ये म्हणशी मरणा, मज भरभर!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 September, 2012 - 08:22

गझल
ये म्हणशी मरणा, मज भरभर!
मजपाठी जगण्याची घरघर!!

नकोस छाटू पाय चालते;
घे माझे तू पंख हवे तर!

वाट कितीही असेल खडतर;
तुझिया सोबत प्रवास सुखकर!

कुरूपता ही कधी जायची?
कधी व्हायची दुनिया सुंदर?

कसाबसा मी तग धरलेला;
ये धावोनी, आता सत्वर!

वय छोटे पण, दिसतो मोठा!
तारुण्याचा गळला मोहर!!

सगळ्या घटना घडल्या भरभर!
उतार वयही आले लवकर!!

कोण प्रेरणा देतो मजला?
पाझरती या गझला झरझर!

तुझा शेर वाचून वाटते....
घासामध्ये यावा कंकर!

कसली गुर्मी? कुठली मस्ती?
स्थावरजंगम सारे नश्वर!

प्रतिसादांची उलट पावले!
भूतपिशाचांचा हा वावर!!

प्रश्न कितीही भंडावू दे.....
काळच सगळ्यांवरती उत्तर!

पदोपदी पातळी सोडतो!
रोग मनाचा अतिशय दुर्धर!

ढील प्रथम तो देतो, नंतर.....
आवळतोही नाड्या ईश्वर!

हयगय ना नोकरीत केली;
नव्हे नोकरी, ती तर भाकर!

तोच मी! परी, खुर्ची दुसरी;
सलाम करती नोकर चाकर!

यम केव्हाही येवू शकतो....
मला करू दे आवरसावर!

लोक कैक आतून विषारी!
परंतु वाणीमध्ये साखर!!

शोभिवंत मी, तितका नाजुक!
मला जरासे जपून वापर!!

तुझ्याच स्वप्नांची मी चादर!
मलाच अंथर! मलाच पांघर!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै भारी
छोटा बहर मस्त जमलाय सर

शेर ३ , ७, १४ अन २०(मक्ता) ........मतला- ए -सानी आहेत ना ..वा वा मस्त
असो

गझल मस्तय

प्रतिसादांची उलट पावले!
भूतपिशाचांचा हा वावर!!<<< Rofl

==============================

शोभिवंत मी, तितका नाजुक!
मला जरासे जपून वापर!!

तुझ्याच स्वप्नांची मी चादर!
मलाच अंथर! मलाच पांघर!!<< वा वा वा

दोन्ही शेर आवडले.

कुरूपता ही कधी जायची?
कधी व्हायची दुनिया सुंदर?<<< हाही आवडला.

(प्रोफेसर साहेब, फिराक गोरखपुरीची एक गझल ३६ शेरांची, तिची आठवण आली कारण आपली ही गझलही चांगलीच लांबलचक आहे)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

वाहवा.

अतिशय चांगली गझल प्रोफेसर.

काही शेर वैयक्तिक तर काही खरंच वैश्विक झाले आहेत.

अभिनंदन.

नकोस छाटू पाय चालते;
घे माझे तू पंख हवे तर!

प्रश्न कितीही भंडावू दे.....
काळच सगळ्यांवरती उत्तर!

लोक कैक आतून विषारी!
परंतु वाणीमध्ये साखर!! ---------> हे तीन शेर खुप आवडले. Happy

आवडली छोटया बहरातील ही गझल.

कसली गुर्मी? कुठली मस्ती?
स्थावरजंगम सारे नश्वर!......सहीय!

प्रश्न कितीही भंडावू दे.....
काळच सगळ्यांवरती उत्तर!...व्व्वा!

पदोपदी पातळी सोडतो!
रोग मनाचा अतिशय दुर्धर!.....खरयं!

ढील प्रथम तो देतो, नंतर.....
आवळतोही नाड्या ईश्वर!........ये बात!

तोच मी! परी, खुर्ची दुसरी;
सलाम करती नोकर चाकर!......सही फर्माया...

लोक कैक आतून विषारी!
परंतु वाणीमध्ये साखर!!......ह्म्न!

शोभिवंत मी, तितका नाजुक!
मला जरासे जपून वापर!!......व्वा!

तुझ्याच स्वप्नांची मी चादर!
मलाच अंथर! मलाच पांघर!!..... मस्त!

अबब!! केव्हढी मोठ्ठी !!

आणि छोटा बहर अगदी मस्त निभावला असल्याने एकदम लयबद्ध आहे.. एका ठेक्यात ! इतकी लयबद्ध की जर एखाद्या दमेकर्‍याने अख्खी गझल वाचली तर गचकायचाच !! (गंमत आहे बरं का प्रोफेसर साहेब... हलक्यानेच घ्या..! )

कावळ्याने सांगितल्याप्रमाणे काही वैयक्तिक आणि काही वैश्विक शेर आहेत. वैश्विक शेर आवडले.

नकोस छाटू पाय चालते;
घे माझे तू पंख हवे तर!

पदोपदी पातळी सोडतो!
रोग मनाचा अतिशय दुर्धर!

तोच मी! परी, खुर्ची दुसरी;
सलाम करती नोकर चाकर!

यम केव्हाही येवू शकतो....
मला करू दे आवरसावर!

शोभिवंत मी, तितका नाजुक!
मला जरासे जपून वापर!!

२० पैकी उपरोक्त ५ आवडले..