हसना मना है

Submitted by मुंगेरीलाल on 9 December, 2012 - 07:49

आयुष्यात पहिल्यांदा मी कधी हसणं ‘शिजवलं’ ते मला आठवत नाही. म्हणजे कुणी विनोद केल्यावर, विनोदी लिखाण वाचल्यावर किंवा एखादं नाटक, सिनेमा वगैरे पाहताना/वाचताना येणारं हसू मला म्हणायचं नाही. माझा इशारा स्वतः प्रयत्नपूर्वक ‘रांधलेल्या’ आणि इतरांनाही आग्रहानं ‘वाढलेल्या’ हसू या प्रकाराकडे आहे. हे असलं हसणं सोसायला तशी आवड आणि ‘पचनशक्ती’ पण लागते.

या स्वयंनिर्मित ‘रेसीपी’चे घटक म्हणजे थोडीशी विनोदबुद्धी, आजू-बाजूच्या परिस्थिती बद्दल कुतूहल आणि त्यातील विसंगती टिपण्याचा छंद. हे तिन्ही मसाले बारीक वाटून ते मिश्रण बाजूला ठेवायचं. (हे बऱ्याचदा आधीच करून ठेऊन लागेल तसंही वापरता येतं) आता दुसऱ्या भांड्यात समोर जे चाललंय त्याच्या अतिशय विरुद्ध कल्पना मोठ्या-मोठ्या फोडी करून घालायची आणि मग आधीचं मिश्रण ओतून झाकण ठेऊन एक जोरदार वाफ आणायची. या प्रयोगाला पोषक वातावरण म्हणजे हे सगळे उद्योग करण्याचं अजिबात प्रयोजन आणि औचित्य नसलेली परिस्थिती. उदा.गणिताचा तास, कुणाची तरी शोक-सभा (म्हणजे एकच गोष्ट) वगैरे तत्सम.

यातून आलेलं हसणं हे विनाकारण असतं (म्हणजे तसा बाह्य-जगाचा समज असतो, कारण आतली भूस्तर उलथा-पालथीची प्रक्रिया त्यांना माहित नसते). माझ्या बाबतीत या छंदाचा विकास जुनियर कॉलेज मध्ये झाला. तेंव्हा आयुष्याच्या सुरवातीला ‘ठोठावलेली’ शाळा भोगून बाहेर पडल्यावर ११वी हे वर्ष जरा मोकळा श्वास घेण्याचं ‘रेस्ट ईयर’ समजलं जायचं. आता ११वी नसतेच. या शाळेतून बाहेर काढणाऱ्या राजमार्गाचं एसेस्सी आणि एचेस्सीच्या मध्ये दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी ओटे वाढवत वाढवत रस्ता अरुंद करावा तसं पार बोळकांडं झालंय.

ग्रॅज्युएशनला आधी काही निवडक ‘पिळ’दार प्रोफेश्वर आणि मग हळूहळू कुणीही कसंही शिकवणारं असो, काहीतरी निमित्त काढून त्यांची पाठ वळल्यावर खास ‘शिजवून’ हसायची खोडच जडली, अगदी आवडते प्राध्यापकही प्रसंगी त्यातून सुटले नाहीत. या टप्प्यात याच छंदाची आवड उत्पन्न झालेले रसिक हसवय्ये मित्रही आपोआप जोडले जायचे.

पद्धत साधारणपणे नेहेमीचीच - सर काहीतरी बोलत असताना चेहेरा गंभीर ठेवायचा आणि ते फळ्याकडे वळले की मनाने टिपलेली/निर्मिलेली विसंगती हळूच एकमेकाला कुजबुजून, वहीवर लिहून अथवा पुढे-पुढे नुसतंच खुणेनी कळवायची. मित्राच्या चेहेऱ्यावर अपेक्षित प्रतिसाद आणि ‘दाद’ मिळाली की ‘रेझोनांस’ होऊन आपला आनंद डबल. तितक्यात सर वळले की क्षणात चेहेरा पुन्हा गंभीर. ही एक जबरदस्त रियाझ आणि टायमिंग लागणारी मौल्यवान कला आहे. पुढे-पुढे मग अमली पदार्थाची नशा करणाऱ्याला नंतर जास्त ‘किक’ देणारी रसायनं लागतात तसंच मग त्यात धाडसीपणाची भर. म्हणजे सर वर्गाकडे बघत बोलत असतानाही त्यांची नजर ३० अंशात जरी (टेबल फॅन) आपल्यापासून बाजूला गेली, तरी एकमेकांना मूक ईशारा देणं वगैरे प्रकार सुरु झाले. यात भयंकर रिस्क असायची. कारण एकमेकांच्या डोक्यात नजरेतून ‘कीडे’ तर सोडता यायचे पण प्रत्यक्ष हसायचं कसं? तर यावरही संशोधन झालेलं होतं. चेहेरा कठीण ठेवून शक्य तितकी उबळ दाबून ठेवायची (गांजा वाले कसा दम भरून घेतात तशी) आणि ती मजा अनुभवायची. ज्याला अगदीच सहन होत नसेल त्यानं पेन वगैरे खाली पाडायचं आणि ते उचलतोय असं दाखवत खाली वाकून थोडी वाफ जाऊ द्यायची (मात्र तोंडातून आवाज आला नाही पाहिजे) आणि पुरेसा ऑक्सिजन घेतला की पुन्हा चेहेरा गंभीर करत ‘आपलं काय मिस झालं बुवा’ असं प्रश्नचिन्ह आणून शेजारच्याची वही वगैरे न्याहाळायचा अभिनय करायचा. या ‘वाकू-डोकी’ अवस्थेत शरीर कधीकधी डीझेल-इंजिनसारखं नुसतं थरथरत असायचं. त्यावेळी त्याकडे बाजूच्या ‘रसिकान’ नजर टाकायची नाही असा दंडक होता. नाहीतर त्याला स्वतःला वरच्यावर धरलेली उबळ अनावर होऊन धडधडीत हवेतच स्फोट होऊन रसिकांची आख्खी मांदियाळीच वर्गाबाहेर काढली जायची शक्यता असते. पुढे पुढे तर वर्गाबाहेरही कुठेही ‘सुपीक’ परिस्थिती निर्माण झाली की डोक्यात या रेसिपीचा ‘स्क्रीन-सेव्हर’ सुरू झालाच म्हणून समजा.

या नापाक-कलासंघातले मधले मेंबर कधीकधी टेम्पररी कळपातून फुटायला बघायचे, म्हणजे परीक्षा जवळ आल्यावर किंवा मास्तरांनी एकटं गाठून ‘तू हुशार मुलगा आहेस, त्यांच्या नादी लागू नकोस’ वगैरे बजावल्यावर. मग अंडरवर्ल्डचे लोक कसे ‘इधर एकबार जो आता है वो इधर्काच होता है’ असं वारंवार ठसवतात तसं त्यांना अद्दल घडवावी लागायची. उदा. एकदा एक मित्र पहिल्याच तासाला नेहेमीची शेवटची ‘पंगत’ सोडून सगळ्यात पुढे अभ्यासू मुलांमध्ये जाऊन बसलेला मला दिसला तेंव्हाची गोष्ट. मी वर्गात उशिरा प्रवेश केला आणि ते माझ्या ध्यानात आलं. मी तिथे त्याच्या शेजारी कालत्रयीही बसू शकणार नाही हे त्याला माहित होतं हे जाणून गडी माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होता. मी मागे नजर टाकली तर उर्वरित ‘संत’मंडळी ‘पहा तो कसा सटकला’ असं माझ्याकडे आर्जवी पाहत होती. मला ‘टोळी-प्रमुख’ म्हणून शिक्षा करण्याच्या नैतिक कर्तव्याची जाणीव झाली आणि मी क्षणात निर्णय घेतला. दोन बाकांच्या रांगेतून मागे जाण्याऐवजी (सर फळ्यावर काहीतरी करत आहेत हे पाहून) मार्ग बदलून पहिल्या बाकाच्या समोर मध्यावर येऊन त्याच्या कानाजवळ तोंड नेले (सेकंदांचं काम होतं – हायली रिस्की) आणि हळूच कानात एक ठेवणीतलं ‘विसंगती-हास्य-बीज’ सोडून दिलं. इतकं करून मी झटकन मागच्या रांगेत येऊन बसलो. (आत्ता ते नक्की काय सांगितलं होतं ह्याला महत्व नाही कारण ते फार उच्च दर्जाचा विनोद वगैरे वाटणार नाही, पण त्याचं त्या परिस्थितीत गुदगुली-महात्म्य वेगळं होतं. भौतिकशास्त्रात जसं दाबाखाली उत्कलनबिंदू खाली येतो तसंच काहीतरी). बास. माझं काम झालं होतं. वात पेटली होती आणि दबलेले स्फोटावर स्फोट होणार होते. शिवाय सगळ्यात पहिल्या रांगेतून ते सहन करणं पण जबरी कठीण होतं. तास संपल्यावर हा मित्र चेहेरा लाल होऊन अर्धवट हसत, अर्धवट वेदनेने तळमळत मला बुकलण्यासाठी शोधत मागच्या बाजूला आलाच, पण यावेळी इतर रसिकांनी कडं करून मला वाचवलं आणि मग आम्ही सगळेच तुफान हसत सुटलो. अर्थातच यानंतर असं कळपातून सुटण्याचं धाडस करण्याच्या फंदात कुणी पडलं नाही.

एकदा तर सर डीक्टेट करत करत ३ फुटांवर येऊन ठेपले आणि त्याआधी काही मिनिटेच आमच्यापैकी कुणीतरी ‘बीज’ सोडलेलं होतं. मग काय, नुसतं व्हायब्रेशन, हठयोग आणि डोळ्यांतून घळ-घळा पाणी आणि आज नक्की पकडले जाणार असं एकाबाजूला वाटत होतं. सुदैवानं काळ आला पण वेळ आली नाही. पण यातून वाचल्यानंतर आम्ही इतके निर्लज्ज आणि फाजील आत्मविश्वास बाळगणारे झालो होतो की पुढच्याच आठवड्यात दसरा होता तेंव्हा याच सरांच्या घरी गेलो होतो पाया पडायला आणि तिथे ते आम्हाला बैठकीत बसवून बायकोला सांगायला आत गेले होते तेंव्हा एकानं ‘ती’ आठवण काढली आणि आमची पार गोची झाली. एखाद्या माणसाच्या घरी स्वतःहून जाऊन त्याला हसायचं हा नालायकपणाचा कळस होता. साहजिकच अशी रेसिपी अवेळी करून खाण्यानं अपचन होऊन त्रास होण्याची शक्यता असते आणि ती वेळही लवकरच आली. पण ती वर्गात नाही तर कॉलेजच्या लायब्ररीत.

झालं काय की या आमच्या टीम मध्ये एक नवीन मित्र दाखल झाला होता, त्याच्याबरोबर आम्ही कॉलेजच्या लायब्ररीत गेलो, उगीच लेक्चरला बंक मारून वेळ काढण्यासाठी. तिथला लायब्ररीयन खडूस आणि जीवघेणा शांतता-प्रिय होता (दबाव-निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती). प्रत्यक्षात आमच्या कुजबुजीऐवजी त्याच्या शुक-शुकनेच वाचणाऱ्यांना उपद्रव व्हायचा. तर तिथेच वर संस्थेच्या अध्यक्षांचा फोटो लावलेला होता त्याला पाहून आमच्यापैकी कुणीतरी ‘बीज’ सोडलं आणि बाकीच्यांनी त्याला खुसपुसत कल्पना-विलास करून खत-पाणी घालत रासायनिक प्रक्रियेला गतिमान करण्याचं काम चालू केलं. आता आम्हाला बरोबरच्या नव्या भिडूच्या ‘प्रेशर’ सहन करण्याच्या ताकदीचा अंदाज आला नाही म्हणा किंवा त्याची ‘रिंग’ नीट बसली नाही म्हणा की त्याला आतल्या आत हसू येत असलेलं आम्हाला चेहेऱ्यावर समजलंच नाही म्हणा, शेवटी व्हायला नको ते झालंच आणि तेही अतिशय अनपेक्षितपणे. झालं काय की आमच्या कुत्सित-कल्पना-कल्हई ने त्याचं हसू आतल्या-आत उकळत गेलं आणि एका क्षणी ते उलटून त्याच्या उछावासाबरोबर एक भयानक चित्कार बाहेर पडला. (तो आवाज साधारणपणे जुने रॉकेलच्या डब्यात घालायचे गंजके पत्र्याचे हातपंप असायचे, त्याचा दट्ट्या वर ओढल्यावर जसा येईल तशापैकी होता) त्यानं अख्ख्या लायब्ररीने वळून पाहिलंच शिवाय आम्ही उरलेलेही सॉलिड दचकलो. आता ज्यानं-त्यानं आपापला जीव वाचवणं इतकाच उद्देश शिल्लक होता. अशावेळी पाय नेमके थिजून जातात आणि मेंदू करवंटीमध्ये सुकं खोबरं गडगडावं तसा ‘पळ लेका, पळ’ असा कोकलत असतो. मग नकळत कमरेच्या वरचं शरीर आधी बाहेरच्या दिशेने झेपावतं आणि त्यामागोमाग पाय लडबडत जातात अशी अवस्था झाली.

तर अशा या छंदाचं निवारण कॉलेजच्या बाहेर पडलं की आपोआप होईल असं वाटलं होतं, पण तसं ते झालं नाही. घरीदारीही याचा त्रास व्हायचा, उदा.कुणी ग्रुप मध्ये गायला हो म्हणालं आणि गाणं सुचेपर्यंत सगळे त्याच्याकडे उत्कंठेने पाहत शांतता पसरलेली असते तेंव्हा, कुणाला मुलगी दाखवायला आली असते (आणि मध्ये काही काळ कुणालाच काहीही विषय सुचत नसतो) तेंव्हा किंवा लिफ्टमध्ये बराच काळ लोकं एकमेकाला खेटून स्तब्ध उभी असतात तेंव्हा. बऱ्याचदा हे हसणं एकट्यानं होण्याची शक्यता कमी असते पण जर एखादा समानधर्मी बरोबर असेल (गम्मत म्हणजे माझी एक आधीची बॉस तशी होती) तर केवळ नजरा-नजर होताच ‘स्फोट’ ठरलेला. ही बॉस आणि मी त्यामुळे एकत्र एखाद्या नवीन व्यक्तीचा इंटरव्हू वगैरे घेण्याची रिस्क फार कमी वेळा घ्यायचो, कारण समोरच्या माणसात कल्पनाशक्तीला काही ‘बीज’ जाणवलं आणि आम्ही ते जाणवून एकमेकांकडे पाहिलं की ‘रेझोनांस’ आणि मग सगळं मुसळ केरात गेलंच म्हणून समजायचं. आता हे बरोबर नाही हे कळत असतं, पण यावर आमचा मुळीच कंट्रोल नसतो. मग अशावेळी आमच्यापैकी कुणीतरी फोन वगैरे आल्याचं नाटक करत उठून जाणार हे ठरलेलं, त्याआधी गंभीर, दु:खद प्रसंग मुद्दाम आठवून आलेली उबळ दाबून टाकण्याचे असफल प्रयत्न करून झालेले असायचे.

वयोमानाप्रमाणे जसा काही लोकांचा दूरचा चष्मा आपोआप कमी होतो तसं आताशा हा त्रास कमी झालाय, पण अजूनही सुप्त ज्वालामुखी आत आहे याची जाणीव आहे. आतापर्यंत त्याने त्रासही दिलाय, अभ्यासात, वर्गात लागणारी एकाग्रता नष्ट करून नुकसानही केलंय पण त्याचबरोबर खूप काही देणंही दिलंय असं वाटतं – मुख्य म्हणजे तणाव आणि कंटाळवाण्या परिस्थितीतून स्ट्रेस न येऊ देता सुखरूप बाहेर काढलंय आणि काही निखळ, निर्मळ, कुठलाही मतलब नसलेले मित्रही जोडून दिलेले आहेत. हा छंद कमी झाला तरी पूर्ण ‘बरा’ होऊ नये असं आतून वाटतं कारण आजही ते मित्र भेटले की एका क्षणात भूतकाळात जायला आणि पुन्हा बेफिकीर, तरुण व्हायला मदत होते आणि मी फ्रेश होतो.

- धनंजय दिवाण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<अशावेळी पाय नेमके थिजून जातात आणि मेंदू करवंटीमध्ये सुकं खोबरं गडगडावं तसा ‘पळ लेका, पळ’ असा कोकलत असतो. मग नकळत कमरेच्या वरचं शरीर आधी बाहेरच्या दिशेने झेपावतं आणि त्यामागोमाग पाय लडबडत जातात अशी अवस्था >>>>> Rofl

अशी अवस्था झालीय माझी आणी माझ्या मैत्रिणींची बर्‍याचदा. कॉलेज काय शाळेत पण असे चमत्कार घडलेत. कारण आमचे सायन्सचे सरच विनोदी होते. वर्गाचा एन्ट्रन्स मागुन आणी पार आतमध्ये फळ्यावर ते लिहीत होते. मध्येच त्यांना काहीतरी हुक्की आली. कुठुन तरी परीक्षणाच्या नळ्या आणुन उगाच त्यात पावडर शिंपडुन, त्यात पाणी ओतले आणी काही घडायच्या आतच अरे स्फोट झाला पळा पळा म्हणत स्वतच हातवारे करत पळत सुटले.

त्या नादात काही मुली पायात पाय अडकुन पडल्या.:फिदी: त्यावेळी जी परिस्थिती होती ती विचीत्र होती. हसता येईना आणी बोलता पण येईना.:फिदी:

छान लिहीलय, जुने दिवस आठवले.

मुंगेरीलाल..

छान लिहीलय. स्वतःच्या लिखाणाची प्रोसेस उलगडून सांगितलेला भागही छान आलाय. तुमची एक स्वतंत्र शैली ही निर्माण झालीये. अभिनंदन !

Rofl हे माझे कॉलेजमधले हसू दाबायचे काही प्रसंग आठवले त्याबद्दल..:)एका सरांच्या लेक्चरला आम्ही ग्रुपमध्ये झालेल्या विनोदावर दाबलेलं हसू सरांनीच एखादा टुकार जोक जरी केला तरी प्रचंड हसून आमचं राहिलेलं हसू मोकळं करून घ्यायचो...स्वतःच्या विनोदबुद्धीवर सरांचा गैरसमजही झाला असेल त्यामुळे Wink
मस्त झालाय लेख...:)

अप्रतिम लिहिलंय Rofl खूप आवडलं.

तणाव आणि कंटाळवाण्या परिस्थितीतून स्ट्रेस न येऊ देता सुखरूप बाहेर काढलंय >>> अगदी !!

जबरी लिहितो यार तू....

आमच्याही कॉलेजवर्गात अस्ले भारी मित्रवर्य होतेच आणि बाकी मग सगळे अस्लेच प्रसंग ....

<<<<पण त्याचबरोबर खूप काही देणंही दिलंय असं वाटतं – मुख्य म्हणजे तणाव आणि कंटाळवाण्या परिस्थितीतून स्ट्रेस न येऊ देता सुखरूप बाहेर काढलंय आणि काही निखळ, निर्मळ, कुठलाही मतलब नसलेले मित्रही जोडून दिलेले आहेत.>>>> ग्रेट....

आता ११वी नसतेच. या शाळेतून बाहेर काढणाऱ्या राजमार्गाचं एसेस्सी आणि एचेस्सीच्या मध्ये दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी ओटे वाढवत वाढवत रस्ता अरुंद करावा तसं पार बोळकांडं झालंय. >> वा धनंजय वा... फारच चपखल...

रसिक हसवय्ये >> Lol

वाफ जाऊ द्यायची >> Lol

एकदा तर सर डीक्टेट करत करत ३ फुटांवर येऊन ठेपले आणि त्याआधी काही मिनिटेच आमच्यापैकी कुणीतरी ‘बीज’ सोडलेलं होतं. मग काय, नुसतं व्हायब्रेशन, हे खरंचच अनुभवलंय... त्यामुळे ज्ज्जाम रिलेट झालं Rofl

आणि ओव्हरॉल लेख सहीच्च झालाय!! शुभेच्छा...

११वी ते टिवाय ची आठवण करून दिली.. Lol
मस्तच.. अनेक लेक्चरं, लायब्ररी डोळ्यासमोरून फ्लॅशबॅकसारखी तरळून गेली Happy

मस्त आहे.

आमच्या एका वर्गाला पाच की सहा दरवाजे होते. काही काही प्रोफेसरच्या लेक्चरला काही काही मुलं या दरवाज्यांमधून सन्गीत खुर्ची खेळायची. प्रोफेसरनी पाठी पाह्यलं की स्टॉप. Happy तेव्हा अख्खा वर्ग सरांचं शिकवणं विसरून असाच हास्यस्फोट दाबत बसलेला असायचा.

आम्ही नववीत असताना एकदा अशाच कसल्यातरी "गहनगंभीर" विषयावरून हसाहशी चालू होती तेव्हा गणिताच्या सरांनी "कसे चोर पकडले?" असं एकदम नाटकीरीत्या बोलून भलत्याच बाकावरच्या मुलांना वर्गाबाहेर काढलं होतं. आम्ही परत हसू दाबण्याच्या क्षीण प्रयत्नात.

१२ वीला असताना एका सरांच्या मी केलेल्या विचित्र स्वागतामुळे सरांनी आणी एचेम नी सगळ्या मुलांना(मुली नाही) ओणवे अर्धा तास उभे केले होते.मित्रमंडळी सज्जन होती कोणी नाव लीक केले नाही.

अफाट Happy

झकास! आणि वाचत रहावं अशी शैली आहे.
शाळा - कॉलेज मधले दिवस आठवले, त्यात एखाद्या खिलाडू वृत्तीच्या शिक्षिका, पकडल्यावर, काय जोक झाला, आम्हालाही कळू दे की असं म्हणाल्यावर, काय सांगणार, कप्पाळ?

धन्यवाद मित्रहो. जवळपास सगळेच ह्या अवस्थेतून गेलेले आहेत हे वाचून माझा वात्रटपणाचा गिल्ट-कॉम्प्लेक्स जरा कमी झाला Happy

मस्त लिहिलेय. ( पण काही "बीजे" हवी होती.)
मला हसू दाबुन ठेवणे कधी जमलेच नाही.. मग चेहराच हसरा झाला !

Happy Happy

Lol मस्त लिहिलय.
मला पण मी सामिल झालेले असे बरेच प्रसंग आठवले. काही प्रसंगात आपल्या बहिणाबाई पण असायच्या Proud

एकदा तर एका मैत्रिणीच्या घरी वाढदिवसाला गेल्यावर, केक कापणे वगैरे सोपस्कारानंतर तिने गाणे गायला सुरुवात केली. पहिल्या कडव्यापर्यंत कशीबशी वाफ दबून राहिली, पण पहिल्या कडव्याला तिने अशी तान घेतली की सगळी वाफ व्हॉल्व्ह उडाल्याप्रमाणे फट्ट्कन बाहेर पडली. मी हसत हसत घराच्या बाहेर पळाले, आणि माझ्यामागे माझी बहिण!! Proud मैत्रिण जवळचीच असल्याने तिने नंतर फार राग राग केला नाही :).

Pages