प्रकाशओझे

Submitted by रसप on 16 January, 2013 - 03:30

ही रोज सावळी रात्र मला मोहवते
सागर तमसाचा पापणकाठी बनते
मौक्तिक-रत्ने मज तेथ लाभती रोज
निर्व्याजपणे ही एकच रंगी सजते

गंधास रातराणी पसरे भवताली
वारा पांघरतो नव्या मखमली शाली
आशेच्या पंखांवर सजती मग तारे
मज दिसत नसे की काय राहिले खाली

खिडकीतुन झिरपे रोज नवा अंधार
आकाश उद्याचे घरात घे आकार
कोऱ्या पटलावर मी लिहितो मन माझे
संतप्त वेदना पडते निपचित गार

जो काळ हवासा वाटे, थांबत नाही
रात्रीस पाउले असती, चालत राही
स्वप्नांस असावा शाप कटू सत्याचा
हे प्रकाशओझे मिळे दिशांना दाही

दिसतात सावल्या वठलेल्या झाडांच्या
ओघळतो अश्रू गालांवर रस्त्यांच्या
मन पाचोळ्यासम इथे-तिथे भरकटते
उरतात जाणिवा चुकलेल्या ठोक्यांच्या

....रसप....
१४ जानेवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/01/blog-post_16.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसतात सावल्या वठलेल्या झाडांच्या
ओघळतो अश्रू गालांवर रस्त्यांच्या
मन पाचोळ्यासम इथे-तिथे भरकटते
उरतात जाणिवा चुकलेल्या ठोक्यांच्या>>>> मस्तच

काही ठिकाणी लयीत म्हणता नाही आली

धन्यवाद !

श्याम सर,
कुठे गडगड वाटतेय तेही सांगाल का ? मी प्रयत्न करीन तिथे आवश्यक असल्यास बदल करण्याचा.

खूप आवडली

_____________________

'विचारपूस' केली होती पाहिलीस का ?

खिडकीतुन झिरपे रोज नवा अंधार
आकाश उद्याचे घरात घे आकार
कोऱ्या पटलावर मी लिहितो मन माझे
संतप्त वेदना पडते निपचित गार

हे कडवं लयीत गंडलं आहे. पण अंतिम अक्षर लघु असल्यामुळे तसं होत आहे.

बाकी कविता मस्त. Happy

डॉक साहेब,

ओळीचे शेवटचे अक्षर सरसकट गुरू मानले जाते ना ?

उदा. -

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन
झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे
शिलोच्चयातुनि झुळझुळ येथे गंगाजळ पाझरे
खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखोर्‍यातुन माणिकमोती फुलुनि झाकले खडे

- कवी माधव