हिलरी-ओबामा येती घरा..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"शिक्रेट मीटिंग चालू आहे, location undisclosed" अशी ब्रेकिंग न्यूज ऐकलीत की नाही काल रात्री? ही मीटिंग म्हणजे अशीतशी नाही, हिलरी आणि ओबामाची. 'पुढे काय?' ते ठरवायला हो. आता कोणी म्हणाल त्यात काय ठरलेच आहे की, ओबामा जिंकला! पण तसं नाही, त्याच्याही पुढचं, म्हणजे हिलरीला यायचे आहे का व्हीपी म्हणून, ओबामाला घ्यायचे आहे का तिला व्हीपी म्हणून असं सगळं 'काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात' मीटिन्ग! तर तशी ती चालू होती काल रात्री कुठेतरी असा सुगावा लागला सगळ्या न्यूज चॅनेल्सना. पण हे एकदमच शिक्रेट ठेवले होते, clandestine meeting! अगदी 'अँडरसन तीनशे साठ' ला सुद्धा माहित नव्हते कुठे ते. पण मला माहित होते! कसे? तर ही मीटिंग झाली आमच्याच घरी!
*************

संध्याकाळचा सुमार, दरवाजावर थापा ऐकू आल्या. इथे सहसा असे अचानक कोणी उगवत नाही, पण आमचे घर म्हणजे 'हापूस आंबे पिक अप लोकेशन' झाल्यामुळे संध्याकाळी तरी आम्ही घरी असणारच असं समजून आजकाल अशा दरवाजावर थापा पडतात. आणि थापाच पडण्याचं कारण असं की आमची डोअरबेल बिघडली होती! एकाने दरवाजातून सेलवरुन फोन केला की मी बाहेर आलो आहे, तर म्हटलं आता आलाच आहात तर बेल वाजवायची फोन नसता केला तरी चाललं असतं तर ते म्हणाले, 'खूप वेळा वाजवली, बेल वाजत नसावी'. मग नंतर ज्यांचे फोन आले त्यांना मी मुद्दाम सांगितले की बेल वाजत नाही आहे. त्यात एकजण '२ आंबे खराब निघाले, रिप्लेस करायला येतो' म्हणाला होता. नोट पण लावणार होते 'बेल वाजत नाही, फोन करा' पण ती लगेचच फिक्स झाली, म्हणून मग 'वाजते, वाजवा' अशी (मराठीत) नोट लावली.
तरी थापाच.
मी आतूनच ओरडले, "बेल वाजते आहे"
पुन्हा थापा..
"बेल वा ज ते आहे!"
'वाचता येत नाही का' म्हणून वैतागून दार उघडलं तेव्हा २ धट्टेकट्टे पण साध्याच कपड्यातले गोरे मी 'या' म्हणण्यापूर्वीच कसलेतरी बॅज दाखवत घरात घुसले. त्यांना वाचता आले नसावे किंवा बेल वगैरे वाजवणे त्यांच्या प्रोसिजर मध्ये नसावे. तसेच ते आंबे न्यायला आलेले नसावेत हे लक्षात आलं माझ्या पण एकूण त्याच संदर्भात काहीतरी असणार असं वाटलं.
"हे पहा, हे सगळे आंबे कायदेशीररीत्या सगळी प्रोसेस होऊन इथे आलेले आहेत, आणि लोकांना न्यायला सोयीचे जावे म्हणून मी घरात ठेवलेत. इथे कोणत्याही प्रकारचा लॉ ब्रेक वगैरे झालेला नाही."- मी.
माझ्या बोलण्याकडं फारसं लक्ष न देता ,"घरात तुम्ही एकट्याच दिसता?" त्यातल्या एकाने विचारले.
"हो, का?"
"आम्ही काय सांगतो ते नीट ऐका" असं म्हणून पुढची काही मिनिटे त्याने एकंदर हा काय प्रकार होता त्याची माहिती दिली.
माझ्या डोक्यात शिरलं ते असं- हिलरी आणि ओबामाला ही मीटिंग घ्यायची होती. कोणाला कळू न देता. एखाद्या 'शिक्रेट' ठिकाणी. डीसी नको वाटले कारण तिथल्या कानाकोपर्‍यात काय चालते यावर मिडियाचे कायम लक्ष! त्यामुळे हे गोपनीय राहील याची ग्यारंटी नाही. मग ओबामा म्हणाला व्हर्जिनियात चालेल कारण तो होता इकडेच प्रचार करत. हिलरीने ते मान्य केलं पण म्हणाली की नेमकी कुठे ते ती ठरवेल. मग माझे नाव हिलरी कँपकडून सुचवले गेले. मी 'ब्लॅक' किंवा 'व्हाईट' नाही आणि independent आहे इत्यादी कारणांमुळे शेवटी माझे घर ठरले. मी हिलरी कँपेनमध्ये होते ही माहिती बहुतेक ओबामाला दिली गेली नसावी. माझ्याशी बोलणारे हे दोघे म्हणजे सिक्रेट सर्व्हिस, सुरक्षा रक्षक किंवा तत्सम काहीतरी होते. हिलरी आणि ओबामा बाहेर थांबलेल्या एका मोठ्या अमेरिकन मेकच्या गाडीत वाट पहात होते. माझ्याशी बोलून मग त्यातला एकजण हिलरी आणि ओबामाला बोलवायला बाहेर गेला.
.
मला हे सगळं जरा अनपेक्षित आणि exciting वगैरे असल्यामुळे मी जरा गडबडून गेले. त्यांना कुठे बसायला सांगावं याचा विचार होते तोवर ते आलेच. ओळखपाळख, शिष्टाचार झाले.
"मला माहित नव्हते व्हर्जिनियातही इन्डियन आहेत, आधी कुठे होता तुम्ही? डकोटा मध्ये का?" ओबामाने विचारले.
"नाही, इन्डियातच होते" मी गोंधळून उत्तर दिले.
मग हिलरीच म्हणाली, "त्या 'इन्डियन' म्हणजे इन्डियन अमेरिकन आहेत, अमेरिकन इन्डियन नव्हे. एशिया मध्ये देश आहे ना इन्डिया, तिथल्या आहेत त्या!" मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि ओबामाच्याही.
"ओह, ओके, ओके. आय नो, आय नो व्हेअर इट इज.." ओबामा.
"मी तर तिथे २,३ वेळा जाऊन सुद्धा आले आहे!" हिलरीने ओबामाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत म्हटले.
"इराकला जाणार ना, तेव्हा तिथेही एक चक्कर टाक."
"मी नक्कीच प्रयत्न करेन, इट इस जस्ट नेक्स्ट डोअर."
"तो इन्डिया नव्हे, तो इराण! आता इराणबद्दल काही बोलायला नको. जरा अभ्यास कर."
.
मी मनात म्हटले, अरे देवा, कशी होणार आहेत negotiations! मग वातावरण थोडं हलकंफुलकं करायला आणि आदरातिथ्य दाखवायला मी चहापाण्याचा विषय काढला. ओबामानेही हिलरीला म्हटले कॉफी घेऊ पण ती म्हणाली की हल्ली तिला फक्त बिलच्या हातचीच कॉफी चालते. मग ओबामा म्हणाला की तो ब्लॅक कॉफी घेईल. त्यावरुनही हिलरी काहीतरी बोलणार तेवढ्यात तिने विचार बदलला.
मग मी म्हटले, "आता तुम्ही जेवल्याशिवाय काही जायचं नाही, तुमची बोलणी चालूदेत तोवर मी स्वयंपाक करते."
हिलरी व्हाईट हाऊस मध्ये असतानाच्या त्यांच्या chef ने एक पुस्तक लिहीले आहे ते मी वाचले होते, त्याची नेमणूक हिलरीनेच केली होती आणि त्या पुस्तकात तिच्या आवडीच्या पदार्थांच्या रेसिपीजही होत्या त्यात इन्डियन स्टाईलचे चिकन तिला आवडते असे लिहीले होते मग मी तेच करायचे ठरावले. हे सगळे मी तिला सांगितल्यावर हिलरी एकदम खूष झाली.
"मी राजकारणात पडल्यापासून, म्हणजे सेव्हेन्टीज पासून इतकी जगभर फिरले. इतके वेगवेगळे cuisine ट्राय केले. बिलबरोबर व्हाईट हाऊसमध्ये असताना तर डीसी मधल्या छान छान restaurants मध्ये गेले. इन्डियन फूड माझ्या अगदी आवडीचे! It is one of the best!"
"Yes, yes. I agree!" इति ओबामा.
हिलरीचा 'तुला काय माहित?' असा प्रश्न येण्यापूर्वीच त्याने स्पष्ट केले की शिकागोमध्ये त्याने खाल्ले आहे इन्डियन फूड. कधीकधी 'Change' म्हणून त्याला ते आवडतेही!
मग हिलरी मला म्हणाली, "डियर, त्याला विचारुन घे, त्याला काही अनुभव नाही, तो कधीच व्हाईट हाऊस मध्ये नव्हता त्यामुळे त्याच्याबद्दल तशी काही माहिती तू वाचली नसशीलच!"
इतक्यात मला सुचले की त्याच्यासाठी आमरस करावा. विचारल्यावर तो आनंदाने हो म्हणाला. हवाईत असताना त्याला आंबे खूप खायला मिळायचे. वर माझ्या आतिथ्यशीलतेचे त्याने फारच कौतुक केले, तेव्हा 'त्यात काय, I am not from that 'विशिष्ठ' गाव' you know!' असं बोलून जाणार होते पटकन् पण सुरवातीच्या संभाषणावरुन एकंदर भौगोलिक ज्ञानाची कल्पना आली होती, पुन्हा हे 'विशिष्ठ' काय आणि कुठे आले हे सांगून आणखी गोंधळात भर नको म्हणून आवरले. 'तसा तो चांगला आहे पण अधूनमधून त्याचा गोंधळ उडतो' असं कुठंतरी नुकतंच वाचलंही होतं. मला जरा त्याची दयाच आली!
.
मी त्यांना स्टडीरुममध्ये मीटिंग घेण्याबद्दल सुचवले. यावर हिलरीने शंका बोलून दाखवली की समजा... समजा माझा आवाज चढला तर शेजारपाजार्‍यांना त्रास होईल. बाईचा आवाजच तसा असतो, पण काहींना कर्कश्श वाटतो, त्यात वाद होण्याची शक्यता. तर मी म्हटले की त्याबद्दल काळजी नसावी, शेजारपाजार्‍यांना सवय आहे, ते नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतील. ओबामा म्हणाला की तो नेहमीच calm असतो. मग काळजीच नव्हती पण ते दोन धटिंगण गोपनीयतेबद्दल साशंक, मग ते म्हणाले की तुमच्या तळघरातल्या खोलीत घेऊन जा. माझ्या 'अय्या, तुम्हाला कसे माहित?' या प्रश्नावर 'आम्हाला सगळे माहित असते, बावळटासारखे प्रश्न विचारु नका' असा भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसला. आणि स्टडी नको म्हणाले ते एक बरेच झाले कारण 'हिलरी फॉर प्रेसिडेन्ट' वाले पोस्टर तिथे लावलेले आहे हे माझ्या आधी लक्षातच आले नव्हते. मग हिलरी-ओबामा दोघांना तळघरात बसवले, ओबामाला कॉफी दिली. धटिंगण म्हणाले आम्ही ड्यूटीवर काही खात पीत नाही. मी स्वयंपाकाला लागले.
.
मग नेमकी वाजली ती बेल! हा एक मित्र- आणि वैरी! कारण हा कट्टर ओबामा समर्थक, 'आंबे बदलून पाहिजेत' म्हणून हजर. आता एवढे घेतले त्यातले २ खराब निघाले तर कुठे आता बदलत बसावे? ते नाही! मिळतायत तर का सोडा? मग वरुन एक दोन काळे डाग पडलेले आणि जर मऊसर लागणारे दोन आंबे मला त्याने दिले. म्हटलं अगदी काही दाखवायला आणायची गरज नव्हती, नुसते सांगितले असते तरी दिले असते. त्यावर तो म्हणालाच की अजून एक खराब होता पण चिरल्यावर कळले! मग मी काही न बोलता त्याला २ घेऊन ३ दिले, 'गाडी कुणाची? हे दोघे(धटिंगण) कोण?' इत्यादी भोचक प्रश्नाना 'ऑफिसातले लोक, आंबे न्यायला आलेत' वगैरे संयमाने उत्तरे दिली. तरी अतिचांगल्या वागण्याने अगदीच संशय येऊ नये म्हणून दोनचार टोमणे मारुन त्याला फुटवले.
.

तेवढ्यात आमचे कुटुंबीय आले. त्यांना थोडक्यात सगळे समजावले. धाकट्याला वाटले 'हिलरी' म्हणजे 'डफ' आली आहे, पण 'क्लिंटन' नाव अनोळखी वाटले त्यात त्याला खाली खेळायचे होते, ते करता येणार नाही म्हणून तो वैतागला. थोरल्याने मीटिन्ग संदर्भात 'why' वाले उत्तर देता न येणारे, पुन्हा 'एका वोटर ला एकच मत का देता येते, आयडॉल सारखी सिस्टीम का करत नाही' वगैरे प्रश्न विचारले, मग मी वैतागले. त्यांना पिटाळले टीव्ही पहायला. आमचे हे काहीतरी पीत Fox News channel बघत होते. तिकडे आणि सगळीकडेच एव्हाना 'ब्रेकिन्ग न्यूज्-सिक्रेट् मीटिन्ग' सुरु झाले होते आणि ठिकाण म्हणून दाखवत होते हिलरीचे घर!
माझा स्वयंपाक होत आला, आमरसच करायचा राहिला होता. अगदीच साधे २-४ पदार्थ नको, संधी आली आहे तर जरा 'कौशल्य' दाखवावे म्हणून मग मी काही बटाटेवडे (हे पाश्च्यात्याना आवडतातच), खास कोल्हापुरी मिसळ, वालाचे बिरडे, मुळ्याची कोशिंबीर, श्रीखंड-पुरी, भात असा बेत केला. 'मेनू काँबिनेशन' जरा नाविन्यपूर्ण आहे पण म्हणूनच ते for a change म्हणून निदान ओबामालातरी आवडेल असे वाटले, हिलरीची आवडती चिकन डिश होतीच. तेवढ्यात एक धटिंगण खालून वर आला अन् मला म्हणाला तुम्हाला बोलावले आहे खाली. त्यांची काय चर्चा चालू असेल याबद्दल मला उत्सुकता होतीच.
.
हिलरी कपाळ धरुन बसली होती आणि ओबामा मख्ख, हट्टी चेहर्‍याने बसला होता. काही मार्ग सापडल्याची चिन्हे दिसत नव्हती. मला बघून ते दोघेही म्हणाले, 'तुमची मदत लागेल'. हिलरी म्हणाली, "माझे डोके दुखू लागले आहे आता. किती समजावले तरी याच्या डोक्यात प्रकाश पडतच नाही आहे."
"तरी मी सांगत होतो सुरवातीलाच की कॉफी घ्यावी म्हणून." पुढे "इराकचेही मी सांगितले होते आधीच" असे ओबामा पुटपुटला.
"पण आता काय उपयोग, आता ऑलरेडी दुखायला लागले आहे ना डोके?"
मग मी त्यांना एक उपाय सुचवला की मी पटकन जेवण आणते. दोन घास पोटात गेले की बरे वाटेल, जेवत जेवत चर्चा करता येईल पाहिजे तर. भरल्या पोटी वेगळे मार्ग सुचतात. ते त्यांनी मान्य केले. पटकन वर येऊन मी आमरस केला आणि बाकीच्याना 'हवे ते जेऊन घ्या' सांगून मी जेवण घेऊन हिलरी-ओबामाकडे आले.
.
जेवत जेवत हिलरी म्हणाली, "तुझी मदत अश्याकरता हवी होती की मी सांगायचा प्रयत्न करते आहे, मला तिकिटावर यायला आवडेल. We have better chance to beat McCain together. हा एकटा काय करणार आहे? वक्तृत्व, अनुभव सगळ्याची मारामार. पुन्हा माझ्याशिवाय पार्टीत आहे का कोणी दुसरा चांगला उमेदवार? जॉन तर एकदा हरुन बसलाय. तो बिल! 'रिचर्ड्सन' म्हणतेय मी! तो टपूनच बसलाय व्हीपी व्हायला, आधी माझ्यामागे होता, मग हा जिंकायला लागल्यावर ह्याच्याकडे पळाला. लोकांना कळत नाहीत का या गोष्टी? कोण मत देईल? आणि एवढा सगळा स्त्रीवर्ग माझ्या पाठीशी आहे. तर मी असायलाच हवं तिकिटावर. आता तूच सांग, तू देशील का याला मत मी नसेन तर?"
माझ्याकडून उत्तराची अपेक्षा असावी पण असं पटकन 'नाही' कसं म्हणणार म्हणून मग मी 'काही हवं का, काय वाढू' असा विषय बदलला. हिलरी म्हणाली Everything is delicious, पण 'माझे डाएट चालू आहे, मी थोडंच जेवेन' असं म्हणत चिकनवर मात्र ताव मारला. मग मी ओबामाला आग्रहाने वडे, मिसळ बिरडे, आमरस खायला लावले. 'तुमचे काही डाएट वगैरे नाही ना, मग घ्या घ्या. खाणार्‍याने भरपूर खाल्ले की केल्याचे समाधान मिळते बघा.' माझा आग्रह त्याला मोडवेना, पुन्हा मी अजून उत्तरही दिले नव्हते. मी त्याच्या बाजूने बोलेन अशी त्याला आशा असावी.
पण मग मीच त्याला विचारलं, "तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला पटते का हे सगळे?"
"मला तसे पटते हो, त्यांना तिकिटावर घ्यायला माझी काहीच हरकत नाही तशी.."
"मग काय, प्रॉब्लेम कुठे आला?
"अहो, पण त्या म्हणतायत की त्या प्रेसिडेण्ट होणार आणि मी vice president! हे मी का मान्य करु?"
मी उडालेच! पण तसं दाखवलं नाही. पण मानलं बाईंना!. काय डेअरिन्ग! मते तशी तिच्याकडेही भरपूर आहेत म्हणा. आणि मिशिगन धरले तर पॉप्युलर वोट्स सुद्धा! पण आयडिया काही वाईट नाही. ओबामाच्या गळी कशी उतरवावी हा प्रश्न, आणि यात माझी कशी मदत होईल.. मग मिसळीचा कट वाढत मी बोलायला सुरवात केली-
"मला असं वाटतं, त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिले जाते समाजात हे स्त्रियांना आवडत नाही. त्यामुळे बाईंना तुम्ही व्हीपीपद दिले तर काहीच फरक पडणार नाही, स्त्रियांचा रोष राहीलच, त्या मते देणार नाहीत आणि दोघेही पडाल! तेव्हा काय हरकत आहे? ८ वर्षांनी तुमचा टर्न येईलच पुन्हा, तेव्हा तर तुम्ही अगदी अनुभवीही झालेले असाल, वयही वाढले असेल. मग तेव्हा तुम्हाला कोणाच्या आधाराचीही गरज भासणार नाही! तेव्हा तुम्ही सिरियसली विचार करा, नाहीतर मी काय तुम्हाला मत देऊ शकत नाही!
हे ऐकल्यानंतर ओबामाला मिसळीच्या कटाचा जोरदार ठसका लागला.
"अरेरे, सावकाश. पाणी घ्या. तिखट लागलं का? असं करा तुम्ही गोड आमरस खा त्यावर मग बरे वाटेल. तुमच्यासाठीच आहे, थोडाच राहिलाय आता सगळा संपवून टाका पाहू. श्रीखन्ड पण घ्या जरा म्हणजे तिखटपणा कमी होईल."
मग ओबामा आमरस आणि श्रीखन्ड खात असताना पुन्हा हिलरी आणि मी आपापल्या परीने त्याला हाच मार्ग कसा बरोबर आहे ते समजावण्याचा प्रयत्न केला.
त्या भडीमाराने तो बावचळून गेला, मग काहीतरी सुचल्यासारखे म्हणाला,
"तुमच्या मिस्टरांना बोलवा बघू, त्यांचेपण मत घेऊ यावर. ते देतील का मला मत?"
"आता त्यांना कशाला आणता मध्ये उगाच? माझे मत तेच त्यांचे मत! आणि इथे आपण बायकांच्या मताबद्दल बोलतोय ना? मग?" - मी.
"May I use your bathroom?" - ओबामाने जरा खजील होऊनच विचारले. मग मी त्याला बाथरूम दाखवून आले.
ओबामा गेल्यावर हिलरी मला म्हणते, "Thanks for your help, गं. बघ आता कसा गोंधळलाय. काही क्लीअर मतेच नाहेत, नुसती पाठ करुन भाषणबाजी करतो, आता बोलती बंद! बघ ना, आता विचार करत बसला असेल आत म्हणून इतका वेळ लागतोय! आज काहीतरी डिसिजन झालाच पाहिजे. मला भाषण करायचंय दोन दिवसात."
आम्ही ओबामा परत यायची वाट बघत बसतो, मग एकदाचा तो येतो. चेहर्‍यावर अगदीच 'गरीब' भाव. मग उभ्याउभ्याच बोलायला सुरवात करतो,
"मला हा निर्णय घेताना थोडं दु:ख होतं आहे, यू नो, यंदा मलाच हक्क होता प्रेसिडेन्ट व्हायचा पण देशासाठी, पार्टीसाठी आणि स्त्रियांसाठी मी व्हीपी व्हायला तयार आहे, हिलरी या प्रेसिडेंट होतील. तसे मी माझ्या पार्टीला लगेचच कळवेन. झाला ना एकदाचा निर्णय? तर मग चला, उशीर झाला आहे तेव्हा आपण निघूया का आता?"
मला असे काही लगेच होईल अशी अपेक्षाच नव्हती त्यामुळं मी म्हटलं त्याला की पूर्ण विचार केलायत ना कारण मला वाटले जरा गडबड केली, अजून वेळ घ्या म्हणजे नंतर 'माझ्यावर दबाव आणला' वगैरे नको. यावर हिलरी जरा वैतागल्याचे माझ्या लक्षात आले पण ओबामा निर्णयावर (म्हणजे 'झाला एकदाचा' यावर) पक्का होता त्याने निघण्याबद्दल घाई सुरु केली.

आम्ही सगळे वर आलो, निर्णय झाल्याचे सांगितले. धटिंगणही आनंदले, 'संपले एकदाचे' म्हणून कारण ते नुसते बसून बसून कंटाळले होते. ओबामाने आमचे आभार मानले आणि लगेच गाडीत जाऊन बसला. हिलरी आनंदात होती, मुलांशी बोलली. 'Fox News' चॅनेलकडे दुर्लक्ष करुन आमच्या ह्यांचे आभार मानले, मग हे हिलरीला म्हणाले, "तुमचे मिस्टर नाही आले? त्यांना पण आणायचे ना.. मला कंपनी मिळाली असती." मग हिलरी "नाही, ते नाही आले." असं हसतहसत म्हणाली पण खरे कारण 'हल्ली त्यांना कुठे काय बोलावे कळत नाही म्हणून मी त्यांना कुठे नेत नाही' हे मला बरोब्बर माहित होते. जाता जाता हिलरीने मला हळूच कानात "कँपेनचे काम आहेच, चालू ठेव!" असं म्हणत डोळे मिचकावले.

ते निघून गेल्यावर मी सगळी आवराआवर करत विचार करु लागले. 'क्या निर्णय था! एकदम Dream (ticket) come true! हे सगळे होऊन गेले आहे नुकतेच आणि ते सुद्धा आपल्या घरी! अश्या ऐतिहासिक निर्णयाचे आपण साक्षीदार आहोत आणि म्हटलं तर आपला थोडा हातभारही आहे त्यात याचा फारच अभिमान वाटला. घराला 'निर्णय झाला ते ठिकाण' म्हणून कालांतराने किती महत्व येईल. मग आपले घर हे एक 'ऐतिहासिक महत्वाचे टुरिस्ट लोकेशन' म्हणून डेव्हलप करता येईल का, लोक व्हाईट हाऊस पहायला आले की आमचेही हाऊस पहायला येतील. नाममात्र शुल्क आणि/किंवा दानपेटी वगैरे ठेवता येईल, वगैरे वगैरे... पण अगदी 'लाँग डे' झाल्यामुळे थकले होते त्यात उद्या कामावर जाण्याची तयारी, शाळेची तयारी, आंब्याचे हिशेब ठेवणे इत्यादी शिल्लक होते. मग त्या आंब्याच्या हिशेबावरुन आठवले ते परत आलेले २ आंबे आणि दिलेले ३ लिहून ठेवायचे होते. पण ते परत आलेले २ आंबे काउंटर वर ठेवले होते ते कुठेच दिसेनात. चुकून पुन्हा पेटीत ठेवले गेले की काय म्हणून मी शोधायला लागले. पण कुठेच सापडेनात... गार्बेज कॅन मध्येही नाहीत... मग मला एकदम भीतीने धडधडायला लागले आणि मन काळजीने ग्रासले...
आमरस आपण शेवटी जरा गडबडीतच केला. दोन आंबे वरच दिसले म्हणून एक पेटीतून काढला आणि ओबामापुरता रस केला. म्हणजे ते दोन खराब आंबे रसात गेले होते! अरे देवा! घरी आलेल्या एवढ्या महत्वाच्या पाहुण्याच्या बाबतीत आपल्या हातून चुकून असे कसे झाले!? मी शप्पथ सांगते हो, हे चुकूनच झाले. 'कौशल्य' दाखवायची संधी आहे म्हटले तेव्हा मला 'पाककौशल्य' च म्हणायचे होते आणि माझा इरादा अगदी 'पाक' च होता!

त्याने शेवटी "घाईघाईने" निर्णय का घेतला त्याचे कारण मला उमगले! ओबामा त्याचा निर्णय आता पार्टीला सांगेल, मग जगाला सांगेल. त्यामागची कारणेही देईल. पण खरे कारण कधी देऊ शकेल का? त्या माझ्या 'ओबामा समर्थक' मित्राला हे कळले तर या निर्णयाला आपण अप्रत्यक्षरित्या कारणीभूत झालो याचे त्याला किती क्लेश होतील!

पण सध्या तरी या ऐतिहासिक बैठकीतल्या अंतिम निर्णयामागचे रहस्य त्यालाच माहित आहे, आणि मला!

समाप्त.

(संपूर्णपणे काल्पनिक. कोणाला खरे वाटण्याची शक्यता नाही, पण सांगितलेले बरे! Happy )

विषय: 
प्रकार: 

वॉव.. क्या बात है... चल येवु दे वृतांत... Happy
- अनिलभाई

खरच की काय???!! लिही लिही लवकर!! Happy

लालुताई राSSSजे जिंदाSSSबाद.
लालुताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. (म्हणजे हमको भी साथ लेलो).
काल लई वेळा सिऐनैन लावले काही कळले न्हवते.

वा लालू, तुझी एकदम पोचलेल्या माणसांबरोबर ऊठबस आहे तर Happy

वा लालू, तुझी एकदम पोचलेल्या माणसांबरोबर ऊठबस आहे तर <<<< अहं! ओबामा आणि हिलरीची 'लालू'बरोबर ऊठबस आहे"! Happy
तर कधी पूर्ण करतेस? चला 'ते' नाही लिहिलं तरी 'हे' चालवून घेऊ! Proud

Happy
Teasers देऊन गायब व्हायची सवय चांगली नाही. Happy

लालू, भन्नाटच !! तुझ्याकडून या लढतीबद्दल ऐकायला आवडेल असं पीपीवर म्हणालो तेव्हा एवढं आतल्या गोटातलं अपेक्षित नव्हतं Happy वृत्तांताची आतुरतेने वाट बघत आहे Happy

    ***
    असेच काही द्यावे घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा
    - इंदिरा

    लालू, पटापट लिहा मिटिंगचा वृत्तांत.

    लालू, क्या बात है...
    लवकर लिही ग बाई, वाट बघतेय.

    लिहीलं आहे. Happy आवडून घ्या.

    'तसा तो चांगला आहे पण अधूनमधून त्याचा गोंधळ उडतो'
    तरी अतिचांगल्या वागण्याने अगदीच संशय येऊ नये...
    .
    proud.gif
    .
    मस्तच लिहिलय एकदम!!

    आवडून घेतलं. Happy

    (वाचायला चांगलं लागलं, आणि अजून तरी पोट बरं आहे.) Proud

    अग, हे धम्माSSSल लिहिलं आहेस!! खुपच आवड्या!! Happy

    'हल्ली त्यांना कुठे काय बोलावे कळत नाही म्हणून मी त्यांना कुठे नेत नाही' Lol Lol

    हाहा.. लई झक्कास जमलय लालू.

    Rofl Rofl गंडवल आम्हाला. मिंटींग मात्र आवडली.

    :):स्मित: उदे आई उदे !! चांगलीच खेचलीयेस की !!
    >>> 'Fox New' चॅनेलकडे दुर्लक्ष करुन आमच्या ह्यांचे आभार मानले..... Happy

      ***
      असेच काही द्यावे घ्यावे
      दिला एकदा ताजा मरवा
      देता घेता त्यात मिसळला
      गंध मनातील त्याहून हिरवा
      - इंदिरा

      सही लिहिलस....

      मस्त लिहिलं आहेस लालू Lol

      >> "अहो, पण त्या म्हणतायत की त्या प्रेसिडेण्ट होणार आणि मी vice president! हे मी का मान्य करु?"
      >> "आता त्यांना कशाला आणता मध्ये उगाच? माझे मत तेच त्यांचे मत!
      --------
      lol लालू Happy
      मस्त जमलाय लेख...सुरूवातीला तर वाटलं खरंच असं काही झालं की काय Wink

      लालू, भन्नाट!

      काय भारी लिहिलंयत हो!
      एकदम धम्माल!!:):):):)
      ..प्रज्ञा

      लालु एकदम धमाल लिहीलयस, तु या वेळची निवडनुक खुपच मनावर घेतलेली दिसतेय Happy
      मजा आली..

      तु या वेळची निवडनुक खुपच मनावर घेतलेली दिसतेय स्मित >> अगदि अगदि Lol

      लालु मस्तच खूपच छान लिहिल आहेस!! धमाल आली.

      Pages