सार

Submitted by अज्ञात on 6 June, 2008 - 15:42

या उरातही दाटते कधि
वेदनेची आस का
पाउलांना वाटते
माहेरची ती वाट का

गूढ हे उकले न कांही
जाणिवा मेघात का
वाहिलेले गोड पाणी
लागते खारेच का

रंगती डोळ्यांत स्वप्ने
भंगती काठास का
शुद्ध त्या साता स्वरांतिल
पाच हे विकृत का

सार हे कळले तुला जर
पाहिजे जगणेच का
कोण ना उरले धरेवर
काय खेळिल द्वारका

................अज्ञात
१२३९,नाशिक

गुलमोहर: 

अज्ञाता, दरवेळी नाशिक च्या आधी आकडे आहेत प्रत्येक कवितेत वेगळे. ते काय आहेत? उदा. १२३९,

पल्ली,
तो माझ्या डायरीच्या रेकॉर्डमधला कवितेचा सिरिअल नंबर आहे. ती जशी आली, कधी आली, कुठे आणि कुठल्या क्रमांकावर आली ते मी लिहिले आहे. माझा या व्यतीरिक्त कुठलाही संग्रह अथवा संदर्भ नाही. नावापेक्षा नंबरने कविता शोधणे सोपे जाते कारण ती कुठल्याही डायरीत असली तरी मग फरक पडत नाही.
........................अज्ञात