चालला अद्याप श्वासोच्छ्वास आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 October, 2012 - 06:30

गझल
चालला अद्याप श्वासोच्छ्वास आहे!
जीवनाचा और अट्टाहास आहे!!

जाग नाही, झोपही नाही जिवाला;
कोण जाणे, हा कशाचा ध्यास आहे!

गीत गाणा-या गळ्याला ज्ञात नाही....
रेशमी असला तरी, हा फास आहे!

तू इथे आहेस या खात्रीमुळे मी;
घेतला मागून कारावास आहे!

काय मी मृत्यू, तुला सांगू खुशाली;
जीवनाचा जीवघेणा त्रास आहे!

व्हायला नुसत्या इशा-याने शहाणा,
एवढा कोठे मला अदमास आहे!

पाहतो जो जो मला तो, हेच म्हणतो.........
मी जिता आहे खरे? की, भास आहे?

वाळवंटातील माझ्या तूच मृगजळ!
सोबतीला हा तुझा आभास आहे!

आज जी काही कमाई कनवटीला;
ती नका समजू विनासायास आहे!

पांगळा असलो तरीही चालतो मी....
मी शिखर गाठेन हा विश्वास आहे!

मी वसंताचाच वंशज एक आहे!
वाटतो साक्षात मी मधुमास आहे!!

लोक चाळायासही करतात काकूं;
वाचतो मी तेच तासंतास आहे!

रोजची झाली मला टीका टवाळी!
बांधतो मी रोज माझी कास आहे!!

लोक खाती टाळवावरचेच लोणी!
तोंडचाही मी दिलेला घास आहे!!

दागिना होणे स्वत: होतो गुन्हा का?
मी गझलक्षेत्रातला अनुप्रास आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>प्रयत्न करत राहा देवपूरकर.. तुमची वृत्तावर बर्‍यापैकी पकड आहे. जमेल हळूहळू.
बाप रे तुम्ही असा सल्ला कसा काय दिलात ? तुम्हाला माहित नाही की काय ? Uhoh
प्रो. हे खरेच प्रो. असुन माबोवर त्यांच्या अगणित गझला आहेत.
तसेच ते लोकांना गझला लिहिण्यात मार्गदर्शन देखील करतात.

रोजची झाली मला टीका टवाळी!
बांधतो मी रोज माझी कास आहे!!

बांधतो मी रोज माझी कास आहे?????
मंजी काय भो? धोतर घालताना कासोटा बांधणे असलं काही रूपक आहे का ते?

प्रयत्न करत राहा देवपूरकर.. तुमची वृत्तावर बर्‍यापैकी पकड आहे. जमेल हळूहळू.<<<

महान प्रतिसाद येतायत इथे

अमित,
धन्यवाद, प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
................................................................................................

के.गो.
धन्यवाद दिलेल्या आशिर्वादाबद्दल, प्रशस्तिपत्रकाबद्दल व दाखवलेल्या आशावादाबद्दल!
आपणच राहिला होतात आम्हास गंडा बांधायचे!
.................................................................................................

महेश,
धन्यवाद मुद्रांकित व मुद्रित सत्य प्रतिसादाबद्दल!
............................................................................................

इब्लिस,
धन्यवाद!
कास कसणे.........कासोटा घालणे
कास बांधणे/घालणे...........कार्यासाठी कंबर बांधून सिद्ध असणे, निश्चय करणे.
शेराचा अर्थ: रोज होणा-या टीका, टवाळीला न जुमानता आम्ही (गझलेचे घेतलेले व्रत अखंड चालू ठेवण्यासाठी) कंबर बांधून (रोज) सिद्ध होतो!
..............................................................................................

आंबा१
कासेस लागणे/धरणे म्हणजे एखाद्या समर्थ माणसाच्या आश्रयास जाणे.
खयाल म्हणजे काय हो?
खयाल चालायचे कशाला?
............................................................................................

बाबूराव,
धन्यवाद!
घेतला मागून कारावास आहे<<<<<<<<<<<<<
म्हणजे मीहून कारावासाची मागणी केली व तो मी भोगीत आहे.
..............................................................................................

आहेऽ अजून जीव आहेऽ.. श्वास सुरू आहे म्हणे.. बस च्या समोरच्या अंगाने अचानक ओरडा झाला.

(म्हैस मधून आठवणीने साभार)

मायबोलीवर जरा रेंगाळलो तर
गझल तुमची वाचणे हा त्रास आहे..

आदाब अर्ज़ हैं!

आठ वेगवेगळ्या प्रतिसादांतून पाठोपाठ पोचपावत्या देऊन प्रतिसादसंख्या वाढविण्याची कल्पना 'खास आहे'.

के.गो.
रेंगाळता न आले मज भोवती कुणाच्या;
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!

प्रतिसादांचे कट् पिसेस् आहेत ते, खास लांबी कमी केलेले!
संख्यात्मकता आपण मोजा.............
गुणात्मकता आम्ही मोजू!

कारणे काहीही असोत, मायबोली 'गझल विभाग'- (विशेषतः प्रतिसाद आणि कथित गझलचर्चा) दिवसेंदिवस अत्यंत टाकाऊ, थिल्लर आणि दर्जाहीन होत चालला आहे. Sad
माझ्या मायबोलीवरच्या कालावधीत गझल विभागाची इतकी अधोगती झालेली मी पाहिलेली नाही. आणि एकंदर स्थिती याहून वाईट होत जाणार आहे, असे दिसते आहे.

एक मायबोली सदस्य या नात्याने माझी मायबोली प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की काही दिवसांसाठी तरी 'मराठी गझल' हा विभाग बंद करावा. ते शक्य नसेल तर किमान गझलेखाली प्रतिसाद देता येणार नाहीत अशी काहीतरी व्यवस्था करावी.

(हे लिहिण्यासाठी ही योग्य जागा नाही याची मला कल्पना आहे. मात्र नवीन धागा सुरू करून उपद्रवी आयडींसाठी नवे कुरण उपलब्ध करण्याची माझी इच्छा नाही. ही सूचना फक्त मायबोली प्रशासनासाठी आहे. त्यांना पर्सनल मेसेजही लगेच करतो आहे.
कृपया इतरांनी यावर आपली मते इथे नोंदवू नयेत.)

कृपया इतरांनी यावर आपली मते इथे नोंदवू नयेत.)<<<

माझ्या मनात शंका आहे की हे आपण म्हणू शकता की नाही. म्हणू शकत असलात तर हा नियम मोडल्याबद्दल दिलगिरी.

तुमच्या मूळ मुद्याशी (मराठी गझल विभाग बंद करणे) असहमत.

तसेच, गझल, प्रतिसाद या सर्वांचा दर्जा अबाधित राहावा यासाठी गझलकारांनी आपणहून पुढाकार घेणेही शक्य आहेच.

या निमित्ताने माझी प्रशासनाला ही विनंती आहे की मायबोली गझल विभागावरील असंबद्ध प्रतिसाद, जेन्युईन सदस्यांनी विनंती केल्यावर कृपया तातडीने उडवण्यात यावेत.

-'बेफिकीर'!

मायबोली गझल विभागावरील असंबद्ध प्रतिसाद कृपया तातडीने उडवण्यात यावेत. तसेच ह्या सदरावर काही काळ तरी नियमित मॉडरेशन असावं, नियंत्रण असावं.

प्रशासकांचा निर्णय मान्य असेल.

अधोगती ही होतेच, बर्‍याच लोकांना अभिव्यक्ती आणि त्याच्या स्वातंत्र्याचा अतिवापर हा अधोगतीकडे नेतो याची जाणीव व्हायला उशीर होतो. काही काळापूर्वी, मायबोली कविता विभागामध्येही अशाच प्रकारच्या थिल्लरतेला पूर आला होता. त्यावेळी, गझल विभागाकडेच जाणे व्हायचे, कारण तेव्हा तिथे चांगल्या दर्जाच्या गझल वाचायला मिळायच्या आणि शिवाय त्यांची संख्याही मर्यादीत (अगदी शेरांची सुद्धा!) होती. वरील सदस्यांनी विवेकबुद्धीने केलेल्या सुचना नक्कीच स्पृहनीय.

अरे वा इकडे अजुनही श्वासोच्छवास चालूच आहे की !
बुंदी पाडल्यासारख्या कविता अन गझला पाडणार्‍या लोकांचे मला विशेष कौतुक वाटते.
कसे काय जमते राम जाने !

गझलेपेक्षा गझलकाराकडे पाहूनच असंबद्ध प्रतिसाद जेव्हा पाठवले जातात, तेव्हा हे असेच होणार. मूळ गझल बाजूलाच रहाते व वैयक्तिकक, स्वार्थमूलक, व थिल्लर गप्पांची चावडी म्हणजे मायबोलीवरील प्रतिसाद असे दिसून येते. अर्थात याला काही सन्मानीय अपवाद आहेत! अहंकार व टवाळी जेव्हा डोके वर काढतात, तेव्हा माणूस प्रतिसादाच्या नावाखाली काहीही अप्रशस्त लिहू लागतो.

...........प्रा.सतीश देवपूरकर

मला स्वतःला गझल, कविता, पद्य झेपतच नाही/ कळत नाही. पणएक काळ होता जेव्हा माबो वर गझल कार्यशाळा घेतली होती वैभव, प्रसाद आणि इतर दिग्गजानी. तेव्हा खुप एन्जॉय केलं होतं मी.
आजकाल गझल म्हणले की त्याखालचे प्रतिसाद वाचुनच वाइट वाटतं. Sad