कंठलंगोट

Submitted by A M I T on 21 December, 2012 - 05:27

आमच्या डिपार्टमेंटचे हेड बदलले आणि माझे हेडेक सुरू झाले. त्याला कारणही तसंच होतं.
आमच्या नव्या साहेबाने आम्हांला टाय कम्पल्सरी केला होता आणि टाय नसलेल्या व्यक्तीस रि'टाय'र्ड करण्याची छूपी धमकीही दिली होती.
आता आली ना पंचाईत ! उभ्या जन्मात मला कधी बुटांची नाडी बांधता आली नाही तिथं टायची काय कथा !

पण नव्या नियमांचं पालन करून टाय खरेदी करणे क्रमप्राप्त होतं.
एका दुकानातल्या काचेच्या आत फायबरच्या की प्लास्टीकच्या मानवी आकृतीच्या अंगावर सुट-बुट विथ टाय मी बाहेरूनच पाहून इथे टाय नक्की मिळेल, अशी खात्री करून दुकानात प्रवेश केला.
दुकानात अजिबात गर्दी नव्हती. दुकानातील कामगार जणु माझीच प्रतिक्षा करत होते की काय? अशी शंका मला त्यांनी एकदम गराडा घातल्यावर आली.
"बोला काय देऊ?"
"टायची जोडी मिळेल का?" मी आवंढा गिळत विचारले.
"तुम्ही काय मोजे घ्यायला आलात काय जोडीने घ्यायला?"
"की अंडरवेअर?" त्यांच्यातल्या एकाने दुसर्‍याच्या कानात ही अंदर की बात कुजबुजलेली मी चोरून ऐकली.
पायातले जोडे काढून त्या तरूणाच्या डोईवर हाणण्याचा कार्यक्रम माझ्या मनात लवकरच बारगळला.
"उद्या तुम्ही टाय किलोवर किंवा डझनावर मागाल?" त्यांच्यातल्या एका वाह्यात तरूणाच्या या विनोदावर इतर मंडळी आपापली तोंडे लपवून फिस्सकन हसली.
'दुकानाचा मालक दुकानात नसावा' हे मी माझ्या अंतर्ज्ञानाने ताडले.
"बरं मग टाय कसा मिळतो इथे?"
माझ्यावर झालेले असंख्य विनोद मी बायकोने रांधलेल्या हरभर्‍याच्या सहजतेने पचवलेले आहेत.
"टाय शर्टच्या स्वभावानुसार खरेदी करायचा असतो." त्यांच्यातल्या एका पढतमुर्खाने माझ्यासमोर आपले तत्वज्ञान पाजळले.
"शर्टचा स्वभाव? तो आणि कसा ओळखायचा बुवा?" मी सचेतन-अचेतन या विषयावर चाललेल्या व्याख्यानात जिज्ञासुची भुमिका घेतली.
"अहो म्हणजे प्लेन शर्ट, चेक्सवाले शर्ट इ. इ." त्यांच्यातला दुसरा.
"हे पहा, माझ्या कुठल्याही शर्टच्या स्वभावावर औषध नाही." असं विसंगत विधान करून मी आपल्या पसंतीला मुरड घालून त्याने दाखवायला काढलेल्या पहील्या चार-पाच टाय घेऊन तेथून सटकलो.

पण लवकरच मला कळलं, टायखरेदीपेक्षा टायबांधणी हे प्रकरण भयंकर किचकट आहे.

खरेदी केलेल्या टायांपैकी (विद्वानांनी टायच्या अनेकवचनावर प्रकाश टाकावा.) प्रथम कुठला टाय गळ्यात बांधायचा? याची निवड आमच्या चिरंजीवांनी

आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर
चिंकीचा बापुस कवटाचोर

(प्रस्तुत ओळींमध्ये यमकाचा खटाटोप करणार्‍या रचनाकारास साहीत्याची 'ढाल' देण्याचा माझा विचार आहे.)

असले वाह्यात गीत गात त्यातल्या प्रत्येक शब्दागणिक प्रत्येक टायवर बोट ठेवत गीत संपताच ज्या टायवर बोट येईल, तोच टाय गळ्यात बांधायचा अशा विचित्र पद्धतीने केली.

निवडून आलेल्या टायला मी गळ्यात बांधून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आरशासमोर उभं राहून मी अनेक वेळा टायच्या गाठी बांधल्या आणि सोडल्या. पण टायबांधणीचं व्रत काही केल्या सफल होईना.
हा टाय अस्सा फेकून द्यावा आणि वाटल्यास भगवान शंकरांप्रमाणे गळ्यात आयुष्यभर सर्प मिरवावे, या निश्चयापर्यंत येऊन मी ठेपलो. मायबोलीवर "टाय कसा बांधावा?" असा धागा कुणी कसा काढला नाही? किंवा गेलाबाजार 'माझी टायस्टोरी' या किंवा अशा शिर्षकाचं एखाद्या पीडीत लेखकाने आत्मचरित्रही कसं लिहलं नाही? याचे राहून राहून आश्चर्य वाटले.
कधी टायचं एखादं टोक लांबच येत होतं, तर कधी टायच्या गाठीशी गाठच पडत नव्हती यामुळे मी अक्षरशः कंटाळून गेलो होतो.
कंटाळा आल्यावर इंग्रजीत 'टाय'र्ड म्हणूनच म्हणत असावेत कदाचित !

"अहो तो टाय आहे. टॉय नाही. खेळत बसलाय ते त्याच्यासोबत !" इतका वेळ माझ्या टाय बांधण्याच्या धडपडीकडे पाहत मटर सोलता सोलता सौ. म्हणाली.

ही इतकी बोलून दाखवते तर हिलाच टाय बांधायला का सांगू नये? असा विचार क्षणभर माझ्या व्यथित झालेल्या मनात आला. पण दिवाळीत लाडू बांधणे आणि वर्षाकाठी भावाच्या मनगटावर राखी बांधणे याउप्पर सौ.ला बांधाबांधीचा विषेश अनुभव नसावा.

'टाय अनादर डे' बांधावा का? असा विचार माझ्या मनात जवळजवळ 007 वेळा येऊन गेला.

अखेर मी चिरंजीवांस शेजारच्या श्रीयुत वागळेंना बोलावून आणण्यास पिटाळले. श्री. वागळे हे व्यवसायाने बिल्डर आहेत. काही क्षणांत श्री. वागळे आपल्या पत्नीसह अवतरले.
त्यांनी माझ्याच टायने माझाच गळा आवळण्याचा बरेचदा प्रयत्न केला. त्यांनाही टाय बांधणे जमले नाही. शेवटी त्यांनी टाय बांधण्याचा नाद आणि माझा टाय दोन्ही सोडून दिला.
"अहो तुम्ही इतक्या उंच उंच इमारती बांधता. मग तुम्हांला साधा टाय बांधता येऊ नये?" वास्तविक मी हे थट्टेने म्हटले होते, पण वागळेंनी वागळेंनी ते मनावर घ्यायचे ठरवले आणि तेव्हाच त्यांनी भांडणाचा श्रीगणेशा केला.
मला कुणी वाईट-साईट बोलत असताना गप्प बसतील तर त्या आमच्या सौ. कसल्या !
सौ. नी भांडणात उत्साहाने भाग घेतला. आता आमच्या इकडच्या सौ. सोनारकी झाल्यावर तिकडच्याही सौ.नी लोहारकी बनण्याचा पवित्रा घेतला आणि खर्‍या अर्थाने भांडणाला 'तोंड फुटलं'. भांडण सामुहिक झाले.
काही मिनिटांच्या शिव्या-शिवीनंतर अखेर सामना 'टाय' झाला. सौ. वागळे यापुढे आमच्या सौ.ना डोसा बनवायला पॅन देणार नाहीत, या भीष्मप्रतिज्ञेने भांडणाची सांगता झाली. अर्थातच माझ्या आगामी पगारात 'पॅन'चा खर्च वाढला.

'वागळे माझ्यासोबत असे का वागले?' असा प्रश्न संबंध चाळीला पडला.

वास्तविक आता इतक्या घमासानानंतर मी टाय बांधण्याचा विचार जवळजवळ रहितच केला होता. पण मी टाय बांधून वागळेंच्या दारापुढून ताठ मानेने जोवर जात नाही, तोवर सौ स्वस्थ बसणार नाहीत, असं त्या वारंवार पुटपुटत होत्या. सौ. इरेल्या की काय म्हणतात? तशा पेटल्या होत्या.
आता मात्र टाय हा चक्क प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता.
घराला घरपण देणारी माणसं दुरावल्यानंतर जीवाला जीव देणार्‍या माणसांची आता गरज भासू लागली. अनेक हौशी नाटकांत कधी डॉक्टर, कधी वकील अशा आणि तत्सम टायवाल्या पात्रांच्या भुमिका लिलया साकारणार्‍या नाट्यभैरव वसंत नटे याची योगायोगाने मला आठवण झाली.

वश्याने चाळीतल्या चार टाळक्यांसह प्रवेश केला. इतक्यात सौ.ने चहा टाकण्यासाठी स्वयंपाकघरात पळ काढला. वास्तविक हा वश्या नाटकात अगदीत सुमार अभिनय करतो. त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर, "पदरचे संवाद बोलून वेळ मारून नेतो की नाही बघच !"
पण वेशभुषा करताना तो टाय मात्र अगदी 'मापात' बांधताना मी प्रत्यक्ष पाहीलयं.
मी त्याला घरी बोलावण्याचं प्रयोजन सांगताच तो नाटकी हसला.
"लेका लग्नात टाय बांधला होतास की नाही?" वश्या.
"तेव्हा आताच्या सारखी सुटाबुटाची भानगड नव्हती तेव्हा सफारी. आणि लग्नात बायकोच्या गळ्यात मंगळसुत्र तेवढं बांधलं होतं. ते बांधलं तिच्या गळ्यात... परंतू फास मात्र माझ्या गळ्याला बसला, हे आता माझ्या लक्षात यायला लागलयं." सौ. स्वयंपाकघरात गेलेली पाहताच माझ्यातला मुंगेरीलाल** जागा झाला.
यावर उपस्थित मंडळी एकमेकांना टाळ्या वगैरे देत दिलखुलास हसली.
चहा आटोपल्यावर वश्याने टाय बांधण्याची मोहीम हाती घेतली. मोठ्या सफाईने वश्या इकडून तिकडे टाय फिरवीत होता.
"वश्या, इतक्या डोकेफोडीपेक्षा ऑफीसला निघताना बो लावत जाऊ का?" मी आपलं उगीचच विचारलं.
"कुणाला बोलावणारेस?"
"अरे बो ! बो ! फुलपाखराच्या आकाराचं असतं ना ते..!"
"लेका तू प्रितम रेस्टारंटमधला वेटर आहेस का बो लावायला?" असं म्हणून त्याने माझ्यावर आपले डोळे 'वेटर'ले आयमीन वटारले. "ऑफीसात टायच चालतो."
"टाय काय संबोधता लेको. कंठलंगोट संबोधा." असंख्य पुस्तके वाचून भाषा कोळून प्यायलेल्या चाळीतील एकमेव द्वीतीय ज्ञानसागर शास्त्री म्हणाला.
'ह्या मनुष्याला कधी सोप्या मराठीत बोलताना पाहीलयं' असं शपथेवर सांगणारा चाळकरी अजून भेटायचाय. म्हणजे साधं चिंपाट वा टमरेल म्हणायचं सोडून हा 'पार्श्वभागप्रक्षाळणजलपात्र' असं म्हणणार.
त्याच्या याच स्वभावाला वैतागून बायकोने म्हणे याला 'टाकले', अशी सबंध चाळीत वदंता आहे.

एकदा बांधलेला टाय वश्यानं पुन्हा सोडला.
"काय रे, काय झालं?"
"समोसा व्यवस्थित आला नाही."
"समोसा?"
"टायच्या गाठीचा आकार समोश्याप्रमाणे त्रिकोणी यायला हवा, तर म्हणावा टाय बांधून झाला, अन्यथा नाही."
या भौमितिक नियमानुसार मी मघाशी टायला मारलेल्या गाठी जिलेबीच्या आकाराच्या आलेल्या असाव्यात, याची मला पक्की खात्री पटली.
मग वश्याने दुसर्‍याच प्रयत्नात टाय बांधून दिला आणि माझा गळा दाटून आला. सोबत मला टायसंबंधी एक मोफत टिपही मिळाली. ऑफीसातून घरी आल्यावर टायची गाठ जराशी सैल करून टाय अलगद काढून ठेवावा. दुसर्‍या दिवशी ऑफीसला जाताना टायची गाठ घट्ट केली की झालं !

दुसर्‍याच दिवशी टाय बांधलेला मी वागळेंच्या घरासमोरून ताठ मानेनं गेलो. पण श्या ! त्यांचं दार बंद होतं. बघतिलच कधीतरी माझी टाय ! अशी मनाची आणि सौ.ची समजूत काढून मी ऑफीसला गेलो.
सगळ्यांच्या गळ्यात टाया पाहून नवा साहेब सुखावला.

"वा ! आज एक माणुस जंटलमन दिसतोय." ऑफीसातल्या केशरने ओठांचं चुंबन करत म्हटले.
मी तिच्या स्तुत्य टिकेकडे लक्ष न देण्याचं ठरवलं.

लंचला आम्ही मित्र आपापले डबे खात होतो. तोंडी लावायला टायचा विषय पुरेसा होता.
"माझा एक मित्र खिशात रूमाल असूनदेखील खुशाल टायनेच शेंबुड पुसतो." आमच्यातल्या एकाने त्याच्या मित्राचा वेंधळेपणा सांगितला.
"नाकाजवळ रुमालाच्या आधी टाय जलद पोहचू शकतो, असा साधा सोपा हिशेब असावा त्याचा." माझ्या या सिद्धांतावर उपस्थित मंडळींत एकच हशा पिकला.
आमचं टोळकं या हास्यरंगात बुडालेलं असताना आमच्यातल्याच एकाची टाय त्याच्याच डब्यातल्या आमटीत जाऊन कधी बुडाली? हे त्या टायला देखील कळाले नसेल.
"जा. 'टाय'पर बदलून ये." माझ्या या 'बाळ'बोध विनोदावर तर 'टायफ्राईडग्रस्त' मित्रासह इतर मित्रगण ऑफीस सुटेपर्यंत हसत होते, असं मला दिसून आलं.
तो सबंध दिवस टायसंबंधीचे किस्से सांगण्यात निघून गेला.

वश्याच्या तालमीत मला काही दिवसांत नीटनेटका टाय बांधता येऊ लागला आणि सौ.च्या निरीक्षणानुसार हल्ली माझ्या टायला बर्‍यापैकी 'समोसा'पण येऊ लागलाय ..!

( मुंगेरीलाल** : मायबोलीवरील विलक्षण विनोदबुद्धी असलेले लेखक.)

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जा. 'टाय'पर बदलून ये." Rofl

अम्या, आतापर्यंत कालपनिक बायको..आता चिरंजीव झाले का? Proud

Rofl

मस्त Lol

जबरी लिहिलय अम्या!! Rofl

रच्याकने, आभासी बायको झाली, चिरंजीव पण येउन गेले. आता एखादी आभासी कन्यका ही होउ दे! Proud

जबरी रे Happy अगदी 'कोटी'च्या कोटी उड्डाणे लीलया केली आहेस.
नाकाजवळ रुमालाच्या आधी टाय जलद पोहचू शकतो, असा साधा सोपा हिशेब असावा त्याचा>> Happy

आमच्यापण ऑफिसात बॉस ने नाही, पण एका टायपटूने 'आपण सगळे निदान दर गुरुवारी' टाय नेसून येऊया अशी टूम काढली होती, नंतर ती बंद पडली.

Pages