ऐतिहासिक ठिकाणे/ घटना व त्यामागील आख्यायिका/ इतिहास

Submitted by निंबुडा on 20 September, 2012 - 03:15

मागील आठवड्यात कुंभलगड आणि उदयपूर ह्या राजस्थानमधील २ ठिकाणांना भेट दिली. जसे आपल्याकडे शिवाजी महाराज ह्या नावाविषयी जिव्हाळा आहे तसे तिथे महाराणा प्रताप ह्या व्यक्तीसाठी आहे.

एका वस्तु संग्रहालयात त्या काळची चित्रे, वस्तु ह्यांचे जतन करण्यात आलेले आहे. एका चित्रांच्या दालनात राणी पद्मिनीचा जोहार, पन्ना दाईचे लहानग्या उदयसिंह ला वाचविण्यासाठी स्वतःच्या बाळाचे दिलेले बलिदान, हल्दी घाटीची सुप्रसिद्ध लढाई, चेतक घोड्याचा मृत्यू ह्या विषयावरील चित्रे दिसली. त्यामागचा इतिहास अगदी थोडक्यात लिहिला होता. शालेय जीवनात हा सर्व इतिहास वाचल्याचे स्मरते. पण कालपरत्वे सर्व विसरायला झाले आहे.

ह्या धाग्यावर अशा सर्व आपणास माहीत असलेल्या ऐतिहासिक/सांस्कृतिक/पौराणिक ठिकाणे व त्यामागील आख्यायिका/ इतिहास वगैरे संकलित करुया का? भारत व भारताबाहेरील ठिकाणे ही अंतर्भूत करुया.

(मी वर लिहिलेल्या घटनांच्या तपशीलवार गोष्टी कुणाला माहीत आहेत का? जाणून घ्यायला आवडेल.)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निंबुडा.....तुम्ही लेखाच्या शीर्षकात 'आख्यायिका' शब्दाचे योजन केले आहे ते फार चांगले झाले. 'इतिहास' हा विषयच असा काही समोर येत असतो की त्यामध्ये रुक्ष सनावळ्या आणि वंशवेल यापेक्षाही जादाचे काहीतरी हवे असते इतिहासप्रेमींसाठी.....पण इतिहासाच्या अभ्यासकाला एखाद्या घटनेभोवती मुद्दाम चढविण्यात आलेल्या मखरामध्ये कसलेही स्वारस्य नसते, त्याला मागोवा घ्यायचा असतो तो 'निखळ सत्याचा'. मग सत्यशोधनामध्ये काही कटु आणि अप्रिय अशाही घटनांना सामोरे जावे लागते....त्याचा त्याने आपल्या शोधनिबंधात केलेला उल्लेख बहुजनांना कधीच पचनी पडत नसतो...त्याला कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या समोर असते ती त्या ऐतिहासिक स्थळाबाबत, घटनेशी जोडलेली हजारो वर्षाच्या 'आख्यायिका'. अशा आख्यायिका इतक्या रोचक असतात की त्या भोवताली जमा झालेल्या गारुडाने वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो.

उदयपूर आणि कुंभलगड तसेच राजस्थानमधील तत्सम अनेक केन्द्रांना स्थळांना मी भेटी दिल्या आहेत. त्या त्या ठिकाणाचे गाईडस मोठ्या उत्साहाने राणी पद्मिनी, चेतक घोडा, पन्नादाईचा त्याग, हल्दी घाटी आदी कथांवर अ‍ॅक्शन चित्रपटासम कहाण्या सांगत असतात ज्या पर्यटकांना नक्कीच भावतात....अर्थात इतिहास जपण्यासाठी काही मसालेदार गोष्टी सांगणे क्रमप्राप्त असतेच....ललित लेखकही त्यात आपल्या साहित्याद्वारे भर टाकत असतोच.

मुद्दा असा की, इतिहासकारांच्या मते 'राणी पद्मिनी' नामक कुणी स्त्री अशी आरशात खिलजीच्या इच्छेसाठी उभी राहिली होती ही एक दंतकथा होय. ती एक केवळ कविकल्पना होती. राजपूत स्त्रिया म्हणजे मूर्तीमंत त्यागाची प्रतिमा....पतिव्रता....लज्जारक्षणासाठी प्रसंगी जोहार करून जीव देणारी....अशा कथा त्या त्या समाजाला फार रुचत असल्याने 'कथेकरी' वेळोवेळी अशा कथांना सत्यातील काही पूट चढवून त्या समाजात पसरवित असतात. पात्रांचे ग्लोरिफिकेशन होते त्या निमित्ताने. पद्मिनीची ही कथा येते ती "पद्मावर्त' या काव्यात. अल्लाउद्दीन खिलजीने तिची कामना करणे, मग चितोड वाचविण्यासाठी राणा रतनसिंहाच्या विनंतीवरून पद्मिनीने वाड्याच्या एका खोलीच्या आडाला उभे राहून आरशात आपले स्वर्गीय सौंदर्य खिलजीला दाखविणे, तेवढ्यावर समाधान मानून खिलजीने परत फिरणे, मग दगलबाजीने रात्री गडावर तिच्या प्राप्तीसाठी हल्ला करणे....इ.इ. गोष्टी या काव्यात आलेल्या आहेत. त्याच्याशी प्रत्यक्ष इतिहासाचा संबंध नाही. इतिहास हा आहे की इ.स. १३०३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी याने चित्तोडगडावर स्वारी करून राणा रतनसिंगचा पराभव केला आणि मुघल सैन्याच्या तावडीत आपण सापडू नये यासाठी राजपुत स्त्रियांनी 'जोहार' केला त्यात राणी पद्मिनीदेखील होती.

'चेतक' ची देखील अशीच कथा. प्रत्यक्षात 'चेतक' हे घोड्याचे नाव नसून ती राजस्थानातील घोड्याची एक जात आहे. 'अबलख' जातीच्या घोड्याप्रमाणेच. चेतक आणि नातक अशा दोन जाती आहेत. पैकी चेतक युद्धकाळासाठी उपयुक्त असे तेज जनावर मानले जाते तर नातक मालवाहतुकीसाठी टणक म्हणून.

हल्दीघाटीची लढाई आणि राणा प्रतापचे राजस्थानच्या जडणघडणीत असलेले शिवछत्रपतींच्या तोडीचे स्थान....ह्या गोष्टी मात्र सर्वमान्य आहेत, ज्याना इतिहासतज्ज्ञांचाही पाठिंबा आहे.

'इतिहास' आणि 'आख्यायिका' हे दोन्ही विषय आजकाल फार नाजूक समजले जातात त्यामुळे सविस्तर लिहिणेही काहीवेळा अवघड वाटते.

अशोकजी,
खूप छान पोस्ट.

आपल्याकडेही हिरकणीची गोष्ट सांगितली जाते. तीत खरा इतिहास काय नि आख्यायिकेचा भाग किती हे कळणे अवघड आहे. त्याचप्रमाणे गोष्ट सिंहगडाच्या नामकरणाची. मी कुठेतरी असे वाचल्याचे आठवते (बहुदा पुरंदरेंच्या राजा शिवाजी मधे) की सिंहगड हे नाव तानाजींच्या बलिदानाच्याही आधीच त्या गडाला दिले गेले होते व ऐतिहासिक कागदोपत्री तसे पुरावे ही आहेत. पण आपल्याकडे "गड आला नि सिंह गेला" ह्या नावाने सिंहगडाच्या नामकरणाचीही कथा सांगितली जाते.

ह्या धाग्यावर त्या रंजक आख्यायिका समजणे अपेक्षित आहेच, पण इतिहासकारांचे व संशोधकांचे त्यावरचे संशोधन काय आहे, खरे व अस्सल पुरावे काय सांगतात ह्याचीही चर्चा झाल्याच दुधात साखरच. Happy

राणी पद्मिनीने स्वतःच्या शीलाची विटंबना वाचविण्याचा मार्ग म्हणून राजवाड्यातल्या एका विहिरीत उडी मारून जीव देण्याची कल्पना मांडली व इतरही स्त्रियांनी त्यास अनुमोदन देऊन आत्मसमर्पण केले ही इतक्या एकच ओळीत कथा माहीत आहे.
उदयपूर येथील एका वस्तु संग्रहालयात एका चित्रात राणी पद्मिनीचे आगीच्या ज्वाळांनी वेढलेले चित्र होते. आगीत उड्या घेतल्या की विहिरीत?

इतिहास आणि आख्यायिका या एकमेकापासून वेगळ्या ठेवलेल्याच बर्‍या.
राणा प्रतापचे राजस्थानच्या जडणघडणीत असलेले शिवछत्रपतींच्या तोडीचे स्थान>>> माफ करा, पण छत्रपतींचे कार्य हे केवळ एकमेवाद्वितिय आहे आणि केवळ मुघलांशी लढले एवढ्या साम्याखातर त्यांची तुलना राणा प्रताप वा अन्य कोणत्याच मध्ययुगीन राजाशी होउ शकत नाही.
एकच उदाहरण देतो, राणा प्रतापने एका चितोडगडासाठी सगळी हयात वेचली, छत्रपतींनी वेळ आली तेंव्हा तहात कित्येक किल्ले देउन टाकले कारण त्यासर्वांपेक्षा 'स्वराज्य' महत्वाचे होते. असा धोरणीपणा, सतत स्वतःपेक्षाही मोठ्या ध्येयाकडे असलेली निष्ठा हे सगळे केवळ अतुलनीय आहे.

पण आपल्याकडे "गड आला नि सिंह गेला" ह्या नावाने सिंहगडाच्या नामकरणाचीही कथा सांगितली जाते.
<<
<<

मला वाटते "गड आला नि सिंह गेला" ह्या नावाने सिंहगडाच्या नामकरणाची सुरुवात ही "हरी नारायण आपटे" यांच्या "गड आला नि सिंह गेला" या कादंबरीपासून झाली, याच कादबंरीत 'कमलकुमारी', 'घोरपडीच्या सहाह्यांने गडावर मावळे पाठवणे. या असल्या दंतकथा घुसडण्यात आल्या. नंतर शिवशाहीर "बाबासाहेब देशमुख" यांच्या "गड आला नि सिंह गेला" या पोवाड्यातून या दंतकथांचा गावागावात त्याचा प्रसार झाला.

अशोकसर, चांगली पोष्ट.

"पण छत्रपतींचे कार्य हे केवळ एकमेवाद्वितिय आहे ....."

~ मान्य आगाऊ.....मी केलेले ते एक ढोबळ विधान मानावे. दोन्ही व्यक्तींना त्या त्या राज्यात, त्यांच्या त्यांच्या लोकांमध्ये असलेले अनन्यसाधारण महत्व विचारात घेतल्यामुळे साहजिकच इतिहासाच्या दृष्टीकोणातून न्यायपूर्ण वाटावी अशी तुलना होणे नैसर्गिक मानावे लागते. सम्राट अकबरचे कार्यदेखील इतिहासकारांना [ज्यात अनेक हिंदूही आहेत] देशाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अमोल वाटते, त्यामुळे त्याचा कारकिर्दीच्या तुलना करतेवेळी चंद्रगुप्त, अशोक, समुद्रगुप्त, हरिहर-बुक्क आदी अनेक नावे सामोरी येतात, ती अशाच निकोप चर्चेच्या माध्यमासाठी.

अकबर, शहाजहान, औरंगजेब आदी नावे केवळ मुघलांची होती म्हणून त्याना 'इतिहास' अभ्यासताना सर्वार्थाने टाकावू समजून चालत नाही. तुलना अपरिहार्य असते अशावेळी.

तुम्ही म्हणता तशी महाराजांची 'स्वराज्य' कल्पना सर्वांना भावणारी होती आणि त्यातूनच त्यांच्या त्या कार्याच्या यशस्वीततेसाठी तळहातावर शीर घेऊन लढणारे साथीदार त्याना मिळाले होते.

@ विजय.....थॅन्क्स....'घोरपड' दंतकथेचा उल्लेख केला ते आवडले. मी मूळ पोस्टमध्ये हेच म्हणत होतो की काळाच्या कसोटीवर काही अतर्क्य घटना तपासून घेतल्या म्हणजे संबंधित इतिहासकार आपल्या परंपरेचा दुश्मन होत नसून उलटपक्षी तो सार्‍या घटना शक्यतेच्या कानसेवर घासून घेऊनच वाचकांपुढे ठेवण्याचे कार्य करीत असतो. घोरपडीच्या मदतीने किल्ला चढणे हे एक स्वामीनिष्ठेचे आणि प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे काय त्याचे एक उदाहरण मानले जाते.

सर्वमान्य नसलेल्या इतिहासाला आख्यायिका म्हणतात.

सर्वमान्य असलेल्या आख्यायिकेला इतिहास म्हणतात.

( बैजू बावरा सिनेमाच्या आधीची नोट)

शेळीताई, मस्त नोट! खरेच असे होत आले आहे खरे! Happy

राजस्थान मधील कुंभलगडाची आख्यायिका ह्या धाग्यावर टाकली आहे:
कुंभलगड (राजस्थान) - सचित्र माहिती - http://www.maayboli.com/node/38049

मांडवगडाची आख्यायिका:

राणी रूपमती नर्मदेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. गडावरून दूर क्षितिजावर नर्मदा दिसते. पण पावसाळ्यात ढगाळ हवेने दर्शन होत नसे म्हणून म्हणे बाजबहादूराने सायफन पद्धतीचा वापर करून नर्मदेचे पाणी किल्ल्यावर चढवले. (म्हणे)

तेथील अमुक पाणी नर्मदेचेच आहे असे सांगतात. परंतू सायफन सिस्टीमचे थोडे संशयास्पद अवशेष फक्त दिसले होते..

आगाऊ,

आपला इथला प्रतिसाद वाचला. माझं मत थोडं वेगळं आहे.

१.
>> केवळ मुघलांशी लढले एवढ्या साम्याखातर त्यांची तुलना राणा प्रताप वा अन्य कोणत्याच मध्ययुगीन
>> राजाशी होउ शकत नाही.

एका अर्थी आपण म्हणता ते खरं आहे. परंतु राणाप्रताप आणि शिवरायांची परिस्थिती सारखी नव्हती.

महाराजांच्या वेळी अनेक मराठा सरदार स्वतंत्र वा स्थानिक सर्वेसर्वा होते. ते क्षणार्धात धनी (चाकर्‍या) बदलीत. याउलट राणाप्रतापांच्या वेळेस बाकी सारे राजपूत सरदार मोगलांचे अंकित होते. त्यामुळे महाराजांना बांदल, जेधे (यादी अपूर्ण) यांची जशी मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली तशी राणाप्रतापांना मिळाली नाही. तरीही त्यांनी चितोडखेरीज सर्व मेवाड मुक्त केला.

शिवरायांना जसे शहाजीराजांच्या राज्यधुरिणांचे मार्गदर्शन लाभले तसे राणाप्रतापांना मिळालेले दिसत नाही. त्यांचे वडील उदयसिंग त्यांच्या राज्यारोहणास अनुकूल नव्हते.

२.
>> एकच उदाहरण देतो, राणा प्रतापने एका चितोडगडासाठी सगळी हयात वेचली, छत्रपतींनी वेळ आली
>> तेंव्हा तहात कित्येक किल्ले देउन टाकले कारण त्यासर्वांपेक्षा 'स्वराज्य' महत्वाचे होते. असा
>> धोरणीपणा, सतत स्वतःपेक्षाही मोठ्या ध्येयाकडे असलेली निष्ठा हे सगळे केवळ अतुलनीय आहे.

महाराजांच्या गुणांबद्दल वादच नाही. मात्र राणाप्रतापांकडे फार कमी स्थावरे (अ‍ॅसेट्स) होती. तसेच दख्खनप्रांत राजपुतान्यापेक्षा (निव्वळ उदयपूर नव्हे) खूपच बचावनीय (=defendable), बळकटीयोग्य (=fortifiable) व संघर्षांनुकूल आहे. याचाही विचार व्हावा.

राणाप्रतापांनी चितोडखेरीज सर्व मेवाड मुक्त केला. त्यामुळे एका चितोडसाठी आख्खी हयात वेचली हे विधान दुरूस्त करून घ्यावंसं वाटतं. तसेच राणाप्रताप गनिमी काव्याचे जनक मानले जातात. त्यामुळे शिवराय आणि राणाप्रताप आपापल्या स्थानी यथार्थपणे शोभून दिसतात.

हे माझं मत आहे. आपली व/वा इतर वाचकांची मते वेगळी असू शकतात. Happy

आ.न.,
-गा.पै.

>>तसेच राणाप्रताप गनिमी काव्याचे जनक मानले जातात.

वरील विधान चुकीचे आहे,आणि संदर्भ म्हणून जोडलेला विकीपेडिया चा दुवा संदर्भाविना दिलेला आहे.
भारतीय गनिमी काव्याचे जनक शिवाजी महाराजांना मानले जाते,तसेच जगात गनिमी काव्याचा वापर सर्वात परिणामकारकपणे,सूत्रबद्धपणे आणि यशस्वीपणे शिवाजी महाराजांनी केला.त्यामुळेच बर्याच देशांच्या लष्करी अभ्यासात शिवरायांच्या गनिमी काव्याचा ( guerrilla tactics ) समावेश केला जातो.
विएतनाम मधील शिवाजी महाराजांचा पुतळा याची साक्ष देतो.

तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये guerrilla warfare चा अर्थ छोट्या तुकड्यांनी हल्ले करणे असं अभिप्रेत आहे.गनिमी काव्यामध्ये छोट्या तुकडीने हल्ले करणे याबरोबरच वेग,धक्कातंत्र,भौगोलिक स्थिती,प्रत्येक तुकडीने वेगवेगळे अचूक लक्ष्यभेद करणे या गोष्टींनाही अधिक महत्व होते.

>>भारतीय गनिमी काव्याचे जनक शिवाजी महाराजांना मानले जाते
>>> हे पण चुक...

मुद्दामून इथे गनिमी कावा हा शब्द वापरला आहे ! हा मूळ फारसी शब्द आहे आणि याचा उगम हा मोगली इतिहासकारांकडून
बहुदा महम्मद खाफिखाना कडून झालेला आहे.आणि हा शब्द शिवराय आणि त्यांच्या लढायांच्या संदर्भात आहे.शिवाजी महाराजांनी वापरलेल्या मोगलांविरुद्धच्या युद्धतंत्राला घनिम-ए-कावेत असे खाफीखानाने संबोधले आहे.त्यामुळे याचे जनक शिवराय हेच असू शकतात.
गोरील्ला वॉरफेयर आणि गनिमी कावा युद्धतंत्राचाच भाग आहेत पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

संदर्भ-
अख्बारात ए दरबार
मुंतखबउललुबाब - मुहम्मद हाशीम खाफीखान

माझा काही सखोल अभ्यास नाही पण माझ्या आतापर्यंतच्या समजूतीप्रमाणे गनीमी कावा ह्या युद्धशाश्त्राचा पाया निजामशाही सरदार मलीक अंबर ने घातला आणी शहाजीराजांनी , शिवाजी महाराजांनी त्यावर कळस चढवला

हा कुरुंदवाडचा घाट.

इथे संताजी घोरपडे यांची समाधी आहे.

ghat.jpgsantaji.jpg

गावचे लोक आता इथे शिवसृष्टी उभारणार आहेत.

फोटो नेटावरून साभार.

मालोजीराव,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> वरील विधान चुकीचे आहे,आणि संदर्भ म्हणून जोडलेला विकीपेडिया चा दुवा संदर्भाविना दिलेला आहे.

विकीवर दुवा आहे. तो Medieval India – 1000 AD to 1740, by L.P Sharma असा आहे. हे पुस्तक माझ्या हाताशी नाही. त्यामुळे हा संदर्भ खरा आहे का नाही ते पडताळता येत नाही. त्यामुळे राणाप्रताप हे गनिमी काव्याचे जनक कदाचित नसतीलही, मात्र त्यांच्या तंत्राचा अभ्यास मलिक अंबरने केलेला असल्याची दाट शक्यता आहे.

२.
>> गोरील्ला वॉरफेयर आणि गनिमी कावा युद्धतंत्राचाच भाग आहेत पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

तुम्हाला प्रयुक्ती (guerrilla tactics) आणि धोरण (guerrilla staregy) असं म्हणायचं होतं का? राणाप्रतापांनी वृकयुद्धाच्या (guerrilla defense) केवळ तात्कालिक प्रयुक्त्या वापरल्या असाव्यात. मात्र त्याचे परिपूर्ण तंत्र बनवले ते शिवरायांनी.

३.
शेवटी म्हणावंसं वाटतं की वृकयुद्धाची माहीती आधीपासून होती. (उदा. : इ.स. १४५० मधला मलिक उत्तुजारचा पराभव) मात्र त्याचे युद्धतंत्रात रूपांतर करून आश्चर्यकारक रीतीने लढाया जिंकल्या त्या शिवाजीमहाराजांनी.

त्यामुळे मूळ जनक कोण हा प्रश्न तसा अनुत्तरित राहणार आहे. मात्र अधिक तपासाअंती राणाप्रताप ते मलिक अंबर हा दुवा स्पष्ट होऊ शकेलसे वाटते.

आ.न.,
-गा.पै.

गामापैलवान आपला प्रतिसाद आवडलेला आणि पटलेला आहे मूळ जनक कोण नक्की सांगता येणार नाही कारण प्रत्येकाने हि पद्धती वेगवेगळ्या रूपाने वापरली
पूर्वी फक्त छोट्या तुकड्या छुपे हल्ले करायच्या नंतर शिवकाळात त्याला स्वच्छंदी म्हणतात त्याप्रमाणे कळस चढला विरोधी पक्षाची दिशाभूल करणे ,अचूक लक्ष्यभेद करणे,वातावरणाचा आणि भौगोलिक स्थितीचा आधार घेऊन विरोधी सैन्याला trap करणे (उंबरखिंड लढाई,प्रतापगड लढाई), वेषांतर किंवा तत्सम युक्त्या वापरून सुरक्षाभेद करणे (शास्ताखान -लाल महाल हल्ला) ,बेसावध हल्ले करणे (Surprise attacks) इ. गोष्टींमुळे तो गनिमी कावा झाला असावा.