(नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्यावर काव्य करायचे ठरविले आणि सुरुवात करून संपविले तेव्हा लक्षात आले कि हे लिखाण तर पोवाड्यासारखे झाले आहे पण पोवाडा नाही मग याला नाव काय द्यावे हे समजेना थोडा विचार करून "नरवीर तानाजी मालुसरे वीरगाथा " असे केले ते योग्य कि अयोग्य आहे ते माझ्या सर्व सदस्य मित्र आणि वाचक मित्रांनी ठरवावे काही ठिकाणी लय साधण्यासाठी एकेरी उल्लेख आला आहे त्याबद्दल क्षमस्व.)
उमरठे गावचा एक वीर|
राजांचा होता सुभेदार |
करूनी पराक्रम थोर |
जाहला जगी अमर ||
राजांचा खास शिलेदार|
बालपणीचा त्यांचा मैतर |
सोडूनि सारं घरदारं |
बनला स्वराज्याचा चाकर ||
वीर मोठा रुबाबदार |
मिश्या होत्या पल्लेदार |
भेदक तिक्ष्ण नजर |
शत्रु कापे थरथर ||
एकदा काय जाहले |
रायबाचे लग्न ठरले|
आमंत्रण देण्या गडावरी गेले|
मुजरा करुनी बोलिले ||
आमंत्रण देतो सकळाला|
यावे मुलाच्या लग्नाला |
आशिर्वाद देउनी रायबाला |
क्रुतार्थ करावे सेवकाला ||
ऐकुनी विनंतीला ।
राजांना खेद वाटला ।
बोलले प्रेमाने तान्हाला ।
नाही येऊ शकत लग्नाला ।।
एक कामगिरी थोर ।
घेतली आम्ही शिरावर ।
फत्ते करण्या जाणे सत्वर ।
कोंढाणा किल्ल्यावर ।।
ऐकुनी वीर गडबडला ।
मुजरा करुनी बोलला ।
तानाजी असता दिमतीला ।
आपण का गा जावे स्वारीला ।।
भारावून राजे बोलले ।
तुझ्या मुलाचे लग्न निघाले ।
कोंढाणा रत्न गळ्यातले ।
शत्रूहाती असणे नाही चांगले ।।
ऐकुनी वीर बोलला ।
पुढे सारितो लग्नाला ।
आधी निघतो कोंढाण्याला ।
द्यावी आज्ञा सेवकाला ।।
राजांच्या पटेना मनाला ।
परी वीर पेटला हट्टाला ।
घेउनि शिरी कामगिरीला ।
कोंढाणा घेण्या निघाला ।।
घेउनि शेलारमामा सूर्याजीला ।
निवडक मावळा सोबतीला ।
तोंड देण्या दीड हजार फौजेला ।
आला गडाच्या पायथ्याला ।।
घनदाट रात्र अंधारी ।
महाकठीण होती कामगिरी ।
पोचायचे कसे गडावरी ।
खल करण्या जमली सारी ।।
तानाजी बोले सूर्याजीला ।
काही मावळे घेतो सोबतिला ।
मागुनी चढतो कड्याला ।
तू यावे मुख्य द्वाराला ।।
परिपूर्ण बेत आखला ।
कड्यावरी फेकले दोराला ।
बेत सफल झाला ।
एक एक चढू लागला ।।
शेवटी थोडा घोटाळा झाला ।
दगडावरी दोर काचला ।
अशुभ घडले त्या समयाला ।।
घासुनी दोर तुटला ।।
काही मावळे मुकले प्राणाला ।
हळहळ वाटली सकलाला ।
वेळ नव्हता दुख्ख करण्याला ।
सज्ज जाहले टक्कर देण्याला ।।
रजपूत होता किल्लेदार ।
पराक्रमी शूर वीर ।
सहज वाकवी पहार ।
नजरेत त्याच्या अंगार ।
दीड हजार पठाणी फौज ।
ताकदीचा त्यांना होता माज ।
कोणी येणार नाही हि समज ।
हरहर महादेव उठली गाज ।।
सगळे भानावर आले ।
शस्रे शोधू लागले ।
मराठे वीर पेटले ।
मुंडकी उडवु लागले ।
एकच गदारोळ झाला ।
दुसरा दरवाजा उघडीला ।
सूर्याजी आत आला ।
तोंड फुटले मोठ्या लढाईला ।।
हर हर महादेव गजर केला ।
मावळा बेफाम झाला ।
सपासप उडवी मुंडक्याला ।
गनीम पळू लागला ।।
पाहून पळत्या सेनेला ।
संताप आला उदयभानाला ।
घेउनि हाती तलवारीला ।
मराठ्यांवर तुटून पडला ।।
पाहुनी उदयभानाला ।
नयनी अंगार फुलला ।
सावरीत समशेरीला ।
उदयभाना समोरा गेला ।
भिडले एकमेका वीर ।
नव्हते दोघेही कमजोर ।
एकमेकावर करिती वार ।
नव्हते घेत कोणी माघार ।
इतर थांबवून लढाईला ।
पाहू लागले दोघांच्या समराला ।
दोघेही पेटले हट्टाला ।
सपासप करिती वाराला ।
अद्भुत रण माजले ।
दोघेही रक्ताने न्हाहले ।
त्या समयी अघटीत घडले ।
ढालीचे तुकडे झाले ।।
ढालीचा तुकडा पडला ।
नाही वीर डगमगला ।
गुंडाळून शेला हाताला ।
वीर पुन्हा लढू लागला ।।
दोघेही जखमी झाले ।
रक्तात न्हाउनी निघाले ।
परी नाही मागे हटले ।
जीव घेण्या सरसावले ।।
उदयभानाने वार केला ।
तान्हाचा हात तुटला ।
एका हाताने लढू लागला ।
परि नाही मागे हटला ।।
निर्वाणीच्या समयाला ।
दोघांनीही वार केला ।
बसताच वर्मी घावाला ।
दोघेही पडले धरणीला ।।
उदयभान सावध झाला ।
उठुनी वार पुन्हा केला ।
धारातीर्थी ताना पडला ।
स्वराज्यासाठी कामी आला ।।
पाहुनी त्या प्रसंगाला ।
शेलारमामा उभा पेटला ।
पकडुनी उदयभानाला ।
नरडीचा घोट घेतला ।।
सुभेदार आपला पडला ।
कळताच बातमी सैन्याला ।
जो तो पळू लागला ।
सूर्याजी आडवा झाला ।।
खडसावले साऱ्या सैन्याला ।
बाप तुमचा मारून पडला ।
थूत तुमच्या जिंदगानीला ।
घरी जाऊन भरा बांगड्याला ।।
बोल जिव्हारी लागला ।
सारा मावळा माघारी फिरला ।
शत्रूवरी तुटून पडला ।
जिंकून घेतले कोंढाण्याला ।।
गंजीला अग्नी लाविला ।
इशारा केला राजाला ।
पाहताच इश्याराला ।
लगोलग आले किल्याला ।।
तेथील समाचार कळला ।
दुख; झाले राजाला ।
माझा जिवलग गेला ।
धारा लागती डोळ्याला ।।
महाराज बोलले समयाला ।
स्वराज्यात कोंढाणा आला ।
परी माझा सिंह गेला ।
आजपासून कोंढाणा सिंहगड झाला ।।
नरवीर तानाजी झाला ।
स्वराज्याच्या कामी आला ।
अजरामर होऊनी गेला ।
अभिमान अवघ्या महाराष्ट्राला ।।
अनिल तापकीर लिहितो गाथेला ।
मुजरा करुनी अमर वीराला ।
द्यावे बळ मराठी माणसाला ।
तुमचे स्वराज्य टिकविण्याला ।।
।।जय भवानी ,जय शिवराय ,जय जिजाऊ ।।
स्वराज्याच्या सर्व शिलेदारांना मानाचा मुजरा
*******************************************
अनिलजी जी जी जी जी ... , फार
अनिलजी जी जी जी जी ... ,
फार छान. सगळा प्रसंग समोर उभा केला.
(दोरा एकदा तुटला हे काय आहे? - ऐतिहासिक का असेच? मी असे पण वाचले होते कि तानाजींची "यशवंती" घोरपड तीनदा माघारी फिरली. तेव्हा तानाजी तिला म्हणाले कि आता परत फिरलीस तर तुझीच खांडोळी करीन. त्या मुक्या प्राण्याला पण पुढचा प्रसंग कळला होता ... )
"आजपासून कोंढाणा सिंहगड झाला ।।" मधून "आजपासून" काढले तर?
तुमची वाणी ओघवती आहे
आकाशनील धन्यवाद, अहो हे
आकाशनील धन्यवाद,
अहो हे बरेचसे मी लहानपनापासुन पोवाड्यात एकत आलो आहे. घोरपडि ची कथेला पुरावा नाही असे मला समजले म्हनुन घोरपडिचा प्रसंग टाळला आहे .
काल सहज सिंहगडावर गेलो नि
काल सहज सिंहगडावर गेलो नि तुमच्या या विरगाथेची आठवण झाली
Pages