तू भेटलीस मजला, मी गाव सोडताना!

Submitted by सतीश देवपूरकर on 9 October, 2012 - 07:37

गझल
तू भेटलीस मजला, मी गाव सोडताना!
जगण्यात रंग आला, आयुष्य संपताना!!

आता कुठे जगाच्या आल्या समोर गझला!
मज पाहिले न कोणी, आयुष्य वेचताना!!

भूकंप कैक झाले, कळले कुणास नाही;
आवाज होत नाही काळीज भंगताना!

अद्याप श्वास होते चालू उरात त्याच्या.....
संशय कुणा न आला प्रेतास जाळताना!

सत्ता असो सुबत्ता, किंवा असो प्रसिद्धी!
माणूस आज दिसतो मस्तीत झिंगताना!!

समजायच्या न कोणा, माझ्या मुक्या व्यथा या;
मीही अबोल होतो, मजलाच सोसताना!

नाही उगाच झाली माझी गझल मुलायम;
दिसलो न मी कुणाला काळीज पिंजतना!

आरक्त जाहलेले आकाश सर्व बघती!
सूर्यास कोण बघतो? आतून पेटताना!!

सारे अतीत माझे, साक्षात मूर्त होते!
दिनदर्शिका पुराण्या सहजीच चाळताना!!

कर कान तू जिवाचे ध्वन्यार्थ ऎकताना;
एकेक ओळ माझी हृदयात गुंजताना!

एकांत सर्व माझा तू व्यापतेस ऎसा.......
हरवून पार जातो, तुजला निहाळताना!

तुज पाहताच होते माझी विचित्र दैना.....
आवाज खोल जातो, तुजला पुकारताना!

इतकीच फक्त इच्छा.... यावेस तू समोरी!
व्हावेस तूच साक्षी, मी प्राण सोडताना!!

....................प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल छान
न्याहाळताना
आणि
सामोरी
हवे .

आरक्त जाहलेले आकाश सर्व बघती!
सूर्यास कोण बघतो? आतून पेटताना!!

भूकंप कैक झाले, कळले कुणास नाही;
आवाज होत नाही काळीज भंगताना!

<< क्लास !

बेफिकीरजी!
धन्यवाद टपालमुद्रेबद्दल!
मुद्रेचा भावार्थ समजला नाही.
नाराज आहात काय आमच्यावर?
आम्ही कुठे चुकलो का?
..........प्रा.सतीश देवपूरकर

मुक्तेश्वर!
निहाळणे/न्याहाळणे दोन्ही शब्द वापरतात ज्याचा अर्थ आहे निरखून पाहणे.
समोर असा शब्द आहे. काव्यात समोरी असे ब-याचदा म्हणतात.
सामोरी जाणे/येणे याला निराळा अर्थ आहे, जो इथे अपेक्षित नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
असाच लोभ असावा!
.........प्रा.सतीश देवपूरकर

अमित!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
असाच लोभ असावा!
.........प्रा.सतीश देवपूरकर

सर !
एकच एक प्रदीर्घ प्रतिसाद टंकण्यापेक्षा त्यास स्प्लिट करून प्रत्येकास सेपरेट धन्यवाद देण्याची ऐडिया अत्यंत आवडली.
आभारी आहे.
असाच लोभ असावा.

........ज्ञानेश.

आरक्त जाहलेले आकाश सर्व बघती!
सूर्यास कोण बघतो? आतून पेटताना!!

खल्लास ... दिल को चिरुन गेलि गझल

'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !'
सुरेश भटांच्या ह्या ओळी आठवल्यात ...

भूकंप कैक झाले, कळले कुणास नाही;
आवाज होत नाही काळीज भंगताना!
>>>
अप्रतिम

थोडा निराशावादी सुर जाणवतो पण खुप छान लिहिली आहे

भूकंप कैक झाले, कळले कुणास नाही;
आवाज होत नाही काळीज भंगताना!

आरक्त जाहलेले आकाश सर्व बघती!
सूर्यास कोण बघतो? आतून पेटताना!!

हे दोन शेर विशेष आवडले...

सर्वच शेर अप्रतिम, मनापासून आवडले

गझल थोडी लांबलचक वाटते, एका गझलेत किती शेर असावे किंवा नसावे याबाबत मला फारसे माहित नाही तरीही ६ ते ८ शेर असले तर तीच सौंदर्य जास्त खूलत अस माझ व्ययक्तिक मत , बाकी जाणकार आहेतच येथे.

सारे अतीत माझे, साक्षात मूर्त होते!
दिनदर्शिका पुराण्या सहजीच चाळताना!!>>>>>शेर छान

..इतर अनेक शेरही उल्लेखनीय आहेतच पण या शेरात दिनदर्शिकेऐवजी आपल्या गझलेच्या वहीचा/ डायरीचा उल्लेख आला असता तर शेर माझ्या डोळ्यापुढे मूर्तिमन्त होवून अधिक सुन्दरपणे उभा राहिला असता असे मला वाटून गेले

सारे अतीत माझे, साक्षात मूर्त होते!
माझी गझलवही मी सहजीच चाळताना!!

धन्यवाद

नाही उगाच झाली माझी गझल मुलायम;
दिसलो न मी कुणाला काळीज पिंजतना!

नाही उगाच झाली माझी गझल मुलायम;
दिसलो न मी कुणाला काळीज पिंजताना! ..... असे असावे. टायपो असेल कदाचित.