हुरहूर

Submitted by आनंदयात्री on 27 July, 2008 - 10:35

हुरहूर

वेगळे हे माणसांचे नूर आता
वाटतो सर्वांस मी निष्ठूर आता

मी स्वतःच्या ऐकतो गाणे मनाचे
समजुतींचा कोष झाला दूर आता

शेवटी तुजला हवे ते मिळवले तू
गमवल्याचा नाटकी का सूर आता?

शब्दही माझा जिथे कळलाच नाही
मौन का वाटे तुला मग्रूर आता?

राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता
नचिकेत जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता

छानच!
आणि मगरूर की मग्रूर?

नचिकेत, बहुत सुंदर.
कोष, सूर, मगरूर, धूर, मतला, मक्ता एकदम आरपार (मग राहिलं काय?).
एक प्रश्न नचिकेत- गमवल्याचा की गमावल्याचा?

गजल सुंदरच रे.... (कमी दिसतोस इथे हल्ली बाबा, कारे? :अरेरे:)

व्वा शेवटचे दोन फार मस्त..

बाकीच्यांवर थोडे अजून काम करायला पाहिजे होते असे वाटले

चु.भु.द्या.घ्या..

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

      भाउ आनंदयात्री,
      मस्त बरं का !!
      ....................अज्ञात

      चिन्नू, दाद, अज्ञात, स्वाती ताई, मिल्या
      मनापासून धन्यवाद...

      दाद - "गमावल्याचा" हे खरंच... पण मीटर तडजोड.... Happy आणि 'नेटा'चा प्रश्न आहे, म्हणून इथे कमी दिसतो हल्ली....

      मिल्या - अजून काम हवं होतं - एकदम मान्य...

      चिन्नू - माझ्या मते "मग्रूर", म्हणून वापरला...

      मगरूर असा ल्याहायचे मी Happy यापुढे नीट लिहीन.
      धन्यवाद.

      मस्त.

      शब्दही माझा जिथे कळलाच नाही
      मौन का वाटे तुला मग्रूर आता?
      वा! क्या बात हॅ.
      बोलुन भलताच अर्थ होतो
      ना बोलता अनर्थ होतो
      सुंदर.

      शेवटचा सही.

        ***
        टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

        गझल आवडली.

        त्यातही हूरहूर आणि मग्रूर हे शेर खास.

        ~~~~~~~~~
        ~~~~~~~~~
        Happy

        >>शब्दही माझा जिथे कळलाच नाही
        मौन का वाटे तुला मग्रूर आता?

        वाहवा! सगळ्यात आवडला हा शेर Happy

        राख झाली त्या अबोली भावनांची
        आठवांचा येत आहे धूर आता

        दु:ख वाटावे असे काहीच नाही
        हीच आहे नेमकी हुरहूर आता

        खूप खूप खास! Happy

        नचिकेत!
        आम्हास जाणवलेल्या बाबी खालीलप्रमाणे..............

        १)मराठीत नूर पालटणे असा शब्दप्रयोग साधारणपणे वापरतात, ज्याचा अर्थ होतो........रंग पालटणे. मतल्याच्या उला मिस-यात याचा उपयोग करता येतो का ते जरूर पहा..........नम्र विनंती (धुडकावून लावू शकतोस!)
        (पर्यायी उला मिसरा देणे टाळत आहे.)

        २)कोष शब्दाचा अर्थ आहे देहाचे वा आत्म्याचे आवरण (स्थूल/सूक्ष्म)
        माझा कोष म्हणता येते का........विचार करावास. सक्ती नाही. उला
        मिस-यात दिव्य गाणे गुणगुणे असे काही म्हणता येते का त्यावरही विचार करून पहावे.

        ३)लाभले ना असेही म्हणता यावे. गमवणे/गमविणे/गमावणे/गमाविणे.........सर्व शब्द बरोबर आहेत, ज्यांचा अर्थ आहे हरवणे, व्यर्थ घालविणे, (वेळ) घालविणे, करमणुकीत वेळ घालविणे, हरपणे, हरविणे, सांडणे. वस्तू/काळ/प्रकृती/कीर्ती घलविणे
        लाक्ष. अर्थ......मरणे/समूळ नष्ट होणे.
        नाटकी ऎवजी बेगडी पण चालेल!

        ४)मगरूर असा शब्द आहे(अरेबिक) ज्याचा अर्थ आहे गर्विष्ठ, चढेल, उन्मत्त.
        मगरूरी शब्द कुणी कुणी मग्रूरी असाही लिहितात, ज्याचा अर्थ आहे गर्व, चढेलपणा, घमेंड.
        उला मिस-यात वावगे कधीही बोललो नाही, असे करता येते का पहावे.

        ५)भावना कधीच्या राख झाल्यात असे काहीतरी उला मिस-यात आणता येते का असे वाटून गेले, म्हणजे आता या रदीफाला न्याय मिळावा!
        आठवांचा/स्मरणांचा.....काहीही चालेल. ‘फक्त’ शब्द सानी मिस-यात बसवता येतो का पहावे.

        ६)सुंदर शेर आहे शेवटचा! तरीही उला मिस-यात काही तरी हातातून निसटून गेल्याचे म्हटले तर शेराची बहार वाढावी! असे केल्याने हुरहूर काफियाला पूर्ण न्याय मिळावा!

        टीप: नचिकेत छान आहे तुझी ही गझल. पण खयालांवर, रदीफवर, काफियांवर अजून चिंतन हवे होते. आम्ही केलेले चिंतन तुला उपयुक्त वाटते का ते पहावे. नाही पटले तर सोडून द्यावे.
        पर्यायी शेर देणे जाणीवपूर्वक टाळले आहे.
        ..........प्रा.सतीश देवपूरकर
        ..........................................................................

        धन्यवाद लोक्स! जुनी गझल वर आणल्याबद्दल मयुरे धन्स Happy

        सतीश देवपूरकर, सुचवण्यांबद्द्ल धन्यवाद Happy

        बादवे, मी या गझलेत बदल केले नाहीत, तरी 'बदलून' असा टॅग का दिसतोय? Uhoh

        नचिकेत,
        धन्यवादाबद्दल, धन्यवाद!
        तुझ्या सशक्त गझललेखनास आमच्या हार्दिक शुभेच्छा!
        ..........प्रा.सतीश देवपूरकर

        बादवे, मी या गझलेत बदल केले नाहीत, तरी 'बदलून' असा टॅग का दिसतोय?

        <<<

        हल्ली नवीन सुरू झाले आहे, माहीत नाही का? प्रोफेसरांनी बदल सुचवले की आपोआप मदत समीती ते गझलेत इन्कॉर्पोरेट करून 'बदलून' असा टॅग लावून गझल झळकवते

        ( तुमची ही २००८ ची गझल १ ऑगस्ट २०१२ च्या नवीन नियमानुसार नसल्याने ते बदलले असेल समीतीने)

        भूषणराव,
        आता आम्ही फक्त गद्यात अपेक्षित बदल काय होवू शकतात ते लिहितो. आम्ही कोण कुणाचे काही बदलणारे! घेणे न घेणे मूळ गझलकाराची मर्जी!
        पण, ज्या गोष्टी, बाबी जाणवल्या त्या आम्ही नमूद करतो!

        मला कल्पनाही नाही भरडलो किती मी?
        नको नको म्हणता म्हणता बदललो किती मी!

        आपण आपल्यालाच फक्त बदलू शकतो, ही आमची खात्री झाली आहे!

        टीप: आम्ही एका जुन्या गझलेला प्रतिसाद दिला होता, अलीकडे, पण ती गझल (आमची नव्हे) काही वर आलेली दिसली नाही. असे कसे बुवा?
        ...........प्रा.सतीश देवपूरकर

        रणजीतच्या गझलेला दिला होता.
        ‘सुखाच्या मल्मली वेषात आली बोचरी दु:खे!’

        हल्ली फावला वेळ मिळाला की, मागील आवडत्या गझला चाळतो!(इतरांच्या)
        ..........प्रा.सतीश देवपूरकर

        राख झाली त्या अबोली भावनांची
        आठवांचा येत आहे धूर आता

        दु:ख वाटावे असे काहीच नाही
        हीच आहे नेमकी हुरहूर आता

        उच्च....

        शुभेच्छा..

        Pages