सुरस कथा माझ्या प्रेमाची..

Submitted by रसप on 8 October, 2012 - 04:05

सुरस कथा माझ्या प्रेमाची नका विचारू मला
प्रेमपटावर डाव मनाचा अनेकदा मांडला
हरेक वेळी माझी खेळी पराभूत जाहली
तरी नव्या प्रेमाची आशा पुन्हा पुन्हा बांधली

पहिले होते बालपणीचे चौथ्या वर्गातले
कुणास ठाउक कधी तिनेही होते का जाणले ?
मला पकडले होते बाईंनी बघताना तिला
हातावरती प्रसादही मग यथेच्छ होता दिला !

त्यानंतर मी सुतासारखा झालो होतो सरळ
पण हे मनही जात्या होते पक्के चंचल चपळ
वर्ग दहावीचा होता तो तिच्यात गुंतुन फसलो
'निकाल' पाहुन मार्कशीटवर स्वत:च कुंथत बसलो

कॉलेजाच्या दुसऱ्या वर्षी केले तिसरे प्रेम
जितका चुकला तितक्या वेळा परत लावला नेम
लाल गुलाबाला माझ्या पायाने चुरले तिने
बॉयफ्रेंडला सगळे सांगुन मस्त तुडवले तिने !

नजर फिरवुनी कुणासही मग कधीच ना पाहिले
'हि'ने मला हेरले एकदा अन जाळे टाकले
बेसावध होतो मी फसलो बंधनात अडकलो
लग्नाच्या बेड्यांना माळुन 'श्रीयुत' मी जाहलो

आजच आली मैत्र विनंती फेसबूकवर नवी
कॉलेजच्या तिसऱ्या प्रेमाची तीच हासरी छवी
स्विकार केले विनंतीस मी गप्पाही रंगल्या
'फटके पडलेल्या' दिवसांच्या आठवणी जागल्या !

मी म्हटले की, "सुरस कथा त्या नका विचारू मला
प्रेमपटावर डाव मनाचा अनेकदा हारला
मला आठवे ना कुठलाही आज जुना चेहरा
जे न मिळाले त्यास गमविण्याचा तोटा ना खरा !!"

....रसप....
८ ऑक्टोबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blog-post_8.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप क्यूट अन थोड्याशा विनोदी अंगाने जातंय हे कारण शाळाकॉलेजातली अपरिपक्व प्रेमं आलीयेत त्यात..शेवटही तसाच त्यामुळे.
कोणी सांगितलं की प्रेमाचं ओझंच घेतलं पाहिजे म्हणून.. :))