भिक्षावळ काय करावी?

Submitted by madevi on 27 November, 2012 - 02:54

माझ्या पुतण्याची मुंज दोन महिन्यानंतर आहे. पारंपारीक भिक्षावळ तर गावी करतीलच पण तुम्हाला काही नविन प्रकार माहित असतील तर सुचवा ना .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरजा -- भिक्षावळीसाठी नविन म्हणजे लहान मुलांना काय आवडते चॉकलेट --- सध्या चॉकलेट बुके हा एक नविन प्रकार आहे बघ....दिसतोही छान...आणी मुख्य म्हनजे हमखास खाल्ला जाईल, बाकीचे आपण काय काय घालतो भिक्षावळसाठी, लाडू, पेढे, पैसे....या पेक्षा हा प्रकार उठून दिसेल..बघ तुला आवडेल का?

बटुच्या झोळीत काय घालावे असं विचारायचं आहे का तुम्हाला? चक्क अभ्यासासाठी लागणारी स्टेशनरी, चांगली गोष्टीची पुस्तकं असंही झोळीत घालू शकता.

चॉकलेट्,बिस्कीटे,गोळ्या इ. करणारच आहे.पण अजुन वेगळे काही करता येइल का?
अश्विनी, बटुच्या झोळीत घालण्यासाटीच विचारायचे होते. तुमची आयडीया मला खुपच आवडली.
ह्या सगळ्यांचे पॅकींग टोकरीत छान वाटेल का?

चुरमुर्याचा ,डाळवांचा लाडू करतात तसाच dry fruits चा करता येईल.पारंपारीकही आणि नविन पण.>>>> ही पण छान आयडीया आहे..

रुचिरा पुस्तकातपण याबद्दल छान प्रकार आहेत..बघ

*

मुलांना उपयोगी पडतील व आवडतील असे रंगीत खडू/ स्केचपेन/ पेन्सिलींचे सेट्स, गोष्टीची पुस्तके, पॉकेट डिक्शनरी, कंपासपेटी इत्यादी स्टेशनरी व पुस्तके देऊ शकता. मुलांसाठीच्या एखाद्या मासिकाची वर्षाची वर्गणी त्या मुलाच्या नावे भरून त्याला ते सबस्क्रिप्शन देऊ शकता. शब्दकोडी, पझल्स, वैज्ञानिक खेळणीही देऊ शकता.

खाऊमध्ये सुकामेवा, काजूकंद, जेलीस्वीट्स, जेम्सच्या गोळ्या, इक्लेअर्स, कॅडबरी हे प्रकार हमखास हिट्ट ठरतात.
काही मुलांना श्रीखंडाच्या गोळ्या, बडीशेपेच्या गोळ्या, लिमलेटच्या गोळ्यांचेही फार आकर्षण असते. त्याही देऊ शकता. बिस्किटांचा कोणता खास प्रकार आवडत असेल तर तो. चिक्की, रेवड्या, गझक वगैरेही देता येईल.

निरजा,

पूर्वी मुंज झाली की बटू गुरूगृही शिकायला जायचा. आताची मुलं शिक्षण, नोकरी या निमित्ताने घराबाहेर असतातच. अशावेळेला सर्वात जास्त हाल्खाण्याचे होतात. त्यामुळे आपण भिक्षावळीमधे कूकिंग सेट अथवा बेसिक कूकबूक्स देखील देऊ शकता. {माझ्या भावाच्या मुंजीत आमच्या एका नातेवाईकांनी बेबी कूकर, चहाचे पातेले, गाळणी, दोन पातेली, ताट वाटी चमचे असा सेट दिला होता. पॅकिंग वगैरे सुंदररीत्या केले होते. पॅकिंगवर "स्वतःच्या हातानी बनवायला शिकायचे; म्हणजे आयुष्यात काहीच अडत नाही" असे सुंदर अक्षरात लिहिले होते.}

अजून एक म्हणजे, एखाद्या चांगल्या लायब्ररीचे मेंबरशिप कार्ड देऊ शकता.

काय द्यायच ते द्या!
पण नियम असा अस्तो की,
बटूने त्यास जे काय "भिक्षेमधे " मिळेल ते (या "जे काय" मधे कोरडा शिधाच अपेक्षित असतो, शिजवलेले/बनवलेले नाही) (नेहेमीच) गुरूच्या (अथवा गुरूमाऊलिच्या) चरणी अर्पण करायचे असते, व गुरू त्यातील "आवश्यक" तेवढेच परत बटूस देतो, बाकिचे गुरूच्याच ताब्यात रहाते.
इथे मुन्ज चालविणारे गुरूजी यास गुरू मानले जाते.
आता व्यावहारिकदृष्ट्या हा नियम कोणते गुरुजी कसा पाळतात हे बघणे औत्सुक्याचा विषय ठरेल, पण माझ्या बघण्यात मात्र आख्खी झोळी गुरुजींकडे देऊन, गुरुजी जे काय अन जितके देतिल तितकेच घेऊन संयम शिकविल्याचे देखिल पाहिले आहे.
असोच!

[आम्ही मुन्जी वा लग्ने लावायला जाणे नेहेमीच टाळतो, कारण लोकं शास्त्राधारित रितीन्ची शास्त्र/कारणमिमांसा काडीचेही समजून घेण्याचे कष्ट न करता दिखाव्यानिमित्ते कशाकशाप्रकारे वाट लावतात ते बघणे /अनुभवणे अशक्य होते. खरे तर हिन्दू धर्मियान्ची मुन्जी/लग्ने यातिल बदललेली (की बिघडलेली?) परिस्थिती यावर दो/चार शम्भरी पोस्टस्चे धागे सहज निघू शकतील. पण नकोच्च ते!]

लिंबुटिंबु, अगदी सहमत. भिक्षावळीतल्या वस्तू पळविण्यासाठी गुरुजींची अहमहमिका लागते. त्यांच्याकडून झोळी हिसकावून घेण्यासाठी अंगी निबरपणा असावा लागतो. झोळीत सुवर्ण,मौक्तिक,प्रवाल वगैरे घाला असं सांगतात. ते सर्व (दक्षिणेव्यतिरिक्त) गुरुजींनाच मिळते. आमच्या गावाकडे अशी प्रथा होती की झोळीतल्या फराळाच्य वस्तूतले थोडे थोडे जमलेल्या सर्वांना त्यावेळी किंवा नंतर भेट म्हणून द्यायचे. पण आता असे काही करताना कोणी दिसत नाही. या प्रथेमुळे आपण केलेल्या अपूर्वाईच्या,कलाकुसरीच्या वस्तू चार लोकांच्या नजरेस पडतात, त्यांची तारीफ होते.

धन्यवाद हीरा, पण
>>>>भिक्षावळीतल्या वस्तू पळविण्यासाठी गुरुजींची अहमहमिका लागते. <<<<<<
अशी आवश्यकता नाही, कारण ती सर्व झोळी "गुरूच्याच" चरणी अर्पण करायची असते.

>>>> त्यांच्याकडून झोळी हिसकावून घेण्यासाठी अंगी निबरपणा असावा लागतो. <<<< याचीही आवश्यकता नाही, कारण बटूस पहिल्यावहिल्या व कदाचित हल्लीच्या काळात आयुष्यात एकदाच मागितलेल्या भिक्षेत जो काय "शिधा" मिळेस तो त्याने गुरू चरणीच अर्पण करायचा असतो. इतरांचे तिथे काम नाही.

>>>> झोळीत सुवर्ण,मौक्तिक,प्रवाल वगैरे घाला असं सांगतात. <<<< कोणी सान्गत असतील तर ते चूकीचेच आहे. केवळ अन केवळ कोरडा शिधाच भिक्षेमधे घातला पाहिजे. पण माझ्या माहितीमधे तरी असे सान्गणारे कुणी भेटले/दिसले नाहि, उलट असे कुणि घातलेच तर यजमानाला शेवटी मौल्यवान ते ते काढून घ्यायलाच सान्गतो.
"आई"कडे मागितलेल्या भिक्षेत, केवळ आईच फक्त, आपला पुत्र आता घरापासून बरीच वर्षे शिक्षणासाठी दूर गुरुगृही जाणार म्हणून, पुत्राच्या आवडत्या दोनचार गोडधोड बाबी "भिक्षा" म्हणून घालू शकते. बाकिच्यान्ना शिध्याव्यतिरिक्त काही देण्याचा अधिकार नाही, तर घेणार्‍यासही घेण्याचा नाही

>>>> ते सर्व (दक्षिणेव्यतिरिक्त) गुरुजींनाच मिळते. <<<< शिध्याची भिक्षा असेल (हल्ली मौल्यवान वस्तून्व्यतिरिक्तचे खाद्यपदार्थ) तर ती गुरुजींकडेच जायला हवी.

तुम्हांस बटूस काही मौल्यवान भेट द्यायचीच असेल, तर त्याकरता सोडमुन्ज झाल्यावर अथवा नन्तर व्यासपीठावर स्वतन्त्ररित्या आहेर द्यावा-घ्यावा. जर कुणी शहाजोगपणे लिहीले असेल की आहेर आणू नका, तर आहेर न नेण्याचे "निर्लज्य धाडसही" जरुर दाखवा, पण कृपया आहेर आणू नका असे सान्गितले तर भिक्षावळीत आहेर घाला असे काही करू नये. बटूस शिक्षणोपयोगी वस्तू/पुस्तके (वर कुणीकुणी लिहील्याप्रमाणे) वगैरे बाबी जरुर द्याव्यात, पण देण्यासाठी त्याचा संबंध भिक्षावळीशी लावू नये/भिक्षावळीत या वस्तू देऊ नयेत.

मूळात मुन्ज हा विषय "समारंभ", "दिखाव्याचा", "जेवणावळी वगैरे घालायचा" नसून बटू, त्याचे पालक अन गुरुजी, ओवाळण्यापुरती एखादी सवाष्ण, ती नसेल तर ओवाळण्यास स्वतः गुरुजीच, इतक्याच जणांपुरता मर्यादित आहे. यात कुठेही आहेर/जेवणावळी/रुखवत/मिरवणूक वगैरे काहीही नाही.
बरेचदा मी अनुभवलय, की असा अगदी चेहरा पाडून सान्गतात "आम्ही ना आमच्या चिन्ट्यापिन्ट्याचि मुन्ज घरच्या घरीच "थोडक्यात" लावली", देवळात सामुहिक मुन्जीत भाग घेतला हे सान्गताना तर मणामणाचे ओझ डोक्यावर असल्यागत खालमानेने सान्गतात. अशी वृत्ती का बनावी?
जन्मल्या जन्मला बाळाला धुतलापुसला असेल, तर ते जितक्या सहजतेने दाईने/सुईणीने केले असेल तितक्याच सहजपणे मुन्जही व्हायला हवी. पण ते होत नाही, आम्हिच अमक्या तमक्याशी तुलना/कम्पेअर करत, बाकीच्यान्च्या भपक्याला भुलत, मुन्जीमधे हे हे इतके करायलाच हवे/इतके जण बोलवायलाच हवेत्/इतका खर्च करायलाच हवा/होतोच असे मनाशी ठरवतो, व प्रसंगवशात तसे केले गेले नाही तर मात्र खालमानेने चेहरा पाडून सान्गतो.
अभिमानास्पद अशा मुन्ज या संस्कार विषयाचीही आम्ही पार वाट लावतो.

असो, प्रत्यक्षात चालु कालानुसार चालायच्या नावाखाली बरेच "शास्त्रबाह्य नि कालबाह्य" अस्ते तिथे, धार्मिकतेचा मागमूसही नसतो, काय करतोय, का करतोय याचे सोयर सुतक नस्ते, अस्तो तो केवळ भपका/दिखावा, अन एक "संस्कार" कसातरी उरकून "धार्मिक" कर्तव्य उरकल्याची कृतकृत्यता.
मुन्जीमधे तरी खूपच गाम्भिर्य असते. लग्न म्हणजे हल्ली फक्त "तमाशा" झालाय. जौद्या.
मला येत्या २९ला एका लग्नाला (लावायला नव्हे, केवळ अक्षत टाकायला) जायचय.
देवाऽऽ, मला सहनशक्ति दे! Proud

>>
मूळात मुन्ज हा विषय "समारंभ", "दिखाव्याचा", "जेवणावळी वगैरे घालायचा" नसून बटू, त्याचे पालक अन गुरुजी, ओवाळण्यापुरती एखादी सवाष्ण, ती नसेल तर ओवाळण्यास स्वतः गुरुजीच, इतक्याच जणांपुरता मर्यादित आहे. यात कुठेही आहेर/जेवणावळी/रुखवत/मिरवणूक वगैरे काहीही नाही.
बरेचदा मी अनुभवलय, की असा अगदी चेहरा पाडून सान्गतात "आम्ही ना आमच्या चिन्ट्यापिन्ट्याचि मुन्ज घरच्या घरीच "थोडक्यात" लावली", देवळात सामुहिक मुन्जीत भाग घेतला हे सान्गताना तर मणामणाचे ओझ डोक्यावर असल्यागत खालमानेने सान्गतात. अशी वृत्ती का बनावी?
जन्मल्या जन्मला बाळाला धुतलापुसला असेल, तर ते जितक्या सहजतेने दाईने/सुईणीने केले असेल तितक्याच सहजपणे मुन्जही व्हायला हवी. पण ते होत नाही, आम्हिच अमक्या तमक्याशी तुलना/कम्पेअर करत, बाकीच्यान्च्या भपक्याला भुलत, मुन्जीमधे हे हे इतके करायलाच हवे/इतके जण बोलवायलाच हवेत्/इतका खर्च करायलाच हवा/होतोच असे मनाशी ठरवतो, व प्रसंगवशात तसे केले गेले नाही तर मात्र खालमानेने चेहरा पाडून सान्गतो.
अभिमानास्पद अशा मुन्ज या संस्कार विषयाचीही आम्ही पार वाट लावतो.
<<

संपूर्ण सहमत.
अभिनंदनिय विचार.

तुम्हाला शक्य असल्यास बटूलाच विचारा त्याला काय आवडेल ते .

एखादी वस्तू तुम्ही विकत आणून देण्याऐवजी त्याला एखाद्या हाइक / ट्रेक ला नेणे, एक पूर्ण दिवस त्याच्या सोबत त्याच्या आवडीच्या गोष्टींमधे घालावणे , त्यालाच पुस्तके / खेळणी यांच्या दुकानात नेऊन त्याच्या आवडीच्या गोष्टी खरेदी करु देणे , त्याला हव्या असलेल्या एखाद्या क्लासला घालणे असे काही तरी करू शकता.

बटूच्या घरची सांपत्तिक स्थिती चांगली असल्यास बहुतेक वेळा भेटीत मिळालेल्या वस्तूंचं फारसं अप्रूप रहात नाही. त्यामुळे त्याच्या कलाने भेट देता येईल असे पहा.

एखाद्या शैक्षणिक मासिकाची वर्षाची वर्गणी भरू शकता. एखादे एफ. डी, देऊ शकता. पुस्तकाचा पर्याय चांगला आहे. त्याच्या बरोबर आवडणारा नट्स आणि ड्रायफ्रूटसचा खाऊ.

नंदिनी, माझा पुतण्या ८ वर्षांचा आहे त्यामुळे त्याला त्याप्रमाणेच द्यावे लागेल.
लिंबूजी, तुमचे म्हणने अगदी योग्य आहे.त्यामुळेच कोरडी भिक्षावळ करणार आहोत ती गुरुजींनाच देणार हेही माहित आहे.
बटू लहान असल्यामुळे त्याला त्याच्या आवडीच्या वस्तु मिळाल्यावर जो आनंद त्याला होइल तो जास्त महत्वाचा वाटतो.त्याला मी असेही देऊ शकते पण मलाच भिक्षावळीच्या निमीत्ताने द्यायचे होते.
बाकी मला धर्म, संस्कार इ. मध्ये खोलवर जायचे नाही.
लिंबूजी मी काही चुकीचे लिहले असेल तर माफ करा.

नीरजे, तू धाग्याच्या सुरवातीलाच म्हणले आहेस की "पारंपारिक भिक्षावळ....", तेव्हा तुम्ही कुणीच चूकीचे लिहीले असे मी म्हणत नाही.
[अन माफ वगैरे करणारा मी कोण असा लागून गेलोय? ]
मी फक्त या धाग्याच्या विषयाच्या निमित्ताने वाचक/सूचकान्च्या लक्षात यावे (for attention) म्हणून काही एक निवेदन केले. ज्याला पटेल त्याने जरुर घ्यावे, न पटेल तर सोडून द्यावे.
प्राप्त परिस्थितीप्रमाणे, वर सूचविलेल्या वेगवेगळ्या उपायांपैकी शक्य ते अवलंबावे, फक्त "भिक्षावळ" म्हणून नव्हे तर "आशिर्वादपर सप्रेम भेटीचा नविन प्रकार" म्हणून करावे, इतकेच सान्गणे असे.

बाकी, तू चक्क "लिम्बूजी" असे संबोधून माफ करा वगैरे म्हणतीहेस, तिकडे इब्लिसराव चक्क सहमतीच्या टाळ्या वाजवताहेत! मी चिमटा काढून बघतो, झोपेतल्या स्वप्नातच मायबोली उघडुन तर बसलो नाहीये ना मी? Proud

फक्त "भिक्षावळ" म्हणून नव्हे तर "आशिर्वादपर सप्रेम भेटीचा नविन प्रकार" म्हणून करावे, इतकेच सान्गणे असे.
> १००% पटले

लिंबूटिंबू ,

कृपया आपण, 'मुंज अर्थात उपनयन संस्कार' या विषयावर तो (संस्कार) कुणावर, का, कधी, कोणी, केव्हा, कसा ई 'क' कारी प्रश्नांची उत्तरे मिळतील अशा स्वरुपाचा एक स्वतंत्र लेख लिहू शकाल का?

हर्पेन, लेखाची कल्पना चांगली आहे, लिहू शकेन पण त्यासाठि थोडा वेळ लागेल. Happy
तुमची सूचना/कल्पना मनात नोन्दविली आहे.

limbutimbu - 100% अनुमोदन; अतिशय महत्त्वाची माहिती......

माझ्याकडून पण चिमूटभर.........

भिक्षावळीसाठी चॉकलेट, श्रीखंडाच्या गोळ्या, बिस्किटे, जेलीची चॉकलेट यांचा विचार तर नकोच नको पण हे पदार्थ भेट म्हणून पण नको. कारण, कित्येक इंपोर्टेड चॉकलेट्‌समध्ये अंडे असते. श्रीखंडाच्या गोळ्या किंवा जेलीची चॉकलेट्‌स यांमध्ये जिलेटिन नावाचा पदार्थ नॉनव्हेज पदार्थ असतो. बिस्किटांमध्ये डालडा असतो. (पाहा - http://ahimsasangh.net/जिलेटिन-कैसे-बनता-है-how-gelatin-is-made )

मुंजीमध्ये बटूला गायत्री प्रबोध होणार असतो. नंतर तो गायत्रीची उपासना करणार असतो. त्यासाठी त्याला खानपानादी काही नियम पाळावयाचे असतात. त्यामुळे केवळ नाविन्याच्या प्रकारापायी वरील पदार्थ त्याला देऊन मुंजीचे पावित्र्य घालवू नये. बटूला या सर्व गोष्टीचे अज्ञान आहे पण आपण सर्व सूज्ञ आहोत. वेगळे काहीतरी या सदराखाली प्रथा, परंपरा आपण पाहिजे तशा मोल्ड करू नयेत असे मला वाटते.

खरेतर कार्यालयात मुंज झाली असता मुंजीनंतरच्या पहिल्या विधिपूर्वक अन्नसंस्कारात बटूस कार्यालयातील जेवण जेवावे लागते, हे सुद्धा योग्य नाही. मुंज हा संस्कार खऱ्या अर्थाने करावयाचा असेल तर सध्याच्या काळात घरातल्या घरात मुंज लावणे योग्य ठरेल. घरी अतिशय योग्यप्रकारे हा संस्कार करता येतो. कारण मुंजीमध्ये "मेधाजनन' हा अतिशय महत्त्वाचा विधी आहे. मेधाजनन म्हणजे वेदग्रहण करण्यासाठीची बटूमध्ये "मेधा' (जी बुद्धी व प्रज्ञा याहून भिन्न आहे) उत्पन्न होणे महत्त्वाचे ठरते; जी मेधा बटूच्या पुढील अध्ययनास साहाय्यभूत ठरणार असते. मेधाजनन हे मुंजीनंतर चौथ्या दिवशी करतात. कारण तीन दिवस संध्या व अग्निकर्म केल्यानंतर चौथ्या दिवशी दिवशी बटूस मेधाजनन करून घेण्याची आर्हता प्राप्त होते. (परंतु सध्याच्या काळात कार्यालयामध्ये एकाच दिवशी सर्व विधी केले जातात.)
मुंजीनंतरचा (आश्र्वलायन सूत्रानुसार) अभ्यासक्रम (सिलॅबस्‌) येथे थोडक्यात देतो म्हणजे आपणास कल्पना येईल.

मुंजीनंतर पहिली तीन वर्षे - काव्यव्युत्पत्ती व पाणिनिकृत अष्टाध्यायी, धातुपाठ व सिद्धान्तकौमुदि, पतंजलिकृत महाभाष्य; 1।। वर्षे - दीपिकेसह तर्कसंग्रह, सिद्धान्तमुक्तवली, कात्यायनादि मुनिकृत कोश, यास्कमुनिकृत निघण्टू व निरुक्त; 6 महिने - पिंगलमुनिकृत भाष्यासहित छंदसूत्र, वामनकृत काव्यालंकारसूत्र व त्यावरील वात्स्यायनमुनीचे भाष्य, जैमिनिकृत पूर्वमिमांसाशास्त्र, व्यासमुनीकृत व्याख्यांसहित अधिकरणमाला, मनुस्मृती; 3 महिने - कणादकृत वैशेषिकदर्शन व त्यावरील गौतममुनिकृत पदभाष्य भारद्वाजमुनिकृत सूत्रवृति; 5 महिने - गौतमकृत न्यायदर्शन व त्यावरील वात्स्यायमुनीचे भाष्य, 2 महिने - पतंजलिकृत योगशास्त्र व त्यावरील व्यासकृत भाष्य, 2 महिने - कपिलकृत सांख्यदर्शन व त्यावरील भागुरिमुनिकृत भाष्य, 6 महिने - ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य, छांदोग्य, ब्रह्मविद्या, ऐतरेय व बृहदारण्यक ह्या उपनिषदांचा अभ्यास, 6 महिने - बादरायण कृत वेदांत दर्शन व त्यावरील शांकरभाष्य व रामानुजभाष्य यांचा अभ्यास याप्रमाणे सहा शास्त्रे व दहा उपनिषदे यांचा अभ्यास झाल्यानंतर पुढील 2 वर्षे - अर्थ व स्वर यासहित संपूर्ण ऋग्वेद शिकून आश्र्वलायनकृत श्रौत व गृह्यसूत्र, बह्‌ऋचब्राह्मण व कल्पसूत्र हे ग्रंथ शिकावेत. त्यानंतर 1।। वर्षे - यजुर्वेद व श्रौत हिरण्यकेशी श्रौतसूत्र व गृह्यसूत्र, शतपथब्राह्मण व तैत्तिरीय ब्राह्मण हे ग्रंथ शिकावेत. नंतर 1 वर्ष - सामवेद व गोभिलीय व राणायन श्रौतसूत्र, कल्पसूत्र, सामब्राह्मण; 1 वर्ष - अथर्ववेद व शौनक श्रौत व गृह्यसूत्र, अथर्वब्राह्मण व कल्पसूत्र ह्या ग्रंथाचा अभ्यास, अशा प्रकारे आठव्या वर्षी मुंज झाल्यानंतर पुढील 6 ते 7 वर्षामध्ये (वयाच्या 15 व्या वर्षी) चारही वेदांचे अध्ययन पूर्ण होते. उपरोक्त अध्ययन झाल्यानंतर बटूने पुढील 3 वर्षात ऋग्वेदाच्या उपवेदाचा अर्थात आयुर्वेद तसेच धन्वंतरीकृत निघण्टू, चरक व सुश्रुत या तीन ग्रंथातील शस्त्रक्रिया, हस्तक्रिया व निदानक्रिया या विषयांचे यथार्थ ज्ञान घ्यावयाचे आहे. नंतर पुढे सामवेदाचा उपवेद गांधर्ववेद (वाद्य, रागरागिणी, कालताल व स्वरपूर्वक गायन) 2 वर्षात पूर्ण करावयाचे आहे. नंतर पुढील 3 वर्षात अथर्ववेदाचा उपवेद अर्थवेद (शिल्पशास्त्र), बौधायन शुल्बसूत्र, ऋतव्येष्टकोपधान ब्राह्मण, शिल्पसंहिता, कश्यपसंहिता, अगस्त्यसंहिता, भृगुसंहिता, पद्मसंहिता, गार्गेयागम शिकावे. नंतर पुढील 3 वर्षात गणितविद्या, ज्योतिःशास्त्र, भृगु आदि विविध मुनींची सूत्रे, व भाष्य बृहत्संहिता ह्यांचा अभ्यास. (संदर्भ प. पू. ब्र. भू. बालशास्त्री क्षीरसागर कृत सार्थ षोडशसंस्काररत्नमाला)

उपरोक्त अभ्यासक्रमास अनुसरून भिक्षावळीच्या वेळी भिक्षा मागताना बटू; (पुरुषाकडे) "ॐ भवन्‌ भिक्षां देहि। चतुर्वेदान्‌ षट्‌शास्त्राणि अष्टादशपुराणानि पठिता भवामि।।' अर्थात, "अहो! मला भिक्षा द्या! मी चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ह्यांचे अध्ययन करणार आहे.' आणि (स्त्रीकडे) "ॐ भवति भिक्षां देहि। चतुर्वेदान्‌ षट्‌शास्त्राणि अष्टादशपुराणानि पठिता भवामि।।' अर्थात, "माई! मला भिक्षा दे! मी चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे ह्यांचे अध्ययन करणार आहे.', असे म्हणून भिक्षा मागत असतो.

याप्रमाणे सुमारे 25 ते 30 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून अध्ययन झाल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारावयाचा असेल तर गुरु व मात-पिता यांच्या संमतीने समान व योग्य लक्षणांनी युक्त अशा वधूची योजना करून नंतर सोडमुंज करावयाची असते. तथापि एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाला ब्रह्मचर्यव्रताने पूर्ण विद्याभ्यास करून जितेंद्रिय राहून वैराग्यशक्ती प्राप्त झाली तर तो परोपकारार्थ व परमार्थ आदिशंकराचार्यांप्रमाणे संन्यास घेऊ शकतो.

उपरोक्त विवेचन वाचल्यानंतर आपण लक्षात येईल की वयाच्या 15 व्या वर्षीच हा बटू चार वेदाचा अध्ययन पूर्ण करीत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किती विचक्षणता बटूच्या अंगी यावयास हवी. ही विचक्षणता केवळ योग्य मेधजनानामुळे व नंतर करण्यात येणाऱ्या नित्यसंध्या व नित्यअग्निकर्म यांमुळे प्राप्त होत असते. ज्याची मेधा प्रगल्भ आहे असा बटूच उपरोक्त अत्यंत कठीण अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. सध्याच्या काळातदेखील नवीनतम अभ्यासक्रमासाठी मेधाजनन उपयुक्त ठरते. तरी मुंजीकडे सोहळा म्हणून न पाहता त्याकडे एक महत्त्वाचा संस्कार म्हणून पाहावे व मुंज शास्त्रोक्त पद्धतीने कशी होईल ते पाहावे.

हे सगळं जर का त्या बटूने वाचलं तर गेली माझी चॉकोलेट्स म्हणून हळहळल्यावाचून राहणार नाही तो..काय केलंस तू हे निरजा मावशी/आत्या Light 1

माझ्या मावशीनं तिच्या नातवाच्या मुंजीत - त्याला कळतील अशी गोष्टींची + इन्स्पिरेशनल + वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं ठेवलेली रुखवतावर

वेका निरजाकाकू आहे मी बटूची. पण ह्यामुळे खुप चांगल्या गोष्टी कळल्या ना आपल्याला.
स्टेशनरी वस्तु,पुस्तके, एज्युकेशनल गेम्स ,ड्रायफ्रुट्स असे देता येइल की.
खरतर मी भिक्षावळीच्या एवजी मुंजीचे रुखवत असेच लिहावयास हवे होते.

चॉकलेट किंवा तत्सम पदार्थात असलेल्या अंड्यामुळे/जिलेटीनमुळे हे पदार्थ कसे काय भिक्षावळीत किंवा लग्न/मुंजीच्या रुखवतात चालतील असा एक भाबडा प्रश्न मला पडला होता. पण तसंही मुंज आता फक्त एक सोहळा म्हणुनच करतात, असा विचार करुन आधी लिहीले नव्हते.
लिंबुटिंबु आणि हरीहर यांच्या पोस्टी माहितीपुर्ण आहेत.

लिंबू आणि हरिहर यांच्या पोस्टस अगदी संग्रहणीय आहेत.

हरिहर, असाअसा सिलॅबस हवा हे साधारण कधी ठरले?
वेदाध्ययनाशिवाय काही नविन अभ्यासक्रम , कालानुरूप बदल करतात का?

हल्ली पाठशाळांमधून संगणकादी चालू अभ्यासक्रम देखील शिकवला जातो. (कारण तसे जर केले नाही तर मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवले म्हणून आपले कर्तव्यदक्ष सरकार त्यांच्यावर फौजदारी करू शकते.) प्रत्येक सूत्रानुसार अभ्यासक्रम वेगवेगळा असू शकेल. येथे आश्र्वलायन सूत्रानुसार अभ्यासक्रम दिलेला आहे. इतरांचा मला माहीत नाही. limbutimbu एखाद्या वेळेस सांगू शकतील. सध्याच्या काळात देखील अशा आपापल्या सूत्रानुसार वैदिकशिक्षण घेणारे बटू आहेत. वेदग्रहण झाल्यानंतर पुढेपुढे तर घन, जटा, चक्रदंड अशा पद्धतीने वेदऋचांच्या विकृतींचे शिक्षण घेतले जाते. उदाहरणार्थ एका ऋचेचा घन पाहू.

यज्ञेन यज्ञमयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्‌।। (ऋग्वेद, मंडल 10- सूक्त 90-ऋचा 16)
(1) यज्ञेन (2-3) यज्ञं+अयजन्त (4-5)देवा:+तानि (6)धर्माणि (7-8)प्रथमानि+आसन्‌ ।।
या ऋचेचा घनपाठ खालीलप्रमाणे होतो.
यज्ञेन यज्ञं यज्ञं यज्ञेन यज्ञेन यज्ञमयजन्त अयजन्त यज्ञं यज्ञेन यज्ञेन यज्ञमयजन्त।।
(1-2-2-1-1-2-3-3-2-1-1-2-3)
यज्ञमयजन्त अयजन्त यज्ञं यज्ञमयजन्त देवाः देवा अयजन्त यज्ञं यज्ञमयजन्त देवाः ।।
(2-3-3-2-2-3-4-4-3-2-2-3-4)
अयजन्त देवा देवा अयजन्त अयजन्त देवास्तानि तानि देवा अयजन्त अयजन्त देवास्तानि ।।
(3-4-4-3-3-4-5-5-4-3-3-4-5)
देवास्तानि तानि देवा देवास्तानि धर्माणि धर्माणि तानि देवा देवास्तानि धर्माणि।।
(4-5-5-4-4-5-6-6-5-4-4-5-6)
तानि धर्माणि धर्माणि तानि तानि धर्माणि प्रथमानि प्रथमानि धर्माणि तानि तानि धर्माणि प्रथमानि।।
(5-6-6-5-5-6-7-7-6-5-5-6-7)
धर्माणि प्रथमानि प्रथमानि धर्माणि धर्माणि प्रथमान्यासन्‌ आसन्‌ प्रथमानि धर्माणि धर्माणि प्रथमान्यासन्‌ ।।
(6-7-7-6-6-7-8-8-7-5-6-7-8)

वरील घनपाठामध्ये जे आकडे दाखवलेले आहेत ते मूळ ऋचेतील पदांचे असून त्यावरून ऋचेतील प्रत्येक पद कसे व किती वेळा आवृत्त होते याची कल्पना येऊ शकेल.

हा झाला एका ऋचेचा घनपाठ. अशा ऋग्वेदातील दहा हजार ऋचांचा घन पाठ असणारे कित्येक घनपाठी ब्राह्मण आजदेखील आहेत आणि ते वेदजतनाचे महत्कार्य करत आहेत. आणि समाज त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो तर सत्यनारायण पूजा सांगणारा, गणपती बसवणारा किंवा लग्नात मङ्गलाष्टक म्हणणारा एक भटजी.

कधीतरी विशेषकरून अक्षयतृतियेच्या दिवशी अशा घनपाठी ब्राह्मणाला घरी बोलवा, त्याचा यथोचित सन्मान करून उदाहरणादाखल आशीर्वाद मंत्रांचा घन म्हणावयास सांगा म्हणजे लक्षात येईल की त्याची योग्यता काय आहे.
आणि यानंतर जटा व चक्रदंड अशा वेदविकृती आहे. त्यांची तर कल्पनाच न केलेली बरी.

Pages