........पांगळं सिंहासन.......

Submitted by ashishcrane on 14 August, 2012 - 05:18

........पांगळं सिंहासन.......

दुपारची झोप घेणं हा आता माझ्या रविवारच्या दिवसाचा एक भाग बनला होता.
वसूच्या हातचं सुंदर जेवण जेवल्यावर झोपेवर ताबा मिळवणं म्हणजे महा कठीण काम.
अशी बायको मिळायला नशीब लागतं....
बिछान्यावर पडलो आणि डोळा लागला.मधून कुठून तरी कसली तरी कुजबुज ऐकू आली तेव्हा जाग आली.
डोळे न उघडता आवाजाचा अंदाज लावता येतो का ते पाहूया म्हटले...
अरे ह्या तर साहेबांच्या पत्नी....माया वहिनी.....पण ह्या हे असं का सांगत्यात वसूला....
"नवरा असा हातात असावा...आमच्या ह्यांच्यासारखा.मी सांगते तुला वसू,
हे नवरे असतात ना त्यांना तू जितकी सूट देशील, ते तितके मोकाट सुटतात....
काटलेल्या पतंगासारखे...आणि मग आपण धावत सुटतो पतंगामागे....पतंग पकडायला...
म्हणून कधीही गाफील राहू नये....
खरं सांगू तर लग्नानंतर अख्या जगात ना मुलं ना भावंडं...फक्त नवराच आपल्या हक्काचा असतो...
सर्व काही मागे सोडून आपण नवऱ्याच्या घरी येतो.कुणाच्या भरवश्यावर?यांच्याच ना?
स्वतःची स्वप्नं, स्वत:ची माणसं सोडून आपण त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या माणसांना आपलं मानतो.
मग त्यांनी आपलं ऐकलं तर बिघडलं कुठे ?
बाईने चुलीजवळ गप्प रहायचे दिवस गेले वसू.
तू पैसा कमव नाहीतर नाही कमव पण,तू नवरा मात्र कमावला पाहिजेस.
संसाराच्या रगाड्यात 'नवरा' हे नाणं नेहमी आपल्याच खिश्यात हवं....ह्या नाण्यांनं अख्खा संसार जिंकता येतो.

आमचे हे कर्तुत्वाने इतके मोठे...पण...माझ्या शब्दाला उलटा शब्द देत नाही कधी.
पाहिलंयस का कधी ह्यांना माझ्यावर खेकसताना? ओरडताना?आईचं नसेल ऐकलं ते तितकं माझं ऐकतात..
ह्या पुरुषांना मुठीत ठेवणं खूप सोप्पं असतं गं.एक-दोन भारीभक्कम शस्त्र आहेत आपल्याकडे....
एक म्हणजे अबोला आणि दुसरं म्हणजे स्पर्श...
हि शस्त्र कधी आणि कशी वापरायची हे सुद्धा एक शास्त्र आहे.ते जमलं कि जिंकणं सोप्पं होतं.
अबोला....हे एक सोप्पं आणि परिणामकारक शस्त्र आहे...
कारण
सोबत राहणारे जिवंत पुतळे जास्त त्रास देतात....
त्रास झाला कि स्वत:मधले काही न काही बदलणे भाग पडते आणि तेच नेमकं आपण करायचं.
मनासारखं नाही केलं ना कि अबोला धरायचा....
शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलते, जास्त छळते.
स्पर्श हे दुसरं शस्त्र...आणि पुरुषांचा सर्वात मोठा Weak point ...
मनाविरुद्ध घडलं कि सरळ सरळ स्पर्श नाकारायचा...नाकारलेला स्पर्श सरळ पुरुषाच्या वर्मावर बोट ठेवतो.
तुला नवऱ्याला स्वतःचं वेड लावता आलं पाहिजे.पुराण वाचले आहेस का ?
एका स्त्रीमुळे रामायण आणि महाभारत घडले...तू हि एक स्त्री आहेस..हे विसरायचं नाही.
आणि हो अजून एक....
मित्र आणि व्यसनं ह्या कोणत्याही बायकोच्या सवत आहेत आणि या नेहमीच संसारात अडचणी आणतात.
त्यांना नेहमी लांब ठेवायचं...
पुरुष आपल्या बायकोपेक्षा आपल्या मित्राला जास्त मानतात, जास्त सांगतात.म्हणून असे एक दोन मित्र आपल्या हाताशी ठेवायचे
आणि बाकीच्यांना वेळेवर त्यांची योग्य जागा नकळत दाखवायची...त्यांना ना दुखवता...
कळलं का वसू मी काय सांगितलं ते ?कि गेला सगळं डोक्यावरून ?
बघ मी सांगितलंय ते आजमावून...फरक नाही पडला तर नावाची माया नाही मी....
चल बाई जाते मी आता....तुमची शिकार बाजूला झोपलीय.पहा उठली कि काही नवीन ट्राय करून...
हाहाहा..."
वहिनी गेल्या...पण जाताना माझी झोप उडवून गेल्या...
बिछान्यावर झोपेचं सोंग केलेय मी ते सगळं ऐकलं...
माया वहिनी मला अश्या असतील असे स्वप्नात हि वाटले नव्हते...
आणि जयवंत हि इतके काही सहन करत असेल याचा हि अंदाज नव्हता.
जयवंत....एकेरी उच्चार....????जयवंत नाही जयवंतसाहेब....माझे साहेब होते ते....
पण
माणसाच्या नावामधला आदर एकेरीवर यायला एखादा प्रसंग बस असतो.
जयवंतरावांकडून आता सगळं कसं काढून घ्यायचे हि चक्र आता माझ्या डोक्यात सुरु झाली.

वहिनी गेल्या..त्या गेल्यावर मी वसुला उठण्याचं खोटे खोटे नाटक करून म्हटले,
"वसू...ऐकतेस का??....शिकार उठली गं तुझी....चहा आण...."
तेव्हा वसूचा चेहरा बघण्यासारखा होता.....भेदरलेला....जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखा...

माझ्या डोक्यातली चक्र चालूच होती.साहेब वहिनींशी असे का वागतात हे काही कळण्यास मार्ग नव्हता.
दिवस जात होते. आता साहेब समोर आले कि सगळं आठवायचं..
पण एक दिवस ऑफिसच्या कामासाठी ऑफिस संपल्यावर साहेबांच्या घरी जायची संधी आली.वहिनी घरी नव्हत्या.
मग काम झाल्यावर बाटल्या बाहेर आल्या....मी पीत नव्हतो पण मी चागली कंपनी देऊ शकत होतो...
साहेबांना खूप चढली होती.....मला विषय काढावासा वाटला.
"साहेब एक विचारू का? तुम्ही ऑफिसमध्ये असे आणि वहिनींसमोर असे वेगवेगळे कसे वागता?.."
प्रश्न विचारला खरा मी पण विचारल्या नंतर मात्र भीती वाटू लागली.साहेब काय बोलतील याचा अंदाज नव्हता.
साहेब हसले आणि म्हणाले,
"हाहाहा.....श्री.....
सुरकुत्यांपासून सुरु होणारं शरीर सुरकुत्यांसोबतच संपतं.
या दोन तऱ्हेच्या सुरकुत्यांमध्ये जे काही घडतं त्याला आपण 'आयुष्य' असे म्हणतो.
माणूस बौद्धिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून कोणत्याही पातळीवरचा असो, कुणावर तरी आपण हुकुमत गाजवावी अशी त्याची इच्छा असते.
मग शोध सुरु होतो....आणि या शोधाची सुरुवात स्वतःच्या जवळच्या व्यक्तीपासूनच होते.

मी मायाशी जसा वागतो ते वागणे पाहिल्यावर "बायकोचा बैल" या शिवाय दुसरी कुठलीही पदवी जग मला देत नसणार याची मला खात्री आहे.
पण मला त्याची फिकीर नाही...विरोध तर नाहीच नाही.

मी जेव्हा मायाचे काही ऐकतो,तिचं सांगणं बिनविरोध मान्य करतो तेव्हा तिच्या डोळ्यांत, तिच्या स्पर्शात एक वीज असते.
विजेला आपलं तेज लपवून ठेवता येत नाही.
आभाळाला दाटून आलं कि,त्याला बरसणं भाग असतं..
मग अशी हि बरसात ती माझ्यावर करते...त्या तेजात मी दिपून जातो...

संसार हा असाच असतो....एखाद्या राज्यासारखा....
एक असते प्रजा आणि एक असतो 'हुकुम'...
पण इथे 'प्रजा' आणि 'हुकुम' हि दोन पात्रं कधी आणि कोण निभावत असतं हे मात्र निश्चित नसतं.
परिस्थितीनुसार पात्रं निभावणाऱ्या व्यक्ती बदलतात...प्रजेचा राजा आणि राजाचा प्रजा व्हायला इथे जास्त वेळ लागत नाही.

प्रजा असेल तर राजा...नाहीतर त्याला 'राजा' कोण म्हणणार?
हुकुम ऐकणारं कुणी असेल तर हुकुमाला 'हुकुम' म्हणता येतं, नाहीतर 'हुकुम' आणि 'याचना' यांत जास्त फरक नाही.

माया जेव्हा माझ्या मिठीत येते, तेव्हा तिला वाटतं कि,"हि माझ्या हक्काची जागा आहे. इथे माझ्या शब्दांना अलगत झेलणारं
कुणीतरी आहे, हे जे काही आहे ते सर्व माझे आहे..कोणतीही गोष्ट मागताना मला इथे विचार करायची गरज नाही."
ती तेव्हा निर्धास्त असते.

ऑफिसमध्ये काही खटकले कि घरी परतणाऱ्या मायामध्ये आणि त्या संध्याकाळीमध्ये काही फरक नसतो...
दोन्ही सारख्याच असतात..निस्तेज...
तिला तेज माझ्यामुळे येते....

अरे श्री...
आकाशात चांदण्या लुकलुकतात पण त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो.
ताऱ्यांना मात्र तो असतो...ह्या चांदण्या ताऱ्यांमुळे चमकतात.
त्यामुळे चांदण्यांना खरंतर स्वतःच्या रूपाचा, तेजाचा गर्व करायचा काहीच हक्क नसतो.

मायाला मी पांघळं केलंय...आणि.. ते हि तिच्याच नकळत...
तिच्या सिंहासनाचे चारही पाय माझे आहेत..."

बोलता बोलता जयवंतने......नाही....नाही....
बोलता बोलता जयवंत साहेबांनी टेबलावरचा वहिनींचा फोटो हातात घेतला...
मी पाहिले कि....
खरा बादशहा पांगळ्या सिंहासनाकडे पाहून हसत होता...
त्याला 'क्रूर' हि म्हणता येत नव्हतं आणि 'शूर' हि म्हणता येत नव्हतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संसार हा असाच असतो....एखाद्या राज्यासारखा....
एक असते प्रजा आणि एक असतो 'हुकुम'...
पण इथे 'प्रजा' आणि 'हुकुम' हि दोन पात्रं कधी आणि कोण निभावत असतं हे मात्र निश्चित नसतं.
परिस्थितीनुसार पात्रं निभावणाऱ्या व्यक्ती बदलतात...प्रजेचा राजा आणि राजाचा प्रजा व्हायला इथे जास्त वेळ लागत नाही.<<<

प्रजा असेल तर राजा...नाहीतर त्याला 'राजा' कोण म्हणणार?
हुकुम ऐकणारं कुणी असेल तर हुकुमाला 'हुकुम' म्हणता येतं, नाहीतर 'हुकुम' आणि 'याचना' यांत जास्त फरक नाही.

हे खूप आवडलं.
पण पांगळं सिंहासन हे शीर्षक नाही आवडल...

मायाला मी पांघळं केलंय...आणि.. ते हि तिच्याच नकळत...
तिच्या सिंहासनाचे चारही पाय माझे आहेत<<<
हे वाक्य वरच्या paragraph शी contradictory वाटत.

बाकी कथा मस्त!

मी ३ वेळा वाचली तरी मन नाही भरलय्.........
खरच हे पुरुष असे असतात कि आपल्या समोर बैल आणि जगासमोर सिंह........
मी सुद्धा अशाच पांगळया सिंहासनावर बसली आहे असा भास होतोय.?
ha ha ha.......
पु.ले.शु.

ही कथा फेसबुकवर 'क्षण तुझे माझे' ह्या गृपमध्येही वाचली होती. आशिष राणे, तिथुनच घेतलीत का कथा कॉपी पेस्ट करुन??

आशिष राणे, छान कथा आहे. It's interesting to know who had the last laugh! Happy
आ.न.,
-गा.पै.

अवांतर : आर.के. सर नसून मॅडम आहेत. Happy