करूया का ग? भाई सकाळपासून कर म्हणतोय, मी तुम्ही आल्यावर करू म्हणत होते. चल आत तुला घर दाखवते ' असं म्हटले. आईला चक्कर यायचीच बाकी होती. ज्यांना भेटायची ती गेली २५ वर्षे स्वप्न पाहत होती त्यांना त्यांच्याच घरात स्वत:च्या हातचे खाऊ घालायचे? जणू काही सुनिताबाईंचा विचार बदलेल तर काय करा अशा भीतीने ती त्यांच्यापुढे स्वयंपाकघरात धावली. त्यापुढची १५-२० मिनिटे माझ्या सुखाची परमावधी कारण पु.ल. आणि मी दिवाणखान्यात दोघेच. मी भीतभीत वुडहाउसचा विषय काढला. त्यांची कळी खुलली. वुडहाउसच्या जीवनाविषयी त्यांनी खूप आठवणी सांगितल्या. शेवटी म्हणाले 'त्याला मी भेटू/बघू शकलो नाही हे मला फार शल्य आहे. खरेतर जेव्हा जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा तेव्हा थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच भेट झाली असती पण काय झाले कोणास ठाऊक! विल पॉवर कमी पडली ' . मी भक्तिभावाने एक एक शब्द, एक एक हालचाल मनात साठवत होतो.
कौतुक करत त्यानी पोहे खाल्ले, आईच्या लिखाणाची पुन्हा तारीफ केली. आई अल्लड नववधूप्रमाणे लाजून/भावनातिरेकाने लाल झाली होती. जाण्याची वेळ आली. पुन्हा एकदा निस्सीम भक्तीने दोघांच्या पाया पडलो. डोळे भरून पु.लं. ना पाहिले, त्यांच्या घराकडे बघितले आणि कष्टाने पाय बाहेर ओढला.
आज विचार करताना तो दिवस दाखवल्याबद्दल जग:नियन्त्याचे आभार मानण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले, आनंद यादवांसारखा हिरा काळ्या मातीतून वर काढला, मुक्तांगणला संजीवनी देऊन हजारो व्यसनाधीन लोकांना माणसात आणण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला त्या तेज:पुंज स्रोताची काही किरणे आमच्याही आयुष्यांवर पडावी आणि आमचे सामान्य जीवन आयुष्यभरासाठी 'पुल'कित व्हावे ही त्या ईश्वराचीच योजना असणार, दुसरे काय?
अजूनही पु.लं. ची पारायणे चालूच आहेत. काही ओळी वाचताच हसण्याचा उमाळा येतो. डोळ्यातून पाणीही सांडते पण ते फक्त लिखाणातील विनोदामुळे आलेले असते असे आता वाटत नाही. त्या दोन -एक तासात मिळालेल्या दैवी अनुभूतीच्या - असीम कृपेच्या आठवणी त्या अश्रूत मिसळतात आणि त्या अश्रूंना माझ्यालेखी तीर्थाचे महात्म्य प्राप्त होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलंय!

माझ्या आयुष्याला पुरेल अशी एक चूक केली मी... पुलंच्या दाराशी जाऊन नुसती १० मिनिटं उभी राहून उलट पावली निघून आले! बेलसुद्धा वाजवायला सुचलं नाही. बरोबर मैत्रिण होती, तिनेही कच खाल्ली...
परत जायचं नक्की केलं, पण तोवर त्यांची तब्येत खालावली नि भेटीसाठी पूर्वपरवानगी नाही मिळाली. Sad

अजूनही खूप खूप हळहळ वाटते!

वा अमेय! मस्तं अनुभव! नक्कीच भाग्यवान आहात !! आणि किती छान शब्दात मांडलायत ! तुमच्या जागी मी आहे अशी कल्पना करून प्रसंग अगदी अनुभवला आणि मला देखील भाग्यवान बनवलंत !! धन्यवाद!

छान लिहिलंय. पुलं म्हणजे महाराष्ट्राची शान होती.
माझ्या एका विवाहेच्छु मित्राला त्याच्या बायकोबद्दलच्या अपेक्षांमधे पुलंचे विनोद कळावेत हीही एक अपेक्षा आहे. म्हणजे...पुलंच्या पुस्तकांची व कॅसेट्सची पारायणे तिनेही केलेली असावीत व अर्धे वाक्य आपण बोलले की पुढचे तिला पुर्ण करता आले पाहिजे Happy बिचारा अजून बिनलग्नाचा अहे.

बिचारा अजून बिनलग्नाचा आहे >>> Lol

सुमेधा, तुमच्या मित्राला म्हणावं - पु.ल.प्रेम इन्ड्युस करता येतं. Wink

एकदम "आह!" झालं वाचल्यावर...
खरं तर प्रतिक्रिया द्यायला शब्दच नाहीत इतका सुरेख अनुभव तुमच्या लेखणीतून उतरलाय.....

"आज थोडी समज आल्यावर जाणवते ते हे की पु.ल.नी आपल्या लिखाणातून जी इतर लेखकांची, कलांची, कलासाधकांची ओळख करून दिली ती जास्त प्रभावशाली होती. व्यासंग म्हणजे काय याचे ते लिखाण एक मार्गदर्शकच होते."

अगदी! माझं कॉलेज संपता संपताच्या सुमाराला मलाही हे प्रकर्षाने जाणवलं. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या (अन थोडं त्याच्या बाहेरही) समाजजीवनात आणि 'मराठी' कलाजीवनात जे जे उत्तम, अभिरुचीपूर्ण घडलं त्या त्या सर्वाला पु.ल. चा स्पर्ष झाला होता! पु.ल. म्हणजे फक्त एक लेखक नव्हते - ती त्यांची फारच तोकडी ओळख झाली. किंबहुना ते फक्त एक बहुआयामी कलाकारच नव्हते - तीही त्यांची तशी अपूर्णच ओळख होईल. पु.ल. म्हणजे रसिकशिरोमणी होते! केवळ कलेचेच रसिक नव्हे तर अवघ्या मानवी जीवनाचे रसिक. अभिरुचीपूर्ण कृतीशील समज काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण होते. केसरबाई, किशोरीबाई, माटेमास्तर, बोरकर, गोविंदाग्रज, नेमाडे, आनंद यादव, आरती प्रभू, महात्मा गांधी, आमटे, डॉ. अवचट, चाप्लीन, वुडहाऊस, टागोर... या अशा सगळ्यांना समजता येणं, अनुभवता येणं, आणि त्याहीपुढे जाऊन त्यातली कणभर जाण आमच्यासारख्या सामान्य वाचकांत पेरता येणं... दॅट वॉज हिज जीनीयस!! आपलं भाग्य थोर की पु.ल. होते, आणि मराठी होते!
असो, हा विषय म्हणजे हमखास माझ्या भरकटण्याचा विषय आहे.

अमेय, हा हृद्य किस्सा लिहिल्याबद्दल धन्यवाद!!

सुंदरच!

आता लगेच पु.ल. ऐकायला घेतले!

तुमच्या आईने लिहीलेल्या कथा/ पुस्तकाचे नांव शेयर कराल का? वाचायला आवडेल!

>>आणि त्या अश्रूंना माझ्यालेखी तीर्थाचे महात्म्य प्राप्त होते.

सुंदर...

कल्पनातीत अनुभव तितक्याच ताकदीने लिहीला आहे.
असूया तर वाटलीच, पण मग लक्षात आले की जेंव्हा तुमच्यासारखा एक वेडा पुलंना भेटतो तेंव्हा तो माझ्या सारख्या लाखो वेड्यांचे मन बरोबर घेउनच भेटत असतो!
आणि पुलं गेलेतच कुठे? त्यांच्यावर प्रेम करणार्‍या आपणा सर्वांत ते आहेतच.

पु.ल.नी आपल्या लिखाणातून जी इतर लेखकांची, कलांची, कलासाधकांची ओळख करून दिली ती जास्त प्रभावशाली होती. >>>

याचा मला आलेला लेटेस्ट अनुभव -

पु.लं.च्या बालगंधर्वांवरच्या एका सुरेख भाषणाची ऑडियो माझ्या एका कॉलेजवयीन भावाला मी ऐकवली. ते ऐकून तो थक्क झाला. कारण, 'बालगंधर्व' सिनेमा पाहून त्याच्या मनात बालगंधर्वांबद्दल तयार झालेली प्रतिमा एकदम विरुध्द, दुसर्‍या टोकाची होती. तो सिनेमा पाहून आल्यावर 'या बालगंधर्वांना तेव्हा लोकांनी इतकं डोक्यावर का घेतलं तेच कळत नाही' असं तो म्हणायचा. आणि हीच त्याच्या अनेक वर्गमित्रांचीही प्रतिक्रिया होती. त्याचा हा गैरसमज दूर केला तो पु.लं.च्या त्या भाषणाने.
('पाचामुखी' या पुस्तकात ते भाषण आहे बहुतेक.)

सुंदर लिहिला आहे अनुभव.

पुस्तक विश्वाच्या विठ्ठलाचे आपल्याला दर्शन घडले. दर्शनच काय साक्षात भेट घडली म्हणावे लागेल.
पुलं हे खरच भारताचे वुडहाऊस होते. पुलंची शैली हि विनोदी होती आणि त्यात त्यांचा हातखंडा होता. पुलंची प्रतिभा हि शब्दांत सांगणे कठीण आहे. खरच पुलं हे दैवत होते, आहे आणि राहतील. फक्त एक खंत नेहमीच राहील पुलंना भेटण्याची. Sad

वा, केव्हढा अनमोल अनुभव , नशीबवान आहेस Happy
अमेय्,काय सुरेख लिहिलंयस..
तुझ्या आईचा कथासंग्रह मिळेल का वाचायला..

अविस्मरणीय अनुभव आणि त्याचे खुप सुंदर वर्णन Happy

सगळ्यांप्रमाणेच मी देखिल पुलभक्त त्यामुळे जास्तच आवडला लेख Happy

फारच नशिबवान आहात, आता पुलंना प्रत्यक्ष पहाता येणे आम्हाला शक्य नाही, तरी आम्हीही नशिबवानच त्यांचे लेखन वाचायला मिळाले म्हणून .....

Pages