किल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत

Submitted by आनंदयात्री on 10 October, 2012 - 01:57

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट. ऑफिसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आठवडाभर नाशिकमध्ये होतो. देवही आम्हा ट्रेकर्सच्या बाबतीत कधी कधी अगदी मेहेरबान होतो. यावेळी मेहेरबानी झाली ती प्रोजेक्टच्या ठिकाणावर! यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर! समोर अंजनेरी किल्ला! अगदी पहिल्याच दिवशी दिवसभर गडमाथ्यावर धुकेजलेले ढग होते आणि कॉलेजमध्ये मी बैचेन! कधी एकदा अंजनेरीला जाऊन येतो असे झाले होते. कॉलेजमधूनच गडाचे फोटो घेणे 'तत्त्वात' बसत नव्हते. चार-पाच दिवस जाता-येता, चालता-चालता रोज डोळ्यासमोर असणारा अंजनेरी चक्क हात पसरून बोलावतोय असं वाटायला लागलं आणि शनिवार, अनंत चतुर्दशी च्या सुमुहुर्तावर अंजनेरीची भेट पक्की केली. सोबत कोणी येईल का याची तपासणी केली आणि 'हा माझा मार्ग एकला' या निष्कर्षाप्रत येऊन पोचलो. नाशिकहून सकाळी सहा वाजता निघालो. त्र्यंबकेश्वर मार्गावर असणार्‍या अंजनेरीपर्यंत पोचणे अगदी सोपे आहे. सीबीएस (ठक्कर)हून सतत एसटी मिळतात.

अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत. हनुमानाचा जन्म याच गडावरचा. अंजनीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले असावे. वनवासामध्ये रामचंद्रांनी बराचसा काळ पंचवटी परिसरात घालवला असल्यामुळे नाशिकच्या आसपास अनेक रामायणकालीन स्थळे आहेत. खुद्द अंजनेरी गावातही पुराणकालीन अनेक उद्ध्वस्त मंदिरे आहेत.

अंजनेरीला जाण्यासाठी सर्वात योग्य ऋतू म्हणजे पावसाळा. मुळात हा गड सोपा असल्यामुळे पावसाळ्यातही जाता येऊ शकते. सोबतीला धबधबे असतातच. अंजनेरी गडापर्यंत पोहोचण्याचे साधारण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यापर्यंत गाडी जाऊ शकते. तिथून पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत पायर्‍या आहेत. तिथून तिसर्‍या टप्प्यात गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. एकूण भटकंती सोपीच आहे.

अंजनेरी गावात उतरलो, तेव्हा पावणेसात वाजले होते. अंजनेरी करून बारा पर्यंत खाली उतरायचे ठरवले होते. नंतर वेळ आणि ताकद असेल तर ब्रह्मगिरीही करून यावा असा प्लॅन होता. गावात शिरताना हे मंदिर लागले. अनायासे शनिवार होताच, त्यामुळे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पुढे निघालो.

मी गाडीरस्त्याने न जाता गावामागून जाणारी पायवाट पकडली. समोर अंजनेरीची रांग सकाळच्या उन्हात चमकत होती.

अंजनेरी किल्ल्याची वाट दक्षिणोत्तर असल्यामुळे या वाटेवर सकाळी पूर्ण वेळ सूर्य असतो. त्यामुळे सकाळी लवकर सुरूवात करणे केव्हाही श्रेयस्कर! अंजनेरीच्या रांगेत अलिकडे नवरा नवरीचे सुळके दिसतात. सह्याद्रीचं हे एक बरं आहे. कुठल्याही डोंगररांगेवर आजूबाजूला दोन सुळके दिसले, की नावं ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा 'नवरा-नवरी' म्हणून मोकळं व्हायचं. संख्येने जास्त असले तर उरलेल्यांना 'वर्‍हाडाचे सुळके' म्हणायचं (काही अपवाद सोडून!). तात्पर्य, हे दोन सुंदर सुळके लक्ष वेधून घेतात. त्यापैकी उजव्या सुळक्यावरील मंदिरापर्यंत जाता येते. फक्त मागच्या बाजूने कातळवाट आहे, असे एका गावकर्‍याकडून समजले.

एका सपाटीवर गाडीरस्ता पायवाटेला येऊन मिळतो. उजव्या कोपर्‍यात अंजनेरी गाव.

त्या सपाटीवरून थोडं चाललं की आपण पायर्‍यांपाशी येऊन पोचतो.

पायर्‍यांवरून घेतलेले काही फोटो -
अंजनेरी गावाशेजारचे धरण

थोडा झूम करून

अजून थोडा झूम करून

पायर्‍या एका कड्याच्या पायथ्याशी येऊन पोचतात. अंजनेरीच्या वाटेवरचा सर्वात थ्रिलींगचा पॅच जर कुठला असलाच तर तो हा आहे. कड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो.

त्या घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेले श्रीमारूतीराय दिसतात.

तिथून पुन्हा पायर्‍या सुरू होतात ते पहिल्या पठारापर्यंत!

वाटेत डाव्या बाजूला कातळात दोन गुहा आहेत. तिथे मुक्काम करता येऊ शकतो.

त्या पायर्‍या संपल्या की आपण येऊन पोचतो ते एका पठारावर. इथपर्यंत अर्धं अंतर पार झालेलं असतं.

या पठारावर अंजनी मातेचं एक मंदिर आहे.

मंदिराजवळच एक मोठा तलाव आहे.

त्याच्या शेजारुन दोन वाटा फुटतात. त्यापैकी पायर्‍यांची वाट माथ्याकडे जाते आणि डावीकडची पायवाट सीतेच्या आश्रमाकडे जाते. ऊन्ह वाढायच्या आत वर जाऊन येऊ असं ठरवून मी आधी पायर्‍या पकडल्या.
पायर्‍यांच्या वाटेवर मध्येच एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर 'हनुमान जन्मस्थान' अशा अर्थाची पाटी आहे.
कड्याच्या पोटात एक गुहा, गुहेच्या बाहेर झाडावर घंटा, गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती!

पायर्‍या संपवून पठार पूर्ण चालून आपण अखेरीस हनुमान मंदिरापाशी येऊन पोचतो. हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते.

अंजनी माता आणि वानरमुखी हनुमान यांच्या मूर्ती आणि पुढ्यात शिळा आहेत.

मंदिरात एक गावकरी भेटला. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी वास्तव्यास असताना खोदलेली पाण्याची कुंडे इथून जवळच आहेत अशी माहिती त्याने दिली. (नवनाथांच्या पोथीमध्येही याचा उल्लेख आहे, म्हणे!) कमी अधिक खोलीची एकूण अकरा कुंडे आहेत. काही काही बर्‍यापैकी खोलही आहेत असे वरून डोकावल्यावरही जाणवते.

अंजनेरीच्या पश्चिम कड्यावरून दिसणारा ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर गाव

आपण ज्या वाटेने चढून येतो ते पठार -

भटक्यांच्या 'visual डिक्शनरी'त एकावर एक रचून ठेवलेले दगड हे वाट चुकू नये म्हणून केलेल्या खुणेचे असतात. अंजनेरी माथ्यावर अशा अनेक दगडांचे अनेक मनोरे दिसतात. यांचा अर्थ वेगळाच आहे.

देवाला नवस बोलल्यावर हे उभे केले जातात. याचा देवासाठी मतितार्थ असा की 'नैसर्गिक क्रियेमुळे (वारा, पाऊस इत्यादी) हे एकावर एक ठेवलेले दगड कोसळायच्या आत मनातील इच्छा पूर्ण कर'!

माथ्यावरून पठाराचा आणखी एक फोटो -

या फोटोतल्या वरचा जलाशय हे पठारावरील तळं, तर खालचा पाणीसाठा हा अंजनेरीशेजारचा धरणाचा जलाशय! दोन जलाशयांमध्ये हजार फूट खोली आहे, एवढाच काय तो फरक!

पायर्‍या उतरून पठारावर आलो आणि सीतेच्या आश्रमाकडे निघालो.
या गुहेमध्ये अंजनी आणि सीतामाईची भेट झाली असे सांगतात.

ही मंदिरे पाहिल्यावर मला लगेच आजोबा डोंगरकुशीतल्या वाल्मिकी आश्रमाची आठवण झाली.

आधी पठार, मग पायर्‍या मग पायवाट उतरून गावात आलो तेव्हा फक्त साडे अकरा झाले होते. बर्‍याच दिवसांनी भटकायला मिळाले होते. एकट्याने केलेली ही बहुधा पहिलीच अपरिचित किल्ल्याची भटकंती! short but sweet! नाशिक प्रांतातल्या या पहिल्यावाहिल्या किल्ल्यांनंतर हा सिलसिला सुरू होवो ही सह्याद्रीबाबाकडे प्रार्थना!

(अवांतरः अंजनेरीसारख्या डोंगराला रामायणामध्ये जर पर्वत म्हणत असतील, तर अजून तीन चारशे वर्षांनी सह्याद्रीमध्ये 'रायपर्वत', 'राजपर्वत', 'सिंहपर्वत' अशी नामे प्रचलित व्हायला हरकत नाही, असा विचार माझ्या मनात येऊन गेला, एवढंच!)

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/10/blog-post_10.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदयात्री,
अंजनेरी /नाशिक/ त्र्यंबकेश्वर ची आठवण करुन दिल्याबदाल धन्यवाद!
मला तर वाटतं पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर आणि आजुबाजुचा परिसर जेवढा सुरेख दिसतो तेवढा जगात कुठलाही दिसत नसेल. Happy
तुमचे फोटो खुपचं छान आले आहेत.

मस्त फोटो.
सुंदर आणि बर्‍यापैकी सुस्थितीत आहे परिसर. झाडे लावलीत, तेही छानच. म्हणजे उन्हाळ्यातही जायची सोय होईल.

सुंदर ! पहिल्यावाहिल्या किल्ल्यांनंतर हा सिलसिला सुरू होवो ही सह्याद्रीबाबाकडे प्रार्थना!>>> आपली मनोकामना पुर्ण होवो अशी आमचीही प्रर्थना ....... Happy

अरेव्वा..त्र्यंबकेश्वरला जातांना बघितला कित्येकदा. याच्या वाटेवर/ हायवेला लागुनच एक कार्तिकस्वामीचं मंदीर पण आहे...छोटसं.

तो बाळ हनुमान व अंजनीमाता किती गोडुले दिसतायत. Happy
आणि ते विस्तीर्ण पठार पण आवडलं.

<<मला तर वाटतं पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर आणि आजुबाजुचा परिसर जेवढा सुरेख दिसतो तेवढा जगात कुठलाही दिसत नसेल.<< +१

मस्त!!!

सर्वच सुरेख रे - ठिकाण, फोटो.
सह्याद्रीबाबा तुम्हा सर्व भटक्यांवर प्रसन्नच असतो.....

मस्तच रे नचिकेत... नेहमीप्रमाणे वर्णन आणी फोटो अप्रतीम...
कधी कधी सोलो ट्रेकमध्ये पण मस्त मजा असते..

तात्पर्य, हे दोन सुंदर सुळके लक्ष वेधून घेतात.>>>>ह्याच परीसरात डांग्या पिनॅकल आहे.. फोटोपैकी एखादा तोच असावा असा माझा आपला एक अंदाज Happy (ह्या डांग्यासुळक्याच्या इथल्या एका पाण्याने म्हणे डांग्या खोकला बरा होतो म्हणून हे नाव. खरे खोटे तो सुळका आणी देव जाणे :))

डांग्या सुळका अंजनेरीच्या मागील (दक्षिण) बाजूस आहे. नवरा - नवरी सुळके उत्तरेच्या बाजूस आहेत. माथ्यावरून डांग्या दिसतो. आया ने काढलाही असेल फोटो...!
मस्त लेख आणि प्रचि. आवडले.
(खालच्या मंदीरांचे प्रचि कुठे आहेत? )

मस्त रे... Happy एकटा होतास तरी जाउन आलास हे बरे केलेस.. एकला चालो रे!!! Wink

बरं रायपर्वतावर कधी जायचे आपण??? Proud

माहीती बद्दल धन्यवाद हेम...

नची, रोहन>> कधीपण ठरवा, रायपर्वत, राजपर्वत जायला मी कधीही तयार असतो :).

सर्वांचे मनापासून आभार Happy

डांग्या पिनॅकलचा फोटो काढला होता, पण वातावरण क्लिअर नव्हते, त्यामुळे फोटो नीट आला नाही.. ब्रह्मगिरीच्या फोटोमध्येही त्या धूसर वातावरणाचा इफेक्ट दिसतोय..

हेम, खालच्या मंदिराचे फोटो स्वतंत्र टाकेन म्हणतो.. Happy


एकटा होतास तरी जाउन आलास हे बरे केलेस..

मग काय! नाशिकमधल्या दिग्गज ट्रेकर्सने टांग दिली (हेम, वाचू नकोस हे :P).. मग एकटाच गेलो.. Wink

@रायबागान - आयडी छान आहे Happy
रच्याकने, तुम्ही नुसतेच ट्रेक अरेंज करा, ट्रेकला जा... एकदाही फोटो किंवा वृत्तांत लिहू नका बरं का!! Proud

नचिकेत, मी त्रिंगलवाडीचा वृत्तांत लिहीला होता आणि कसेबसे फोटो सुद्धा टाकले होते त्यामधे. Happy Happy Happy

आता बाकीच्या ट्रेकचा वृत्तांत काय लिहू, मी काही तुमच्या सारखे कठीण ट्रेक नाही करु शकत Sad (सोबत नवखे खिलाडु असतात आणि मी काही तुमच्या एवढी लहान नाही आता Wink )

नवीन गड ज्याविषयी तुम्ही कोणी लिहीले नसेल त्यावर मात्र नक्की लिहीन Happy

Pages