व्यसनी

Submitted by सत्यजित on 18 December, 2012 - 22:36

अजुनही आपसूक वळते
नजर त्या खिडकी पाशी
फरक इतकाच की
आता प्रश्न पडतात
तेंव्हा वादळं उठायची

आता नकोशी उत्तरं असलेले
नको ते प्रश्न
तेंव्हा हवीहवीशी असणारी
नको ती वादळं...

तशी खिडकी सामान्यच
पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती
पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता
नाधोंच्या कवितांतला पाऊस होता
बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता
ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती
त्या पलिकडे जाऊन
शब्दां शिवाय मनात रेंगाळत
रहाणारी 'एक' कविता होती

काही गोष्टी सवयीने
किती सवयीच्या होतात
तर काही गोष्टी
सवयी लावून जातात

मी इतकी वर्ष बघतो आहे
त्या खिडकी कडे
पण कधीच थांबलो नाही
पण...काल अचानक मनात विचार आला
की खिडकीतुनही कोणी बघत असेल का
इतकी वर्ष...? मी थांबायची वाट पहातं...

मगाशी म्हंटलं ना..
नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न

-सत्यजित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण...काल अचानक मनात विचार आला
की खिडकीतुनही कोणी बघत असेल का
इतकी वर्ष...? मी थांबायची वाट पहातं...<<< वा वा! अतिशय सुंदर पद्धतीने या प्रश्नापर्यंत आणते कविता.

धन्यवाद!

शब्दां शिवाय मनात रेंगाळत
रहाणारी 'एक' कविता होती>>>क्या बात है सत्याभाय! मस्त वाटल सकाळी सकाळी ही कविता वाचून

खूप आवडली.

काही गोष्टी सवयीने
किती सवयीच्या होतात
तर काही गोष्टी
सवयी लावून जातात >>> मस्त!

मस्त रे... रेंगाळणही सापडत नाही खिडकिही वेगळ्याच वाटे कडे तोंड कऋन बसते... पाउस असला तर ' साला अजुन विसेक मिनिटे उशिर' चा वायपर मनाच्या (?) काचेवर हलायला लागतो ...