राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!

Submitted by सतीश देवपूरकर on 26 October, 2012 - 22:42

गझल
राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा! तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!!

भेटला जो जो मला, मी त्यास कवटाळीत गेलो;
जात माझी माणसाची, माणसावर प्रेम केले!

पायथ्याच्या पायवाटा उंच शिखरांना म्हणाल्या.....
ह्या इथे राहून आम्ही पर्वतावर प्रेम केले!

त्यामुळे हृदयात माझ्या लागले दिव्यत्व तेवू;
मी प्रकाशाचा पुजारी, पण तमावर प्रेम केले!

तू दिलेल्या त्या उन्हाला चांदण्याचा गंध होता;
वेचताना चांदणे ते मी उन्हावर प्रेम केले!

हे खरे आहे तुझ्याशी भांडलो कित्येकदा मी;
जीवना! हेही खरे की, मी तुझ्यावर प्रेम केले!

...........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजयजी, धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
असाच लोभ असू द्या!