कहानी घर घर की

Submitted by मुंगेरीलाल on 7 October, 2012 - 13:45

अमिताभ ने टाय ची गाठ सैल करत कोटाच्या बटनाला हात लावला तोच कोणीतरी ओरडलं

"अगबाई, डाग कसला पडलाय एवढ्या महागड्या ब्लेझर ला?".

त्यानं दचकून इकडं-तिकडं पाहिलं. कुणीच दिसलं नाही. तेव्हढ्यात,

"अहो, मी विचारतीये, मी. जरा माझ्याकडे पहा."

पुन्हा तेच. गोंधळून त्यानं जादुगार रघुवीरच्या शो सारखा पुढ्यात तरंगणारा पायजमा घेतला आणि त्यामागे तो धरून उभी असलेली जया त्याला दिसली. इतकी वर्षं झाली लग्नाला, पण हे असंच होतं नेहेमी. "क्या चाहती हो बेहेनजी?"

केबीसी च्या सवयीने त्याने एकदम विचारलं आणि आपण अजून पाय खोलात घातला हे जाणवून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. महत्प्रयासानं राग गिळत जयानं मूळ मुद्दा पुढे रेटला.

"काय हा असा डाग पाडून घेतलाय? परवाच ड्राय-क्लीन करून आणला होता. खास श्वेताच्या आई ने दिलाय तो अभिषेक च्या लग्नात. त्याची तरी आठवण ठेवा"

"अगं बाई, केबीसी मध्ये आज एकाचा वाढ-दिवस होता, त्यांनी मला केक खाऊ घातला त्याचा तुकडा पडला. मी काय मुद्दाम खराब करतो का कपडे?" आधीच त्याला फार थकायला झालं होतं आणि हि बाई काही खायला-प्यायला विचारायचं सोडून ब्लेझरच पकडून बसलीये.

"बरं, काय खायला काय आहे? सॉलिड भूक लागलीये मला.", त्यानं विषय बदलायचा प्रयत्न केला.

"मुगाची खिचडी आणि टोमाटो-सूप", तीनही फार ताणल नाही.

"ओह, शिट. पुन्हा तेच? काही चमचमीत देत जा ना गं कधीतरी. खिचडी, दुधी भोपळ्याचा उकडलेला खीस, पालक अशा पदार्थांचा कंटाळा आलाय. ती कपूरं बघ कशी बटर चिकन झोडत असतात रोज."

"कसे ड्रम झालेत त्यांचे पाहताय ना? घरातल्या घरात वळताना सुद्धा वोल्वो-सारखे मोठाले आरसे बसवायची वेळ आलीये त्यांच्या खांद्यांना, आजूबाजूचं दिसण्यासाठी."

"अतिशयोक्ती करू नकोस, त्यांची अंगकाठीच तशी आहे. त्यांनी शिकरण-पोळी खाल्ली तरी ते तसेच दिसणार"

"पण आपली तब्येत तशी नाही ना. मागच्या ६ महिन्यात ३ वेळा हॉस्पिटल ला दाखल करावं लागलं लक्षात आहे ना?"

"वाटलंच मला तू खायला मागितलं की माझं आजारपण काढणार ते"

"काढू नको तर काय करू? करावं लागतं ते मला. ही महाराणी बाळंतपणाचं कारण दाखवून घरीच बसणार. डिस्चार्ज घ्यायच्या वेळी मिडिया असतो तिथे मात्र पुढे पुढे. एक दिवस मेकप केला नाही की दिसतं सगळ्या जगाला, किती सून दमलीये करून करून ते. दवाखान्यात तुमच्याजवळ रात्र-रात्र जागायची मी आणि हिला साधं रिकामे थर्मास नीट स्वच्छ धुवून पाठव म्हटलं तर फणकारा आला. म्हणे, माझ्या आईनं मला कधी काम सांगायच्या आधीच असं बजावलं नाही"

"अरे देवा, किती बोलशील आणि जरा हळू. ऐकेल नं ती. शिवाय नोकर माणसं घरात असतात."

"ऐकू दे. माझ्याच घरात मीच का घाबरायचं कुणाला?"

"अग्गं बाई, बा...स. मी क्षमा मागतो तुझी. मागे अशीच बडबडली होतीस आणि मला आणि अभीला जाहीर माफी मागावी लागली होती." हिचं म्युटचं बटण कुठे आहे हे त्याला आजतागायत सापडलं नव्हतं.

पण कसं कोण जाणे, जया अचानक गप्प बसली. तिनं पुढे केलेला मँगोशेकचा ग्लास घेत त्यानं विचारलं,
"बरं ते जाऊ दे. मँगोशेक नाही आला अजून? सॉरी, अभिषेक नाही आला अजून?" मँगोशेक एवढी एकच गोष्ट त्याला मनापासून आवडणारी आणि पथ्यातही बसणारी असल्यामुळे त्याची जरा गडबड झाली.

"कुठे गेलाच नाहीये तो. घरीच आहे त्या दोघीनभोवती सारखा. काम नाही धाम नाही. कसं व्हायचं या मुलाचं? परवा धरमजीं बोलत होते फोनवर. त्यांची दोन्ही देवळं पण काही न करता नुसती चकाट्या पिटत असतात आणि कारण नसताना बहिणींना येता-जाता धाक दाखवत बसून असतात. बोलता-बोलता उद्वेगानं तोंडातली कवळी सुटून क्रेडल वर पडली त्यांची आणि फोन कट झाला"

"अगं करतो तो काम. रेंगाळला जरा बायको पोरीमध्ये तर काय झालं? तू का एवढा दुस्वास करतेस?"

"दुस्वास करते मी? मी दुस्वास करते?", एकाच वाक्याचं व्याकरण बदलत ती जवळ-जवळ चालूनच गेली त्याच्यावर. पण इतक्या जवळून (ओंजळीत आरसा घेतल्याशिवाय) त्याचा ६ फूट उंचीवरचा चेहेरा दिसणार नाही हे जाणवून पुन्हा चार पावलं मागे सरली.

"तसं नव्हतं म्हणायचं मला", त्यानं सावरून घ्यायचा प्रयत्न केला. "तुझ्या भावना समजतात मला. पण असं बघ, जरी ती आपली लाडकी नात असली तरी आपण आपली एक रेखा ओढून घ्यावी आणि.." हे बोलता बोलताच त्याला लक्षात आलं की आपण आग विझवायला पाणी ओतायला गेलो आणि त्या बाटलीत पेट्रोल निघालं. समोर पिस्तुल रोखलेलं पाहून गांधीजी म्हणाले तसंच काहीतरी आपल्या तोंडातून आता बाहेर पडणार असं त्याला वाटायला लागलं तोच पुढ्यात कमी शक्तीचा का होईना पण स्फोट झालाच.

"बोला, आता तुम्हीही बोला. ते मिडीयावाले राज्यसभेत पण निर्लज्जपणा सोडत नाहीत आणि तुम्ही घरीही तेच चालू ठेवा. मनी वसे तेच स्वप्नी दिसे हेच खरं"
"अगं रेखा म्हणजे रेष, रेष. लाईन मारावी आपण असं म्हणत होतो मी", पुन्हा त्याला कळून चुकलं की आपलं डावं चाक जितका प्रयत्न करू तितकं रस्त्याच्या खालीच जास्त जातंय.

"सॉरी, मेरे कहेने का मतलब है के अब वो तीनो का एक परिवार है और हमको उसमे एक लिमिट के पलीकडे ढवळाढवळ करणेंका..."

"अधिकार नाही, कळतंय मला", त्याचं वाक्य तोडत ती फुत्कारली. "पण माणसांनी किती स्वतःच्या जगात राहायचं यालाही काही मर्यादा आहेत. माझा नवरा, माझं बाळ आणि भरीत भर म्हणजे फोनवर माझी आई... सारखं दिवसभर तुळूभाषेत गुळु-गुळु चालू असतं. मला काय बावळट समजतात काय?"

"अगं, काही बाळाचं खायचं-प्यायचं विचारात असेल, तुझ्या चुगल्याच करते असं का समजतेस तू?"

"चुगल्या? करूनच पहा म्हणावं. आणि काय हो? मला काय बाळाचं करायला येत नाही? श्वेतीची सासू तर ६ महिने फिरकली नाही दोन्ही बाळंतपणात. कुणी केलं त्यावेळी?"

"अग तिची गोष्ट वेगळी, कसं कळत नाही तुला? ती मुलगी आहे शेवटी"

"वेगळी कशी? आणि तिलाही हिचाच पुळका आहे. मी जरा मन मोकळं करायला तिला सांगायला गेले तर मलाच समजवायला लागली की आता ऐशीलाच तुझी मुलगी समज वगैरे. आणि हिनीही ओळखलं ते माझ्या चेहेऱ्यावरून... नाक वर करत गुणगुणत गेली 'सास गाली देवे, ननद समझा लेवे' करत", कुजकी मेली. नुसतं दिसणं पाहिलं तिथेच चुकलं. बुद्धी जाऊ दे पण मनात माया नसेल तर का....ही उपयोग नाही."

"एक काम करतो मी. आत्ता जाऊन पोरीला दुपट्या-सकट उचलून आणतो. आपण दोघंही जरा फ्रेश होऊ", तिचा त्रागा ओळखून तिला जरा थंड करणं आवश्यक आहे हे जाणून अमिताभ ने व्यवहारी पवित्रा घ्यायचा ठरवला.

"आत्ता नका जाऊ, झोपलीये ती. उठली तर ३ वाजेपर्यंत ठो-ठो करत बसेल, तिचीच मुलगी ती"

"अगं नाही रडत. मी गाणं म्हंटलं की छान झोपेल परत", त्यानं युक्तिवाद चालूच ठेवला

"अजिबात नको. तुम्हाला म्हणा म्हंटलं की आपलं काळ-वेळ-स्थळ नं पाहता बाबुजीकी मधुशाला-मधुशाला चालू करता. मागच्या आठवड्यात असंच तिला केलं आणि पोरगी लागली की सारखी कफ-सायरप च्या बाटली कडे बोट दाखवायला मड्डू-मड्डू करत."

आता मात्र अमिताभ सगळ्या लाईफ-लाईन्स संपल्या सारखा मटकन पलंगावर बसला आणि हतबुद्ध होऊन तिच्याकडे पहात राहिला. त्याच्यातला अँग्री यंग मॅन कधीच वितळून गेला होता पण आता घरी निदान कामावरून आल्यावर हंग्री-ओल्ड मॅनची तरी कीव करावी एवढीच त्याची माफक अपेक्षा होती. उंचापुरा डोंगर खाली बसला होता आणि तळजाई टेकडी त्याच्याकडे 'इतक्यात का डाव मोडलास' अशा नजरेने अनिमिष पहात होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय. आवडलं. Biggrin

"काढू नको तर काय करू? करावं लागतं ते मला. ही महाराणी बाळंतपणाचं कारण दाखवून घरीच बसणार. डिस्चार्ज घ्यायच्या वेळी मिडिया असतो तिथे मात्र पुढे पुढे. >>> Biggrin

देओलांची देवळं ..... Rofl

खास श्वेताच्या आई ने दिलाय तो अभिषेक च्या लग्नात. >>> Uhoh श्वेताच्या सासूने असा बदल करायला हवा.

मन्डळी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Happy होय, श्वेताच्या सासूने असा उल्लेख हवा. आज आणखी एक अपलोड करत आहे...

Pages