१० वी - 'क'

Submitted by किसन शिंदे on 17 January, 2013 - 16:59

आज ३० एप्रिल! रिझल्ट्चा दिवस. मनात धाकधूक होतीच पास होईल की नाही याची. याचं कारण म्हणजे वर्षभर अभ्यासापेक्षा जास्त केलेली टवाळकी आणि वार्षिक परीक्षेला कठीण गेलेले बीजगणित आणि भूमिती! बाकीच्या विषयांचा तर तसा बरा अभ्यास केला होता पण आता पास होतो की नाही कोणास ठाऊक? च्यायला!! नापास झालो तर आईच्या हातचा खूप मार खावा लागेल आणि दादा टोमणे मारेल ते वेगळंच. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आठवीतून पास होऊन नववीत आलेल्या मुलांची ती कुत्सित नजर.

देवा हनुमंता, वाचव रेऽऽऽ देवा!

शीऽऽऽ..ऐला काय घाणेरडे विचार आहेत. जाऊ दे.

झटपट नाश्ता उरकून वेळेच्या अर्धा तास आधीच शाळेत पळालो. शाळेच्या फाटकावर माझ्यासारखीच बावरलेल्या आणि गोंधळलेल्या चेहर्‍यांची बरीच गर्दी उभी होती. काहींचे पालक सोबत आले होते, काही एकटेच आले होते. आपण पास झालोय आणि सगळ्या वर्गात आपला पहिला नंबर आलाय अशा थाटात काही स्कॉलर पोरं उगाचंच शायनिंग मारत उभी होती.

'पाल्या' पण आला होताच. पाल्या म्हणजे देवेंद्र पालेकर. माझा जिवश्च कंठश्च मित्र. आठवी आणि नववीच्या वर्षातला माझा बेंचसोबती. पालेकर एक नंबरचा स्कॉलर होता. अभ्यासू किडा. आठवीला असताना पहिल्यांदा आमची ओळख झाली. तेव्हापासूनच आम्ही एकत्र होतो. बापलेकरशी ओळख ही नववीच्या वर्षातली. नववीच्या सुरूवातीच्या दिवसात कधीतरी एक दिवस आमच्या बेचंवरची तिसरी जागा रिकामी होती आणि त्यादिवशी बापलेकर तिथे बसायला आला तो कायमचाच. मी, पालेकर आणि बापलेकर असे तिघेही एकत्रच शाळेत यायचो आणि एकत्रच घरी जायचो. सुरूवातीला अगदीच शामळू वाटणारा बापलेकर नंतर हळू हळू आम्हाला समजू लागला. चेहर्‍यावरून बराच सभ्य दिसणारा बापलेकर प्रत्यक्षात मात्र पक्का बेरकी होता. एके दिवशी इतिहासाच्या तासाला पाटील बाईंचा १८५७ चा राष्ट्रीय उठाव अगदी जोरात सुरू होता. सगळी मुलं शांत चित्ताने ऐकत होती. आमचंही बाईंच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. बापलेकरही बेंचवर कोपर रोवलेला डावा हात कानावर ठेऊन अगदी तन्मयतेने ऐकत होता. मला त्याची सवय माहीत होती म्हणून मला त्याच्या या एकाग्रतेने ऐकण्याचं कौतूक वाटलं, पाल्याला कोपराने ढोसून मी त्याच्याकडे लक्षही वेधलं. पाल्या हसला आणि हळूच माझ्या कानात कुजबूजला "साल्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याने दप्तरात वॉकमन आणलाय आणि त्यात कॅसेट टाकून तो कुछ कुछ होता है ची गाणी ऐकतोय." कानात लावलेला इयरफोन लपवण्यासाठी त्याने डावा हात कानावर ठेवला होता याचा उगडला मला तेव्हा झाला. साला भें**.

"बापल्या कुठंय रे?" मी नख कुरतडत त्याला विचारलं.

"माहित नाही रे. मी आज सकाळीच गावाहून रिझल्टसाठी आलोय."

शाळेचे टोल पडले आणि पळत पळत आम्ही दोघंही वर्गात शिरलो. आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक सुर्यवंशी सर अजून आले नव्हते. वर्गात नुसता गोंधळ चालू होता. प्रत्येकाला आपला काय 'निकाल' लागतो याची उत्सुकता कमी चिंताच जास्त होती.
"शूऽऽऽऽ शांत बसा." अतिशय खणखणीत आवाजात बोलत सुर्यवंशी सरांनी वर्गात प्रवेश केला. एका हातात रिझल्टचा गठ्ठा होताच. सगळे एकदम चिडीचूप्प. "मला तुमच्याकडून जशी अपेक्षा होती तसा आपल्या वर्गाचा रिझल्ट लागलाच नाही. काही जण तर काठावर पास झालेत. शाळेत अभ्यासाच्या तासाला लक्ष कुठं असायचं तुमचं?" सरांनी आपल्या 'भाषणाला' सुरूवात केली. आणि मग आणखी पाच मिनिटं लेक्चर झाडून सरांनी एक एक रिझल्ट द्यायला सुरूवात केली.

मोरे..पास
चव्हाण..पास
पवार..पास
पालेकर...पास. पालेकरला ९०% पडले होते. सरांनी त्याचं खूप कौतूक केलं
डोंगरे..नापास. 'गाढवा, मला वाटलंच होतं तु काय दिवे लावणार ते' सरांनी असं म्हणताच वर्गात एकच हशा पिकला. सगळी पोरं हसली खरी पण लगेच सरसावून बसली, कारण अजून बरेच रिझल्ट यायचे बाकी होते.
साळवी...पास
पवळे...काठावर पास
शेरकर..नापास. मग शेरकरकडे पाहून सरांनी अशी काही मान फिरवली कि बिचार्‍या शेरकरला भयंकर लाजल्यासारखं झालं. बापलेकर काठावर पास झाला होता त्याची आई आली होती रिझल्ट घ्यायला. आयला! सगळ्यांचे रिझल्ट येताहेत, माझा कधी?? एकदम आतुरतेने मी माझ्या 'निकालाची' वाट पाहत होतो. आणि मग सर म्हणाले "बनकर..पास." जसे कानावर हे शब्द पडले मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मन एकदम पिसासारखं हलकं हलकं झालं. सरांनी सांगितलेल्या नंतरच्या रिझल्टकडे आम्ही लक्षच दिलं नाही. आमच्या लगेच गप्पा सुरू झाल्या. सगळ्यांचे रिझल्ट वाटून झाले आणि पुढे येणार्‍या दहावीच्या वर्षासाठी शुभेच्छा देऊन सर निघून गेले. जाताना 'चांगला अभ्यास करा रे' असं सांगायलाही ते विसरले नाहीत. सगळ्यांना तुकड्या विभागून दिल्या. काही जण 'अ' तुकडीत गेले, काही जण 'ब' तुकडीत गेले. सुदैवाने आम्हा तिघांनाही १०वी 'क'च्या तुकडीत जागा मिळाली होती.

जे पास झाले होते त्यांचा नुसता दंगा सुरू होता आणि जे नापास झाले होते कडूलिंबांच्या पाल्याचा रस प्यायल्यासारखा चेहरा करून बसले होते. पास झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आम्ही वडापावची पार्टी करायचं ठरवलं. मग मी, पालेकर, पवळे, सामंत, अहिरे असे सगळे आनंदाच्या भरात उड्या मारतच रस्त्यापलीकडील वडापावच्या गाडीवर पोहचलो.

"मी तर चाटे क्लासला अ‍ॅडमिशन घेणारे. माझे गणित, विज्ञान आणि इतिहास थोडेसे कच्चेच आहेत." बटार्‍या डोळ्याचा पवळे म्हणाला.

"थोडेऽऽऽऽ..साल्या काठावर पास झालायंस या विषयात आणि म्हणे थोडेसे कच्चेच आहेत" एकाच वेळी किंचाळत आणि पवळ्याची नक्कल करत सामंत बोलला. आम्ही सगळे खदाखदा हसलो.
'मी अजून कुठे अ‍ॅडमिशन घेतली नाही पण मी कर्नावट क्लास लावणार आहे' पाल्या सुमडीत माझ्या कानात बोलला. मी फक्त तोंडाने ह्म्म केलं आणि त्याला एक डोळा मारत हसलो. १४ जुनला सगळ्यांनी नक्की शाळेत यायचं असं म्हणत आम्ही ऐकमेकांचे निरोप घेतले.

घरी जाताना आईची थोडीशी गम्मत करायचं मी मनात ठरवलं. नापास झाल्यासारखा रडवा चेहरा करू घरात शिरायचं आणि तिला घाबरवायचं असं ठरवलं. त्याचबरोबर मला दादा काय म्हणतोय हे ही पाहायचं होतं. त्याप्रमाणे अगदी रडवेला चेहरा करून घरात पाऊल टाकलं. बॅट हातात घेऊन कुठंतरी क्रिकेट खेळायला निघालेले बंधुराजही मला पाहताच दारात थबकले. "काळ्या नापास झालास ना?" माझा असा चेहरा पाहून त्याने लगेच विचारलं. तोपर्यंत इकडे आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिला वाटलं मी नापास झालोय म्हणून असा चेहरा केलाय. "शेंडेफळ ना. तुम्ही लोकांनीच त्याला जास्त लाडावून ठेवलंय." त्यात दुसरीकडून दाद्याही यथाशक्ती तिचे कान फुंकतच होता. एवढा वेळ तोंडाने बडबड करत असलेल्या आईने मग कोपर्‍यातली काठी उचलत माझ्याकडे मोर्चा वळवला. आता मात्र टरकलो, म्हटलं काठीचा पहिला तडाखा बसण्याआधीच सांगून टाकावं म्हणून मग हातातला रिझल्ट वर उंचावत मी मोठ्ठ्याने ओरडलो, "मी पास झालोयऽऽऽऽ"

"उगाच आगाऊपणा का करतोस मेल्या." रागाने थरथरत असलेल्या आईने तरीही माझ्या पाठीत एक जोरदार धपाटा मारला. मला आता मार बसणार नाहीये हे कळताच "हॅ...नाटक्या कुठचा." असं तोंड वेंगाडून म्हणत दादाने बॅट खांद्यावर टाकत घरातून पलायन केलं.

तो दिवस खूप कौड-कौतुकात गेला. दहावीचं वर्ष सुरू होण्याआधी महिनाभर आराम मिळावा म्हणून दुसर्‍या दिवशी बॅग भरून आम्ही गावी निघालो.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users