चारचौघी - ३

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2013 - 05:18

निलीच्या डोळ्यांमध्ये निर्जीवता आणून आणि बाकी तिघींच्या डोळ्यांमध्ये पाणी आणून एक गंभीर शांतता भरून राहिली होती. ऐकले होते ते ऐकवलेले नव्हते. खरे होते पण अविश्वसनीय वाटावे असे खरे होते. गेले सहा महिने जिची, जिच्या सोज्वळ विचारांची थट्टा करण्यात आपण मनोरंजन करून घेत होतो ती अमानुष क्रौर्याला बळी पडून त्यातून कशीबशी सुटून या सोज्वळ विचारांपाशी केवळ विवशतेने पोचलेली होती हे जाणवून पश्चात्ताप होत होता. तिची पार्श्वभूमी कधीच का विचारली नाही असे मनात वाटू लागलेले होते. तिनेही ती स्वतःहून कधीच का सांगितली नव्हती हे समजत नव्हतेही आणि होतेही. आपण चौघीही एकमेकींना पुरेश्या ओळखतच नाही आहोत आणि केवळ एकत्र राहात आहोत म्हणून तात्कालीन मैत्री निर्माण झालेली आहे ही जाणीवही प्रभावी होत होती. मनात येत होते की कदाचित प्रत्येकीला एक काही ना काही इतिहास असावा ज्यात निलीबाबत झाले असेच नाही, पण काही ना काही घडलेले असूही शकत होते. वेळीच या गोष्टी समजल्या तर धीर देणे शक्य तरी होणार होते. अन्यथा मैत्री तरी कशाला म्हणायचे?

पद्मजा कुलश्रेष्ठ, म्हणजे 'जो' समोर करीअर होते. तिने स्वतःहूनच लग्न केलेले नव्हते. लग्न करायचेच नाही अशी तिची भूमिका नव्हती. पण करायचे झाले तर कधीतरी चाळिशी जवळ आल्यावर शोभेलसा पुरुष बघून प्रस्ताव मांडावा असे तिच्या मनात होते. यामागे, अगदी उमेदीच्या काळापासून एका संसारात बद्ध होऊन स्वातंत्र्य गमावू नये अशी कारणमीमांसा होती. आत्ता जो केवळ एकतीस बत्तीस वर्षांची होती. जो च्या मनात पुरुषांबद्दल कोणताही तिरस्कार, कोणतीही घृणा नव्हती. पण जपून राहावे लागते हे मात्र रक्तात भिनलेले होते. तिच्या आयुष्यात लाळघोटेपणा करणारे खूप येऊन गेलेले होते, पण विशिष्ट मर्यादेपलीकडे त्यांची पावले पडू शकलेली नव्हती. जो स्वतःला सेफ ठेवण्याच्याबाबतीत अतिशय कटाक्षाने गुंतलेली असायची.

सिमेलिया जैन म्हणजे 'सिम' मॉडेल होऊ पाहात होती. चौघींमध्ये सर्वात लहान होती. फक्त चोवीस वर्षांची होती. नखरेल दिसणे आणि नखरेल वागणे हा तिच्या व्यवसायाचा एक भाग होता. विचारांनी परिपक्व नव्हती असे नाही, पण जगाचा अनुभव कमी होता. साहसी मात्र होती. 'स्त्री नाही म्हणाली तर पुरुष एक पाऊल पुढे टाकू शकत नाही' अश्या पुस्तकात शोभणार्‍या वचनावर तिचा सध्या दृढ विश्वास होता आणि तो डळमळीत व्हावा असे काही घडलेलेही नव्हते. बाकी तिचे दिसणे, पेहराव व माहीत असल्यास तिचा व्यवसाय यामुळे तिच्याकडे बघणार्‍या आम पुरुषांची नजर तिला व्यवस्थित जाणवत होती. अश्या जमातीकडे दुर्लक्ष करून ती वास्तवाचे पाणी कापत पोहत चाललेली होती. या तिघींची साथ हा तिच्या मनाला असलेला असा दिलासा होता की ज्यामुळे मन मोकळेही करता येत होते आणि 'आपण जश्या आहोत तश्याच वागतो' या विचाराचे सातत्याने प्रात्यक्षिक या तिघींसमोर करून त्यातून स्वतःचे खणखणीत व्यक्तीमत्वही बनवता येत होते. तिच्यासाठी आयुष्य सुंदर होते. घरचे सगळे राजस्थानात होते. सिम शिक्षण झाल्यावर येथेच राहिली होती. बर्‍यापैकी कमवतही होती.

निली २८ वर्षांची होती. निली ज्यातून गेली ते ऐकून सर्वचजणी हादरलेल्या, हबकलेल्या आणि आत्मविश्वासहीन मनस्थितीत पोचल्यासारख्या झालेल्या होत्या. सोबतच राहणार्‍या मुलीबाबत हे होऊ शकते याचा अर्थ ते केव्हाही कोणाहीबाबत होऊ शकते ही जाणीव त्यांना पोखरत होती. निलीबाबत अतीव कणव वाटत होती. जयाच्या साखरपुड्यानिमित्त पिझा आणून मजेत एकत्र गप्पा मारत खाणे हा आनंद आणि तो मिळवत असतानाच पूर्णपणे विपरीत असा निलीचा जहरी अनुभव ऐकायला मिळणे यामुळे आयुष्यातील लहान लहान आनंदांना आपण स्त्री असण्याची, कमकुवत असण्याची, परावलंबी आणि भोगवस्तू असण्याची झालर असल्यासारखे वाटू लागले होते. निली स्त्रियांसाठी असलेल्या पुनर्वसन केंद्रात सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेस्तोवर असायची. तिला सुट्टीच नसायची. पगार जमा व्हायचा. पण होस्टेलवाले पैसे घ्यायचे नाहीत. तिचे तेथे राहण्याचे पैसे दर महिन्याला कोणीतरी भरायचे. त्यामुळे फक्त जेवणाचा आणि इतर काही खर्च असला तर तेवढाच करावा लागायचा. निलीने बाहेर उगाच हिंडणे, चारचौघात जाणे या गोष्टी कटाक्षाने टाळलेल्या होत्या. त्यामुळे ही रूम आणि तीन मैत्रिणी हे तिचे केंद्रातून जाऊन आल्यानंतरचे विश्व होते.

जया सबनीस ही एकच महाराष्ट्रीय मुलगी होती. वय वर्षे सव्वीस! ग्रॅज्युएट झाल्यावर काही वर्षे नोकरी करत असताना ती बरेचदा बुलढाण्याला जाऊन येत होती कारण लग्नाचे जोरात चाललेले होते. जसजसे वय वाढत होते तसतसे मुलांबाबतची निवड, सासरबाबतच्या अपेक्षा, पत्रिका, सासरची आर्थिक स्थिती या अटी काहीश्या शिथिल होऊ लागलेल्या होत्या. निबरपणा स्कीनवर जाणवू लागलेला होता. मुळात फारशी सुंदर नसलेली जया मुलांना फारशी पसंतही पडत नव्हती. लग्नाची तिला आणि तिच्या माहेरच्यांना आता फारच घाई झालेली असल्याने नुकतेच एक स्थळ ठरवून टाकलेले होते. राहुल सातभाई! मुलगा होता बुलढाण्याचाच, पण मुंबईला एका ऑफीसमध्ये क्लर्क होता. त्याला पंधरा हजार मिळत होते. साखरपुडा झालेला होता. लग्नानंतर जयाला घेऊन मुंबईत राहण्यासाठी त्याला अजून एक वर्षाचा अवधी हवा होता कारण तेवढ्या काळात त्याचा पगार वाढणे, आणखी एक पार्टटाईम जॉब मिळणे आणि एखाद्या बर्‍या वस्तीत दोन खोल्या भाड्याने मिळणे हे शक्य होणार होते. एकंदर, सर्वसामान्य रूप आणि वाढते वय यांचा परिणाम असा झाला होता की लग्नाच्या बाजारात जया सबनीसची किंमत फारच खालावलेली होती. ती इकडे एका शाळेत शिक्षिका होती. इतिहास भुगोल शिकवायची. तिला आठ हजार मिळत होते. मुंबईलाही नोकरी मिळणार असेल तरच गेलेले बरे असे तिला स्वतःलाही वाटत होते कारण उगाच येथील पगार सोडून तिकडे जायचे आणि नवर्‍याच्या खिश्यावर पहिल्याच दिवसापासून भार बनून राहायचे हे तिला अवघड वाटत होते. अर्थात, सगळ्या मुली असेच करतात असेही तिला वाटत होते. पण नीट ठरत नव्हते. राहुलचे म्हणणे होते की वर्षभर होस्टेललाच राहून तिने आणखी पन्नास एक हजार कमवून ते घरासाठी म्हणून त्याला द्यावेत म्हणजे दोघांना मिळून एक चांगले घर भाड्याने तरी घेता येईल मुंबईत!

चौघींपैकी 'लग्न' हा विषय जयाच्याच बाबतीत फार महत्वाचा होता. बाकीच्या एक तर लग्नाबाबत विचार तरी करत नव्हत्या किंवा करणारच तरी नव्हत्या. जयाचे विचार तिच्यावर झालेल्या पारंपारिक संस्कारांमधून निर्माण झालेले होते. आजवर तिच्या आयुष्यात कोणी तिच्याशी 'तसे' वागलेले नव्हते. आपण चांगले असलो तर जगही चांगलेच असते हा सुविचार तिचा जीवनमंत्र होता सध्या! त्यामुळे बलात्कारीत स्त्री किंवा मुलगी, अंगप्रदर्शन करणारी स्त्री किंवा मुलगी, मोकळीढाकळी वागणारी स्त्री किंवा मुलगी ही तिच्यामते समाजात घडणार्‍या गुन्ह्यांमध्ये थोडीशी तरी जबाबदार होती. विशेषत: सिमेलियाचे वर्तन जयाला बिल्कुल पटत नव्हते. त्यावरून त्या दोघींचे अनेकदा वाजलेलेही होते. जया अगदीच काकूबाई नव्हती, पण सिम म्हणजे समोरच्याने आपले शरीर, फिगर, पेहराव आणि प्रसाधनांच्या वापराने पूर्णपणे इंप्रेसच व्हायला हवे या स्पष्ट विचारांची होती.

निलीचा अनुभव ऐकून मात्र जयाची झोप उडाली होती. स्त्रीसुद्धा जबाबदार असते या गृहीतकाला ऐकलेल्या वास्तवाने नुसते तडेच दिले नव्हते तर आई, वडील या नात्यांमधील आजवर पाहिलेल्या निर्मळतेलाही नग्न केलेले होते.

बराच वेळ कोणी काही बोलेना, काही खाईना! शेवटी जयानेच शांततेचा भंग केला. निलीकडे बघत म्हणाली.

"त्याला शिक्षा झाली असेलच की? पण तुझ्या आईलाही झाली असेल बहुधा. तुला काहीच माहीत नाही? की माहीत करून घ्यावेसेच नाही वाटत?"

"जया, आई आणि वडील यांना आई आणि वडील का म्हणायचे हाच जिला प्रश्न पडतो ती या सगळ्यात का पडेल? माझं कौमार्य, अभंग शरीर, कोवळी स्वप्ने, निष्पाप अपेक्षा, सुरक्षिततेची इच्छा असणे यातील काहीही मला परत मिळणार आहे का त्यातून? समजा त्या नरेशला अगदी फाशीही झालेली असली, तरी मला जिवंतपणी नरकात जगावे लागत आहे त्याचे काय? त्यांची माहिती मिळवून मनाला आणखीनच यातना होणार. तो मेला असला तर असे वाटणार की आपल्यासमोर, आपल्यामुळे मरायला हवा होता. जिवंत असला तर असे वाटणार की त्याला फाशी का देत नाही आहेत? आणि कैदेत असला तर वाटणार की त्याला बाहेर सोडून आपल्या ताब्यात द्यावे आणि आपण त्याला ठेचून ठेचून मारावे. पण माझ्या आईचे काय? तिला काय करावे मी? जन्म दिला, प्रेमाने वाढवले म्हणून माफ करावे की नरकात ढकलले म्हणून तिलाही अद्दल घडवावी? बापाचे काय करावे? तरुण होईस्तोवर मला शिकवले आणि बापाची माया दिली म्हणून आदर राखावा की कोणाचे लक्ष नाही हे पाहून माझ्यावरच बलात्कार केला म्हणून नरेशच्या आधी त्याचे मुंडके कापावे?"

"पण... ही ... ही पळवाट आहे" - सिम प्रथमच बोलली.

"कसली पळवाट? मी आयुष्यापासून पळत नाही आहे. आयुष्य जगत आहे. मी आत्महत्या करत नाही आहे. मी माझ्यासारख्या इतर स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून झटत आहे. त्यातून मीही पुन्हा उभी राहात आहे. असे समजू नकोस की मी काही करूच शकत नाही हे जाणवून मी वैतागून काहीच करत नाही आहे. मी एक सूज्ञ निर्णय घेतलेला आहे. भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणायचा नाही आणि येऊ द्यायचा नाही. हे मी घाबरून केलेले नाही. हे मी ठरवून केलेले आहे. नरेश, माझी आई, ते क्लाएंट्स आणि ते गडी यांचे काय झाले हे मला कळल्याने माझे मन कदाचित पुन्हा भूतकाळात जाईल. आई जिवंत असली तर तिला जाब विचारायची इच्छा होईल. नरेश हयात असला तर त्याला मारावेसे वाटेल. ते क्लाएंट्स कुठे भेटले तर त्यांचे डोके दगडाने ठेचावेसे वाटेल. मी पुन्हा मागच्याच काळात पोचेन. मी त्यांची माहितीच नाही मिळवली तर मी काहीतरी मागे टाकून देईन. मला पुढे काहीतरी उरलेले असेल. काही सत्कार्य होऊ शकेल माझ्याकडून. कोवळ्या वयात लुबाडल्या गेलेल्या या शरीरातील मेंदू आता सत्कृत्यांसाठी वापरायचा इतके तरी माझ्या हातात आहे. मला त्या आठवणीच नको आहेत. तुमच्याशी शेअर करण्यामागे 'बघा मी किती सहन केले होते' हा अहंभावही नाही किंवा तुम्हाला सावध व्हायला सांगणेही नाही. पण आयुष्य दिसते तितके नेहमीच सुंदर आणि सरळ राहील असे मुळीच नाही हे कळकळीने सांगायचे मात्र आहे."

"पण... तुझ्या ममाने तुला त्याच्याकडे जायला सांगितल्यावर तू विरोध करू शकली नाहीस?" - सिम!

"ममाचा? वयाच्या सतराव्या वर्षी? सख्खा बाप घरात असताना त्याच्यासमोर ममा मला नरेशकडे जायला सांगते आणि तो बाप काहीही म्हणू शकत नाही, मी काय विरोध करणार? आणि कसा विरोध करणार? शारीरिक ताकद अपुरी पडणार, पळून जाता येणार नाही, मैत्रिणींना काही कळवायला आमच्याकडे फोन नाही आणि ममा नेमके काय करायला सांगत होती हे तो प्रकार प्रत्यक्ष घडून गेल्याशिवाय समजलेलेच नाही या परिस्थितीत मी काय विरोध करायचा?"

"कुंपणातून उडी मारून सरळ पळून जायचे"

"आठ फूट उंचीची सिमेंटची भिंत होती ती. तारांचे कुंपण नव्हते. आणि पळून कुठे जायचे? एखाद्या मैत्रिणीकडे? स्वतःचा बापच आपल्याला भोगतो तर मैत्रिणीचा भाऊ, बाप किंवा आणि कोणी काय करेल यावर काय विश्वास ठेवायचा? आणि त्या भल्या मोठ्या कुत्र्याचे आणि त्या दोन भरभक्कम रखवालदारांचे काय?"

"पोलिस?"

"पोलिसांशी संपर्क कसा करायचा? बंगल्यातील फोनला हात लावायला मला सक्त मनाई होती. एकदा एका क्लाएंटकडेच मी माझे रडगाणे गाऊन पाहिले. त्याने रात्रभर मला उपभोगून दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर माझ्याचदेखत नरेशला सांगितले की ही मुलगी तुझी फार तक्रार करत होती. मग मी पुन्हा अत्याचार सहन केले. नकोत त्या आठवणी"

"आय अ‍ॅम सो स्सॉरी निली... आम्हाला खरंच काही माहीत नव्हते... तू कशातून गेलेली आहेस याचा विचारही करवत नाही" - जो ने पहिल्यांदाच तोंड उघडले.

"अश्यांना ठेचूनच मारले पाहिजे. त्यांचे लिंग कापून त्यांना नपुंसक बनवायला हवे" - सिम!

"तू फारच सौम्य शिक्षा सुचवत आहेस सिम! त्या चार वर्षातील साडे चौदाशे दिवसांमधील प्रत्येक क्षण हे एक मरण होते. जे मी खरे तर अजूनही भोगतच आहे मानसिक पातळीवर. इतक्या सौम्य शिक्षांनी काय होणार आहे त्यांचे?"

सळसळत जो ने विचारले.

"पण मला सांग, तो इतका दारुडा वगैरे होता, एखाददिवशी अशी संधी नव्हती का की त्याचे लक्ष नसताना सरळ मागून त्याचेच डोके फोडायचे?"

"होती. अनेकदा होती. पण तो मेलाच नसता तर नंतर आम्ही तिघेही खलास झालो असतो आणि मेला असता तर त्याने केलेल्या अत्याचारांची त्याला शिक्षाच मिळाली नसती, पण मला मात्र शिक्षा मिळाली असती खुनासाठी"

"अन तुझी आई? तिने तुला त्याच्याकडे पाठवून काय मिळवले?"

"सुरक्षा, अजून काही वर्षे तेथे राहून खाण्यापिण्याची परवानगी, जगात उघड्यावर पडण्यापेक्षा एकाच माणसासमोर पाय फाकून निदान बाकीचा वेळ चिंताविरहीत राहणे"

"काय बोलतेस निलू" - जया

"मी आत्ता फक्त बोलतीय! जेव्हा मी ते भोगत होते तेव्हा दिवस दिवस बोलूही शकत नव्हते."

"पण या सगळ्याचा एंड काय झाला असता? जर तुझ्या ममाने तुझ्या पपांना मारलेच नसते तर?"

"रेड लाईट एरियात फेकले गेले असते मी! किंवा कोणाची ना कोणाची कीप म्हणून तारुण्य ओसरेपर्यंत बदलली जात राहिले असते. बाप तसाही मरायलाच आलेला होता. ममाही लवकरच मेली असती"

"तुझ्या ममानेही तुझ्याइतकेच भोगले ना?"

"तिने जास्त भोगले जो! तिने स्वतः तर भोगलेच, पण आपल्या पोटातून जन्मलेल्या आपल्या अजाण मुलीला नराधमाकडे पाठवताना तिच्या मनाला ज्या यातना झाल्या असतील त्यांच्या तुलनेत मी नरेशची पहिल्यांदा शिकार होतानाच्या यातना फारच कमी असतील"

हे वाक्य ऐकून जयाच्या तोंडून तर हुंदकाच बाहेर पडला.

"तुझ्या तोंडून हुंदका आला ना जया? हे लक्षण आहे तू अजून जिवंत असण्याचं! मी आता काहीही ऐकू, वाचू आणि अनुभवू शकते आणि तरीही तटस्थ राहू शकते"

जयाने डोळे पुसले आणि तोंड लपवले. जो मात्र एक वाक्य बोलली.

"थँक गॉड जगातील सगळे पुरुष असे नसतात"

ते ऐकून निली खिन्नपणे बोलू लागली.

"खरे तर मलाही मान्य आहे की जगातील सगळे पुरुष असे नसतात. पण मला त्या विषयात पडावेसेच वाटत नाही. आपला संसार असावा, मुलेबाळे असावीत, असे काही मला वाटतच नाही. पुरुषाचा निर्हेतुक स्पर्श झाला तरी मी चटकन बाजूला सरकते. सहनच होत नाही मला ते! आता तर हेही आठवत नाही की शाळेत आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षापर्यंत वर्गात कोण मुले आणि मुली होत्या. आमचे काय काय चालायचे. काहीच आठवत नाही."

"म्हणजे... लग्नसंस्था वाईट नाही हे तुला मान्य आहे" - जयाने त्यातही साशंकतेने विचारले

उपरोधाने हासली निली. म्हणाली...

"जया, कौटुंबिक सुरक्षित वातावरणात तू आहेस. तुझ्या गृहीतकांना तडे जावेत अशी माझी इच्छा नाही. पण लग्नसंस्था ही फक्त सामाजिक स्वास्थ्यासाठी आहे. याचा अर्थ असा कसा होईल की त्या संस्थेद्वारा आपले कुटुंब स्थापन करणारे पुरुष स्वतःची प्रवृत्तीही बदलतील? ते वाईट असले तर चांगले होतील?"

हा नवीनच वाद होऊ नये म्हणून घाईघाईने जो मधे पडली.

"एक मिनिट, लग्नसंस्था किंवा काही पुरुष खूप चांगले किंवा वाईट असणे हे वेगळेच विषय आहेत, पण निलीच्या बाबतीत जे झाले त्याला न्याय तरी मिळाला का नाही हेच समजत नाही. की तो नालायक अजूनही सुखात जगत आहे कोणास ठाऊक. "

जो च्या या मध्यस्थीचा जयावर काहीही परिणाम झालेला नव्हता. याचे कारण नजीकच्या भविष्यात ती लग्न करणार होती. तिची भूमिका सर्वाधिक सेफ आहे हे मैत्रिणींना पटले नाही तर तिच्याही मनातून नकळतपणे ती भूमिका डळमळीत होऊ शकणार होती. आपला निर्णय योग्य आहे हे या तिघींनी मान्य करणे हे तिच्या विश्वापुरते समाधानदायी होते. या तिघींपेक्षा ती वेगळी होती तेच मुळी ती लग्न करणार असल्याने. कारण निली कधीच लग्न करणार नव्हती, जो चे निश्चीत नव्हते आणि केले तरी चाळीसच्या आधी नाही आणि सिम तर लहानच होती. सिमपुढे करीअरही असे होते की त्यात झालेले लग्न कितपत टिकाऊ असेल हाही प्रश्नच वाटत होता जयाला. त्यामुळे ज्यांच्याबरोबर अजून कदाचित एक ते दिड वर्ष राहावे लागणार आहे त्यांच्यात आपली भूमिका नुसतीच सर्वमान्य नव्हे तर सर्वोत्तम ठरणे हा तिच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्यामुळे जो कडे साफ दुर्लक्ष करत ती निलीकडे बघत पुन्हा म्हणाली.

"खरे तर तू सुद्धा पुरुषांबाबतची तुझी ही ठाम भूमिका एकदा तपासून घ्यायला हवीस. सगळे पुरुष बलात्कारी नसतात, सगळे पुरुष आपल्या पोटच्या मुलीवर रेप करत नाहीत, सगळे पुरुष स्त्रीला फक्त शरीर समजत नाहीत"

जयाचे हे बोलणे निलीची कथा ऐकल्यानंतर अत्यंत विसंगत, आत्मकेंद्रीत असे काहीसे वाटत होते. पण बोलणार्‍यांच्या तोंडावर हात ठेवता येत नाही. जो पुन्हा म्हणाली... यावेळी जयाला उद्देशून स्पष्टपणे...

"जया, आत्ता हा मुद्दा आहे का? निली कशातून गेलेली आहे हे समजल्यावर तिला तिची भूमिका बदलायला सुचवण्याची आपल्यालाही जरा लाजच वाटली पाहिजे खरे तर"

पण निली मधे बोलली.

"माझी भूमिका मी ठरवून तयार केलेली नाही. आयुष्य कसे जगायचे याचे नानाविध मार्ग माझ्यापरीने तपासून त्यातील सर्वोत्तम वाटलेला पर्याय मी निवडला आहे असे झालेले नाही. मी या मार्गावर फेकले गेले आहे. माझ्या मनात इतर काही विचारच येऊ शकणार नाही अश्या मनस्थितीत मला फेकलेले आहे या रस्त्यावर. नैसर्गीकरीत्या माझी मनस्थिती अशीच बनलेली असल्याने वर्षानुवर्षे जर पुरुषांचे फारच उदात्त अनुभव येत राहिले तर कुठे किंचित शक्यता आहे की आपली गृहीतके, आपली भूमिका मी पुन्हा एकदा तपासून घ्यावी असे मला वाटेल. मुळात मी व्यक्तीशः लग्नाला विरोध करतच नाही आहे, पण ते दुसर्‍यांच्या लग्नाला! माझ्या लग्नाला माझा विरोध कायम राहील."

जया निलीचे हे बोलणे ऐकून किंचित आग्रहीपणे म्हणाली.

"एकीकडे तू म्हणतेस की सगळे पुरुष वाईट नसतात हे तुला मान्य आहे आणि एकीकडे स्वतःपुरते पुरुषजगतापासून दूर राहते आहेस, आयुष्यात पुन्हा कोणत्याही पुरुषाला स्थान देणार नाही आहेस, हे थोडेसे कन्फ्यूझ्ड नाही का वाटत?"

आता निली इरिटेट होऊ लागली होती. तिने उत्तर दिले.

"मी ज्यातून गेलेले आहे त्यातून ही भूमिका बनलेली आहे, पण मला इतके समजते की ज्यांचे आयुष्य सरळ चाललेले आहे त्यांच्यासाठीही हीच भूमिका उत्तम आहे असे म्हणणे चूक ठरेल."

"हो पण म्हणजेच तुझा, तुझ्यापुरता का असेनात, लग्नसंस्थेवर विश्वास नाहीच आहे ना?"

"कसा असेल जया? तुला काय म्हणायचे आहे?"

"मला असे म्हणायचे आहे की पुनर्वसन केंद्रात होऊ शकणारे पुनर्वसन आणि एखाद्या खरंच चांगल्या पुरुषाबरोबर संसार करून दोन गोंडस मुलांना जन्म देऊन होऊ शकणारे खरेखुरे पुनर्वसन यात जमीन अस्मानाचा फरक आहे"

"म्हणजे काय? अश्या माझ्या पुनर्वसनाच्या मुळात काही विविध व्याख्या किंवा निकष नाहीच्चेत ना पण? मी निवडलेल्या मार्गापेक्षा अधिक चांगला मार्गच नाही असा माझा दावाही नाही. फक्त मला ते पुन्हा एकदा तपासावेसे वाटतच नाही आहे"

"तू हे 'पुन्हा एकदा' का म्हणतेस हेच मला समजलेले नाही आहे. तू लग्न कुठे केलेले आहेस कधी? तुझ्यावर तर बळजबरी झालेली होती"

"हो पण ती अशी होती की लग्न ही संस्थासुद्धा तिरस्करणीय वाटावी"

"याचाच अर्थ जगात चांगले पुरुष असतात यावर तुला विश्वास ठेवावासा वाटत नाही"

"होय, नाही ठेवावासा वाटत, पण म्हणून इतरांनी ठेवू नये असे मी म्हणत नाही"

"पण... या अश्या आयुष्याला अर्थ काय आहे?"

"लग्न केल्याने आयुष्याला अर्थ मिळतो हे कसे ठरवलेस तू? लग्न केले आहेस कुठे तू अजुन?"

"करणार आहेच ना?"

"हो पण त्यामुळेच आयुष्याला अर्थ मिळतो हे कशावरून?"

"मग एकटे काय जगत राहायचे उगाच आपले? तेही अश्या आठवणी मनात साठवून?"

निली खिन्न झाली. आपल्याला जया एकटी समजत आहे यामुळे तिला वाईट वाटले. आपण एकट्याच नाही आहोत, या तिघींचा एक एक भाग आपणही आहोत, पुनर्वसन केंद्राचाही एक भाग आपणही आहोत या तिच्या गृहीतकाला त्यामुळे एक भेग गेल्यासारखे वाटले तिला! ती उठून झोपायला लागली. पण कान चर्चेकडेच होते तिचे!

जो वयाने सर्वात मोठी होती. पण तिने अजून लग्न केलेले नव्हते.

जो ला आत्ता ही चर्चा तर नको होतीच. पण जयाचे विचारही पटलेले नव्हते. निली खिन्न होऊन झोपू पाहात आहे म्हंटल्यावर निलीला जरा बरे वाटावे म्हणून जो जयाला उद्देशून म्हणाली...

"जया, लग्न हे अश्या गोष्टींना असलेले समर्पक उत्तर नाही. अश्या संकटामधून गेलेल्या मुलीला मानसिक बळ पुरवावे लागते. आधार लागतो. पुन्हा नव्याने जगण्याची जिद्द तिच्यात निर्माण करावी लागते. आपली निली तर स्वतः स्वयंसिद्ध होऊन पुन्हा केंद्रातील इतर स्त्रियांना ही जिद्द पुरवत आहे. केवढे कौतुकास्पद आहे हे! आणि मुख्य म्हणजे लग्न हा स्त्रीच्या जीवनातील सर्वाधिक महत्वाचा भाग नाहीच. आता दिवस बदललेले आहेत. निलीच्या मनावर तेव्हाच्या घटनांचे किती खोलवर परिणाम झालेले आहेत हे आपण बघतो आहोत. अश्या अवस्थेत तिला लग्नाच्या भरीस पाडणे हा कदाचित तिच्यात निर्माण झालेल्या थोड्याफार आत्मविश्वासावरचा दरोडाच ठरेल. तसेही, तिचे निर्णय घ्यायला ती समर्थ आहेच. पण मैत्रिणी म्हणून आपण तिच्या भूमिकेचे स्वागत करायला हवे ना?"

"लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचा भाग नाही तर मग सर्वाधिक महत्वाचा भाग तरी काय स्त्रीच्या जीवनातील?"

"का?"

"का काय? ती करणार काय? असे पुरुष तर ठायीठायी असणार. ते ओरबाडू पाहणारच, आपल्यावर त्यांचे लेबल लावायला तयारच असणार. पण लग्न झाल्यामुळे जे समाजमान्यतेचे लेबल लागते त्यापुढे ही असली गिधाडे निदान काही प्रमाणात तरी वचकतात ना? निसर्गाने मातृत्वाची जबाबदारी स्त्रीवर सोपवलेली आहे. मग लग्नच करायचे नाही तर ती आई कशी होणार? आणि आई होण्यासही काहीच महत्व नसेल तुझ्यालेखी तर मग स्त्री म्हणजे काय? जस्ट एक जिवंत माणूस? जो आपला स्वतःच्या पायावर उभा राहून जगत आहे? मग स्त्री असण्याचा उपयोग काय? आणि अशी स्त्री असण्याचा तर फायदाच काय जी कुनाच एकाची नाही आहे?"

"चुकीचे विचार आहेत. आई होणे चूक आहे असे म्हणत नाही मी. पण कोणा एकाची होऊन राहणे यात मुळातच स्त्रीच स्वतःला एक कमोडिटी मानत आहे असे वाटते. मला सांग, तुला आठ साडे आठ हजार मिळतात आणि तू सुखेनैव या रूममध्ये स्वतःच्या जीवावर राहून वर परत दिड हजार बुलढाण्याला पाठवू शकतेस. तुला नेमकी गरज काय आहे लग्नाची? चार लोक म्हणतात की हिचे अजून लग्न झालेले नाही आणि ते तुला सहन होत नाही म्हणून लग्न करायचे? आई वडिलांनी लहानपणापासून शिकवले की वेळच्यावेळी मुलीचे लग्न झालेले बरे म्हणून लग्न करायचे? तुला काय कोणी मुलगा आवडला आहे आणि तू प्रेमात पडली आहेस का? तसेही नाही. निव्वळ 'आता लग्न व्हायलाच पाहिजे' अश्या मागणीचा व स्वेच्छेचा जोर वाढल्याने इतकी स्थळे झाल्यानंतर तुझे अचानक जगातल्या एका पुरुषाशी, राहुलशी लग्न ठरलेले आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न, लग्नानंतर राहुलनेच.... आय अ‍ॅम सॉरी... कोणा स्त्रीवर बलात्कार केला तर तुझे म्हणणे काय असेल? आणि त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न.... लग्नानंतर राहुलने तुझ्यावरच बलात्कार केला तर तुझे म्हणणे काय असेल?"

"नवरा कशाला बायकोवर बलात्कार करेल?"

"का? तो त्याचा हक्कच आहे असे काही नाही. काही वेळा तुला नकोही असेल ते आणि त्याला हवेही असेल. त्यावेळी तू त्याला नको म्हणालीस तर जग तुला हासेल आणि तुझ्यावर टीका करेल या भीतीने तू त्याला नको म्हणणार नाहीस. त्याचा कार्यभाग आपोआप साधेल. पण तू नको म्हणालीस आणि त्याने ऐकले नाही तर तो रेप ठरेल."

"हे काहीही बोलतीयस तू! मुळात ती स्त्रीचीही तितकीच गरज नसते का?"

"हो पण दोघांची गरज एकाचवेळी, एकाच प्रमाणात निर्माण व्हावी असे काही नाही ना? समजा एखाद्या क्षणी तुला फार गरज वाटली, राहुलही घरात आहे पण त्याची इच्छा नसली तर तू बळजबरी करू शकतेस?"

"स्त्रीचा मोह पडतो, तिने स्वतःचा मोह पाडायचा असतो. पुरुषाला मोहीत करावे लागणार ना अश्या वेळी?"

"नाही झाला मोहित तो. तर काय?"

"मग स्त्री म्हणून तुम्ही कमी पडताय"

"मग काय करणार म्हणे तू? आकर्षक वाटण्यासाठीचे प्रयत्न वगैरे. हे सगळे कश्यासाठी तर त्याचा फोकस तुझ्यावर राहावा म्हणून"

"अर्थात"

"पण मग हे करण्यासाठी लग्नच करण्याची काय आवश्यकता आहे? मी अजूनही लग्न न करता मला जर वाटलेच तर एखाद्या पुरुषाला प्राप्त करू शकतेच की? जर मोहितच करायचे असले तर?"

"लग्नाने सुरक्षितता मिळते"

"अच्छा... म्हणून हुंडाबळी जातात"

"हुंडाबळी गेले की पेपरमध्ये येते... न गेलेल्या केसेस येत नाहीत... की बुवा एकंदर दहा लाख जोडप्यांपैकी नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्ण्व जोडप्यांमधील स्त्रियांना हुंड्यावरून काहीही त्रास झालेला नाही.... अशी बातमी येत नसते"

"ठीक आहे... तू लग्न करत आहेस.. तुझी भूमिका तुझ्यापुरती योग्य आहे हे सगळेच मान्य करत आहेत.. विषय संपला की?"

"नाही... विषय संपला नाही... एका अतिशय संतापजनक व दारूण परिस्थितीला सामोरे गेलेल्या मुलीने नंतरच्या आयुष्यात पुरुष व लग्नसंस्था यांच्यावर कधीही विश्वास न ठेवणे हे मला पटत नाही... मान्य आहे की त्या मुलीच्या मनावर ते परिणाम फार खोलवर असणार... पण तिने लग्न केले तर मन इतरत्र रमू शकते.. मुले होऊ शकतात... सांसारीक आणि करीअरशी संबंधीत आव्हाने असू शकतात... ती पेलतान मागचा विसर पडू शकतो.. नवे आयुष्य सुरू होऊ शकते... आपल्या आयुष्याला आमुलाग्र भिन्न दिशा देणे हे या वयात शक्य असताना केवळ वैयक्तीक विश्वास नाही म्हणून आहोत त्या मनस्थितीत कुढत राहणे हे समजण्यापलीकडचे आहे.. बरे याला तिने काहीही टाईम लिमिट घातलेले नाही की बाई मी माझे वय बत्तीस होईपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही आहे वगैरे... कधीच करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे तिने.. आणि आपण तिघी तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणून तिच्या पुढील आयुष्याला शक्य ते सुरक्षित व संपन्न स्वरूप देण्याचा प्रयत्न करणे हे आपलेच काम आहे... तिला जगात कोणीही नाही... आपल्याला आपली जबाबदारी समजायला हवी... समजा, असे गृहीत धर की निलीची जबाबदारी आपल्यावर आहे असे ठरवले... तर आपल्या दृष्टीने निलीसाठी पुढील आयुष्य व्यतीत करण्याचे चांगले चांगले असे विविध मार्ग कोणते? एकटी राहून नोकरी करणे व म्हातारपणी पुरेल इतका पैसा मिळवून ठेवणे व मदतीला एखादी मुलगी ठेवणे किंवा एखादी मुलगी दत्तक घेणे... दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच पुनर्वसन केंद्र स्थापन करून त्याचे सर्वेसर्वा बनणे आणि आपल्या म्हातारपणाची त्यातून आपसूकच सोय करून ठेवणे... तिसरे म्हणजे नुसतीच नोकरी करून स्वतःचे घर बांधून त्यात राहात बसणे... चौथे म्हणजे जेव्हा योग्य वाटेल तेव्हा लग्न करणे, जमल्यास एखादे मूल होऊ देणे आणि त्याचे संगोपन, स्वतःची आणि नवर्‍याची नोकरी अश्या सर्वसामान्य आव्हानांमध्ये जीव गुंतवणे... किंवा आत्ता आहे तसे होस्टेलवर जमेल तितका काळ राहणे आणि भविष्य काळाच्या हवाली करून टाकणे... आपण तिघी कोणता पर्याय निवडू निलीसाठी? सांग ना? मला एक सांग जो... निलीने पुरुषाचे अतिशय भयकारी स्वरूप पाहिलेले आहे... पण पुरुषाचे दुसरे, खूप चांगले असेही एक रूप असते या वास्तवापासून ती स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवत आहे... पुरुष हे जगातील एक सत्य आहे... जे नाकारून जगत राहणे स्त्रीला शक्य नाही.. पुरुषालाही 'स्त्री या जगात आहे' हे नाकारून जगता येणार नाही... मग जे नाकारताच येत नाही ते स्वीकारायचेच नाही हे किती काळ करत राहणार? माझे असे म्हणणे नाही की आत्ताच्या आत्ता तिने लग्न करावे... असेही म्हणणे नाही की आपल्या तिघीतील जी शेवटची इथून बाहेर पडेल ती बाहेर पडायच्या आत निलीने लग्न करावे... असेही म्हणणे नाही की तिने येत्या पाच वर्षात लग्न करावे... पण तिने मुळात पुरुषांमध्येही काही जण चांगले असतात यावर विश्वास ठेवून पाहावा यादृष्टीने तिची विचारसरणी बदलणे हे आपले कर्तव्य नाही का? मग तिचे तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती लग्न करूदेत... पण लग्न केल्यामुळे मागचे विषय तिच्या मनाच्या तिलाही ज्ञात नसलेल्या कोपर्‍यात कायमचे गाडले जाण्याची निदान एक शक्यता तरी आहे ना? या शक्यतेपासून तिला आपणच वंचित ठेवायचे? ती स्वतःला ठेवतेच आहे, पण आपण तरी त्रयस्थपणे विचार करू शकतो ना? यात कोणताही अपमान नाही की बाई मला पुरुषांसमोर नमते घ्यावेच लागले वगैरे, एका पुरुषाशी लग्न करावेच लागले वगैरे! कमी जास्त प्रत्येक विवाहात असणारच. पण स्त्री आणि पुरुष एकमेकांसोबत लग्न करून दशकानुदशके आनंदाने राहू शकतात याची अगणित उदाहरणे सभोवताली असताना केवळ तिच्या पूर्वेतिहासाच्या प्रभावामुळे तिला त्यातून बाहेर काढलेच जाऊ नये ही तिची भूमिका आपण कितपत समर्थनीय मानायची आणि का? मी हे मान्य करू शकते की लग्न न करताही स्त्रीला राहता येते.. पण ज्या कारणासाठी निली लग्नाला तयार होत नाही आहे ते कारण नरेश नावाच्या नराधमाने स्वतःच्या वागणुकीतून तिच्यासमोर उभ्या केलेल्या पुरुषाच्या भयानक रुपामुळे निर्माण झालेले आहे... याशिवायही पुरुषाची रुपे असतात... मित्र असतात, पती असतात, भाऊ असतात, मुले असतात, वडील, आजोबा अशी अनेक रुपे असतात, असू शकतात... यातील कोणतेच रूप निखळ नसतेच ही तिची भूमिका आपण केवळ सहानुभूती म्हणून मान्य करायची आणि तिचे लग्नाला उभेच न राहणे हे समर्थनीय मानायचे यातून आपली तिच्याशी असलेली खरी मैत्री नव्हे तर निव्वळ कोणाहीप्रती ठेवतात ती माणुसकी दिसत आहे.. मैत्री दाखवायची असली तर तिला यातून बाहेर काढायला हवे... जग तिला वाटते तसेच फक्त भेसूर नाही हे ठसवण्यासाठी आपणही पेन्स घ्यायला हव्यात... तर ती मैत्री होईल ... तुम्ही दाखवत आहात ती सहानुभुती आहे... मी म्हणत आहे ती मैत्री आहे... आपण चौघी एका रेल्वेतून प्रवास करणार्‍या चारचौघी नाही आहोत की एकमेकांप्रती तात्पुरती माणूसकी, सहानुभुती दाखवावी... आपण दिवस रात्र एकमेकींच्या सहवासात राहून आपले अमूल्य क्षण दुसरीच्या साक्षीने जगतोय... आपण मैत्रिणी आहोत... उद्या माझ्या लग्नानंतर मला गरज वाटली तर मी हक्काने तुझ्याकडे येऊ शकले पाहिजे... तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही हक्काने माझ्या संसारात ढवळाढवळ करू शकला पाहिजेत... शक्यता आहे की निलीला मिळणारा नवरा कदाचित नरेशइतका वाईट असेल... पण तो तसा नसेल याची शक्यता खूप म्हणजे खूपच जास्त आहे... लग्न हा मी उपाय मानत नाही आहे... लग्नासाठीची तिची मानसिक तयारी करून घेणे याला मी उपाय मानत आहे... ज्यानंतर कदाचित ती लग्न करणारही नाही... पण निदान पुरुषांशी डील करण्याचा आत्मविश्वास तरी तिच्यात असेल.. आज पाऊल बाहेर टाकले की लेडिज होस्टेलचे वातावरण संपून पुरुषप्रधान संस्कृतीत आपण उभ्या राहतो.. हे सत्य विसरता येणार नाही... आणि एवढे करूनही लग्नानंतर पटले नाही तर ती निदान त्यातून बाहेर तरी पडू शकते... पण न पटण्याची कारणे ही नेहमीच नवरा नरेशसारखा निघाला अशी नसतील.. बलात्कारीत स्त्रीला ती पूर्वीसारखीच आहे, तिच्यात काहीही बदललेले नाही आणि जग अजूनही चांगले आहे यावर विश्वास ठेवण्याइतपत धीर देणे हे मित्रत्वाचे कार्य आहे... आणि तिचा लग्नच न करण्याचा निर्णय आपण अपरिहार्य मानून तिची आणि स्वतःच्याही स्त्रीत्वाची दिशाभूल करत आहोत... काय म्हणतेस यावर?"

खोलीमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झालेली होती. काकूबाईटाईप विधाने करणार्‍या जयाचा मुद्दा शेवटी शेवटी इतका बिनतोड ठरू लागला होता की जो सुद्धा निर्बुद्धासारखी बघत बसली होती. 'आय अ‍ॅग्री विथ यू' म्हणण्याचा मोह तिला आणि सिमला होत होता. निली नुसतीच शून्यात नजर लावून पहुडली होती. अत्यंत कन्फ्युझिंग विचारप्रवाह निर्माण केले होते जयाने आपल्या बोलण्यामधून! असे विचारप्रवाह की मानसिक यातनांमध्ये व त्यांच्या दु:खद स्मृतीमध्ये दिवसरात्र राहणार्‍या मुलीमध्येही आशावाद निर्माण होत होता आणि त्याचवेळी सुचवला गेलेला उपाय अत्यंत पारंपारीक, पिढ्यानुपिढ्यांनी जोखलेलाच होता. गोंधळलेल्या अवस्थेत जो म्हणाली...

"एक प्रकारे तू जे मैत्रिणींचे कर्तव्य म्हणतेस ते पटत आहे मला तरी... पण... पुरुषप्रधान संस्कृतीशी पुन्हा एकदा नव्याने आत्मविश्वासाने डील करण्याच्या सिद्धतेचा शेवट लग्नानेच व्हायला हवा हे मला पटत नाही आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचे उदाहरण मी स्वतःच आहे की पुरुषप्रधान संस्कृतीशी अतिशय आत्मविश्वासाने डील करत असूनही मी लग्न करत नाही आहे"

हे वाक्य विरते तोवर सिमने वयाला व विचारांना न शोभणारा प्रश्न विचारला अचानक!

"जया तू म्हणतेस ते ठीक आहे... पण लग्नाला उभी राहिलीच तर तिच्या भावी नवर्‍याला तिचा इतिहास सांगायचा की नाही, त्याला कळला तर बघू अशी भूमिका ठेवायची की आधीच सांगायचा स्वतःहून? मी असे म्हणत नाही आहे की निलीला आत्ता लग्नाला उभे राहायचे आहे, पण कधीतरी हा प्रश्न भेडसावणारच ना? की तुला असे म्हणायचे आहे की ज्या पुरुषाची वैचारीक बैठक इतकी परिपक्व आहे असाच पुरुष शोधायचा वगैरे"

"तुम्ही दोघी घोळ घालताय. लग्न ही प्रायॉरिटी नाही आहे किंवा विशिष्ट कालावधीत तिचे लग्न होणे हीसुद्धा! प्राधान्य आहे ते तिचा पुरुषप्रधान संस्कृतीतच राहून पुरुषांबद्दलचा दृष्टिकोन मॉडिफाय करणे! मग तिने लग्न नाही केले तरी जमू शकेल"

पहाटेचे पाच वाजले होते. फार तर एक दिड तास झोपता येणार होते प्रत्येकीला. सुन्नपणे बसलेल्या ग्रूपमधून प्रथम जो घड्याळ्याकडे बघत उठली आणि बेडकडे जाऊ लागली. तशी मग सिम आहे तिथेच आडवी झाली. जया मात्र बसून राहिली जमीनीकडे बघत. जयाच्या लक्षात यायला लागले होते, की बहुतेक आज प्रथमच आपण एकहाती या तिघींनाही निरुत्तर केलेले आहे. त्याच आत्मविश्वासाने निलीकडे पाहात तिने सुन्नपणे जाग्याच असलेल्या निलीला विचारले......

"तुझं काय म्हणणं आहे यावर? पटतंय का तुला माझं म्हणणं?"

तीनही चेहरे निलीकडे वळलेले होते. निलीने निर्जीव नजरेने जयाकडे पाहिले आणि म्हणाली...

"तुझा बाप कधी तुझ्यावर चढला तर तुझे म्हणणे तुला पटेल का?"

==============================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती उहापोह ... बापरे...!!
शेवटच वाक्यं एक्दम स्टनींग...(मराठीत काय म्हणतात?) अप्रतिम...! पुढ्चा
भाग लवकर येऊ द्या.

मनाने स्त्री होऊन स्त्रीची वेदना वाचत आहात बेफिकीर, तुम्ही कदाचित ती जास्त नीटपणे व्यक्त कराल कारण संकोच अन भय यामुळे ती अव्यक्तच रहाते कित्येकदा.
ले.शु.

वाचतानाच कुठेतरी खोल आत भयन्कर त्रास होत आहे
मनाने स्त्री होऊन स्त्रीची वेदना वाचत आहात बेफिकीर, तुम्ही कदाचित ती जास्त नीटपणे व्यक्त कराल कारण संकोच अन भय यामुळे ती अव्यक्तच रहाते कित्येकदा.>>>>+१