जगायची जन्मठेप झाली!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 September, 2012 - 14:25

गझल
जगायची जन्मठेप झाली!
झुरायची जन्मठेप झाली!!

हपापल्या या दिशा मधाला;
फुलायची जन्मठेप झाली!

पुसायला आसवे जगाची;
हसायची जन्मठेप झाली!

खुणावणा-या अनेक वाटा....
फिरायची जन्मठेप झाली!

स्फुरायची शायरी अशी की,
लिहायची जन्मठेप झाली!

सुसाट वा-यासमान होतो;
वहायची जन्मठेप झाली!

सुगंध देण्यास जन्म झाला....
झिजायची जन्मठेप झाली!

नशाच होती तुझ्यात गझले!
रमायची जन्मठेप झाली!!

रडायलाही उसंत नव्हती;
कण्हायची जन्मठेप झाली!

हळू हळू तीळ तीळ तुटलो.....
मरायची जन्मठेप झाली!

असे जुगा-यासमान जगतो;
हरायची जन्मठेप झाली!

मुळात मी एक ओल होतो!
मुरायची जन्मठेप झाली!!

असेन मी जन्मजात वणवा!
जळायची जन्मठेप झाली!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन गोरे | 25 September, 2012 - 00:05 नवीन
बीअरचा एक कॅन ढोसता
मुतायची जन्मठेप झाली.<<<

सचिन गोरे, चार दिवस तीन तासातच मुतायची वेळ आली म्हणजे कमाल म्हणायची.

================================================

१८ मधील १० मात्रा रदीफेने चघळल्या आहेत, आठ मात्रांवर विश्वनिर्मीतीची मर्यादा!

==========================================================

हपापल्या या दिशा मधाला;
फुलायची जन्मठेप झाली!

पुसायला आसवे जगाची;
हसायची जन्मठेप झाली!

खुणावणा-या अनेक वाटा....
फिरायची जन्मठेप झाली!

स्फुरायची शायरी अशी की,
लिहायची जन्मठेप झाली!

हळू हळू तीळ तीळ तुटलो.....
मरायची जन्मठेप झाली!

मुळात मी एक ओल होतो!
मुरायची जन्मठेप झाली!!

असेन मी जन्मजात वणवा!
जळायची जन्मठेप झाली!!

========================

व्वा व्वा! सुंदर गझल प्रोफेसर साहेब! नो तकलादू शेर! धन्यवाद व अभिनंदन! (दाद देताना काही शेर गाळले आहेत कारण त्यातील काही शेर मी खाली चर्चेस्तव घेतलेले आहेत. कृपया कोणताही गैरसमज नसावा. निव्वळ टाईमपास करणे शक्य आहे म्हणून चर्वीचरण!) Happy

सुसाट वा-यासमान होतो;
वहायची जन्मठेप झाली!
>>>

येथे मला 'वहायची' ऐवजी थिजायची हे अधिक भावले असते. कृ गै न!

तसेचः

सुगंध देण्यास जन्म झाला....
झिजायची जन्मठेप झाली!<<<

येथे मात्र झिजायची ऐवजी 'वहायची' हा काफिया अधिक भावला असता. (वैयक्तीक मत) कृ गै न!

तसेचः

नशाच होती तुझ्यात गझले!
रमायची जन्मठेप झाली!!
<<<

सुटेल निर्दोष त्या गझलला
रमायची जन्मठेप झाली (असा शेर सुचला. कृपया गैरसमज नसावा. निव्वळ वेळ आहे म्हणून काहीतरी चबकटबक करून पाहिले)

त्याचप्रमाणे:

रडायलाही उसंत नव्हती;
कण्हायची जन्मठेप झाली!<<<

हा शेर नीटसा पटला नाही. Sad

वर पुन्हा:

हळू हळू तीळ तीळ तुटलो.....
मरायची जन्मठेप झाली! <<< व्वा व्वा! उत्तम शेर प्रोफेसर साहेब! (हेच लिहायला येथे रिपीट केला होता). Happy

शिवायः

असे जुगा-यासमान जगतो;
हरायची जन्मठेप झाली!<<<

दोन ओळीतील 'काळात' फरक आहे. 'जगलो' असेही चालावे बहुधा, की टायपो असावा?

पण जुगारी फक्त हारतोच का? की जिंकतोही कधीकधी? (माझ्यासारखा Wink )

हे सर्व झाल्यानंतरः

मुळात मी एक ओल होतो!
मुरायची जन्मठेप झाली!!
<<<

ओल जी असते तिला 'ओल'च राहण्यात स्वारस्य असेल की मुरण्यात? मुळात जी ओल आहे तिला ओलच राहण्यात स्वारस्य असेल असा माझा अंदाज आहे. म्हणून माझ्यामते येथे 'सुकायची जन्मठेप झाली' असा मिसरा अधिक संयुक्तिक ठरावा असे वाटते. (किंवा मग चक्क 'भिजायची जन्मठेप झाली' हाही!)

अर्थात, 'ओल' मुरतेही, पण ती तिची जन्मठेप असते की काय असते? एक प्रकारे 'मुरायची जन्मठेप झाली' हा अप्रतिम मिसरा व शेर आहे. (पण मला हे माहीत नाही की मी ज्या दृष्टीने म्हणतोय त्याच दृष्टीने तो तुम्हालाही अभिप्रेत आहे का!)

सुंदर गझल!

-'बेफिकीर'!

पुसायला आसवे जगाची;
हसायची जन्मठेप झाली!

स्फुरायची शायरी अशी की,
लिहायची जन्मठेप झाली!

सुगंध देण्यास जन्म झाला....
झिजायची जन्मठेप झाली! (चंदनाच्या खोडाचा संदर्भ स्पष्ट होत नाही. तरी आवडला.)

रडायलाही उसंत नव्हती;
कण्हायची जन्मठेप झाली!

हळू हळू तीळ तीळ तुटलो.....
मरायची जन्मठेप झाली!

असे जुगा-यासमान जगतो;
हरायची जन्मठेप झाली!

हे सगळं आवडलं.

हपापल्या या दिशा मधाला;
फुलायची जन्मठेप झाली!

हा शेर आवडला.

Happy

छोटया बहरातल्या गझलेत गझलीयत जास्त अन शब्दछ्ळ कमी अस मस्त समिकरण साधता आपण ( मावैम.)

काफियांच्या फेरबदलांबद्दल बेफिंशी सहमत .

-सुप्रिया.

खरोखरच .............अनेक शेर फार म्हणजे फारच भारी झालेत सर
खूप मजा आली
धन्स !!
_______________________________

अवान्तर:

सुप्रियातै शब्दःछल असे म्हणायचे आहे ना तुम्हाला ??

त्या "छळ" वरून ...देवसरान्चा आजवरचा मायबोलीवरचा अख्खा वावर क्षणार्धात विश्वरूपदर्शन दाखवून गेला बुवा !!ज्जाम घाबरायला होतय आम्हाला!!

तै ; जमल्यास प्रतिसादात शब्दःछल असा बदल कराच प्लीज !!

Happy

(बाकी आपल्या मताशी सहमत आहोत ; हे वेगळे सान्गणे न लगे नाही का!!)

हपापल्या या दिशा मधाला;
फुलायची जन्मठेप झाली!

पुसायला आसवे जगाची;
हसायची जन्मठेप झाली!

मुळात मी एक ओल होतो!
मुरायची जन्मठेप झाली!!

क्या बात है...सुरेख शेर आहेत..

( पण 'मुरायची' शेरासाठी बेफिजींचे दोन्ही पर्याय जास्त आवडले...)

छोट्या बहरातली एक सुंदर गझल...
शुभेच्छा..

भूषणराव, धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
इथे रदीफ आहे.....जन्मठेप झाली
जन्मठेप शब्द जेव्हा माझ्या मनात आला, त्या क्षणीच, काळजात ही गझल लकाकून गेली व नंतर ती कागदावर उतरवली.

जन्मठेप या रदीफावर चिंतन करताना, मला त्यात अनेक शेड्स जाणवल्या.
जन्मठेप या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे आमरण कैद, तुरुंगवास, कारावास, बंधन, बेड्या वगैरे.

जेव्हा एखादी गोष्ट आपण सतत/सातत्याने करतच राहतो जाणीवपूर्वक/अजाणता, तेव्हा त्या गोष्टीत आम्हाला जन्मठेप वा कैदच जाणवू लागली.
मी अमूक होतो........अमुक आमरण झाले/करावे लागले............अशा अर्थाच्या ओळी व विधाने म्हणजे ही गझल नाही. वरवर ओळी सोप्या वाटतील, पण गुणगुणताना त्यांच्यातील खोली/गहनता निश्चितच जाणवेल!

जन्मठेपेचा असा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर मला खात्री आहे की, प्रत्येक शेर हा काळजाला हात घातल्याशिवाय रहाणार नाही. असो.
आपल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद!

आता आपण सुचवलेल्या बदलाबाबत............

सुसाट वा-यासमान होतो;
वहायची जन्मठेप झाली!

इथे मला अभिप्रेत असलेला अर्थ असा......

एखादा सुसाट वारा सुटावा, तसा मी देखिल आयुष्यात वागू लागलो. इथे सुसाट वहाणे हे वा-याबाबतीत आपण जाणतो. पण आमच्यासारखी काही वेडी माणसे पण असतात, जी वेगवेगळ्या बाबतीत आयुष्यात सुसाट मार्गक्रमण करत असतात, जणू काही त्यांना ते कुणी काम दिले आहे. हळू हळू तो आमचा स्वभावच होत असतो.
कधीच थांबून आम्ही विचार करत नाही की, असे सुसाट वहाण्याची गरज आहे का? का आपण असे करत आहोत? वगैरे.
इथे सुसाट वहाणे ही compulsive behavior होवून बसते म्हणून ती देखिल आम्हास जन्मठेपच वाटत आहे. कोणत्याही गोष्टीत आम्ही सुसाटच वहात असतो.

आता बघा ना, एखदी ओळ/शेर/मतला काळजात घुसला की, झाले आम्हाला स्फुरण चढते, धुंद चढते व व झराझरा शायरीचे मिसरे आमच्या मुखातून बाहेर पडतात. त्याला मग ब्रेकच रहात नाही. आम्ही वहावतच जातो. अशी अनेक उदाहरणे आहेत, पण स्थळकाळाच्या मर्यादेमुळे सर्व इथे देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीत बोलूच! (केव्हा योग येणार आहे, देवालाच ठाऊक!)

बोलत राहिलो तर, आम्ही तासंतास बोलतच रहातो. म्हणून ती सुद्धा आम्हाला बोलण्याची जन्मठेपच वाटते.

आहो, आम्ही staffroom मधे पाऊल ठेवले की, रिकामटेकड्या व चकाटे पिटणा-या प्राध्यापक व प्राध्यापिकांचा गराडा आम्हास पडतो व वेळ वा मूड असो वा नसो, आमची दणादण शायरी सुरू होते! मग भान नसते की, अरे आपल्याला व्याख्यान द्यायला जायचे आहे. थांबायचे कुठे हे माहितच नाही. ही न थांबण्याची जन्मठेपच जणू आम्हास झाली आहे. त्यामुळे आमच्या कडकलक्ष्मी आम्हाला नेहमी खेचत असतात, पण आम्ही मात्र सगळी दावणी तोडून चौफेर उधळतच असतो, असो!

आम्हाला वाटते आम्ही फारच विवेचन केले या शेरावर! मामी घोरत पडल्याने आम्ही हे बिनघोरपणे व चपळाईने लिहीत आहोत!

थिजायची मधे ही न थांबण्याची, वहावत, वहात जाण्याची जन्मठेप व्यक्त होत नाही.

पण तरीही भूषणराव, आपण सुचवलेल्या बदलांचा आम्हास आदर आहे. धन्यवाद!

सुगंध देण्यात जन्म गेला......
झिजायची जन्मठेप झाली!

इथे सुगंध व झिजणे अशा प्रतिमा आम्ही का वापरल्या?
सुगंध फुलांचा असतो. इतरही अनेक सुगंध असतात.
सुगंध सुटणे, दरवळणे, घमघमणे, परिमळ येणे, सुगंध वहाणे, याकडे आमचे लक्ष नव्हतेच!
सुगंध व झिजणे या जोडप्रतिमा आमच्या मनात आल्या कारण, चंदनाचे खोड आमच्या मनात आले. चंदन उगाळताना चंदनाची झीज होते......चंदन कमी होते.
पण, सुगंध सुटतो. तेव्हा सुगंध देण्यासाठी जणू चंदन झिजते हे काव्य आम्हास प्रकर्षाने जाणवले.

शेवटी सुगंध हे एक प्रतीक आहे. कुठलीही चांगली गोष्ट जगाला द्यायची झाल्यास त्यासाठी दात्याला झीज/झळ ही सोसावीच लागते.

अस्सल कलाकार आपल्या कलाकृतीने जगाला मोहून टाकतो. पण, त्याला कलाकृतीनिर्मितीच्या यातना (हव्याहव्या वाटणा-या) या सोसाव्याच लागतात. तेव्हा त्या कलाकृतीचा सुगंध जणू जगाला दिला जातो.

गदिमांनी असंख्य अलौकिक गाणी जगाला दिली. पण ती गाणी देताना त्यांच्या प्रतिभेची, कल्पनाशक्तीची, मनाची, काळजाची किती झीज झाली असेल हे त्यांच्या आत्म्यालाच माहीत!
जगास येतो तो फक्त त्यांच्या गाण्यातला निखळ आत्मिक सुगंध! म्हणूनच उला मिस-यात झिजायची जन्मठेप झाली, असा शब्दप्रयोग केला आहे.

एखाद्या मतल्याने/काफियाने जेव्हा आम्ही रात्रंदिवस झपाटले जातो, तेव्हा आमची दिवसेंदिवस झीजच चालू असते. पण त्यातून सुंदर सुंदर मिसरे/शेर/गझला जेव्हा तयार होतात, तेव्हा त्या सुगंधात आम्ही स्वत: व श्रोते/वाचक/रसिक/विद्यार्थी नाहून निघतात. मला वाटते बरेच विवेचन झाले.
तरी पण, आपल्या वहायची बदलाचाही आम्ही आदर करतो. धन्यवाद!

नशाच होती तुझ्यात गझले;
रमायची जन्मठेप झाली!

इथे आमची आसक्ती, वहावत जाण्याचा स्वभाव वगैरे स्पष्ट झाले आहे. गझलेतील नशा आम्हास जाणवली, जणू गझलरुपी दारूची आम्हास चटक लागली!
एखाद्या मद्यपीडिताने पुन्हा पुन्हा मद्यपान करावे, गुत्त्यात डिंक लावल्यासारखे मद्य पीत बसावे/रमावे, तसे आम्ही गझलेच्या नशेत/धुंधीत सतत रमत/झिंगतच असतो.

माणसाला एखाद्या गोष्टीत गोडी वाटू लागली की, तो तासंतास तीच गोष्ट करू लागतो. त्या गोष्टीतच तो रमत असतो, रममाण होतो. म्हणून एखद्या गोष्टीत रमणे/ बुडून जाणे/वहावत जाणे, यालाही आम्ही एकप्रकारची जन्मठेप समजतो.

सुटेल निर्दोष त्या गझलला व रमणे यातील नाते व अर्थ समजला नाही. कृपया समजावून सांगाल का?

रडायलाही उसंत नव्हती,
कण्हायची जन्मठेप होती!

या शेरात आमच्यासारख्यांच्या वाट्यास आलेले वास्तव मांडले आहे, ते म्हणजे.......
आमचे आयुष्य इतके गतीमान (dynamic) आहे की, रडू आले तरी, रडायलाही आमची जिंदगी आम्हाला वेळ देत नाही! अशा वेळी त्या रडण्याला/आसवांना कुठे तरी मोकळे व्हायला हवे ना(drive), तर ते कण्हण्याने होते. म्हणजेच आयुष्यात इतकी दु:खे, वाईट प्रसंग/गोष्टी/घटना झपाट्याने घडत गेल्या की, रडायला वेळ नसल्याने जगताना सतत कण्हण्याची सवय लागली की, आमच्या कण्हण्यातही आम्हाला जन्मठेप दिसू लागली!

आता देखिल जिने चढताना वजनामुळे (तसे आम्ही वजनदार/भारदस्त/भारग्रस्त आहोतच!) त्रास होतो. पण, महाविद्यालयात ठायी, ठायी विद्यार्थीप्रेक्षक असल्याने मोठ्यांदी विव्हळताही येत नाही. पण, मनातून कण्हतच जिन्यांची चढउतार व्याख्यानांसाठी करावी लागते. परंतु काही कनवाळू भक्तविद्यार्थी/विद्यार्थिनी आमची हातातील अवजड(ज्ञानाने/वजनाने) पिशवी/आमचे दप्तर आपणहून वर्गात नेवून ठेवतात(देवमामींना आमच्या अवजड दप्तराची/ज्ञानाच्या पोतडीची प्रचंड तिडीक आहे) व आम्ही आपले मस्त धुंधीत, गुणगुणत व त्याबरोबर कण्हत देखिल वर्गात प्रवेश करतो. आमची ही कण्हण्याची जन्मठेप, भूषणराव, अजून चालूच आहे!
पहा पटतो का शेराचा अर्थ.
जन्मठेप....आमरण कारावास...क्षणाक्षणाला मरत रहाणे व जगणे म्हणजेच हरघडी/रोज मरण्याची जन्मठेप आम्हास झाली असे आम्ही म्हणतो.

असे जुगा-यासमान जगतो,
हरायची जन्मठेप झाली!

इथे अजून आम्ही जिवंत आहोत. जगणे चालू आहे, म्हणून जगतो असे लिहिले पहिल्या मिस-यात, कारण काय तर, आम्हाला जणू सतत हरण्याची/हरायची जन्मठेप झाली(भूतकाळ) होती, असे आम्हास वाटते. ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली, म्हणून भूतकाळ. मला तरी त्यात काळाची गडबड वाटत नाही. पहा आता तो शेर गुणगुणून!

टीप: काही, निदान आमच्यासारखे जुगारी तर हरतातच व तरीही जगण्याचा जुगार चालूच असतो. जगायला जणू आमचा जीव शिवशिवत असतो, जसे जुगा-याचे हात शिवशिवतात तसे!
कधी कधी हरण्यातही जीत असते बर का भूषणराव!

मुळात मी एक ओल होतो;
मुरायची जन्मठेप झाली!

इथे ओल व मुरणे अशा प्रतिमा का वापरल्या?

ओल म्हणजे आर्द्रता, भिजलेले असणे, आशास्थान, सुलभता वगैरे.

मुरणे म्हणजे.............
एखादा द्रव पदार्थ घन पदार्थात शिरून त्यात राहणे, जिरणे, शोषून घेतल्यासारखे
चांगले विरजणे (उदाहरणार्थ दूध)
रुजणे, पक्व दशेस येणे (उदाहरणार्थ बी)
गंभीर,शांत होणे, सवयीने तरबेज होणे, पूर्ण परिचित असणे
इच्छा, क्रोध, वासना दबणे, कमी होणे
बारीक ज्वर अंगात राहणे
गळू/फोड न फुटता बसणे
चिंतनात गढून जाणे, अपेक्षेपेक्षा जास्त खप होणे
लाक्षणीक अर्थ तृप्त होणे वगैरे

उरणे शब्दाची इतकी व्याप्ती आहे.

पहा विचार करून! आता पुन्हा शेर वाचा, पहा काय वाटते ते.

आता ओल ही हळू हळू वाढू शकते, झिरपू शकते, कदाचित पाझरूही शकते (अधिक झाली तर)
झिरपणे......infiltration
पाझरणे..........percolation
(आमच्यातला groundwater geologist बोलतोय भूषणराव!)
या सगळ्या क्रियांना ओल मुरणे असे आम्ही म्हणतो म्हणजे ओल पसरणे/वाढणे वगैरे.

आता ओल स्वत: मुरण्यात खुश असेल का?
बर, सारखे तिने मुरतच रहावे का?
तिला विश्रांती/चिरवि
श्रांती/बदल नको का?
>हे प्रश्न आहेत.
आर्द्रतेचा source बंद झाला की, म्हणजेच गळती बंद झाली की, ओल सुकू लागते.

आता मुळात मी एक ओल होतो......असे आम्ही का म्हणले ते सांगतो.........
आमच्या व्यक्तीमत्वात/वागण्यात/बोलण्यात/शेरात/गझलेत एक ओलावा/आर्द्रता आहे. जिथे जातो तिथे आमची ही ओल पसरत जाते. मुरत जाते.
हम छा जाते है!
आता आमच्या अस्तित्वाची ही ओल सगळ्यांनाच आवडेल का?

(अवांतर: आमच्या वरच्यांच्या न्हाणीघराची ओल सध्या आमच्या मोठ्या शयनगृहात मुरत आहे, कधी कधी पाझरत आहे. आमच्या कडकलक्ष्मी रोज त्यासाठी झुंजत आहेत व आम्ही या गझलेच्या धुंदीत रोज त्यांना बगल देत आहोत!)
आम्हाला सुद्धा मुरण्याची, पसरण्याची इतकी सवयच लागली की, जणू मुरण्याचीच जन्मठेप झाली आहे(झिरपण्याची व पाझरण्याची)

मला वाटते आम्ही शेरावर बरेच बोललो, थांबतो!

आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. पहिल्यांदा आपला प्रतिसाद वाचत होतो तेव्हा चपापलो! इतके शेर आपण कोट करत सुटलात, म्हटले शेवटी काय लिहितात भूषणराव, कुणास ठाऊक! शालजोडीतले तर नाही मारत आहेत? पण पुढे वाचत गेलो तेव्हा आपल्या प्रतिसादातले गांभिर्य समजले व त्यामुळे हा लिखाणाचा प्रपंच!

विस्तारीत प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद भूषणराव!
आपली मते कळवलीत तर वाचायला व शिकायला आवडेल!
>.........प्रा.सतीश देवपूरकर

........................................................................................................

सुप्रियाताई!
गझलीयत जास्त अन् शब्द्छळ कमी! <<<<<<
वा! वा! सुप्रियाताई, तुमच्या प्रतिसादाची शब्दकळा काळजाच्या आरपार गेली!
धन्यवाद!
........प्रा.सतीश देवपूरकर
.......................................................................................

वैभवा!
शब्दछळाचे शब्दच्छल करतोस काय? वा रे बेटा!
बाकी आमच्या कडकलक्ष्मी देवमामी, हे काय शब्दच्छल करत बसताय तुम्ही/तू (लाडात आल्या तर), शब्द चिवडीत बसताय तुम्ही, असे घणाघाती घाव आमच्यावर करतच असतात! पण, आम्ही मात्र मामींची पाठ कधी सोडत नाही, कारण त्या psychologist आहेत. शब्दांच्या बारिकसारिक छटा त्यांना माहीत असतात. म्हणून आम्ही मोठ्या चतुराईने व चपळाईने, लाडीगोडीने त्यांच्याकढून त्या छटा वदवून घेतो.

वैभवा, अलीकडे मी त्यांना माझे निवडक (भारंभार नव्हे) शेर भीतभीत का होईना पण ऎकवत असतो, त्यांचा मूड व तुलनेने सौम्य अवतार बघून! नाही तर शेर राहिले बाजूला आणि काही तरी कुस्पट काढून आमची हजामत सुरू होण्याचीच शक्यता जास्त असते. असो. (कळेल बेट्या तुलाही लग्न झाले की)

छळ शब्दावरून आमचा मायबोलीवरचा अख्खा वावर क्षणार्धात विश्वरूप दर्शन देवून गेला काय?..........घाबरतोस काय? आणि वर हळूच बोचरे प्रतिसादही देतोस काय?
(थट्टेने म्हणतोय रे बाबा! मला आता बोचरेपणा सोसण्याची कला अवगत झाली आहे, कारण, गेले ४४ वर्षांचा अनुभव आहे राव आमच्या गाठीला!)

आमची एक अष्टाक्षरी कविता देण्याचा मोह अनावर होतोय, वैभवा! म्हणून या अष्टाक्षरीचा काही भाग आम्ही तुला अर्पण करत आहोत, जी खूप जुनी रचना आहे.
कृपया ही बोच बोचून घ्यावी...........

फुले वेचता वेचता काटे परडीत आले!

मग, एकेका काट्याचे हळूहळू फूल झाले!!

फुले उधळू लागली, माझ्या स्वप्नांचा सुगंध;

कळ वेदनेची माझ्या झाली आपोआप मंद!

आता फुले आणि काटे असा भेद कुठे वाटे?

जशी हासतात फुले, तसे हासतात काटे!

.........प्रा.सतीश देवपूरकर
आता सांग वैभवा, आमचा छळ देखिल शेवटी हवाहवासा वाटतो की नाही?
प्रामाणिकपणे कबूल करायचे बर का!)
वैभवा, ही सगळी देवमामींची कृपा बर का!


टीप: सुप्रियाताईंचा आता कुठे लोभ आमच्यावर रिमझिमू लागला, तेवढ्यात त्यांना
फितवतोस काय!
कुटिल कुठला! बिलंदर, लब्बाड....अजून खूप काही विशेषणे उचंबळत आहेत, पण आम्हाला आता महाविद्यालयात जायचे आहे, म्हणून थांबतो आहोत.....वाचलास गड्या!
>.............प्रा.सतीश देवपूरकर
....................................................................

वैभवा, ही सगळी मामींची कृपा बर का!<<<

प्रोफेसर साहेब, देवमामी म्हणायचे विसरत जाऊ नका हो? येथे मायबोलीवर दोन मामी आहेत. एक अश्विनीमामी आणि एक कार्तिकीमामी! कार्तिकीमामींना नुसते मामी म्हंटले जाते

Biggrin Biggrin Biggrin

देवसर आज प्रथमच आम्हाला तुमचे प्रतिसादही मनापासून आवडले
बेफीजीन्चे तर नेहमीप्रमाणे आवडलेच हे वेगळे सान्गायला का हवे?

बाकी आज प्रथमच आपली ; गझल /पर्यायी व्यतिरिक्त "शुद्ध कविता" वाचायचा योग आला हे भाग्यच (मस्तय कविता लैच भारीये!!)

कळेल बेट्या तुलाही लग्न झाले की>>>>> घाबरवू नका ना सर ......हे बरोबर नैये बरका !!

बादवे : विषय निघालाच आहे म्हणून सान्गतो .....( तेवढीच जाहीरातही होईल बसल्या-बसल्या ;)!!).काल मी तो 'कनवाळू' चा शेर दिला होता ना त्या माझ्या प्रस्तावित गझलेची जमीन याच विशयावर आधारित अशीच आहे

आईबाबा बोलत होते मी स्वप्नाळू झालो आहे
(हंगामाच आहे लग्नांचा !!...मी लग्नाळू झालो आहे!! )

Lol Lol Lol !!!

बेफिकीरजी!
मी बराच विस्तारीत प्रतिसाद दिला होता. आपली त्यावरील मते (विस्ताराने) वाचायला उत्सुक आहे. कृपया वेळ काढून लिहाल का? म्हणजे माझ्या काही धारणा चुकीच्या असतील तर मला सुधारणा करता येतील.
प्रा.सतीश देवपूरकर