सावलीखेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 3 October, 2012 - 10:39

गझल
सावलीखेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे!
या सुन्या रस्त्यात गर्दी, केवढी माझीच आहे!!

वाटले मी प्रेम ज्यांना, ते मला सोडून गेले.....
होय! मी केला गुन्हा हा! ही सजा त्याचीच आहे!

शांत मी आहे कसा? वाटे मला आश्चर्य माझे!
माझिया गात्रांत नुसती वेदनांची कीच आहे!!

ज्ञान मी छत्तीस वर्षे देत विद्यार्थ्यांस आलो;
ज्ञान हे नुसतेच नाही....चक्क गुरुकिल्लीच आहे!

जिंदगी नुसती नव्हे, मनही तुझ्या केले हवाली!
माझिया हातात आता फक्त ती भक्तीच आहे!!

रंगते जगणे, जसे ते तोंड रंगावे विड्याने!
हे हृदय सद्भावनांची आगळी चंचीच आहे!

मी मला ‘आम्ही’ असे संबोधतो ते याचसाठी
हरघडीला देव असतो सोबती! खात्रीच आहे!

देशसेवा, देशभक्ती, वल्गना अन् घोषणा या.....
आज जो तो लावतो आपापली वर्णीच आहे!

माणसांची ओस पडलेली मला दिसतात हृदये!
जा कधीही तीर्थक्षेत्रांना, तिथे गर्दीच आहे!!

लोक ते मजला खणाया लागले खाणीप्रमाणे!
एवढे कळते.....जगाची चांगली चांदीच आहे!!

झुंज अतिरेक्यांसवे देती किती निधडेपणाने!
कवच नाही, कुंडले ना, पोलिसी वर्दीच आहे!!

भिरभिरे मतल्यातुनी मक्त्यात हे काळीज माझे!
मी अशी गझले! जणू करतो तुझी वारीच आहे!!

मोकळ्या केसांत तुझिया, हे हृदय गुंतू पहाते!
तो तुझा गजरा फुलांचा खोडकर भारीच आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावलीखेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे!
या सुन्या रस्त्यात गर्दी, केवढी माझीच आहे!!

मी मला ‘आम्ही’ असे संबोधतो ते याचसाठी
हरघडीला देव असतो सोबती! खात्रीच आहे!

हे दोन्ही शेर आवडले.

ज्ञानेशजी, धन्यवाद!
बाकीच्या शेरांत काही खटकते आहे काय? काही चुकते आहे काय?
कळवलेत तर मला सुधारणा करता येतील!
>...........प्रा.सतीश देवपूरकर

सावलीखेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे!
या सुन्या रस्त्यात गर्दी, केवढी माझीच आहे!!

मी मला ‘आम्ही’ असे संबोधतो ते याचसाठी
हरघडीला देव असतो सोबती! खात्रीच आहे!

लोक ते मजला खणाया लागले खाणीप्रमाणे!
एवढे कळते.....जगाची चांगली चांदीच आहे!!

<< सबंध गझल अ प्र ति म !

अख्खी गझल निव्वळ अ प्र ती म च !!!

सावलीखेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे ...............
जिंदगी नुसती नव्हे, मनही तुझ्या केले हवाली!..............
मी मला ‘आम्ही’ असे संबोधतो ते याचसाठी.............
जा कधीही तीर्थक्षेत्रांना, तिथे गर्दीच आहे!!...............
एवढे कळते.....जगाची चांगली चांदीच आहे!!...............
हे शेर जास्तच ग्रेट .

मला माझी एक अप्रकाशित गझल आठवली दोन शेर देतोच !!

आजही माझी अवस्था काल होती तीच आहे
आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे !!!!

स्वर्ग म्हणतो "वैभवा ये".... मीच तिकडे जात नाही
जाणतो वैकुंठ माझा भीवरेकाठीच आहे

वारीच आहे हा शेर मला आवडला याचे कारण हे की ...............मी शक्यतो ५ शेर झाले की थाम्बतो
त्या गझलेत पाच शेर झाले होते अन् मग हा काफिया मलाही सुचला होता ...........वारीच आहे... पण मेन्दू थकून गेला होता.............. मी विचार (खयाल) केलाच नाही अन काफिया राहून गेला

आज तुमचा शेर वाचून त्यावेळी काफिया असूनही मी शेर केला नाही याची जी हुरहुर होती ती मिटली

धन्यवाद सर या अप्रतीम गझलेकरिता

-वैवकु

मुक्तेश्वर!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!

वेदनांची कीच म्हणजे वेदनांचा आरडाओरडा!
चंचीचा शेर कसा वाटला? पोचतो ना?
>.........प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा! धन्यवाद प्रतिसादाबद्दल!

आजही माझी अवस्था काल होती तीच आहे!
आजचाही शेर माझा विठ्ठलासाठीच आहे!!.....
वा! वा! अप्रतिम!


स्वर्ग म्हणतो "वैभवा ये".... मीच तिकडे जात नाही;
जाणतो, वैकुंठ माझा, भीवरेकाठीच आहे!...........
सुंदर! खणखणीतच! अभिनंदन!
वारीवरचा शेर करून गझल पोस्ट कर. वाचायला आवडेल! तुझ्या गझललेखनास शुभेच्छा!
टीप: चंचीचा शेर कसा वाटला?
>.........प्रा.सतीश देवपूरकर

चंचीचा शेर कसा वाटला?>>>

पहिली ओळ मस्तच !!

चंचीच......या कवाफीतला बेहतरीन काफिया आहे हा!! आगळावेगळाही .............तीनही अक्षरे 'च' ची आहेत !! मस्त इफेक्ट साधतो हा काफिया !!

अर्थाच्या दृष्टीने मला जरा समजले नाही की विड्याची चंची असते किंवा कसे ? माझ्या माहितीप्रमाणे चंची चुन्या-तंबाखूची असते त्यामुळे विडा-चंची कॉम्बिनेशन तितकेसे भावले नाही............. आपणच योग्य तो खुलासा करावात

शेराचा आशय विषय खूप भावाला अन शेर आवडलाही हे उघडच आहे !!

धन्यवाद Wink

________________________

वारीचा शेर..............
खयाल त्यावे ळी जो अस्पष्टसा सुचलेला तोच जरा पुढे चालवून पाहिला
आता असा एक शेर तयार झाला आहे सर गोड मानून घ्या ......

वाट मी पाहू किती रे ? येच आता विठ्ठला तू !!
वेळ आहे ना जरा ; की आजही वारीच आहे ???

वारीत भक्तांच्या दर्शनासाठी तो २४ तास उभा असतो जराही वेळ नासतो त्याला माझ्याकडे यायला
हे मला माहीत आहे म्हणून तो नेहमी नेहमी हेच कारण सान्गतो आजही वारीच आहे म्हणून

पण आज वारी नाहीये हे मला पक्के माहीत आहे म्हणून आज मी असा प्रश्न केला आहे मुद्दाम की आजही वारीच आहे का रे??........ आज तरी येच मला भेटायला !!

पुनश्च धन्यवाद सर

वैभवा!
चंची म्हणजे विड्याला लागणारे साहित्य ठेवण्याची कप्याकप्यांची अरुंद पिशवी, बटवा.
आमच्या आजोबांजवळ अशी विड्याच्या सामानाची चंची होती.

विड्याचे सामान चंचीत असते म्हणून विडा शब्द आमच्या मनात आला.

विडा आला म्हणून तोंड रंगणे आले.

आम्ही हृदयाला सद्भावनांची चंचीच आहे असे म्हटले

म्हणजे इथे (सहृदयी) माणसाच्या हृदयरूपी चंचीत सद्भावनांरुपी विड्याचे साहित्य जणू असते, असे आम्हाला सुचले.

याच साहित्याचा यथायोग्य वापर केला (योग्य प्रमाणात कात, चुना, पान, तंबाकू/खू, लवंग, विलायची, सुपारी वापरून) म्हणजेच सद्भावनांचा उचित वापर जीवनात केला तर जसा विडा तोंडात रंगतो, तसे माणसाचे जगणेही सद्भावनारूपी विड्याने रंगू शकते, असे आम्ही म्हणतो!

टीप: आम्हालाही कलकत्ता १६०,नवरत्न किवाम, ओली सुपारी (डबल), हे पान/विडा भयानक आवडते! आमच्या कडकलक्ष्मींच्या विरोधाचा बीमोड करून आमची गाडी ठरावीक टप-यांवर थांबतेच व आम्ही हे विडे चघळत बसतो. एकदा का असा तोबरा भरला की, आमची ब्रम्हानंदी टाळी लागून, एकसे एक मिसरे आमच्या रंगलेल्या तोंडातून ईश्वरकृपेने झरझर बाहेर पडतात व लगेचच गाडी बाजूस घेवून ते मिसरे वरच्या खिशातील चिठोरगीवर आम्ही तात्काळ लिहून ठेवतो, म्हणजे विस्मरणाचा धोका टळतो व नंतरच्या दिवसभरातल्या फावल्या वेळेत चिंतनाला व गुणगुणायला खुराकही उपलब्ध होतो.

त्यामुळे चंचीचा शेर असाच एक विड्याचा/पानाचा तोबरा भरल्यावर परवा, तात्काळ आम्हास स्फुरला! चंची काफिया मनात आल्या आल्या हा शेर car चालवताना सुचला व लगेच गाडी बाजूस घेवून तो आम्ही लेखणीबंद करून टाकला!
विडा हा आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने हा शेर सुचायला काहीही वेळ लागलाच नाही. जणू ‘चंचीच’ हा काफिया शेर बरोबर घेवूनच आमच्या मनात चमकला!

वैभवा! अंदरकी बात तुला सांगतो. ब-याचवेळा असे काफिये शेर घेवूनच आमच्या मनात थैमान घालतात. पण, आम्ही अत्यंत काटेकोरपणे त्यांना हजारोवेळा गुणगुणून, चिंतन करून, मगच त्यांचा स्वीकार करतो. माझ्याच शेरांना मी अनेक पर्याय देवून पहातो व मग अत्यंत निर्दयीपणे मला त्या पर्यायांधून निवड करावी लागते. कोणत्याही शब्दांच्या प्रेमात वहावत न जाता हे निष्ठूर काम करावे लागते.

अशा वेळी जिवाची होणारी उलघाल, होणा-या निर्मितीच्या कळा आनंदाने सोसतो, व मग येतो असा एक क्षण, जेव्हा आमचा आतील आवाज फक्त आणि फक्त एकाच बिनतोड पर्यायाला अखेर संमती देतो व आम्ही त्याचा प्रसन्नचित्ताने स्वीकार करतो, व मग आम्ही आमच्या पांडुरंगाचे मनोमन आभार मानतो व परत आमचे अव्याहत गुणगुणणे सुरू होते! असो.

वैभवा! मूड लागला म्हणून ही निर्मितीची प्रक्रिया पाल्हाळ लावून सांगितली!

तुझा विठ्ठलाचा, वारीचा शेर छान आहे. पण तो वाचल्या वाचल्या मला वारीचा शेर सुचू लागला, कसा ते सांगतो................

आम्ही देवमामींना, त्यांचा मूड ठीक असल्याचे पाहून, अगदी सहज विचारल्याचा अविर्भाव चेह-यावर आणून, विचारले...........काय हो, वारीला वारीच का म्हणतात?
आमच्या हुश्शार देवमामींनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले, ‘आहो जिथे जिथे वारंवारता असते तिथे वारीच असते!’ वैभवा, तुला सांगतो, देवमामींच्या तोंडातून पांडुरंगच बोलला व आमचे अंगांग क्षणात शहारले व दुस-याच क्षणात पांडुरंगाने हा शेर आमच्या झोळीत टाकला, तो असा..............
(वैभवा, आम्ही चंतन कसे करतो, ते तुझ्याशी shareकरावे वाटले, म्हणून या आमच्या पाल्हाळाचा प्रपंच!)

पहा हा शेर वैभवा!

माझिया हृदयात विठ्ठल! माझिया श्वासांत विठ्ठल!
हा न श्वासोछ्वास नुसता......चालली वारीच आहे!!

आभारी आहे विठ्ठला!!

>.............प्रा.सतीश देवपूरकर
..................................................................................

चंचीचा शेर कसा वाटला? पोचतो ना?
>> शेर छानच आहे .
मला वाटते सद्भभाव असा चंचीत साठवुन ठेवल्यापेक्षा सर्वांसाठी खुला असणे उत्तमच की नाही
असो.

लै भारी वारी सर !!!

आता वारीचा अजून एक अर्थ सान्गतो .........
वारकरी वारी करतात त्यान्च्याकरता वारी = गावपासून पंढरी अन पंढरीपासून पुन्हा गावापर्यन्तचा प्रवास !!
आम्हा पंढरपूरकराना वारी म्हणजे ते ४-८ दिवस ज्यात वारकरी पंढरपुरात वास्तव्यास असतात
वारकर्‍याना वारी ८-१५ दिवसाची (जितका वेळ गावापासून पंढरी अन पंढरीपासून पुन्हा गाव गाठायला लागेल तितका वेळ)
आम्हाला (मी + समस्त पंढरपूरकर्+विठ्ठल्+रखुमाई+चन्द्रभागा + इत्यादी सगळे मिळून = आम्ही !!:)) वारी चारच दिवसान्ची ,
अशा चार वार्‍या वर्षाला भरतात शिवाय १५ दिवसाची (शुक्ल पक्ष) अन अधिक मासाची वेगळीच त्यात चातुर्मास हाही वेगळा..........दसरा दिवाळी उन्हाळ्याची सुटी नाताळची वगैरे ........मग काय विठ्ठल 24 x 7 बीझी असतो बिचारा !!;)

मुक्तेश्वर!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
हृदयाला सद्भावनांची चंची असे आम्ही का म्हटले ते सांगतो...........

माणसाचे हृदय हे भावभावनांचे उगमस्थान मानतात, जिथे अनेक ब-यावाईट भावना निर्माण होत असतात.

आम्हाला मात्र हृदय हे सद्भावनांचे उगमस्थान वाटते.

हृदय हे भावभावना साठविण्याचे ठिकाण नसून, ते एक जिवंत उगमस्थान आहे.

जसे विडाप्रीय लोकांसाठी विड्याची चंची हे त्यांच्या विड्याला लागणा-या साहित्येचे उगमस्थान असते. ते लोक सतत ही विड्याची चंची सोबत ठेवतात. मूड/तल्लफ आली की, त्या चंचीतून सुपारी काढून कातरतील, पान, तंबाखू आदी साहित्य वापरून एक विड्याचा तोबरा भरून छान पैकी रंगतात.

इथे हृदय हे सद्भावनांचे उगमस्थान आहे. त्या सद्भावनांचा सुयोग्य वापर करून माणूस जीवनात रंग भरू शकतो अशी कल्पना आहे.

हृदयरूपी चंची म्हणजे फक्त साठवणुकीचे साधन असे शेरात म्हटलेले नाही.

सद्भावनांचा उचित वापर म्हणजे माणूस योग्य ठिकाणी सद्भावना व सौजन्य दाखवितो.

दुष्टांसमोर/दुर्जनांसमोर सद्भावना वा सौजन्य यांचा काय उपयोग?

सद्भावनांचा यथोचित वापर दैनंदिन जीवनात करणे, म्हणजेच त्या भावना सर्वांसाठी खुले करणे नव्हे काय मुक्तेश्वर!

पहा पटते का?

.............प्रा.सतीश देवपूरकर
...........................................................................................