संयुक्ता मुलाखत : मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट दीपाली देशपांडे

Submitted by अगो on 3 October, 2012 - 05:31

संयुक्तातर्फे दर महिन्याला एका यशस्वी, कर्तबगार स्त्रीची ओळख आपण करून घेत असतो. काही महिन्यांपूर्वी मनात आलं की मायबोलीवरही आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे जम बसवलेल्या अनेकजणी असतील, त्यांची मुलाखत वाचायला सर्वांनाच आवडेल. लगेच एक नाव डोळ्यांसमोर आलं ते दीपाली देशपांडे उर्फ मायबोलीवरची आपली ’दीपांजली’ हिचं. आपला छंद, कला व्यवसायात बदलण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं. दीपाली त्या भाग्यवंतापैकी एक! मायबोलीवर वेळोवेळी होणार्‍या गप्पांमधून दीपाली ’मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट’ आहे हे बर्‍याचजणांना माहीत असेल. तिच्या मेंदीने सजवलेल्या सुरेख मेणबत्त्याही खूप जणांनी पाहिल्या असतील, विकत घेतल्या असतील. ह्या क्षेत्रातली तिची वाटचाल, व्यवसायाला आकार देण्यासाठी घेतलेले कष्ट, वेगवेगळी मतं आणि अनुभव ह्याबद्दल ह्या गप्पांमधून जाणून घेऊयात.

दीपाली मूळची पुण्याची. चित्रकलेचा वारसा तिला मिळाला तो तिच्या आई आणि आजीकडून. दीपालीलाही चित्रं काढायची खूप आवड. कॉलेजात असताना ती सिरॅमिक किंवा म्युरल पेंटिंग्जही काढत असे. चित्रकलेकडून ती मेंदीकडे वळली ते मात्र अगदी गमतीदार पद्धतीने. दीपालीची बारावीची सुट्टी चालू असताना तिच्या बहिणीचं लग्न ठरलं. त्यावेळी तिच्या आईने आणि बहिणीने सुचवलं की वेळ आहेच तर तिने रीतसर मेंदी शिकायला जावं आणि जमलं तर बहिणीच्या लग्नात हिनेच मेंदी काढावी. त्याप्रमाणे दीपाली पुण्यातल्या पद्मा व्यास ह्यांच्याकडे शिकायला जाऊ लागली आणि मेंदी काढणं तिला आवडून गेलं, जमलं. अशा प्रकारे तिची बहीण हीच तिची पहिली क्लाएंट ठरली.

एकीकडे बीएस्स्सी आणि इंटीरियर डिझाइनच्या कोर्सचा अभ्यास करता करता दीपाली अनेक मेंदीच्या स्पर्धांमधून भाग घेऊ लागली, बक्षिसं मिळवू लागली. त्या स्पर्धांमधलं तिचं काम पाहून तिला ’रविवार सकाळ’ च्या पुरवणीमध्ये एक पूर्ण वर्षभर मेंदीवर इत्थंभूत माहिती देणारं सदर लिहायची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. अर्थात तरीही त्यावेळी मेंदी काढणं हा तिचा छंदच होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खाजगी कंपनीत इंटीरियर डिझायनर म्हणून नोकरी करायलाही तिने सुरुवात केली. मुळात वेगळ्या क्षेत्रात करियर करू पाहणार्‍या दीपालीने 'मेंदी आर्टिस्ट' हाच पूर्णवेळाचा व्यवसाय कसा स्वीकारला ? साहजिकच मुलाखतीला सुरुवात करताना हाच प्रश्न पहिल्यांदा पुढे आला.

छंद हाच आपला पूर्णवेळ व्यवसाय होऊ शकतो अशी जाणीव तुला कधी झाली ?

खरं सांगायचं तर भारतात असताना मी मेंदी काढायला सुरवात केली तेव्हा- कॉलेजमध्ये असतानाच- इच्छा झाली पण पूर्ण वेळ यात लक्ष घालू शकतो ही जाणीव अमेरिकेत आल्यावर झाली कारण मेंदी ही फक्त 'लग्न समारंभांपुरती किंवा त्वचेवर कलाकुसर करण्याइतकी' मर्यादित नाही हे मला इथे आल्यावर शिकायला मिळालं.
कॉलेज मध्ये असतानाही भरपूर काम असायचं पण अर्थात त्या वेळी अभ्यासाकडे लक्ष द्यायचं म्हणून मी स्वतःच माझं काम मर्यादित ठेवलं होतं. बीएससीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी एक वर्ष रविवार सकाळ साठी 'रंग मेंदीचे' सदर लिहायचे, त्या वेळी तर भरपूर ऑर्डर्स यायच्या पण कॉलेज सांभाळून जेवढं झेपेल तेवढं काम करायचे. काम दररोज नसलं तरी मजा यायची आवडत्या कामात बिझी राहायला. इतर मुली ज्या वयात आई बाबांकडून पॉकेटमनी घ्यायच्या त्यावेळी मी पॉकेटमनीसाठी तर नाहीच अवलंबून राहिले आई-बाबांवर; या शिवाय माझी मी टू व्हीलर घेतली, पेट्रोल, गाडीचा मेंटेनन्स वगैरे स्वतःचा स्वतः मॅनेज करायचे. नंतर इंटीरिअर डिझायनर म्हणून नोकरी करताना सुद्धा मी एकीकडे मेंदी काढणे चालूच ठेवले होते पण जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा मात्र नव्याने शिक्षण घेऊन जॉब करण्याऐवजी माझ्या आवडत्या क्षेत्रात स्वतःसाठी काम करायची जाणीव मला झाली आणि सुदैवाने यशही मिळाले.

मग सुरुवातीला अमेरिकेत ह्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी तू काय विशेष प्रयत्न केलेस?

भारतात असताना बहुतेक वेळा लग्नाच्या मेंदीच्या ऑर्डर्स घ्यायचे. कुठून सुरवात करायची विचार केल्यावर पहिल्यांदा 'साऊथ एशिअन क्राऊड’ला डोळ्यांसमोर ठेवलं. तेव्हा मी सॅनफ्रान्सिस्को येथील बे एरियात राहत होते. मग मी त्या भागातल्या सगळ्या इंडियन ब्युटी पार्लर्सशी संपर्क साधला, माझे अल्बम त्यांना नेऊन दाखवले, फ्लायर्स, बिझनेस कार्डस् तयार केली. अशा प्रकारे इंडियन स्टोअर्स, इंडियन ब्युटी सलोन्स, ईद-करवा चौथ फेस्टिवल पासून सुरवात केली. मग लक्षात आलं की साऊथ एशियन सोडून इतरही कल्चरच्या लोकांना मेंदी खूप आवडतेय. हे सगळं करत असताना मला साधारण २००४ मध्ये ’हेना पेज’ नावाचा फोरम इंटरनेटवर मिळाला. कॅथरीन कार्टराइट जोन्स चालवत असलेल्या ह्या 'हेना फोरम' वर अमेरिकन आर्टिस्टस् ना मी भेटले आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करताना, नवीन कल्चर्सचे इव्हेंट्स करायला लागल्या पासून कितीतरी नवीन गोष्टी कळल्या, माझ्या कलेला नवीन वळण मिळालं !

सर्वसामान्यपणे मेंदी म्हटलं की कुयर्‍या, मोर असलेली पारंपारिक भारतीय नक्षी किंवा मग मोठ्ठी ठळक फुलं,पानं असलेली सुटसुटीत अरेबिक नक्षी हेच डोळ्यांसमोर येतं. मेंदी काढताना वापरल्या जाणार्‍या वेगवेगळ्या प्रचलित शैली आणि त्यांची वैशिष्ट्य ह्याबद्दल थोडक्यात सांगू शकशील का?

पारंपारिक भारतीय-राजस्थानी मेंदीमध्ये अर्थातच भारतीय शुभचिन्हांचा आणि भारताच्या परंपरांचा वापर दिसतो. जसे फळांचा राजा आंबा कोयरीच्या स्वरूपात फक्त मेंदीच नाही तर इतरही अनेक कलांमध्ये दिसतो. आपला राष्ट्रीय पक्षी आणि पौराणिक कथांमध्ये सरस्वती, कार्तिकेय यांचे वाहन म्हणून प्रसिद्ध असलेला पक्ष्यांचा राजा मोर देखील मेंदी आणि इतर अनेक पारंपारिक भारतीय कलांमध्ये दिसतो. इतर कलांमध्ये पटकन आठवणारे उदाहरण म्हणजे 'पारंपारिक पैठणी' आणि तिच्या पदरावरचा 'मोर नाचरा' ! लग्नातल्या प्रसंगांची झलकही दिसते त्यात दुल्हा दुल्हन, वरात, सात फेरे, सनई चौघडे अशा 'बिग फॅट' इंडियन वेडिंग्जची चित्रं दाखवतात. इतर शुभचिन्ह जसे स्वस्तिक, कलश देखील दिसतात. संस्कार भारतीच्या रांगोळी सारखे 'फिलर पॅटर्न्स' भारतीय मेंदीतही दिसतात.

Indian wedding in mehendi.jpg

अरेबिक मेंदी म्हणजे फुला पानांची नक्षी (मुस्लिम संस्कृतीत माणसांचे चेहरे, प्राणी, पक्षी हे मेंदीत निषिद्ध आहेत कारण प्राणीमात्रांचे जीवन 'अल्लाह' निर्माण करतो असा विश्वास, या खेरीज नमाज पढताना हे आकार हातावर असलेले चालत नाहीत). इंडो अरेबिक म्हणजे पारंपारीक भारतीय आणि अरेबिक बोल्ड पॅटर्न्स चा संगम. गल्फ स्टाइल म्हणजे अरेबिक पेक्षा जास्त बोल्ड फुलं पानं आणि ठिपक्यांचं शेडिंग. राजवाडी मेंदी म्हणजे राजेशाही लग्नातले विधी, दुल्हन बनलेली राणी, हत्तीवरची वरात हे सगळं. मोरक्कन म्हणजे भौमितिक डिझाइन्स, प्रसिद्ध हामसा (हॅन्ड ऑफ फातिमा-इव्हल आय प्रोटेक्शन सिंबॉल). तुर्कस्थानच्या डिझाइन्स मध्ये टाइल आर्ट मध्ये दिसणारे ओट्टोमन डिझाइन पॅटर्न्स.

खूपच छान माहिती दिलीस गं दीपाली. ह्यातली कुठली शैली तुला विशेष आवडते?

मोर, कोयरी, दुल्हा दुल्हन, वरात, सनई चौघडे ही टिपीकल डिझाइन्स ह्यांना तर कायम मागणी असतेच पण नवीन काहीतरी करायला नेहमीच मजा येते. मला पारंपारिक भारतीय (राजस्थानी डिझाइन्स) चे एलेमेंट्स घेऊन 'बॉडी आर्ट' स्टाइल मेंदी काढायला आवडते. उदा. हातावर किंवा पायावर दिसणारे मोर, कोयरी, राजस्थानी मिनिएचर्स जेव्हा पाठीवर, पोटावर किंवा खांद्यावर काढते ते मला दिसायला जास्त आवडतंच. याशिवाय मला बॉडी आर्ट मध्ये जास्त 'एरिया' मिळतो आणि मी त्यात खूप तपशील भरु शकते. भारतीय शैलीचं इतर शैलींबरोबर कॉम्बिनेशनही आवडतं (जसे इंडो अरेबिक, इंडो मोरक्कन, इंडियन + 'गल्फ' स्टाइल कॉम्बिनेशन). पारंपारिक मेंदीमध्ये बॉडी पेंटिंगचे निरनिराळे रंग वापरुन केलेलं कॉम्बिनेशन पण आवडतं, शेडेड मेंदी ( टू टोन कलर स्कीम) चे प्रयोग खूप आवडतात. फेस्टिवल्स, टिन एज पार्टीज, ग्रॅज्युएशन पार्टीज, प्रॉम नाइटस् मध्ये पॉप्युलर असे ड्रॅगन आणि इतर 'ट्रायबल' डिझाइन्सना सुद्धा थोडा इंडियन टच दिलेला आवडतो.

मला स्वतःला कुठलंही डिझाइन काढताना 'निगेटिव्ह स्पेस' चा वापर खूप आवडतो आणि महत्त्वाचा वाटतो ज्यामुळे मुख्य नक्षी उठून दिसते. नुसतीच भरगच्च नक्षी काढायला मला तितकी मजा येत नाही.
Negative space in mehendi.jpg

ही झाली माझी स्वतःची आवड पण खरी मजा/आव्हान असतं जेव्हा कस्टमर डिमांडिंग असेल त्या वेळी. मला वेगळी फर्माइश करणारे, मला माझ्या स्वतःच्या कंफर्ट झोन मधून बाहेर काढणारे डिमांडिंग कस्टमर्स आवडतात, त्यांच्या बरोबर काम करताना खूप मजा येते. जसे नुकत्याच एका लग्नाची मेंदी काढली जिथे नवरा नवरी दोघं एमिरेट्स एअरलाईन्सचे 'फ्लाईट अटेंडंटस्' होते. त्या मुलीने एअरलाईनचा लोगो मेंदी मध्ये अ‍ॅड करायला सांगितला. अजून एका नवरीने पारंपारिक हत्ती घोड्यांच्या वराती ऐवजी 'लिमोसिन' वाली वरात काढायला सांगितली.

तू आत्ता बॉडी आर्टचा उल्लेख केलास. आपल्याकडे जास्त करून हातापायावरच मेंदी काढून घेतली जाते. ही कला ’बॉडी आर्ट’ म्हणून वापरताना तू काही वेगळे प्रयोग करतेस का?

मेंदी 'बॉडी आर्ट' म्हणून काढून घ्यायची असेल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात. रंग तळहात आणि तळपाया इतका पटकन आणि सहज शरीराच्या इतर ठिकाणी असलेल्या त्वचेवर येत नाही. 'स्ट्रेटम कॉरनियम' चा थर (त्वचेच्या सर्वात वरच्या आवरणाचा डेड सेल्सचा लेयर) जितका जाड तितका रंग गडद. सर्वात पातळ स्ट्रेटम कॉरनियम असलेल्या भागांवर (कपाळावर, डोळ्याच्या आजूबाजूला, गाल, ओठ, नाक,मान इ.) रंग अजिबात चढत नाही. खांदा, दंड, पाठ, पोट, छातीवर मध्यम गडद आणि मनगट-मांड्या-पाया वर बर्‍यापैकी गडद रंग चढतो. सर्वात गडद रंग अर्थातच तळपाय, तळहात, पावलांवर चढतो. बॉडी आर्ट म्हणून मेंदी काढून घेणार्‍यांना मी त्यांना ज्या समारंभाला मेंदी हवी त्याच्या किमान तीन दिवस आधी मेंदी काढून घ्यायला सांगते.
मेंदीचा रंग गडद होणे ही मुळात 'ऑक्सिडेशन' प्रोसेस आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी केशरी दिसणारा रंग दोन दिवसांनी गडद मरुन दिसायला लागतो. बॉडी आर्ट म्हणून मेंदी काढून घेणार्‍यांना मी हेअर-ड्रायरच्या मीडियम हीटिंग सेटिंग वर त्वचा उबदार ठेवायला सांगते ज्यामुळे फिकट रंग गडद होण्यास मदत होते. मेंदीचा बॉडी आर्ट म्हणून वापर करताना मेंदी बरोबर इतर रंगांची रंगसंगतीही सुंदर दिसते. बॉडी आर्ट ला उठाव यावा म्हणून परफॉर्मरच्या ड्रेसशी रंग मॅच होणारे बॉडी पेंट्स, सोनेरी चंदेरी बॉर्डर्स अशा अनेक रंगांशी खेळायला मजा येते.

Body art resized.jpgबॉडी-आर्ट म्हणून मेंदीचा वापर हे तर इंटरेस्टिंग आहेच पण तू इतरही अनेक सुंदर, नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतेस. तुझ्या मेंदीचे डिझाइन्स असलेल्या सुरेख मेणबत्त्या मायबोलीवर प्रसिद्ध आहेतच. तर तुझ्या ह्या आगळ्यावेगळ्या प्रयोगांविषयी सांग ना?

मी मोरक्कन, तुर्कस्थान येथील कलाकारांना मेंदीचा निर्जीव गोष्टींवर वापर करताना अनेक कलाकृतींमध्ये पाहिलं. लँपशेड, ड्रम्स, डफली, सिल्क अशा अनेक गोष्टींवर केलेल्या कलाकृती पाहिल्या. ओल्या मेंदीचा एक रंग म्हणून वापर करायची कल्पना मला आवडली कारण ओल्या मेंदीने काढलेल्या नक्षीचा '३ डी' इफेक्ट खूप आवडतो म्हणून मी मेंदीने सजवलेल्या मेणबत्त्या, बुकमार्क्स, सिल्क अशा गोष्टींचे प्रयोग केले.

Mehendi experiments.jpgअमेरिकेत व्यवसाय करत असल्याने तुझ्या क्लाएंट्समध्ये अनेक अभारतीय लोकांचाही समावेश होतो. अर्थातच लग्न, मुंज, बारशी ह्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे कार्यक्रम करायची संधी तुला मिळते. तर त्याबद्दल आम्हाला सांग ?

मी लॉस अ‍ॅन्जेलेसला आल्यापासून भारतीय कार्यक्रम कमी आणि मल्टिकल्चरल इव्हेंट्स जास्त करते. प्रत्येक इव्हेंटमधून मला स्वतःला निरनिराळ्या देशांच्या मेंदी संबंधित परंपरा आणि त्या त्या देशाच्या विविध परंपरा समजतात, नवीन शिकायला मिळतं. भारत आणि पाकिस्तानी लग्नांइतकीच मोरक्कन, इजिप्शिअन, पर्शियन मुस्लिम, पर्शिअन, ज्युविश, तुर्की, अफगाणी अशा इतर अनेक लोकांमध्ये 'मेंदी नाइट' करतात. निरनिराळ्या देशांमधल्या लोकांना मेंदीचं महत्त्व विचारताना एक कॉमन गोष्ट लक्षात येते, मेंदीचं स्थान महत्त्व हे बर्‍यापैकी विघ्नहर्ता श्रीगणेशासारखं आहे, 'शुभ गोष्टींचा वर्षाव करणारी, वाईट शक्ती दूर ठेवणारी'. मेंदी नाइटने लग्नाच्या समारंभांची सुरवात करणे म्हणजे कार्याची 'शुभ सुरुवात'! 'पवित्र मेंदी' लावल्याने आता सगळ्या वाईट गोष्टी, वाईट नजर, सैतानी शक्तींचा नाश होऊन आयुष्यात शुभ गोष्टींचा वर्षाव होणार असा बर्‍याचशा देशांमध्ये समज आहे. एका इजिप्शियन आज्जींनी बोलताना सांगितलं की मेंदी नाइटला नववधूप्रमाणे इतर सगळ्या बायकांना मेंदी लावतात कारण सैतानी शक्ती (evil eye ) नववधूचा शोध घेत नजर लावायला आल्या तर नववधूला ओळखणार नाहीत कारण सगळ्याच बायकांच्या हातावर मेंदी बघून सैतानी शक्तीचाही गोंधळ होईल की ह्यातली नक्की नववधू कुठली आणि हे बघून वाईट नजर निघून जाईल (कोणालाही नजर न लावता). अशा अनेक गमतीशीर गोष्टी ऐकायला मिळतात.

Mehendi on hands.jpg

लग्नांशिवाय बेबी शॉवर (डोहाळे जेवण), बर्थडे पार्टीज, ब्रायडल शॉवर (अमेरिकन स्टाइलचे केळवण), ग्रॅज्युएशन पार्टीज, प्रॉम नाइट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, जुलै फोर्थ पार्टीज (अमेरिकन स्वातंत्र्य दिनाला होणार्‍या बार्बेक्यु अ‍ॅन्ड फायरवर्क पार्टीज), सुपरबोल गेम पार्टीज, बॅट मिट्झ्वाह-बार मिट्झ्वाह (बॅट मिट्झवाह म्हणजे ज्युविश लोकामध्ये मुलीच्या १२ वा वाढदिवसाला आणि बार मिट्झ्वाह म्हणजे मुलाच्या १३ व्या वाढदिवसाला साजरा होणारा मुंजी सारखा अतिभव्य समारंभ) अशा अनेक इतर समारंभांना मी मेंदी काढायला जाते. पाकिस्तानी लग्न समारंभांत तर बर्‍याच गोष्टी भारतीयच वाटतात. पारंपारिक मराठी लग्नांसारखा हिरवा चुडा, हळदीचा समारंभ आणि पिवळ्या सिल्कच्या साड्या, भारतीय पंजाबी लोकांकडे वाजणारी पारंपारिक मेंदीची गाणी, बॉलीवूड म्युझिक हे सगळं बघून कुठल्या दुसर्‍या देशाचा लग्न समारंभ चालू आहे असं वाटतच नाही.

इतके वेगवेगळे कार्यक्रम तू करतेस. तुझ्या क्लाएंट्सबद्दलच्या काही खास आठवणी सांग ना आम्हाला?

ह्याविषयी लिहायला लागले तर अनेक पुस्तकांची पानं भरतील. प्रत्येक कार्यक्रमाची आठवण खास असते, अनेक अनुभव मनात घर करतात. १९ वर्षापूर्वी पहिल्यांदा हातात कोन धरला तेव्हा कधी काळी हॉलिवूड इंडस्ट्री मधल्या इव्हेंट्स साठी मेंदी काढीन असं स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं! आठवणी खरंच किती सांगेन तेवढ्या कमी आहेत. मी आत्ता इथे फक्त कॅलिफोर्निया मध्ये इव्हेंट्स करतानाचे काही किस्से सांगते कारण भारतापासून सुरवात केली तर खरंच पुस्तकांची अनेक पानं पण अपुरी पडतील.

कॅलिफोर्नियामध्ये निरनिराळ्या देशांमधून आलेले लोक भरपूर आहेत. गेल्या ११ वर्षात मी मुख्यतः सॅन फ्रॅन्सिस्को बे एरीया, लॉस अँजलिस, लास व्हेगास, नॉर्थ कॅरोलिना या भागात इव्हेंट्स केले. सध्या माझे वास्तव्य लॉस अँजलिसला आहे. इथे भेटणारे निरनिराळ्या संस्कृतीचे लोक, त्यांच्याकडून मिळणारा मानसन्मान, प्रेम, आपुलकी, भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड आदर, उत्सुकता हे भारावून टाकणारं असतं. साऊथ एशियन देशांपेक्षाही इतर कल्चरच्या इव्हेंट्स मधले लोक जास्त गप्पा मारतात. त्यांना मेंदी, सिंबॉलिझम, भारतीय संस्कृती, भारतीय फॅशन्स सगळ्या बद्दल खूप उत्सुकता असते आणि खूप गप्पा मारायला आवडतात. दुसर्‍याच्या संस्कृतीबद्दल इतका आदर-सन्मान अगदी शिकून घेण्यासारखा असतो इथे इव्हेंट्स करताना. पर्शिअन समारंभातले आलिशान शामियान्या सारखे सेट अप्स, उंची गालिचे, भारतीय लग्नांमध्ये अनुभवायला मिळणारे 'करण जोहर' च्या सिनेमात शोभतील असे झगमगीत समारंभ, ज्युविश बॅट मिट्झ्वाह पार्टीज मधली 'रेड कार्पेट' स्टाइल एक से एक फॅशनेबल गर्दी, लॉस अँजलिसच्या आसपासच्या समुद्र किनार्‍यावर 'शानदार प्रायव्हेट बीच हाउसेस' मध्ये होणारे कार्यक्रम, हॉलिवुड आणि मॉडेलिंग जगतातल्या नामवंत लोकांकडचे ग्लॅमरस समारंभ, बेली डान्सर्स आणि इतर स्टेज परफॉर्मर्ससाठी बॉडी पेंटिंग करणे, हे सगळं अनुभवणं खरंच अद्भुत असतं आणि ते मला अनुभवायला मिळतं, मी माझं काम एंजॉय करते म्हणून मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते !
Mehendi hands.jpg

कधी कधी इतर देशातले लोक मला मुद्दाम 'पारंपारिक भारतीय ड्रेस' घालून यायची विनंती करतात. मी भारतीय आहे आणि 'भारतीय दिसते' म्हणून जेव्हा इतर देशातले लोक मलाच प्राधान्य देतात, पारंपारिक भारतीय डिझाइन्स काढून घेतात हे बघून फार सही वाटतं. पहिल्यांदा मी हॉलिवुड इंडस्ट्री मधला इव्हेंट केला तो एका आईने मुली साठी दिलेली बर्थ डे पार्टी. त्या बाईंचं व्यक्तिमत्त्व इतकं प्रचंड इंप्रेसिव होतं, बघताक्षणी कोणालाही आदर वाटावा असं. अर्थात मी कुठल्याही क्लायंट कडे जाताना त्या व्यक्ती विषयी थोडा 'होमवर्क' करून जाते तसा करून गेले होते. पण जरी नसते करून गेले तरी ती अतिशय कर्तृत्ववान स्त्री आहे हे कोणीही सांगू शकेल. साधी राहणी पण अगदी अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्त्व. त्या बाई लहान मुलांच्या कार्टून आणि इतर शोजच्या निर्मात्या, मूव्ही मेकर, या खेरीज कोलंबिया पिक्चर्सच्या एक प्रेसिडंट, वॉर्नर ब्रदर्सच्या एक एग्झ्केटिव्ह, ऐतिहासिक चार्ली चॅप्लिन स्टुडिओच्या ओनर. त्यांच्या घरी असलेली 'वाड्या सारखी अंतर्गत सजावट बघून मला खूप आश्चर्य वाटलं. जर पत्ता 'बेव्हर्ली हिल्स, कॅलिफोर्निया' नसता, मला थेट घराच्या आत सोडलं असतं तर पुणे-३० पत्ता म्हणून पण खपून गेला असता. थोडक्यात बाह्यभाग 'बेव्हर्ली हिल्स, कॅलिफोर्निया ९०२१० ' आणि आतून 'पुणे ४११०३०' ! त्यांनी मला जेव्हा सांगितलं की मी आणि माझ्या मुलीने तुझी निवड फार चोखंदळपणे केलीये तेव्हा मला इतका प्रचंड आनंद झाला, त्यांनी सांगितलं की 'वी वॉन्टेड समवन ऑथेंटिक नॉट समवन हु डज बटरफ्लाईज अ‍ॅन्ड ड्रॅगन टाइप डिझाइन्स !

नुकत्याच एका अपकमिंग हॉलिवूड मूव्ही कॅरेक्टर साठी 'टॅटु स्लीव्ह' काढली तो अनुभवही मजेदार होता. तो अ‍ॅक्टर कम प्रोड्युसर माझ्याच घरी आला होता टॅटु काढून घ्यायला, मी टी.व्ही लावू का विचारल्यावर लगेच म्हणाला की बॉलीवूड मूव्ही असेल तर लाव. मी माझ्या डीव्हीआर वर असलेला 'बँड बाजा बारात' लावला तर तो सिनेमा बघताना त्याने इतके अनंत प्रश्न विचारले. मजा येते हॉलिवूडच्या लोकांची बॉलीवूडबद्दल मतं ऐकताना.
अजून एका प्रसिद्ध टिन एज मालिकेतल्या कलावंताला खांद्यावर आणि पाठीवर मेंदी काढली होती, त्याच्या आईच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त, त्याची डिझाइन काढून घ्यायची कल्पना पण मला आवडली, भारतीय डिझाइन ज्यात वुमन पॉवर, आई या पैकी काही तरी मोटिफ असावा अशी त्याची कल्पना होती. मी त्याला दुर्गामातेचा चेहरा काढून दिला आणि ते त्याला खूप आवडलं. तो मुळात ब्रिटिश नट होता आणि क्रिकेटचा चाहता होता. वर्ल्ड कपनंतर अगदी थोड्या दिवसांनी ही अपॉइंटमेन्ट होती, त्याच्याशी क्रिकेट आणि बॉलिवूड च्या गप्पा मारताना खूप धमाल आली.
Durga tattoo.jpg

अजून एका हॉलिवूड मूव्ही अ‍ॅन्ड म्युझिक प्रोड्यूसर, NBA team owner कडे ४ जुलै च्या (अमेरिकन स्वातंत्र्य दिनाची पार्टी) मेंदी समारंभाचा अनुभव पण छान होता. सुप्रसिद्ध मालिबु बीचवरचे प्रायव्हेट बीच एरिया असलेलं त्याचं घर, तिथे केलेला पार्टीचा आलिशान सेट अप, त्याने बीच वर अरेंज केलेली फटाक्यांची आतिषबाजी हे तर कुठल्या सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस नव्हतं. आनंद याचा होतो की अशा मोठ्या समारंभांमध्ये येणारे मोठे लोक माझ्याकडून मेंदी काढून घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबतात, माझा मेंदीबूथ सर्वात जास्त हिट असतो.
गंमत म्हणजे जेव्हा माझे मोठे इव्हेंट्स शनिवारी किंवा सुट्टीच्या दिवशी असतात, मी कधी कधी नवर्‍याला ’साइन इन लिस्ट’ मॅनेज करायला 'बूथ मॅनेजर' म्हणून घेऊन जाते, या इव्हेंटला आणि नंतर अनेक इव्हेंट्सना लोक त्याला चक्क त्यांचा नंबर पुढे लागावा म्हणून लाच देत होते, मला इतकं प्रचंड हसू आलं ते पाहून. या क्लायंटला आणि त्याच्या कुटुंबाला माझं काम इतकं आवडलं की त्यानंतर त्यांनी मला तीनदा बोलावलं वेगवेगळ्या समारंभांना, आता ते मला 'फॅमिली हेना आर्टिस्ट' म्हणतात.

काही महिन्यांपूर्वी केलेला 'अमेरिकन पाकिस्तानी पीस कॉन्सर्ट' इव्हेंट फार लक्षात राहण्यासारखा होता. मला आधी वाटलं होतं की पाकिस्तानी आणि अमेरिकन दोन्ही प्रकारची लोकं असतील, पण त्या इव्हेंट ला १००% लोक अमेरिकन होती जी काहीनाकाही कारणाने पाकिस्तानी कल्चर आणि तिथल्या संगीताने भारावलेली होती. यातले बरेच लोक संगीत शिकायला म्हणून पाकिस्तानात जाऊन राहून आले होते आणि फार भारावलेले होते. त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता की लोकांच्या मनात असलेले प्रसारमाध्यमं दाखवत असलेलं चुकीचं चित्रं खरं नाही, पाकिस्तानी सामान्य जनता कशी शांतताप्रेमी आहे वगैरे. हे झाल्यावर मला अजून एक धक्का म्हणजे शुद्ध अमेरिकन लोकांचा 'कव्वाली प्रोग्रॅम'. सगळे नुसरतच्या कव्वाली गात होते, बर्‍यापैकी भाषेचा अभ्यास वगैरे करून, बरेच चांगले उच्चार होते. मला खरं सांगायचं तर थोडं विचित्रच वाटत होतं की इतकं स्वातंत्र्य अनुभवणार्‍या अमेरिकन बायकाही कशा काय रुढीप्रिय मुस्लिम राष्ट्राबद्दल इतक्या भारावून बोलतात.
मी त्यांना विचारलं तर म्हणे 'वी ऑल कम फ्रॉम ब्रोकन फॅमिली, तिथे जॉइंट फॅमिलीज आणि लोकांचं आदरातिथ्य आवडलं' म्हणे. असो, पण काही म्हणा तो कार्यक्रम खरंच फार वेगळाच अनुभव होता.
इव्हेंट्सच्या निमित्ताने निरनिराळ्या आणि थोड्या वेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या मुलींशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. अ‍ॅड फिल्म मेकर्स, स्टिल फोटोग्राफी, एडिटिंग, मॉडेलिंग,स्पेशल इफेक्ट मेकअप आर्टिस्ट, रिअ‍ॅलिटी शो प्रोड्यूसर्स, बेली डान्सर्स अशा एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीतल्या मुली तर भेटतातच पण यु.एस.आर्मीच्या मुली, हॉर्स ट्रेनिंग इन्स्टिट्युटची मालक, घोड्यांना परफॉर्म करायचं ट्रेनिंग देणारी मुलगी अशा विविध क्षेत्रातल्या मुलींना कामानिमित्त भेटणे हे अनुभव फार मस्त होते.

खरंच तुझ्या व्यवसायामुळे किती वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो तुझा. त्यातले काही तर अगदी विशेष कारणाने लक्षात राहत असतील ...

हो, सर्वात टचिंग आणि आयुष्याकडे बघायचा सकारात्मक दृष्टीकोन शिकवणारा अनुभव म्हणजे नुकत्याच काढलेल्या कॅन्सर पेशन्टच्या 'डोक्यावरच्या मेंदी डिझाइन' चा. किमोथेरपीने केस गेलेली ती ५६ वर्षाची स्त्री इतका सळसळता उत्साह घेऊन आली होती. मी उगीच नर्व्हस झाले होते आधी, पण ज्या क्षणी तिला भेटले त्या क्षणापासून तिने मला निरनिराळे किस्से ऐकून इतकं हसवलं म्हणून सांगू. अशा व्यक्तींकडून मिळणारं 'अ‍ॅप्रिसिएशन, कौतुक' हा आनंद केवळ शब्दांपलीकडचा. नंतर तिने माझ्या 'दीपालीज हेना आर्ट' या फेसबुक पेजवर जाऊन एक खूप छान नोट ही लिहिली , 'माझ्या टक्कल पडलेल्या डोक्याला इतक्या काँप्लिमेंट्स मिळाल्या' सांगणारी तिची ती नोट खरंच सतत वाचत राहावी असं वाटतं. मी जो आनंद त्या कॅन्सर पेशंट कडून कौतुकाची थाप, जादू की झप्पी मिळवल्यावर मिळवला तसा आनंदाश्रू आणणारा अनुभव मला खरंच उभ्या आयुष्यात इतर कुठल्या गोष्टीसाठी झाला नाही.

Mehendi on head1.jpgगरोदरपणात पोटावर केलं जाणारं ’बॉडी पेंटिंग’ हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवं. ते करण्याचा अनुभवही तुझ्या गाठीशी आहे ना?

नऊ वर्षापूर्वी मी पहिल्यांदा 'प्रेग्नंट बेली' वर मेंदी काढली तो अनुभव अतिशय अनपेक्षित आणि यूनिक होता.
मी कॉनकेव्ह चपट्या पोटावर टॅटू मिरवणार्‍या मुली भरपूर पाहिल्या होत्या पण नवव्या महिन्यात 'बेबी शॉवर साठी' वाढलेल्या पोटावर मेंदी काढून घेणारी माऊली पहिल्यांदाच पाहिली त्यावेळी. येणार्‍या बाळासाठी शुभ म्हणून आणि खास प्रेग्नन्सीची आठवण जपायला ती मेंदी काढून घ्यायला आली होती. मेंदी चालू असताना आतल्या बाळाने किती तरी वेळा किक मारली, हे सगळं अनुभवणं फार नवीन होतं मला. नंतर मग असे खूप इव्हेंट्स केले आणि अभिमानाने गरोदरपण मिरवणार्‍या, बेली टॅटु काढून घेणार्‍या अनेक माता भेटल्या. फार सही वाटली मला गरोदरपणाची सुरेख आठवण जपायची ती कल्पना.

अजून एक लक्षात राहिलेला अनुभव एका आगळ्यावेगळ्या भारतीय बेबी शॉवर अर्थात 'गोद भराई'चा. एका नॉर्थ इंडियन घरी असलेल्या या मेंदी पार्टीत पाहुणे मात्र बरेचसे अमेरिकन होते. पारंपारिक गोद भराईमध्ये काय विधी असतात हे सांगायची जबाबदारी होती नवरोबांची. त्यांनी माईक हातात घेऊन काय विधी आहेत हे सांगितलंच, पण त्याहून छान वाटलं त्यांनी केलेला पारंपारिक विधींमधला एक बदल. त्यांनी सांगितलं की सुनेची ओटी भरणे मुळात घरातल्या लग्न झालेल्या बायका करत पण बदलत्या काळानुसार आपणही बदलायला हवं म्हणून आज ज्यांना कोणाला इथे येऊन माझ्या बायकोला शुभाशीर्वाद द्यायची इच्छा असेल त्या सगळ्यांनी माझ्या बायकोची ओटी भरा, स्त्रिया- पुरुष सगळ्यांनी! ओटी कशी भरायची याचं प्रात्यक्षिक सासूबाईंनी दाखवलं आणि खरोखरच सगळ्या अमेरिकन जनतेने, अनेक पुरुषांनीही होणार्‍या आईची ओटी भरून 'गोद भराई' साजरी केली.

तुझे अनुभव ऐकताना लक्षात येतंय की जनसंपर्क हा तर ह्या व्यवसायाचा पाया आहे. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी हसतखेळत, त्यांच्या कलाने घेत काम करायचं ही सोपी गोष्ट नाहीच ...

मेंदीमुळे मी इतके लोक जोडले आहेत, इतक्या लोकांच्या शुभेच्छा, कौतुक मिळवलंय हे मला माझ्या आर्थिक कमाईपेक्षा खूप जास्त प्रिय आहे. बहुतेक मेंदी पार्टीज मध्ये किती तास काम करायचं त्या हिशोबाने (per hour) दर आकारते, त्यामुळे मेंदी काढताना कोणीही कितीही आग्रह केला तरी खाण्या पिण्याचे ब्रेक घेत नाही, स्नॅक ब्रेक सुद्धा घेत नाही, अशावेळी इव्हेंट होस्ट अगदी जेवण भरवायलाही येतात, अगदी सौजन्याने लाजवून टाकतात. पाकिस्तानी कार्यक्रमांमध्ये जाते तेव्हा ते मुद्दाम सांगतात की बीफ नाहीये, शाकाहारी जेवण आणलंय तुझ्यासाठी.

मी स्वतः इव्हेंट्स करताना प्रोफेशनॅलिझम,कोणाशी कसे बोलावे,कुठल्या इव्हेंट साठी कसे काँट्रॅक्ट बनवावे, कुठल्या इव्हेंटला कोणते मुद्दे कॉन्ट्रॅक्ट मध्ये अधोरेखित करावे, मेंदी बूथ कसा सेट अप करावा, कुठल्या संस्कृतीच्या लोकांना काय आवडतं हे काम करता करताच शिकले, अजूनही शिकते.

इतक्या लोकांशी संवाद साधताना ’व्यक्ती तितक्या प्रकृती’ ह्या उक्तीचाही प्रत्यय येत असेल ना ...

आता तर लोकांच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघून लोकांची टेस्ट पण ओळखता यायला लागलीये. एक गंमत सांगते, (यात कुठल्या कल्चर वर रिमार्क मारायचा उद्देश नाही,सहज एक गमतीशीर निरीक्षण सांगतेय. )
बहुतेक वेळा भारतीय-पाकिस्तानी लोकांची आवड असते: भरगच्च, मोठी दिसणारी डिझाइन्स .. 'गिव्ह मी मोअर' अ‍ॅटिट्यूड !
ज्युविश्-अफगाणी आणि मिड्ल इस्टर्न लोकांची आवड : म्हणजे 'भला उसकी मेंदी मेरी मेंदीसे बेहतर कैसे' टाइप, थोडक्यात 'गिव्ह बेटर डिझाइन दॅन व्हॉट द अदर गर्ल जस्ट गॉट'
चायनीज-जॅपनीज-कोरियन : नाजूक आणि अचूक, जसं चित्रात दिसतंय तस्सं..लाइन बाय लाइन .. थोडक्यात 'गिव्ह मी डेलिकेट, एग्झॅक्ट्ली हाउ इट लुक्स इन कॅटलॉग'
अमेरिकन लोकांची आवड आणि त्यांच्याबरोबर काम करणे सर्वात सोपं: तू कलाकार आहेस, तूच ठरव मला कुठलं डिझाइन शोभून दिसेल, थोडक्यात 'आय बिलिव्ह इन आर्टिस्ट्स फ्रीडम, डू व्हॉटेव्हार यू थिंक इज राइट फॉर मी!'
टीन एजर मुलींना बॉडी आर्ट डिझाइन मध्ये बॉय फ़्रेंडचं नाव गुंफायचं असतं. पुरुषांना सामान्यत: ड्रॅगन्स, ट्रायबल बँड्स, बोल्ड फ्लेम डिझाइन्स हवी असतात.

अमेरिकेत पर्सनल हायजिन,स्वच्छता ह्याबद्दलचे नियम अगदी काटेकोर असतात. व्यवसाय करताना काही विशेष खबरदारी घ्यावी लागते का?

देश कुठलाही असो, नियम असोत किंवा नसोत, जितकी कलाकुसर जितकी महत्त्वाची तितकीच 'स्किन सेफ्टी'. मी खालील काही गोष्टी फक्त व्यावसायिक खबरदारी म्हणून नाही पण मेंदी काढणार्‍या/काढून घेणार्‍या सगळ्यांनाच सांगू इच्छिते. आपण वापरत असलेली मेंदी ही १००% नैसर्गिक असावी, मेंदी मध्ये घालतो ती तेलंही चांगल्या प्रतीची 'इसेन्शिअल ऑइल्स' असावीत. मेंदी भिजवताना त्यात जे घटक वापरलेत त्याची पूर्ण माहिती ग्राहकांना द्यावी, जर शक्य झालं तर आधी त्यांना कन्सल्टेशन, टेस्ट डिझाइन साठी बोलवावं. सायट्रस अ‍ॅलर्जी असलेल्यांना मेंदी मध्ये लिंबाचा रस घालता कामा नये, निरनिराळ्या वासाची अ‍ॅलर्जी असणार्‍यांना कुठली तेलं वापरलीयेत, ती त्यांना चालतात का याची खात्री करून घ्यावी. गरोदर स्त्रियांना मेंदी काढताना निलगिरी किंवा लवंगाच्या तेलासारखी तीव्र वासाची तेलं वापरू नयेत, त्या ऐवजी 'लॅव्हेंडर ऑइल,टी ट्री ऑइल' वापरावं. अस्थमा असणार्‍यांना शक्यतो लवंगाचं तेल वापरू नये. लहान मुलांच्या नाजूक त्वचेवर मेंदी काढताना विशेष खबरदारी घ्यावी, शक्यतो पाच वर्षापेक्षा लहान मुलांच्या हातावर मेंदी काढू नये, मेंदीत वापरली जाणारी तेलं त्यांच्या त्वचेसाठी खूप स्ट्राँग होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे para-phenylenediamine (PPD) युक्त अतिशय हानीकारक, दुष्परिणामांनी भरलेली 'काळी मेंदी' कोणाच्याही स्किन वर कधीही वापरू नये. नैसर्गिक मेंदीचा रंग गडद होण्यासाठी यायला कमीत कमी आठ तास तरी लागतात, जर बाजारातली एखादी मेंदी डार्क इन्स्टंट रंग देण्याचा दावा करत असेल तर सावधान. तयार कोन्स घेतानाही खबरदारी घ्यावी, दुकानांमध्ये वर्षानुवर्षे पडलेले कोन जर रंग देत असतील तर ते नक्कीच रसायनयुक्त आहेत कारण नैसर्गिक मेंदी जर डीप फ्रीझरच्या बाहेर राहिली तर फार फार तर दोन दिवस रंग देऊ शकते. तेव्हा तयार कोन्स घेताना एखाद्या मेंदी काढणार्‍या व्यावसायिकाने चांगल्या प्रतीची मेंदी आणि तेलं वापरून बनवलेले फ्रेश कोन घ्या, ते कधी केलेत, काय काय घटकद्रव्यं मिसळलेली आहेत ह्याची जरूर खात्री करून घ्या.

मेंदी सुकल्यानंतर लावायचे लिंबू-साखर वापरताना एकाच कापसाचा बोळा सगळ्यांवर वापरू नये, प्रत्येकासाठी वेगळा कापूस वापरावा आणि वापरल्यावर लगेच कचर्‍यात टाकावा. शक्य झालं तर स्प्रे बॉटल्समध्ये लिंबू-साखर वापरा. बॉडी पेंटिंग करताना कुठलेही रंग उचलून त्वचेवर प्रयोग करू नका. खास त्वचेसाठी बनवलेले 'कॉस्मॅटिक ग्रेड' ची उत्पादनं घ्या (जसे रंगीबेरंगी आयशॅडो पावडर, शिमर पावडर, वॉटरप्रुफ आय लायनर्स). नुसतीच किंमत बघितलीत तर ती कॉस्मॅटिस्कची जास्त असेल पण आपल्या त्वचेवर वाट्टेल ते प्रयोग करण्याइतकी त्वचा आणि आयुष्य तर नक्कीच स्वस्त नाही ना ? भारतात सर्रास कॅमलिनचे कागदावर वापरायचे किंवा फॅब्रिक पेंट्स बॉडी पेंटिंगला वापरताना पाहिलंय, अगदी लहान मुलांच्या त्वचेवर पण तेच !
मी परत परत तेच सांगेन की सहापेक्षा लहान मुलांच्या अंगावर कुठलेच टॅटुज काढून घेऊ नका आणि मोठ्यांच्या पार्टीज मध्ये कॉस्मॅटिक ग्रेडचीच उत्पादनं वापरा.
अमेरिकेमध्ये असाल तर मेहरॉन, बेन नाय या खास थिएटर मेकअपसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनींचे ग्लिटर्स आणि एच डी (हाय डेफिनेशन मेक अप) मेक साठी प्रसिद्ध असलेल्या मेक अप फॉरेव्हर, मॅक सारख्या कॉस्मॅटिक कंपन्यांचे ग्लिटर पिग्मेन्ट्स त्वचेसाठी सुरक्षित आणि दिसायला प्रचंड उठावदार असतात.

'मेंदी आर्टिस्ट' हा व्यवसाय म्हणून स्वीकारताना हातातले कौशल्य ही सगळ्यात प्राथमिक गरज आहे. पण व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, टिकून राहायचं असेल तर अजून कुठले गुण असायला हवेत असं तुला वाटतं?

कले बरोबर 'संयम' असणं महत्त्वाचं आहे. ध्यानाला बसू तसं चुळबूळ न करता एका जागी बसून काम करायची अतिशय मूलभूत गरज मेंदी काढताना असावी लागते आणि एखाद्या कुशल सर्जनसारखा 'स्टेडी हँड' ही असावा लागतो. याशिवाय जेव्हा तुम्ही व्यवसाय म्हणून मेंदी काढता तेव्हा व्यावसायिकता फक्त कामातून नाही तर वागण्यातूनही दिसले पाहिजे. मृदुभाषी असणे अतिशय महत्त्वाचे आहेच पण कुठे अ‍ॅटिट्यूड दाखवायचा आणि कुठे नम्र असावे लागते हे पण जोखता आले पाहिजे. इव्हेंट्समध्ये कोण महत्त्वाचं आहे हे माहीत करून घेता आलं पाहिजे आणि त्याचवेळी जर तिथला एखादा पाहुणा तुमच्या आजूबाजूला घुटमळण्याने तुम्हाला त्रास होत असेल तर योग्य शब्दात समज देता आली पाहिजे. हे झालं काम करताना, पण मुळात काम कसं मिळवलं पाहिजे ते पण मॅनेज करता आलं पाहिजे.
'वर्ड ऑफ माउथ' मुळे बिझनेस येतोच पण तरीही नेटवर्किंग, मार्केटिंगचे बेसिक्स तरी शिकावे लागतात. नुसतीच कला असून उपयोग नाही, तुम्ही काय करता आणि कोण आहात हे लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे. ह्यासाठी स्वतःची वेबसाइट, फेसबुक पेज, येल्प, गुगल लोकल बिजनेस लिस्टिंग आणि जिथे शक्य असेल त्या सगळ्या इव्हेंट प्लॅनर्स च्या प्रेफर्ड व्हेंडर लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे!

ह्या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणार्‍यांना तू काय सल्ला देशील?

मेंदीला इतर व्यवसायांसारखं गांभीर्याने घ्या. तुम्ही कुठल्या प्रकारच्या मेंदी कार्यक्रमांमध्ये जास्त रस /स्पेशलाइझ करता त्या शैलीचा अभ्यास करा, सिंबॉलिझम बद्दलही रिसर्च करा. मोठे कार्यक्रम करताना प्रत्येक ग्राहकाच्या प्रश्नांची उत्तरं देताना थकून जाल, अशा वेळी सर्व साधारणपणे लोकांना पडणार्‍या प्रश्नांची प्रिंटेड 'FAQ-Mehendi aftercare' ची पत्रकं बनवून प्रत्येकाला द्या. कुठलाही इव्हेंट करत असताना कधीही रेसिस्ट, वर्णद्वेषी विधानं करू नका, गॉसिपिंग, फोन घेणे, ड्रिंक्स घेणे अशा गोष्टी टाळा. ज्या इव्हेंटला जातो त्याची माहिती करून घ्या, शक्य झालं तर तुमच्या ग्राहकाविषयी थोडी फार माहिती मिळाली तर करून घ्या, ज्या इव्हेंटला जातो त्या होस्टशी किंवा इव्हेंट प्लॅनरशी बोलून अपेक्षित ड्रेस कोड माहिती करून घ्या. याशिवाय वर दिलेले हायजिन आणि मार्केटिंग चे मुद्दे पण लक्षात घ्या. कॉपी राइट अ‍ॅक्टचा सन्मान करा, कधीही इतर आर्टिस्टने काढलेल्या मेंदीचे फोटो स्वतःचे म्हणून खपवू नका. कुठल्याही व्यवसायात लागतो तो प्रामाणिकपणा असणे महत्त्वाचे आहे. "नेव्हर प्रॉमिस यू कान्ट डिलिव्हर", जे तुम्ही करू शकत नाही ते करण्याची आश्वासनं देऊ नका. सतत नवीन गोष्टी शिकायची तयारी ठेवा, एन्जॉय व्हॉट यू डू...गुड लक !

दीपालीशी भरभरून गप्पा मारताना लक्षात येत होतं की तिच्या कामाविषयीची तिची पॅशन किती जबरदस्त आहे. तिच्या कले वर तिचं मनापासून प्रेम आहे आणि ती कला जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी लागतील तितके कष्ट घेण्याची तिची तयारी आहे. केवळ व्यवसाय करायचाय म्हणून ती मेंदी काढत नाही तर मेंदी काढायला आवडते म्हणून आज ती ह्या व्यवसायात आहे. म्हणूनच आज तिचं स्थान ती यशस्वीरीत्या तयार करू शकलीय. अमेरिकेतल्या मासिकांमधून तिचे लेख प्रसिद्ध झाले आहेत तसेच २००५ साली तिने लिहिलेल्या ’ग्लोरी ऑफ हेना’ ह्या ई-बुकला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. www.gloryofhenna.com हे दीपालीचे स्वत:चे संकेतस्थळ आहे तिथे तुम्ही जरूर भेट देऊ शकता. पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी माझ्या आणि सर्व मायबोलीकरांच्या वतीने दीपालीला मन:पूर्वक शुभेच्छा !

Colourful mehendi.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे ! काय कला आहे. खरंच, मेंदीला नुसती घराघरातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवलय दिपालीने. दिपालीच्या उत्तम व्यावसायीक वृत्तीला आणी माणसे जोडण्याच्या कलेला तसेच दुसर्‍याला भरभरुन देणाच्या वृत्तीला पण सलाम. तिला पुढील वाटचालीकरता हार्दीक शुभेच्छा.

छान मुलाखत घेतलीय अगो. धन्यवाद.

खूप छान झाली आहे मुलाखत..खूप दिवसापासुन हे सगळे जाणुन घ्यायची इच्छा होती..धन्स अगो..आणि दीपाली..यु आर सिंपली ग्रेट!

खुप छान जमलीय मुलाखत! दिपालींचे काम आधी इथे बघितले होतेच पण त्याचा अवाका एवढा मोठ्ठा असेल ह्याची कल्पना नव्हती. आपल्या बागेतली मेहंदी अमेरिकेच्या गार्डन मधे रुजवल्याबद्दल त्यांचे खुप कौतुक आणि खुप शुभेच्छा!!!

अतिशय सुरेख आणि विस्तृत मुलाखत.
खूप आवडली.

दिपांजलीला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! Happy

डीजे, यु रॉक!
तुझी अशीच खूप खूप प्रगती होवो! तू आमची मैत्रिण आहेस हे सांगून आमचीप्ण कॉलर ताठ होते! Happy

वॅाव ! सही. अप्रतिम सुंदर. खुप खुप आवडली सगळी डिझाइन्स. खरे तर अजुन वाचुन झाली नाही मुलाखत. पणनुसते फोटो बघुनच प्रतिसाद द्यावा वाटला. खुप सुरेख. Happy
अगो धन्यवाद, आपल्यातल्याच एका कलाकाराची ओळख करुन दिलीस Happy
बाकी प्रतिसाद मुलाखत वाचून देते'

मस्त मुलाखत... धन्यवाद अगो!
डीजेने तिच्या अनुभवांचे पुस्तक लिहिणं 'अनिवार्य' आहे.

अगो,
दिपाली ची आवड आणि व्यवसाय असलेल्या मेहंदी रेखाटनाचे विविध पैलु उत्तम रितीने मांडले आहेंत...त्याबद्दल दोघींचेही अभिनंदन !!

अरे! ही मुलाखत येणार आहे हे माहितच नव्हते ! मस्त !! आम्ही बे एरियात असताना, सुरुवातीला जॉब करत नव्हते त्या काळात मी डीजे च्या काही ईवेन्ट्स ना तिच्या बरोबर गेले आहे. फार कमी वेळा, पण तेवढ्यात जे अनुभव आले तेही लक्षात राहिलेत ! Happy

अप्रतिम.... फार सुरेख मुलाखत..... अप्रतिम कलाकुसर..... उत्तम व्यावसायिक द्रुष्टीकोन....

आपल्यातलेच हिरे हुडकुन संयुक्ताने एक वेगळं पाउल उचललं आहे... त्या बद्दल अभिन्दन....

दिपांजली थोर आहात....तुमच्या व्यावसायिक पणाची कमाल आहे... तुमचे अनुभव ही मस्तच...

मस्त मुलाखत.

केवळ व्यवसाय करायचाय म्हणून ती मेंदी काढत नाही तर मेंदी काढायला आवडते म्हणून आज ती ह्या व्यवसायात आहे. म्हणूनच आज तिचं स्थान ती यशस्वीरीत्या तयार करू शकलीय.>> बेस्ट!

मोहन कि मीरा +१०
सुंदर मुलाखत...प्रचंड कष्ट पण आहेत आनि ... अभिनंदन तुझ
तुझ्याकडे पाहुन बाकीच्यांच नक्कीच भारतीय महिलांविषयी छान मत बनत असेन Happy
शुभेच्छा तुला Happy

डीजे, इतके दिवस ओझरते माहिती होते आज पुर्ण कल्पना आली, एक नंबर कलाकार आहेस तू.
खुप विस्तृत मुलाखत. Happy
पुढच्या सगळ्या वाटचालिस खुप खुप शुभेच्छा.

डीज्जेच्या कलेइतकीच देखणी, मस्त मुलाखत! दीपांजली, तुझे खरेच खूप कौतुक वाटते. कला आणि व्यावसायिकता यांचा सुंदर मेळ तुला जमला आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! आणि अगोचेही थँक्स या मुलाखतीबद्दल! Happy

सध्या वर वर चाळली आहे मुलाखत.
हा प्रतिसाद फक्त फोटोतल्या ऑसम डिजाइन्स साठी देतोय. Happy
डिट्टेल वाचतोच. डिजेची मुलाखत इन्टेरेस्टिन्ग असणार ह्याची खात्रीच आहे. Happy

मस्त मुलाखत. खुप आवडली.पुढील वाटचालीस शुभेछा.
दीपांजली तुझे हात नाहि ग दुखुन येत एवढ्या लोकांच्या हातावर मेहेंदि काढुन???

मस्त मुलाखत!!
डीजे.. डिझाइन्स तर अप्रतिम आहेतच नी ़किस्से पण भन्नाट .. खुप शुभेच्छा Happy
(अवांतर - आय विश तु माझ्या विपुला प्रतिसाद दिला असता तर प्रत्यक्ष भेट झाली असती .. मी LA मधेच होते)

Pages