अघटीत

Submitted by बहारश्री on 20 January, 2013 - 05:47

अघटीत

मे महिन्याच्या दुपारच्या रणरणत्या उन्हातून आजूबाजूच्या इमारतींकडे पहात तो येत होता. त्याची नजर कुणाला तरी शोधत होती. तो रविवारचा दिवस असल्यामुळे मी आरामात खिडकीत बसून पेपर वाचत होतो.तो शोधक नजरेने येत असताना दूर असूनसुद्धा मी त्याला बरोबर ओळखलं. तीन वर्षापूर्वींच्या माझ्या स्मृती चाळवल्या गेल्या.
तीन वर्षापूर्वी आमच्या कल्याणमध्ये ज्योतिष अधिवेशन भरलं होतं.कॉलेजचं पहिलं
वर्ष संपून सुटी सुरु झाली होती.ज्योतिष विषयात मला काहीही ज्ञान नव्हतं.पण अशा गहन विषयात आपण काहीतरी शिकावं अशी उर्मी होती. ज्योतिष अधिवेशन म्हणजे काय असतं याची उत्सुकता होतीच.त्याच जिज्ञासेपोटी सकाळचं पहिलं सत्र पहिला दिवस पहाण्यासाठी मी उपस्थित राहिलो. कंटाळा आला किंवा आपल्याला समजण्या पलीकडचे आहे असं वाटलं तर झटकन निघून जाता यावं या विचाराने मागल्या खुर्चीत बसलो.दिलेली वेळ सकाळची ९ ची होती.मी ९ ला पाच कमी असताना हजर झालो. स्टेजवर खुर्च्या मांडण्याचं काम सुरु होतं. मी ज्या खुर्चीवर बसलो त्याच्या बाजूच्या खुर्चीत एक दाढीवाला बसला.
“ मी उज्जैनहून आलोय.माझ्याकडे फारसे पैसे नाहीत.तुमच्या गावात एखाद्या धर्मशाळेत मला एकदोन दिवस रहाण्याची व्यवस्था होईल का?” कुठल्याही प्रकारची आर्जव वा विनंती न करता तो बोलला. तो तेज:पुंज दिसत होता. तो ज्ञानी असावा असं समजून मी म्हटलं “ पारनाक्याजवळ रामाचं देऊळ आहे.तिथे धर्मशाळा आहे.तुम्ही तिथे गेलात तर व्यवस्था होऊ शकेल.”
“ इथलं अधिवेशन सुरु व्हायला अजून दीड तास लागेल.तोपर्यत तू ती जागा दाखवायला चल.”
“ तुम्हाला काय माहित अजून दीड तास लागेल म्हणून ?” मी विचारलं.
“ तु स्वत: ज्योतिषी आहेस ?”
“ ह्या विषयात मला काहीही माहिती नाही. केवळ उत्सुकता म्हणून आलो.”
“ मी काही कामानिमित्त इकडे आलो.इथे अधिवेशन आहे हे आज सकाळीच समजलं.
विचार केला, बघूया,तुमच्या कल्याणमध्ये ज्योतिषाची प्रगती कितपत आहे ते.”
“ म्हणजे तुम्ही स्वत: ज्योतिषी आहात ?”
“ बर्यापैकी ज्ञान मिळवलंय मी ह्यात.”
“ मला चांगला गुरु मिळाला ह्या आशेने मी लगेच त्यांना घेऊन राम मंदिराकडे निघालो.जाता जाता त्यांना बोलतं केलं. “ मी मधु पाठक. आपलं नाव ?”
“ रघुनाथ कीर्तने.”
“ आपण ज्योतिष विषय कुठे शिकलात ?”
“ उज्जैनमधेच.माझ्या वडिलांकडून.”
“ आपले वडील उज्जैनलाच असतात का?”
“ ते वारले.”
“ अरेरे ! आपल्याकडे ह्या शास्त्राची काही पुस्तके आहेत का?” मी विचारलं.
“ मी एकही पुस्तक वाचलं नाही.पण वडिलांनी शिकवलेल्या नियमांचा पडताळा पहात पहात शिकत गेलो.”
“ मला तुम्ही शिकवू शकाल का? आपला मुक्काम किती दिवस आहे इथे?”
“ एकतर हा विषय वाचून किंवा अधिवेशनं भरवून शिकता येत नाही.मुळात तुमच्या पत्रिकेत तसे ग्रहयोग असावे लागतात.चांगला गुरु भेटावा लागतो.आणि रात्रीचा दिवस करून शिकण्याची तयारी लागते.”
“ माझी पत्रिका घरी आहे. मी घेऊन येतो दाखवायला.ह्या विषयात मला गती आहे कि नाही हे तुम्ही सांगू शकाल कि नाही?”
“ नक्कीच सांगेन.तूर्त माझी व्यवस्था करून तू अधिवेशनाला जा.आणि ते किती वाजता सुरु होत आहे हे तुझ्या घड्याळाप्रमाणे टिपून ठेव.”
“ माझं घड्याळ रेडिओ टाइमाप्रमाणे लावून ठेवलंय. त्याप्रमाणे मी बघून ठेवीन.”
“ दहा वाजून चौतीस मिनिटांनी तुमचं पहिलं सत्र सुरु होईल.”
मी हादरलो.हा माणूस मिनिटापर्यंत गोष्टीसांगू शकतो म्हणजे साधासुधा ज्योतीशी
नाही.राममंदिरातल्या धर्मशाळेत रघुनाथरावांची व्यवस्था करून मी घरी गेलो नी माझी पत्रिका खिशांत टाकून अधिवेशनाला गेलो. कीर्तने नक्की येणार म्हणून त्यांच्यासाठी शेजारची एक खुर्ची राखून ठेवली. साडेदहा वाजता ते आले व शेजारच्या खुर्चीत बसले. थोड्याच वेळात प्रमुख सूत्रधार माईकसमोर उभा राहिला. मी घड्याळात पाहिलं. दहा वाजून चौतीस मिनिटं झाली होती.माझं लक्ष कीर्तन्यान्कडे गेलं. ते माझ्याकडे बघून हसत होते. व्यासपीठावर बरीच ज्ञानी मंडळी दिसत होती. तीन वक्त्यांची भाषणं झाली. मला जरी त्यातलं काहीच समजलं नव्हतं तरी ते तिन्ही ज्योतिषी विद्वान असणार असं मला वाटू लागलं. परंतु रघुनाथराव मात्र अधून मधून छद्मी हसत होते. त्यांना गर्व झाला असं मला वाटून गेलं. सहाजिकच त्यांच्याबद्दलचा माझा आदर ओसरू लागला. दुपारी दीड वाजता पहिलं सत्र संपलं.
“ मी आता जेवायला जातो.तुही जा जेवायला घरी.” असं म्हणून ते निघाले.
“ माझी पत्रिका आणली आहे तुम्हाला दाखवायला” असं म्हणून मी खिशातली माझी पत्रिका बाहेर काढली.
“ बरं. आण इकडे. आपण त्या कॉर्नरला बसू.” असं म्हणून ते एका कोपर्यांत गेले.खुर्चीत बसून त्यांनी माझी पत्रिका उघडली. “ अरे वा ! भालेरावांनी बनवली वाटतं तुझी कुंडली. तुझी त्यांची काय ओळख?”
“ माझ्या वडिलांचे स्नेही आहेत ते.” मी म्हणालो.
“ हं!” असं म्हणून त्यांनी पत्रिकेतील काही गोष्टी न्याहाळल्या.
बाजूच्या एका stallवरून मी दोन ग्लास लिंबू सरबत घेऊन आलो. त्यांच्या हातात ग्लास देत माझा ग्लास तोंडाला लावणार तोच ते म्हणाले, “ पिऊ नकोस ते.फेकून दे.ज्या लोकांनी ते प्यायलंय त्यांना त्रास होणार.” असं म्हटल्यावर मी दोन्ही ग्लास घेऊन stall वर गेलो.तिकडे काही लोक अस्वस्थ होते. Stall ताबडतोब बंद करण्यात आला. मी कीर्तन्याना विचारलं “ तुम्हाला कसं समजलं हे?”
“ तुला नाही कळणार ते. खरं तर आजच्या सकाळच्या सत्रात ज्या वक्त्यांनी स्वत:चं पांडित्य दाखवलं त्यांच्यापैकी कुणालाही हे सांगता आलं नसतं.”
“ आजचे प्रमुख वक्ते करंबेळकर शास्त्री आहेत.संध्याकाळी त्याचं भाषण आहे.तुम्ही ऐकणार आहात ना त्यांना?”
“ शितावरून भाताची परीक्षा.मला वाटत नाही, ह्या विषयात त्यांची एव्हढी प्रगती असेल. मी काही थांबणार नाही त्यांच पांडित्य ऐकायला.”
“ बरं. मी first year science ला चांगले मार्क मिळवून सेकंइ इयरला अॅइमिशन घेतल्ये. मला doctor व्हायचंय. मी होईन ना doctor?”
“ तू नाउमेद होणार नसशील तर सांगतो.प्रयत्न करीत रहाणं हे जरी आपल्या हातात असलं तरी कोणत्या ध्येयासाठी प्रयत्न करावेत हे जर कळलं तर आपली प्रगती लवकर होऊ शकते. वेळ श्रम पैसा, सर्व वाचू शकतं. यासाठीच ज्योतिष विषयात ज्ञान हवं.”
मी थोडा नाराज झालो. म्हटलं, “ तुम्ही मला योग्य दिशा दाखवा. मी त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करीन.”
“ माझं ऐकणार असलास तरच सांगतो. तुझ्या भल्यासाठीच सांगतो.”
“ सांगा काका, तुम्ही मार्गदर्शन करा. मी प्रयत्नवादी आहे.”
“ doctor होण्याचं स्वप्न तू पाहू नकोस.तू पदवीधरसुद्धा होणार नाहीस. नोकरी मिळवण्यासाठी खटपट कर. चांगली नोकरी मिळेल.”
“ ठीक आहे. सेकंइ इयरची अॅइमिशन घेऊन ठेवली आहे. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करीन. चालेल ना?”
“ येत्या एक जुलई पासून तुला नोकरी मिळेल.बाकी सर्व क्षेम आहे.तीन वर्षांनी मी तुला भेटेन. त्यावेळी मला तुझी गरज लागेल.”
“ मी ज्योतिषी होऊ शकेन ना?”
“ थोडं फार ज्ञान मिळेल तुला.पण ते योग पुढील शतकात येतील. आता जास्त काही विचारू नकोस. मी निघतो.” असं म्हणून ते निघाले. थोडं थांबून ते म्हणाले, “ संध्याकाळी भेट.तिथेच तुझी पत्रिका तुला देईन.”
अधिवेशनाच्या दुसर्या सत्रात जरी मी हजर राहिलो, तरी मनात हुरहूर होती. माझी पत्रिका त्यांनी का ठेऊन घेतली, असं माझ्या पत्रिकेत काय खास होतं, ह्याचा विचार करत राहिलो. शेवटी संध्याकाळी पाच वाजता मी राममंदिरात गेलो. त्यांच्यापुढे चार केळी ठेऊन त्यांना नमस्कार केला. त्यांनी कागदाचा एक चीटोरा वाचायला दिला.
‘ मधु संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी भेटायला येईल.’ असं त्यात लिहीलं होतं. आणि आता तीच वेळ झाली होती. ते हसत म्हणाले, “ भालेरावनी बनवलेली तुझी पत्रिका बरोबर आहे.”
“ काका,उद्या अधिवेशनाचा समारोप आहे.त्यानिमित्त सर्व आमंत्रीतांसाठी भोजनाचा कार्यक्रम आहे. मी आपल्या दोघांसाठी दोन कुपनं आणलीत.” असं म्हणून मी एक कुपन त्याच्याकडे दिलं. “ काय म्हणताहेत तुमचे करंबेळकरशास्त्री?” त्यांनी विचारलं.
“ त्यांच्या भाषणाला वेळ आहे अजून.सर्वात शेवटी आहे त्याचं भाषण. मी चौकशी केली तेव्हां समजलं, कदाचित त्यांना रात्रीचे दहा वाजतील.”
कीर्तन्यांनी विचारलं, “ मग तू जाणार आहेस कि नाही त्याचं पांडित्य ऐकायला?”
“ बघतो. जमलं तर जातो.”
“ जाऊ नकोस.तुमच्या अधिवेशनाचा समारोप आजच होईल. उद्याचं भोजन बिजन विसर आता. तिकडे फिरकला नाहीस तरी चालेल. ”
“ काका, त्या लोकांनी कुपनं वाटल्येत. निदान सहभोजन तरी....”
“ मिळालं भोजन तर जरूर जेव. ही घे तुझी पत्रिका.उत्तम आहे. सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी होतील. तुझं उपद्रवमूल्य काहीच नाही. त्यामुळे तू चांगलं आयुष्य जगशील. तू शतायुषी आहेस. तीन वर्षांनी मी तुला भेटायला येईन. त्यानंतर बघू.”
रघुनाथरावांनी भाकीत केलेल्या सर्व घटना खर्या ठरल्या.त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन वर्षांनी ते मला भेटायला आले.त्यांना माझी गरज आहे असं ते तीन वर्षापूर्वी म्हणाले होते.
बाहेर जाऊन मी त्यांच्या समोर गेलो.मोठ्या आनंदाने त्यांनी माझ्या आगत्याचा स्वीकार केला. “ मधुकर ..तू येणार याची खात्री होती मला. आता तुझ्यावरच माझं सर्व काही अवलंबून आहे.”
“ माझ्या घरी तर चला आधी! असं म्हणत मी त्यांना घरी घेऊन आलो.चहापाणी झालं.
आईवडिलांनी त्यांची ओळख करून घेतली.त्या रात्री ते माझ्याच घरी जेवले नी झोपले.
सकाळ झाली.कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी विचारलं, “ मधुकर, तुला चांगलं पोहोता येतं ना?”
पोहोण्याचा विषय कधीच न निघाल्यामुळे मला आश्चर्य वाटलं. मी पोहोण्यात तरबेज आहे हे त्यांना कसं समजलं हे मला कळेना. ह्या वयात त्यांना पोहणं शिकायचं कि काय असं वाटून मी विचारलं, “ तुम्हाला शिकायचं कि काय पोहायला?...तसं असेल तर आमच्या खाडीवर चला. आज रविवार आहे.माझी मित्रमंइळीसुद्धा आज येतील.त्यांच्याबरोबर आपण जाऊ.”
“ तुमच्या घरात तुम्ही तिघेच रहाता ना?”
“ हो. का बरं ?”
“ तुम्हा तिघांशीही मला थोडं बोलायचंय. तुझ्या आईबाबांना वेळ असेल तर बोलाव जरा.”
काहीतरी सिरीयस आहे याचा अंदाज मला आला.मी लगेच आईबाबांशी डिस्कस केलं. आणि कीर्तने काय सांगतात ते ऐकण्यासाठी जमलो.
“ मी तुम्हाला अपरिचित आहे याची जाणीव आहे मला.तुमच्या मधूला भेटलो होतो तीन वर्षांपूर्वी. त्यावेळी त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला. त्याच वेळी मी त्याला सांगितलं होतं कि मी तीन वर्षांनी येईन म्हणून.तो योग आज आला.”
“ हो बाबा.हे रघुनाथराव कीर्तने महान ज्योतिषी आहेत नी याच प्रत्यंतर मला आलंय.”
माझ्या आईचा ज्योतिषावर विश्वास नव्हता.ती म्हणाली, “ ते काय सांगताहेत ते ऐकून तर घे. मग ठरवू आपण.”
“ हं. ..तर सांगायचा मुद्दा असा कि ...तुमचा मधु पोहोण्यात एक नंबर. नी त्याच्या हातूनच मला जीवदान मिळणार याची खात्री आहे मला.”
बाबा अस्वस्थ झाले. म्हणाले, “ कीर्तनेसाहेब...तुम्हाला वाचवण्याच्या ओघात आमच्या मधूला काही.... “
“ शतायुषी आहे तो.म्हणून तर मी त्याला निवडला.खरा प्रश्न पुढला आहे. ...येत्या तीस तारखेला माझा मृत्यू तुमच्या खाडीत होणार आहे. त्यासाठी तुमचा मधु नी त्याची मित्रमंडळी यांची गरज आहे मला.”
आई चिडून म्हणाली, “ हे तुम्हाला ठाऊक होतं तर तुम्ही इकडे फिरकलात कशासाठी?
आमचा मधु येणार नाही तुम्हाला वाचवायला. आधीच सांगून ठेवते.”
बाबा मात्र शांत होते.मी काय बोलावं हे मला कळेचना.
रघुनाथरावांना माझ्या आईच्या प्रतिक्रियेची अपेक्षा असावी.शांतपणे ते म्हणाले, “मधूच्या आई, तुम्ही रागावू नका.मी काय सांगतोय ते आधी नीट ऐकून घ्या. आजची तारीख पाच.अजून पंचवीस दिवस बाकी आहेत.तुम्हाला विचार करायला पुरेसा वेळ आहे....माझ्या गुरूने मला एक मंत्र दिलाय.मी जर माझ्या मृत्यूला सामोरा गेलो, तरच ह्या मंत्राचा उपयोग करता येईल. म्हणूनच मला हा प्रयोग करायचा आहे.”
मला राहवलं नाही. मी विचारलं, “ ह्या मंत्राचा फायदा काय?”
आईने विचारलं, “ तुमच्या घरच्या मंडळींना का सांगत नाही हे करायला? आमच्या मधूला का अडकवता ह्या तुमच्या मंत्रात?”
“ तुमचं म्हणणं बरोबर आहे.मला आई वडील बहीण भाऊ कुणीही नाही.वाइवइिलार्जीत भरपूर प्रॉपटी माझ्या एकट्याच्या नावावर आहे.अर्थात त्याचा उपभोग घेण्यासाठी मी हे सगळं करतोय अशातला भाग नाही. ह्या संपत्तीचा खरा मालक तुमचा मधुच होणार आहे हे त्याच्या पत्रिकेवरून स्पष्ट दिसतय.”
“ म्हणजे ह्या आमिषाने आमच्या मधूला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात हे उघड आहे.” बाबांनी तोंड उघडलं.
“ चुकीचा विचार करू नका हो तुम्ही.मी माझं आयुष्य पणाला लावतोय.माझ्या सर्व estate चे सगळे कागदपत्र तुम्हाला दाखवायला आणलेत मी. मधूच्या नावे सगळे व्यवहार पूर्ण करतो. हवं तर तुमच्या वकिलाला बोलवून घ्या.सगळ्या कागदपत्रांची छाननी करा. नी मग रुकार द्या.”
बाबांनी विचारलं, “ ठीक आहे.हे सर्व झाल्यावर तुमची पुढली लाईन of action काय?”
“ सांगतो. येत्या तीस तारखेला मी मधुबरोबर खाडीवर पोहायला जाणार.मलाही थोडंफार पोहोता येतं.पोहत असतांना मधु आणि त्याचे मित्र माझ्या आजूबाजूला राहतील. सकाळी दहा वाजेपर्यंत मी जर सुखरूप राहिलो,तर माझा पुनर्जन्म झाला असं समजा. त्यापूर्वीच मी तुम्हाला हवे तसे पेपर्स सह्या करून देतो. शिवाय मी माझं इच्छापत्रसुद्धा मधूच्या नावाने करून ठेवीन. मी त्याचा चुलतमावस काका आहे असं समजा. म्हणजे कायदेशीर बाबी आड येणार नाहीत.”
आईने विचारलं, “ तुम्ही मृत्युंजय झाल्यावर परकायाप्रवेश करणं तुम्हाला सहज शक्य आहे. हे करण्याचा तुमचा हेतू काय?”
“ तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात.मी इंदूरला ज्या ठिकाणी रहातो, त्याच्या जवळच एक घटना अशी घडली कि ती शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. तो तरूण धटटाकटटा असूनही अनुभवी नसल्यामुळे अतिशय हतबल झालाय. सुडाच्या भावनेने तो पेटला असला
तरी काहीही करू शकत नाही. असे अनेक हतबल झालेले लोक मी पाहिलेत. त्यांच्यासाठी परकायाप्रवेश करून मी बरंच काही करू शकतो. लोकांच्या कल्याणासाठीच माझा जन्म झालाय हे माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणीच लिहून ठेवलंय.”
बाबांना चिंता वाटून त्यांनी विचारलं, “ तुमच्या पराकायाप्रवेशाचा वापर आमच्या मधुवर तर होणार नाही ना?”
“ थोड्या कालावधीसाठी होऊ शकेल.पण माझं इप्सित कार्य सुरु झालं कि लगेच मी त्याला मुक्त करीन.”
“ आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा?” आईने माझ्या मनातला प्रश्न विचारला.
“ तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर माझ्याबरोबर इंदूरला यावं लागेल.”
“ तिकडे काय आहे?” बाबांनी विचारलं.
“ माझ्यासमोर घडलेली हकीकत तुम्हाला दाखवतो.” कीर्तने म्हणाले.
आईला ती हकीकत ऐकण्याची इच्छा झाली. ती म्हणाली, “ तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही पाहिलेली हकीकत सांगा.आमचा विश्वास बसला तर इंदूरला जाण्याची जरुरी नाही.”
कीर्तने म्हणाले, “ ठीक आहे.ऋशिकेश कानडे हे नाव तुम्ही ऐकलं का?...त्यांच्याकडून मला पराकायाप्रवेशाची दीक्षा मिळणार आहे. आता ते खूप थकलेत.आता ते हा प्रयोग करीत नाहीत. पुढे त्याचं काय होणार आहे ते मला ठाऊक नाही. परकायाप्रवेश करतांना त्याचं शरीर निष्प्राण होतं. त्यामुळे त्यांना थोड्या कालावधीसाठी हा प्रयोग करावा लागतो.
मी मात्र माझ्या शरीराचा त्याग करून मला हवं ते शरीर निवडणार आहे. ते असो... तर मी काय सांगत होतो....कानइेसाहेबांनी माझ्यासमोर एका तरुण मुलाला खुनाच्या आरोपातून सोडवलं. अर्थात तो निर्दोष होताच. पण काळदाते नावाच्या वकिलाच्या शरीरात प्रवेश करून त्या अमर शिंदेची सुटका केली. अमर शिंदे नी काळदाते दोघेही ठणठणीत आहेत. त्या दोघांना आपण भेटू शकतो.पण हा चमत्कार कसा झाला ते त्यांना सांगता येणार नाही.”
“ तुमचं हे कथानक विस्तारपूर्वक सांगितलंत तर विश्वास बसण्यालायक उलगडा होईल.”
मी म्हटलं नी आईनेसुद्धा दुजोरा दिला.
अमर शिंदेचा फौजदारी खटला न्यायालयात उभा राहिला.

FLASH BACK.

ठिकाण फौजदारी न्यायालय.वेळ सकाळी साडेदहाची.संबंधित वकील हजर आहेत.आरोपीच्या पिंजर्यात अमर उभा आहे. न्यायमूर्ती आल्यावर सर्वजण उभे रहातात.जाग्यावर बसल्यावर टेबलावरील पेपरांवर नजर टाकतात. इतर मंडळी आपापल्या जागांवर बसतात. न्यायमूर्ती म्हणतात, “ please proceed.”

सरकारी वकील : माय लॉर्ड, आरोपी अमर शिंदे पिंजर्यात उभा आहे. पोलीस कस्टडीमध्ये असतांना त्याने इन्स्पेक्टर जाधव यांचा खून केला.म्हणून कलम ३०२ खाली त्याला फाशी व्हावी अशी पोलीस खात्यातर्फे विनंती करण्यात आली आहे.
न्याय : आरोपीचे वकील कोण आहेत?
काळदाते : माय लॉर्ड, मी आहे. आरोपीच्या बाजूने मी आपणास काही सांगू इच्छितो.
न्याय. : काळदाते...तुम्ही? प्लीज प्रोसिड.
काळदाते : thank यु माय लॉर्ड. आरोपी अमर शिंदे हा खरा गुन्हेगारच नाही. त्याच्या वडिलांचा मृत्यू म्हणजे गणपत शिंदे यांचा मृत्यू दोन महिन्यापूर्वी सेवाधाम पोलीस स्टेशनमध्ये गळफास लावून घेतल्यामुळे झाला होता. ते निरपराध असल्याची खात्री आरोपीला होती. शिवाय ते आत्महत्या करूच शकणार नाहीत असा विश्वास अमर आणि त्याच्या आईला होता.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येची बनावट केस करून त्यांचा खून केला अशी आरोपीची धारणा होती.त्या द्रीष्टीने तो पोलीस चौकीत व संबंधित डॉक्टर वगैरे लोकांच्या संपर्कात होता.हि माहिती मयत इन्स्पेक्टर जाधव यांना मिळाली. अमर हा मुलींची छेडछाड करतो अशा खोट्या आरोपाखाली जाधवांनी त्याला ताब्यांत घेतलं. नी थर्ड डिग्रीचा वापर केला. आरोपी अमर तरुण असला तरी त्याने कुठल्याही तरुणीची छेड काढली नाही. तो अत्यंत सरळ स्वभावाचा आणि सत्शील आहे.पोलिसांच्या बेदम मारण्यामुळे त्याचं तरुण रक्त उसळलं नी रागाच्या भरात त्याने इन्स्पेक्टर जाधव यांच्या छातीत ठोसा मारला. त्यांत जाधव मरण पावले.
न्याय : { सरकारी वकिलाकडे बघत } आरोपीला फाशी द्यावी असं पोलिसांना का वाटतं ?
स.व. : आरोपी प्रवृत्तीने अतिशय गुंड आहे.कस्टडीमध्ये येणाऱ्या व असणार्या इतर आरोपींनासुद्धा तो विनाकारण मारतो व त्रास देतो.त्याच्या अंगात अमानुष ताकद आहे.त्याला जर फाशीऐवजी जन्मठेप झाली तर कुठल्याही जेलरला तो डोकेदुखी होऊन बसेल.
न्याय : { आरोपीकडे पहात } अमर शिंदेच ना आपण ? { तो मानेनेच होकार देतो.} गुन्हा मान्य आहे?
अमर : आपली परवानगी असेल तर थोडा इतिहास सांगण्याची माझी इच्छा आहे.
न्याय : त्या आधी तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे की नाही?
अमर : होय साहेब !
न्याय : ठीक आहे.म्हणजे गुन्हा तुम्ही नाकबूल करीत नाही.
काळदाते : माय लॉर्ड, इन्स्पेक्टर जाधव यांना ठार मारण्याचा इरादा आरोपीचा नव्हता.सहनशीलतेचा अंत झाल्यावर उत्स्फूर्त होणारी ती एक प्रतिक्रिया होती.
न्याय : आरोपीला काहीतरी सांगायचं आहे.लेट अस हियर. हं. बोला शिंदे.
अमर : आभारी आहे साहेब. आमचं सोन्यासारखं पाच एकराचं शेत आहे साहेब.त्या शेतातून आम्हाला दरवर्षी चांगलं उत्पन्न मिळतं. मयत जाधव आमच्याच गावचे. त्यांच्या शेताकडे त्यांचं फार दुर्लक्ष होत असे. त्यामुळे त्यांना विशेष आवक नव्हती.त्यांचं आमच्याकडे जाणंयेणं होतं. माझे वडीलसुद्धा त्यांच्याशी चांगले संबंध ठेऊन होते. मयत जाधवांचा आमच्या शेतावर डोळा होता. काहीही करून आमची जमीन त्यांना स्वस्तात हवी होती. त्यांना ते जमेना. माझ्या वडिलांना त्यांनी खूप विनवण्या केल्या. आमची जमीन विकायचीच नव्हती तर आम्ही कशी देणार?...म्हणून जाधवांनी माझ्या वडिलांना खोट्या आरोपाखाली अटक केली. तरीही माझे बाबा बधले नाहीत. म्हणून त्यांना ठार मारून त्यांच्या आत्महत्येचा बनाव केला. मी आणि माझ्या आईने सरकार दरबारी न्याय मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण जाधवांच्या कारवायांमुळे काहीच उपयोग झाला नाही. आमच्या जमिनीचा मी एकुलता एक वारस.शिवाय मयत जाधवांच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्याच्या खटपटीत होतो. म्हणून मलासुद्धा जाधवांनी खोट्या आरोपाखाली अटक केली आणि अतिशय जबरदस्त मार दिला.तो सहन न होऊन मी एकच ठोसा त्यांच्या छातीवर मारला.त्यातच ते आडवे झाले. त्यांना ठार मारण्याचा माझा इरादा नव्हता.
न्याय : प्रायमाफेसी सरकारची बाजू लंगडी दिसते. नीट स्टडी करून पुढील तारखेला तुमचं स्टेटमेंट द्या.
काळदाते : माय लॉर्ड, एक विनंती. ...हा नकळत घडलेला गुन्हा आहे. आरोपीचं पूर्वीचं वर्तन अजिबात आक्षेपार्ह नाही. व तो तरुण आहे. हे विचारात घेऊन त्याची जामिनावर सुटका करावी अशी प्रार्थना आहे.
न्याय : ह्या मुलाबद्दल चांगल्या वर्तणुकीची हमी हवी. आणि जर कुणी जामीन द्यायला तयार असेल तर मी स्वत: तपासून जामिनीचा विचार करीन. Now the court is adjourned.

रघुनाथराव कीर्तने बोलायचे थांबले.पाणी पिऊन त्यांनी पुन्हा सुरुवात केली.
“ काळदाते वकील ही काय चीज आहे हे ठाऊक नसल्यामुळे मी काय सांगतोय त्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. ते नॉर्मल असते तर त्यांनी ही केस घेतलीच नसती. भरपूर पैसे आधी घेतल्याशिवाय ते कोर्टात हजर होतच नाहीत. अमरला सोडवण्यासाठी त्यांनी जी मेहेनत घेतली त्याला तोड नाही. ही कामगिरी त्यांच्याकडून ऋशिकेश रानड्यांनी कशी करवली त्याची हकीकत सांगतो.

FLASH BACK.
पोलीस कस्टडीत अमर शांतपणे एक पुस्तक वाचत बसला होता.एका ठा॓शातच इन्स्पेक्टर जाधवला ठार मारल्यामुळे त्याची कीर्ती सर्व पोलीस ठाण्यात व सर्व कैद्यांना माहित झाली होती. त्यामुळे त्याच्या वाटेला जाण्याची हिम्मत कुणीच करत नव्हता. त्याच्याजवळ एक हस्तसामुद्रिक कैदी आला. आणि त्याने विचारलं, “ कुठलं पुस्तक वाचतोस बाळ?”
अमरने चमकून बघितलं. त्याच्या जवळपास कुणीही फिरकत नसतांना हा आगंतुक माणूस आपल्याजवळ येऊन विचारतोय हेच त्याच्यासाठी खूप होतं.
“ पुनर्जन्म ही कादंबरी वाचायला मिळाली.मोठी विलक्षण आहे.” अमर बोलला.
“ तुला संजीवनी विद्या ऐकून माहिती असेल.”
“ होय. असं ऐकलय कि ही विद्या आत्मसात झाली की माणूस अमर होतो. पण तुम्ही असं का विचारलत?”
“ कारण त्या विद्येचा शोध घेत मी आलोय. ती विद्या नसून एक वनस्पती आहे.ती कुठे मिळेल याचा शोध लागलाय. ती शोधायला थोडा वेळ लागेल, पण त्यासाठी मला इथून बाहेर पडावं लागेल.”
“ काय सांगता?....आपलं नाव काय?..आपण कुठून आलात आणि इथे पोलिसांच्या तावडींत कसे सापडलात?”
“ हो हो.सगळं सांगतो.पण तुझे दोन्ही हात दाखव बघू आधी.”
अमरने दोन्ही हात शर्टवर पुसून त्यांना दाखवले.जानव्याला अडकवलेलं भिंग काढून त्यांनी अमरच्या हाताचं निरीक्षण केलं.
“ मला जामीन मिळेल ना?” अमरने त्याच्या शांततेचा भंग केला. इतरही कैदी आता त्या दोघांच्या जवळ येऊ लागले. नवीन आलेला कैदी हस्तरेषातद्न्य असणार असं समजून बाकीचे कैदीही आपापले हात साफ करू लागले.
“ तुझी लवकरच सुटका होणार. मी आजच सुटेन. आपण त्यानंतर बाहेर भेटू. नाव काय तूझं
नी रहातोस कुठे?”
“ मी अमर शिंदे.इथे जवळच....दोन कोसांवर जत गाव आहे.तिथेच रहातो. पण आपण कोण?”
“ मी ऋशिकेश रानडे.इंदूरहून ह्याच वनस्पतीच्या शोधात आलो. इथे एक हनुमान मंदिर आहे टेकडीवर. त्याच्या जवळपास ही वनस्पती असावी असा माझा कयास आहे.”
“ तसं असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. माझी सुटका झाली तर नक्कीच!”
“ तुझ्याशी बरंच काही बोलायचंय. पण इथे नाही.”
तेव्हढ्यात एक पोलीस हवालदार कानडयांना घेऊन गेला. “ आमच्या साहेबांनी बोलावलंय तुला”
असं म्हणून सब इन्स्पेक्टरच्या रूममध्ये गेला. आत गेल्यावर सब इन्स्पेक्टर राणे उठले. आणि
‘ बसा साहेब’ असं म्हणून हवालदाराला म्हणाले, “ अरे तीनशे साठ, ह्यांना कशाला पकडलं?
अकला गहाण टाकल्या का तुम्ही? दोन चहा सांग ताबडतोब. कानड॓साहेब, माफ करा हं. चुकून तुम्हाला ....”
“ ते ठीक आहे. पण मला पकडण्याचं कारण कळेल?”
“ सांगितलं ना साहेब....आमची चूक झाली. तुम्ही त्या बोरकर वकिलाकडे आला होता ना?..
त्यांचा फोन आला. तुम्ही नामांकित हस्तमुद्रिक आहात असं कळलं.”
तेव्हढ्यात चहा आला.दोघेही चहा पीत असतांना राण्यांनी स्वत:चे हात कानडयांपुढे केले.
“ साहेब बघता का जरा माझे हात....चहा होऊ द्या तुमचा. तुम्हाला बोरकर साहेबांच्या घरी नेऊन पोहोचवतो आमच्या जीपमधून.”
कानडयांचा चहा झाल्यावर एका हवालदाराने त्यांची पिशवी आणून दिली. पिशवीत सगळ्या वस्तू आहेत ना याची खात्री झाल्यावर त्यांनी राण्यांचे हात भिंगाने पहायला सुरुवात केली. पहातापहाता,
“ घरची लक्ष्मी रागावलेली दिसत्ये” असं म्हणाले.
“ राण्यांनी कबूल केलं. “ जरा चुकलंच आमचं. जरासं मारलं तिला. माहेरी निघून गेली.”
“ चूक मान्य आहे ना तुम्हाला?...तुमची चूक मान्य करून सन्मानाने परत आणा तिला. एक महिन्याच्या आत बढती होईल तुमची. मोठ्या भाग्याची पोर आहे ती.तिला कधीही दुखवू नका.”
“ आभारी आहे साहेब मी. आजच जातो नी माफी मागून माघारी घेऊन येतो तिला. चला, तुम्हाला सोडतो बोरकरांकडे.” असं म्हणून दोघेही उठले. बोरकरांकडे कानडयाचं स्वागत झालं. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल राण्यांनी दोघांची माफी मागितली. राणे निघतांना कानडे म्हणाले, “ तुमचा कैदी अमर शिंदे.....त्याचा हात मी बघितलाय. तो निरपराधी आहे.जमलं तर त्याला जामिनावर सोडवा. त्रास देऊ नका त्या बिचार्याला.”
“ पण साहेब, त्याने खून केलाय. आमच्या जाधवसाहेबांना ठार मारलं त्याने. त्याला जामिनावर कसा सोडवणार?”
बोरकरांना अमर शिंदेची केस ठाऊक होती.ते राण्यांना म्हणाले, “ मिस्टर राणे, तुम्ही इथे नवीन आलेले दिसता. अमरने जाधवांना मारलं हे जरी खरं असलं, तरी न्यायमूर्तींनी, अमरला योग्य जामीन मिळाल्यास सोडू, असं म्हटलं आहे. तुम्ही त्याचे केसपेपर नीट वाचा, म्हणजे कळेल तुम्हाला.”
“ बरं साहेब, वाचतो मी त्याची फाईल. निघू?” असं म्हणून राणे बाहेर पडले.

हे ऐकत असतांना मधूला रहावलं नाही. त्याने विचारलं,“ कानडे हस्तसामुद्रिक तद्न्य आहेत का?”
“ ते तर सगळ्याच बाबतीत तद्न्य आहेत.एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, अॅडव्होकेट
काळदाते यांच्या शरीरात कानडयांनी प्रवेश केल्यामुळेच हे शक्य झालं. पुढली कथा तर तुम्हाला ऐकाविशीच वाटेल अशी आहे.”
FLASH BACK

न्यायाधीश दंडवते त्यांच्या चेंबरमध्ये सिगारेट ओढत पेपर वाचत होते. काळदाते वकील बिनधास्त आत गेले नी अदबीनं म्हणाले, “अमर शिंदेच्या केससंबंधी थोडं बोलायचं होतं.”
“ बसा आणि बोला.”
“ साहेब... ऑफ द रेकोर्ड... मयत जाधव अट्टल दारुडे होते.दारूच्या नशेत त्यांनी अमरला गुरासारखं बडवलं. तो अमर, तरुण व ताकदवान होता म्हणून एव्हढा मार सहन करू शकला.
विनाकारण मार सहन करणं त्याच्या संयमापलीकडे गेलं नी त्याचा एकच ठोसा जाधवच्या मृत्यूला कारणीभूत ठरला हे जरी खरं असलं, तरी दारूच्या व्यसनापायी जाधवचं शरीर नी मन खिळखीळं
झालं होतं. त्यामुळे इन्स्पेक्टर जाधव कुठल्याही क्षणी मरण्याच्या दारात होता. अमरचा ठोसा हे फक्त निमित्त ठरलं.”
दंडवते हसत म्हणाले, “ काळदाते...एकतर तुम्ही स्वत: डॉक्टर नाही. पोस्टमारटेम रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, छातीवरील वर्मी घावामुळे जाधव मेले. अशा परिस्थितीत तुमच्या बोलण्यावर कोर्ट विश्वास कसा ठेवणार?”
“ ही शंका अपेक्षित होती. हा पटवर्धन डॉक्टरांचा रिपोर्ट बघा. ....जाधवांच्या मृत्युच्या दोन दिवस आधीचा हा इशारा आहे. त्यांत पटवर्धनांनी स्पष्ट म्हटलंय की, जाधवांचं लिव्हर, हार्ट, आणि लंग्ज अतिशय नाजूक झालेत.चांगल्या हॉस्पिटलमध्ये treatment घेणं जरुरी आहे. मी स्वत: डॉक्टरांना भेटलो. त्यांनी मला सांगितलंय की दारू आणि सिगारेट पिणं बंद न केल्यास त्यांची जबाबदारी स्विकारणं कठीण आहे.”
“ असं जर आहे, तर सिव्हील हॉस्पिटल असा रिपोर्ट कसा देऊ शकतं ?”
“ कावळा बसायला नी फांदी मोडायला एक गाठ अशातली गत आहे ही. शिवाय एका य:कश्चित कैद्याकडून पोलीस इंस्पेक्टर मारला जातो,ही घटना तीखठमीठ लावून सिव्हील हॉस्पिटलच्या डॉक्टरला सांगितली गेली असेल अशी शक्यता दाट आहे. त्या डॉक्टरवरही दबाव आणला गेला असेल अशी शक्यता आहे.”
“ कोण आहेत ते सिव्हील सर्जन ?”
“ डॉक्टर भानुसे.”
“ ते जर त्यांच्या रिपोर्टवर जास्त भाष्य करू शकत असतील तर......”
“ मी जाऊन भेटतो त्यांना.हा रिपोर्ट दाखवल्यावर त्यांनी दिलेला पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट न बदलता मयत जाधवच्या शारीरिक अवस्थेबद्दल जर त्यांनी महत्वाचे मुद्दे दिले तरच आपल्यापुढे मांडणं
औचित्याचं ठरेल.”
“ तुम्ही योग्य तेच कराल अशी खात्री आहे माझी.”
“ तसं झालं तर दौलतरावांचा जामीन मान्य कराल ना ?”
“ अपोक्षेप्रमाणे रिपोर्ट मिळाला तर जामीन कोण रहातो ह्याला महत्व नाही. फक्त तो रिपोर्ट आम्हाला जामीन मंजूर करण्यापूर्वी वाचायला मिळावा.”
“ thank you साहेब. येतो मी.”

आता बाबांनाही गोष्टींत रस वाटायला लागला. त्यांनी विचारलं, “ मग कानडेसाहेब गेले का भानुसे सर्जनकडे ?”
बाबांचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसतोय हे बघून कानडयांना बरं वाटलं. ते म्हणाले “ हो. काळदात्यांच्या रुपात कानडे गेले भानुश्यांकडे. ऐका पुढे काय झालं ते.
FLASH BACK

डॉक्टर भानुसे यांची चेंबर. टेबलावर बरेच रिपोर्ट्स पडलेत.विचारांच्या तंद्रीत हातात घेतलेली तंबाखू मळणं चालू आहे.चांदीची डबी टेबलावरच आहे. एव्हढ्यात ‘ येऊ का डॉक्टर?’ म्हणत काळदात्यांनी
प्रवेश केला.
“ या या वकीलसाहेब, तुम्ही फोन करून आलात ते बरं झालं. त्यानिमित्ताने मला थोडी उसंत मिळाली.” असं म्हणून त्यांनी चांदीची डबी पुढे केली.त्या डबीवरील नक्षीकाम पहात काळदाते उभे.
“ आमच्या आजोबांची ही आठवण.”
“ तरीच ! अशी डबी हल्ली पहायला मिळत नाही. नशीबवान आहात.”
“ काय ? कसं येणं झालं आमच्याकडे ?”
“ तुम्ही दिलेल्या पोस्ट मारटेम रिपोर्टची आणि डॉक्टर पटवर्धनांच्या रिपोर्टची कोपी आणल्ये तुम्हाला दाखवायला.” असं म्हणून दोन्ही रिपोर्ट्स टेबलावर ठेवले. ते पहात असतांना डॉक्टरांना मयत जाधवांचा चेहेरा आठवला. त्यांचे चार हवालदार त्यांच्या घरी रात्री साडेबाराच्या सुमाराला आले होते. व त्यांना अर्जंटली पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट हवा होता. अमर शिंदेच्या मारहाणीमुळे इंस्पेक्टर जाधव मेले हे त्या शिपायांनी तिखटमीठ लावून सांगितलं होतं. त्या अमरला चांगलीच अद्दल घडावी असा आग्रहही करण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्षात काहीही तपासणी न करता त्या अपरात्री पोलिसांना हवा तसा रिपोर्ट त्यांनी दिला. साहजिकच डॉक्टर पटवर्धनांचा रिपोर्ट पाहिल्यावर त्यांना त्यांची चूक कळून आली.आपण कशी प्रतिक्रिया द्यावी हे डॉक्टरांना सुचेना.
अनुभवी काळदाते समजले. स्वत: पुढाकार घेऊन दिलासा देण्याचे द्रुष्टीने ते म्हणाले, “ you need not change your report. If you can give your supplementary document…”
“ वकीलसाहेब....आता मयत माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण मी चांगलाच ओळखत होतो जाधवला. दारू सिगारेट एव्हढ्यावर त्याचं भागलं नाही. चरस, गांजा, अफू... फुकट मिळेल ते सर्व खायचा. माझ्याकडे तो एकदाच आला होता. ह्या चांदीच्या डबीवर त्याची नजर होती त्याची. ह्या डबीच्या बदल्यात एका सुंदर तरुणीला पाठवण्याचं त्याने स्वत:हून ठरवलं.मी अर्थातच नकारदिला.”
“ म्हणजे त्या इंस्पेक्टरबद्दल तुमच्या भावना चांगल्या नव्हत्या तर. तरीसुद्धा तुम्ही...”
“ माझी चूक आता मला कळली. डॉक्टर पटवर्धनांसारखा देवमाणूस जाधवांबद्दल असं लिहितोय याचाच अर्थ जाधवांचे दिवस भरले होते हे स्वच्छ दिसतंय.तरुण शिंदे फक्त त्यांना फक्त संपवायला कारणीभूत झाला. ....काळदाते...तुम्हाला अपेक्षित रिपोर्ट तुम्ही ड्राफ्ट करा. मी नजर टाकतो. व माझ्या भाषेत स्वत: लिहून देतो. एकच विनंती. ...माझा आधीचा रिपोर्ट न बदलता किंवा कुठल्याही पद्धतीने सिव्हील हॉस्पिटलचं नाव खराब न होता रिपोर्ट बनायला हवा.”
“ thank you very much डॉक्टर! मी नीट विचार करून, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन टाईप केलेला मजकूर पाठवून देईन. त्यात मेडिकल शब्द वापरून तुमचा फायनल रिपोर्ट झाला कि मला फोन करा. मी स्वत: येऊन घेऊन जाईन. निघू मी?”

रघुनाथराव बोलायचे थांबले.
“ अमर शिंदे सुटला का?”
“ अर्थातच! जामीन तर त्याला मिळालाच.कालांतराने त्याची निर्दोष मुक्तता झाली. अशा कितीतरी
गुंतागुंतीच्या केसेस माझ्या पाहण्यात आहेत. आणि मला खात्री आहे...मला जर तो मंत्र मिळाला तर कित्येक लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न मी करीन. पण तुमचं सहकार्य मिळालं तरच शक्य आहे.”
मधूच्या आईची खात्री पटत चालली होती.तरीसुद्धा ती म्हणाली, “ तुमचे पेपर्स आमच्याकडे देऊन ठेवता का? आमच्या माहितीत ओंक नावाचे चांगले वकील आहेत. त्यांना मी दाखवून घेते.”
“ खुशाल ठेवा हे पेपर्स तुमच्याकडे. मी तुमच्या वकिलाची फीसुद्धा देईन. बरं. तर येऊ मी?”

शेवटी मधुकर आणि त्याच्या आईवडिलांनी रघुनाथरावांना मदत करण्याची तयारी दाखवली. तीस तारखेला ठरल्याप्रमाणे मधूच्या मित्रांसह रघुनाथराव खाडीवर पोहायला गेले. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले.पण त्यांचा देह मात्र खाडीत बुडाला. त्यांच्यापैकी कुणीही रघुनाथरावांना
वाचवू शकलं नाही. पोलिसकेस झाली.मधूच्या घरी अवकळा पसरली.त्याच्यामागे शुक्लकाष्ट सुरु झाली. मधूने घडलेली सर्व हकीकत पोलिसांना कथन केली. घरच्या लोकांच्या जबानीत त्याच्या बोलण्यात खरेपणा दिसून आला. शिवाय ओंकवकिलांनासुद्धा रघुनाथरावांनी सांगून ठेवलं होतं. त्यामुळे मधूची सुटका झाली. पण त्याला चैन पडेना.रघुनाथराव इतक्या सहजासहजी नियतीपुढे हार मानतील असं त्याला वाटत नव्हतं. इंदूरला जाऊन ऋशिकेश कानडेंना भेटण्याची त्याला तीव्र इच्छा झाली. त्यांचा पत्ता मधूला ठाऊक नव्हता. पण इतका मोठा थोर माणूस सापडायला कठीण जाणार नाही असा मनाचा कौल घेऊन तो इंदुरसाठी निघाला. स्टेशनवर उतरल्याबरोबर त्याच्यासमोर दादू नावाचा एक वयस्कर माणूस आला. “ मधु...तू येशील याची खात्री होती.”
आवाजावरून मधूने ओळखले. “ रघुनाथराव तुम्ही ?”
“ हो. तू अगदी बरोबर ओळखलस. तूर्त तू मला दादू म्हण. आमच्या वाड्यात जाईपर्यंत तू काहीही बोलला नाहीस तरी चालेल. फक्त माझ्या पाठोपाठ चल.”
इंदूरच्या मखमली तलावाजवळ एका मोठ्या वाड्यात दादुच्या मागोमाग मधूने प्रवेश केला. प्रचंड मोठ्या दिंडीदरवाज्याला एकावेळी एकच माणूस जाईल एव्हढं लहान दार होतं. आतमध्ये सामसूम होती. पण अंगण स्वच्छ दिसलं. ओटीवरून माजघरात प्रवेश करतांना माणसांचा इथे वावर असावा असं त्याला वाटलं.
“ मधुकर घाबरू नकोस. बस ह्या सोफ्यावर आरामशीर. तुझ्यासाठी पाणी आणतो.” आत जातांना त्याने रमाबाईना सांगितलं “ रमाबाई, साहेबांचे पुतणे मधुकर पेठे आलेत. त्यांना घेऊन मी वर जातोय. चहा आणि बिस्कीटं तयार ठेवा. मी घेऊन जाईन.” काचेच्या सुंदर ग्लासातील स्वच्छ पाणी पिऊन मधु दादूबरोबर माडीवर गेला.
“ रघुनाथराव, इथे आल्यापासून घरी फोन केलाच नाही मी. आता माझ्या सेलवरून फोन करतो.
मग आपण बोलू.”
“ मधु...विसरू नकोस.माझं नाव दादू आहे.मला त्याच नावाने हाक मार. घरच्या लोकांना मी भेटलो असं सांगू नकोस. ते का ? हे मी सविस्तर सांगेन. हं लाव फोन.”
सेलवर बराच वेळ लाईन मिळेना. म्हणून दादुने त्याला तिथला घरचा फोन दिला. स्वत:ची ख्याली खुशाली कळवल्यावर त्याला बरं वाटलं. मालकांचे पुतणे म्हणजे वारसदारच. हे समजल्यावर पोहे चहा आणि बिस्कीटं आणली. जाता जाता दादुने रमाबाईना “ आता घरी गेलात तरी चालेल. रात्रीचं
ठरवू काय ते.” असं म्हणून त्यांची बोळवण केली.
“ तू फार उत्सुक असशील माझ्याबाबतीत. तुम्हा सर्वांना वाटलं की मी मेलो. अर्थात तसं वाटणं साहजिकच आहे. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास सोसावा लागला. खरच मी दिलगीर आहे.”
“ पोलिसांचा ससेमिरा आमच्या मागे लागला. आम्हीच तुम्हाला बुडवलं असा त्यांचा वहीम होता.
नशिबाने पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आमच्या विरुद्ध गेला नाही. ओंकवकिलांनी पोलिसांना खरी हकीकत सांगितल्यावर त्यांनी आमची सुटका केली.”
“ त्यामुळे तर तुम्ही सुटू शकलात. मी सांगून ठेवलं होतं त्यांना.”
“ तुम्हाला मी दादू का म्हणायचं?”
“ दादू म्हणजे आमच्या घरचा नोकर.गेली पन्नास वर्ष तो आमच्याकडे होता. त्याचं लग्न झालेलं नाही. त्याला जवळचे कुणीही नातेवाईक नाहीत. मी देहदान केल्यावर माझा आत्मा कानड्यांकडे गेला. ताबडतोब कुठलाही देह मला स्वीकारायला हवा असं त्यांनी सांगितल्यामुळे स्मशानात पोहोचणार्या एका मृत शरीरात मी प्रवेश केला. नेणाऱ्या सर्वांची धावाधाव झाली. मी तिथून पळालो
नी आमच्या वाड्यात गेलो. दादू अत्यवस्थ होता. घरात कुणीही नव्हतं. मी दादुच्या शरीरात प्रवेश केला. आणि नेहेमीप्रमाणे दादुचं काम सुरु ठेवलं. तसाच लगोलग कानड्यांना भेटलो. कानडे म्हणाले, “ तुला दिलेल्या मंत्राचा उपयोग तात्पुरत्या परकाया प्रवेशाचा होता. तू आत्ता आलास हे फार बरं झालं. तू ज्या देहात प्रवेश केलायस त्याचा मृत्युयोग जवळ आलाय. लवकरात लवकर तुला दुसरा देह शोधावा लागेल. तू इच्छिलेल्या कार्यासाठी एक खास मंत्र तयार आहे. तरूण देह शोधलास तर बरं.”
मधु घाबरला. त्याने विचारले, “ दादू आत्ता जिवंत आहे कि नाही?”
“ आहे. पण थोड्याच वेळात त्याची अंत्ययात्रा आपल्या दोघांना काढावी लागेल.”
“ पण दादू गेल्यावर तुम्ही कोणाच्या रूपाने येणार?.....माझ्या माहितीत तर कुणीही नाही.”
“ काळजी करू नकोस. मी माझ्या माहितीतल्या एका मित्राला फोन करून चार पाच मंडळींची
व्यवस्था करतो. ते येण्यापूर्वी, चार तासासाठी तुझ्या शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी दादू गेलेला असेल. तू म्हणजे मी तुझ्या रूपात सर्व काही पार पाडीन. त्यानंतर तुला घरी सोडून म्हणजे ह्या वाड्यावर सोडून मी एखाद्या तरूण देहात प्रवेश करून इथे येईन. तुला अर्थातच कळेल.”
मधूच्या हातून दादुच्या देहाचा अंत्यविधी पार पडला. त्याला छान झोप लागली. रघुनाथरावांच्या हाकेमुळे तो जागा झाला. डोळे चोळून समोरच्या व्यक्तीकडे पाहू लागला.
“ मधु...माझं नाव गणेश सातपुते. तुझ्या बालपणीचा मित्र. आईवडील गेल्यामुळे मी नोकरीच्या शोधात इकडे आलो. तुझ्या आईवडिलांकडून तू इंदूरला आल्याचं समजलं. म्हणून तुझ्या आश्रयाला आलो. चालेल ना?”
मधु हसला. “गुड ! आता मी तुम्हाला.....नाही गणेश ह्या नावाने हाक मारीन.”
“ नुस्तं गणेश नाही. गण्या म्हणालास तरी चालेल. कारण तू नी मी आता खूप जवळचे मित्र आहोत. तुला आता कसलीच अडचण येणार नाही.”
एव्हढ्यात रमाबाईची हाक ऐकू आली. “ आहेत का पेठेसाहेब?”
बाहेर येत मधु म्हणाला, “ अहो रमाबाई, मला पेठेसाहेब काय म्हणता?...नुसतं मधु म्हटलंत तरी आवडेल मला. या आत या. हा माझा बालमित्र गणेश सातपुते. नोकरीच्या शोधात आला इथे. आता तो राहील इथेच.”
“ त्याचे आईवडील कुठे असतात?” रमाबाईनी विचारलं.
“ आमच्या कल्याण मधेच होता हा. नुकतेच त्याचे आईवडील वारले. मी इथे आहे म्हणून तो आला भेटायला. दादू गेल्याचं समजलं ना?....बिचारा....शेवटपर्यत माझी सेवा केली त्याने.”
“ हो कळलं. रघुनाथरावांचे सहा मित्र आले होते त्यामुळे बरं झालं..... तुमच्या जेवायचं काय?”
“ आज दादुच्या आवडीचे पदार्थ करा.”
“ त्याला माझ्या हातची काकडीची कोशिंबीर फार आवडायची. बाकी त्याच्या विशेष आवडी निवडी नव्हत्या. तुमच्यासाठी पोळ्या, भात, भाजी, वरण पुरे ना?...काही गोड धोड हवं असेल तर सांगा.”
“ तुम्हीही जेवाल ना आमच्या दोघांबरोबर?....”
“ आधी तुम्ही जेवून घ्या. मी जेवीन नंतर. खीर आवडते की नाही?...करीन थोडीशी.”
“ चालेल. आम्ही बाहेर जाऊन येतो. बारा साडेबारा पर्यत परतू. काही आणायचं असेल तर सांगा.”
“ सध्या आहे सगळं. उद्यासाठी काय आणायचं ते ठरवू नंतर. या तुम्ही.”
रमाबाई आत गेल्यावर गणेश म्हणाला, “ माझ्या अपेक्षेपेक्षा तू बराच हुशार आहेस हं.”
“ बरं. पुढल्या काही सूचना?”
“ एक महत्वाचं काम कर.रमाबाईना सुट्टी देऊन टाक. आपल्या दोघांना कल्याणला जायचं आहे असं सांग. घरात आपण दोघच असलो कि तुझ्याशी बोलतांना मला नी तुला टेन्शन येणार नाही.
तुला हवं तर कल्याणला जायचं असेल तरी हरकत नाही. इथून निघतांना भरपूर पैसे देईन. म्हणजे मलाही बरं वाटेल. इथे आता मला बर्याच गोष्टी पार पाडायच्या आहेत. अधून मधून तू
मला फोन कर. ... पण नको. मी घरात भेटेन की नाही, सांगता येत नाही. मीच तुला योग्य वेळी फोन करीन. दुपारचं जेवण झालं की, रमाबाईना साडीचोळीसाठी एक हजार रुपये दे. त्यांना म्हणावं, मी कधी इकडे आलो की तुम्हाला निरोप देईन. त्या गेल्या की दुपारच्या चारच्या गाडीने तुही गेलास तरी चालेल.”
ह्या गोष्टीला चार महिने लोटले.रघुनाथरावांचा फोन अजून आला नाही. त्यांना भेटण्याची फार इच्छा आहे. पण इंदूरला जाण्याचा धीर होत नाही. इकडल्या पेपरमध्ये इंदूरच्या बातम्या विशेष येत नाहीत. माझ्या घरचा पत्ता त्यांच्याकडे असेल का?....त्यांच्या इंदूरच्या वाडयाचा पत्ता तरी
माझ्याकडे कुठाय?

-------------------------------------------------------------------------------------------
श्रीराम श.बर्वे , पुणे.-३८.
: 020 25398763.
9850233375.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा छान आहे. एक शंका : मधु आधी त्या इंदुरच्या वाड्यात गेला असताना शेवटी त्याला वाड्याचा पत्ता माहीत नाही असं का लिहिलंय?

नाही पटली..........?
जर संपुर्ण प्रॉपर्टि मधुच्या नावाने आहे तर त्याला त्याचा पत्ता कसा माहीत नाही........?
ओक वकीलांकडुन पेपरची छाननी करुनसुद्धा पत्ता माहीत नाही. आश्चर्यकारक. किंवा शेवटची ओळ बदला.........!
पु.ले.शु.