कैफ माझ्या काळजाचा ह्या तुझ्या दारूत नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 January, 2013 - 09:46

गझल
कैफ माझ्या काळजाचा ह्या तुझ्या दारूत नाही!
मी पिण्याआधीच माझ्या राहिलो काबूत नाही!!

हे अताशा आगलावे सांत्वनासाठी निघाले....
आज जेव्हा एकही घर राहिले शाबूत नाही!

रंगवेडा, गंधवेडा, एक मी सौंदर्यवेडा!
मी कुणाचा भाट नाही, मी कुणाचा दूत नाही!!

जन्म गेला पावलांचा वाळवंटी चालताना....
जाळण्याइतका मला चटका तुझ्या वाळूत नाही!

माझिया थडग्यावरी साकारले ते राजवाडे!
मी तिथे राहूनही त्यांच्यात अंतर्भूत नाही!!

बेरजा किंवा वजाबाक्या तुम्ही तुमच्याच मांडा......
हे असे खेळायला आयुष्य म्हणजे द्यूत नाही!

मी हवा काढून त्यांच्या घेतली सा-या कटाची!
वार करण्याएवढी ताकद कुण्या बाहूत नाही!!

द्यायचे नव्हते मला प्रेतासही माझ्या विटाळू!
ह्याचसाठी मी कुणा उचलू दिला ताबूत नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सर....

कैफ माझ्या जिंदगीचा तांबड्या दारूत नाही
मी तुला पाहून माझ्या राहिलो काबूत नाही...

सर कसा वाटला मतला ?

धन्यवाद अरविंदराव!
चांगला आहे आपला मतला. पण तांबड्या दारूत असे का म्हटले आहे, ते समजले नाही.
दारूचा रंग फक्त तांबडा थोडाच असतो?
शिवाय तांबद्या रंगाची दारू व मी तुला पाहणे यातील नातेसंबंध लागत नाही, ज्यामुळे मततल्यातील दोन ओळी जरा दुरावलेल्या वाटतात. उला मिसरा बदलता यावा.
प्रा.सतीश देवपूरकर

अरविंदराव!
तुम्ही दिलेला मतला जर असा केला तर कसे वाटेल पहा......

कैफ जगण्यातील माझ्या, कोणत्या दारूत नाही!
पाहिले तू काय अन् मी राहिलो काबूत नाही!!

...........प्रा.सतीश देवपूरकर

आज जेव्हा एकही घर राहिले शाबूत नाही!....जबरदस्त ओळ , मला पानिपता नंतरचा महाराष्ट्र आठवला

वा सर...आपला मतला मस्तच..

कैफ जगण्यातील माझ्या, कोणत्या दारूत नाही!
पाहिले तू काय अन् मी राहिलो काबूत नाही!!