स्वप्न मलाही बघावयाची आवड होती!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 October, 2012 - 23:18

गझल
स्वप्न मलाही बघावयाची आवड होती!
पण, सत्याची डोळ्यांवरती झापड होती!!

ओघळलेल्या आयुष्याची हळहळ उरली....
जणू जिंदगी हिंदळणारी कावड होती!

लोक समजले जिवावरी तो उदार झाला.....
जगण्यासाठी केलेली ती धडपड होती!

तुला न आली कधीच ऎकू साद दिलेली;
उरात तुझिया सदैव माझी धडधड होती!

तुटतानाही मला मिळाला जणू दिलासा;
पाहिलीस तू कशी जाहली पडझड होती!

मित्र मोजके; शत्रू त्याला असंख्य होते!
हळवा होता, परंतु वाणी परखड होती!!

कुणी आणले मला? कसा मी घरी पोचलो?
परतायाची वाट केवढी अवघड होती!

विकायला मी बसता सोने...कुणी न आले!
विकायचो मी माती तेव्हा झुंबड होती!!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली.

स्वप्न मलाही बघावयाची आवड होती!
पण, सत्याची डोळ्यांवरती झापड होती!!<< मलाही मधील ही खटकला. मतला एकुण छानच!

ओघळलेल्या आयुष्याची हळहळ उरली....<< व्वा व्वा
जणू जिंदगी हिंदळणारी कावड होती!<< शेर मस्तच

लोक समजले जिवावरी तो उदार झाला.....
जगण्यासाठी केलेली ती धडपड होती!<<< सुंदर

कुणी आणले मला? कसा मी घरी पोचलो?
परतायाची वाट केवढी अवघड होती!<<<

यावरून माझा एक जुना शेर आठवला.

नको तिथे आणलेस आता जबाबदारी तुझीच आहे
असेल किंवा नसेल माझा मलाच पत्ता, तुझ्या घरी ने

विकायला मी बसता सोने...कुणी न आले!
विकायचो मी माती तेव्हा झुंबड होती!!<<< शेर आवडला

धन्यवाद व अभिनंदन!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी! धन्यवाद प्रतिसादाबद्दल. मतल्यातला "मलाही" शब्द अशाकरता वापरला की, जसे इतरांना स्वप्न बघायला आवडते, तसेच मलाही आवडते! स्वप्नेच तर माणसांना जिवंत ठेवतात.
मला तो शब्द खटकत नाही. पण आपणास तो खटकत असेल तर पर्याय द्याल काय?
........प्रा.सतीश देवपूरकर

मित्र मोजके; शत्रू त्याला असंख्य होते!
हळवा होता, परंतु वाणी परखड होती!!

कुणी आणले मला? कसा मी घरी पोचलो?
परतायाची वाट केवढी अवघड होती!

>> सहज आलेत, म्हणून आवडले!