काचेचा लोलक

Submitted by सुज्ञ माणुस on 23 January, 2013 - 00:31

काचेचा लोलक

कळून येता जगण्याची हि इवलीशी त्रिज्या, उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा....
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा, राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा .....
कंटाळ्याचा.. देखील आता कंटाळा येतो...........
अरे... वाजणारा भ्रमणध्वनी कसा काय बंद झाला????? अरे.... त्याला सुद्धा तेच ते गाणे वाजवायचा कंटाळा आला असणार बहुतेक....
मी मात्र उठलो जागेवरून आणि म्हटले काहीतरी स्वतःसाठी केले पाहिजे यार!! रविवार हा छंद जोपासण्यासाठी आयोजित करून ठेवलाय असे वाटले... लगेच जाणवले की कित्येक रविवार आपले पाऊलच घरात नाहीये.... जवळ जवळ दर रविवार आपण दुर्गभ्रमंती साठी बाहेरच आहोत... मग म्हटले चला त्याचेच अनुभव शब्दांकित करूया.... म्हणून बसलो ब्लॉग लिहायला .....
असे का?????

खरेतर मलाही नाही माहीत असे का... हे म्हणून ते की ते म्हणून हे..... पण ... "If there is a cause, there is a effect".... असे बरेच "असे का" मला भेडसावत असतात.. मी जेव्हा जेव्हा न्हाव्याकडे केस कापायला जातो तेव्हा दर वेळेस न चुकता 'आपके प्यार मी हम गुजरने का सवरने लगे " असे काहीतरी टुकार गाणे का लागलेले असते? दरवेळी सांगूनही न्हावी परत "साह्येब तुमचे कुच्या गावचे? " असे का विचारतो .. आणि पुण्याचाच म्हटल्यावर पुढचे काहीच न बोलता (स्वतःच मनानेच) केस कापायला लागतो... ( पु. ल. चे पुणेकर त्याने ऐकलेले असावे बहुतेक... त्यात मी दुकानदार आहे हे हि त्यास ठाऊक असावे .... त्यामुळे पुणेरी बोली भाषे प्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान करण्याची "कला " मला अवगत असावी असे त्यास वाटत असणार बहुतेक.... )

परवाच बाबांबरोबर जाताना काहीतरी विषय चालू होता मदत करण्याचा.... "आपण कोणासाठी काहीही करायची गरज नाहीये.. आपल्यासाठी कोण काय करते??? कोणाला कोणाची पडलेली नसते इथे ... " हे वाक्य बोलतानाच मी समोर पहिले की एक मध्यमवयीन कामगार श्रेणीतला माणूस आपली सायकल रस्त्याच्या बाजूला उभी करून दुकानात गेला.. आणि एक बिस्किट पुडा घेऊन आला. कामावरून घरी जाताना दमला असेल बहुतेक.. लगेच त्याच्याजवळ तीन चार कुत्री जमली आणि तो त्यांना ती बिस्किटे खाऊ घालू लागला.... बऱ्याच दिवसांची मैत्री असावी त्यांची बहुतेक.. बिस्किटे संपल्यावर शांतपणे सायकल काढून तो गाणी म्हणत निघून गेला .. "कोणाला कोणाची पडलेली नसते इथे" असे बोललेले वाक्य तोंडातच अडकून पडले .. हे मी कसे बोललो हे माझे मलाच आठवेना.... मी हे करू शकतो का?? मी रस्त्यात थांबून त्या कुत्र्यांना खायचा घालेन का? पैशाच्या मागे धावून आपण नक्की काय गमावतोय हाच प्रश्नाचा विचार करतो झोपले ... त्याचे उत्तर मला अजून कसे सापडले नाही... असे का????

मध्यंतरी मोठ्या दुर्गा भ्रमंतीस गेलो होतो .. नाशकातल्या बागलाण जिल्ह्यातले उत्तुंग असे मोठे किल्ले माझ्या एका मित्राबरोबर धुंडाळून काढले... तिथे जाताना 'वाघांबे' नावाच्या गावात आम्ही मुक्काम ठोकला.. गावात राहण्याची सोय विचारताच २-३ माणसे पुढे आली आणि त्यांनी एका मंदिराचा आश्रय दिला.. कोणत्याही मोबदल्याशिवाय त्यांनी आमची राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था करून दिली.. कोणाच्याही चेहऱ्यावर अपेक्षेचा लवलेश हि नव्हता.. गावात अजून माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला. आम्ही मात्र प्रत्येक गोष्ट पैशात तोलण्याचा स्वभावाचे बळी.. किती घेणार? हा प्रश्न आम्हांस सुटेना... किल्ला चढून गेल्यावर दरवेळी प्रमाणे वाट चुकल्यानंतर ( इथे पु. ल. चा एक विनोद आठवला... की आमचे रिझर्वेशन खुद्द इंजिनात झाले असले तरी चुकून आम्ही पहिल्यांदा गार्डच्या डब्यातच शिरणार.. ) आम्हांस एक गुराखी भेटला.. पूर्णतः निर्मनुष्य अश्या डोंगर रांगा मध्ये तो आम्हाला देवासारखा भेटला... त्याने आम्हाला पुढचा रस्ता दाखवला आणि परत आम्ही जाऊन येईपर्यंत आमच्या सामानाची राखण केली... आम्ही त्याला आमच्याबरोबर जेवायला बसवले.. बरेच प्रश्न विचारले तरी तो मोजकीच उत्तरे देत होता.. त्याला संकोच वाटत असावा असे वाटले म्हणून मी त्याला "अरे खा रे पोटभर" असे म्हणत गुळाची पोळी दिली... गुळाची पोळी तो प्रथमच खात होता असे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवले.. थोड्या वेळाने तो बोलता झाल्यावर म्हणाला की तो 'महाधर' नावाच्या गावात राहतो आणि शेळ्या घेऊन डोंगरावर येतो. पोटापाण्यासाठी रोजंदारी करायला तालुक्याच्या गावास जातो काधीकाही.. पण जायचे पैसे नसले की उपाशीच बसून राहतो... "सकाळी भाकरी खाऊन आलो होतो रानात आणि संध्याकाळी ५ वाजता घरी परत गेल्यावर खाईन आता".... आणि पाण्याचे काय???? "गावामध्येच पिण्यासाठी पाणी नाही आमच्या. इथे कसे घेऊन येऊ ??? गावात साधे किरणा दुकानही नाही तर रोजचा काय शिधा आणणार? आणि कामही काय करणार? आकाश पांघरून बसतो आणि आणि एखाद्या ओढ्याने तहान भागवतो... तुमचे बरे असते की तुम्हाला नोकरी असते".. हे त्याचे वाक्य ऐकून मी खरेच विचारात पडलो. रोजच्या टेन्शन मधून बाहेर पडायचे म्हणून असे फिरण्याचे उपाय अवलंबतो रे आम्ही... खरेच आमचे बरे आहे??? निसर्गाच्या सहवासाचा मागमूसही नाही रे आम्हाला??? चिवचिवणारी चिमणी मी कधी शेवटची बघितली बरे??? आकाशात चंद्र आणि लुकलुकणारे तारे असतात याची आठवण होते आम्हाला घराच्या भिंतीवरचे रेडियम चे तारे बघून रे.... कपडे आणि बूट भिजतील म्हणून पावसाला किती वेळा डावलले आम्ही??? बहिणाबाई च्या कवितेची आजीची गोधडी अजून कशी ठिगळे लावलेली??? टायर खेळतानाची मजा आता फक्त कॅमेऱ्यात बंदिस्त करतो आम्ही...
व्ह्यर्र्र्र्र्र्र्र्र्र....... अरे हा कुठला आवाज????? तो शेळ्या च्या मागे धावत केव्हाच गेला होता..... आमच्या करून कहाण्या ऐकण्यात त्यालाही रस नसवा बहुतेक... जाताना म्हणाला की माझे तेवढे मोबाईल चे रिचार्जे करता का तालुक्याच्या गावाला गेल्यावर?? नाहीतर मला तेवढ्यासाठी जावे लागेल तिथे .. आम्ही त्याचा क्रमांक घेतला आणि जातो म्हणालो पुढे किल्ल्यावर... उतरताना दुसऱ्या गावातून उतरीन म्हणतो किल्ला... असे म्हणत खिशाकडे हात टाकला.... नको म्हणत तो जाऊ लागला.. तरीही ६० रुपये देऊ केले आम्ही.. तालुक्याच्या गावास गेल्यावर त्याचे २० रुपयांचे रिचार्जे केले तोच त्याचा फोन आला.. धन्यवाद म्हणून.... किल्ला उतरताना आमच्या गावाहून.. आमच्या घरी या ... हे त्याचे वाक्य मनात मात्र घर करून गेले.. ज्याला रोज या दोन वेळच्या जेवणा साठीची मारामार.. तरीही त्याचे मन मोठे होते... नंतर मात्र भटकंती झाल्यावर जाताना प्रवास हिशोब करताना आम्ही दोघांनी ते ६० रुपये अर्धे अर्धे खर्च म्हणून वाटून घेतले ....
असे का????

कित्येक दिवस बाहेरचे खायला न मिळाल्यामुळे मोर्चा Macdi कडे वळवला... शे पाचशे रुपडे असे उडले. येताना मात्र एक प्रसंग आठवला.. मुंबई ला गेलो असतानाचा.. आमचे खास मित्र आणि भ्रमंतीचे फोटोग्राफर कोतकर साहेब हे दिमतीला हजर होते. गेटवे ऑफ इंडिया ला जायचा प्लान करून आम्ही तिथे पोहोचलो .. खरेच हौशे आणि गौशे दोघांसाठीची हे स्थान.. एक माणूस काकडी विकत उभा होता.. विकण्यासाठी त्याने काढलेल्या काकड्या च्या साली हि त्याने तिखट मीठ लावून विकण्याचा घाट घातला होता.. १ रु च्या ५ साली... आणि खाणारी मंडळीही १ रु देऊन त्या ५ साली खात होती... मी वेडाच झालो हे बघून.. रोजचा संघर्ष म्हणजे काय असतो.. प्रत्येकाच्या पाजवी ला हा पुजलेला कसा ?
असे का???

सर, आज मी शाळेतून लवकर घरी जाऊ का?
अजिबात नाही का???
सर माझे पाय खूप दुखत आहेत हो सर.. मला उभे पण राहवत नाहीये .. तुम्ही प्लीज माझ्या घरी फोन करा सर ....
आता काही नाही मधल्या सुट्टीत बघू... गुपचुप बस जागेवर....
सर मला काहीच सुचत नाहीये... खूप पाय दुखातायेत हो सर .. पायातली शक्ती गेलीय... त्याचे डोळे पाणावले..
अजिबात फालतूपणा नकोय.... शाळा सुटेपर्यंत थांब आणि जा मग.. आणि माझ्याकडे फोन साठी पैसे नाहीयेत मोबाईल मध्ये....
अखेरीस शाळा सुटेपर्यंत त्याला मी थांबवलेच... मुलांना शिस्त नाहीये...
४-५ दिवसांनी.... अहो सर तुमच्या वर्गातला तो "... " नावाचा मुलगा येत नाही का हो???
नाही.. तो सध्या येत नाही.. आणि आता येऊ शकेल असे वाटत नाही.....
का????
पोलिओ झालाय त्याला.. ट्रीटमेंट चालू आहे...
ओहह... जर मी त्याला लवकर सोडले असते त्या दिवशी तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवला असता??
शिस्त म्हणून त्याला आयुष्यभराचा नको असलेला सोबती मिळाला...
असे का???

आपल्यातील चंचलता वाढली आहे.. घरी गरम वरण भात तूप लिंबू असताना आपण नाक्यावर जाऊन वडापाव खातो... वडापाव रोज खावा लागणाऱ्याची चेष्टा यात नाही .. पण कुठेतरी "चांगल्याला" सुरवात करण्याची गरज आहे असे जाणवले...
असे का?

परवाच एका कार्यक्रमात सलील कुलकर्णी म्हणाला की.. शांता शेळके यांच्या कवितेतला तो देवळातील झुंबरातील काचेचा लोलक (Prism) आपण आपल्या आयुष्यातून हरवत चाललोय...
देवळातील झुंबरातून सापडलेला काचेचा लोलक हरवला माझ्याकडून....
आणि मग दिसू लागली माणसे पुन्हा माणसासारखी... गवत पुन्हा हिरवे आणि आकाश पुन्हा निळे..
बऱ्याच वर्षांनी एक लहान मुलगी धावत आली आणि म्हणाली, आजी, गवत नसते नुसतेच हिरवे आणि आकाश नसते नुसतेच निळेशार. आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनलेली...
अरेच्च्या माझा हरवलेला लोलक हिला कुठे सापडला बरे??
त्या देवळातील झुंबराला अजून असे किती लोलक आहेत कुणास ठाऊक?

उत्तराच्या शोधार्थ मी आहेच.... आपणास काही सुचते का याचे उत्तर????

http://sagarshivade07.blogspot.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी नवीन लेखन करू इच्छितो पण मला त्याचा दुवा सापडत नाहीये .

अहो सुज्ञ माणुस, ही अक्षरे जिथे लिहीलीत तिथेच नवीन लेखन लिहायचे.
हाकानाका.

.

आवडलं