दूध भाताची गोष्ट

Submitted by shilpa mahajan on 24 December, 2012 - 09:06

दूध भाताची गोष्ट

खूप दिवसानंतर सिनेमाला जाण्याचा योग आला होता. मी आणि माझी मैत्रीण दोघीच जाणार होतो.
मी कोणती साडी नेसावी याचा विचार कारण्यात गुंग होते. तेवढ्यात मोबाईल वर एस एम एस ची वर्दी आली. मी लगेच उघडून पाहिला.
" बापू मामा ला देवाज्ञा झाली " बाबा
मी तो मेसेज वाचला मात्र , माझा सगळा उत्साह क्षणार्धात गळून पडला. माझे डोळे भरून आले. गळा दाटून आला. मी मैत्रिणीला फोन करून प्लान रहित करत असल्याचे सांगितले.आणि ताबडतोब बाबांकडे जाण्यासाठी गाडी काढली .

बाबां कडे पोहोचल्यानंतर माझा उसना धीर देखील गळून पडला. मी बाबांच्या गळ्यात पडून हमसा हमशी रडले . बाबांनी माझ्या पाठीवरून हात फिरवून मला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. माझं मन मात्र शांत होत नव्हतं ! होणार तरी कसं ? ज्या बापूमामावर मी जीवापाड प्रेम केलं आणि ज्यानं उलटपक्षी माझ्यावर पित्यासारखीच माया केली त्याला मी काय दिलं ?
एका क्षुल्लक गोष्टीसाठी त्याच्याशी जन्मभर उभा दावा मांडला , तरीसुद्धा त्याने एका अक्षरानेही मला दुखावले नाही. फक्त माझी समजूत घालायला मात्र तो कधीच आला नाही. मी त्याची जन्मभर वाट पाहिली. जेव्हा जेव्हा मी आणि बापू मामा कोणत्या न कोणत्या निमित्ताने समोरा समोर आलो, तेव्हा तेव्हा त्याची माया पूर्वीसारखीच असल्याचे त्याच्या वागण्यातून, त्याच्या प्रेमळ नजरेतून मला जाणवत होते. पण मी विरघळले नाही. मला त्याचे शब्दच हवे होते. केवळ शब्दच नव्हे, सपशेल शरणागती दर्शवणारी कृती हवी होती , त्याने स्वतः मला दूधभात कालवून भरवावा अशी माझी इच्छा होती, .ती मात्र त्याने कधीच पूर्ण केली नाही. मी त्याच्या रागावर माझा प्राणप्रिय दूधभात सोडून दिला होता. जेव्हा बापूमामा मला स्वतः भरवेल तेव्हाच तो खायचा असा पण मी केला होता. नुसता पण केला असं नव्हे तर तो पण बापूमामाच्या कानावर घातला गेला याची खात्री करून घेतली होती.आणि म्हणूनच कधी न कधी तो माझी समजूत घालेल आणि स्वतः मला दूध भात भरवेल अशी माझी खात्री होती , माझा तो विश्वास मात्र त्याने खोटा पाडला. तो माझी समजूत घालायला कधीच आला नाही. जस जसा काळ पुढे सरकत गेला तसतसा माझा हट्ट देखील पक्का होत गेला .

पुढे माझी इयत्ता मोठी होत गेली. अभ्यास वाढत गेला. आमचा आजोळच्या गावी जाण्याचा काळदेखील कमी झाला. अधून मधून गेलोच तर मी बापूमामाकडे जाइनाशी झाले. तो देखील माझ्या आईला माझे कुशल विचारून गप्प बसू लागला. त्याचा मला जास्तच राग येत असे. पण मी करणार तरी काय ?
त्याच्याशी बोलणे तर सोडाच, पण त्याच्याबद्दल बोलणे हे देखील मला माझी हेकडी सोडण्यासारखे वाटत होते. आपला अहं सोडून त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तो आपण होऊन बोलण्याची मुकाट्याने वाट पाहाणे मला श्रेयस्कर वाटत होते. आज त्या वाट पहाण्याचा असा अंत झाला होता. माझ्या वाट पहाण्याचा आणि त्याच्या आयुष्याचा ही ! आता मला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता . खरं म्हणजे मलाआपल्या प्रेमाच्या माणसासाठी थोडे झुकायला काहीच हरकत नव्हती . पण या पश्चात बुद्धीचा आता काय उपयोग होता ?
बाबां बरोबर मी बापूमामाच्या घरी गेले. मामीला भेटताच मला भडभडून आलं.
. मामीच्या गळ्यात पडून मी खूप रडले. अतीव दुःखात असूनही मामीनेच माझे सांत्वन केले.
" मामी , मला माफ कर गं ! मी चुकले , खूप खूप चुकले. मामा माझ्यावर खूप रागावला असेल." हुंदके देत देत मी कशी बशी बोलले.
" शांत हो बेटा ! शांत हो ! मला माहिती आहे कि तुला खूप पश्चात्ताप होतो आहे, पण विश्वास ठेव माझ्यावर , मामा तुझ्यावर मुळीच रागावला नव्हता. ते बघ ,” मी मान वळवून मामी दाखवत असलेल्या दिशेने पाहिले. माझा आणि मामाचा एका समारंभात काढलेला एकत्रित फोटो खूप मोठा करून भिंतीवर लावलेला होता. मी आश्चर्याने मामीकडे पाहिले.
" ते अंथरुणाला खिळले तेव्हापासून हा फोटो मोठा करून आणायला लावला आणि आपल्या पलंगा समोर सतत दिसत राहील असा लावायचा हट्ट धरला. जितका वेळ शुद्धीत असायचे त्यातला बराच वेळ त्या फोटोकडे पहाण्यातच जायचा त्यांचा !"
" पण मग मामी, मला निरोप का नाही धाडलास ? तो आजारी असल्याचे मला कुणीच का नाही कळवले ?" मी कळवळून विचारले.
" त्याला कारण देखील त्यांचा हट्टच ! " मामीने सांगितले. " काहीही झालं तरी माझा प्राण जाण्या आधी शकूला काहीही कळवायचे नाही अशी सर्वाना त्यांची सक्त ताकीदच होती . हे ऐकून मी आणखीनच गोन्धळात पडले.
एकीकडे माझ्या फोटोकडे पाहून दिवस व्यतीत करणारा मामा खरा की आपल्या आजारपणाची बातमी मला न सांगण्याचा हट्ट धरणारा मामा खरा तेच मला कळेनासे झाले .
खूप विचार करूनही मला ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टींचा संबंध लावता येईनासा झाला. मी त्याच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा एकाच उपाय मला सुचत होता.
जरी त्याचा काही उपयोग नव्हता तरी माझ्या मनाला शांती मिळवून देईल अशी एकच गोष्ट होती , ती म्हणजे आमच्या दोघांमध्ये ज्या एका गोष्टीमुळे वितुष्ट आले होते ती म्हणजे दूधभात ! ऐकायला किती विचित्र वाटते नाही ? पण खरोखरच दूधभाता वरूनच आम्हा दोघात वितुष्ट आले आणि ते जन्मभर टिकले . त्याने माझ्या हातातली दूध भाताची वाटी हिसकावून घेतली आणि संतापाने भिरकावून दिली . मामीने किती प्रेमाने मला तो भात कालवून दिला होता! मला दूध भात अतिशय प्रिय होता. जेव्हा जेव्हा मी मामाकडे जाई तेव्हा मामीकडे दूध भाताची फर्माइश करत असे. दूध भात म्हणजे जणू पंचपक्वान्नाचे जेवण ! दूध भात मला घरी सुद्धा मिळत असे ,

पण मामाकडच्या दूधभाताची सर त्याला काही केल्या येत नसे . मामाकडे हातसडीचा घरचा तांदूळ , घरच्या म्हशीचे दाट साय असलेले दूध याने बनलेला तो दूधभात ! त्याची नुसती आठवण झाली तरी माझ्या तोंडाला आजही पाणी सुटते.
मला आजही तो दिवस लख्ख आठवतोय . मी बरेच दिवस आजारी होते. आजारातून उठल्यानंतर विश्रांती आणि हवापालट करायला म्हणून मामाकडे आले होते. शहरात रहाणारी मी बाजारात गेले होते आणि गोलगप्पे ,खाउन परत आले होते.
रात्री अचानक पोटात दुखायला लागले . घरगुती प्रयत्न करूनही पोटदुखी आटोक्यात येईना म्हणून दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या. काही हाती लागत नव्हते.
मला दवाखान्यात भर्ती केले गेले. खूप दिवसांनी मला घरी पाठवले. मी खूप अशक्त झाले होते. मला बरीच औषधे लिहून दिली होती. ती घेऊन घेऊन तोंडाची चव गेली होती. मी मामाकडे जाण्याचा हट्ट धरला म्हणून मला बाबा मामाकडे घेऊन आले. मी इथेच रहाणार असे जाहीर केले. बाबा मला मामाकडे सोडून गेले. जाताना मामाशी हळू आवाजात खूप वेळ काहीतरी बोलत होते. मामा होकारार्थी उत्तर देत होता. दुसऱ्या दिवशी मामा बाहेर गेला होता. मी मामीकडे दूधभाताची मागणी केली . कधी नव्हे ती मामी मला म्हणाली कि मामा ला येऊ दे, त्याला विचारू या आणि त्याने हो म्हटले तर मी लगेच तुला दूधभात कालवून देईन. मामा कोणत्या कामासाठी गेला आहे ते कोणालाच माहिती नव्हते , त्यामुळे किती वेळाने येईल ते ही कोणी सांगू शकत नव्हते.
मला धीर धरवत नव्हता. तरी थोडा वेळ मी कशी बशी थांबले . थोड्या वेळाने मी पुन्हा हट्ट सुरु केला. या वेळी मी जास्त आक्रमक झाले होते. फक्त मागून मिळत नाही असे पाहून मी रडायला सुरुवात केली . माझ्या रडण्याचा सूर वाढतच गेला. मी इतकी अशक्त झाले होते कि मी करत असलेला आक्रस्ताळेपणा माझा मलाच सोसवत नव्हता. मला घेरी येऊ लागली.
शेवटी मामीचा नाइलाज झाला . तिने दूधभात देण्याचे कबूल केले , तेव्हा कुठे मी गप्प बसले. मामीने मला हवा तसाच साय घालून दूध भात कालवून आणला.

मी पहिला घास उचलायला आणि दारात मामा यायला एकच गाठ पडली. " अरे वा ! आज आमच्या बाहुलीला काहीतरी खाण्याची इच्छा झाली म्हणायची ! काय मिळालंय नाश्त्यासाठी ? " त्याने कौतुकाने विचारले,
" दुसरं काय मागणार लाडकी भाची ? दूध भात !" मामी हसत हसत म्हणाली. मामाचा नूर एकाएकी बदलला. " मी सांगितल्याशिवाय तिला काहीही द्यायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना ?मग इतकी घाई कशाची झाली तुम्हाला ? मी काय परदेशी गेलो होतो का की कायमचाच गेलो होतो ? " कधीही वरच्या पट्टीत न बोलणारा मामा आज तारस्वरात मामीवर ओरडला.
फक्त ओरडलाच नाही तर झटक्यात माझ्या हातातली वाटी हिसकावून घेऊन दूर भिरकावून दिली. " काही खायचा नाही दूध भात ! पचायला जड असतो तो ! डॉक्टरांनी जड पदार्थ देऊ नका म्हणून सागितले आहे . " मला उद्देशून मामाने फर्मान काढले .
मामा कधी नव्हे तो माझ्यासमोर मामीवर ओरडल्यामुळे ती देखील गोरीमोरी झाली. आपलं काय चुकलं तेच तिला कळेना ! ती बिचारी एकदम गप्पच बसली . थोड्याच वेळात मामा सावरला. त्याने मामीला दुसऱ्या खोलीत नेले आणि काहीतरी हळू आवाजात सांगितले. तिची समजूत पटली. ती माझ्याजवळ आली आणि दुसरा एखादा खाऊ खाण्यासाठी माझी समजूत घालू लागली. पण माझी समजूत काही केल्या
पटेना ! दूधभात खाऊ दिला नाही हे कारण तर होतेच पण मामाने माझ्या हातातली वाटी हिसकावून भिरकावण्यामुळे माझा प्रचंड अपमान झाला होता. त्याचा मला जास्त संताप आला होता. मला आता दुसरे काहीच खायचे नव्हते. दूध भातच खायचा होता आणि तो देखील मामाच्या हातानेच !
मामाने स्वतः मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा हेका मी सोडलाच नाही. शेवटी मामाने मला धमकी दिली कि आता जर मी त्याचे ऐकले नाही आणि दुसरे काही खाल्ले नाही तर तो बाबांना बोलावेल आणि मला घरी पाठवेल. मला वाटले कि तो फक्त मी त्याचे ऐकावे म्हणून धमकी देत आहे. त्यामुळे मी आपला हेका सोडला नाही.

शेवटी मामा खरोखरच बाबांना घेऊन आला. बाबा मला बोलले काहीच नाही , फक्त मला गाडीत बसवून घरी घेऊन आले. मामाने केलेल्या ह्या कृतीने माझ्या मनात रागाचा लोळ उठला.
मामाचे माझ्यावर प्रेमच उरलेले नाही. मी त्याला आवडत नाही असा ग्रह मी करून घेतला. दुसरे दिवशी मामा मला भेटायला आला, तेव्हा मी त्याच्याशी बोलले नाही. शेवटी त्याने मला विचारले ," शकू, माझ्यावर इतकी रागावली का की माझ्याशी कट्टी घेतलीस ? " यावर मी म्हणाले, " आधी मला दूध भात खाऊ घाल ! मगच मी तुझ्याशी बोलीन !"
मामा यावर काही न बोलता निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला आणि याच प्रश्नोत्तरांची पुनरावृत्ती झाली. मग त्याच्या ऐवजी मामी दूध भाताची वाटी घेऊन आली.मी तिला साफ सांगितलेकी मी फक्त मामाच्याच हाताने दूध भात खाइन .बाकी कोणाच्याच हाताचा मला नको .
बस , हेच माझे मामा मामी बरोबरचे शेवटचे संभाषण ! तेव्हापासून आमचा अबोला सुरु झाला तो आजपर्यंत कायम राहिला . आता मला कितीही वाटले तरी तो सुटणार नाही !
माझ्या आणि मामाच्या एकत्रित फोटोकडे पहाता पहाता मला हे सारे आठवले आणि पुन्हा एकदा रडू कोसळले. मामीच्या मांडीवर डोके ठेवून मी मलूल स्वरात म्हणाले, " मामी, मला
दूध भात कालवून देतेस ?" मामीला जणू हे अपेक्षितच होते. ती मुकाट्याने उठली, आतून दूध भाताची वाटी आणि एक बंद पाकीट घेऊन आली. मी तिच्याकडून वाटी घेतली आणि बंद पाकिटाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
" तू दूध भात खाण्यापूर्वी हे पाकीट उघडून त्यांनी तुझ्यासाठी ठेवलेलं पत्र वाचावंस अशी त्यांची इच्छा होती ." मामी म्हणाली.
मला आश्चर्याचा पुन्हा धक्का बसला. हे सगळं असं घडणार हे सुद्धा मामाला माहिती होतं का ?
मी मामीच्या चेहेरयाकडे पाहिलं . किंचित हसल्यासारखे करून ती आत निघून गेली . बहुधा मुद्दामच ! मला एकांत मिळावा म्हणून !

मी पाकीट उघडलं .
" माझ्या छोट्या बाहुलीस , मनापासून आशीर्वाद . मला ठाऊक आहे की हे पत्र तू वाचशील तेव्हा तुझ्या शेजारीच दूध भाताची वाटी असेल. मी तुला सांगणार आहे की मी तुझी समजूत
घालून तुला दूध भात का भरवला नाही ते ! तुला मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात हा प्रश्न मी वाचत होतो . प्रत्येक वेळी माझ्या हृदयाला घरं पडत होती . पण बाळा , माझा नाइलाज होता !
तुला वाटत होतं की माझं तुझ्यावरच प्रेम आटलं ! पण तसं नव्हतं !
उलट तुझ्यावरच्या प्रेमामुळेच मी तसं वागत होतो . तुला आठवत असेल,तू आजारातून उठून माझ्या घरी विश्रांतीसाठी आली होतीस .मी बाहेर गेलो होतो तेव्हाच तू मामीकडे हट्ट करून दूध भात मागून घेतला होतास . मी येईपर्यंत तुला धीर निघाला नव्हता. तुला माहिती आहे मी कुठे गेलो होतो ? तुझ्या डॉक्टरांना भेटायला ! त्या वेळी त्यांनी जे सांगितले ते ऐकून आम्हा सर्वांनाच धक्का बसला होता .आम्ही सर्व जण
समजत होतो कि तू बाजारात जे गोलगप्पे खाउन आलीस ते तुला बाधले , तुला त्यामुळे फूड पौयझनिंग किंवा इन्फेक्शन झालं . पण तसं नव्हतं . तुझ्या शरीरात दूधभाताची तीव्र अलर्जी निर्माण झाली होती ! गोलगप्पे तुला बाधले नव्हते तर त्यानंतर रात्री तू खाल्लेल्या दूधभाता मुळे तू आजारी पडली होतीस. हे ऐकून मी घरी आलो आणि बघतो तर काय तुझ्या हातात नेमकी दूध भाताची वाटी ! मला ब्रम्हांड आठवलं ! डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं कि एकदा तू कशीबशी त्यातून वाचलीस , पण पुन्हा जर दूध भात खाल्लास तर कोमात जाण्याची शक्यता आहे .त्यामुळेच मला काही काही सुचले नाही आणि मी तुझ्या हातातली वाटी हिसकावून घेतली.
त्यानंतर मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पणतुझ्या अडनिड्या वयामुळे
तुझी समजूत पटली नाही. शिवाय मला भीती वाटत होती कि तीव्र एलर्जी च्या गंभीर परिणामाची जाणीव नसल्याने तू कधीतरी आमच्या नकळत दूध भात खाल्लास तर !

पण जेव्हा तू माझ्या हातानेच दूध भात खाण्याचा हट्ट जाहीर केलास तेव्हा मला नकळत आनंद झाला आणि तुझ्या एलर्जिवर उपाय देखील सापडला. तुझा जिद्दी स्वभाव मला चांगलाच ठाऊक होता. तू पण केलास म्हणजे तो निश्चित पाळणार हे मी जाणून होतो . मला ठाऊक होतं की मी तुझी समजूत घालायला आलो की लगेच तू दूध भाताची मागणी करणार ! म्हणून तो प्रसंग येउच नये आणि तुझ्या जिवावर संकट बेतू नये म्हणून मी आयुष्यभर तुझा अबोला एखाद्या जन्मठेपेच्या शिक्षे सारखा सहन केला. आता मात्र तसे नाही , तू समजूतदार झाली आहेस. तसे पाहिले तर तू मोठी झालीस तेव्हा तुला याबद्दल सांगावे असे सर्वांचे म्हणणे होते . कदाचित ते योग्यही असेल. पण एखाद्या दिवशी तुला कदाचित मोह आवरणार नाही किंवा परीक्षा घेऊन पहाण्याची इच्छा होईल अशी मला शंका वाटत होती . म्हणून मी तसा प्रयत्नच न करण्याचा निर्णय घेतला आणि तो जन्मभर पाळला. आता यापुढे निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुझ्या शेजारी दूध भाताची वाटी आहेच ! ती संपवून त्वरित माझ्या भेटीला यायचे की मी फेकली तशी ती फेकून आयुष्य भरपूर जगायचे हे तुझे तूच ठरवायचे आहेस ! तुझा बापू मामा "
पत्र वाचून संपले , मी मान वर केली . मामी माझ्या वहात्या अश्रूंकडे अपेक्षेने पहात होती. मी वाटी उचलली आणि दूर भिरकावली . अगदी जशी बापू मामाने भिरकावली होती तशीच!
----------------------------------------------o-------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..............मस्तच!!!
हेलवुन टाकनारे लिखान आहे हे, आणि अतिशय ओघावत्या भाषेत लिहलय तुम्ही!!!
खुप छान.

अमित

अरेरे शिल्पा. ही अशी सायंटिफिक बेस नसलेली कथा तू अशीच कल्पनेने लिहील्येयस की खरोखर तुझ्या ओळखीच्या कुणाकडे असे घडलेय. असे घडले असेल तर फक्त दूधभाताची अ‍ॅलर्जी आहे असे सांगणारा डॉक्टर महान असेल.
कथेत कुठे दूधाचे पदार्थ भाताचे पदार्थ खायचे सोडलेय असे लिहिलेले नाहीये. दूधभात काँबिनेशनने काय घोडं मारलंय.
बरं ही मुलगी मोठी झाल्यावर हे सांगता आलंच असतं की तिच्या घरच्याना. आणि लग्नाच्या वेळि सासरच्याना नवर्याला वैगेरे इतकी सिविअर अ‍ॅलर्जी असेल तर सांगितलं असेलच ना.

हि कथा काल्पनिक आहे. मला वैद्न्यानिक पार्श्वभूमी नाही, त्यामुळे काही गफलत झाली असेल तर फक्त एक कथा म्हणून दुर्लक्ष करावे हि विनंती ,

मला माहिती असलेली काही वैद्न्यानिक सत्ये खालीलप्रमाणे आहेत, पहिले म्हणजे कोणाही व्यक्तीला कोणत्याही वस्तूची अलर्जी केव्हाही निर्माण होऊ शकते. त्याचे कारण
निश्चित असे सांगता येत नाही. शिवाय आज एखादा पदार्थ मानवत नसेल तरी काही काळानंतर तो मानवू लागतो.काही व्यक्ती माझ्या पहाण्यात अशा आहेत कि एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनामुळे दुखावल्यामुळे एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा कायमचा त्याग करतात.

मग ती दुखावणारी व्यक्ती मरण पावल्यानंतर देखील ते ती वस्तू वापरणे किंवा सोडलेला पदार्थ खाणे सुरु करत नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी दोन विशिष्ट वस्तूंच्या कोम्बिनेशन ची माणसाला एलर्जी निर्माण होते.

पण तेच पदार्थ स्वतंत्रपणे किंवा इतर वस्तूंमध्ये मिसळून खाल्ले तर काहीही त्रास होत नाही. जसे दूध पिणे मानवत नाही पण संपूर्ण दुधाची कोफी किंवा चहा बाधत नाही.

दूधभात हा नेहेमीच्या वापरण्यात येणारा पदार्थ आहे . पण अचानक त्याची एलर्जी निर्माण होऊ शकते एवढेच मला सुचवायचे आहे. सत्य माहिती असूनही मोह न आवरू शकलेल्या

व्यक्ती माझ्या ऐकण्यात आहेत. [ डॉक्टरांच्या बोलण्यातून]

नानबा , माझी कथा वाचून तुम्हाला हिंदी सिनेमा आठवला हे मी कथेचे क्रेडीट मानते. सिनेमात तर यापेक्षा कितीतरी पटीने अतिरंजित प्रसंग दाखवतात. खूप काही करणे

इतरांच्या दृष्टीने शक्य असले तरी एखाद्याच्या भावना ते सर्व करू देत नाहीत , असे प्रसंग आपण पहात नाही का ? बापूमामाची व्यक्तिरेखा त्या लोकांपैकीच आहे. खूप लोकांनी

वेग वेगळे सल्ले दिले तरी कोणाचाही सल्ला न मानता फक्त आपल्या मनाचा सल्ला त्याने मानला एवढेच !