काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा

Submitted by बेफ़िकीर on 19 December, 2012 - 01:57

काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा
कुठूनही तू दूर कसा दिसतोस कळेना आकाशा

हारवलेल्या रस्त्यावरती सापडते पडकी टपरी
कभिन्न काळा इसम जगाला चहा पाजतो अन् जगतो
खिन्न किळसवाण्या वस्तूंवर छाप लक्झरीची छपरी
कासावीस बनत दर्पाने चहा मागुनी मी बसतो

आदळतो कप...

आदळतो कप दुर्दैवाच्या थाटाने अस्तित्वावर
इसम थुंकुनी बाजूला, "द्या चार रुपै सुट्टे" म्हणतो
टेबलवरची घाण पाहुनी मीही चिडतो इसमावर
भवतालाला शिव्या मोजुनी इसम जरा टेबल पुसतो

चहा भुरकुनी घाणतवाना होत निरखतो आकाशा
काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा

घाण स्वतःची विकणार्‍यांचे लेबल स्वच्छ कसे होते
मळक्या फडक्याने पुसलेले टेबल स्वच्छ कसे होते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है बेफिकिर एकदाम भारि....

घाण स्वतःची विकणार्‍यांचे लेबल स्वच्छ कसे होते
मळक्या फडक्याने पुसलेले टेबल स्वच्छ कसे होते
>>>>>>> सही आहे

क्या ब्बात है.....

घाण स्वतःची विकणार्‍यांचे लेबल स्वच्छ कसे होते
मळक्या फडक्याने पुसलेले टेबल स्वच्छ कसे होते

अफाट!!

कवितेतले तीन टप्पे अत्यंत प्रभावित करून गेले

-काही प्रश्नांचे उत्तर मी शोधत नाही आताशा
कुठूनही तू दूर कसा दिसतोस कळेना आकाशा
-आदळतो कप...
-घाण स्वतःची विकणार्‍यांचे लेबल स्वच्छ कसे होते
मळक्या फडक्याने पुसलेले टेबल स्वच्छ कसे होते

या तीन टप्प्यांच्यामधले काव्य कवितेचा डौल सांभाळत छान वळण घेते

कविता खूप आवडली