कशास चांदणे हवे? हवा कशास चंद्रमा?

Submitted by सतीश देवपूरकर on 30 November, 2012 - 07:44

गझल
कशास चांदणे हवे? हवा कशास चंद्रमा?
तुझ्या समीप वाटते हरेक रात्र पोर्णिमा! !

गुलाब पाकळ्यांपरी तुझेच ओठ पाहुनी.....
पहा नभासही चढे विलोभनीय लालिमा!

दडून काय राहतो मनात राग साठता?
झरेल लोचनांमधे मनातलाच रक्तिमा

उभी हयात एकही न शुद्ध शेर साधला....
असेच लोक फासतात शायरीस काळिमा!

विटाळणार ना कधीच वैखरी तुझ्यापरी;
खुशाल दे शिव्या तरी मला न वाटते तमा!

बघू, थकेल कोण प्रथम, मी थकेन की, तुम्ही?
गुन्ह्यावरी गुन्हे करा, करेन मी तुम्हा क्षमा!

हिशेब मांडतो वहीत चित्रगुप्त आपुल्या,
हरेक पाप-पुण्य ते तिथेच व्हायचे जमा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलाब पाकळ्यांपरी तुझेच ओठ पाहुनी.....
पहा नभासही चढे विलोभनीय लालिमा! << व्वा सर ! गुलाबी शेर >>

छान गझल

कैलसराव!
फक्त आमच्या प्रेयसीचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी आहेत. जे बघून कुणलाही ते आवडावेत, जणू प्रत्येक पहाणा-याच्या मधे ती ओठांची लाली/लालिमा पसरावा! म्हणून नभातील पसरलेला लालिमा पाहून आम्हास वाटते की, जणू आमच्या प्रेयसीच्या गुलाबाच्या पाकळींसारख्या ओठांकडे पाहून या नभावरही लाली/लालिमा चढली/चढला आहे, जी/जो अत्यंत विलोभनीय आहे. म्हणून आम्ही म्हणतो.......
गुलाब पाकळ्यांपरी तुझेच ओठ पाहुनी.....
पहा नभासही चढे विलोभनीय लालिमा!

मग बरोबर आहे सर
मलाही पटेल अशा भाषेत सान्गीतलेत , धन्स !

निव्वळ गम्मतः
१) ...चला!! आता यापुढे कुणीतरी मला सुनावले की अमुक शब्द भरीचा आहे वगैरे तर मलाही वेळ मारून नेता येईल असा आत्मविशवास वाटतो आहे Wink
धन्यवाद सर

२) जे बघून कुणलाही ते आवडावेत, >>>> "मला" आवडले तर "तुम्हाला" चालेल का ??

..........नाही ना ? मग 'जणू' हा पुढचा शब्द स्वल्पवीरामाच्या आगोदर असलेल्या जागेत लिहावा अन् मग स्वल्पवीरामाच्या ऐवजी एखादे उद्गारवाचक चिन्ह टाकावे अशी सूचना Lol

जे बघून कुणलाही ते आवडावेत जणू!!

धन्यवाद वैभवा!
गझलेविषयी/शेरांविषयी काही बोलला नाहीस ते?

मतला असावा तर असा !!

बाकीचे सर्वच शेर बेहद आवडले

उभी हयात एकही न शुद्ध शेर साधला....
असेच लोक फासतात शायरीस काळिमा!
>>>>>>>>>>>>सर हा शेर मला लागू होतो का ? तुम्हाला मनापासून काय वाटते माझ्या शेरान्बद्दल? खरेखरे सान्गा !! जाणून घेण्याची गरज वटते म्हणून विचारतो आहे , याचना करतो समजा हवे तर!! आत्ताच सान्गा

बराच वेळ झाला मी रडतोय हा शेर वाचून हा शेर तुम्ही माझ्यावरच केलाय असे वाटते आहे

नाही रे बाळा वैभवा! तुला कशाला मी असे लिहीन? तू छान लिहितोस. तुझी साधना चालू ठेव! आमच्या तुझ्या गझललेखनास हार्दिक शुभेच्छा!
स्वत: गझला न लिहिता, ते धाडस पण न दाखवता जे लोक गझलेवर बेधडक बिनबुडाच्या टीका करतात समीकक्षकांच्या तो-यात, त्यांच्यासाठी हा शेर लिहिला होता. असो.
आता तुला काही गोष्टी तुझ्यामाझ्या स्नेहापोटी सांगतो...........
फक्त थांबायला शीक.
मतला जोवर स्वत:स आवडत नाही, तोवर पुढे सरकत जावू नकोस
कमीत कमी सुटी घेण्याचा प्रयत्न कर.
अवतरण चिन्हांच्या कुबड्या शक्यतोवर टाळण्याचा प्रयास करीत जा.
काफियांच्या मागे लगू नये, काफियेच शेर घेवून आपल्या पाठीमागे लागले पाहिजेत, इतके आपल्या चिंतनाचे तेज वाढवावे.
मनात आलेला खयाल / प्रतिमा मनात रुजू द्यावे
गुणगुणण्यावर भर द्यावे.
जोवर समाधान होत नाही तोवर आपल्याच मिस-यांना आपण पर्यायी मिसरे द्यावेत व शेवटी सर्वोत्तम मिस-याची निवड करावी. यात होणारे क्लेश आनंदाने उपभोगावेत.
शब्दांच्या अर्थांची प्रसरणशीलता नेहमी लक्षात घ्यावी. कोणत्याच शब्दाला लाइटली घेवू नये.
कोणत्याही काफियासाठी/शेरासाठी हटून बसू नये.
तुला आश्चर्य वाटेल पण सांगतो की, वरील गझलेचा मतला मार्च ९३ सालचा आहे, जो शांता शेळकेंना खूप आवडला होता, एका कवीसंमेलनात!
पण मतल्याची उंची बघता व काफियांची कमतरता बघता पुढे सरकायला धजावत नव्हतो.
आज दिनांक ३०-११-२०१२ रोजी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत इतर कामे उरकता उरकता ६ शेर लिहिले व तूर्तास ही गझल हातावेगळी केली, सुमारे १९वर्षांनंतर! ही त्या पांडुरंगाची कृपा!
नेहमी मनाजोगता शेर लिहिल्यावर आम्ही पांडुरंगाचे आभार मानतो.
आता तुला सगळे पटेल की नाही आम्हास माहीत नाही पण जे आम्ही आचरतो वा तसा प्रयत्न करतो ते तुला लिहिले स्नेहाच्या नात्याने! चांगले वाटेल ते जरूर घे, बाकीचे सोडून दे!

टीप: आपल्या लिखाणाचे आपणच परखड परीक्षण करायला शिकावे.
जेव्हा एखादा दिव्य मिसरा वा शेर आपल्या हातून लिहिला जातो तेव्हा ते जाणायलाही शिकले पाहिजे.
ब-याचदा आपल्यालाच कळत नाही की, आपण किती सुंदर लिहिले आहे ते.
आम्ही तर सकाळी लिहिलेले दुपारी महाविद्यालयात इतरांना ऐकवतो. शेर पारखून घ्यायला मदत होते.
थांबतो! फारच तुला बोअर करणार नाही.....
............प्रा.सतीश देवपूरकर

..........च्या मूड मधे म्हणायचे आहेना भुन्गोजी राव तुम्हाला .....!!!

धन्स!! अन्तःकरणापासून धन्स !!

गुणगुणण्यावर भर द्यावे.
>>>>>>>>>>>>

बघ वैवकु मी पण तुला हेच सांगत होतो....... Proud