भूतकाळ

Submitted by ashishcrane on 3 January, 2013 - 04:01

भूतकाळ

"ह्या आजकालच्या मुली ना. ताप झालाय डोक्याला. एकतर 'लग्न कर..कर' असं हजार वेळ सांगूनही लग्नाला तयार नाही होत. किती स्थळं येऊन गेलीत पण, काय चाललंय हिच्या मनात देवाला ठाऊक. हे परमेश्वरा, तूच सांभाळ रे देवा आता. काल एक स्थळ आलंय. मुलगा चांगला कमावता आहे. स्वत:चे घर आहे. तर म्हणाली, आधी मी भेटेन मग ठरवेन काय ते होकाराचे. आमच्या काळात होतं का असं काही? आम्ही नाही का संसार केले इतकी वर्ष? गेलीय कारटी आज भेटायला. काय होतंय कुणास ठाऊक?" मनातल्या चिंतेने तिच्या आईचा जीव कासावीस झाला होता.

केतकी रोहनच्या बाजूला बसली होती. कुणीच काहीच बोलत नव्हते. वातावरण छान होते. पण मन प्रसन्न नसेल तर वातावरणाची प्रसन्नता काय कामाची? बोलणार कोण? म्हणजे बोलतील दोघेही पण, सुरुवात कोण करणार? बाकीच्या ठिकाणी 'लेडीज फस्ट' म्हणून या मुली पुढेपुढे करतात पण, ऐनवेळी मात्र गप्प बसतात.

रोहन शांततेला कंटाळला. मनात बोलून बोलून पण माणूस थकतोच ना? गुदमरायला होतं.
शांततेला थोडासा हिसका देऊन रोहनने प्रश्न विचारला.
"मी त्या व्यक्तीची जागा घेऊ शकतो का?"
प्रश्न आला पण, उत्तर? उत्तरं देणारी मात्र शांतच होती. डोळ्यातून काही शोधून सापडतंय का हे पाहायला रोहनने तिच्या नजरेत स्पष्ट बघायला सुरुवात केली. पण ती गप्पच.
"हाच प्रश्न मी तुला विचारला तर?"
रोहन फक्त हसला. म्हणाला, "हुशार आहेस हा तू बोलण्यात."
"अनुभवानेच शिकवलंय मला की,जे आपल्याला छळतं ,समोरच्यालाही कमी जास्त प्रमाणात तेच छळत असतं."
केतकी तेव्हा हसण्यावर खूप राग असल्यासारखी हसली.
"तुम्हालाही असेलच न भूतकाळ?"
"भूतकाळ कोणाला नसतो? ज्याला भूतकाळ नाही असं कुणी सापडेल का पृथ्वीवर? खरंतर भूतकाळ असतो म्हणून वर्तमान आणि भविष्यकाळ अस्तित्वात येतात. भूतकाळातल्या चुका, अपूर्ण इच्छा, आनंद, द्वेष ह्याच गोष्टी उद्याच्या उदयाला जन्म देतात. आपण जितके आयुष्य जगलो त्यात एकही व्यक्ती आपल्याला आवडली नाही असे कुणी म्हणूच शकत नाही आणि म्हणालंच तरी त्यावर माझा विश्वास नाही."
ती फक्त ऐकत होती.
"अगं, अगदी गुन्हेगाराला फासावर चढवणाऱ्या जल्लादाही फुलं आवडत असणार. प्रेमापासून तोही वंचित नसेल. कितीतरी आवडत्या गोष्टी माणूस मनात लपवून ठेवतो. ज्याचं त्याचं काही न काही रहस्य असतंच ना?"
पटलं म्हणून तिने फक्त होकाराची मान हलवली. आपण बोलतोय ते हिला पटतंय कळल्यावर रोहनलाही हुरूप आला.
"मी त्या व्यक्तीची जागा घेऊ शकतो का ?' असं विचारणं खरंतर व्यर्थ आहे.
समोरची व्यक्ती 'हो' असं उत्तर देईलच कसं? शांततेही बरीचशी उत्तरं दडलेली असतात. फक्त मनाचे कान उघडे हवेत. पण..."
पण वर येउन थांबला तो.
"पण? पण काय?" तिनं विचारलं.
"पण हल्ली माणसांना शब्द ऐकूनही भावना कळत नाही. तिथे शांतता कळेल अशी अपेक्षा काही करायची आपण?"
ती फक्त उसनं हसली यावर.

"असो. आपण ज्या देवाला मानतो त्याच्या मुर्त्या,फोटो देवघरात ठेवतो. ते फोटो,त्या मुर्त्या बाजूबाजूला ठेवतो. देवामध्ये क्रम लावतो का आपण? माणसंही अशीच असतात. आवडत्या माणसांमध्ये क्रम कधीच लावता येत नाही. ती सर्व एकतर आवडतात किंवा नाही आवडत."
"हम्म. असं काय असतं त्या माणसांत. इतकं कसं कुणी वेड लावतं?"

"केतकी, आयुष्यात खूप माणसं येतात. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला कितीही खटकल्या तरी का माहित नाही पण, मन त्यांना परकं म्हणायला तयार नसतं. माणसाला माणसाने भरून काढता येत नाही. नवीन आठवणी दिल्या म्हणजे जुन्या आठवणी विसरता येत नाहीत. मनात खूप जागा असते... आभाळाएवढी. पण त्या जागेमधली आपल्या मर्जीची जागा १० टक्केच. बाकी जागा दुसऱ्यांच्याच मालकीची."
समाधानाचं एक छोटंसं हास्य चेहऱ्यावर आलं तिच्या. आपल्या मनातला कुणी शब्दात मांडलं की, आपल्यावरचं ओझं अचानक कमी झाल्यासारखं वाटतं. तसाच काहीसं झालं होतं तिचं. त्या छोट्याश्या हसण्यातही सुंदर दिसत होती ती.

तिचं हसणं असंच रहावं म्हणून म्हणाला तो, "सोड ना. आपण असे एकदम सिरिअस का बोलतोय? चुकलोय का आपण? एकदम मोकळे बोलूया ना."
तिलाही थोडे हलके वाटू लागले. सोबतचं माणूस समजून घेणारं असलं की, सोबत वाटू लागते नाहीतर घड्याळ हळू चालतंय असं वाटू लागतं.
थोड्याश्या शांततेनंतर तो म्हणाला, "केतकी"
"हम्म. काय?"
"मी माझ्या आयुष्यात तुला त्या व्यक्तीची जागा देऊ शकणार नाही असं स्पष्ट सांगून टाक मला. पण तुझा हक्क मी तुझ्यापासून कधीच हिसकावून घेणार नाही असंही ऐकव मला. म्हण मला की, गमावणं म्हणजे नक्की काय असतं हे अनुभवलंय मी."

रोहन बोलत होता पण, केतकीच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलत नव्हते. सजिव गोष्टी निर्जीवपणे वागू लागल्या की, स्वत:च्याच सजिवतेवर शंका होऊ लागते. रोहनला हेच सहन होत नव्हते.
अखेर केतकी बोलली, "रोहन, मी त्या व्यक्तीशी प्रेम करताना स्वत:चं सगळं बहाल केलंय. अगदी स्वत:चे सर्वस्वही."
दोन क्षण शांततेने घेतले. केतकी रोहनच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होती. पण तो मात्र ढिम्म. शांतच.
न राहवून ती म्हणाली, "वाटलंच होतं मला. हे ऐकल्यावरही तू मला स्वीकारशील?"
शांतता चिरून एकच वाक्य रोहनच्या कानावर आले.
कधी कधी एखाद्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहतो आणि इतक्या प्रतीक्षेनंतर मिळालेली ती गोष्ट प्रतीक्षेपेक्षा जास्त भयानक वेदना देऊन जाणारी असते. अश्यावेळी 'प्रतीक्षेचे ते क्षण संपलेच का? हीच किंमत आहे का आपल्या प्रतिक्षेची?' अशी शंका माणसाच्या मनात नक्की येते. कधी कधी समोरची माणसं असं काही बोलतात की, स्वत:च्या संपत्या वाक्यासोबत आपले शब्द गिळत जातात. शब्दांनाच मुकेपण आलं, तर मग बोलायचं कसं?

"रोहन. बोल. शांत नको राहूस. शांततेच्या पोटात बरीचशी रहस्य असतात, कित्येक श्वास घुटमळत असतात. दुसऱ्याचे श्वास आपल्या मौनाखाली गुदमरत असतील तर, मौन तोडावं. रोहन मी जे काही विचारलं त्याचं उत्तर हवंय मला. काहीतरी बोल. प्लीज"
पण रोहन काहीच बोलत नाही हे पाहून थोडा राग आलाच तिला. पण त्यात त्या बिचाऱ्याची काय चूक असे वाटून ती शांत झाली.
म्हणाली, "कसं असतं न? बायका गजऱ्यात फुलं माळतात. गजरा वापरून झाला की, फुलं कोमेजतात. एकदा कोमेजलेली फुलं पुन्हा वापरतं का रे कोण? मी चुकले. स्वतःच्या पायऱ्या सोडून वागले. त्याबद्दल स्वत:ची बाजू मी कधीच घेणार नाही. इतकंच सांगेन की, त्या क्षणी स्वत:चे सर्वस्व देताना मी फक्त त्याची होते. आनंदाच्या त्या क्षणी त्या क्षणाला देण्यासाठी माझ्या सर्वस्वाहून मोठी भेट माझ्याकडे नव्हती. मी ती बहाल केली आणि ती ही कोणताही विचार न करता. आनंदाच्या क्षणी बुद्धी परकी होते,कृती घडते. पण, जेव्हा बुद्धी टाळ्यावर येते, तेव्हा आनंद परका होतो."

बऱ्याच दिवसापासून मनात ठेवलेले भडभडा बाहेर काढले केतकीने. तशी केतकी इतके स्पष्ट बोललीच नसती. पण रोहनच्या बोलण्यातून थोडा धीर मिळाला होतं तिला. किमान हा तरी आपल्याला समजून घेईल अशी आशा होती त्या वेडीला.
"मला तुझ्यापासून काहीच लपवायचे नव्हते. पहिल्या भेटीत तुला मी हे इतके स्पष्ट सांगतेय कारण..." थांबली ती बोलताना.
"कारण?" भुवया उंचाऊन रोहनने विचारलं.
"कारण, योग्य वेळी स्पष्ट नाही बोललं की, भविष्यात अस्पष्ट वार सहन करावे लागतात. या जगाचेही आणि स्वत:चेच स्वतःलाही. सांग. अजूनही तू मला स्वीकारशील का रोहन?"

रोहन शांत होता. पण त्याच्याही मनात वादळं उठली असणार याची कल्पना केतकीला होती. वादळात एखादे झाड तोवर उभे असते जोवर त्याची मुळे भक्कम असतात. पुरुषाच्या बाबतीतही मुळं त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर भक्कम उभी असतात. पण, जेव्हा ह्याच चारित्र्यावर प्रश्न उभा राहतो, तेव्हा मात्र पुरुष पांघळा होतो, गडबडतो. केतकी हे सर्व जाणून होती.
रोहन सगळे ऐकूनही अस्पष्ट हसत होता. त्याचं हे हसणं आहे की, मनातलं रडणं आहे ह्याच विचारात केतकी होती.

"केतकी तुझ्यामते सर्वस्व म्हणजे नक्की काय सांगू शकशील का?"
रोहनच्या प्रश्नाने थोडी गडबडलीच ती. पण इतर कोणतेही उत्तर देण्याची तिची सध्या मनस्थितीच नव्हती.
रोहन म्हणाला, "सांग ना,तुझ्यामते सर्वस्व म्हणजे नक्की काय? शरीराला शरीर भेटतं. आनंदाच्या ज्या क्षणी ही शरीरं एकत्र भेटतात, तेव्हा ती गरज शरीराची असते की ती त्या क्षणाची? तू सर्वस्व गमावलं म्हणजे नक्की काय गमावलंस? त्या क्षणी तू त्याचाशी प्रामाणिक होतीस आणि या क्षणी तू माझ्याशी प्रामाणिक आहेस. तुझा स्वीकारायला मी तयार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण 'स्विकारणं' हा शब्द मला मोठेपणा आणि तुला तुच्छता देऊन जाईल. तू तुच्छ नाहीस कारण या क्षणी तू माझ्यासाठी एक दिव्य आहेस. मी मोठा नाही कारण यात माझा स्वतःचा स्वार्थ आहे. मी त्याग नाही करतंय. त्याग म्हणजे देणं. मी नक्की तुला काय दिलं? याचं उत्तर माझं माझ्याकडेच नाही."

रोहनचे बोलणे ऐकून केतकी अवाक होऊन ऐकत होती. काय बोलावं हेच कळत नव्हतं तिला. डोळे फक्त तराळून आले होते. कुणीतरी जास्त समजून घेतले की, जास्त प्रेमाची सवय नसलेले मन भरून येतेच.
रोहनचे ही डोळे आलेच होते भरून पण, स्वतःला सावरत तो म्हणाला,
"आता या क्षणी मी प्रियाची मनस्थिती काय असू शकेल हे समजू शकतो. लाजेच्या कित्येक पायऱ्या आम्हीही नकळत ओलांडल्या होत्या.
आमच्याही मनात त्या क्षणी काही पाप नव्हते. तीही कोणाला तरी हाच प्रश्न विचारत असेल का? मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, ही माझ्या स्वत:च्या चुकीची भरपाई आहे का? मी तुझ्याशी अजूनही लग्न करायला तयार आहे कारण तू तुझ्या भावनांशी प्रामाणिक आहेस. ज्याला स्वतःचे दु:ख कळते, त्याला समोरच्याचे दु:ख समजून घ्यायला जास्त वेळ लागत नाही."

पालवी जन्म घेत होती केतकीच्या मनात. गमावल्यावर पुन्हा कमावण्याचा क्षण हळवाच असतो.
तिचा होकार नजरेतून जाणला रोहनने.
म्हणाला, "केतकी, माणसांना चिडचिड करताना पाहतो आपण, पण या चीडचीड करण्यामागे त्यांना दुःखाचं न उलघडत असलेलं कारण कारणीभूत असतं.
ज्याने स्वत: गमावणं अनुभवलंय, ती व्यक्ती समोरच्याकडून सहसा काही हिसकावून घेत नाही. कारण, त्यामागचं दु:ख काय असतं हे ती व्यक्ती जाणून असते.
माझा पुरुषी अहंकार नक्की आडवा येतो. मी नाही म्हणणार नाही पण, तरीही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण फक्त एका अटीवर"
केतकीच्या भरलेल्या डोळ्यात तेव्हा प्रश्नचिन्ह होते, ओठांत शब्द अडकून होते. घड्याळातले काटे तेव्हा त्या दोघांना सोडून बाकीची दुनिया पुढे घेऊन जात होते.
मानेनेच "कोणती अट?" असा प्रश्न केतकीने केला.

"यापुढे आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तू माझ्याशी इतकीच प्रामाणिक राहशील. सौख्याच्या कोणत्याही क्षणी आपल्यासोबत मी नि तू सोडून इतर कुणीच नसेल.
प्रेमात तू माझी कधीच प्रतारणा करणार नाहीस. तुझ्या भूतकाळाचे भूत तू आपल्या भविष्याच्यामध्ये कधीच येवू देणार नाहीस. संसारातली वचने कागदावर लिहून घेता येत नाहीत. ती पाळणं न पाळणं आपल्या हातात असतं. तो एक गुप्त अबोल करारनामा असतो. तुझा भूतकाळ यापुढे परका असेल...तुलाही आणि मलाही. मी तुझ्याकडे तुझा भूतकाळ नाही तर तुझा भविष्यकाळ मागतोय. देशील?"

पुढे? पुढे काय झालं?
घरात आल्या आल्या अंदाजाचे डोंगर बांधणाऱ्या केतकीच्या आईने प्रश्नांचे भांडे केतकी समोर रिकामी केले.
"केतकी, आलीस? आता तरी घेतलास का निर्णय? सांग माझ्या आई एकदाचं काय ते. 'हो' तरी बोल नाहीतर 'नाही' तरी बोल. जीव टांगणीवर लागलाय बघ कधीचा!"
"आई, लग्नाच्या तारखा व्यवस्थित ठरव हा. मला ऑफिस मधून जास्त सुट्टी नाही मिळणार गं. जास्तीत जास्त चौदा दिवस सुट्टी मिळेल."
लाजत आत गेली ती.

या चौदा दिवसानंतर केतकी समोर भविष्यकाळ उभा राहणार होता की भूतकाळ? खरंच भूतकाळ कधी पाठलाग करणं सोडतो का? स्वीकारण्याबाबतचा जो प्रश्न केतकीला विचारावासा वाटला, तोच प्रश्न रोहनला का विचारावासा वाटला नाही? पुरुषाला या गोष्टी माफ असतात का? अश्या क्षणी पुरुष काहीच गमावत नाही का?

-- आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्षक नाही पटले. काहीतरी वेगळे असायला हवे होते पण नक्कि काय ते सुचत नाही आहे.
सुचल्यावर सांगते.

सलग संवादात परिच्छेद विस्कळीत का आहे ? एक वाचक म्हणून विचारतोय. गै.स. नसावा. अशाने पुढे वाचण्याची इच्छा होत नाही. पुढील लिखाणास शुभेच्छा !

कंसराज धन्यवाद. Happy

तृष्णा : नक्की सुचवा नवीन नाव...

एक प्रतिसादक : पुढच्या वेळी ही चूक नक्की टाळेन, शुभेच्छा बद्दल धन्यवाद Happy

कथा छान आहे. आपण म्हटले त्याप्रमाणे भुतकाळाचे ओझे वाहु नये हे खरे पण असे 'नेहेमी' शक्य आहे का? हा प्रश्ण आपण म्हटल्याप्रमाणे आहेच. ज्या समाजात बहुतेक जण लग्नापुर्वी संबंध ठेवतात तिथे हे प्रश्ण एवढे तीव्र नसतात.
पण ज्या समाजात हे प्रमाण अर्ध्यावर आहे तिथे हे जास्त कठीण होउन बसतात.

आवडली.
मूळात स्त्री चे चारित्र्य, पुरूषाचे चारीत्र्य हा प्रश्न नसून केवळ शरीराने एक झालो नाही म्हणून आपण सर्वस्व गमावले नाही किंवा शरीराने एक झालो म्हणजे आपण बाटलो हा विचार चुकीचा आहे.
जेव्हा तुम्ही मनाने एखाद्याशी एकरूप होता तेव्हा तुम्ही सर्वस्व बहाल केलेलंच असतं. या नंतर येणारा दुसरा हा दुसराच असतो. असं माझं मत आहे.
शरीराने दुसर्याचे हा व्यभिचार आणि केवळ मनाने दुसर्याचे हा सदाचार , संयम , पावित्र्य हेच मला पटत नाही.

साती:
असे होऊ नये....पण समजा....
उद्या तुम्हाला हि तुमच्या पार्टनरबद्दल असे काही कळले तर....तुम्हाला काहीच वाटणार नाही का?
तुम्हीं त्याला माफ कराल का?
जर माफ नाही करणार असशाल तर मग, त्यामागचे कारण काय असेल?
त्यांनीही जे काही केले असेल ते मनापासूनच केलेले असणार .... मग तुम्ही का माफ नाही करणार?