विरहोत्सुकता

Submitted by रसप on 7 December, 2012 - 00:07

अर्ध्यात संपतो येथे
प्रत्येक डाव दैवाचा
जो कमी हारतो थोडा
आणतो आव जेत्याचा

नियतीचे प्यादे होउन
माझ्याशी जेव्हा भिडलो
माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो

जखमाही माझ्या साऱ्या
भळभळणे विसरुन गेल्या
एकट्याच वाटा माझ्या
भरकटणे विसरुन गेल्या

तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

....रसप....
६ डिसेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/blog-post_7.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो कमी हारतो थोडा
आणतो आव जेत्याचा

नियतीचे प्यादे होउन
माझ्याशी जेव्हा भिडलो
माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो<<

वा वा, आवडली

झकास..... Happy

वाह वाह वाह!

सुंदरच!

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

मी हे असं वाचलं

नात्यांनी मला शिकवली
स्वप्नांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

आणि अर्थ बदलला तेव्हा जास्त आवडलं Happy

रणजित,

मी पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करतेय पण मला ह्या ओळीचा अर्थ उमगत नाहीये.

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता

कृपया काय अर्थाने ही वाक्ययोजना आहे, ते समजावणार का?

मी वर लिहिल्याप्रमाणे नाती व स्वप्ने ह्या शब्दांची अदलाबदल करून जो अर्थ बनला तो समजला व भावला.

तसेच होउन आणि सोडुन हे शब्द मी होऊन आणि सोडून असे लिहिते. पण बर्‍याच कवितेत असे बदल झालेले पाहिले आहे. ते डेलीबरेटली असते का? म्हणजे लय वगैरे बिघडू नये इ. साठी वगैरे? (गझलेत मात्रांचा तोल सांभाळताना अशी सूट घेतात ते माहीत आहे. कवितेत असे करण्याचे कारण विचारतेय.)

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार..!

---------------------------------------------------

@निंबुडा,

आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

१. ही कविता एका तुटणार्‍या नात्याच्या, विरहाच्या पार्श्वभूमीवर काही भाष्य करते. "आपल्याला उगाचच असं वाटत असतं की आपण यशस्वी झालो, अयशस्वी ठरलो... प्रत्यक्षात कुठलाच डाव, दैव पूर्णही होऊ देत नाही. त्याच्या हातातले खेळणे बनून मी जेव्हा जेव्हा बहकलो, तेव्हा तेव्हा तोंडघशी पडलो. हे वैफल्य इतक्या वेळा मी सहन केले आहे की आता मला दु:खाची वेदनाही होत नाही. (मी जरासा भावनाशून्य झालो असेन, कदाचित)" अशी प्रस्तावना दिल्यावर -

तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही

ह्या कडव्यात कविता 'मुद्द्यावर' येते. ती/ तो (प्रेयसी/ मित्र/ इतर काही नाते असलेली व्यक्ती) सुद्धा - ह्यापूर्वीही काही जण जसे सोडून गेले आहेत - तशी सोडून जात आहे. पण माझी हरकत नाही.. त्या व्यक्तीचे सोडून जाणे जरी दु:खद असले, तरी मी त्याने विचलित होणारा नाहीये... तिला थांबवणारा नाहीये.

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

ह्या कडव्यांत 'कन्क्ल्युजन' होत आहे. हे कडवे खरं तर मला सगळ्यात आधी सुचले होते. इथे मला स्वप्न व नाते ह्यांना तीच जागा देणं अत्यावश्यक वाटतं. ह्यातून अर्थ हा व्यक्त करायचा होता की - 'सारं कसं स्वप्नवत आहे' असं जे आपण म्हणतो, तसं प्रत्येक नातं मी माझ्या स्वप्नात पाहिलं. सत्य त्याहून खूप वेगळं होतं. हा विरोधाभास नेहमी मी अनुभवला आहे आणि हीच शिकवण मिळाली की कुठलंही नातं चिरकाल टिकत नसतंच. त्यामुळे आजकाल मी प्रत्येक नात्याचा अंत - विरह - अपेक्षितच धरतो. किंबहुना, 'आता हे नातं कुठल्या वेगळ्या प्रकारे तुटणार आहे?' अशी काहीशी विचित्र उत्सुकता मला लागलेली असते.
म्हणून "स्वप्नांनी मला नात्यांची क्षणभंगुरता शिकवली" असं म्हटलं आहे. 'नात्यांनी स्वप्नांची क्षणभंगुरता शिकवली' ह्यातूनही साधारण तेच भाष्य होईल. पण ह्यात मी 'स्वप्न हे सत्यापेक्षा जास्त स्वीकारार्ह असतं' असं काहीसं छुपं भाष्य नाही करू शकणार!

२. 'होउन', 'सोडुन' बाबत.. ही कविता मात्रा वृत्तात आहे. (प्रत्येक ओळीत १४ मात्रा) त्या दृष्टीनेच ह्या सुटी घेतल्या आहेत. माझा शक्यतो असा प्रयत्न असतो की ज्या अक्षरांचे उच्चार आपण र्‍हस्व-दीर्घ दोन्ही प्रकारे करतो, अश्याच अक्षरांबाबत सूट घ्यावी.
वृत्तबद्ध काव्य म्हणजे फक्त गझलच असं नाही ना? Happy

मनःपूर्वक धन्यवाद !

....रसप....

जितू अतिशय उत्तम रे
कविता प्रकाशित झाल्यापासून अनेकदा वाचतोय
प्रतिसादास झालेल्या विलम्बासाठी क्षमस्व

नमस्ते जितू स्रर खूप छान लिहिता तुम्ही

तुमची ही कविता वाचून मला मी काही दिवसापूर्वी प्रकाशित केलेल्या रचनेतील माझा एक शेर आठवत आहे जो मी तुमच्यावरच्या प्रेमापोटी योजला होता

जीत आणिक हार यांची काय तुलना मी करू
जर स्वतःला जिंकताना मी हरावे लागते

http://www.maayboli.com/node/39438#comment-2455800

आपलाच एक कुणीतरी

रणजित, ही पण खूप सुंदर आहे कविता. तुझ्या कवितेतलं प्रत्येक कडवं नेहमीच विचार करायला लावतं. त्याच्याकडे त्रयस्थपणे पाहू शकत नाही.

तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही >>> असं म्हटलं, तरी असं होत नसतं. खरेखुरे बंध असतील तर वरवर शतदा असं म्हटलं तरी ते शब्द विरायच्या आत हृदयाला पीळ पडणारच.

अश्याच उत्तम उत्तम कविता देत रहा Happy

>>तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही>>>

डोळ्यात येणारं पाणी कठोरपणे परतवून लिहिल्यासारख्या या ओळी अन सर्वच कविता खूप आवडली. पु.ले.शु. रसप.

धन्यवाद..!

देव काका,

डाऊनलोड करून ठेवतो, नंतर घरी गेल्यावर ऐकीन.. (मला माहित आहे, आधीच २ पेन्डिन्ग आहेत.. परत एक चानस द्या.. मी वेळ काढतो.)

व्वा..... क्या बात है.... !!
रणजीत..... तुझ्या कविता आवडतात रे... !!

नियतीचे प्यादे होउन
माझ्याशी जेव्हा भिडलो
माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो...
..... जबरी

जपतो विरहोत्सुकता.........जियो !!

"जो कमी हारतो थोडा
आणतो आव जेत्याचा" - एक नंबर!!!

"माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो" - पुन्हा एकदा एक नंबर!!!