"किल्ले सुधागड" - फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 6 December, 2012 - 00:00

"जिप्स्या, सुधागडला येणार का? ओव्हरनाईट ट्रेक आहे?" यो चा फोन.
"नाही रे, नाही जमणार, त्याच दिवशी मी आणि ऑफिसचा गृप पालीलाच श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला चाललोय." इति मी.
"अरे मग चल की तिथुनच पुढे ट्रेक ला" - यो
"ठिक आहे सांगतो तुला उद्यापर्यंत"

फोन कट झाला आणि माझ मनं सुसाट वेगाने तब्बल १३ वर्षे मागे गेलं. आयुष्यातील पहिलाच ट्रेक "सुधागड". कॉलेजातील सुरूवातीचे ते मखमली दिवस. त्यावेळेस कदाचित "ट्रेकिंग" हा शब्दही जास्त लोकांस माहित नसावा. आठही मित्रांचा, कुठलीही तयारी न करता/माहिती न काढता केलेला हा पहिलाच ट्रेक. भर दुपारी २ च्या दरम्यान धोंडसे गावातुन चढणीस सुरूवात, थकलेले मित्र, प्रत्येक विसाव्यानंतर शिव्या खाणारा बिच्चारा मी :फिदी:, वाटेत दिसलेले साप आणि जागोजागी पडलेली सापाची कात, संपूर्ण गडावर आम्हा आठजण आणि साप यांव्यतिरीक्त कुणीही नाही, भोराई देवीच्या देवळातला मुक्काम, मुक्कामात रात्री घाबरलेले आणि "यापुढे तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही" असं म्हणणारे मित्र. Happy सारं सारं काही अगदी काल परवा घडल्या सारख आठवलं. "ट्रेक कसा नसावा" याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचा सुधागड ट्रेक. "तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही" असं म्हणणारे सातही मित्र या वाक्याला अक्षरशः जागले आणि गेल्या १३ वर्षात एकदाही माझ्याबरोबर कुठेच भटकायला आले नाही. Proud

ज्या सुधागड किल्ल्यामुळे मला सह्याद्रीची ओळख झाली, सह्याद्रीच्या प्रेमात पाडले त्यालाच पुन्हा भेटायचेच असं ठरवून "मी येतो रे" म्हणत यो ला फोन केला. Happy यो रॉक्स, सौ. रॉक्स, शिव, सौ. शिव, मी आणि माझे तीन मित्र दिपक, प्रशांत आणि संदीप असे एकुण आठजण तयार झालो.
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली गावातील श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अंदाजे १२-१३ किमी अंतरावर असलेल्या ठाकूरवाडीतुन सुधागड साधारण २ ते २.५ तासात गाठता येतो. गडावर जाणारी अजुन एक वाट धोंडसे गावातुन साधारण ३ ते ३.५ तासात गडमाथा सहज गाठता येतो.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
गडाचा इतिहास: (विकिहुन साभार)
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्‍यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले.

या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे.तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही बर्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पायर्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.

पहाण्यासारखी ठिकाणे:
पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.

गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पायर्यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.

प्रचि ०५

गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्‍या परळी गावात हत्तीच्या पायी दिले.

तेलबैला आणि भोराईदेवीचे मंदिर
प्रचि ०६
तेलबैला (झूम्म्म्म करून)
प्रचि ०७
पंतसचिवांचा चौसोपी वाडा
प्रचि ०८

प्रचि ०९
पंत सचिवांच्या वाड्यातील आमचे एका दिवसाचे स्वयंपाकघर Happy
प्रचि १०

माझ्यासाठी हा ट्रेक खास महत्वाचा कारण सुधागडला दुसर्‍यांदा भेटणार होतो, मायबोलीकरांबरोबर (जरी तीनच असले तरी Happy ) पहिला असा ओव्हरनाईट ट्रेक ज्यात आम्ही स्वतः जेवण बनवण्याचा आनंद घेणार होतो. Proud अगदी तसंच झालंही सर्वांनी मिळुन बनवलेली ती खिचडी आत्तापर्यतची "दि बेस्ट खिचडी" होती. Happy

चविष्ट दाल खिचडी, गरमागरम सूप तयार आहे Happy
प्रचि ११
भोराई मंदिराकडे जाणारी वाट
प्रचि १२
गडाची तटबंदी (धोंडसे गावच्या बाजुची)
प्रचि १३
दूरवर पसरलेले सोनसळी गवत
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
टकमक टोक
प्रचि १७
भोराईदेवीचे मंदिर
प्रचि १८
श्री भोराईदेवी
प्रचि १९
गडावरील देवदेवता
प्रचि २०

प्रचि २१
गडावरील सूर्यास्त
प्रचि २२

प्रचि २३
रायगडाच्या महादरवाज्याची प्रतिकृती असलेला "सुधागडचा महादरवाजा"
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
धोंडसे गावातुन सुधागडला येणार्‍या वाटेवरच थंड पाण्याचे टाके आणि वीरपुरूष तानाजी शिल्प
प्रचि २७
कचर्‍याच्या पिशव्या बॅगेला बांधत परतीचा प्रवास
प्रचि २८
वाट पाहिन पण एसटीनेच जाईन. (खरं तर दुर्गम भागातील दुर्गवैभव दाखवणारी, लाल डब्बा, खडखडाट अशी बिरूदावली मिरवणारी आपली हि "एसटी" ट्रेकर्संना कुठल्याही राजरथापेक्षा कमी नाही)
प्रचि २९
मूड्स ऑफ सुधागड ट्रेक
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३
आभार्स
तळटिपः
खरंतर या ट्रेकबद्दल भरभरून लिहायच मनात होतं पण सध्या कामात व्यस्त असल्याने वेळ मिळत नसल्याने वृतांत थोडक्यात आटोपतोय. सविस्तर वृतांत योकडुन येईल अशी अपेक्षा करूया. ;-).

=======================================================================
=======================================================================

"किल्ले हडसर" फोटो वृतांतासहित लवकरच पुन्हा भेटुया. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ट्रेक वृतांत!
आणि फोटोबद्दल वेगळे काय सांगणार, नेहमीप्रमाणेच सुंदर.

वॉव.. सुंदर वृत्तांत.. वाचतानाही तुझ्या नॉस्टेल्जियाला फिरवून आणतोस की मस्तपैकी!!!!

तळटिपः
खरंतर या ट्रेकबद्दल भरभरून लिहायच मनात होतं पण सध्या कामात व्यस्त असल्याने वेळ मिळत नसल्याने वृतांत थोडक्यात आटोपतोय.>>>>>

हे पण भरपूरच आहे , मन भरल .

फोटो अफाट सुंदर आलेत जिप्स्या... Happy
सुपर्ब क्लिक्स...

सुधागड राहिलाय.. Proud

तेराव्या फोटोमध्ये सवाष्ण घाटाचा डोंगर पाहिला आणि थोडावेळ मेमरीतून फिरून आलो... Happy

अरे व्वा... मला वाटलं होतं की तुझा पण बँड वाजला की काय? बरेच दिवस 'प्रकाशचित्रण' सदरात एक पोकळी निर्माण झाली होती Wink

सोनसळी, सुर्यास्त, प्रचि ९, १०, ११, २१ आवडले. वृत्तांत छोटा असला तरी अगदी सुटसुटीत आहे.

सुधागड राहिलाय.. > +१

मस्त ! मस्त ! ! मस्त ! ! !
दुसरा फोटो बघून भोवळच आली. पाचवा बघून शांत्-निवांत वाटलं. तैलबैला खास. नववा पाहून कोण कुठच्या काळात चक्कर मारली Happy अकरा, का बघितला मी ?
चवदावा, अहाहा ! सुरेखच ! लोळावं वाटलं अगदी.
२१,२२ मस्त! २९, रामा, ती तिथून बाहेर कशी पडली Uhoh
३०,३२,३३ मस्त Happy
धन्स रे, मस्त फिरवलस Happy

नेहमीप्रमाणे सुंदर फोटो... ते परलीचे परळी कर. Happy तिथली बाळाजी आवजींची समाधी पाहिली की नाही?

ट्रेक क्षितिजने सुधागडवर खुप काम केलय. महादरवाजा तर बुजून गेला होता तो पाण्याची वाट मोकळी झाल्याने आता कित्ती छान झालाय. Happy

खुप वर्षापुर्वी असेच साफसफाई करायला गेलो होतो तेंव्हा हे २-३ फोटो झब्बू म्हणून.. Happy तेंव्हा ही नवी शिडी नव्हती बहूदा.

सुधागड हा राजधानीचा किल्ला म्हणून शॉर्ट लिस्ट केला होता राजांनी. Happy पण त्याचा पसारा आणि थोडासा बसकेपणामुळे तो राजधानीचा किल्ला बनू शकला नाही. Happy गडाच्या डोंगररांगांवर उतरत्या पद्धतीने जे बांधकाम केले आहे ते खास आहे एकदम. Happy आता पडझड इतकी झालेली आहे की तिथपर्यंत जाणे देखील अशक्य होउन बसले आहे. Sad

ओ, बाळाजी आवजी ! माझे खापर्-खापर आजोबा. आता पुन्हा गेलास तर माझ्यावतीने नमस्कार कर त्यांना Happy

हो. पण काहीच नोंदी नाहीत रे Sad
मी माहेरची चित्रे. चिटणीसचे चित्रे झाले कोणत्यातरी पिढीत.. तेही माहिती नाही का ते. आपल्याकडे इतिहासाबद्दल फार फार अनास्था आहे ते खटकत राहते....

मग ते तुझे खापर-खापर आजोबा यासाठी तुझ्याकडे काही संदर्भ आहेत की फक्त ऐकीव माहिती? माझ्याकडे राजांनी आवजींना चिटणीशी दिली तेंव्हाचे अनुवादीत पत्र आहे. Happy

ट्रेकर्सांनो आधी विनम्र _/\_ घ्या.
कित्ती छान डोंगरदर्‍यांतून फिरता रे... बरेचदा हेवा वाटतो फार...
:आजवर एकही ट्रेक न केलेली बाहूली:

नाही, नाही ऐकीव नाही.( अरे मी इतिहासाची, त्यामुळे 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' या खाक्यातली Wink ) काकांकडे पूर्ण वंशावळ आहे Happy

मी पण नुकताच सुधागड केला आता लवकरच 'हडसर' करणार आहे - घरी बसल्याबसल्या. Proud

नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलंयस आणि छान प्रचि. ते सोनसळी गवत लै भारी दिसतंय.

किती लिंबं कापून ठेवलीयेत? सरबत केलंत का?

Pages