इंडिया अगेन्स्ट करेक्शन : २०१४ च्या निवडणुकीसाठी २५ कलमी जाहीरनामा

Submitted by Kiran.. on 4 October, 2012 - 13:01

मी नानांचा फॅन आहे. मी त्यांना अगदी मनसे काका मानतो ते मला पुतण्या मानतात कि नाही कुणास ठाऊक ! पण मी त्यांचा हनुमान आणि ते माझे नाना आहेत. नानांनी विविध प्रश्नांवर मतं मांडून शांत बसण्याच्या प्रवृत्तीवर वस्तरा चालवल्याने माझं मन छिन्नविछिन्न झालं आहे. बास झालं आता !!

नानांनी गेल्या वर्षी उपोषण केलं त्या वेळी नाना बिछान्यात आणि मी टीव्हीवर असायचो. टीव्हीवर सातत्याने बोलायचं असल्याने उर्जेच्या पुरवठ्यासाठी नानांची रसोई उपोषणस्थळाच्या मागेच सुरू केली होती. बाकि नानांनी कसा देश हलवून सोडला हे जसं देशाने टिव्हीवरून पाहीलं तसंच मी ही रसोईत बसून मुर्गमुसल्लम चापताना पाहीलं. पण पुढं काय ? पुढं काहीच झालं नाही.

मध्यंतरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नाना आमच्यावर नाराज झाले. आता पहिल्यासारखे लोक जमत नाहीत. २४ तास मेडीया कव्हरेज मिळूनही पुढच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. सरकार मधे (नानांसारखेच) बेरकी लोक असतील तर चर्चेला कुणाला पाठवणारच नाहीत. उपोषण कितीही दिवस चालू द्या.. दोन महीने जरी उपोषण चाललं तरी प्रॉब्लेम नाही... पण लोकांना संशय येईल ही भीती वाटते. म्हणून उपोषणाला बसणं बिसणं आता मान्य होत नाही. !!

आता कृती हवी. नुसते लिहून काही होणार नाही. ब-याच गोष्टी बदलायच्या आहेत. काही तरी केलं पाहीजे या विचाराने झोप उडाली. सगळा साधकबाधक विचार केल्यावर आपलंही पोट भरलं पाहीजे आणि लोकांचे प्रश्नही मार्गी लागले पाहीजेत असा एकच मार्ग समोर आला तो म्हणजे निवडणुकीचा...!

अनेक वर्षं माबोवर काढल्याने सामाजिक प्रश्नांची सखोल जाणीव आहेच.

सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीमचा भाग व्हा असं कुठल्यातरी मॅनेजमेंट गुरूने फेकलेलं दिलखेचक वाक्यं मनापासून पटलं. सिस्टीमचा भाग व्हायचं तर पवार ताब्यात हवेत.. माफ करा.. पॉवर ताब्यात घ्यायला हवी. म्हणूनच निवडणुकीला उभं रहायचं ठरवलं.

पण मनात हा विचार येतो न येतो तोच नानांनी राडेगण बुद्धी तून फतवा काढला कि माझा फोटु, नाव वापरायचं नाही. माझ्याच नावाची टोपी मलाच घालायची नाही. पण नानांची दुखरी नस ठाऊक असल्याने नाना नाराज झाले कि मी दोन कोटीचं आश्वासन दिलं. पुन्हा एक डाव माफ करा.. दोन खोटीच आश्वासनं दिली. नानांची नाराजी लगेच दूर पळाली आणि ते म्हणले तू टिब्बल च्या विरोधात लढ, मी पाठीशी आहे !

मग नानांच्या साक्षीने हळूच एक कागद बाहेर काढला. नाना म्हणलं " काय आहे हे? "
मी म्हणलं "जाहीरनामा !"
नाना म्हणले , "कसला ?"
मी म्हणलं " लोकसभेच्या निवडणुकीचा "
नाना चमकलं, म्हणलं " सरकार पडलं ?"
मी म्हणलं " तुमाला नसतं का कळलं ? अहो नाना, २०१४ च्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे हा. "
नाना बोळक्याने हसले. आशिर्वाद दिला आणि टीव्हीच्या लोकांकडे निघून गेले. नानांमधे टीव्हीवाले टाईमपास करू लागल्याचं पाहून मी निमिष सौसौदिया कडं पाहीलं निमिषनं लगेच दोन चार फोन केले कि मेडीयाचे लोक नानांना वा-यावर सोडून माझ्याकडं आले.

२०१४ च्या माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्याबद्दल सौसौदियाने चांगलीच हवा केली होती. तरुण टीव्ही पत्रकारांना दम निघत नव्हता. मग आमच्यातर्फे जनरल बी के सिंग यांनी जाहीरनामा जाहीर केला. उद्या पेप्रात छापून येईलच पण मित्रहो, माबोकरांना विसरून कसं चालेल ? नाहीच विसरणार ! आमचा हा जाहीरनामा *** खास माबोकरांसाठी इथेही जाहीर करीत आहोत. आपल्या बहुमोल सल्ल्यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

जाहीरनामा : माबोच्या प्रिय वाचकांसाठी !

१. निवडून आल्यानंतर पहिल्या तासातच जनलोकपाल मंजूर करणार. रामलीला मैदानावर लोकपाल कार्यालय थाटणार.
२. जनलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी गणलोकपाल आणणार (नानांना उपोषणाची संधी देणार नाही)
३. गणलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी (कि)रणलोकपाल (बेदींची) आणणार
४. किरणलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी (भू)षण लोकपाल आणणार ..
५. संसद बरखास्त करून भारत देश विश्वस्त संस्थेकडे सोपवणार. ही विश्वस्त संस्था "चांगल्या" लोकांची असेल. उदा इंडिया अगेन्स्ट करेक्शन. विश्वस्तांवर विश्वास असल्याने राज्यघटनेची गरज राहणार नाही. विश्वस्त ही कायमस्वरुपी संस्था असेल आणि तिचे अध्यक्ष तहहयात या पदावर असतील. विश्वस्तांचे नाव अथवा आडनाव क वरून सुरू व्हावे ही महत्वाची अट असेल.
६. लोकपालामधेच बिनीचे मोहरे अडकल्याने विश्वस्त संस्थेतर्फे सरकार चालवायला देणार. सरकार चालवण्यासाठी दर पाच वर्षांनी जागतिक निविदा काढणार. यामुळे निवडणुकीवरचा खर्च बंद होऊन उलटपक्षी महसूल मिळेल.
७. पेट्रोलचे भाव दोन रुपये लिटर करणार
८. जीवनावश्यक वस्तू महिन्याला ३८ रुपयात देणार
९. श्रीमंतांची संपत्ती जप्त करून तिचं देशप्रेमी नागरिकांमधे (उदा. यमक गांधी ) समान वाटप करणार.
१०. प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देणार. यासाठी ज्या कुटुंबात एका पेक्षा जास्त सदस्य नोकरीत आहेत त्यांची सेवा बरखास्त करणार.
११. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येची कामे त्वरीत व्हावीत यासाठी चिरीमिरी कायदेशीर करणार.
१२. पोलीस खात्यामुळे भ्रष्टाचार वाढत असल्याने हे खाते बंद करण्यात येईल. संपत्तीचे समान वाटप केल्याने या खात्याची गरज राहणारच नाही.
१३. म. नाना पगारेंचा (उपोषणकालीन) स्टीलच्या ग्लासातून पाणी पितानाचा फोटो नवे राष्ट्रपिता म्हणून नोटांवर छापण्यात येईल.
१४. सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार. ओढणीनृत्यास चालना देण्यात येणार.
१६. शासनातर्फे स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल. त्यासाठी घर तिथे असीम आनंद शौचालयाची योजना राबवली जाईल.
१७. ग्रामसभा /खापपंचायतीं/नाना/लोकपाल आदींचे आदेश सर्वोच्च करणार. न्यायपालिका बरखास्त करणार.
१८. राष्ट्रपती भवन राडेगण बुद्धीला हलवणार. मंत्र्यांना मोठी घरे देण्यात येणार नाहीत. आमचे देशप्रेमी वास्तुविशारद नसीम त्रिवेदी यांच्या गाजलेल्या रचनेप्रमाणे आकार असणारी घरे मंत्र्यांना राहण्यासाठी देणार.
१९. प्रत्येक गावात मंदिर बांधणार. काचेच्या ग्लासातून दारु पिऊन येणा-यास मंदिराच्या खांबाला बांधून हाणणार.
२०. लांडगे आणि भटकी कुत्री यांसारख्या महत्वाच्या प्राण्यांची राष्ट्रीय स्तरावर विशेष देखभाल करण्यात येईल. त्यासाठीच नाना पगारेंच्या विरुद्ध बाजूला लांडग्यांचा वॉटरमार्क छापण्यात येईल. दिल्लीतल्या एका विशेष वास्तूत देशभरातली भ.कु. आणून ठेवण्यात येतील. नसीमजींच्या इच्छेप्रमाणे याच वास्तूत मध्यभागी नानांचा छोटासा पुतळा बसवण्यात येईल.
२१. नामदेव बाबा यांना राष्ट्रसंत म्हणून घोषीत करणार.
२२. मेडीकल कॉलेजेस बंद करणार. अ‍ॅलोपॅथीवर बंदी आणणार. संत्रांजली योगपीठातर्फे गाव तेथे योगविद्या या उपक्रमास आर्थिक मदत करणार.
२३. भारतरत्नाऐवजी मेगॅसेसे पुरस्कारास सर्वोच्च पुरस्कार म्हणून मान्यता देण्यात येणार. महत्वाच्या ठिकाणी नेमणुकीसाठी मेगॅसेसे अनिवार्य करणार.
२४. दुस-या स्वातंत्र्ययुद्धाचे धडे इतिहासाच्या पुस्तकात घालणार.
२५. रामलीला संग्रामावर आधारीत "नाना बाबा आणि चाळीत मोर" या माहीतीपटाची निर्मिती करणार.

----------------------------------------------------------------------------------------------------------------
<फॉण्टसाईज>६
*** लोकांनी खरंच निवडून दिल्यास परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. मागाहून तक्रारी चालणार नाहीत.

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे दिव्य लिखाण पाहुन दिव्यत्वाची प्रचिती आली. तुम्हाला दिव्य केतकरांच्या दिव्य पेपरात भरपुर स्कोप आहे. इथे वाया घालवु नका बुद्धीमत्ता.

तुमचे दिव्य लिखाण पाहुन दिव्यत्वाची प्रचिती आली. तुम्हाला दिव्य केतकरांच्या दिव्य पेपरात भरपुर स्कोप आहे. इथे वाया घालवु नका बुद्धीमत्ता.
<<
<<
वरिल प्रतिसादाशी, १००% सहमत..!!

जबरी झालंय.. टोपण नावं तर अफलातून. विनोदी फोडणी असली तरी सामान्य माणसाच्या भाबड्या आशेच्या डोळ्यात तेल उडून होणारी आग जाणवते.

दिल्लीतल्या एका विशेष वास्तूत देशभरातली भ.कु. आणून ठेवण्यात येतील.
जाहीर निषेध! Angry
त्या भ. कु. ना एका वास्तूत ठेवले तर त्यांचे भ. चे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. आणि ते भ. कु. रहात नाहीत. त्यांना आत्तासारखाच मुक्त संचार करू दिला पाहिजे, भुंकून भुंकून लोकांचे डोके उठवण्याचे स्वातंत्र्य पाहिजे, मनात आले तर कुणालाहि चावायचे पण स्वातंत्र्य दिले पाहिजे.
वाटल्यास त्या पुतळ्याभोवती सर्व कबुतरांना एकत्र करून आणून ठेवा. Proud Proud

हे आजच वाचल.... जबरी झालय

विषेश आवडलेले वाक्य

२५. रामलीला संग्रामावर आधारीत "नाना बाबा आणि चाळीत मोर" या माहीतीपटाची निर्मिती करणार.

ह्या एका वाक्या साठी जोरदार टाळ्या..............

किरण.. (इंग्रजी),
प्रथमतःच स्पष्ट करु इच्छितो की मला विनोदाचे वावडे नाही. तुझा बहुतांशी लेख मला विनोद/ सटायर/ ब्लॅक कॉमेडी या प्रकारे आवडला..

पण... मला काही सांगायचे आहे... वाद घालायचा नाहीये वा कोणाची चूकही दाखवायची नाहीये....

देशातील सर्वसामान्य जनतेने आशेने कुणाकडे पाहावे असा एकही नेता नाही, समाजसुधारक नाही ही वस्तुस्थिती आहे.
अशा पार्श्वभूमीवर एकमेव अण्णांनी जी काय उपोषणे केली, आंदोलन केली त्याचे मूल्यमापन मी तरी (काहीही न करणारा किंवा नुसते क्रीटीसाईज करणारा किंवा माझ्याच घरात बसून अण्णा तुम्ही हे करा किंवा करु नका असे फक्त बोलणारा) करु शकत नाही.

भले अण्णांचे प्रयत्न असफल असतील, चुकीचेही असू शकतील पण निदान असे प्रामाणिक प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणून तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच राहील.

अजुन एक.........
.
.

देशाची सगळी धोरणे बाबत प्रत्येक नागरिकाला मोबाईल वर समस वर विचारले जाईल.......आणि त्यानुसार एसएमएस पोल नुसार देशाची धोरणे ठरवली जाईल.......यासाठी एका अतिजलद वृत्तवाहीनीला पारदर्शक टेंडर काढुन काम दिले जाईल

प्रथम आलेले हसू नंतर नाहीसे झाले. लेखाची विनोद-क्षमता पहिल्यांदा उत्तम मग साधारण आणी शेवटी शेवटी पाणचट झाली आहे. त्यामुळे लेखन अयशस्वि झाले आहे. असे फक्त मलाच वाटत आहे का?

हो.

पोरकट, पाणचट आणी मंदबुद्धीचा असा हा लेख आहे. हा वाचल्यावर ना हसु आले, ना उपहास वाटला , ना चीड आली, फक्त लेखकाची कीव आली.

भारतीय तुम्ही गझलेवरचा प्रतिसाद चुकून इथं दिला का ? लेख अत्यंत छान आहे. संडासचित्रं आवडणा-यांन कदाचित पटणार नाही.

चाचा
प्लीज माझ्या अडचणी वाढवू नका. ही दुसरी वेळ आहे सांगायची. मला माबोवर येता येत नाही. या कारणाने यावं लागतंय. मला भारतीय यांचा प्रॉब्लेम माहीत आहे. त्यांची काळजी वाटते. भारतीय तुम्ही प्लीज बरे व्हा. पाठीचं दुखणं चांगलं नाही. कणा आणि मेंदू यांचा जवळचा संबंध आहे हे मी काय सांगायच ? फार वेळ जागत जाऊ नका. खोकल्याची काळजी घ्या. ब्लॉकेजेस कडे नीट लक्ष द्या. तुम्ही बरे असलात तर आम्हाला बरे वाटेल.

सध्या हे असे प्रतिसाद मनावर घेत नाही. संपूर्ण बरे झालात कि बोलू. आरोग्यासाटी शुभेच्छा !

किरणजी
आपण मलाच बोलता नेहमी. पण त्यामागची भावना समजली. इथून पुढे असे आयडीज आणि त्यांच्या अशा विकारयुक्त कमेण्ट्स (एकाच बाफवर या आयडीच्या दोन कमेण्ट्स) दिसल्या तर हा प्रकार अ‍ॅडमिनच्या संमतीने आहे असे खुशाल समजून दुर्लक्ष करावे. मराठवाडी बायको कि पुणेरी गर्लफ्रेण्डचं टेरीफ ( उत्पन्नाचा स्त्रोत) चांगलं चालू असताना असे बाफ बंद पाडणाचा प्रयत्न करणा-यांना कसे माफ करतील ते ? आपण या खेळ्यांना बळी पडू नये. शुभेच्छा !

kiti hi prayatna kela ki asha panchat lekhala reply karayacha nahi pan sahan hot nahi mhanun ha prapancha... lekhakasarkhya lokanna rajakarnacha gatar kelay ashich lok avadat asavet kadachit mhanun pramanik prayatna karanaryanvar tyach gataratla pani takat tras dyaycha kam karanyat dhanyata vatate. IAC tyanchya hi kahi chuka astil (mala actually tyat kahi chukicha vatat nahi) tari pan te hya ghaneradya rajakaranyapeksha 10,000,000 patinne swachha ahet.

Kiran झणझणीत,

पुणे मेट्रोच्या बाफवर पोटतिडीकीने मतं मांडणारे तुम्हीच का, असा प्रश्न पडलाय!

आपल्या लेखातील विनोदनिर्मितीचा हेतू स्पष्ट होत नाही. दोन घटकांची करमणूक व्हावी हा हेतू निश्चितच नाहीये. आपल्याला अण्णांच्या व/वा त्यांच्याभोवतीच्या गोतावळ्याच्या वर्तनातल्या विसंगत्या दाखवायच्या होत्या, तर त्याकरिता ही शैली उपयुक्त नाही. कारण या शैलीतून विसंगतीपेक्षा प्रतिमेकडे (अण्णा, केजरीवाल, किरण बेदी) लक्ष वेधले जाते.

आज सर्वसामान्य जनतेच्या बाजूने कोणीही उभा नाही. अण्णा किंवा रामदेव बाबा यांनी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभे राहायचे धाडस दाखवलेय ते केवळ नैतिक अधिष्ठानाच्या जोरावरच. याच नीतीमत्तेची भ्रष्ट राजकारण्यांना सर्वात जास्त भीती वाटते.

लेखातून अशा नीतीमान लोकांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतल्यासारखी वाटते. आपला तसा हेतू नसेलही कदाचित, पण लोकं नेमका नको तो अर्थ काढतात. म्हणून नीतिवान माणसांच्या चुकांची चर्चा करण्यासाठी आपल्याकडून सुस्पष्ट मतप्रदर्शन अपेक्षित आहे (निदान तुमच्यासारख्या विचारी माणसाकडून तरी).

अधिक काय सांगावे.

आ.न.,
-गा.पै.

Pages