सहल [ फोटो सहित ]

Submitted by shilpa mahajan on 21 November, 2012 - 07:55

दोन वर्षापूर्वी मुलांनी पासपोर्ट काढून घ्या म्हणून आमच्यामागे लकडा लावला होता तेव्हा मला '''हा नसता खटाटोप कशाला ?' असेच वाटले होते. तरीही त्यांचा आग्रह म्हणून काढून ठेवले होते.
दोन तीन महिने लागले ते मिळायला. आम्हाला गरज नव्हती म्हणून त्या उशिराचे काही वाटले नाही. मिळाल्यानंतर सुरक्षित स्थळी ठेवून विसरून ही गेलो.

अधून मधून ' केलाच आहे इतका खटाटोप तर एकदा तरी परदेशाची
वारी घडावी' असा विचार डोकावून जात असे, पण तो तेवढ्यापुरताच!
वेगवेगळ्या कंपन्यांचे विविध देशांच्या टूर्सचे रेट वाचले कि ' जाऊ दे, तो आपला प्रांत नव्हेच !' असे मी मनाला बजावून पान उलटत असे. माझ्यासारख्या लाखो मध्यमवर्गीय गृहिणींना हा अनुभव असेलच की!

एक दिवस अचानक ह्या अनुभवाला जणू सुरुंगच लागला. ' केसरी टूर्स' ची बँगकॉक आणि पट्टाया ला जाणारी 'माय फेअर लेडी ' या टूरची जाहिरात माझ्या बघण्यात आली.
सात दिवसांचा टूर आणि रेट च्या जागी ३९,९९० रुपये हा आकडा वाचला आणि मी जागच्या जागी उडालेच!

सहा महिन्यापूर्वीच आम्ही 'ज्येष्ठ नागरिक संघ' यांच्या टूर बरोबर अंदमानला गेलो होतो
तेव्हा खर्च आला होता ३०,००० रुपये प्रत्येकी !
त्या मानाने हा काहीच नाही ! शिवाय त्यात दिलेल्या गोष्टी बऱ्याच होत्या. आणि खास म्हणजे खूप वर्षापासून मी मनाशी जपून ठेवलेलं स्वप्न पूर्ण होण्याचा चान्स दिसत होता , तो म्हणजे 'पेरा सेलिंग' चा अनुभव कंपनी सर्वाना देणार होती !

इतक्या वाजवी खर्चात आपल्याला 'फोरेन रिटर नड' होता येत असेल तर काय हरकत आहे ? ते हि 'केसरी' सारख्या 'आदरातिथ्य फेम' कंपनी सोबत !
मी लगेच पतीदेवांसमोर प्रस्ताव मांडला . गम्मत म्हणजे कसलीही कुरकुर न करता त्यांनी होकार दिला. मग काय विचारता? मला जणू स्वर्ग दोन बोटे उरला !
प्रश्न होता सोबतीचा ! शेकडो बायका बरोबर असल्या तरी सोबत कुणीतरी घरचं हवंच! आपला आनंद वाटून घेणारं! आपल्या सारखं आनंदी होणारं! थोड्या प्रयत्ना नंतर माझी सून रेणुका योग्य व तयार असल्याचे कळले.

टूर बुक केल्यानंतर प्रथमच मला आपण मुलांचे ऐकून पासपोर्ट काढला हे फार बरे झाले. नाहीतर ही संधी मला गमवावी लागली असती, असा विचार मनात येऊन मुलांच्या दूर दृष्टीचे कौतुक वाटले.
ठरलेल्या दिवशी आम्ही दोघी गाडी करून मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळावर संध्याकाळी ६.३० वाजता पोहोचलो.
वास्तविक दोन दिवस आधी आमची ग्रूप लीडर जास्वंदी हिचा फोन आला होता . तिने ९ वाजता पोहोचायला सांगितले होते. पण माझं भित्रं मन दिवसा उजेडी पोहोचण्यावर भर देत असल्याने लवकरच गेलो.
मग वाटलं कि इतका वेळ कसा काढणार आपण ? पण प्रत्यक्षात 'केसरी' च्या इतर टूर ज्या त्याच दिवशी निघणार होत्या त्याचे लोक येत गेले.त्यांचे निरीक्षण करण्यात व त्यांच्याशी बोलण्यात वेळ सहज गेला.
कुणालाही न विचारता सारे लोक केसरीच्या टूरसाठी निघाले आहेत हे त्या सर्वांच्या केसरीने दिलेल्या एक सारख्या केसरीचा शिक्का असलेल्या सूटकेसेस पाहून सहजच कळत होते. का कोण जाणे पण अनोळखी लोकांच्या गर्दीत 'हे अनोळखी लोक' अचानक ओळखीचे वाटू लागले. सारी काही मिनिटांची साथ !
पण तेवढ्याच वेळात कोण , कुठले , काय करतात , टूर कोणती , कशी बुक केली वगैरे सारी माहिती एकमेकांना सांगून झाली !
आमच्या फ्लाईट ची वेळ जवळ आली. आमच्या ग्रुपचे लोक जमू लागले. आम्ही आमच्या सूटकेसेस ना भगव्या रंगाच्या रिबिनी बांधल्या होत्या.
आम्हाला वाटत होतो कि आम्ही किती हुशार! सगळ्या केसरीच्या सूट केसेस मधून आमच्या चार लगेच ओळखू येतील . सर्वजण जमा झाले तेव्हा
प्रत्येकाच्या सामानाला निळ्या , हिरव्या, पिवळ्या रिबिनी पाहून आम्ही शरमलो. आमची आयडिया सर्वानीच चोरलेली दिसत होती ! [असे सर्वांनाच वाटले असेल की!]

टूर बुक केल्यानंतर काही दिवसांनी केसरी कडून फोन आला की प्रत्येकी १०००० बाथ [थायलंड ची करन्सी] असणे अनिवार्य आहे. ती आम्ही देतो. घ्यायला यावे.
हा खर्च मी गृहीत धरला.नव्हता . त्यामुळे मी जरा रागावले. सर्व बाथ परत आणण्याची मनोमन प्रतिज्ञा केली. पण हाय रे दैवा! तिथल्या बाजारात फिरताना आणि बारीक सारीक वस्तू घेताना सगळे बाथ केव्हाच संपले .
एवढेच नव्हे तर 'भारतीय रुपये स्वीकारतो ' असे काही दुकान दारांनी म्हटल्यावर अडीअडचणीला असावेत म्हणून बाजूला ठेवलेले रुपयेदेखील खर्च झाले.पण मन मात्र खूष झालं. पैसे उडवले म्हणून कोणी नाराज पण झालं नाही ! उलट सर्वांना आमची खरेदी आवडली. त्यामुळे आमचा आनंद दुणावला. बरं झालं बाथ नेण्याची सक्ती केली, नाहीतर केवढ्या मोठ्या आनंदाला आम्ही मुकलो असतो !आम्ही स्वतःच्या मनाशी कबुली दिली .

आमचा नंबर बँगकॉक एअरलाईन्स च्या फ्लाईट मध्ये लागला . विमानात हवाई सुंदरीने त्यांच्या भाषेत काहीतरी स्वागतपर शब्द म्हटला.आम्ही फक्त स्मितच करू शकलो. नंतर कळाले की तो शब्द 'सवारी खा' असा होता. पुढे तो खुपदा ऐकायला मिळाला. आणि प्रत्युत्तर म्हणून 'खापून खा' असे म्हणायचे हे हि कळले. आपापसात आम्ही सर्व 'कापून खा हो' असे म्हणून चेष्टा करायचो.

थाई वेळेप्रमाणे [ आपल्या वेळेच्या दीड तास पुढे ] सकाळी साडेसात वाजता बँग कॉक ला
पोहोचलो. 'सुवर्णभूमी ' हे त्यांच्या विमानतळाचे नाव. अगदी सार्थ वाटलं.
अत्यंत प्रशस्त , स्वच्छ , जागोजागी सुंदर सुंदर पेंटींग्ज , चढण्या उतरण्याचे कष्ट वाचवणारे
एस्कलेटर्स आणि प्रवेशद्वारापाशी समुद्र मंथनाचा अति भव्य देखावा ! बाहेर आल्यावर
प्रत्येक चाळीस बायाकान्मागे एक ग्रुप लीडर केसरीचा आणि एक ' थाई विजन ' या बस पुरवणाऱ्या संस्थेचा ! थाई लीडर ने सर्वांच्या गळ्यात हार घालून व्यक्तीशः स्वागत केले.

आम्ही खूष झालो. उभ्या आयुष्यातला हा दुसरा हार ! पहिला पतीदेवांनी लग्नात घातला होता आणि आता हा दुसरा हार !

आपल्या गळ्यात कुणी हार घातल्यावर इतकं छान वाटतं हा अनुभव नवा होता !

मग आम्हाला केसरी लीडर ने एक धक्कादायक बातमी सांगितली. ती म्हणजे आतापासून सात दिवस खूप काही मिळेल , फक्त चहाचं नाव काढायचं नाही. तो इथे मिळू शकत नाही .
लगेच आम्हाला नाश्ता करण्यासाठी नेण्यात आलं. 'टायगर झू रेस्तौरा' त आम्ही आलो. अगदी अफलातून कल्पना आहे कि नाही? काचेच्या बंद पेटीत रेस्तोरेंत आणि त्याच्या चारही बाजूला वाघोबांचा मुक्त संचार!
"मध्ये जर हि काच नसती तर ? आमचाच नाश्ता वाघोबाला मिळाला असता." असा विचार मी छोले पुरी वर ताव मारता मारता करत होते

टायगर झू -

tn_DSC00008.JPG

वातानुकूलित हॉटेलच्या स्वच्च्छ काचेतून बरेच वाघोबा दिसले. कुणी उन खात बसलेला तर
कोणी शतपावली करत असलेला !
एक मादी आपल्या बछड्यान समवेत खेळत होती .
त्यांचं ते नैसर्गिक कुटुंब पाहून त्याचा क्रूरपणा क्षणभर विसरल्यासारखाच झाला!
मांजरीच्या पिला सारखं त्या बछड्याला गोंजारावं असा मोह झाला. अर्थातच मी तो आवरला.

थोड्याच वेळात 'केसरी' चा टी शर्ट घातलेले आदेश बांदेकर तिथे आले. पाहता पाहता आबाल वृद्ध 'तरुणींनी 'त्यांना गराडा घातला. त्यांना नाश्ता करायची संधी न देता सर्वजणी
आपल्याबरोबर फोटो काढण्याचा आग्रह करू लागल्या. त्यांनी देखील हातातली प्लेट खाली ठेवून सर्वजणींचा हट्ट पुरवला.

'केसरी' ने सर्व जणांचे समाधान करण्याचा चंग बांधलेला असावा . कारण नाश्त्याला पुरी भाजी बरोबरच ब्रेड बटर, कॉर्न फ्लेक्स , जूस , कोफी ,
फळे, अंडी. जॅम हे सर्व देखील होते. प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या पदार्थावर 'वाघासारखा' तुटून पडला.

त्यानंतर आम्हाला नेलं हॉटेल मध्ये. 'अम्बेसेदर सिटी जोमेतीअन ' हे ४८ मजल्याचं हॉटेल आणि आमची खोली होती १८व्या मजल्यावर ! इतके मजले जायला लिफ्ट किती वेळ घेते कोण जाणे
असे मनात म्हणत आम्ही १८ हा आकडा दाबला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर चकित झालो. इतकी फास्ट चालणारी लिफ्ट मी तरी प्रथमच पहिली ! शिवाय ती चालू झाल्याची कसलीच चाहूल न लागता. न धक्का बसला , न आवाज झाला , एकदम उतरण्याचा मजलाच आला.[ भारतातही असतील अशा लिफ्ट कुठे कुठे ! आम्ही कुठे भारतातील पंचतारांकित हॉटेल पहिले आहे ?]
खोलीत आल्यावर खिडकीचा पडदा सारला आणि ' अरे वा! ' असा उद्गार निघाला तोंडातून! समोर पोहोण्याचा प्रशस्त तलाव आणि त्याच्या पुढे निळाशार समुद्र ! खिडकीपासून हटाव असं वाटेना ! बाथरूम इतकी स्वच्छ की आपल्या अंघोळ करण्याने घाण होईल अशी भीती वाटली. तरी केलीच शेवटी आणि ताजे तवाने होऊन समुद्रावर फिरायला गेलो.

समुद्रावर अगदीच दोन चार डोकी दिसली . गुडघाभर पाण्यात जाऊन उभ्या राहिलो.
पण प्रत्येक लाटेसरशी घाणीचे गोळे येऊन पायाला स्पर्शू लागले.
त्यामुळे किळस येऊन पाण्यात खेळण्याचा विचार सोडला. किनाऱ्यावर आराम खुर्च्या ठेवलेल्या होत्या त्यावर थोडा वेळ घालवून खोलीवर परतलो. रात्री चे जेवण' नांग्नूच विलेज' मध्ये होते. त्यासाठी सर्वजण खाली आलो. आजचा कलर कोड लाल होता. लाल रंगाच्या कपड्यात शेकडो बायका जमल्या .क्षण भर ' हमालांची सभा भरली तर काहीसे असेच दृश्य दिसेल' असा विचार मनात आला आणि हसू आले.

नांग्नूच विलेज मध्ये 'थाई कल्चरल शो' दाखवण्यात आला . रंगी बेरंगी वस्त्रे ल्यालेल्या सुंदरींनी खूप सुंदर नृत्य सादर केले.

दुसऱ्या दिवशी समुद्रावर जायचे होते. सकाळीच बस ने समुद्राच्या धक्क्यावर नेले. तिथून एका वेळी २५ जणी बसू शकतील अशा स्पीड बोटीने मोठ्या बोटीवर नेले.उंच उसळणाऱ्या लाटांवर स्वार होऊन मोठे मोठे हेलकावे घेत जाणाऱ्या बोटीत बसून खूप मजा वाटली. जणू काही उंच झोकेच घेत आहोत असे वाटत होते.
खोल समुद्रात एक खूप मोठी बोट उभी होती. तिच्यावर 'स्कूबा डायव्हिंग' म्हणजे समुद्राच्या आतील सफर घडवण्याची सोय व साधनसामुग्री होती.रेणुकाने ते केले. मी मात्र दम्याच्या त्रासामुळे ते करू शकले नाही . हृदय रोगी व दम्याचे रोगी यांना ते वर्ज्य होते. सर्वांनी नंतर लहान बोटीत बसून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे होते. तिथे गेल्यावर केसरी तर्फे भेळ आणि शहाळे [ नारळ पाणी ] देण्यात आले. किनाऱ्यावर बान्देकरांनी विविध खेळ घेतले.

नंतर वेळ आली माझ्या स्वप्नपूर्तीची ! पेरा सेलिंग ची ! केसरीने सर्वांना आवाहन केले कि हा आनंददायक अनुभव सर्वांनी जरूर घ्या. काही विशिष्ट रोगी सोडून खरोखरच सर्वांनी ते केले . त्यात एका ७८ वर्षे वयाच्या आजींचा हि समावेश होता .त्या उंच आकाशात गेल्यावर सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला!
माझी पाळी जवळ आली तशी मला एक लाईफ जाकीट घालायला दिले गेले.
त्याच्या वरच्या बाजूला दोनही खांद्यांना कड्या होत्या व बसायच्या जागी लोखंडी
झोक्याच्या सीटसारखी भासणारी कडी होती. ते घातल्यावर हात पाय आखडल्यासारखे झाले व चालताना खांदे झुकवून चालावे लागू लागले. काही मिनिटातच
थकल्यासारखं वाटायला लागलं.तेवढ्यात माझी पाळी आलीच ! खांद्यावरच्या कड्यांना हवाई छत्रीचे हूक अडकवून दोन पावले पळायला सांगितले गेले. मी जेम तें दोन तीन पावले टाकली असतील , तेवढ्यात मी अलगद हवेत उचलली गेले. क्षणभरासाठी भीतीची लहर अंगातून गेली खरी पणपुढच्याच क्षणी मी सावरले.
झोका उंच उंच गेल्यावर एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव आला आणि त्याच क्षणी टूरला आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.पक्ष्यांना आकाशात उडताना असेच वाटत असेल का? असा विचार मनात आला. तेवढी तीन चार मिनिटे मी जणू एखादी पक्षीण झाले होते. पहाता पहाता तो स्वर्गीय सुखाचा काळ संपत आला आणि स्वप्नातून जागे होण्याची वेळ आली. मी खाली येऊ लागले. योग्य अंतरावर येताच
दोघाजणांनी उड्या मारून माझा झोका पकडला आणि धरतीवर आणला.

एक एक करून सर्व जणींचे पेरा सेलिंग करून झाले. सर्वजणींचे पाय बोलत असतील याची खात्री असल्यामुळेच असेल कदाचित , पुढचा कार्यक्रम होता थाई मसाज ! आधी मी घाबरले . कारण मी बदलायला कपडे [ तेलकट झाले तरी चालतील असे ] आणले नव्हते. त्यामुळे आपण तो कार्यक्रम सोडून द्यावा असा विचार मनात येतो न येतो तोच कळले की हा मसाज 'बिन तेलाने' होणार आहे! मग आम्हाला मसाज पार्लर मध्ये नेण्यात आले.
एका मोठ्या खोलीत अमोरासमोर १०- १० गाद्या घातलेल्या होत्या.
त्यावर आम्हाला आडवे होण्यास सांगण्यात आले. अंगापिंडाने दणकट अशा थाई मुलींनी
आमचे थकलेले , अवघडलेले हात पाय इतक्या सफाई दार पणे चेपून दिले की सगळा थकवा निघून गेला.
मसाज करणाऱ्या मुलीचा जोर झेपत नसेल तर तिला 'बाऊबाऊ ' [ भाऊ किंवा भौ नव्हे बरं का!] किंवा मरगळलेली वाटत असेल तर 'नाका नाका'म्हणून सांगा असे आम्हाला पढवून ठेवले होते पण तशी वेळ आलीच नाही. आमच्या अंगकाठीकडे पाहून किती जोर लावायचा हे त्यांना अचूक कळलेले दिसले.

रात्रीच्या वेळी आमच्यासाठी आणखी एक आगळी वेगळी गोष्ट या सहलीत होती. ती म्हणजे रेड लाईट एरियाचे दर्शन. आपल्याकडे वेश्यावृत्ती किंवा वेश्या वस्ती हे शब्द देखील उच्चारायची अनुच्चारित मनाई असते . पण थायलंड मध्ये कमाईची साधने व संधी कमी आहेत हे शासनाने समजून घेतलेले आहे आणि वेश्या
व्यवसाय कायद्याने मान्य केलेला आहे. त्यामुळे ज्याला कमाईचे अन्य साधन नसेल तो [म्हणजे अर्थातच ती ] उघडपणे हे काम करू शकतो. ह्यामुळे बरेच लोक त्या देशात फक्त 'ह्या' कामासाठी येतात ! आम्ही रात्र पडल्यावर रेड लाईट एरिया पहायला निघालो. इतक्या जणी एकाच वेळी जात असल्याने एखादा मोर्चा निघावा तसे दृश्य दिसत होते. सारे क्लब उघडे होते . आत चाललेल्या नाच गाण्याचा आवाज बाहेरही ऐकू येत होता. याशिवाय होतकरू गरजू बायका दाराशी रांगेने उभ्या होत्या. त्यात काही अशा कोवळ्या कळ्या होत्या ज्यांनी अजून तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊलही ठेवले नव्हते. हातात ' संपूर्ण रात्रीसाठी ६०बाथ ' असा बोर्ड घेउन त्या उभ्या होत्या. त्यांच्यासाठी मन कळवळून आलं! पण करणार काय? जास्त पुढे न जाता तिथूनच मागे फिरण्याच ठरवून आम्ही वळलो .

पुढच्या दिवशी सकाळी 'नाग्नूच विलेज' पहायला गेलो. इथे पोटरी गार्डन आहे. विविध प्रकारच्या कुंड्यांचा वापर करून इतके विविध आकार तयार केले आहेत की काय पाहावे आणि काय नाही तेच कळेना! विविध फुलांची आरास केलेला महाल असावा असा भास होत होता .

तिथेच 'लवबर्डस अंगावर बसवून' फोटो काढून देणारा होता. त्याचे अगदी त्याच्या 'आज्ञेत' असलेले लव बर्डस पाहून मजा वाटली . आपलाच कामेरा वापरून फोटो काढणार, तरी त्याचे १०० बाथ ! [२००रु.] काय करणार ? हौसेला मोल नसते न? आम्ही पण 'जीवाचे थायलंड' करायलाच गेलो होतो ! म्हटले आपण कधी असले उद्योग करणार ? घेतला झालं फोटो काढून !

नांग्नूच विलेज मधील 'लव बर्डस' ची वसाहत -

tn_DSC00221.JPG

एके ठिकाणी खूप गर्दी दिसली . म्हटले पाहू तरी कोणता नवा फोटोचा प्रकार आहे तो ! पहिले तर वाघा सोबत फोटो काढण्यासाठी ती गर्दी होती !आधी जरा दचकलेच ! जवळ जाऊन पाहते तर काय! एका वाघाचे चारही पाय आणि मान वेग वेगळे जेरबंद केलेले ! बहुधा उपाशी पण ठेवले असावे,कारण अगदी लोळागोळा झालेला वाटला . त्याची पोझिशन देखील माणसाने बदलून द्यावी लागत होती आणि त्याच्या सोबत फोटो काढायला माणसांची झुंबड उडाली होती. आयुष्यात पहिल्यांदा मला वाघाची कीव आली; आणि माणसांचे हसू!
वाघाची हालत एखाद्या पुतळ्या सारखी करून त्याच्या सोबत फोटो काढण्यात काय मर्दुमकी ? पूर्वी शिकारी लोक स्वतः वाघ मारून त्याच्या अंगावर पाय टेकवून फोटो काढून घेत असत. तो फोटो त्यांच्या मर्दुमकीची निशाणी म्हणून फ्रेम करून दिवाणखान्यात लावत असत. ते पहायची मला सवय होती ! असल्या वाघ नामक शेळीसोबत फोटो काढण्यात रस वाटेना ! मी तिथून दूर झाले.

दुपारी हत्तींचा शो होता त्यात हत्तींच्या करामती पहायला मजा वाटली. हत्तीची नेमबाजी, चेंडू झेलणे, खेळणे, याखेरीज विशेष म्हणजे जमिनीवर झोपलेल्या माणसाचा मसाज!
[ हलक्याने पायाचा दाब देणे] कितीही हलका दाब म्हटला तरी शेवटी हत्ती तो हत्तीच की ! जराशी चूक झाली तरी जीवावरच बेतायचे हो!
कान्वास वर पेंटिंग केले बरे का हत्तीने ! ते पाहून खूप करमणूक झाली. तीन चाकी स्कूटर हत्तीला चालवताना पाहून हसून बेजार झालो. त्यानंतर वेळ आली हत्ती सोबत फोटो काढून घेण्याची ! हत्ती सोंडेने उचलून घेतो आणि माहूत फोटो काढून देतो. काळजात धाकधूक होत होती तरी काढून घेतले सासवा सुनांनी फोटो आणि फुकले २०० बाथ ! नंतर सोंडेचा स्पर्श आठवून आठवून अंगावर शहारा येत होता कितीतरी वेळ ! जंतुघ्न टिशू पेपर ने किती तरी वेळा पुसले हात !

पुढचा दिवस होता सफारी पार्कचा . माणसे बसमध्ये बंदिस्त आणि हिंस्र प्राणी त्यांच्या कुटुंबासहित मोकळ्यावर वावरताना पाहून मजा आली. ते पाहता पाहता गाईडने सांगितले की वाघ आणि सिंह हे जंगलात एकमेकांचे शत्रू असतात. पण इथे वर्षानुवर्षे एकत्र ठेवल्याने शत्रुत्व विसरून सलोख्याने राहतात. एवढेच नव्हे तर क्वचित क्रोस ब्रीड देखील होते. पण अशी संतती जास्त जगत नाही. माहिती पाठोपाठ पुरावा म्हणून की काय , वाघ आणि सिंव्ह एकत्र उभे दिसले !

सफारी पार्कचे प्रवेशद्वार -

tn_DSC00139.JPG

वाघ आणि सिंहाचे कुटुंब -

tn_DSC00156.JPG

पुढे बरेच प्राणी पहिले. ते मात्र भारतात पाहिलेले असल्याने वेगळे वाटले नाही.
नंतर पहिला डॉल्फिन शो. पाण्यात रहाणाऱ्या त्या जलचरांनी पाण्या बाहेर येऊन ज्या करामती करून दाखवल्या त्या पाहून त्या प्राण्यांचे कौतुक जास्त कि त्यांच्या कडून करवून घेणाऱ्या प्रशिक्षकाचे जास्त त्याचा निर्णय घेता येईना ! उंचावर टांगलेल्या घंटांचा घंटानाद पाण्यातून दुरून पोहत येत अचूक ठिकाणी उडी मारून शेपटीने करणे, किंवा उभारलेल्या रिंग मधून आरपार जाणे, काठावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा शेपटावर उभे राहून मुका घेणे , दूर फेकलेला चेंडू दुरून येऊन अचूक शेपटाने उडवणे ,या साऱ्याच करामती त्यांच्याकडून करवून घेताना प्रशिक्षकांना किती पापड बेलावे लागले असतील याचा विचार मनाला बराच वेळ छळत राहिला.

डॉल्फिन्स प्रेक्षकांना अभिवादन करताना -

tn_DSC00208.JPG

असाच दुसरा शो दाखवण्यात आला तो 'उरांग उतांग शो.' 'वन मानव' म्हणता येईल अशा माकडा सदृश प्राण्याकडून कुस्तीचा आखाडा तयार करणे, जाहिरातीचा फलक लावणे, कुस्ती करणे [ अभिनय बरं का !] प्रेक्षक म्हणून हसणे, दाद देणे. हुर्रेवडि करण्यासाठी पेप्सीचे रिकामे डबे फेकणे वगेरे सर्व काही त्यांनी केले. अगदी मुलींची छेड काढण्याची नक्कल देखील केली ! मनोरंजनाबरोबर त्या लोकांची मेहेनत माझ्या मनात उभी रहात होती!

नंतर आम्हाला नेले जेम्स गालरी म्हणजे रत्नांची खाण बघायला. आशिया मधल्या सर्वात मोठ्या गालरी पैकी ती एक आहे असे सांगितले गेले. खरोखर अगदी
अतिभव्य अशीच ती आहे. अगदी शब्दशः धावत पहायची म्हटली तरी तीन चार तास तरी हवेतच . आम्हाला दिला होता अवघा दीड तास.
मोहोरी एवढ्या रत्ना पासून ते ग्लुकोजच्या बिस्कीटा एवढ्या आकाराची रत्ने पाहिली.
किमती वाचण्याचे धाडस केले नाही . कारण मोहोरी एवढ्या रत्नाची किंमतच काही लाखात होती!
मग आम्हाला जी मदतनीस मिळाली होती [ थाई उप विक्रेती बहुधा ] तिला मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये सांगितले कि सर्वात स्वस्त विभाग जो असेल तिथे घेऊन चल. तिच्या मागोमाग गेलो. आमच्या खिशाला परवडेल असा एक गोमेध चा सेट घेतला. खरा म्हणजे तो भारतातही मिळाला असता आणि कदाचित थोडा स्वस्त देखील मिळाला असता. पण आम्ही त्याकडे 'थायलंड भेटीची आठवण' या दृष्टीने पहात होतो. म्हणून घेतला. आणि परतलो.

बँग कॉक आल्यानंतर साऱ्या शहरातून फिरवत विविध इमारतीनमध्ये असलेल्या सरकारी
कार्यालयाची माहिती गाईड ने दिली. शहरात फिरत असताना जागो जागी उभारलेल्या कमानी , त्यावर चितारलेले विविध रंगी बेरंगी देखावे आणि शहरभर राखलेली हिरवळ आणि रंगी बेरंगी फुले हे पाहून आपले शहर प्रेक्षणीय व्हावे यासाठी घेतलेली मेहेनत दिसून येत होती.
ती दिसण्यामागचे प्रमुख कारण होते आत्यंतिक स्वच्छता ! रस्त्यावर प्लास्टिकचे कप, ग्लास , पाण्याच्या बाटल्या , पेपर प्लेट्स, शीत पेयांचे डबे , फळांच्या साली , गुरांची विष्ठा, पान खाऊन टाकलेल्या पिचकाऱ्या यांचा मागमूसही नव्हता.

शहरात असलेली तीन प्रमुख बुद्ध मंदिरे दाखवण्यात आली. मूर्ती सोन्याच्या असून नजर ठरत नव्हती अशा झळाळत होत्या. एक मूर्ती शयन करणारी होती. ती इतकी प्रचंड होती कि कामेरयात एका वेळी डोके किंवा धड किंवा पाय या पैकी एकच काहीतरी येऊ शकत होते.

प्रिन्सिपल बुद्धाची सोन्याची झळाळती मूर्ती -

tn_DSC00259.JPG

त्यानंतर स्काय बायो के नावाच्या सर्वात उंच [ त्या शहरातील] इमारतीत नेले. तिला ८५ मजले होते. ७८ मजले जायला एक लिफ्ट आणि उरलेल्यासाठी दुसरी ! १ मिनिट २० सेकंदात लिफ्टने ७८ मजले ओलांडले. शिवाय ती काचेची होती त्यामुळे बाहेरचे दिसत होते. शिखरावर गेल्यावर पूर्ण शहराचा नजारा पहायला फिरता सज्जा होता. म्हणजे आपल्या पायाने तेवढे कष्ट देखील घ्यायची गरज नाही. पण ते फार हळू फिरत होते व आमच्या कडे वेळ कमी होता म्हणून आम्ही आपल्या पायानेच एक फेरी मारली. विमानातून पाहिल्यासारखे सारे शहर पाहिले
आणि झटपट खाली आलो. आता खरेदीची बारी होती!

स्काय बायो के च्या ८५ व्या मजल्यावरून दिसणारे बँगकॉक -

tn_DSC00269.JPG

या ट्रीपमध्ये एक जेवण पब मध्ये आणि एक बोटीवर होते. पब मधील जेवणाला बार बालांच्या नाच गाण्याची जोड होती. आजवर फक्त हिंदी सिनेमात पाहिलेले वातावरण आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. तेही कसलेही टेन्शन न येता! कारण तिथे फक्त केसारीयंसच होते. सगळा पब आमच्यासाठी बुक होता ! बायकांनी मनसोक्त धिंगाणा घातला. त्याचे कारण म्हणजे बार बालांनी हिंदी फेमस गाणीच म्हटली ! हिंदी गाण्यांचे थाई उच्चार ऐकून करमणूक झाली.

क्रूजवर रात्रीचे जेवण होते. पाण्याच्या लाटांवर विहरत जाणारे आपण , सोबत नाच गाण्याचा जल्लोष, नजर जाईल तिथपर्यंत रोषणाई ने झगमग करणाऱ्या उंच उंच इमारती ! जणू एखाद्या शाही लग्नासाठी तयार झालेली वरात असावी तसे शहर चमकत होते. आमच्या बोटीतून आकाशात जाउन रंगीत चांदण्यांची उधळण करणारे फटाके फोडण्यात आले.सर्वात शेवटी शेजारच्या बोटीवर फटाक्यांनी केसरी ही अक्षरे उमटली आणि आनंदाचा एकाच जल्लोष झाला. वेग वेगळे चीत्कार तोंडून उमटले आणि मग परत जाण्याची सूचना मिळाली. मन आगळ्या आनंदाने भरून गेलं होतं.

tn_DSC00126.JPGtn_DSC00135.JPG

संपूर्ण दिवस वेगवेगळे अनुभव घेण्यात घालवून हॉटेलवर परतलो कि रात्री पुन्हा जल्लोष असायचाच ! वीणाताई पाटील कधी वेगवेगळ्या टूरमध्ये आलेले कडू गोड अनुभव सांगायच्या तर कधी ते काम बांदेकर करायचे ! आपल्या हजरजबाबीपणाने बांदेकर वातावरणात काही ताण असेल तर तो झटक्यात दूर करतात आणि उत्साहाचे फवारे उसळवतात याचा सुरेख अनुभव आला.

एक दिवस फाशन शो झाला. बायका खूपच तयारीनिशी आल्या होत्या. कोळी वेशापासून सुरु होऊन नववधू पर्यंत विविध वेशात येऊन स्त्रियांनी राम्पवर चालण्याची हौस फेडून घेतली! त्यांची चेष्टायुक्त रेवडी उडवायला बांदेकर होतेच ! त्यामुळे प्रेक्षकांची हसता हसता पुरेवाट झाली !

एक दिवस पैठणी गेम झाला. सगळ्या बायका अशा तयारीने आल्या होत्या की ' तळ्यात -मळ्यात ' म्हणून बांदेकर थकले पण बायका आउट काही होईनात !
मोठ्या मुश्किलीने चार दोन बायका आउट झाल्या. नंतर चेंडूने नेम मारायचा गेम घेतला. त्यात देखील सगळ्या तरबेज !
मग लहानशा चेंडूने दुसऱ्या एका लहानशा चेंडूला मारायचा गेम घेतला तेव्हा कुठे तो आवरता आला. ६० वर्षा खालील एक व वरील एक असे दोन ग्रुप केले होते. फायनल मध्ये पोहोचल्यावर मात्र दोन्ही ग्रुप साठी एकच
गेम होता. जुनिअर ग्रुप पैकी कुणालाही तो जिंकता आला नाही . तेव्हा सिनिअर ग्रुप च्या रनर ला दुसरी पैठणी देण्यात आली.

रोज रात्री त्या दिवशी ज्या ज्या महिलेचा वाढ दिवस असेल तिला काहीतरी टोकन गिफ्ट देऊन तो साजरा केला गेला. शेवटच्या रात्री शेवट गोड करण्यासाठी रात्री १२ वाजता केक कापण्यात आला. अर्थातच 'केसरीच्या' नावाचा ! तो इतका मोठा होतं कि कापायला दोन तलवारी आणल्या होत्या ! बांदेकर आणि वीणाताई यांनी तो कापला आणि सर्वांना तो मनमुराद मिळाला हे विशेष !

ह्या टूरने मला आणखी एक अमूल्य गोष्ट दिली. ती म्हणजे माझे आणि रेणूचे[ माझ्या सुनेचे]
एका आगळ्या वेगळ्या नात्याचे , मैत्रीचे बंध निर्माण झाले. आम्ही दोघी एकत्र कुठेही गेलो तर एकमेकींच्या अपेक्षा समजू शकू याची खात्री आणि एकमेकीना पूरक ठरणारे काम आणि विचार करू शकतो याचा सुखद अनुभव मला [ बहुधा तिला देखील ] आला. अगदी असेच काम आणि विचार मी आणि माझी मुलगी तृप्ती आम्हा दोघींमध्ये असतो. मी सासू झाल्यापासूनच असे घडावे अशी इच्छा माझ्या मनात होती, ती पूर्ण झाल्याचा अनुभव मला घेता आला तो केवळ आम्ही दोघीच होतो म्हणूनच!

लोकहो, माझ्या आयुष्यातले हे दिवस खऱ्या अर्थाने 'वो सात दिन ' आहेत. पुन्हा परदेशी जाण्याचा योग येईल न येईल ! पण नाही आला तरी त्याचे दुक्ख वाटू नये एवढे सुख मला या सहलीने दिले. थायलंड ची मी जी स्तुती केली आहे त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. पण तो जगातला सर्वात चांगला देश आहे असे काही मला म्हणायचे नाही. मी पहिल्यांदा देशाबाहेर पाउल टाकले ते त्या देशात ,म्हणून हे असू शकेल. असा अनुभव कदाचित भारतात देखील येऊ शकला असता. फक्त मी त्या ठिकाणी गेले नाही हे त्याचे कारण असू शकेल. मला फक्त एकच सांगावेसे वाटले की 'केसरी' ने माझा पहिला वाहिला परदेश प्रवास अविस्मरणीय व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व केले . पुन्हा कधी मी परदेशी गेलेच आणि यातलेच काही अनुभव पुन्हा आले तरी त्यातली गोडी तितकी अवीट असणार नाही कारण ते 'पहिल्यांदा' असणार नाही!

दररोज रात्री वीणाताई आम्हा सर्वांशी काही न काही हितगुज करत होत्या. एकदा त्या म्हणाल्या होत्या की पुष्कळशा बायकांना माहेरपण मिळत नाही .
त्यांना हे हक्काचे माहेरपण वाटावे असा या ट्रिपचा उद्देश आणि प्रयत्न आहे. वीनाताइन्ना आवर्जून सांगावेसे वाटते की तुमचा उद्देश २००% सफल झालेला आहे.
ज्यांची आई हयात नाही अशा माझ्यासारख्या असंख्य बायका या ' माहेरपणासाठी' तुम्हाला शतशः दुवा देत असतील यात कणभर देखील शंका नाही.
---------------------------------------------------------------0-------------------------------------------

tn_DSC00221.JPGtn_DSC00269.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छानच आहे प्रवास वर्णन Happy Happy Happy

पुष्कळशा बायकांना माहेरपण मिळत नाही .
त्यांना हे हक्काचे माहेरपण वाटावे असा या ट्रिपचा उद्देश आणि प्रयत्न आहे. ---- अगदी खर Happy

सुरेख प्रवासवर्णन. चला या निमित्ताने तुमचे आणि सुनेचे मैत्रीचे नाते उलगडले ही अचिव्हमेंटच म्हणायची.

पुष्कळशा बायकांना माहेरपण मिळत नाही .
त्यांना हे हक्काचे माहेरपण वाटावे असा या ट्रिपचा उद्देश आणि प्रयत्न आहे>>>=+++++९९^९९

अगदी मनातून लिहिलंय...
ह्या टूरने मला आणखी एक अमूल्य गोष्ट दिली. ती म्हणजे माझे आणि रेणूचे[ माझ्या सुनेचे]
एका आगळ्या वेगळ्या नात्याचे , मैत्रीचे बंध निर्माण झाले>>>> ये ब्बात!!!

तृष्णा,विनार्च,मानसी साळुंखे,मृनिश ,रायाबगान ,शुभांगी कुलकर्णी,जो_एस ,प्रीतीभूषण,मनस्विता,सृष्टी१४,साक्षी, नंदिनी,स्वाती, शिल्पा_के ,मी नताशा , पौर्णिमा,अखी, तुम्हा सर्वांना माझे मनःपूर्वक धन्यवाद ! मनातला आनंद कुणाबरोबर वाटून घ्यावा हेच कळत नव्हते. जवळच्या नातेवाईकांना सांगून झाले, त्याने पोट भरले नाही. म्हणून मायबोलीवर टाकले. तुम्ही सर्वांनी माझा आनंद इतका छान वाटून घेतला कि मन आनंदाने भरून गेले. पुंन्हा एकदा धन्यवाद

खूप छान प्रवासवर्णन.
पुष्कळशा बायकांना माहेरपण मिळत नाही .
त्यांना हे हक्काचे माहेरपण वाटावे असा या ट्रिपचा उद्देश आणि प्रयत्न आहे >> हे आवडलं.

अगदी मनातून लिहिलंय...
ह्या टूरने मला आणखी एक अमूल्य गोष्ट दिली. ती म्हणजे माझे आणि रेणूचे[ माझ्या सुनेचे]
एका आगळ्या वेगळ्या नात्याचे , मैत्रीचे बंध निर्माण झाले>>>> ये ब्बात!!! >>>>> +१००....

पुष्कळशा बायकांना माहेरपण मिळत नाही. त्यांना हे हक्काचे माहेरपण वाटावे असा या ट्रिपचा उद्देश आणि प्रयत्न आहे >> हे आवडलं. >>>> +१०००...

सुरेखच लिहिलंय.....

मस्त प्रवास वर्णन, वाचताना मजा आली.
******************
लाल रंगाच्या कपड्यात शेकडो बायका जमल्या .क्षण भर ' हमालांची सभा भरली तर काहीसे असेच दृश्य दिसेल' असा विचार मनात आला आणि हसू आले.
<<
<<
खरच हसु आले. Lol

Pages