तुझीच नौका, तुझ्याच लाटा, तुझी हवा अन् तुझाच वारा!

Submitted by सतीश देवपूरकर on 27 September, 2012 - 10:50

गझल
तुझीच नौका, तुझ्याच लाटा, तुझी हवा अन् तुझाच वारा!
निदान माझ्या कलेवराला तरी मिळू दे तुझा किनारा!!

अशाच एका भ्रमात माझी तमाम मी वाटचाल केली.....
लकाकतो माझियाचसाठी, कुठे तरी दूर एक तारा!

नका मला तारकांत मोजू, नका लळाही जिवास लावू;
तुटायची वेळ जाहलेला लकाकतो वेगळाच तारा!

तनास तगडे करावयाला कितीक आहेत औषधे ती.......
मनातुनी जो अपंग असतो, मिळे न त्याला कुठे सहारा!

मिटून डोळे करोत पापे, हिशेब होईल सर्व त्यांचा;
कधी समजणार लोक? त्यांच्यावरी कुणाचा तरी पहारा!

तमाम आयुष्य ऊब, माया, दिली मुलांना अखंड छाया!
परंतु निवृत्त काय झालो, मलाच ना राहिला निवारा!!

कसेबसे बाल्य संपले अन् निघून गेले तसेच यौवन......
अजून नुसत्या स्मृतींमुळेही तनामनावर उठे शहारा!

कितीकदा दार वाजवोनी निघून गेला असेल मृत्यू!
अजून मी आवरीत आहे समस्त माझाच हा पसारा!!

न रंग आहे, न रूप आहे, न कोणत्याही बड्या उपाध्या!
तरी कसा प्रेक्षणीय वाटे, जगास माझाच हा पिसारा?

हरेक दिवशी नवीन गझला! जगास आश्चर्य काय वाटे?
तुझ्या कृपेचा कटाक्ष आहे, म्हणून फुटतो मला धुमारा!

अशी दिशाभूल ते जगाची उगाच नाही करीत होते;
दहा दिशांना सदैव त्यांचा पहा कसा वाजतो नगारा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरेक दिवशी नवीन गझला! जगास आश्चर्य काय वाटे?
तुझ्या कृपेचा कटाक्ष आहे, म्हणून फुटतो मला धुमारा!>>>>>>>>>>>>>> Lol

अशाच एका भ्रमात माझी तमाम मी वाटचाल केली..
लकाकतो माझियाचसाठी, कुठे तरी दूर एक तारा!

क्या बात है..
सुंदर शेर! अतिशय आवडला.

ज्ञानेशजी, विजयराव!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
आपल्या मौलिक मार्गदर्शनाची मला जाणीव व आदर आहे.
मतला कसा वाटत आहे?

कारण मतला माझ्या मर्जीप्रमाणे असल्याशिवाय मी पुढे सरकतच नाही.
बरेचवेळा मतला व एखादा शेर लिहून, माझ्या कित्येक गझला, कित्येक वर्षे सुद्धा अवधानाने वा अनावधाने अपूर्णच राहिलेल्या असतात. योग्य वेळ व मूड लागल्याशिवाय मला लिहावेसेच वाटत नाही. मतला तर अक्षरश: हजारो वेळा कित्येक दिवस गुणगुणून मग पुढे सरकायचे की नाही, हे ठरवतो.
कधी कधी कंटाळून, मुक्तक करतो किंवा सुटा शेरच ठेवतो. कधी खूपच मूड लागला तर रुबाई लिहून होते. रुबायांविषयी आपणास काही माहिती असेल तर कृपया सांगाल का?

टीप: मी एक तरहीसाठी म्हणून ओळ सुचवली होती. पहाल का? कशी वाटते ती ओळ? अशी ओळ आपण सुचवू शकतो काय? की, ओळी आधीच ठरल्या आहेत?
मी सुचवलेली ओळ अशी होती..........
‘आले रडू तरीही रडता मला न आले!’
..........प्रा.सतीश देवपूरकर

अवांतर: ज्ञानेशजी, प्रलय शब्दाबाबत व एकंदरीत काव्यातील लयीबाबत आमचे मुक्तचिंतन जयंता५२च्या गझलेवर लिहिले आहे. पहाल का?

मतल्याविषयी माझे मत देतो,

दोन्ही ओळी स्वतंत्ररीत्या उत्तमच, आवडल्या. परंतू राबता जरा अस्पष्ट वाटला.

ह्याचे कारण म्हणजे, "नौका, लाटा, हवा, आणि वारा ह्या सगळ्यांवर तुझी मालकी असल्याने माझ्या जिवंत शरीराला त्यातले काहीच उपभोगायला मिळत नाही" असा आशय पहिल्या मिसर्‍यात गृहीत धरावा लागत आहे.

दुसर्‍या मिसर्‍यात निदान कलेवराला तरी तो लाभ होऊदे/किंवा ते भाग्य मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली गेली असल्यामुळे, जिवंतपणी मला काहीच मिळणार/मिळत नाही हा भाव असावा असे वाटले.

इतका आशय स्पष्ट करण्यास पहिला मिसरा कमी पडतोय असे वाटले. त्यात फक्त तुझे काय काय आहे त्याचे वर्णन आले आहे परंतू दुसरा मिसरा वाचल्यानंतर समजते की कवीला ते स्वतःला मिळत नाही ह्याची खंतही व्यक्त करायची आहे. आणि जे आहे ते फक्त तुलाच आहे असे दाखवायचे आहे.

ह्या व्यतिरीक्त काही वेगळा आशय अपेक्षित असल्यास आपण स्पष्ट करावेत प्रोफेसर.

मतल्याबाबत विजय पाटलांशी काही प्रमाणात सहमत! लकाकतो तारा हा शेर छान वाटला. पण एकंदर गोटीबंदपणा व काही ठिकाणी वजनदारपणा कमी पडला असे माझे मत आहे. क्षमस्व! चुभुद्याघ्या

न रंग आहे, न रूप आहे, न कोणत्याही बड्या उपाध्या!
तरी कसा प्रेक्षणीय वाटे, जगास माझाच हा पिसारा?

हरेक दिवशी नवीन गझला! जगास आश्चर्य काय वाटे?
तुझ्या कृपेचा कटाक्ष आहे, म्हणून फुटतो मला धुमारा!

अशी दिशाभूल ते जगाची उगाच नाही करीत होते;
दहा दिशांना सदैव त्यांचा पहा कसा वाजतो नगारा!

अजिबात नाही आवडले, निव्वळ आत्मकेंद्री, वैयक्तिक पातळीवर स्वतःचेच गुणगान गाणारे वाटले (वैम )

राग नसावा.

-सुप्रिया.

इथे वैयक्तिक कुणाशीच काहीही देणे-घेणे नाहीय बेफीजी.

जी गझल वाचून जे वाट्ले ते लिहिले Happy

-सुप्रिया.

ओक्के ...

अरे देवा! तुमचीही ताईच का ?

प्रोफेसर साहेब वयाचा नाही पण देवपणाचातरी अधिकार गाजवाच हो...

ताई वैगरे नको प्लिजच! सुप्रिया ठीक राहिल.. Happy

-सुप्रिया.

<<<हा प्रतिसाद भारी आहे सुप्रियाबाई>>>>

गुड! शाळेची आठवण करुन दिलीत बेफी Happy

सुप्रियाजी!(दुरुस्ती केली आहे)

काय आहे, प्रत्येकाची profile बघायला सवड मिळत नाही.
बर वयाचा अंदाज मायबोलीवरील लिखाणावरून व प्रतिसादावरून बांधणे निव्वळ अशक्य आहे असे आतापर्यंतच्या आमच्या येथील स्वल्प वावरावरून आमच्या लक्षात आले आहे! बुजुर्ग कोण? थोर कोण? सान कोण?.........काही कळेनासे होते.
म्हणून आम्ही आतापर्यंत प्रत्येकास प्रतिसाद देताना नावास जी लावायचो(जरी हांजी हांजी करणे आमच्या रक्तात नाही तरी!)

पण हळूहळू वैचारीक घरोबा/सलोखा वाढल्यावर काहींना एकेरी संबोधू लागलो आहोत. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थिनिंनाही आहो ताई असेच संबोधतो! असो.

आता प्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल बोलतो...........

प्रथम आपल्या प्रांजळ, परखड व निर्भीड प्रतिसादाबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो! कारण आम्ही वाहवापेक्षा, टीकेची व लोक काय समजतात यांचा जास्त आभ्यास करतो. (फिकीर करतोच असे नाही) असो.

आपण जे ३ शेर चोखंदळपणे (चांगल्या अर्थाने म्हणत आहे) न आवडले, वैयक्तीक गुणगान करणारे व निव्वळ आत्मकेंद्रित आहेत म्हणून कोट केले आहेत
त्यांविषयी थोडेसे..............
(बाकीचे शेर आवडले, ठीक वाटले, बरे आहेत असे समजायचे काय?)
काव्यामधे काय, गझलेत काय.............

मी, माझा, माझे म्हणजे काय स्वत: कवीच नेहमी असतो काय?

ते प्रातिनिधिक नसते काय?

कवी, शायर, गझलकार हा फक्त निमित्तमात्र असतो.

सच्चा कवी आपल्या वैयक्तीक सुखदु:खांचे अवडंबर कधीच माजवत नाही.

त्याच्या शब्दांमधे वरवर जरी तशी छटा दिसली तरी, वाचल्यानंतर वा ऎकल्यानंतर
आपणास कळते की, तो जगातील अनेकविध प्रवृत्तींवर/विकृतींवर बोट ठेवत आहे.

आपल्याला आत्मकेंद्रित वैयक्तीक वाटल्याने आवडले नाही, हे बघून आम्ही मात्र जाम खुश झालो आहोत! कारण आम्हाला ज्या भावना पोचवायच्या होत्या त्या चपखलपणे आपल्यापर्यंत पोचल्याचे आपल्या सात्विक संतापावरून दिसून आले. चला माझे लिखाण सार्थकी लागले म्हणायचे तर!

आहो, खलनायकाच्या वर्तणुकीचा आपणास राग येतोच की!
पण लोक त्याच्या अभिनयाची तारीफ नायकापेक्षा जास्त करताना दिसतात.
शिवाय पडद्यावरचा खलनायक वैयक्तीक जीवनातही तसाच असतो काय? की, लोकांनी त्याचा रागच करावा!

आहो कलाकृतीतून कलाकार बाजूला झाल्याशिवाय अस्सल कलाकृती ही साकारतच नाही! असो.

गझलेतील दोन ओळींच्या शेरात एक स्वयंपूर्ण कविता मांडायची असल्याने सूचक
शब्द, प्रतिमा, म्हणींचा विपुल व मार्मिक वापर मी, तू, ती, ते, माझा, त्यांचा असे शब्द येणे अपरिहार्य असते. इथे मी म्हणजे तू, ती, ते असू शकतात!

सुप्रियाजी, आम्ही आपणावर काय रागावणार?
खरे सांगू का आम्ही आमच्या मुलांवर, पत्नीवर, विद्यार्थ्यांवर, कुणावरच रागवत नाही. कारण राग आमचा शत्रू नंबर एक आहे!
आहो, आम्ही ऎसपैस गझलेच्या धुंदीतच जगणारे प्राणी आहोत. कसला आला राग, द्वेश व मत्सर?
अस्सल गझलेपुढे आम्ही नेहमीच नतमस्तक असतो!
..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

बेफिकीरजी!
नुकत्याच रिमझिमू लागलेल्या लोभाचा क्षणातच संहारात्मक प्रपात झाला म्हणायचा<<<<<<<<<<<<<<

लै भारी! झाक! चिमटा काढलात राव! आवडले बुवा आपल्याला!

आहो, भूषणराव घरात साक्षात धोधो कोसळणारा नायगरा आहे, ज्याचा संहार आम्ही गेले ४४ वर्षे यशस्वीपणे झेलतो आहोत! त्यामुळे बाकीच्या चाउम्याऊ प्रपातांचे आम्हास काय वाटणार?

भूषणराव, दिवा देणे म्हणजे काय हो?
बाकी आम्ही कोणत्याही विद्यार्थिनीला आहो ताई, असेच संबोधतो!

टीप: नेमक्या कोणत्या शेरात व कोणत्या ठिकाणी गोटीबंदपणा व वजनदारपणा कमी वाटला? कळवलेत तर तो बिघाड आम्हास दुरुस्त करता येईल!
...............................................................................................

विजयराव! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मतल्यातला आपण जो अर्थ दिला आहे तोच आम्हाला अभिप्रेत होता.
सगळ्या गोष्टी तुझ्याच होत्या. पण जिवंतपणी त्या कधीही आमच्या होवू शकल्या नाहीत हे आम्ही जाणीवपूर्वकच पहिल्या मिस-यात गुलदस्त्यात ठेवले होते, अव्यक्त ठेवले होते.
आम्ही हा suspence दुस-या ओळीच्या पूर्वार्धात थोडासा leak केला..........
निदान माझ्या कलेवराला तरी..........या शब्दयोजनांनी व किनारा काफिया वापरून सस्पेन्सचा पूर्ण उलगडा केला.
यात काही चूक आहे का?

आपण म्हणता त्याव्यतिरिक्त अन्य आशय आमच्या मनात नाही!

कृपया सानी मिसरा हाच ठेवून पर्यायी उला मिसरा सुचवाल काय?
वाचायला व शिकायला आवडेल!
>.............प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................................

अशाच एका भ्रमात माझी तमाम मी वाटचाल केली.....
लकाकतो माझियाचसाठी, कुठे तरी दूर एक तारा!

हा शेर खूप आवडला .. बाकी गझल छान