भक्ति

Submitted by webmaster on 7 April, 2008 - 12:01
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचे काय आहे, की सगळ्या ग्रंथांत बरेच काही काही सांगितले आहे. त्यातले कुठले जास्त महत्वाचे मानायचे नि कुठले नाही, हे कसे कळणार? मग जो उठतो तो स्वतःला समजेल तसा अर्थ त्यातून काढतो. तर तुम्ही म्हणता, चिन्या, तेहि खरेच, नि कर्म करावे, ज्ञान संपादावे हेहि खरेच. कारण तसेहि तर सांगितले आहेच की सगळ्या ग्रंथांत.

मुळात या गृहस्थांचे (वामनराव पै) असे म्हणणे आहे की सुख पहाता जवाएव्हढे, दु:ख पर्वताएव्हढे वगैरे खरे नाही. संसारातून विरक्त होऊन केवळ भक्ति करावी याने तुम्हाला सुख लाभेल हे खरे नाही. खरे तर संसार करणे हेच मुख्य कर्तव्य. ते करण्यासाठी ज्ञान प्राप्त करून युक्ति प्रयुक्तिने चांगल्या गोष्टींचा लाभ होईल, वाईट गोष्टी कमी होतील. पण त्यासाठी काम करावे लागेल, ज्ञान मिळवावे लागेल. प्राक्तन, पूर्वसंचित यावर भर देऊन, काही न करता, ज्ञान प्राप्त न करता, नुसते बसून रहायचे, नि भक्ति भक्ति म्हणून स्वस्थ बसायचे यामुळे तुम्हाला सुख लाभणार नाही! सुख हे मिळवता येते. त्यासाठी ज्ञान व कर्म आवश्यक आहे. संसार वाईट आहे म्हणून त्यातून कायमची मुक्ति मिळावी, म्हणून संसाराकडे दुर्लक्ष करून नुसते भक्ति करत बसलात तर सुखी होणार नाही. नि ज्ञान करून न घेता भक्ति केलीत तर ती भक्तीहि खरी भक्ति, की तुमचे काही चुकत असेल? नि काही चुकत असेल तर तुमचे धेय साध्य होईल का? तेंव्हा ज्ञान मिळवा, संसार करा, नि त्याच वेळी समजून उमजून भक्ति करा. या सर्व गोष्टींना त्यांनी संदर्भ दिले आहेत.

आता देव अवतार घेईल नि आपली सुटका करेल, असे म्हणून तुम्ही आपले गप बसलात, तर सुख मिळायचे नाही. सुख मिळत नाही, मिळवावे लागते. अवतार खरे असतील, होणार असतील तर होऊ देत. पण त्यावर विसंबून राहून नुसते हरी हरी करत बसलात, ज्ञान मिळवले नाही, कर्म केले नाही तर सुख मिळणार नाही!

ह्या चार नियमांकडे पाहिले तर कृष्णाने कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग योग ह्यांचा समन्वय साधण्यास सांगितले आहे. हे खरे आहे. म्हणूनच जसे तुम्ही संदर्भ दिले आहेत, तसे ज्ञान नि कर्म यांची महति सांगणारेहि श्लोक गीतेत आहेत. तुम्ही ते हि लक्षात घेतले पाहिजेत.

मला वामनराव पै यांच्याबद्दल फारशी माहीती आहे असे नाही मात्र त्यांची १-२ पुस्तके वाचली आहेत व त्यांचे विचार मला थोडक्यात माहीत आहेत्.मला असे वाटते की ते एक थिओसॉफीस्ट आहेत्.देव्,दैविक शक्ती असे काहीतरी आहे पण नक्की काय हे माहीत नाही असे त्यांचे बोलणे ऐकुन कधीकधी वाटते. दुसरे म्हणजे त्यांचे बोलणे थोडक्यात आईवडील्,आजीआजोबा सांगतात तसेच वाटते.वर तुम्ही त्यांचे जे विचार लिहिलेले अहेत त्यातील ज्ञान आणि ज्ञानमार्ग यांच्यात जमिनास्मानाचा फरक आहे असे वाटते.बहुतेक ज्ञानमार्ग म्हणजे आपल्या आजुबाजुला चाललेल्या गोष्टींचे ज्ञान असायला हवे असा अर्थ बहुतेक त्यांना अपेक्षित असावा.पण धर्मग्रंथांमधील अथवा आध्यात्मातील ज्ञानमार्ग हा याहुन खुपच वेगळा आहे.ज्ञानी (किंवा योगी) लोक साधारणपणे संन्यास घेउन ध्यानधारणा वगैरे करुन आध्यात्मिक ज्ञान मिळवतात.त्याचा आपल्या दैनंदीन जीवनातील 'ज्ञान' या शब्दाशी फारसा संबंध नाही.म्हणुनच मी वर लिहिले आहे की आजच्या काळात ज्ञानमार्गात फारशी प्रगती करण अवघड आहे.दिवसातुन १५-२०मिनिट ध्यानधारणा केल्याने 'ज्ञान्'प्राप्त होत नाही.दुसर म्हणजे कर्ममार्ग्.मुळात अनेक लोक या मार्गाला बेसिक मानतात. कर्ममार्गाच्या पुढची पायरी(ज्ञान्,भक्ती) घेणे आवश्यक असते.वास्तविक सुख मिळवण्याची तुम्ही(पै यांनी)वर जी व्याख्या लिहिली आहे तीच चुक आहे. हे असे सुख क्षणिक असते.भक्ती करण्यासाठी संसाराकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे,नुसते बसुन रहाणे गरजेचे आहे असा गैरसमज वामनराव पै यांचा आहे का???? तसे असेल तर त्यांना गीता समजलीच नाही असे आम्ही म्हणावे का???अर्जुन हा भगवान कृष्णांचा भक्त होता.त्याने गीता ऐकल्यानंतर युध्द केले,हनुमान हा रामाचा भक्त होता त्यानेही युध्दात अमुल्य कामगिरी केली.जर भक्ती म्हणजे नुसते बसुन रहाणे असते तर या लोकांनी युध्दभुमी सोडून घरचा रस्ता धरला असता व घरी बसुनच पुजाअर्चा केली असती.याबद्दल एक घटना सांगु इच्छितो.एका संस्थेला एक भव्य मंदीर बांधायचे होते. काम करायला सुरुवात झाली.गुरुंनी खुप कमी वेळात काम पुर्ण करण्यास सांगितले.त्यांचा जो शिष्य या कामात प्रमुख होता त्यावर खुप मोठे काम पडले.त्याला दररोजचे नामस्मरण करायलाही वेळ मिळेना.त्याने गुरुंकडे तक्रार केली.तर गुरु म्हणाले 'तुला काय वाटले की अर्जुन कुरुक्षेत्रातील युध्दभुमिवर जपमाळ घेउन नामस्मरण करत होता???'.यावरुन कळते की नुसते बसुन रहाणे म्हणजे भक्ती असा समज किती चुकिचा आहे.ज्ञानाबद्दलचे अनेक श्लोक गीतेत आहेत पण त्याला अनुसरणे तुम्हाला जमेल का??भगवद्गीता ६.११.-१४ मधे ज्ञानमार्गावरील साधकांचे वर्णन दिले आहे.ते इथे टाकतोय-
To practice yoga, one should go to a secluded place and should lay kusha grass on the ground and then cover it with a deerskin and a soft cloth. The seat should be neither too high nor too low and should be situated in a sacred place. The yogi should then sit on it very firmly and practice yoga to purify the heart by controlling his mind, senses and activities and fixing the mind on one point.One should hold one's body, neck and head erect in a straight line and stare steadily at the tip of the nose. Thus, with an unagitated, subdued mind, devoid of fear, completely free from sex life, one should meditate upon Me within the heart and make Me the ultimate goal of life.
आता वरील ज्ञानमार्गाचे वर्णन आणि वामनराव पै यांना अपेक्षित असलेला ज्ञानमार्ग यात काही साधर्म्य आहे काय?? विवेकानंदांची पुस्तके अनेक लोक वाचतात पण त्यांनी जो उपदेश केला आहे त्यावर अतिशय कमी लोक चालतात.कारण त्या मार्गावर चालणे फारच अवघड आहे.म्हणुन आजच्या युगात भक्ती हा सर्वोत्तम मार्ग आहे असे म्हटले जाते.

वामनराव आजोबांच्याच वयाचे आहेत. त्यांचे प्रवचन तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाला उद्देशून नसून जे आळशी, कामचुकार लोक, स्वतःच्या उन्नतिबद्दल उदासिन असतात त्यांना खडसावून जागे करण्यासाठी आहेत. तसेच जे अनेक अज्ञ लोक कर्तव्य न करता उगाच भक्तीच्या नावाखाली बावळटपणा करत बसतात त्यांच्यासाठी पण आहे. त्या ऐवजी जगात आहोत, तर जगात नीट राहून सुख मिळवणे यासाठी चालू गोष्टी, शास्त्र यांचे भरपूर वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. पैसे कुणा बुवाच्या नादी लागून घालवण्यापेक्षा, त्याचा योग्य उपयोग करा. मुख्य म्हणजे श्रम, काम यात कामचुकारपणा करू नका. नि मग भक्ति वगैरे करा.

तसे माधवराव पेशवे व न्यायशास्त्री प्रभुणे यांची पण एक गोष्ट आहे. राज्याकारभारातील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल न्यायशास्त्रींना माधवरावांची भेट घ्यायची होती. पण माधवराव पूजा अर्चा इ. करण्यात गुंतलेले. तेंव्हा बर्‍याच वेळाने जेंव्हा केंव्हा माधवराव बाहेर आले नि त्यांनी विचारले की काय काम आहे, तेंव्हा न्यायशास्त्री म्हणाले की सेवानिवृत्त होऊन काशीला जावे म्हणतो. तुम्ही पण चलावे, तिथे राज्यकारभारापायी चित्त विचलित होणार नाही व अखंडपणे देवाची भक्ति करत बसता येईल. हा टोला हुषार माधवरावांच्या लगेच लक्षात आला, व त्यांनी राज्यकारभाराकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.

दुसरीहि एक मनोरंजक गोष्टः
एकदा नारदमुनींनी भगवान श्री विष्णूंना विचारले, तुमचा सर्वात आवडता भक्त कोण? नारदमुनींना खात्री की भगवान म्हणतील, नारदा तूच. पण भगवानांनी स्मित करीत म्हंटले, 'पृथ्वीवरील एक शेतकरी माझा परम भक्त आहे, तुला दाखवतो.' मग ते दोघे पृथ्वीवर त्या शेतकर्‍याच्या गावी गेले. पहिली गोष्ट नारद म्हणाले, अहो हा ब्राह्मणपण नाही.
याला वेद विद्या नाही. याच्या घरी देवाची एक ओबडधोबड मूर्ति व त्याची पण षोडशोपचार करून पूजा केलेली नाही. शेतात तो शेतकरी आपला काम करत होता, पण तोंडाने देवाचे नाव घेत होता. तेंव्हा नारदांना फार आश्चर्य वाटले की हा कसा भगवांनाचा आवडता भक्त? तेंव्हा श्री. विष्णू म्हणाले आता आपण एक परीक्षा घेऊ. त्यांनी नारदांना व त्या शेतकर्‍याला सांगितले की डोक्यावर पाण्याने काठोकाठ भरलेला पेला ठेवून त्यातले एक थेंबभरहि पाणी न सांडता दहा पावले चालून दाखवा. प्रथम नारद निघाले. बराच वेळ थांबत थांबत दोन तीन पावले गेले. सगळे लक्ष पाणी सांडू नये याकडे. भगवंतांचे नामस्मरण विसरले! नि चौथ्या पावलाला पाणीच काय, पेलापण खाली पडला.
मग तो शेतकरी आला. त्याने डोक्यावर पाण्याने काठोकाठ भरलेला पेला ठेवला, नि देवाचे नामस्मरण करत, नेहेमीच्या चालीने तो सहज दहा पावले चालून गेला. त्याला नारदाने विचारले, 'अरे, तुला पाणी सांडेल अशी काळजी वाटली नाही?' तेंव्हा तो म्हणाला, 'काळजी नाही वाटली. या पेक्षा कितीतरी कठिण गोष्टींना मला संसारात तोंड द्यावे लागते. त्यासाठी काही शिकावे लागते, काम करावे लागते. ते केल्याने मला संसारातील दु:ख कमी करता येते, नि मग मी आनंदाने भगवंतांचे नामस्मरण करतो.' तेंव्हा भगवंत हसून म्हणाले, बघ नारदा. संसाराच्या सर्व जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडून तो माझी भक्ति करतो. नि तुला एक साधे काम सांगितले तर तू मला विसरलास!

तर असे लक्षात घ्या, की संसार आहे तोपर्यंत संसार सुखाचा करा. उगाच सन्यास वगैरेच्या नावाखाली पळपुटेपणा करू नका. ते खरे ज्ञान नव्हे. किंवा मेल्यानंतर काय होईल याचा विचार करत बसण्या ऐवजी जिवंत आहोत तोपर्यंत सुखी रहाण्यासाठी जे करावे लागेल, ते कर्तव्यबुद्धीने करा नि योग्य वर्तन ठेवून करा.
मला आपल्या चार आश्रमांची कल्पना फार आवडते. जसे बालवय, गृहस्थाश्रम, इ. नंतर जेंव्हा शरीर थकते, तुमचे ज्ञान नि अनुभव यांचा बदलत्या जगात फारसा उपयोग नसतो, तेंव्हा मग निवृत्त होऊन देवाची भक्ति करावी. त्यासाठी पूर्वी वनात जात. म्हणजे आपला भार फुकट समाजावर व आपल्या मुलाबाळांवर पडू नये. आता यासाठी वनातच जायला पाहिजे असे नाही. मुले वेगळी झाली, तर आहोत तिथेच राहून आपली काळजी आपण घेण्याइतके पैसे जमवले पाहिजेत, आपल्या आरोग्याची काळजी स्वतःची स्वतःला घेता आली पाहिजे, नि मुख्य म्हणजे सुना, मुले यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये. मग जेंव्हा केंव्हा मरण येईल, त्यानंतर काय होईल, हे देवावर सोडा.

झक्की, आपला दृष्टीकोन सुद्धा योग्य आहे. उपदेश करताना target audiance कोण आहे हे पहाणेही महत्वाचे आहे. ज्यांची मिळकत कमी आहे अशा लोकानी भोंदू बुवांच्या नादी लागून पैसे गमावले तर त्यांचा देवाधर्मावरचा विश्वास उडेल.
चिन्या, तुझे म्हणणेही बरोबर आहे. भक्तीवरून मला विवेकानंदानी त्यांच्या एका भाषणात दिलेले उदाहारण आठवले. एका भक्ताला परमेश्वर प्रसन्न झाला आणि त्याने अवतीर्ण होऊन भक्ताला एक थोबाडीत मारली. भक्ताला दु:ख झाले. तो म्हणाला "देवा! असे का केलेस?". परमेश्वर म्हणाला "तू अजून खरा भक्त बनला नाहीस. मी तुला दिलेले सर्वकाही माझा प्रसाद म्हणून तू आनंदाने स्विकारले पाहिजेस." म्हणजे 'मी तुझी इतकी भक्ती करतो, पण माझ्याआधी त्या जोश्याला promotion का मिळाले?' असे विचारतो तो खरा भक्त नव्हे. आपण रोज किती तक्रारी करतो नाही? साध्या साध्या गोष्टी आपल्याला राग आणवतात. छोट्या गोष्टीनी आपण frustrate होतो. कोणी काही बोलले की आपला अहम् दुखावतो. माझेच उदाहरण घेतो. पदोन्नत्ती मिळेपर्यंत मी रोज देवाला साकडे घालत होतो. ज्या क्षणी बातमी कळली, त्या क्षणी अजून कोणाला पदोन्नत्ती मिळाली ह्याचे गॉसिप चालू केले. देव नाही आठवला. शेवटी प्रार्थना हीच आहे की "हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा."

||श्री स्वमि समर्थ||

Hello friends,

I am new member , excuse me i am unable to type in Marathi, bt i will soon,as i am trying.

i liked to inform i have read a book on Shree Swami Samarth written by MUKUND HANUMANTE
The Glimpse of Divinity, which is one of the master pieces till date i have read, explains details on the life of Shree Swami Samarth and its a must read for swami bhakts, person inclined towards spirituality the book is also available in marathi translated by great Shree B.Kulkarni and available in Pune.

Just thought about sharing my views as this my first post.

Prasad

Shree Swami Samarth

झक्की,माझ्यामते त्यांनी सांगताना चुकिच्या गोष्टी सांगु नयेत.त्यापेक्षा त्यांनी भक्ती अधिक चांगल्या पध्दतीने कशी करावी ते शिकवल्यास बरे होईल अथवा मोटीव्हेटर वगैरे बनल्यास बरे होईल पण उगाच 'फक्त भक्ती उपयोगी नाही' वगैरे चुकिच्या गोष्टी पसरवु नये.मी पण ज्या गोष्टी लिहित आहे त्या पाळू शकतोच असे नाही पण मला त्या पाळता येत नाहीत म्हणुन त्या चुकिच्याच असे म्हणने बरोबर नाही.'नुसता संसार सुखाचा करा ,भक्ती वगैरे नंतर' असे म्हणायचा त्यांना अधिकार आहे पण त्यांनी त्याला कर्मयोग असे नाव देउ नये. 'सर्वात महत्वाचा संसार्'हे म्हणने कर्मीचे आहे कर्मयोग्याचे नाही.शिवाय आपल्या क्षेत्रातील माहीती मिळवा या गोष्टीला ज्ञानमार्ग म्हणनेही साफ चुकिचे आहे.आणि वर संसारात सुख मिळवा म्हणन्याने त्यांचे शिष्य लोक नंतर निराश होउ शकतात कारण संसारातील सुख हे क्षणिक असते. आज मला बढती मिळाली किंवा परिक्षेत चांगले मार्क पडले याचे सुख १-२ दिवसच असते नंतर परत कुठलेतरी नविन 'लक्ष्य्'खुणावु लागते मग आपण ते मिळवण्यासाठी कष्ट करतो मग मागे साध्य झालेल्या लक्ष्याचे सुख नाहीसे होते व नविन लक्ष्य साध्य न झाल्यास निराशाही येते.यालाच म्हणतात 'सुख जवापाडे दु:ख पर्वताएव्हढे'.या विचारसरणीपेक्षा भक्ताची विचारसरणी चांगली.भक्तासमोर जे जे येते ते देवानेच दिलेले आहे व देव आपल्याला भल्याचेच देतो अशा विचारसरणीनी तो त्यातही सुख मानतो नव्हे त्यातही त्याला सुख मिळते.जे जे आपल्याला करावे लागते आहे ती सर्व परमेश्वराची लीला आहे हे त्याला माहीत असते त्यामुळे भक्ताला त्याच्याशी ऍटॅचमेंट नसते.त्यामुळे भक्त सदैव सुखी असतो.गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात की हे समोर उभे असलेले सर्व लोक याच युध्दभुमिवर मरणार आहेत हे तर आधीच 'मी' ठरवले आहे त्यामुळे तू फक्त त्यातले एक साधन आहेस्,तुझ्या शस्त्र ठेवण्याने काहीही फरक पडणार नाही. हे अर्जुनाला कळले की भगवानाच्या हातातले आपण फक्त एक खेळणे आहोत्.त्यामुळे त्याच्या नातेवाईकांशी असलेली त्याची ऍटॅचमेंट त्याने सोडून दिली व शस्त्र हाती घेतले. हेच खरे ज्ञान आहे.मी भक्तीचैतन्य स्वामींना असाच प्रश्न विचारला होता की 'माझ्या अभ्यासाशी माझ ऍटीट्युड कस असाव्??'तर त्यांनी उत्तर दिल की ' अभ्यास करण हे तुझ कर्म आहे ,तुला भगवंतानी ते काम दिल आहे त्यामुळे ते तु व्यवस्थित करणे हाच तुझा धर्म आहे.'
शेतकर्‍याच्या कथेत पै यांनी थोडासा बदल केला आहे. वास्तविक तो शेतकरी म्हणतो की 'भगवंताचे नाव घेण्यासाठी मला कुठलेही कष्ट करावे लागत नाहीत त्यामुळे मी कधिही कुठेही कुठल्याही परिस्थितीत ते घेउ शकतो.' यावर नारदाला कळले की या शेतकर्‍याचा पुर्ण शरीरात भगवद्भक्ती भरली आहे त्यामुळे हा शेतकरी कधीही भगवंताला विसरत नाही. पै यांनी केलेल्या बदलातुन असे दिसते की शेतकर्‍यासाठी काठोकाठ भरलेला पेला ही गोष्ट साधी होती म्हणुन त्याने नामस्मरण केले.पण शेतकर्‍यावर जर खुप मोठे संकट आले असते तर तोही नामस्मरण करायच विसरला असता. मुळ कथेतुन असा अर्थ उद्बोधीत होत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आठवण्यासाठी संन्यासाश्रमापर्यंत वाट पहाणे चुकिचे आहे.संन्यास घेउन एकदम सगळ होणार नाहीये.या गोष्टी सोप्या नसतात.इथे मार्गक्रमण करण्यासाठी वर्षानुवर्ष जातात्.जिथे आपले चालत नाही ती गोष्ट देवावर सोडणे हेही चुकिचे आहे.
येडाकाखुळा, तुझ बरोबर आहे.माझही काहीस असच होत.तू दिलेली कथा बरोबर आहे.त्यातुन असेही कळते की आध्यात्माच्या मार्गावर आपण एकटे असतो.संसारातील मुल्यवान गोष्टी तिथे उपयोगाच्या नाहीत.

चिन्या, पुर्ण अनुमोदन.

न करी संग राहें रे निश्चळ | लागो नेंदी मळ ममतेचा ||
यां नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान | अनुभवांवाचून बडबड ते ||
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय | संकल्पाही न ये वरी मन ||
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा | अंतरी या थारा आनंदाचा ||

क्ष, याचा अर्थही थोडक्यात स्पष्ट केल्यास बरे होईल.

नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥

इथे गंमत बघा !! ज्ञानदेव मौन आहेत, आणि अंतरी श्रीहरी जपमाळ धरून स्वत:च बसला आहे !!

कबिरांचीही हिच स्थिती आहे ना?
राम हमारा जप करे । हम बैठे आराम !!

प्रसन्ना,पण हे महान भक्त होते. आपल्यासाठी तसे नाही.

आपल्यालाही आज ना उद्या संतपदातून जायचेच आहे, त्याशिवाय मुक्ती नाही. ध्येय ज्ञानेश्वर किंवा कबीर होण्याचेच असावे की नाही ? तसे ध्येय ठेवले तरच कुठल्या ना कुठल्या जन्मात आपण संतपदाला पोहोचू.

आपण रोज जप करायला बसताना आपल्या सद्गुरुंना आळ्वून म्हणावे की "जप करणारा मी कोण ? तुम्हीच माझ्या हृदयात बसून जप करा. . मी ऐकतो."

शेवटी भक्तीयोगात भावालाच अधिक महत्व आहे. जसा भाव तसे फळ !

प्रसन्ना, पण असे ध्येय ठेवल्याने अहंकारही बळावु शकतो असे मला वाटते

नाही चिन्या, अहंकार बळावण्याची शक्याता कमी. कारण, मुळात संत पदासाठी अहंकाराला सोडावे लागते. ज्याला त्या दिशेने प्रवास करायचा आहे त्याला अहंकार सोडण्याशिवाय पर्याय नाही. त्याला हे ही माहित असते कि वाटेवर मधेच कधीही अहंकार बळावला तर अधोगती अटळ.

मला वाटते इथे संतपद मिळणे म्हणजे कुठली post मिळणे नसून परमेश्वराच्या maximum जवळ जाण्यासाठी ज्या qualities लागतात त्या आत्मसात करणे किंवा मुळात जन्मजात असल्यास त्याचा वृक्ष करण्याचा सफल प्रयास करणे. या प्रयासात "अहंकार" हा मुख्य अडथळा आहे.

बरोबर आहे तु़झं अश्विनी. अहंकार आणि तोही सात्विक अहंकार बळावण्यासाठी आधी काही साधना तर करायला हवी ना! आणि साधना जर मनापासून व गुरुंना साक्षी ठेवून केली असेल तर अहंकाराचा प्रश्न येतोच कुठे ?
तेरा तुझको अर्पण. . क्या लागे मेरा !
अशी फकीरी वृत्ती आल्यावर अहंकार फक्त अस्तित्वापुरताच उरणार!

ज्याप्रमाणे आपण व्यवहारात एक ध्येय समोर ठेवून पावलं उचलतो त्याचप्रमाणे साधनेतही ध्येय ठरवावेच लागेल! श्री गोंदवलेकर महराजांनी सद्गुरु हवाच असे ध्येय ठेवून वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी अर्धा भारत पिंजून काढला! प.पू. वसुदेवानंद सरस्वतींनी "प्राण गेला तरी दत्ताला दूर करायचे नाही " असे ठरवून वाट्टेल ते देहभोग सहन केलेच ना ?

असो. जर आपल्याला सद्गुरु असतील तर आपले काम सोपे होते हे मात्र निश्चित ! गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप ह्या सारखी सरळ सोपी आणि भावपूर्ण साधना अजून कोणती असणार ?

श्रीराम.

कारण, मुळात संत पदासाठी अहंकाराला सोडावे लागते.
माझ म्हणन अस होत की आपण स्वतःला अस संतपदाला पोहोचलोय असे मानण्यामुळे अहंकार बळावु शकतो ना??????
बाकी ही गोष्ट माझ्यासाठी नविन आहे. मला माहिती अशी आहे की आपण 'भगवंताच्या दासाच्या दासाचा दास ' अशा पद्धतीने भक्ती करायचा प्रयत्न केल्यास अहंकार आपोआपच दुर रहातो.
प्रसन्ना,तुम्ही छान लिहित आहात. अजुन येउ देत.

आपण स्वतःला अस संतपदाला पोहोचलोय असे मानण्यामुळे अहंकार बळावु शकतो.<<< तीथवर पोचलेल्या व्यक्तीला ती जाणीवही होत नसावी. ही पदं बिरुदं तुम्हा-आम्हासाठी!
आपण 'भगवंताच्या दासाच्या दासाचा दास ' अशा पद्धतीने भक्ती करायचा प्रयत्न केल्यास अहंकार आपोआपच दुर रहातो.<<< त्यातल्या 'आपण' ची जाणीव ठसठशीत असेपर्यंत कसला हो अहंकाराचा नाश?
प्रसन्न, सुरेख!

तीथवर पोचलेल्या व्यक्तीला ती जाणीवही होत नसावी. ही पदं बिरुदं तुम्हा-आम्हासाठी!

तेच तर मी म्हणतोय
त्यातल्या 'आपण' ची जाणीव ठसठशीत असेपर्यंत कसला हो अहंकाराचा नाश?

म्हणजे 'मी भगवंताच्या दासाच्या दासाचा दास व्हायचा प्रयत्न करेल' अशा पध्दतीच्या मनस्थितीबद्दल मी लिहित होतो.

न करी संग राहें रे निश्चळ | लागो नेंदी मळ ममतेचा ||
यां नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान | अनुभवांवाचून बडबड ते ||
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय | संकल्पाही न ये वरी मन ||
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा | अंतरी या थारा आनंदाचा ||

हा संत तुकारामांचा अभंग म्हणजे साधकाला उत्तम मार्गदर्शन म्हणता येईल. पण यांत त्यांनी जी सूचना केलेली आहे ती न पाळता पुढे गेलो तर काही अर्थ नाही.

तुकाराम महाराजांनी इथे स्पष्ट सांगून ठेवले आहे की खरे ब्रह्मज्ञान सांगण्याची अधिकारी फक्त तीच व्यक्ती आहे जिला त्या ज्ञानाचा अनुभव आहे. इतर सर्व नुसती पोपटपंची.
पण त्या दिशेने प्रवास करत असाल आणि योग्य हेतू मनात असेल तर त्यावर चर्चा केलेली हितकारकच होईल.
या अभंगाचा अर्थ जो पुढे दिला आहे तो मी "काढलेला" अर्थ नसून संततुल्य व्यक्तींकडून ऐकलेला आहे. ते पूर्ण तर मला सांगता येणार नाहीच पण जितकं सांगतोय त्यांत देखील चुका नसाव्या ही त्यांच्याकडे प्रार्थना. तेव्हां सध्या मी करतोय ती निव्वळ पोपटपंची किंवा बडबड मानून घ्यावी.

वर म्हटल्याप्रमाणे हा अभंग अक्षरशः साधनेचे सार आहे. पहिल्या ओळीत तुकाराम महाराज ज्या ब्रह्मज्ञानाबद्दल बोलत आहेत ते ब्रह्मस्वरूप अनुभवता यावे यासाठी काय करावे लागेल हे सांगितले आहे. दुसरी ओळ अगदी स्पष्ट सांगते की खरे ब्रह्मज्ञान कोणते आणि ते कोणी सांगावे. तिसरी आणि चौथी ओळ हे ब्रह्मज्ञान झाले की काय होईल ते सांगते.

हे कसे मिळवावे हे सांगताना महाराज म्हणतात "न करी संग, राहें रे निश्चळ"
श्रुती म्हणते ब्रह्म हे असंग आहे. वर जनक राजाला एका आठवड्यात श्रवण करून मिळालेल्या मुक्तीचा उल्लेख केला आहे. त्याने या एका आठवड्यात जे ज्ञान अष्टावक्र ऋषींकडून घेतले त्याला अष्टावक्र गीता म्हणतात. (म्हणजे अगदी proven and tested ज्ञान आहे हे Happy )
या गीतेत उल्लेख आहे की जेव्हा जनकाने मोक्षज्ञान किंवा स्वस्वरुपाचे ज्ञान म्हणजे काय हे विचारलं तेव्हां भगवान अष्टवक्र म्हणाले की
न त्वं विप्रादिको वर्ण: नाश्रमी नाक्षगोचर: ।
असङगोऽसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव ।।
म्हणजे तू ब्राह्मण किंवा कुठल्याही जातीचा नाहीस, तू कुठल्याही ग्रुहस्थ वगैरे आश्रमात नाहीस, "नाक्षगोचरः" म्हणजे जे दिसू शकतं, ज्याला रूप आहे असे काहीही तू नाहीस. तू असंग आहेस, तुला कुठलाही आकार नाही, तू फक्त सर्वांस साक्षी आहेस आणि नेहमी सुखी आहेस आणि तसाच रहा.
असंग, म्हणजे कुठलाही कुणाचाही संग नसलेला. का नाही? कारण दुसर्‍याचा संग करायला दुसरे कुणी नाही. आणि असे झाल्यावर तुकाराम महाराज म्हणतात की त्यापासून ढळू नकोस. तिथेच निश्चळ रहा.
पुढे त्यांनी सांगितले आहे की ममतेचा मळ लागू देऊ नकोस. म्हणजे मग आई, वडील, नवरा, बायको, मुलं सगळं सोडून द्यायचं का? तर नाही. या सर्वांत असून त्यांचा संसर्ग होऊ न देणे यालाच खरा संन्यास म्हणावा. ज्ञानासाठी शास्त्रोक्त संन्यास घेणे हे या काळात बहुतेक अशक्य आहे. पण आपण असू त्या आश्रमात संन्यस्त वृत्तीने राहणे हे योग्य. पण म्हणून मग एकदम मरगळलेलं आणि उदासीन रहायचं का? तर नाही. तो मळ असा दूर ठेवावा जसे डॉक्टर लोकं ऑपरेशन करताना हातांत मोजे घालतात. ते मोजे इतके पातळ असतात की कोणाला सहजी दिसत पण नसावेत. पण अगदी त्या रक्तमांसात बुडाले तरी मोजे काढल्यावर हात स्वच्छ! असेच संसारात असावे.

पुढे महाराज अगदी कुठलीही शंका न ठेवता म्हणतात की खरे ब्रह्मज्ञान, ज्याचे नाव अद्वैत आहे, ते अनुभव आल्यावरच सिद्ध होते. नाहीतर बाकी सगळी (मी करतोय तशी) पोपटपंची Happy

पुढे ते एक अगदी नवलाची ओळ लिहितात. "इंद्रियांचा जय वासनेचा क्षय". आपण गोंधळात पडतो की इंद्रियांचा जय व्हावा असं महाराज कसं सांगतील? पण इथे हे लक्षात येण्यासाठी इंद्रीये कुणाच्या सत्तेवर चालतात हे पाहणं गरजेचं आहे.
सामान्य माणसात इंद्रीये ही वासनेच्या सत्तेवर चालतात. तुकाराम महाराज गाथेतच म्हणतात "काया वाचा मने गुंतल्या वासना". मुक्तिकोपनिषदात म्हंटले आहे की "शुभाशुभांभ्या मार्गाभ्यां वहन्ति वासना सरित्" माणसाच्या मनात वासनांची एक नदी आहे, जिचे दोन प्रवाह आहेत, एक शुभ आणि दुसरा अशुभ. हे आपल्यालाही चांगलं ठाऊक असतं की आपल्या मनात असे दोन्ही विचार येतांत आणि आपल्याला हे ही कळतं की ते शुभ आहेत की अशुभ! कोणाला न सांगता किंवा कोणी दुसर्‍याने न सांगता प्रयोग करून बघा!
याच वासना बुद्धीद्वारे इंद्रियांचे काम चालवतात. जसे, "मला आत्ता भूक लागली" हे जेव्हां मी म्हणतो, तेव्हा ही खाण्याची वासना (जी शक्यतो शुभ असते :)) ती मेंदूकरवी इंद्रियांना निरोप देते की जा बाबा, काहीतरी खा एकदाचा Happy मग तेव्हा आपण जाऊन खातो. तात्पर्य हे, की साधारण माणसाच्या इंद्रियांची "ड्राईव्हर" वासना असते.. आणि गीतेत अर्जुनाने कोणाला ड्राईव्हर केले आहे? Happy जर त्या ईश्वराला या इंद्रियांचा ड्राईव्हर किंवा सारथी केले, तर त्यांच्याकरवी नेहमी शुभच होईल. आता ईश्वराला सारथी करणे म्हणजे त्याच्या येण्याची वाट बघत बसायचं का? तर ते ही नाही. त्याने गीतेतून आणि धर्मशास्त्रातून आपल्याला कसे वागावे, काय करावे हे सांगून ठेवलेले आहे. आपल्याला सुद्धा कळते चांगले आणि वाईट काय ते. पुन्हां ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम, रामदासांसारखे संत आपल्या भूमीत होऊन गेले आहेत. दासबोधात अगदी साधनेपासून राजकारणापर्यंत कसे वागावे याच्या सूचना आहेत. हे आचरणात आणले तर ईश्वरालाच सारथी केल्यासारखे आहे. मग अशा मनाला, कि ज्याचा सारथी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे, त्याचे संकल्प विकल्प करण्याचे सुद्धा थांबून जाते. संकल्प विकल्प जेव्हा थांबतो, तेव्हा त्यापासून उद्भवणारे सुख आणि दु:ख यांचे द्वंद्वसुध्दा थांबते आणि याचीच परिणती म्हणजे शेवटची ओळ जिथे अंतःकरणात जाणीव राहत नाही. आता जाणीव राहत नाही म्हणजे जाणीवशून्य का? तर नाही, जाणीव न राहणे म्हणजे दुसर्‍या कशाची जाणीव न होणे आणि फक्त ब्रह्मानंदा मध्ये "आनंदाचे डोही आनंद तरंग" या स्थितीत राहणे हे होय. आनंद, जे ब्रह्माचे स्वरूप आहे! आणि म्हणूनच ते पुढे म्हणतायत अंतरी या थारा आनंदाचा!

खरं म्हणजे या प्रत्येक ओळीवर अतिशय रसाळ विवेचनं झालेली आहेत. पण माझ्यासारख्याला इतके काही सांगता येणार नाही.
जितके आठवले तितके लिहिले आहे.

प्रसन्न, मृण्मयी, क्ष, चिन्या, मजा येतेय वाचायला ! V&C होण्यापासून हा group दूर राहून अशीच सुंदर चर्चा झाली पाहिजे.

क्ष, तुमची पोस्ट वाचून मला दै.प्रत्यक्ष मधील तुकाराम महाराजांच्या गाथेवरील सदराची आठवण झाली.

हरि ओम.

हे वाहून जाणारे पान असल्याने वरचे संदेश आणखी वाहून जाऊ नये म्हणून हे पान बंद करतो आहोत. नवीन वाहून न जाणारे पान सुरू केले आहे.
http://www.maayboli.com/node/2261