बिजवराच्या पत्नीच्या खुनाचे प्रकरण - भाग १

Submitted by हर्षल वैद्य on 2 November, 2012 - 03:37

४ ऑगस्ट २००५. हरकिशन लखानी आदल्याच रात्री आपल्या बिझनेस टूरवरून भारतात परतले होते. एक रात्र मुंबईत काढून दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी आपल्या खंडाळ्याच्या बंगल्याचा रस्ता धरला होता. गाडी पार्क करतेवेळी त्यांना बंगल्यात जरा जास्तच वर्दळ दिसली. खाकी वर्दीतील चार-पाच हवालदार इथे तिथे फिरत होते. कसलीतरी मोजमापे घेत होते. हरकिशनभाई विचार करतच गाडीतून उतरले आणि त्यांची भेट इन्स्पेक्टर तावड्यांशी झाली.

"तुम्ही श्री. लखानी का? " तावड्यांनी विचारले.

"हो. काय भानगड काय आहे इन्स्पेक्टर? "

"आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी मि. लखानी, आपल्या पत्नी श्रीमती सुनंदा यांचा काल रात्री खून झाला आहे. "

"ओह नो! ", हरकिशनभाई मटकन खालीच बसले. तावड्यांनी एकाला पाणी आणावयास पाठवले. नंतर ते हरकिशनभाईंना सावकाश घरात घेऊन गेले. "लखानीजी, माफ करा, आपल्यासाठी हा एक फार मोठा धक्का आहे हे आम्ही समजू शकतो. तरी गुन्ह्याचा तपास शक्यतो वेगाने व्हावा म्हणून आम्हास काही गोष्टी करणे भाग आहे. आम्ही सुनंदाबाईंचे प्रेत ताब्यात घेतले आहे. ते तुम्हाला शवविच्छेदनानंतर साधारण दोन दिवसांनी मिळेल. तुम्ही कृपया घरातील सर्व वस्तूंचा एकदा हिशोब घेऊन काही सामान गहाळ झाले आहे काय ते पाहा. आमची या ठिकाणाची बरीचशी पाहणी पूर्ण झाली आहे. मी उद्या संध्याकाळी परत येईन. तेव्हा मला मिसिंग मालमत्तेची यादी द्या. काही जबान्यासुद्धा घ्याव्या लागतील. मी उद्याच तपशीलवार सांगेन. " तावडे पंचनामा पूर्ण करून निघून गेले.

---------------------------------------------------------------------------------------------------

हरकिशन लखानी हे मुंबईतील एक बडे प्रस्थ होते. लखानी उद्योगसमूह हे एक प्रख्यात नाव होते. हरकिशनभाई त्याच लखानी कुटुंबातील कनिष्ठ बंधू. जरी प्रमुख अधिकार हे त्यांचे ज्येष्ठ बंधू, स्वरूपकिशन यांच्या हातात असले तरी हरकिशनभाईंच्या शब्दालाही उद्योगसमूहात मोठा मान होता. विशेषकरून तयार कपड्यांच्या उद्योगाचा कारभार हरकिशनभाई एकहाती सांभाळत असत. याकरिता त्यांची महिन्या – दोन महिन्यात एखादी परदेशवारी होतच असे.

हरकिशनभाई साधारणतः पन्नाशीतील गृहस्थ होते. पण त्यांचा कामाचा उरक पाहून लोक त्यांना चाळिशीतीलच समजत. त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न वयाच्या बावीसाव्या वर्षीच कलावतीदेवींबरोबर झाले. चोवीस वर्षे संसार केल्यावर कलावतीदेवी साध्याशा आजाराच्या निमित्ताने वारल्या. औषधांची अकल्पनीय रिऍक्शन असे निदान डॉक्टरांनी सांगितले. पत्नीच्या निधनानंतर वर्षाच्या आत हरकिशनभाईंनी सुनंदाबरोबर लग्न केले. सुनंदा त्यावेळी अठ्ठावीस वर्षांची होती आणि लखानी ग्रुपमध्येच वरिष्ठ पदावर कार्यरत होती. लग्नानंतर सुनंदा नोकरी सोडून घरीच राहू लागली.

हरकिशनभाईंना कलावतीदेवींपासून नेत्रा नावाची एक मुलगी होती. आईच्या मृत्युच्या वेळी नेत्रा सतरा वर्षांची होती. नेत्राला आपली सावत्र आई कधीच आवडली नाही. या लग्नानंतरच हरकिशनभाईंनी खंडाळ्याची प्रॉपर्टी घेतली होती. सुनंदाबाई बरेचदा खंडाळ्यासच असत. त्या जेव्हा मुंबईस येत, नेत्रा काकांकडे राहण्यास जात असे. नेत्राने नुकतेच शिक्षण पूर्ण करून आपल्याच उद्योगात उमेदवारी सुरू केली होती.

सुनंदा ह्या लग्नापूर्वी आपल्या भावाबरोबर बोरिवलीस राहत असे. सुनंदाचा भाऊ मनसुख दलाल एका सी. ए. फर्ममध्ये कामास होता. मनसुखचं छोटं आणि सुखी कुटुंब होतं. पत्नी निशा आणि मुलगा हरीश. सुनंदाचं हरकिशनभाईंशी झालेलं लग्न मनसुखला मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर त्याने सुनंदाशी कसलाही संबंध ठेवला नव्हता. पण सहा महिन्यांपूर्वीच सुनंदाने स्वतःचा वीस लाखाचा विमा उतरवला होता ज्याचा लाभार्थी तिने हरीशला केले होते. तसे तिने आपल्या भाईला पत्राने कळवले होते.

या कथेला खरी सुरुवात त्यावेळी झाली जेव्हा निशा दलाल आपल्या नवऱ्याची केस घेऊन माझा मित्र देवदत्त याच्याकडे आली. ५ ऑगस्टची संध्याकाळ. शुक्रवार असल्याने मी नेहमीप्रमाणे देवदत्तकडे कॉफी आणि आठवड्याच्या गप्पा यासाठी गेलो होतो. श्रावणी पाऊस पडत होता. मी जाताना भजी घेऊन गेलो होतो. आमच्या गप्पा चालू असताना संध्याकाळी साधारणतः सातच्या सुमारास बेल वाजली. दाजीने (देवदत्तचा नोकर) दार उघडले. दारात निशा दलाल या नखशिखांत भिजलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. त्या अतिशय घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या दिसत होत्या. दाजीने त्यांना एक टॉवेल दिला आणि जराशी कॉफी दिली. देवदत्तने त्यांना बसायला सांगितले आणि त्यांचे चित्त जरा स्थिर झाल्यावर त्यांनी आपली कैफियत सुरू केली.

---------------------------------------------------------------------------------------------------

पण अजून मी तुम्हाला माझा आणि मुख्य म्हणजे देवदत्तचा परिचय करूनच दिलेला नाही. देवदत्त हा एक खाजगी गुप्तहेर आहे. खाजगी गुप्तहेर म्हटल्यावर जी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते त्याच्या एकदम उलट व्यक्तिमत्त्व. सडसडीत बांधा. अंगात साधेसे कपडे. खांद्यावर बरेचदा शबनम. गुन्ह्याच्या ठिकाणी तपासास लागतील अशा अनेक चमत्कारिक वस्तू त्या शबनममध्ये सापडतील. नोंदवही, अनेक पेनं, भिंग, कॅमेरा, फूटपट्टी, बारीक दोरा, सुतळीचा गुंडा, चाकू, एखादं फळ आणि खोट्या दाढी-मिशा सुद्धा. गुन्हेगारांच्या मागावर जाताना मात्र जरा हालचालीस सोपे पडेल असे ढगळ शर्ट पॅंट आणि त्याच्याजवळ एक अत्यंत आधुनिक असं पिस्तूलसुद्धा आहे. अर्थात त्याचा वापर झालेला मला फारसा आठवत नाही. पण त्याला तायक्वांडो उत्तम येतं आणि त्याचं फार भयानक प्रात्यक्षिक मी एकदोनदा पाहिलं आहे. पण त्याचं प्रमुख शस्त्र म्हणजे त्याच्या सर्व गबाळेपणावर मात करतील असे त्याचे ते दोन भेदक हिरवट डोळे. ते जेव्हा रोखून तो पाहतो तेव्हा कोणीही त्याच्याशी खोटं बोलूच शकत नाही. पण कसे कोण जाणे एखाद्या साक्षीदाराशी बोलताना तेच डोळे अतिशय आश्वासक भाव व्यक्त करताना मी पाहिले आहेत.

देवदत्त स्वतः शक्यतो कोणत्याही गुन्हेगारास पकडावयास जात नाही. त्याची यंत्रणा मजबूत आहे. हवे ते पुरावे गोळा करून तो पोलिसांना खबरा देतो. साक्षीपुरावे गोळा करणं आणि त्याआधारे आणि आपल्या तल्लख मेंदूचा वापर करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हे त्याचं काम. प्रत्यक्ष अटकेची जबाबदारी पोलिसांची. म्हणून गुन्हेगारी जगतात देवदत्तला ’पॅंथर’ म्हणून ओळखलं जातं.

आणि मी डॉ. सुलाखे. सूर्यकांत सुलाखे. सध्या जनरल फिजीशियन म्हणून काम बघतो. पण फोरेन्सिक सायन्सची फार आवड. उच्च शिक्षणासाठी हाच विषयही घेतला होता. काही वर्षे पोलिसात नोकरी केली. नंतर वैयक्तिक कारणांमुळे सोडावी लागली पण अजूनही तज्ञ म्हणून काही केसेससाठी जातो. देवदत्तची मैत्री तेव्हाच एका केसमुळे जुळली आणि त्याच्यासारखा स्वतंत्र झाल्यावर पक्की झाली.

---------------------------------------------------------------------------------------------------

तर या कहाणीची सुरुवात होते ती ५ ऑगस्टच्या संध्याकाळी. श्रीमती दलाल जेव्हा देवदत्तला भेटायला आल्या तेव्हा मी तिथेच होतो. गुन्हा तीन तारखेस घडला त्या सकाळी मनसुख दलाल आपल्या बहिणीस भेटायला खंडाळ्यास गेले होते. तिथून ते ४ तारखेस घरी परतले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दुपारी तिथून निघाले पण रात्री त्यांचा निवास कुठे होता ते सांगण्यास त्यांनी नकार दिला. साहजिकच पोलिसांनी त्यांचाच संशय घेतला. त्यांचे आधीच बहिणीशी पटत नव्हते आणि त्या दिवशीही त्यांचे भांडण झाल्याचे नोकराने जबानीत सांगितले होते. शिवाय विम्याचे पैसे हाही मुद्दा होताच. मनसुखभाईंना लगेच अटक झाली.

श्रीमती दलाल अगदी घाबरून गेल्या होत्या. देवदत्तने त्यांना शांत केले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. "हे बघा बाई, जर माझ्या मदतीची अपेक्षा असेल तर काही गोष्टी मला स्पष्टपणे तुम्ही सांगितल्या पाहिजेत. आणि खोटं बोलण्याचा उपयोग नाही. सुलाख्यांना तुम्ही विचारू शकता की माझं हेरांचं जाळं किती मजबूत आहे. थोडीही खोटी माहिती मी लगेच पकडेन. "

"नाही देवदत्त साहेब. काहीही विचारा. मी मला माहित आहे ते सर्व सांगेन"

"तर ३ तारखेच्या रात्री श्री दलाल कुठे होते? "

(इतरत्र पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्षद.. मस्त कथा.. पण पटकन पुढचे भाग येऊ द्या.. साप्ताहिकातल्या कथा दर आठवड्याला वाचताना लिंक लागत नाही पटकन तसे होऊ देऊ नका

अरे लोक्स ज्याच्या कथेवर त्याच्या बद्दल किंवा त्याच्या लेखनाबद्दल बोला की
हर्षद ही माझी शेवटची पोस्ट
आता कथा पुर्ण झाल्यावर प्रतिसाद टंकवेन
आतापर्यंत तरी मज्जा आली वाचताना

आवडलं ! पुढचे भाग लवकर येऊ द्यात.
अजून एक! --- प्रत्येक भागात मागील व पुढील भागांची लिंक द्याल का?