चारचौघी - ८

Submitted by बेफ़िकीर on 23 January, 2013 - 02:32

नीलाक्षीने केंद्रामधून आज रजा काढलेली आहे हे तिने कोणालाच सांगितलेले नव्हते. पाण्याची एक बाटली आणि थोडे अन्न असलेला एक डबा घेऊन ती कोणाच्या नकळत मागच्या टेकडीवरील एका मोठ्या झाडाखाली येऊन बसलेली होती. होस्टेलचे सुरक्षा कर्मचारी नजरेच्या आणि थोडेसे चालले तर हाकेच्या टप्प्यात राहतील अश्या बेताने तेथे बसून ती मूकपणे होस्टेलवरची कमी कमी होत चाललेली वर्दळ पाहात होते. सकाळचे दहा वाजलेले होते. ऊन चढलेले होते पण झाडामुळे ते जाणवत नव्हते. मुली, महिला हळूहळू कामाला निघून जात होत्या. लहान लहान ग्रूप्समधून बाहेर पडून मुली पुढे आपापली वाट धरत निघून जात होत्या. एक दिवस असाही येईल जेव्हा आजच्या या मुलींपैकी कोणीच या होस्टेलवर नसेल पण तरीही होस्टेल तुडुंब भरलेलेच असेल. सगळ्याच मुली लहान लहान ग्रूप्समधून बाहेर पडून आपापली आयुष्याची वाट निवडत निघून जातील. नीलाक्षीच्या मनावर खिन्नतेचा एक एक थर नकळतपणे येऊन बसत होता. जात असलेला काळ धरून ठेवता येत नाही यामुळे आलेली ती खिन्नता झटकावीशीही वाटत नव्हती. असे वाटत होते की खिन्नतेला सामोरे जाणे हे निदान सत्य तरी आहे, खिन्नतेला झटकणे किंवा खिन्न न होणे किंवा खिन्न वाटतच नाही असे दाखवणे ही कोणाचीतरी फसवणूक ठरेल. कदाचित आपलीच स्वतःची, कदाचित इतरांची किंवा कदाचित निसर्गाची, आयुष्याची! खिन्नतेच्या त्या डोहामध्ये हळूहळू बुडताना नीलाक्षीला सत्य जगत असल्याचा आनंद मिळू लागला होता. या बुडण्यात कोणताही मुखवटा नव्हता, जे जसे आहे तसेच ते आहे याचा स्वीकार होता. ती अशी पहिल्यांदाच टेकडीवर आलेली नव्हती. अनेकदा आलेली होती यापूर्वी. आईने लहानपणी केलेल्या प्रेमाची फार आठवण यायची तेव्हा, वडिलांनी आपल्याला त्यांच्या विकृत मानसिकतेचे बळी करण्यापूर्वीच्या काळात केलेले निर्व्याज प्रेम आठवायचे तेव्हा! हा स्पॉट नीलाक्षीसाठी चिंतन ठिकाण होते जणू! या चिंतनातून हाती काहीच लागणार नव्हते, पण निदान मन शांत व्हायचे. वास्तवाचे भान यायचे. आपण स्वप्नवत जगात जगत नाही आहोत हे नव्याने जाणवायचे. दृष्टिकोन व्यवहार्य व वास्तववादी व्हायचा. प्रयत्नवादी व्हायचा. सकारात्मकतेकडे बघून पुढे चालण्याची आंतरिक शक्ती या झाडाखाली तिला मिळू शकायची.

आजही तिचे मन विचारांनी तुडुंब भरलेले होते. कारण होते जयाने सर्वांना पटवून पटवून सिमला दुसर्‍या खोलीत राहायला भाग पाडण्यास तयार करणे. नीलाक्षीला तिच्या पुनर्वसनाच्या कार्यामध्ये एका पारंपारिक स्त्रीची ही मानसिकता चिंतनीय वाटली होती. बलात्कारीत युवतीला बलात्कारानंतरही अश्या निर्णयांना सामोरे जावे लागणे हे नुसतेच दुर्दैवी नव्हते तर जयासारख्या स्त्रीकडून एकंदरच स्त्रीत्वाच्या ममताळू, मायाळूपणाचा झालेला अपमान होता, घाटा होता, त्यावरील हल्ला होता. अतिशय सूक्ष्मपणे याकडे बघायला हवे होते. ढोबळ मानाने दोघींच्या भूमिका वरकरणी पटतील अश्या असू शकत होत्याही, पण स्त्रीने स्त्रीला मोलाची साथ दिली नाही तर स्त्री कोलमडू शकते हे नीलाक्षीला तीव्रपणे जाणवले होते काल रात्री. नीलाक्षीला हे मान्य होते की जया आणि जो या दोघींना सिमेलियाचा रेप झालेला आहे हे माहीतच नव्हते. पण सिमेलियाच्या बाबतीत त्यांना जे माहीत झालेले होते, म्हणजे उत्तान अवस्थेत छायाचित्रे देणे, हे सिमेलियाचे मूळ कॅरॅक्टर असेल असे शिक्कामोर्तब करताना दोघींनी अधिक माणूसकीने व सर्वसमावेशक असा विचार करायला हवा होता असे नीलाक्षीला वाटत होते.

स्त्रीच स्त्रीची खरी शत्रू असते हे पुस्तकी विधान मान्य करून नीलाक्षी गप्प बसणार नव्हती. मुळाशी जायला हवे होते. मुळात सिमेलियाने रेपनंतर कायद्याचे दार का ठोठावले नाही? कशामुळे ती गप्प बसली? बहुधा केस केली तर करिअर तर संपेलच पण नावापुढे आजन्म बदनामीचा शिक्का बसेल आणि ओळखणार्‍या अनेक जणांच्या नजरेत ती एक हलक्या चारित्र्याची मुलगी ठरेल याची भीती असावी. मग कायद्याचे दार न ठोठावण्याची वृत्ती कशामुळे निर्माण होते? तर वारिया दस्तूरसारख्या वकीलांमुळे, कदाचित त्यांना पैसे देऊन पढवून ठेवणार्‍या गोयलांसारख्या सत्ताधीशांमुळे, संधीसाधू लांडग्यांप्रमाणे वागणार्‍या आशिष, देव या धनाढ्य मुलांमुळे! कदाचित इथे आपण एकट्याच आहोत या भावनेमुळे! कदाचित नीलाक्षी, जो आणि जया पुरेशी साथ देऊ शकणार नाहीत किंवा कदाचित अजिबातच साथ देणार नाहीत या अंदाजामुळे! म्हणजे एक मैत्रीण़ म्हणून आपण कोठवर सिमेलियाच्या मनाला बळ पुरवले असते तर ती ताठ मानेने कायद्याकडे गेली असती? कदाचित तिथवर, जेथे पोचल्यावर तिला न्याय मिळण्याची शक्यता सहजप्राप्य वाटली असती. आणि तिथवर तिला मानसिक बळ पुरवण्याचे मानसिक बळ मुळात आपल्यातच नाही आहे. उद्या गोयलांची माणसे कारमधून आली आणि आपल्याला रस्त्यातून उचलून पळवून घेऊन गेली आणि पुन्हा एकदा आपल्याला नासवून आणि धमकावून होस्टेलबाहेर आणून फेकून दिले तर त्या वेळी आपण सिमेलियाला मानसिक बळ पुरवू शकण्याच्या मनस्थितीत असू? पण जे जसे आहे तसेच स्वीकारायचे आहे, म्हणून तर रजा काढून इथे येऊन बसलेलो आहोत, खोटेखोटे कशाला मानायचे की सिम पोलिसात गेली की गोयल घाबरेल आणि न्याय वगैरे होईल? तो त्यातून सुटण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणारच की? त्याच्याकडे असलेले सामर्थ्य त्या हेतूने तो वापरणारच की?

मग गोयल, वारिया दस्तूर, आशिष, देव यांनी केलेल्या कृत्याचा जबाब काय? त्याच्यावर आपल्याकडून दिले जाऊ शकणारे तितकेच भयावह उत्तर काय? की कुढत राहायचे? रात्री दु:स्वप्ने पाहिल्यासारखे दचकून उठत राहायचे? लचके तोडण्याच्या आठवणींनी स्वतःच्याच शरीराला भ्रष्ट मानून आत्मविश्वास गमावून बसायचे?

हे शरीर नेमके काय असते? एखाद्याल एखाद्याचे शरीर पाहून काय होते? हार्ड कोअर चिंतन केल्याशिवाय येथून उठायचेच नाही आज! काय असते हे शरीर? एखाद्याला का असे वाटते की निदान गर्दीत या शरीराचा एक चोरटा स्पर्श आपल्याला व्हावा? आणि त्याची शिक्षा मिळू नये? तो स्पर्श चुकून झाला हे त्या शरीरालाही मान्य व्हावे. किंवा मान्य नसले तरी त्याविरुद्ध आवाज उठवावासा वाटू नये. किंवा आवाज उठवावासा वाटला तरी आजूबाजूची परिस्थिती अशी असावी की त्या आवाजालाच जग हासेल? असे त्या क्षणिक स्पर्शात काय मिळते? बलात्कार करून काय मिळते? नुसते शोषण करून, लैंगीक कमेंट्स करून काय मिळते? समोरचे तरुण शरीर बघत असताना आपली बहिण का आठवत नाही? केवळ एक शक्य असते म्हणून बलात्कार होतो का? बलात्कार करणे आणि तो गुन्हा उघड न होऊ देणे शक्य आहे यामुळे बलात्कार होतो का? की अती वासनांधतेमुळे बलात्कार होतो? की न्यायसंस्था आणि काय्द्यांची अंमलबजावणी हा फार्स असल्याचे ठाम मत असल्यामुळे बलात्कार होतो? की स्त्रीला बदनामीची भीती असल्यामुळे बलात्कार होतो?

बहुतेक या सर्वांची पर्म्युटेशन्स आणि काँबिनेशन्स असावीत. कोणतेही एक कारण किंवा त्या कारणांची परसेंटेजेस ठामपणे नाही सांगता येणार. पण तीन गोष्टी नक्की! बलात्कार करणे व तो उघड होऊ न देणे शक्य आहे याची जाणीव बलात्कार्‍याला असणे हे एक कारण, बलात्काराची अचानक संधी चालून आलेली आहे हे दुसरे कारण आणि अत्यंत तीव्र कामपिपासा जी क्षणार्धात बलात्कार करावा अशी इच्छा कोणत्याही सभोवतालच्या परिस्थितीमध्येसुद्धा मनात आणते हे तिसरे कारण!

बलात्काराला तितकेच भयावह उत्तर आहे, पण ते न्यायसंस्थेच्या हातात आहे. कदाचित ते उत्तर तितके भयावहही नाही. सात वर्षे सक्तमजूरी आणि पाच वर्षे सक्तमजूरी ही बलात्काराच्या शारीरिक व मानसिक यातनांमधून गेलेल्या स्त्रीने विचारलेल्या प्रश्नांना दिलेली पुरेशी उत्तरेच नाहीत. या उत्तरांनी बलात्कार करूच नये अशी भीती आगामी बलात्कार्‍यांच्या मनात येणे अशक्य आहे. उलट सात वर्षे कैदेपासून भ्रष्टाचारामार्फत सुटता येते हेच त्या लोकांना अधिक शक्य वाटत आहे. मग?

मग कायदा अपुरा आहे. नुसताच अपुरा नाही तर तो जो काय आहे तोही प्रत्यक्षात येण्यापूर्वी भगीरथ प्रयत्न करावे लागतात फिर्यादी पक्षाला! त्यात पुन्हा नाचक्की होते, आयुष्य अधिकच नागवे, पिसाट नजरांचे भक्ष्य आणि बरबाद होत राहते. थोडक्यात, कायदासंस्थेला तोवर पूर्णविराम, जोवर त्याच्या अंमलबजावणीबाबत काही ठोस होत नाही. मग आता?

आता काय! कायद्याकडे सामर्थ्य नसले तर बलात्कार होऊच नये याची काळजी मुलींनी, बायकांनी घ्यावी हाच सर्वोत्तम उपाय! पण मग तीन महिन्यांची बालिका हा उपाय कसा योजणार? जन्मदात्या वडिलांपासून आपल्याला भीती आहे हे पहिलीतल्या मुलीला कसे कळणार? "काय बाई, आज काय विशेष, नवी साडी नेसलायत' असा कामाच्या ठिकाणी हासत हासत विचारला जाणारा प्रश्न निव्वळ दिलखुलास नसून त्यातून त्या स्त्रीने स्वतःच्या स्तुतीने खुष होऊन एक स्वारस्ययुक्त कटाक्ष आपल्याकडे टाकावा ही सुप्त इच्छा असते हे प्रत्येक भोळ्या स्त्रीला कसे आणि कधी कळणार? त्या प्रश्नावर उत्तरच दिले नाही तर आपण 'भावखाऊ' का ठरतो आणि दिले तर 'चीप' का ठरतो आणि दोन्हीबाबत आपल्याला नेमके काहीच करता का येत नाही या एका स्त्रीच्या प्रश्नांना कोणती उत्तरे आहेत? की नाहीच आहेत?

म्हणजे प्रिकॉशन आणि स्वसंरक्षण हे मार्गही मर्यादीत झाले. स्त्री सशक्त व तरुण असली तर एखादवेळेस पळू तरी शकेल. सहा महिन्यांची मुलगी कुठे आणि कशी पळणार? यातच, या प्रश्नातच जया आणि सिम यांच्यात काल जे झाले त्याचे उत्तर आहे. एका स्त्रीने जीवापाड प्रयत्न करून दुसरीला वाचवायला हवे. जी स्त्री अश्या प्रसंगाना सामोरी जात आहे तिला तर अधिकच जाणीवपूर्वक पाठबळ द्यायला हवे, तिच्या सोबत असायला हवे. जयाने सर्वांना पढवून सिमला बाहेर काढले. सिमेलियाला आपल्यात ठेवून समजून घ्यायला हवे होते का? पण तिचा रेप झालेला आहे हेच माहीत नसताना तिने केलेले कृत्य निव्वळ चीप पब्लिसिटी स्टंट आहे हे जयाचे मत चुकीचे कुठे आहे? आणि रेपबाबत सांगितले तरी जया सिमच्या मुक्त जीवनशैलीला दोष देणारच की?

मग? पण समजा, एका स्त्रीने दुसरीला आणि दुसरीने पहिलीला अगदी डोळ्यात तेल घालून वाचवायचे ठरवले, आईने आपली सहा महिन्यांची मुलगी दिराच्या मांडीत खेळत आहे हे पाहून दिरावरही विश्वास न ठेवून तिथ्थेच उभे राहायचे ठरवले तरी कोण कोणाला किती वेळा आणि किती ठिकाणी पुरणार? किती वेळा सोबत करू शकणार? आणि दोघींवरही हल्ला झाला तर तिसरी सोबतीला हवी होती असे म्हणत बसणार का? घराच्या बाहेर पाऊलही न टाकता अत्याचार होत असतील तर वाचा कोण फोडणार? घराबाहेर पाऊल टाकताक्षणी अश्या नजरा सर्वांगाला चिकटतात तर कुठेकुठे स्वतःला सुरक्षित ठेवणार?

मग हे सगळे पुरुषांच्या दृष्टिकोनातूनच का हवे तसे घडत असते? स्त्रीने दिसावे, चांगले दिसावे, आपल्याशी बोलावे, हसावे, मुक्त वागावे, आपल्या वखवखलेल्या नजरेला तोषवावे, असे न वागल्यास बदनाम व्हावे, वागल्यास उपलब्ध असल्याचा शिक्का मारून घ्यावा, परिस्थितीप्रमाणे आपल्याला शरण जावे, आपल्यावर अवलंबून असावे, कायद्याकडे जाऊनही पराभूतच व्हावे, हास्यास्पद बनावे, अगतिक बनून आपल्यासमोर स्वतःला सादर करावे या सर्व पुरुषांच्या इच्छांच्या चौकटीतच स्त्रीचे वर्तन तपासले जाणे, मर्यादीत ठेवले जाणे, हे का? कशासाठी? नुसते भैय्या म्हणून हाक मारल्याने परपुरुषाच्या मनात भाऊ असल्याची जाणीव निर्माणच होत नसेल तर काय? बहेनजी असे म्हणून आपल्याकडे गढूळलेल्या नजरेने पाहणार्‍या पुरुषाचे डोळे फोडावेत असे वाटत असतानाही त्याच्या तोंडातून निदान हाक तरी 'बहेनजी' अशी आली याचे आभार मानत स्त्रीने का जगावे?

स्त्रीची सुरक्षितता पुरुषांवरच अवलंबून असणे आणि ती पुरुषांकडूनच लाथाडली जाणे हा विरोधाभास आपल्या समाजात का आहे? की प्रत्येकच समाजात आहे? मग प्रत्येक पुरुष वाईट असतो का? आपल्या वडिलांसारखे वडील जयाला मिळाले नाहीत म्हणून ती स्वतःला चारित्र्यवान समजते आणि सिमेलियाला बदनाम समजते हा स्त्रीने स्त्रीवर केलेला अन्याय असून त्यात एका स्त्रीचेच अपरिपक्व विचार दिसत नाहीत काय? आणि एवढे असून माझे वडील माझ्या आईच्या हातून मेलेच नसते तर असेच वागत राहिले असते आणि सुरक्षिततेसाठी मी कोणाकडेही धावू शकले नसते या अवस्थेचे काय? नरेशने बोलावले की सजवून धजवून त्याच्यासमोर आपल्याला सादर करणारी आपलीच आई आपल्या वडिलांनी आपल्यावर हात टाकला की चवताळायची, ही मानसिकता कोणत्या थराची आहे? यात दोष पुरुषाचा किती आणि स्त्रीचा किती?

प्रत्येकीवर बलात्कार होतच असतो का? राहुल जयाशी जे वागला ते काय होते? कधीतरी सोळाव्या वर्षी लिंगाचा खरा उपयोग समजल्यापासून बत्तीस वर्षे होईपर्यंत, म्हणजे तब्बल सोळा वर्षे कदाचित ज्याला स्त्रीसुख मिळालेच नाही त्याच्या तावडीत एक हक्काची स्त्री येणे यातून त्याच्या भावनांनी तीव्रतेचा उच्चांक गाठला आणि त्या भावना हळूहळू शमत जातील तसतसे त्याचे खरे वर्तन समजू लागेल अश्या प्रतीक्षेच्या विचित्र काळात एका जयासारख्या स्त्रीने तरी काय म्हणून राहावे? ज्याचे नुकतेच वीर्यपतन झालेले आहे तो पुरुष तरी मनाने स्वच्छ असेल का? प्रियंका आज एकोणीस वर्षांची आहे आणि एखाद्या राजकन्येसारखी चिवचिवाट करत वावरत आहे. तिच्या वयाची असताना आपण नरेशचे अत्याचार सोसून तीन वर्षे झालेली होती. वडिलांनी काही वेळा आपल्याला वापरलेले होते. गडीमाणसांनी ओढत त्यांच्या खोलीत नेलेले होते. इतके होऊनही आई आपल्याला नरेशसाठी नटवतच होती. या असल्या भीषण आणि अमानवी वास्तवापासून आज प्रियंका योजने दूर आहे. पण सिमने ते सोसलेले आहे. नुसतेच सोसलेले नाही तर त्यातून बाहेर पडून तिने अख्खा समाज ढवळून काढलेला आहे. पण आता सिम बदनाम ठरवली जात आहे. आशिष, देव आणि गोयल सिमला हवे तसे वापरून मुक्तपणे फिरत आहेत कारण त्यांना भयच नाही आहे.

मग स्त्री म्हणजे कोण आहे या समाजात? प्रतिकार करू इच्छिणारी पण मानही वर न करू शकणारी हक्काची भोगवस्तू! याची बहिण, त्याची आई, त्याची बायको, ह्याची मुलगी! ओळखच मुळी पुरुषाशी असलेल्या नात्यातून होणारी! थोडक्यात, हिच्या शरीरावर हक्क असलेला किंवा हिच्या इज्जतीची काळजी घेईल असे समजला जाणारा एक तरी पुरुष आहे की नाही यातूनच जिची ओळख होऊ शकते अशी कोणीतरी! तसे कोणीच नसले तर एक शरीर! मग ते सुंदर असो वा नसो, उपलब्ध तर आहे?

जर असहाय्य व्हायचे नसेल तर काय व्हावे? इज्जत सांभाळण्यासाठी आत्महत्याही करायला तयार असलेली एक स्त्री व्हावे? का? अशी काय असते ही इज्जत बिज्जत? की जी नाही सांभाळली की सगळे जणू संपतेच? खरे तर संपत काहीच नाही. मनावर खोल खोल व्रण राहतात, तेही कालांतराने बुजू शकतात. पण लोक जगू देत नाहीत. का? त्यांना काय म्हणायचे असते? की एकदा एखादीचा रेप झाला की ती त्यानंतर फक्त रेपसाठीच उपलब्ध असावी? पुन्हा ओळख म्हणजे शरीरच?

मग जर ओळख म्हणजे शरीरच, तर सिमच्या एकाच फोटोवरून तिचे मंदिर बांधायला निघालेले टवाळ तरुण निदान सच्चे तरी आहेत की? निदान ते रेप तरी करत नाहीयेत? पूजा करत आहेत तिच्या शरीराची!

जर शारीरिक दौर्बल्य आणि सौंदर्य हीच स्त्रीची ओळख आहे तर पुरुषाचीही ओळख कर्तृत्व आणि शौर्य का नाही? हवी आहे ना एखादी कोवळी मुलगी? मग ती तिच्या वडिलांपासून, भावांपासून किंवा नवर्‍यापासून लढून जिंकून दाखवाल? ते नाही. भ्याडासारखे शोषण करणार. गिधाडासारखे लचके तोडणार! आणि तुम्ही लढून जिंकून दाखवल्यानंतर पुन्हा सन्मानाने तिला विचारणार आहात की बाईगं मी तुला जिंकलेल असले तरी तुझी इच्छा नसली तर तुला परत जायचे आहे का? नाही, लांडग्यांसारखे तुटून पडणार! नोकरीला लागून बारा वर्षे झालेला राहुल स्वतःची एक खोलीही बांधू शकत नसताना मित्राच्या खोलीवर जयाशी संबंध करू इच्छितो. लग्नाचा अर्थच त्याच्यासाठी तो आहे. जर सहजीवनाचा अर्थच दोघांसाठी पूर्णतः भिन्न असेल तर दोघांच्या घरच्यांनी त्यांना एकत्र नांदवायला लावणे यालाच काय अर्थ आहे?

नरेश अत्याचार करत असताना ममा आणि पपांचे बाकीचे नातेवाईक कुठे होते? त्यांनी मधे पडावे अशी इच्छाच का झाली नसेल ममाला?

मुलींनी सक्षम बनावे म्हणजे काय करावे? शस्त्र बाळगावे म्हणजे काय करावे? चौघींना दोन मुले छेडत असतील तरी तिथून सटकून जावेसे वाटत असते हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही? एका पुरुषापासून स्वतःला वाचवण्यासाठी दुसर्‍या पुरुषाचीच मदत का घ्यावी लागते? पुरुषाच्याच सहाय्याने पुरुषाच्याच विरोधात आयुष्य का जगावे लागते? नुसते आपले सहज, एक मुलगी म्हणून जगणे अशक्य का असावे? निसर्गाने दिलेला स्त्री जन्म हा मानवी संस्कृतीने स्वतःवरच करता येणार्‍या बलात्कारासाठी का वापरलेला आहे? मग मुली गर्भातच मेल्या तर त्याच्याविरुद्ध कायदे का असावेत? सोनोग्राफी सेंटर्सवर छापे का मारावेत? कोर्टात मुलीला असभ्य प्रश्न का विचारले जावेत? राखी का बांधावी? मुलाला स्वतःचे दूध का पाजावे? सासरीच का नांदावे?

पहिल्यांदाच असे होत आहे की केलेल्या विचारांमधून समाधानकारक उत्तरच मिळत नाही आहे. 'जे जसे आहे तसेच ते स्वीकारायचे आहे' ही येथे येऊन बसण्यामागची भूमिका पहिल्यांदाच निरर्थक वाटत आहे. जितक्या संख्येने 'का' हे प्रश्न आहेत त्याच्या एक टक्काही संख्येने उत्तरे नाही आहेत.

आज या खिन्नतेच्या डोहत बुडताना आपण बाहेरच येऊ शकणार नाही आहोत याची कल्पनाच नव्हती. त्यापेक्षा विचार झटकून रूमवर जाऊन चहा घेऊन पडून राहावे. सगळेच पुरुष नरेश आणि आपल्या वडिलांसारखे नसतील या वेड्या आशेवर उरलेले आयुष्य कंठावे.

=========================

'यू हॅव टू गो टू इगतपुरी' हे वाक्य सकाळी भसीनने ऐकवले आणि दुपारी बॅग भरून नाशिकला पोचून रात्री नीलकमलला स्टे करून जो आत्ता इगतपुरीला जाणार्‍या शेअर टॅक्सीत बसलेली देखील होती. शेअर टॅक्सीची तिची कल्पना होती की अँबेसिडर गाडीत ड्रायव्हर सोडून चारजण बसवले जात असतील. जो मागे बसली होती. तिच्या शेजारी दोन ग्रामीण बाजाचे म्हातारे येऊन बसले. पुढच्या सीटवर ड्रायव्हशेजारी मात्र दोन कॉलेजच्या मुली बसल्या. मधे आणखीन एक पॅसेंजरघेतला गेला जो आता जो ला खेटून बसलेला होता. असेल कॉलेजलाच जाणारा विशीचा पोरगा! कर्कश्श आवाजात कोणतीतरी मसाला गाणी टेपवर लावून गाडी सुसाट इगतपुरीकडे निघाली होती. हातात पर्स आणि क्लेम्सच्या कागदांची लहान बॅग धरून बसलेल्या जो ला गाडीतला तो तंबाखू, गजरे, अनेक दिवसांत न धुतले गेलेले कपडे, गुटखा आणि डिझेलचा संमिश्र वास नकोनकोसा झालेला होता. पॅसेंजर्स इतक्या घाईघाईत बसवण्यात आलेले होते की जो ला हेही विचारायला वेळ मिळाला नाही की मी स्पेशल टॅक्सी केली तर किती पडतील!

गाडी हायवेला लागली आणि जो ला तिच्या छातीच्या डाव्या बाजूवर काही बोटे रेंगाळल्याचे स्पष्ट समजले. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जो विरुद्ध बाजूला असलेल्या दोन ग्रामीण म्हातार्‍यांच्या बाजूला सरकली. पण गाडीच्या धक्क्यांमुळे काही खास फरक पडत नव्हता त्या अश्लील स्पर्शाच्या वारंवारतेत! एकदा जो ने तीव्र नजरेने शेजारच्या मुलाकडे पाहिले. तो बाहेर नजर लावून बसल्याचा अभिनय करत होता. त्याचा स्पर्श आपोआप होत आहे आणि तो तर होणारच की असा त्याचा एकंदर आविर्भाव होता. त्याचे धाडस कमीजास्त होत होते. जो ला अगदीच स्पष्टपणे काही म्हणता येऊ नये म्हणून तो अधूनमधून अगदी सभ्यपणे पोज बदलतही होता. पण त्याच्या हाताची बोटे हळूहळू अधिक धाडसी होत गेली. दहा ते पंधरा मिनिटांतच त्याचा उद्देश तिला नीट समजला आणि तो तिला समजलेला आहे व तरीही ती शांत आहे हे त्यालाही समजले. विचित्र मनस्थितीत जो त्या स्पर्शापासून शक्य तितके लांब राहायचा प्रयत्न करू लागली. तिने पर्स आणि बॅग खाली पायात ठेवण्याचाही आणि दोन्ही हातांची घडी घालण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण तसे केल्यावर त्या मुलाने त्याचा तो हात आपोआप सरकल्यासारखे दाखवत तिच्या डाव्या मांडीपाशी आणला. अजून फार वेळ प्रवास नसणार या आशेपायी अवघडलेल्या जो ने पुन्हा पर्स आणि बॅग उचलून मांडीवर ठेवल्या. त्या मुलाचे धाडस या विचाराने वाढले की या बाईला बहुतेक मांडीला स्पर्श झालेला इतरांना दिसेल म्हणून छातीलाच स्पर्श झालेला हवा आहे.

जो च्या मनात येत होते की स्पष्टपणे सर्वांदेखत त्या मुलाला सांगावे की नीट बस! पण परिणाम काय झाला असता ते कळत नव्हते. मुलगा म्हणाला असता की इतके आहे तर स्पेशल टॅक्सी घ्यायची होतीत. कदाचित ड्रायव्हरच्या ओळखीचा मुलगा असणार होता. कदाचित हे दोन म्हातारे खुसखुसले असते. कदाचित आपण उतरून जाण्याचा निर्णय घेतला तर मागाहून लगेच दुसरी टॅक्सी आलीच असती असे नव्हते. आली असती तरी त्यात किती गर्दी असती हे माहीत नव्हतेच. शक्य तितके अंग आक्रसून जात राहावे हा विचार जो ने केला. वाटेल ते झाले तरी येताना स्पेशल टॅक्सी करायची हे तिचे ठरलेले होते. त्या मुलाचे धाडस वाढत राहिले. आता त्याची बोटे तिच्या डाव्या स्तनावरून गाडीच्या धक्क्यांसोबत निर्विरोधपणे फिरत राहिली. जो ला त्याचा हात छाटून टाकावासा वाटत होता. शेवटी असह्य होऊन ती त्याला म्हणाली...

"नीट बसा"

'आता या मॅडमना काय झाले नवीनच' असा चेहरा करून तिच्याकडे बघत तो मुलगा थोडा सरकल्यासारखा बसला. दोन्ही म्हातारे आणि ड्रायव्हरने जो चे ते बोलणे नीट ऐकले होते. पण रिअ‍ॅक्शन काहीच दिली नव्हती. गाणी तशीच जोरात वाजत राहिली होती. बाकी तिच्या या स्पष्ट बोलण्याचा सूड म्हणून त्या मुलाने बसण्याची पोझिशन अशी काही केली की हरकतही घेता येत नव्हती आणि त्याच्या हाताची मूठ जो च्या छातीवर साईडने अगदी ठामपणे टेकून राहिली. पुन्हा काही वेळाने त्या मुलाने तेच प्रताप सुरू केले. जो चा तीळपापड झालेला होता तो या कारणाने की एकदा त्याला सांगूनही त्याचे धाडस वाढत आहे पण गाडीतले कोणीच त्याला काहीच म्हणणार नाही आहे. गाणी वाजत असतानाच त्या पुढच्या दोन मुलींच्या गप्पा रंगात आलेल्या होत्या. शेजारचे म्हातारेही भसाड्या आवाजात एकमेकांशी बोलतच होते. ड्रायव्हरला अव्याहत मोबाईलवर फोन येत होते आणि तो कोणालातरी सारखा मी कुठे पोचलो आहे, सवारी किती आहेत, परत केव्हा येणार असली तद्दन फालतू माहिती पुरवत गाडी हाकत होता. एकंदर कोणाचेच लक्ष नसलेल्या त्या अवस्थेत या मुलाने जो चा स्तन अगदी व्यवस्थितपणे दाबला आणि उचकलेल्या जो ने खाडकन त्याच्याकडे पाहिले. त्यावर एक घाणेरडे लाळ गाळणारे हास्य चेहर्‍यावर स्थापन करून तो पुन्हा बाहेर पाहू लागला. शेवटी एकदाच्या त्या दोन मुली वाटेत उतरल्या आणि जो ने ड्रायव्हरला ती पुढच्या सीटवर बसत आहे म्हणून सांगितले. पण आता इगतपुरी पाचच किलोमीटर्सवर होती. तो मुलगाही मधे कुठेतरी उतरला आणि शेवटी जो इगतपुरीला उतरून कस्टमरकडे गेली.

पूर्ण दिवस तेथे क्लेम्सवर बाचाबाची करून सेटलमेंट करून जो नाशिकला परतण्यासाठी टॅक्सी शोधू लागली. तिच्या एकंदर स्टँडर्डमुळे तिला आपल्या गाडीत घेण्यास 'य' टॅक्सीवाले तिला आमंत्रीत करत होते. पण तिने स्पेशल टॅक्सी केली. मागच्या सीटवर बसून आणि एकही गाणे लावायचे नाही हे निक्षून सांगत तिने मान मागच्या बाजूला टेकवली आणि खिडकी किंचित उघडी ठेवून येत असलेल्या अतिशय सुखद गारव्यात झोपायचा प्रयत्न करत ती विचार करत राहिली.

पुन्हा पुन्हा तिचे विचार सकाळच्या त्या मुलाने केलेल्या स्पर्शाकडे येत राहिले. सकाळी त्या गोष्टीचा जितका राग येत होता तितकेच आत्ता कुतुहल वाटत होते. आपल्या स्तनावरून एक अत्यंत अनोळखी हात बराच वेळ फिरत राहण्याचा तो अनुभव आत्ता सुरक्षित असलेल्या जो ला एकाचवेळी गढूळ, तिरस्करणीय आणि तरीही हवाहवासा वाटू लागलेला होता. तिला स्वतःचाच राग येत होता. संताप होत होता. पण ती आठवण बेचैनही करत राहिली होती. हे काय होते आहे आणि असे का होते आहे या पलीकडे जो पोचलेली होती. मग तिला हळूहळू समीकरणे जुळत असल्याचा भास होऊ लागला. अर्धवट झोपेच्या पेंगुळलेल्या अवस्थेत असतानाच तिच्या कल्पनाविलासाने त्या अनामिक हाताला नाव दिले. दीपक भसीन! गेले काही दिवसांपासून दीपक भसीनचे सभ्य वर्तन, आपली काळजी घेण्यासाठी रोज गाडी आणि ड्रायव्हर ठेवणे, स्वतःच्या कौटुंबिक आघाडीवर त्याची होत असलेली दैना आणि तरीही कामात कर्तव्यदक्ष राहण्याची जिद्दी वृत्ती या सर्वांमधून आपल्याला भसीन आवडू लागलेला आहे की काय असे जो ला वाटू लागले. हाच हात भसीनचा असता तर आपण काय केले असते असेही वाटू लागले. ही आपली शारीरिक गरज आहे की पुरुषाबाबतच्या आपल्या मानसिक अपेक्षा पूर्ण करणारे व्यक्तीमत्व आपल्याला मिळालेले असल्यामुळे आता शारीरिक पातळीवर त्या व्यक्तिमत्वाचा आपण विचार करू धजत आहोत यावर ती विचार करत होती.

त्या मुलाला अद्दल घडावी असे वाटत असूनही आपण गप्प राहिलो या स्वतःच्या कर्तव्यशून्यतेचा आणि धडाडीच्या अभावाचा मात्र तिला तिरस्कार वाटत नव्हता. खरे तर एरवी तिला या स्वतःच्या वागण्याचाच राग आला असता. पण आज येत नव्हता. कारण समजत नव्हते. आपणही एक स्त्री असून, इतक्या शिकलेल्या आणि बर्‍यापैकी पदावर काम करणार्‍या असून, चांगल्या घरच्या असूनही काही क्षण असे येऊ शकतात की आपणही निव्वळ शारीरिक पातळीवर विचार करू शकतो याचे तिलाच नवल वाटत होते. स्वतःमधील हा बदल जो ला पचत नव्हता. घडनार्‍या घटनांना भसीनचे कृत्य मानण्याचा कल्पनाविलास करणे हा विरंगुळा चुकीचा आहे हे समजत होते, पण भसीनची जादू तनामनावर पसरू लागलेली होती. भसीनने कधी त्याच्या वर्तनात सजेस्टही केलेले नव्हते की त्याच्या मनात काही आहे. त्याच्या मनात काही नव्हतेच. पण आपल्या मनात का इतके सगळे आहे हे जो ला समजत नव्हते. जो ने कुमारिकाच राहण्याची प्रतिज्ञा केलेली नव्हती. कधीतरी आपलेही शरीर एखाद्या योग्य व्यक्तीच्या हाती सोपवावे यात तिला काहीही गैर वाटत नव्हते. पण त्या विचाराला शरीराने कधी स्वतःहून उर्जा पुरवलेली नव्हती. आज शरीरातूनच मागणी होत असल्यासारखे होऊ लागले होते.

हे आवडतही होते आणि नावडतही! पण ते दोन्हीही नियंत्रणात नव्हते. ही मनोवस्था नावीन्यपूर्ण वाटत होती इतकेच! भारावलेल्या मनस्थितीत जो नाशिकच्या नीलकमलला पोचली आणि तिने तश्याच मनोवस्थेत एक एस एम एस टाईप करून भसीनला पाठवला.

'इगतपुरी क्लेम्स सेटल्ड. शॅल बी लिटल लेट टुमॉरो. गुड नाईट'

अकरा मिनिटे तिच्या या टेक्स्टला काहीही रिप्लाय आला नाही. जो ला उदास वाटू लागले आणि उदास वाटण्याचाही राग येऊ लागला. आपण आत्ता इतक्या उशीरा कामाबाबतचा टेक्स्ट पाठवूनही भसीनला त्याचे काहीच सोयरसुतक नसेल तर आपल्याला पाठवले कशाला इगतपुरीला, असे रागीट विचार तिच्या मनाला व्यापत असतानाच त्याचे उत्तर आले.

'गूड जॉब जो, यू आर द मोस्ट ट्रस्टवर्दी पर्सन विथ लव्हिंग नेचर, आय बँक अपॉन यू, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स'

हरखलेली जो कितीतरी वेळ त्या टॅक्सीतल्या मुलासारखा स्वतःचाच हात स्वतःवरून फिरवत राहिली होती...

======================

महाराष्ट्रात कोठे कोणती पिके येतात आणि कधी येतात यावर पाठ झालेले लेक्चर देऊन जया टीचर्स रूममध्ये एकटीच बसलेली होती. विचार राहुल आणि सिम या दोघांनी व्यापलेले होते.

राहुलचे कालचे वर्तन जयाला जरा अतीच वाटले होते. त्यात त्याने प्रवासातून आल्यावर साधा शर्टही बदललेला नव्हता की चूळही भरलेली नव्हती. त्याच्या तोंडाला विचित्र वास येत होता. दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढलेले होते. त्याचे हात जयाच्या सर्वांगावरून घाईघाईने फिरत होते. जो स्पर्श अनुभवण्यासाठी मनाच्या खोल तळाशी जयाने एक खास घटिका जपून ठेवलेली होती तो स्पर्श असा ओंगळवाणेपणाने पुढ्यात आलेला होता. तो नाकारताही येत नव्हता आणि स्वीकारताही! त्या स्पर्शाशिवाय त्या क्षणी राहुलच्या मनात इतर काहीही नव्हते. त्यात अधिकार होता, हक्क होता पण बलात्कारी वृत्ती नव्हती असे जयाला वाटत होते. उलट कचखाऊपणाच होता. चोरून काहीतरी मिळवण्याचा कोल्हेपणा त्यात अधिक जाणवला होता तिला. चला आत्ता चान्स आहे तर मिळतंय तितकं करून घेऊ अशी काहीतरी घाणेरडी घाई होती त्यात! जयाने दिलेल्या ठाम नकारानंतर नुसताच ओसंडलेला वैताग होता. बळाच्या जोरावर ते मिळवण्याचे धाडस नव्हते. लग्नसंस्थेच्या सर्वमान्य पावित्र्याला त्या कालावधीत काहीही महत्व नव्हते. चर्चा नव्हती, अपेक्षांचे संलग्नीकरण नव्हते. हात धरून पुढे जाणे नव्हते, हात धरून ओरबाडणे होते.

जयाला हे सगळे असे नकोच होते. फार वेगळ्या पद्धतीने हे सगळे व्हायला हवे होते तिला. हनीमून पॅरिसला व्हावा असली वेडगळ स्वप्ने नव्हती तिची. पण प्रत्येक गोष्टीला काही खास काळ, स्थळ व संदर्भ असावा अशी किमान अपेक्षा होती. एखाद दोन चुंबने तिनेही अपेक्षित ठेवलेली होती, पण ती टेकडीवर गेल्यास! मित्राच्या रिकाम्या रूमवर अशी घिसाडघाई करणे आणि आत जाताना किंवा बाहेर पडताना सतरा जणांच्या नजरेला तोंड देणे तिला नको होते.

पण हे नीट सांगताही येत नव्हते कोणाला. किंवा सांगून उपयोगही नव्हता. पुन्हा तो एकांतात भेटेल तेव्हा असाच असणार होता, असेच वागणार होता. बाकीच्या गोष्टींवर काय करायचे आहे याची चर्चा कदाचित त्याच्यामते तो शांत झाल्यानंतरच होऊ शकणार होती. आणि अगदी खरे सांगायचे तर आता त्या गोष्टींवर, स्वप्नांवर, भविष्यावर चर्चा व्हावी असे तिला वाटणेच बंद झाले होते कालपासून!

हा आपल्यातील बदल विचित्र आहे हे तिला माहीत होते. हा बदल आत्ता या पातळीला दोन्ही घरांपैकी कोणीही कदापीही स्वीकारणार नाही हेही माहीत होते. पण तो बदल तिच्या नियंत्रणात नव्हता. तो मनातल्या मनात होत होता हे मात्र खरे! सगळे निगेटिव्हच वाटू लागले होते. असे काय खास होणार आहे लग्न करून, असेच मनात येऊ लागले होते. त्यातच सिमने उडवलेल्या तोफगोळ्यांमुळे स्त्री म्हणजे एक शोभेची वस्तूच असल्याचे चित्र उगीचच ठळकपणे निर्माण होऊ लागले होते. वास्तविक त्याचा आणि तिच्या लग्नाचा काही संबंध नव्हता. पण दोन्ही घटना साधारण एकदमच झाल्यामुळे तोही प्रभाव पडतच होता.

खूप विचार करावासा वाटत होता. पुनर्विचार करावासा वाटत होता. तो विचार एकटीने करावासा वाटत होता, त्यात राहुलला सहभागी करून घेण्याची इच्छा होत नव्हती. फार काही झाले होते अशातलाही भाग नव्हता. पण जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा ती अशीच घिसाडघाईने आणि ओरबाडल्यासारखी होईल असेच वाटत होते. स्वप्नवत मीलन ही संकल्पनाच आता स्वप्नवत वाटत होती. एकदा खरंच धीर धरून 'हे लग्न नको' यावर शांतपणे विचार करूयात का असे ती स्वतःलाच विचारत होती आणि स्वतःच स्वतःला परवानगी नाकारतही होती.

ज्या लग्नसंस्थेच्या अभिमानातून तिने स्वतःला इतर रूममेट्सपेक्षा श्रेष्ठ ठरवले होते त्या लग्नसंस्थेचे एक गचाळसे स्वरूप पुढ्यात येऊन त्या नात्याचा आरंभ झाला होता. हा फक्त आरंभच असता तर ठीक होते. पण यापुढेही या संस्थेचा इतकाच अर्थ राहणार असेल तर कशाला हवे लग्न असे तिला वाटू लागले होते.

=========================

सिनियर इन्स्पेक्टर राव होस्टेलच्या कॉन्फरन्समधील भल्या मोठ्या टेबलच्या सेंटरला बसला होता. तीन महिला अधिकारी आणि दोन पुरुष अधिकारी त्याच्या आजूबाजूला बसलेले होते. एका खुर्चीवर पै बसलेला होता तर एका खुर्चीवर सिमेलियासाठी असलेला वकील मेहता! एका खुर्चीवर सोहनी मॅडम बसलेल्या होत्या आणि एका खुर्चीवर बसली होती 'मेघना'! मेघनाने सिमेलियाबद्दलच्या असूयेमधून बातमी फोडली होती की सिमचा त्या दिवशी रेप झालेला होता. सिमच्या रेपची बातमी फुटली तर तिच्या फोटोसेशनमधील हवाच जाणार होती. तिचे करिअर बोंबलणार होते कारण केस आणि मेडिकलसाठी तिला सगळा वेळ द्यावा लागणार होता. वर बदनामी वेगळीच.

आणि आत्ता राव सिमेलियाला त्या दिवशी आशिषकडे काय काय झाले हे तीक्ष्ण डोळे करून एकापाठोपाठ एक अश्या प्रश्नांमधून विचारत होता. सिमने अगदी इत्थ्यंभूत कहाणी सांगितलेली होती, फक्त रेप झाला हे सांगितलेले नव्हते.

सिमच्या नजरेतील धाडसाची चमक पाहून रावही वचकलेला होता. सोहनीबाई तर गलितगात्रच झाल्या होत्या कारण फोटोसेशनपाठोपाठ रेप केसही समोर येते की काय हा विचार त्यांना धडकी भरवत होता. बाकीचे पोलिस अधिकारी सिमच्या चेहर्‍यावरील आणि देहबोलीतील सूक्ष्म बदल टिपत होते व सगळा चाणाक्षपणा पणाला लावून अभ्यासत होते की ती खोटे बोलत आहे की खरे! सिमचा वकील मेहता रावला 'असे विचारू नका, तसे विचारू नका' म्हणत असला तरी राव त्याला गप्प बसवत होता. रावच्या दृष्टीने क्राईम झालेला असल्यास तो रिपोर्ट होणे आणि इन्व्हेस्टिगेशन्स होणे अत्यावश्यक होते. पै मात्र सिमबाबत पूर्ण बेफिकीर होता. तो नेहमीप्रमाणे शून्यात नजर लावून बसला होता. रावची सरबत्ती आत्ता निर्णायक क्षणाला येऊन पोचलेली होती. रावने अपेक्षित घाव घातला सिमवर...

"आणि तू आशिषला किस केल्यावर आशिषने तुला तुझ्या इच्छेविरुद्ध उचलून वर बेडरूममध्ये नेले आणि तेथे चौघांनी तुझा आळीपाळीने रेप केला... राईट??????"

खदखदून हासत सिमेलिया उठली. डौलात चालत चालत रावपाशी आली. रावसमोर झुकून आपली दोन्ही कोपरे टेबलवर टेकवून तिने स्वतःची डीप क्लिव्हेज रावसकट सगळ्यांना दिसेल अशी पोज घेतली. त्या दर्शनानेच निम्मा हॉल बसल्या जागी घायाळ झालेला होता. हासत हासतच डोळा मारत सिमेलिया म्हणाली...

"मी प्रेमासाठी आसूसलेली आहे इन्स्पेक्टर... चार कोवळी मुले माझा काय रेप करणार"

====================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

OH MY GOOOOODDDDD.......................!!!!!!!!!!!

.

भूषण भाऊ...! एक्दम सही...

निली ला पडलेले सर्व प्रश्न खरोखरच अनुत्तरित राहतील असेच वाटत आहे...

हम्म!

भूषण भाऊ...! एक्दम सही... >>> Happy

निली ला पडलेले सर्व प्रश्न खरोखरच अनुत्तरित राहतील असेच वाटत आहे... >>> Sad

मस्त Happy

सही
मोठा भाग पाहून आणी वाचुन बरे वाटले
मागे एक नाटक बघीतले होते, प्रिया तेडूंलकर होत्या त्यात.. त्यात नायीका म्हणते.. बलात्कार होताना आधी राग येत होता.. मग मी कधी enjoy करु लागले मलाच कळले नाही
एका कथेत वाचले होते... नवरा बायकोला म्हणतो..
if you can not avoid it then enjoy it

पु ले शु